Wednesday, 21 February 2024

शासकीय योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दाखविली हिरवी झेंडी




जालना, दि. 21 (जिमाका) – विविध शासकीय लोककल्याणकारी योजनांच्या प्रचार-प्रसिध्दी  चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते आज हिरवी झेंडी दाखवून चित्ररथ जनजागृतीसाठी रवाना करण्यात आला.  हा चित्ररथ जालना जिल्हयाच्या शहरी व ग्रामीण भागात जाणार आहे.‍  जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात आयोजित या कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, जिल्हा रेशीम अधिकारी अजय मोहिते, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी रेश्मा चिमिंद्रे आदिंसह विविध विभागांचे कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-


युवा संसद वक्तृत्व स्पर्धेत प्रथम धनश्री टेकाळे तर स्वप्नील खरात याने द्वितीय क्रमांक पटकावला

 

 

            जालना, दि. 21 (जिमाका) :- जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा संसद वक्तृत्व स्पर्धा दि. 17 फेब्रुवारी 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. यात जिल्ह्यातील धनश्री टेकाळे प्रथम तर स्वप्नील खरात याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. ते दोघेही राज्यस्तरीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.

नेहरु युवा केंद्रातर्फे युवकांमध्ये नेतृत्व गुण विकसित व्हावे यासाठी राष्ट्रीय युवा संसद घेण्यात आली. या स्पर्धेतून जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर वक्तृत्व स्पर्धेच्या माध्यमातून युवक-युवतींची निवड करण्यात येणार आहे. नेहरू युवा केंद्रातर्फे जिल्हास्तरीय राष्ट्रीय युवा संसद वक्तृत्व स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली. या स्पर्धेचे उद्घाटन नेहरु युवा केंद्र संघटन महाराष्ट्र-गोवाचे राज्य संचालक प्रकाश मनुरे यांनी केले. दि. 26 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यस्तरीय स्पर्धा होणार असून राज्यस्तरीय स्पर्धेमधील विजेत्यांना संसद भवनाच्या मुख्य सभागृहात होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसद कार्यक्रमात विचार मांडण्याची संधी युवक-युवतींना मिळणार आहे. असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

“माझी वर्दी माझा मताधिकार” या उपक्रमांतर्गत विशेष मतदार यादी नाव नोंदणी शिबीराचे आयोजन

 

 

 

  जालना दि. 21 (जिमाका) :- जिल्ह्यातील भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये कार्यरत असलेले व सेवानिवृत्त झालेले अधिकारी व जवान तसेच त्यांच्या परिवारातील सदस्य या अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी यांचेसाठी आगामी लोकसभा सार्वत्रीक  निवडणुक 2024 च्या अनुषंगाने मतदार यादीमध्ये मा. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार नाव नोंदणी व दुरुस्ती आदी करीता माझी वर्दी माझा मताधिकार या कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना येथे  दिनांक 23 फेब्रूवारी 2024 रोजी निवडणूक मतदार यादीत नाव नोंदणी व दुरुस्ती पथकाव्दारे एक दिवसीय   शिबीर राबवीण्यात येणार आहे.

 

तरी भारतीय सैन्यदल, नौदल व वायुदलामध्ये कार्यरत असलेले व सेवानिवृत्त झालेले अधिकारी व जवान तसेच त्यांच्या परिवारातील सदस्य ज्यांनी आपले नाव मतदार यादीत नोंदविलेले नाही किवा दूरुस्ती करावयाची आहे असे सर्वांनी दिनांक २३ फेब्रूवारी २०२४ रोजी महासैनिक लॉन, बीड बायपास रोड, क्रीडा संकूल समोर, जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, जालना, येथे निवडणूक मतदार यादीत नाव नोंदणी व दुरुस्ती पथकाव्दारा आपले नाव मतदार यादीत नोंदविने किवा दूरुस्ती करण्याचा लाभ घेणेस्तव शिबीरामध्ये कार्यालयीन वेळेत उपस्थीत राहावे असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

Tuesday, 20 February 2024

मराठवाड्यातील युवक-युवतींसाठी 23 व 24 फेब्रुवारीला लातूर येथे विभागीय भव्य नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर ऑनलाईन नाव नोंदणीसाठी संकेतस्थळ कार्यान्वित

 


जालना, दि. 20 (जिमाका) --- राज्य शासनाने प्रत्येक महसुली विभागामध्ये नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मराठवाड्यातील युवक-युवतींसाठी करिअर मार्गदर्शन शिबीर आणि विभागीय नमो महारोजगार मेळावा अनुक्रमाने 23 व 24 फेब्रुवारी 2024 रोजी लातूर येथे होणार आहे. या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणीकरिता https://nmrmlatur.in हे संकेतस्थळ कार्यान्वित करण्यात आले आहे. तरी मराठवाड्यातील सर्व आठही जिल्ह्यातील युवक-युवतींनी रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी या संकेतस्थळवर ऑनलाईन नाव नोंदणी करण्याचे आवाहन राज्याचा कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाने केले आहे.

लातूर शहरातील महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर आयोजित नमो महारोजगार मेळावा आणि करिअर मार्गदर्शन शिबिरात मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील युवक-युवतींना एकाच छताखाली रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच रोजगार, स्वयंरोजगारातील नवीन संधींची ओळख करून देण्यात येणार आहे. यामध्ये 23 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन शिबीर होणार आहे. तसेच 24 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महारोजगार मेळाव्यात विविध उद्योजक, व्यावसायिक प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांच्याकडे असलेल्या रिक्त पदांच्या संख्येनुसार युवक-युवती यांची मुलाखतीद्वारे निवड करतील.

23 फेब्रुवारीला मार्गदर्शन शिबिरातून मिळणार करिअरच्या नवीन वाटांची माहिती

दहावी, बारावी किंवा पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर व्यवसाय, स्वयंरोजगाराच्या संधी, करिअरच्या नव्या वाटांची माहिती युवक-युवतींना व्हावी, यासाठी नमो महारोजगार मेळाव्याच्या पहिल्या दिवशी, 23 फेब्रुवारी रोजी करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील नामांकित आणि तज्ज्ञ व्यावसायिक, उद्योजक यांचे मार्गदर्शन होणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), कृषि उद्योग, पर्यटन, आर्थिक गुंतवणूक, नर्सिंग यासारख्या विविध क्षेत्रातील रोजगार, स्वयंरोजगारातील संधीविषयी व्याख्यान, चर्चासत्र आदी कार्यक्रम होतील. तसेच रोजगार आणि स्वयंरोजगारासाठी विविध शासकीय विभाग, बँकामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहितीही दिली जाणार आहे.

24 फेब्रुवारी रोजी भव्य महारोजगार मेळाव्यातून रोजगाराच्या संधी

नमो महारोजगार मेळाव्यामध्ये मुंबई, पुणे, छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यातील विविध ठिकाणहून उद्योजक उपस्थित राहून शैक्षणिक पात्रता व मुलाखतीद्वारे पात्र उमेदवारांची निवड करणार आहेत. यासाठी 24 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9 पासूनच लातूर शहरातील बार्शी रोडवरील महिला तंत्रनिकेतन समोरील मैदानावर मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता दहावी, बारावी, तसेच विविध विषयातील पदविका, पदवी, पदव्युत्तर पदवी, आयटीआय (सर्व ट्रेड) आदी शैक्षणिक पात्रताधारक उमेदवार या मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करू शकणार आहेत.

रोजगार मेळाव्यासाठी येथे करा ऑनलाईन नोंदणी

मराठवाड्यातील युवक-युवतींनी लातूर येथे आयोजित नमो महारोजगार मेळावा व करिअर मार्गदर्शन शिबिरात उपलब्ध रोजगाराच्या संधींचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन नावनोंदणी करावी. ऑनलाईन नाव नोंदणीसाठी  https://nmrmlatur.in  हे संकेतस्थळ (क्यू आर कोडसह) कार्यान्वित करण्यात आले आहे. यामध्ये उमेदवार पर्याय निवडून लॉगीन करावे. त्यानंतर वैयक्तिक माहिती, ई-मेल आयडी, भ्रमणध्वनी क्रमांक, आधार क्रमांक, महास्वयंम नोंदणी क्रमांक यासह इतर माहिती भरून छायाचित्र, सी.व्ही. (बायोडाटा) अपलोड करावा, असे आवाहन  सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता  भुजंग रिठे यांनी केले आहे.                                                            

-*-*-*-*-*-*-

राज्य शासनाच्या ‘उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार 2023’साठी प्रवेशिका पाठविण्याकरिता 29 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

 

 जालना, दि. 20 (जिमाका) - माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत उत्कृष्ट पत्रकारिता, उत्कृष्ट लेखन, उत्कृष्ट दूरचित्रवाणी वृत्तकथा, उत्कृष्ट छायाचित्रकार, समाज माध्यम आणि स्वच्छता अभियानाबाबत केलेल्या जनजागृतीपर लेखनासाठी पुरस्कार स्पर्धा जाहीर करण्यात आलेली आहे. या स्पर्धेसाठी दिनांक 1 जानेवारी, 2023 ते 31 डिसेंबर, 2023 पर्यंतच्या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या लेखन/छायाचित्रे/वृत्तकथा यांच्या प्रवेशिका मागविण्यात येत आहेत. प्रवेशिका पाठविण्याचा अंतिम  दि. 31 जानेवारी, 2024 असा होता. या प्रवेशिका मागविण्याकरिता दि.29 फेब्रुवारी, 2024 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. राज्यातील विविध भागातील स्पर्धकांनी संबंधित जिल्हा माहिती कार्यालयाकडून तर मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील इच्छुकांनी, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, तळमजला, हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई-32, येथून विहित नमुन्यातील अर्ज प्राप्त करुन घ्यावयाचे आहेत. अर्जाचे नमुने dgipr.maharashtra.gov.in  व  www.maharshtra.gov.in तसेच https://mahasamvad.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

-*-*-*-*-*- 


जिल्हा माहिती कार्यालयात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांना अभिवादन

 



जालना, दि. 20 (जिमाका) - मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती जिल्हा माहिती कार्यालयात साजरी करण्यात आली.  याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे व उपस्थित पत्रकारांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पत्रकार दीपक शेळके, संजय देशमुख, नंदा पवार, गणेश चांदोडे, शेख महेजबीन, संतोष भुतेकर, दर्पण सकलेचा, श्रीकिशन झंवर, नरेंद्र जोगड, अतूल पडूळ आदींसह जिल्हा माहिती कार्यालयाचे कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-

बचत गटाच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रकारे मदत करू -- केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री रावसाहेब दानवे उमेद्च्यावतीने जानकी जिल्हास्तरीय विक्री व प्रदर्शनाचे संपन्न 22 फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार प्रदर्शन कै. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलात प्रदर्शनाचे आयोजन





 


जालना दि. 20 (जिमाका)- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेदच्यावतीने तयार करण्यात येणाऱ्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य केले जाईल, जेणेकरून  ग्रामीण भागातील महिला सक्षम होण्यास मदत होईल,  असे प्रतिपादन जिल्हास्तरीय जानकी वस्तू व प्रदर्शनाच्या  उद्घाटन प्रसंगी  केंद्रीय रेल्वे, कोळसा व खाण राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाकडून ग्रामीण महिला स्वयंसहायता गटाच्या वस्तूंचा प्रदर्शन व विक्री महोत्सव दि. 20 ते 22 फेब्रुवारी 2024 या कालावधीत जुना जालना येथील घायाळ नगरातील  कै. कल्याणराव घोगरे क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाचे उदघाटन आज श्री. दानवे यांच्या हस्ते झाले. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी मंचावर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, माजी आमदार अरविंदराव चव्हाण, भास्कर आबा दानवे, बद्रीनाथ पठाडे, जिल्हा नियोजन मंडळ सदस्य मिर्झा अन्वर बेग, रामेश्वर भांदरगे , प्रकल्प संचालक शिरीष बनसोडे यांची उपस्थिती होती.

श्री. दानवे म्हणाले की, ग्रामीण भागातील जनतेच्या गरजा लक्षात घेवून , महिला बचत गटांनी मालाचे उत्पादन केल्यास , गटांना आर्थिक स्वावलंबन होण्यास मदत होईल. देशाचे पंतप्रधान यांनी या महिला बचत गटांना अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने लखपती दीदी हा उपक्रम सुरु केला आहे.  जिल्हयातील जास्तीत महिलांनी याचा लाभ घेवून आपली वेगळी ओळख निर्माण करावी, जिल्ह्यात आज 11 महिलांच्या शेती उत्पादक कंपन्या असून केंद्र व राज्य शासनाच्यावतीने 162 कोटी रुपयांचे वाटप केले आहे. त्यांना उमेद अंतर्गत आगामी कालावधीत विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात यावे.

उमेदमुळे महिलांमध्ये एकात्मता निर्माण होवून सांघिक प्रयत्न होत असल्याचे मत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी आगामी कालावधीत मालाचे सादरीकरण, पॅकेजिंग, याकडे विशेष लक्ष दिले जाईल, असे सांगितले. जिल्ह्यात आज रोजी 16 हजार 500 गट असून त्यातंर्गत 1 लाख 87 हजार महिलांना 2023 दरम्यान 101 कोटींचे आर्थिक कर्ज वितरण केले असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी श्री. चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. एसबीआय बँकेच्या वतीने 47 कोटी, एमजीबी बँकेच्या वतीने जाफराबाद तालुक्यासाठी 1 कोटी 12 लक्ष, बीओएम बँकेच्या वतीने जालना तालुक्यासाठी 1 कोटी 58 लक्ष, आयसीआयसीआय च्या वतीने घनसावंगी व मंठा तालुक्यासाठी 3 कोटी 75 लक्ष तर एचडीएफसी बँकेच्या वतीने बदनापूर , अंबड व परतूर तालुक्यासाठी 2 कोटी 20 लक्ष रुपयाच्या कर्जाचे वितरण मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.     

ग्रामीण भागातील महिलांच्या स्वयंसहाय्यता गटाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी या उद्देशाने उमेद व ग्राम विकास विभागाच्यावतीने दिनांक 20 ते 22 फेब्रुवारी या  तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शहरातील स्व. कल्याणराव घोगरे क्रीडा मंडळावर सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत सर्वासाठी खुले  राहणार आहे. सदरील प्रदर्शनात जिल्ह्यातील निवडक बचत गटांचे 50 स्टोल लावले जाणार असून या ठिकाणी ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेले लोणचे ,डाळी, फरसाण , चिवडा , सोय उत्पादने , मध, विविध प्रकारचे पापड , गोडंबी , लाकडी खेळणी , जाम, द्रोण ,पत्रावळे , लोकरीच्या आकर्षक वस्तू, हस्तकला वस्तू राहणार असून खवय्यासाठी अस्सल चविष्ट, व रुचकर शाकाहारी व मांसाहारी भोजन राह्रनार आहे. याशिवाय दही धपाटे , वांगे भरीत, झुणका भाकर , मिसळ वडापाव , काळा मसाला मटन भाकरी, बंजारा पातळ पोळी इत्यादी पदार्थ उपलब्ध  आहेत.

रात्रीच्या वेळी मनोरंजनसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रकल्प संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास        उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र तुबाकले, उप मुख्य कार्यकारी अधिकारी  अंकुश चव्हाण, उप मुख्य कार्यकारी अधिकारी   बालचंद जमधडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी  कोमल कोरे, कॅफो राजू सोळंके, कार्यकारी अभियंता सविता सलगर,तसेच तालुक्याचे गटविकास अधिकारी सह मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी शैलेश चौधरी यांनी विशेष प्रयत्न केले.

-*-*-*-*-*-