जालना,दि.25 (जिमाका):
केंद्र पुरस्कृत 21 वी पशु गणना दि. 25 नोव्हेंबर, 2024 पासून सुरू होत आहे.
पशुसंवर्धन विभागाकरिता अत्यंत महत्त्वाची गणना असून, या गणनेमधून प्राप्त होणारी
माहिती पुढील पाच वर्ष नियोजन, धोरणात्मक निर्णय व विविध योजनांसाठी अत्यंत
उपयुक्त असल्याने पशुगणना अतिशय महत्त्वाची आहे.
पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय
विभागामार्फत दर 5 वर्षांनी राज्यातील पशुधनाची गणना करण्यात येते. सदर
पशुगणनेमध्ये 16 प्रजातीच्या पशुधन व कुकुटादी पक्षी जात, लिंग व वय निहाय गणना
करण्यात येणार आहे. पशुगणना दि. 25 नोव्हेंबर, 2024 ते 28 फेब्रुवारी, 2025 पर्यंत
पूर्ण करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. आपल्या जिल्ह्यातील 163 प्रगणक व
37 पर्यवेक्षक यांना सविस्तर सूचना व प्रशिक्षण देण्यात आले आहे. या पशुगणनेसाठी
नागरी भागाकरिता प्रती 4,000 कुटूंबामध्ये एक प्रगणक व 10 प्रगणकामागे 1
पर्यवेक्षक तर ग्रामीण भागाकरिता प्रती 3,000 कुटूंबामागे एक प्रगणक व प्रती 5
प्रगणकामागे 5 पर्यवेक्षक याप्रमाणे नियुक्ती करण्यात आली आहे. दि. 25 नोव्हेंबर,
2024 पासून पशुगणना सुरू करण्याच्या केंद्र शासनाच्या सूचना आहेत. पशुगणना अचूक व
विहित कालावधीत होण्याकरिता वेळोवेळी संबंधितांना मार्गदर्शन करुन आढावा घेण्यात
येणार आहे. तसेच घरोघरी जाऊन पशुगणना करणाऱ्या प्रगणकांना जिल्ह्यातील नागरिकांनी
सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. डी.एम. गोल्हेर, जिल्हा पशुसंवर्धन
उपायुक्त, जालना यांनी केले आहे.
****
No comments:
Post a Comment