Tuesday, 12 November 2024

मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतत दक्ष रहावे -निवडणूक निरीक्षक (सामान्य) वेद पती मिश्र

 



 

 जालना,दि.10 (जिमाका) :- विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीत होणाऱ्या मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवणारे निवडणूक सुक्ष्म निरीक्षक (मायक्रो ऑर्ब्जव्हर्स) हे भारत निवडणूक आयोगाचे प्रतिनिधी असल्याने निवडणूक प्रक्रियेत त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. आपले काम निरीक्षण करण्याचे आहे. त्यामुळे मतदान केंद्रावर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतत दक्ष रहावे, असे प्रतिपादन निवडणूक निरीक्षक (सामान्य) वेद पती मिश्र यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या नूतन सभागृहात दि.10 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता संपन्न झालेल्या सुक्ष्म निरीक्षकांच्या दुसऱ्या प्रशिक्षणात मार्गदर्शन करताना निवडणूक निरीक्षक श्री. मिश्र हे बोलत होते. यावेळी निवडणूक निरीक्षक श्री. नवीन, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, प्रशिक्षणार्थी आयएएस श्री.अरुण, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांची प्रमुख उपस्थिती होती. निवडणूक निरीक्षक श्री.मिश्र म्हणाले की, मतदान केंद्रावर सकाळी मॉक पोलींग (अभिरुप मतदान) मतदान प्रक्रियेपासून ते सायंकाळी मतदान संपेपर्यत घडणाऱ्या सर्व घटनांचे अवलोकन करुन त्या माहितीचा अहवाल निवडणूक सुक्ष्म निरीक्षकांच्या मार्फत निवडणूक आयोगाकडे वेळेत सादर करणे आवश्यक आहे. असे सांगत त्यांनी भारत निवडणूक आयोगाच्या नियमाबाबत सर्व सूक्ष्म निरीक्षकांना अवगत केले.

निवडणूक निरीक्षक श्री.नवीन म्हणाले की, सूक्ष्म निरीक्षकाचे काम हे अत्यंत संवेदनशील आहे. सर्व गोष्टीवर बारकाईने लक्ष ठेवावे. मतदान केंद्रात प्रवेश करताना मतदारांना मोबाईलसह प्रवेश देणे टाळावे. मतदान केंद्रात कोणत्याही स्वरूपाचा व्हिडिओ किंवा छायाचित्र काढून तो सोशल मीडियावर व्हायरल करणे चुकीचे आहे. त्यामुळे याबाबत सूक्ष्म निरीक्षकांनी दक्षता घ्यावी, असेही सांगितले.

मॉकपोल मतदानाच्या दिवशी पक्षांचे मतदान प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत पार पाडावी व त्यांची स्वाक्षरी घेणे आवश्यक आहे. असे सांगून मतदानासाठी इव्हीएम यंत्र तयार करणे, प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी अभिरुप मतदानाची पद्धत, मतदान यंत्राबाबत करावयाची कार्यवाही अचूकरित्या होत असल्याचे निरीक्षण करावे. मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेले सुक्ष्म निरीक्षकांनी कामे जबाबदारीने पार पाडावी. असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ.पांचाळ यांनी दिले.

निवडणूक सुक्ष्म निरीक्षकांनी करावयाच्या कामकाजाबाबत माहिती देत सूक्ष्म निरीक्षकांना मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावर होणारी कामकाज प्रक्रिया, तेथील अधिकाऱ्यांचे कर्तव्य आणि ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्रणेची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी यावेळी उपस्थितांना दिली.

_*_*_*_*_

 

No comments:

Post a Comment