Monday, 21 August 2023

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

 


 

            जालना दि. 21 (जिमाका) :-   दि. 30 ऑगस्ट  2023 रोजी रक्षाबंधन सण साजरा होणार आहे. तसेच दि. 3 सप्टेंबर 2023 रोजी संकष्ट चतुर्थी असल्याने जालना जिल्ह्यात मौजे राजुर, माळाचा गणपती व माव पाटोदा येथे गणपती मंदीर असल्याने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते.

    तसेच सध्या महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकाविरुध्द आरोप प्रत्यारोप विविध कारणास्तव सुरु आहे. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच शेतक-यांचे विविध मागणीसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकरता येत नाही. 

        त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.    तसेच  अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.   हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.      हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि. 3 सप्टेंबर 2023  रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

                                                                    -*-*-*-*-       

राष्ट्रीय लोकअदालतीचे 9 सप्टेंबर रोजी आयोजन

 


 

जालना, दि. 21 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, जालना व सर्व तालुका न्यायालयांमध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्याअंतर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम 138, एन. आय. ॲक्टची प्रकरणे, बँकेची  वसूली प्रकरणे कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबंधीचे वादाची प्रकरणे, भुसंपादनाची  प्रकरणे, इलेक्ट्रीसिटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणे व तर प्रकरणे तसेच दावा दाखलपुर्व प्रकरणे, इत्यादी प्रकरणासाठी दि. 9 सप्टेंबर 2023 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.   तरी सर्व संबंधितांनी या संधीचा लाभ घेवून आपली प्रकरणे लोकअदालतमध्ये ठेवून तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन श्रीमती पी.पी.भारसाकडे-वाघ, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

Friday, 18 August 2023

जिल्हाधिकारी कार्यालयात माजी प्रधानमंत्री राजीव गांधी यांना अभिवादन सद्भावना दिनाची उपस्थितांना प्रतिज्ञा

 




 

जालना, दि. 18 (जिमाका) - माजी प्रधानमंत्री भारतरत्न राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. या निमित्त साजरा करण्यात येणाऱ्या सद्भावना दिनानिमित्ताने जिल्हाधिकारी यांनी उपस्थितांना सद्भावना प्रतिज्ञा दिली. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगीता सानप, मनिषा दांडगे आदी उपस्थित अधिकारी, कर्मचाऱ्यांनी भारतरत्न राजीव गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

***

जालना जिल्ह्यात शासनाच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास करणार - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 




       जालना, दि.18 (जिमाका) :- जालना जिल्ह्यात शासनाच्या कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्याबरोबरच पायाभूत सुविधांचा विकास करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज  आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विविध प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी, संपादक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, राज्य शासनाने सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी विविध कल्याणकारी योजना कार्यान्वित केलेल्या आहेत.  या योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात येतील. जालना जिल्हा रेशीम शेतीमध्ये प्रगती करीत आहे. आपला जिल्हा रेशीम शेतीत राज्यात पहिल्या क्रमाकांवर आणण्याचा मानस आहे. रेशीम हातमाग, रो मटेरियल निर्मितीसाठी प्रयत्न केले जातील. जिल्ह्यातील मुख्य शेती उत्पादन असणारे मोसंबी, द्राक्षे व मिरची यांचे प्रक्रिया उद्योग स्थापित करता येतील का, याचीही चाचणी केली जाईल. 

जालना शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण, मोकळ्या जागा, अतिक्रमण, भटके जनावरे,  रस्ते अपघाताबाबत उपाययोजना याबाबत ठोस कार्यवाही केली जाईल, असे सांगून जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, शहरातील सार्वजनिक शौचालयाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल. रस्ता सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात येतील.  शहरातील सीसीटिव्हीचा प्रश्नही मार्गी लावण्यात येईल.   पाणीपुरवठा योजनेसाठी शासनस्तरावर प्रलंबित प्रस्तावाची माहिती घेवून सुधारीत प्रस्ताव दाखल करण्यात येतील. जाळीचा देव तिर्थक्षेत्र विकासासाठी प्रयत्न केला जाईल. मत्स्योदरी देवी मंदिराचा विकास आराखडा शासनाकडे पाठविण्यात येईल.  तसेच  श्रीक्षेत्र  राजुरेश्वर संस्थानची कामे प्रगतीपथावर नेवून मंदिराच्या परिसरात विकासात्मक कामांचे नियोजन केले जाईल. जलयुक्त शिवारच्या माध्यमातून गावे टँकरमुक्त केली जातील. नानाजी देशमुख कृषि संजिवनी प्रकल्पातंर्गत विविध कामे झाली आहेत.  या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करुन शेतकऱ्यांना समृध्द केले जाईल.

 

-*-*-*-*-

हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन

 







 

       जालना, दि.18 (जिमाका):- मराठवाडा मुक्ती संग्रामात हुतात्मे झालेले हुतात्मा जनार्दन मामा नागापूरकर यांच्या बलिदान दिनानिमित्त आज दि. 17 ऑगस्ट 2023 रोजी हुतात्मा स्मारक, टाऊन हॉल येथे स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले व मामा चौक जालना येथे जनार्दन मामा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 याप्रसंगी उपशिक्षणाधिकारी श्याम देशमुख, विनया वडजे, साहित्यिक रावसाहेब ढवळे, मुख्याध्यापक प्रकाश कुंडलकर, निखिल कुंटे, राजेंद्र कायदे, कल्याण गव्हाणे,  क्रीडा प्रशिक्षक संतोष मोरे, गृहपाल विजय खेडेकर, तसेच जिल्हा परिषद प्रशाला मुलांची जालनाचे विद्यार्थी उपस्थित होते.

हुतात्मा जनार्दन मामा नागापुरकर यांचे स्मृतिप्रित्यर्थ जिल्हा  परिषदेच्यावतीने विविध उपक्रमा अंतर्गत वादविवाद स्पर्धा या शाळा, केंद्र व तालुकास्तरावर 20 सप्टेंबरपर्यंत घेण्यात येणार असून तालुका स्तरीय विजेत्या स्पर्धकांच्या जिल्हास्तरावर सप्टेंबर महिन्याचा शेवटच्या आठवडयात जिल्हास्तरीय वादविवाद स्पर्धा घेण्यात येणार आहे. सदर वादविवाद स्पर्धेचे विषय पुढीलप्रमाणे आहेत. इयत्ता सहावी ते आठवीसाठी - पाण्याचे स्त्रोत संवर्धन जबाबदारी -समाज की प्रशासनाची ? तर  इयत्ता नववी ते दहावीसाठी  " विश्वगरु" बनण्यासाठी भारत सक्षम आहे/ नाही. असे विषय  असल्याचे शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा अर्जातील त्रुटी दुरुस्तीसाठी आवाहन

 


 

       जालना, दि.18 (जिमाका):- जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, दि. 20 जानेवारी, 2024 साठी अर्ज हे ऑनलाईन पद्धतीने भरले जात असून जालना जिल्ह्यातील इयत्ता पाचवी वर्गात सन 2023-24 मध्ये शिकत असणा-या विद्यार्थ्यांनी त्यांचे पालकांसह सेवा केंद्रावरून व ईतर यंत्रणेचा वापर करून ऑनलाईन अर्ज भरण्याचा शेवटचा दि. 17 ऑगस्ट 2023 अशी होती.  तरी आता प्रशासकीय कारणास्तव ही मुदत वाढवून 25 ऑगस्ट 2023 पर्यंत करण्यात आलेली आहे व ऑनलाईन अप्लीकेशन चुका दुरूस्तीसाठीची तारीख 26 व 27 ऑगस्ट अशी आहे. जिल्हाभरातील सर्व मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचे अर्ज भरावेत , असे आवाहन प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, परतूर यांनी केले आहे.

इच्छुक विद्यार्थी, पालक, शिक्षक व मुख्याध्यापकांनी हयाची नोंद घेवून ऑनलाईन अर्ज भरण्यापुर्वी पाचवीचे मुख्याध्यापकांकडुन प्रमाणपत्र पत्र भरून घ्यावेत व त्यावर विद्यार्थ्याचा फोटो, स्वाक्षरी व पालकांची स्वाक्षरी करून सदर प्रमाणपत्र हे मुख्याध्यापाकाद्वारे सत्यापित/प्रमाणित केलेले असणे आवश्यक आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी सुधारीत प्रमाणपत्र (Revised Certicate) हे खालील दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. फॉर्म भरण्यासाठीचे प्रमाणपत्र, फोटो, स्वाक्ष-या हे १० ते १०० KB मध्ये स्कॅन करून संकेतस्थळ "www.navodaya.gov.in" यावरून भरावेत. विद्यार्थ्याचा जन्म हा दिनांक 01 मे 2012 पुर्वी व 31 जुलै 2014 नंतर झालेला नसावा. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Tuesday, 15 August 2023

पारशी टेकडीवर पणन, अल्पसंख्यांक विकास, औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण

 


 

       जालना, दि.15 (जिमाका):- जालना शहरालगत असलेल्या पारशी टेकडीवर रोटरी मिडटाऊन क्लबच्या वतीने 30 फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात येऊन सुशोभिकरण करण्यात आले आहे. याला "अमर जवान पॉईंट" असे नाव दिले आहे. या ठिकाणी आज स्वातंत्र्य दिनानिमित्त  राज्याचे पणन, अल्पसंख्यांक विकास, औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

        पारसी टेकडीवरील आयोजित ध्वजारोहण व तिरंगा ध्वज रॅली कार्यक्रमास माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलीस अधीक्षक तुषार दोषी, रोटरी क्लबचे प्रतीक नानावटी, सुनील रायठट्टा, उदय शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

          जालना शहराजवळील औद्योगिक वसाहत परिसर व समृद्धी महामार्गाजवळ असलेल्या पारसी टेकडीवर कुंडलिका-सीना नदी फाउंडेशन, समस्त महाजन ट्रस्ट, जालना रोटरी क्लब मिडटाऊन यांच्यावतीने स्वातंत्र्य दिनाचा आनंदोत्सव साजरा करण्यात येऊन तिरंगा ध्वज रॅली टेकडीच्या पायथ्यापासून ते माथ्यापर्यंत काढण्यात आली. पारशी टेकडीचे सुशोभीकरण करून ही हरित टेकडी बनविण्यासाठी या ठिकाणी वृक्षारोपणासह नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत.  कार्यक्रमप्रसंगी पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व पर्यावरणप्रेमी नागरिक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                                                                          -*-*-*-*-