Tuesday, 12 May 2026

भोकरदन येथे ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ उत्साहात संपन्न

 


 

जालना,दि.12(जिमाका) :  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि स्वातंत्र्यसेनानी पुंडलिक हरि दानवे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकरदन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आज उत्साहात संपन्न झाला. या रोजगार मेळाव्याला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना येथील सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थित उमेदवारांना रोजगाराच्या विविध संधी, कौशल्य विकासाचे महत्त्व आणि उद्योग क्षेत्रातील बदलत्या गरजांविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी विशाल येवले, आयटीआयचे आयएमसी समन्वयक एस. एस. नाईक तसेच आर. डी. देशपांडे शिल्पनिदेशक यांची प्रमुख उपस्थिती होती.

रोजगार मेळाव्यात विविध नामांकित संस्था व कंपन्यांनी सहभाग नोंदवून उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. एकूण 103 उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या, त्यापैकी 55 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. यामध्ये मोर्याश्री अॅग्रो प्रोड्युसर कंपनी लिमिटेड, भोकरदन यांनी 19 उमेदवार, परम कोचिंग क्लासेस, भोकरदन यांनी 13 उमेदवार, अर्थक्रांती अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, जालना यांनी 3 उमेदवार, इंडियन पब्लिक स्कूल, भोकरदन यांनी 3 उमेदवार, इंडियन अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड, भोकरदन यांनी 4 उमेदवार, कैवल्य इंडस्ट्रीज, भोकरदन यांनी 1 उमेदवार तर क्रॉम्पटन ग्रीव्स, छत्रपती संभाजीनगर यांनी 12 उमेदवारांची निवड केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन के. एच. चौधरी यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. अमोल परिहार यांनी मानले.  रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी जिल्हा कौशल्य विकास विभागातील अमोल बोरकर, आत्माराम दळवी, योगेश बहुरे, विशाल जगरवाल, दिपक पालवे तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भोकरदन येथील आर. खरात, व्ही. बरोटे, एस. अक्से, एन. पाचुंदे, आर. जाधव, एम. भिवसनकर, एस. शिरसाठ, एस. वाघ, एस. देशमुख, आर. जगदाळे, बी. राऊत, जी. भवर आदी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्‍य नियोजन केले.

-*-*-*-*-*-*-

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

 


     जालना दि. 12 (जिमाका) :-   जिल्ह्यात दि 14 मे 2026 रोजी छत्रपती संभाजी महाराज जयंती इत्यादी  जयंती, सण, उत्सव, जयंतीच्या अनुषंगाने  जिल्ह्यात व शहरात मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजीत होतात. त्यासाठी मोठया प्रमाणावर नागरिक एकत्र येत असतात.

     तसेच मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण बचाव व धनगर समाज एस. टी. प्रवर्गात समाविष्ठ करावे या अनुषंगाने  जालना जिल्ह्यात विविध प्रकारचे आंदोलन कार्यक्रम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे अनुचित प्रकार घडून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू शकतो.

     तसेच महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द गटबाजी व आरोप प्रत्यारोप विविध कारणांवरुन सुरु आहेत. तसेच शेतकऱ्यांचे विविध मागण्यासाठी विविध संघटनाकडून आत्मदहन,उपोषण, धरणे मोर्चे, निर्दशने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारतायेत नाही. 

        त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

 

   तसेच  अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.

 

     हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.

       हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि.21 मे 2026 रोजीच्या रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

जालना जिल्ह्यात 12 व 15 मे रोजी ‘यलो अलर्ट’; नागरिकांना उष्माघातापासून बचावाचे आवाहन

 


जालना,दि.12(जिमाका) : भारतीय हवामान विभागाच्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यासाठी दि. 12 व 15 मे, 2026 रोजी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून, या कालावधीत उष्णतेची तीव्र लाट येण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जिल्ह्यात वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 12 ते सायंकाळी 4 या वेळेत तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळावे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला तसेच मैदानी काम करणाऱ्या कामगारांनी अधिक दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. उष्माघात टाळण्यासाठी पुरेसे पाणी पिणे, तहान नसली तरी नियमित पाणी सेवन करणे आणि फळांचे रस, ओआरएस, लिंबूपाणी, ताक यांसारख्या द्रव पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसेच बाहेर पडताना डोक्यावर टोपी, गमछा किंवा छत्रीचा वापर करावा तसेच हलक्या रंगाचे, सैल व सुती कपडे परिधान करावेत. उन्हात काम करणाऱ्या व्यक्तींनी शक्यतो सावलीत विश्रांती घ्यावी. कामाच्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी तसेच मधून-मधून विश्रांती घेऊन शरीराचे तापमान नियंत्रित ठेवावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.

प्रशासनाने नागरिकांना उष्माघाताची लक्षणे ओळखण्याचे आवाहन केले असून, चक्कर येणे, डोकेदुखी, अशक्तपणा, जास्त घाम येणे किंवा घाम अचानक बंद होणे, त्वचा लाल होणे, उलटी होणे, श्वास घेण्यास त्रास होणे अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. दरम्यान, नागरिकांनी उष्णतेच्या काळात चहा, कॉफी, मद्य किंवा कॅफिनयुक्त पेयांचे अतिसेवन टाळावे. तसेच उच्च प्रथिनेयुक्त व शिळे अन्न खाणे टाळावे. पार्क केलेल्या वाहनांमध्ये लहान मुले किंवा पाळीव प्राणी ठेवू नयेत, असेही आवाहन केले आहे.

आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी जिल्हा सामान्य रुग्णालय, जालना येथे मो. 9404548317 संपर्क साधावा. तसेच आरोग्य विभाग जिल्हा परिषदे जालनाच्या टोल फ्रि क्रमांक 104 वर संपर्क साधुन नजीकच्या शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.


Monday, 11 May 2026

नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने उपाययोजना राबवाव्यात - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल · जिल्हा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश · पूर, वीज, आरोग्य व आपत्कालीन सेवांसाठी विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित · मान्सुनपूर्व आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज

 




 

जालना,दि.11(जिमाका) : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी सर्व संबंधित विभागांना तातडीने उपाययोजना राबविण्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी निर्देश दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित मान्सुनपूर्व आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल बोलत होत्या. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कांवरिया, महानगर पालिका आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी श्रीमती पगारे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल म्हणाल्या की, जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांनी नैसर्गिक आपत्तीचा सामना प्रभावीपणे करण्यासाठी तालुका व जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सतर्क ठेवावी. तसेच जिल्हा प्रशासनाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनानुसार, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आराखड्याचे अद्ययावतीकरण करून संबंधित विभागांनी आवश्यक माहिती तातडीने सादर करावी. तसेच तालुका स्तरावरही स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करून ते जिल्हा प्रशासनाकडे सादर करावेत.

जिल्ह्यातील पूरपरिस्थितीचा इतिहास लक्षात घेऊन 2005, 2006 आणि 2008 मधील पूरग्रस्त भागांचा अभ्यास करून त्या ठिकाणी विशेष दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. पूरस्थितीत कोणत्या विभागाने कोणती जबाबदारी पार पाडायची यासाठी स्वतंत्र एसओपी तयार करण्यासाठी माहिती सादर करावी. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत ठेवण्यात यावे. पोलीस, आरोग्य, महसूल, महावितरण, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, पंचायत राज, दूरसंचार आदी विभागांनी आपत्ती कालावधीत समन्वय ठेवून कार्य करावे. सर्व तहसीलदारांनी तालुका आपत्ती व्यवस्थापन समित्यांच्या बैठका घेवून स्थानिक पातळीवरील उपाययोजनांचा आढावा घ्यावा. पुर परिस्थितीत नागरिकांना हलविण्याची वेळ आली तर यासाठी मोठे हॉल, शाळा यांची पाहणी करुन ठेवावी तसेच  पुर प्रवण गावामधील बचाव पथके तयार ठेवण्याच्या सूचनाही  त्यांनी यावेळी दिल्या.

तसेच पावसाळ्यात साथीचे आजार फैलावू नयेत, यासाठी आरोग्य विभागाने विशेष दक्षता घ्यावी. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये औषधीसाठा उपलब्ध ठेवावा. तसेच ग्रामीण भागात स्वच्छता मोहीम राबविण्याच्या सूचना देण्यात याव्यात. सर्व पिण्याच्या पाण्याचे स्रोत सुरक्षित ठेवावेत. महावितरणने पावसाळ्यापूर्वी वीजवाहिन्यांची तपासणी करून धोकादायक झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम तात्काळ पूर्ण करावेत. तसेच ट्रान्सफार्मर परिसरातील स्वच्छता करुन घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने दुरुस्ती पथके कार्यरत ठेवावेत. जिल्ह्यातील पाझर तलाव/साठवण तलावाची देखभाल संबंधीत विभागांनी दूरुस्ती करुन घ्यावी. नदी पात्रातील अतिक्रमण तात्काळ काढून घ्यावीत. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने जिल्ह्यातील सर्व रस्ते, पूल व नाले यांची पाहणी करून आवश्यक त्याठिकाणी तात्काळ दुरुस्तीची कामे करुन घ्यावीत. शहर व ग्रामीण भागातील जलनिस्सारण व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी नाल्यांची साफसफाई करण्याचे निर्देशही देण्यात आले. जालना महानगर पालिका आणि सर्व नगरपालिकानी शहरातील गटार व्यवस्था, नाले यांचे साफसफाई करुन घ्यावी. तसेच जाहिरात फलकांची तपासणी करुन घ्यावी.  आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना त्वरित मदत मिळावी यासाठी जिल्हा नियंत्रण कक्षाशी संपर्कासाठी दूरध्वनी, मोबाईल, व्हीएचएफ, इंटरनेट आणि एसएमएस यंत्रणा कार्यान्वित ठेवण्याचे आदेश देण्यात आले. गावपातळीवर आपत्ती व्यवस्थापन पथके तयार करून त्यांना प्रशिक्षण देण्याच्याही यावेळी सांगितले.

अतिवृष्टी, पूर किंवा वादळाच्या परिस्थितीत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता जिल्हा प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे. आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज असुन, आपत्तीत मदतीसाठी नागरिकांनी जिल्हा नियंत्रण कक्षाचा टोल फ्रि क्रमांक 1077 वर संपर्क साधावा,  असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

बैठकीत प्रारंभी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी सादरीकरणांद्वारे आपत्ती व्यवस्थापन मान्सुनपूर्व आढावा बैठकीचे सादरीकरणाद्वारे माहिती सादर केली.

-*-*-*-*-*-*-

दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पूर्वतयारीचा आढावा

 


जालना,दि.11(जिमाका) : भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार यावर्षी आगामी कालावधीत मराठवाडा विभागावर हवामानाचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्याअनुषंगाने आज दुष्काळ सदृश्य परिस्थितीच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात आढावा घेतला.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कृष्णकांत कांवरिया, महानगर पालिका आयुक्त अंजली शर्मा, पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह संधू, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी श्रीमती पगारे यांची उपस्थिती होती.

यावेळी मित्तल म्हणाल्या की, भारतीय हवामान विभागाने यावर्षी पावसाचा खंड पडण्याची शक्यता वर्तवली आहे. त्याअनुषंगाने पशुसंवर्धन, पाणीपुरवठा आणि कृषी  विभागांनी आतापासूनच आवश्यक नियोजन करुन ठेवावे. ज्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी आतापासूनच नियोजन करावे. तसेच पाणीपूरवठा योजनेतील सर्व कामे तातडीने पूर्ण करावेत. तसेच पशुधनास चाऱ्याची कमतरता उद्भवू नये यासाठी आतापासूनच पशसंवर्धन विभागने पूर्वनियोजन करावे. “दूष्काळ सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनीही पाण्याचा काटकसरीने वापर करावा,” असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी यावेळी केले.

शासकीय व निमशासकीय अधिकारी-कर्मचारी यांनी स्व-गणना करावी - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 

 

जालना,दि.11(जिमाका) :भारत सरकारच्या 16 व्या जनगणना-2027 प्रक्रियेअंतर्गत डिजिटल स्व-गणना (Self Enumeration) करण्याकरीता केवळ चार दिवसचा अवधी उरला असुन, जिल्ह्यातील सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी यांनी आपली डिजिटल स्व-गणना (Self Enumeration) करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

 देशातील 16 वी जनगणना जानेवारी 2026 ते फेब्रुवारी 2027 या कालावधीत दोन टप्प्यात पार पडत आहे. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यात नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाइन पद्धतीने नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी भारत सरकारच्या https://se.census.gov.in या संकेतस्थळावर डिजिटल स्व-गणना प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

ही ऑनलाइन स्व-गणना प्रक्रिया 1 ते 15 मे, 2026 या कालावधीत राबविण्यात येत असून, सर्व शासकीय व निमशासकीय कार्यालयांचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वतःची डिजिटल स्व-गणना पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच संबंधित कार्यालयांतील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही ही प्रक्रिया निश्चित मुदतीत पूर्ण करावी. ज्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांनी अद्याप स्व-गणना केलेली नाही किंवा प्रक्रिया अपूर्ण ठेवली आहे, त्यांनी तातडीने नोंदणी पूर्ण करून त्याचा प्रमाणित अहवाल सादर करावा. संबंधित कार्यालयांनी 15 मे 2026 पर्यंत डिजिटल स्व-गणना पूर्ण करून 16 मे, 2026 रोजी अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील नागरिकांनी स्व-गणना करुन घ्यावी

तसेच जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी देखील या सुविधेचा लाभ घेऊन स्वतःची व कुटुंबाची माहिती अचूकपणे भरुन आपली स्व-गणना करुन घ्यावी. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा प्रधान जनगणना अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

 

 

Friday, 8 May 2026

अंबड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न महाराजस्व समाधान शिबिरास आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची प्रमुख उपस्थिती • 78 भिल्ल कुटुंबांना घराचे पट्टेचे वितरण

 




 

जालना,दि.08(जिमाका) :  महसुल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे अंबड येथील मत्स्योदरी देवस्थान सभागृहात यशस्वीरित्या संपन्न झाले. शासनाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली देण्यासाठी आयोजित या शिबिरात अंबड शहरासह नजीकच्या गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

यावेळी अंबड-बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, अप्पर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, नगराध्यक्षा देवयानी कुलकर्णी, उपनगराध्यक्ष विश्वजीत खरात, उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार विजय चव्हाण, तालुका कृषी अधिकारी बाळासाहेब गंडे, मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी आमदार नारायण कुचे म्हणाले की, महसुल विभागामार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन केले जात आहे. या शिबिरामुळे राज्य शासनाच्या विविध योजनाचा लाभ सर्वसामान्य नागरिकांना होत आहे. प्रशासनाने याशिबिराचे  उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले.

विभागीय आयुक्त जी. श्रीकांत म्हणाले की, घर बांधण्यासाठी जमिनीचा आधार लागतो. आज या वंचित घटकांना शासनाने तो आधार दिला आहे. माननीय मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांनी घेतलेल्या निर्णयामुळे गोरगरिबांचे घराचे स्वप्न आता पूर्ण होत आहे. या लाभार्थ्यांना केवळ जागेचे पट्टेच नाही, तर घरकुल आणि ५ ब्रास मोफत वाळू देखील दिली जाणार असल्याची त्यांनी यावेळी सांगितले

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल म्हणाल्या की, महसूल विभागामार्फत विविध ठिकाणी महाराजस्व समाधान शिबिराचे यशस्वीआयोजन करुन लाभार्थ्यांना विविध लाभ दिले जात आहे. जिल्हा प्रशासनातील सर्व यंत्रणा शासनाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवत असल्याचे त्यांनी सांगितले. भिल्ल समाजासाठी राबविण्यात आलेला  वन पट्टे वाटपाचा प्रयोग हा दिशादर्शक असून, यामुळे अनेक लाभार्थ्यांना याचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे.

आज आयोजित करण्यात आलेल्या या  शिबिरात महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, अंबड शहरातील एकलव्य नगर येथे अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून वास्तव्यास असलेल्या भिल्ल जमातीतील 78 कुटुंबांना हक्काच्या घराचे पट्टे (जागेची मालकी) वितरीत करण्यात आले..यावेळी पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधवासह नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

शिबिरात वाटप करण्यात आलेले विविध लाभ:

•           शेतकरी व आपत्तीग्रस्त मदत: नैसर्गिक आपत्ती (वीज पडणे) व शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांच्या मदतीचे वाटप.

•           महिला सक्षमीकरण: नगरपालिकेच्या महिला बचत गटांना 2 कोटी 75 लाख रुपयांचे अनुदान आणि छोट्या घरकुलांच्या चाव्यांचे वाटप.

•           कृषी यांत्रिकीकरण: ट्रॅक्टर, मिनी ट्रॅक्टर, फवारणी यंत्रे आणि अद्ययावत ड्रोनचे शेतकऱ्यांना वितरण.

•           विविध प्रमाणपत्रे व योजना: महसूल विभागाचे जन्म आदेश, 7/12 उतारे, उत्पन्न प्रमाणपत्रे, आणि पुरवठा विभागामार्फत दिव्यांगांना अंत्योदय योजनेचा लाभ जागीच देण्यात आला.

-*-*-*-*-