Tuesday, 28 June 2022

मनुष्यबळाचे त्रैमासिक विवरणपत्र ई-आर 1 सादर करण्याचे आवाहन

 

 

      जालना दि. 28 (जिमाका) :- सार्वजनिक क्षेत्रातील केंद्र व राज्य शासन यांची सर्व कार्यालये, अंगिकृत उद्योग, व्यवसाय,महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद , पंचायत समिती, महानगर पालिका, नगरपालिका, तसेच खाजगी क्षेत्रातील 25 किंवा अधिक लोक काम करतात अशा सर्व आस्थापना, उद्योग, व्यापार व्यवसाय, कारखाने यांना सेवायोजन कार्यालये ( रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 नुसार त्रैमासिक विवरणरपत्र ई-आर 1 माहे जून 2022 तिमाही संपल्यानंतर 30 दिवसाच्या आत (31 जुलै 2022 पर्यंत) सादर करणे बंधनकारक आहे. या प्रमाणे नियोक्त्यांच्या लॉग-इन मध्ये विवरणपत्र www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन सादर करण्याची सुविधा उपलब्ध आहे. या प्रमाणे नियोक्त्यांची जून 2022 या तिमाहीचे विवरणपत्र ई-आर 1 दि. 30 जुलै 2022 पर्यंत सादर करावे. यासाठी www.rojgar.mahaswayam.gov.in वेबसाईट ओपन करुन एम्प्लॉयर (लीस्ट अ जॉब) वर क्लीक करुन एम्प्लॉयर लॉग इनमध्ये नियोक्त्यांचा युजर आय डी व पासवर्ड वापरुन लॉग इन करुन ईआर रिपोर्ट मधील ई-आर 1 या ऑप्शनवर क्लीक करुन ऑनलाईन सादर करणे आवश्यक आहे.

 

यासाठी काही तांत्रिक अडचण आल्यास किंवा अधिकच्या सहाय्यासाठी सोमवार ते शुक्रवार रोजी सार्वजनीक सुटया वगळून सकाळी 10.00 ते सांयकाळी 6.00 वाजेपर्यंत (02482) 299033 या कार्यालयाच्या दूरध्वनीवर संपर्क करावा.

सेवायोजन कार्यालये (रिक्तपदाची सुचना देणे सक्तीचे) कायदा 1959 व त्या अंतर्गत नियमावली 1960 मधील तरतुदी नुसार वरील प्रमाणे सर्व आस्थापनांनी जून 2022 या अखेर आपल्या वेतन पटावर असलेल्या सर्व मनुष्यबळाची माहीती ई- आर 1 विवरणपत्र 30 जुलै 2022 पुर्वी वरील वेबसाईटवर ऑनलाईन सादर करणे बंधनकारक आहे, यात कसूर झाल्यास कसूरदार आस्थापनांवर कायदेशिर कारवाई होऊ शकेल, याची नोंद घ्यावी असे सहायक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, संपत चाटे, यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-

Monday, 27 June 2022

विशेष घटक योजना व बीजभांडवल योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन

 


         

    जालना दि. 27 (जिमाका) :- संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय विशेष घटक योजना (अनुदान योजना) व बीजभांडवल योजनेसाठी कर्जप्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

   संत रोहिदास चर्मद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्या. जिल्हा कार्यालय सन 2022-23 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजना उद्दिष्ट 40 व बीजभांडवल योजना उद्दिष्ट 16 असे प्राप्त झाले आहे. वरील दोन योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविल्या जातात चांभार समाज अंतर्गत असणाऱ्या चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील लाभ घेऊ इच्छिणाऱ्या अर्जदारांनी यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा तसेच अर्जदाराने महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्राची पुर्तता करुन कर्ज प्रस्ताव तीन प्रतीत खालील ठिकाणी स्वत: अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून दाखल करावेत त्रयस्थ, मध्यस्थामार्फत कर्ज प्रकरणे स्वीकारण्यात येणार नाही.

कर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे

जातीचा दाखला (सक्षम अधिकाऱ्याकडुन घेतलेला असावा), अर्जदानाचा उत्पन्नाचा दाखला चालु वर्षाचा (तहसीलदार यांच्याकडून घेतलेला असावा) नुकताच काढलेल्या पासपोर्ट साईज फोटो तीन प्रती जोडाव्या, अर्जदाराचा शैक्षणिक दाखला, राशनकार्ड झेरॉक्स प्रत, ओळखपत्र आधारकार्ड, मतदानकार्ड, पॅनकार्ड प्रत, व्यवसायाचे दरपत्रक कोटेशन , व्यवसाय ज्या ठिकाणी करावयाचा आहे. त्या जागेची भाडेपावती, करारपत्रे किंवा मालकी हक्काचा पुरावा, नमुना नं. 8, लाईटबिल, टॅक्सपावती, बीजभांडवल योजनेसाठी प्रकल्प अहवाल, वाहनासाठी लायसन्स, बॅच परवाना, व्यवसायाचे ग्राम पंचायत, नगर पालिका यांचे नाहरकत प्रमाणपत्र, व्यवसायाचे तांत्रिक प्रमाणपत्र तसेच अनुभवाचा दाखला, अनुदान न घेतल्या बाबत प्रतिज्ञापत्र वरील प्रमाणे कागदपत्रे स्वयंसाक्षांकित करुन घोषणापत्र द्यावे.

     वरील योजनांचा कर्जप्रस्ताव महामंडळाच्या विहित नमुन्यात अर्ज दि. 1 जुलै 2022 पासुन ते 30 जुलै 2022 पर्यंत अर्ज वाटप व स्वीकृती कार्यालयीन वेळेत सकाळी 9.30 ते  6.15 पर्यंत स्थळ जिल्हा कार्यालय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना या ठिकाणी स्वीकारले जातील.

     जालना जिल्‌ह्यातील प्रत्येक तालुक्यातील चांभार, मोची, ढोर, होलार या समाजातील बेरोजगार युवक, युवतींना तसेच होतकरु गरजु अर्जदारांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन अरुण राऊत जिल्हा व्यवस्थापक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-    

Friday, 24 June 2022

जिल्हा वार्षिक योजनेचा निधी विकास कामांवर वेळेत खर्च करावा - पालकमंत्री राजेश टोपे

 




 

जालना दि. 24 (जिमाका):-  जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत जालना जिल्ह्यासाठी सन 2022-23 या वित्तीय वर्षासाठी 358 कोटी 29 लक्ष रुपयांचा निधी मंजूर आहे.  या मंजूर निधीच्या खर्चाचे काटोकोर नियोजन करुन प्रत्येक विभागाने त्यांना दिलेला निधी वर्षभरात विविध विकास कामांवर वेळेत खर्च होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या  त्रैमासिक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

बैठकीस आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, माजी आमदार चंद्रकांत दानवे, अरविंद चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील सुर्यवंशी आदींसह समिती सदस्य व विभाग  प्रमुख  यांची उपस्थिती होती.

जिल्हा वार्षिक योजनेंर्तगत वित्तीय वर्ष 2021-22 मध्ये जालना जिल्ह्याच्या विकास कामांसाठी  336 कोटी 21 लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. प्राप्त झालेल्या निधीपैकी जवळपास 98.17 टक्के निधी विविध विकास कामांवर खर्च करण्यात आल्याने त्याबाबत पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त करत चालू वर्षातही मंजूर असलेला निधी पूर्णपणे खर्च करण्यासाठी काटेकोर नियोजन करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.

ग्रामीण भागांमध्ये रोहित्र नादुरुस्त असणे तसेच रोहित्रांसाठी ऑईल नसल्यामुळे अनेक गावांमध्ये सातत्याने वीज पुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी येत आहे.  ही अतिशय गंभीर बाब असुन ज्या गावाधील रोहित्रे नादुरुस्त आहेत ती तातडीने दुरुस्त करण्यात यावीत. तसेच जी रोहित्रे केवळ ऑईल नसल्यामुळे बंद आहेत अशा रोहित्रांसाठी अधिकचे ऑईल प्राप्त करुन घेऊन रोहित्रे सुरु करण्यात यावीत.   जिल्ह्यातील एकाही गावात रोहित्रांच्या नादुरुस्तीमुळे वीज खंडीत होणार नाही याची काळजी घेण्याच्या सक्त सुचनाही त्यांनी यावेळी केल्या.

जिल्ह्यात पाणी पुरवठ्याच्या अनेक योजना सुरु आहेत.  परंतू केवळ कंत्राटदार वेळेत काम करत नसल्याने या योजनांचे काम वेळेत पुर्ण होत नसल्याच्याही तक्रारी येत आहेत.  ज्या ज्या भागात कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे पाणी पुरवठा योजनांची कामे रखडलेली असतील अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिले.

यावेळी आमदार बबनराव लोणीकर, आमदार नारायण कुचे यांच्यासह समिती सदस्यांनी उपयुक्त अशा सुचना केल्या.   या सुचनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.

जिल्हा नियोजन अधिकारी श्री सुर्यवंशी यांनी सन 2021-22 मध्ये झालेल्या खर्चाची तसेच सन 2022-23 मधील निधी वाटपाची माहिती पॉवर पॉईंटच्या माध्यमातुन सभागृहाला दिली.

बैठकीस सर्व विभागांचे प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

*******

शासकीय तंत्रनिकेतन येथील 151 विद्यार्थ्यांची नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीसाठी निवड

 

         

    जालना दि. 24 (जिमाका) :- शासनाच्या तंत्रशिक्षण संचालनालयाद्वारे संचालित, शासकीय तंत्रनिकेतन जालना येथील 151 विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यांमध्ये निवड झाली आहे.

   जालना येथील एम. आय. डी. सी. क्षेत्रात वसलेली  ही संस्था अभियांत्रिकी क्षेत्रात विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी त्यांच्या ईच्छाशक्तीला ऊर्जा प्रदान करण्याचे प्रामाणिक प्रयत्न करत आलेली आहे. संस्थेतील मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल, कंप्युटर, केमिकल या शाखांमार्फत नवनवीन तंत्रज्ञान विद्यार्थ्यांना अवगत करण्यात येते. अल्पसंख्यांकांसाठी मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल या शाखांमध्ये अतिरिक्त जागा उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेत विविध उपक्रम राबविले जातात.

 

   संस्थेचे प्र. प्राचार्य डॉ. एम. डी. वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली व मार्गदर्शनानुसार जी. जी. गोरे प्र. प्रशिक्षण व आस्थापना अधिकारी, रोजगार संदर्भात विविध संधी उपलब्ध करुन देण्याकरिता ट्रेनिंग व प्लेसमेंट विभागामार्फत विविध रोजगाराभिमुख उपक्रम राबवितात, याचेच फलित म्हणून यावर्षी अंतिम वर्षात शिक्षण घेत असलेल्या 151 विद्यार्थ्यांची विविध नामांकित कंपन्यामध्ये निवड झालेली आहे.

     यामध्ये बजाज ऑटो -38, एल अँड टी कन्स्ट्रक्शन -2, इन्फोसिस पुणे -3, व्हेरॉक प्रा. लि. 35 ह्योसंग प्रा. लि. 18, प्यारासन प्रा. लि. - 2, ड्ररोहॉल्वर प्रा. लि. 19, ड्याना ई. प्रा.  लि.- 8, मग्ना ऑटोमोटिव्ह पुणे- 18, जॉन डियर पुणे -5 कालिका  स्टिल कंपन्यामध्ये-3 उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

 

तसेच सिमेन्स, जनरल इलेट्रीक एव्हिअशन पुणे कॅनप्याक, एन. आर. बि, ग्राशिम, ई. नामांकित कंपन्या विद्यार्थ्यांना रोजगार देण्यास इच्छुक आहेत. अशी माहिती शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

.

-*-*-*-*-*-*-  

प्रादेशिक परिवहन प्राधिकरणावर एका अशासकीय सदस्याच्या नियुक्तीसाठी आवाहन

 


     जालना दि. 24 (जिमाका) :- प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, जालना यावर एका अशासकीय सदस्याची नियुक्ती करण्याचे निर्देश परिवहन आयुक्त कार्यालयाकडून  प्राप्त  झाले असुन प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तरतुद केल्याप्रमाणे अर्हता प्राप्त इच्छुक व्यक्तींकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

     मोटार वाहन कायद्यानुसार अशासकीय सदस्य कोणत्याही ट्रान्सपोर्ट अंडरटेकिंगचा मालक, नोकर किंवा इतर प्रकारे आर्थिक हितसंबंध असणारा नसावा. हा व्यक्ती सामाजिक प्रतिष्ठा असलेला व परिवहन, वाहतूक समस्यांची जाण असणारा असावा. ही नियुक्ती किमान 3 वर्षापर्यंतची असेल.

     इच्छुक व अर्हताप्राप्त व्यक्तींना सचिव प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी आवाहन करण्यात येते की, त्यांनी वर्तमानपत्रात वृत्तनिवेदन प्रसिध्द झाल्यापासून सात दिवसात आपले नाव व बायोडाटा माहिती अर्जासह उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना येथे वरिष्ठ लिपीक राजेश जाधव यांच्याकडे सादर करावी. असे प्रादेशिक परिवहन प्राधिकरण तथा उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

खतांची विक्री जादा दराने केल्यास कृषि सेवा केंद्राचा परवाना रद्द

 


जालना दि. 24 (जिमाका) :- खरीप हंगामातील पिकासाठी आवश्यक असलेल्या रासायनिक खतांची जाणीवपुर्वक कृत्रिम टंचाई निर्माण करून या खतांची सरकारने निश्चित केलेल्या दरापेक्षा जादा ‍ दराने विक्री केल्यास संबधीत कृषि सेवा  केंद्राचा  परवाना रद्द करण्यात येईल असा इशारा जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भिमराव रणदिवे यांनी दिला आहे.

            खरीप हंगामास सुरवात झाली असून शेतकरी खरीप हंगामासाठी बियाणे व खते खरेदी करत आहेत.पेरणी योग्य म्हणजे 75 ते 100 मी मी पाऊस झाल्या नंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी . जिल्ह्यात रासायनिक खताचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. कृषि सेवा केंद्राने ज्यादा दराने विक्री केल्याची तक्रार शेतकरी जिल्हा तक्रार निवारण कक्षाच्या 9823915234 या क्रमांकावर करू शकतात किंवा तालुका स्तरावरील पंचायत समिती च्या कृषी विभागात तक्रार निवारण कक्षात करू शकतात.ज्यादा दराने बियाणे/खते विक्री केल्याची तक्रार प्राप्त झाल्यास संबंधीत कृषि सेवा केंद्राचा परवाना रद्द/निलंबितकरण्यात येईल, तरी सर्व कृषि सेवा केंद्रानी  एमआरपी दरानुसारच खताचीविक्री करावी.

ग्रेड

ग्रेड दर प्रति  बॅग

1) युरिया

266.50 रू

2) डी.ए.पी.

1350 रू

3) एमओपी

1700 रू

4) 20:20:0:13

1470 रू.

5) 15:15:15

1470 रू.

6)10:26:26

1470 रू

येथे तक्रार नोंदवा:-

जिल्हयातील कोणीही खत विक्रेता निश्चित किंमतीपेक्षा जास्त दराने विक्री करत असल्यास त्याबाबतची तक्रार करण्यासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केला असून शेतकऱ्यानी मोबाईल क्र 9823915234 या क्रमांकावर तक्रार नोदवावी किंवा तालुका स्तरावरील तक्रार नियंत्रण कक्षाकडे किंवा तालुका कृषी अधिकारी यांचेकडेतक्रार नोंदवावीतसेच शेतकऱ्यांना dsaojalna@gmail.comकिंवा adozpjalna@gmail.comया ई-मेल आयडी वर तक्रार नोंदविता येईल असे जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जालना यांनी सांगितले.

-*-*-*-*-*-*-

 

भरारी पथकाकडून 5 कृषी सेवा केंद्रां विरुध्द गुन्हा दाखल

 


 

          जालना दि. 24 (जिमाका) :- खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्याची लगबग सुरू झाल्याने बि- बियाणे खतांची विक्री करताना शेतकऱ्यांची फसवणूक होवू शकते.या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने प्रत्येक  तालुक्यात एक भरारी पथक या  प्रमाणे 8 भरारी पथके व जिल्हा स्तरावर एक भरारी पथक  असे एकूण 9 भरारी पथका कडून तपासणी सुरु झाली असून शेतकऱ्याला बनावट बियाणे ,खते ,कीटकनाशक विक्री केल्यास दुकानाचा परवाना रद्द करण्यासोबतच गुन्हा नोंदविण्याची  कारवाई कृषी विभागाने सुरु केली आहे शेतकऱ्याला बियाणे , खते ,कीटकनाशक दर्जेदार देणे कृषि  सेवा केंद्रांना बंधनकारक  असून योग्य दरानेच विक्री करणे आवश्यक आहे या बाबत शेतकऱ्यांची काही अडवणूक झाल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ 9823915234 या क्रमांकावर तक्रार करावी. निविष्ठा विक्रेते विशिष्ट खत उपलब्ध नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची अडवणूक करतात या साठी जिल्ह्यातील कोणत्या दुकानदाराकडे खताचा किती साठा  आहे. या बाबतची अद्यावत माहिती कृषी विभागाच्या adojalnafertilizer.blogspot.com या ब्लॉगवर उपलब्ध आहे.

मे महिना अखेर जिल्ह्यास बियाणे 105 ,खते 65 व कीटकनाशके 12 नमुने तपासणी चे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी मे अखेर बियाणे 115, खते 51 व कीटकनाशके 10 नमुने तपासणी साठी प्रयोगशाळेस पाठविण्यात आले होते त्यापैकी बियाणांचे 7 नमुने व खताचा 1 नमुना  अप्रमाणित आढळून आला असून अप्रमाणित आढळून आलेल्या बियाणे लॉटच्या 508.60 क्विंटल बियाणास व 25 मे टन  खतास  विक्री बंद आदेश देण्यात आले. जिल्ह्यात या खरीप हंगामात एकूण 5 कृषी सेवा केंद्रा  विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असून या मध्ये 2 बियाणे 1 खत व एक कीटकनाशकाचा समावेश आहे.गुन्हा नोंदविलेल्या कृषी सेवा केंद्रातील 25  एच टी बी टी एचटीबीटी सं  कापूस पॉकेट्स , 15 मे  टन  खत  व 52 लिटर कीटकनाशक एवढा साठा  जप्त करण्यात आला आहे. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-*-