Thursday, 13 August 2026

महिला लोकशाही दिनाचे 17 ऑगस्ट रोजी आयोजन

 


 

       जालना दि. 13 (जिमाका) :-महिला व बाल विकास विभागाने, समस्या व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळण्यासाठी त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने  जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्यात येतो. तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याचे चौथ्या सोमवार आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिस-या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन  करण्यासाठी दि. 17 ऑगस्ट 2026  रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु इच्छिणा-या महिलांनी आपली तक्रार दोन प्रतित महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जालना येथे दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

 अर्ज स्वीकृतीचे निकष पुढीलप्रमाणे तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, तक्रार निवेदन दोन प्रतित सादर करावे, सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावे, अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा, सेवा व आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत.

    निवडणुक आचार संहिता काळात त्या त्या स्तरावर, विधीमंडळ अधिवेशन काळात राज्यस्तर महिला लोकशाही दिन पाळण्यात येत नाही.

     महिलांनी प्रथम संबंधीत तहसिलदार यांच्याकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतीत तक्रार दाखल करावी. तालुका महिला लोकशाही दिनात एका महिन्यांचे आत कार्यवाही न झाल्यास संबंधीत महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनांत तक्रार दाखल करु शकतील. तालुकास्तरावरील लोकशाही दिनांत अर्जदार महिलेस अंतिम उत्तर  शक्य तितक्या लकर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत देण्याचे बंधन संबंधित अध्यक्ष तथा तहसिलदार व सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील. महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 


 

         जालना,दि.13 (जिमाका):  राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.

मंत्री श्री. सावकारे यांचे शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9.00 वाजता शासकीय विश्रामगृह येथून रेशीम कोष बाजारपेठ, जालना येथील इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रमाकरीता शासकीय वाहनाने रवाना. सकाळी 10.00 वाजता जालना येथील रेशीम कोष बाजारपेठ इमारतीच्या लोकार्पण कार्यक्रम समारंभास उपस्थित राहतील. सकाळी 11.40 वाजात मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत जालना येथील विविध कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.00 वाजता मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत जालना येथील विविध कार्यक्रमास उपस्थित राहतील. दुपारी 1.00 वाजता मा. मुख्यमंत्री यांच्या समवेत छत्रपती संभाजीनगरकडे रवाना व विविध कार्यक्रमास उपस्थित राहतील.

-*-*-*-*-*-*-

‘स्वदेशी एक्स्पो’ची तयारी अंतिम टप्प्यात आज उद्घाटन केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते उद्घाटन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालयाच्यावतीने आयोजन

 


 

छत्रपती संभाजीनगर, दि. 13 :- केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्यम मंत्रालयाच्यावतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये 14 ते 16 ऑगस्टदरम्यान सागर रिसॉर्ट, एमआयडीसी येथे आयोजित ‘स्वदेशी एक्स्पो 2026’ची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. देशभरातून 75 हून अधिक प्रदर्शक यात सहभागी झाले असून नागरिकांसाठी प्रवेश पूर्णपणे मोफत आहे, जास्तीत जास्त नागरिकांना या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन दि.14 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 10.00 वाजता केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

नॅशनल ज्युट बोर्ड, ट्रायफेड यांसारख्या राष्ट्रीय संस्थांचाही या एक्स्पोमध्ये सहभाग असून त्यांचे सहकार्य लाभले आहे. ओडिशाची पट्टाचित्र, राजस्थानची पिचवाई, झारखंडची सोहराई, बिहारची मधुबनी, उत्तराखंडची ऐपण कला तसेच महाराष्ट्राची पैठणी यांसह विविध राज्यांतील पारंपरिक कला व हस्तकला पाहण्यासोबतच त्यांची खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे.

एक्स्पोमध्ये सहभागी झालेल्या प्रदर्शकांपैकी 75 टक्क्यांहून अधिक महिला उद्योजक व लघुउद्योगांचा समावेश आहे. एक्स्पोदरम्यान फॅशन शोसह विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि. 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे या एक्स्पोला भेट देणार असून, त्यांच्या हस्ते विविध स्पर्धांतील विजेत्यांसह देशभरातून आलेल्या कलाकार व कारागिरांचा गौरव करण्यात येणार आहे.

तीन दिवस चालणाऱ्या या स्वदेशी हातमाग व हस्तकला प्रदर्शनाला नागरिकांनी मोठ्या संख्येने भेट देऊन स्वदेशी उत्पादनांची खरेदी करावी, पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सनेही एक्स्पोला पाठिंबा दिला असून आगामी दिवाळीनिमित्त भेटवस्तू म्हणून स्वदेशी उत्पादनांची खरेदी करून कारागीर व उद्योजकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

-*-*-*-*-

Wednesday, 12 August 2026

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 


            जालना,दि.12 (जिमाका):  राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहेत.

 

पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे शुक्रवार, दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9.45 वाजता शासकीय विश्रामगृह छत्रपती संभाजीनगर येथून जालनाकडे प्रयाण करतील. सकाळी 10.45 वाजता आगमन व एमआयडीसी फेस वन छत्रपती संभाजीनगर चौफुली- जालना येथील भाजपा जिल्हा कार्यालय नवीन इमारत भूमीपूजन कार्यक्रमास उपस्थिती राहतील. त्यानंतर दुपारी 1.00 वाजता जालना येथून छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील. दुपारी 2.00 वाजता आगमन व मुख्यमंत्री महोदयांच्या हर घर तिरंगा अभियान रॅलीत सहभागी होतील. सायंकाळी 5.00 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून जालनाकडे प्रयाण करतील. सायंकाळी 6.00 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव.

            शनिवार, दि. 15 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 9 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालना येथील  भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजीत शासकीय ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित राहतील. त्यानंतर सकाळी 9.35 वाजता शासकीय वाहनाने परळी वैजनाथ जिल्हा बीडकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-

 

‘हर घर तिरंगा’ मोहिमेतंर्गत वंदे मातरम् समूह गायन व योग प्रात्यक्षिकाचे आयोजन

 


जालना,दि.12(जिमाका) : ‘हर घर तिरंगा’ मोहिमेतंर्गत देशभक्ती, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रप्रेम तसेच नागरिकांमध्ये आरोग्य व योगाबाबत जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने ‘वंदे मातरम्’ समूह गायन व ‘योगा फॉर हेल्थ’ योग प्रात्यक्षिक कार्यक्रमाचे दि. 14 ऑगस्ट, 2026 रोजी सकाळी 8.00 ते 9.00 या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, जालना येथे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमामध्ये ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन तसेच ‘योगा फॉर हेल्थ’ अंतर्गत विविध योगासने व योग प्रात्यक्षिके सादर करण्यात येणार आहेत. या माध्यमातून नागरिक, विद्यार्थी व युवकांमध्ये देशभक्तीची भावना वृद्धिंगत करण्यासोबतच नियमित योगाभ्यासाचे महत्त्व अधोरेखित करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास जिल्ह्यातील विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, खेळाडू, अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

विशेष वृत्त पाणलोटातून शाश्वत शेतीकडे; अंबडमध्ये 51.60 हेक्टरवर 23,790 फळझाडांची लागवड PMKSY 2.0 अंतर्गत 65 शेतकरी कुटुंबांना आर्थिक स्थैर्याची नवी दिशा

 






 

 

जालना,दि.12 (जिमाका) : प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY 2.0) अंतर्गत पाणलोट विकास घटक (WDC-PMKSY 2.0) मध्ये अंबड प्रकल्प क्रमांक 1 अंतर्गत सन 2024-25  मध्ये राबविण्यात आलेल्या फळबाग लागवड उपक्रमाला चांगले यश मिळाले आहे. या उपक्रमातून 65 शेतकऱ्यांच्या 51.60 हेक्टर क्षेत्रावर तब्बल 23 हजार 790 फळझाडांची लागवड करण्यात आली. या उपक्रमामुळे पारंपरिक शेतीला शाश्वत, अधिक उत्पन्न देणाऱ्या आणि पर्यावरणपूरक शेतीची जोड मिळाली आहे.

रोहिलागड, बदापूर, आवा, अंतरवाला, खेडगाव, चिकनगाव, कौचलवाडी तसेच इतर पाणलोट समिती क्षेत्रातील गावांमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. जलसंधारणाच्या कामांसोबत फळबाग लागवडीची सांगड घातल्याने शेतकऱ्यांना पाण्याचा कार्यक्षम वापर, जमिनीचे संवर्धन, उत्पादनवाढ आणि रोजगारनिर्मितीचा लाभ मिळत आहे. 

5 प्रकारच्या फळझाडांची लागवड

या उपक्रमांतर्गत विविध उच्चमूल्य फळपिकांना प्राधान्य देण्यात आले. त्यामध्ये डाळिंबाची 12 हजार 709, मोसंबीची 5 हजार 942, आंब्याची 3 हजार 920, सीताफळाची 720 आणि पेरूची 499 रोपे असे एकुण 23 हजार 790 रोपांची लागवड करण्यात आली. या फळबागांसाठी योजनेअंतर्गत 43.06 लाख रुपयांची गुंतवणूक करण्यात आली. पारंपरिक पिकांवर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना फळपिकांकडे वळण्यासाठी या उपक्रमामुळे प्रोत्साहन मिळत आहे.

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला नवी दिशा

डाळिंब, मोसंबी, आंबा, पेरू आणि सीताफळ यांसारख्या उच्चमूल्य फळपिकांमुळे भविष्यात शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्याची अपेक्षा आहे. फळबागांची लागवड ही एकदाच होणारी प्रक्रिया नसून तिच्या देखभालीसाठी वर्षभर विविध कामांची आवश्यकता असते. त्यामुळे छाटणी, सिंचन, तणनियंत्रण, खत व्यवस्थापन, औषध फवारणी, काढणी, वर्गीकरण आणि बाजारपेठेपर्यंत माल पोहोचविणे अशा विविध टप्प्यांवर स्थानिक रोजगाराच्या संधी निर्माण झाल्या आहेत.

विशेषतः महिलांनाही फळबागांच्या देखभाल व काढणीसारख्या कामांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्याने ग्रामीण कुटुंबांच्या उत्पन्नाला हातभार लागला आहे. गावातच रोजगार उपलब्ध होण्यास मदत झाल्याने रोजगारासाठी होणारे स्थलांतर कमी करण्याच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे.

मृद संधारण आणि भूजल पुनर्भरणाला चालना

फळबागांमुळे जमिनीवर कायमस्वरूपी हिरवे आच्छादन तयार होत असल्याने मातीची धूप कमी होण्यास मदत होते. परिणामी सुपीक मातीचे संरक्षण होऊन जमिनीची उत्पादकता टिकविण्यास हातभार लागतो.

पाणलोट विकासाच्या कामांसोबत फळबाग लागवडीची सांगड घातल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होत आहे. त्यामुळे भूजल पुनर्भरणाला चालना मिळून विहिरी व बोअरवेलमधील पाण्याची उपलब्धता सुधारण्यास मदत होत आहे. पाण्याचा काटकसरीने आणि नियोजनबद्ध वापर केल्यास फळबागांमुळे शेतकऱ्यांना दीर्घकालीन लाभ मिळण्याची शक्यता आहे.

23 हजार 790 झाडांमुळे पर्यावरणालाही फायदा

फळबाग लागवडीचा फायदा केवळ शेतकऱ्यांच्या उत्पन्नापुरता मर्यादित राहिलेला नाही. 23 हजार 790 फळझाडांमुळे परिसरातील हरितक्षेत्र वाढण्यास मदत झाली आहे. झाडांमुळे मातीचे संरक्षण, जैवविविधतेला चालना आणि कार्बन शोषणास हातभार लागत आहे. त्यामुळे जलसंधारणाबरोबरच पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीनेही हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत आहे.

जलसंधारणासोबत फळबागेची यशस्वी सांगड

अंबड प्रकल्प क्रमांक 1 मधील हा उपक्रम केवळ फळझाडे लावण्यापुरता मर्यादित नसून जलसंधारण, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन, शेतकरी उत्पन्नवाढ, रोजगार निर्मिती आणि पर्यावरण संवर्धन यांना एकत्रितपणे पुढे नेणारा उपक्रम ठरत आहे. पाणलोट क्षेत्रात उपलब्ध पाण्याचा योग्य वापर करून फळबागांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दीर्घकालीन आणि शाश्वत उत्पन्नाचा मार्ग उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न या माध्यमातून झाला आहे.

पाणी साठे, झाडे वाढली, उत्पादनवाढीची आशा निर्माण झाली आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा नवा मार्ग खुला झाला, अशी या उपक्रमाची वाटचाल आहे. PMKSY 2.0 अंतर्गत अंबड प्रकल्पातील फळबाग लागवड ही जलसंधारण आणि शाश्वत शेतीची प्रभावी सांगड घालणारी यशस्वी वाटचाल ठरत आहे.

 

-*-*-*-*-*-

 

 

 

 

 

 

 

 

Tuesday, 11 August 2026

‘हर घर तिरंगा’ आणि विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

 


 

जालना,दि.11(जिमाका) : जिल्ह्यात ‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) मोहिमे अंतर्गत 9 ते 17 ऑगस्ट, 2026 या कालावधीत तसेच 13 ऑगस्ट 2026 पासुन विभाजन विभीषिका स्मृती दिनानिमित्त विविध उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.

‘घरोघरी तिरंगा’ (हर घर तिरंगा) मोहिमे निमित्ताने जिल्ह्यात दि. 12 ऑगस्ट 2026 रोजी तिरंगा पदयात्रा, व्याख्यान आणि चर्चासत्राचे आयोजन करुन विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. तसेच दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी तिरंगा रॅली, देशभक्तीपर चित्रपट, प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी सांस्कृतिक कार्यक्रम / तिरंगा प्रतिज्ञा / सेल्फी अपलोड जिल्हास्तरीय उपक्रम आणि प्रश्नमंजुषा होणार आहे. दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी प्रभात फेरी, सायकल रॅली, शालेय स्पर्धा, बक्षीस वितरण, तिरंगा प्रतिज्ञा, सेल्फी अपलोड आणि वंदे मातरम् गीत गायन होणार आहे. दि. 16 ऑगस्ट 2026 रोजी देशभक्तपर चित्रपट दाखविण्यात येणार आहे. तर दि. 17  ऑगस्ट 2026 रोजी तिरंगा प्रतिज्ञा / सेल्फी अपलोड करुन कॅन्डल मार्च काढणे असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

विभाजन विभिषिका स्मृती दिनानिमित्त भारताच्या फाळणीदरम्यान लाखो नागरिकांना वेदना, सहन कराव्या लागल्या होत्या. तसेच विस्थापन आणि संघर्षाच्या आठवणींना उजाळा देत नव्या पिढीला त्या काळातील इतिहासाची जाणीव करून देण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्मृती दिनानिमित्त शालेय-महाविद्यालयीन स्तरावर परिसंवाद, चर्चासत्राचे, व प्रश्नमंजूषाचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच वंदे मातरम या गीतास 150 वर्ष पुर्ण झाल्यानिमित्ताने केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाच्या निर्देशानुसार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

-*-*-*-*-*-*-