Wednesday, 6 September 2023

गणेशोत्सव स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी 15 सप्टेंबरपर्यंत सहभाग नोंदवावा सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन

 


 

मुंबई, दि. 6 : राज्य शासनाने १९ सप्टेंबर २०२३ पासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.

या स्पर्धेसाठी मुंबई, मुंबई उपनगर, पुणे, ठाणे या जिल्ह्यांतून प्रत्येकी ३ व अन्य जिल्ह्यांतून प्रत्येकी एक या प्रमाणे उत्कृष्ट ४४ गणेशोत्सव मंडळांची निवड करण्यात येईल. या ४४ गणेशोत्सव मंडळांमधून राज्यातील पहिल्या क्रमांकाच्या उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळास पाच लाख रुपयांचे, द्वितीय क्रमांकास अडीच लाख रुपयांचे, तर तृतीय क्रमांकास एक लाख रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. उर्वरित ४१ गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रत्येकी २५ हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देण्यात येईल. 

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे वेळापत्रक 

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश मंडळांना 15 सप्टेंबर 2023 पर्यंत स्पर्धेत अर्ज करता येईल. mahotsav.plda.@gmail.com या ई - मेलवर गणेशमंडळांनी अर्ज करावा. पु. ल. देशपांडे कला अकादमी तर्फे ई-मेलवर प्राप्त अर्ज संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाला १८ सप्टेंबरपर्यंत परीक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येईल. १९ ते २८ सप्टेंबर दरम्यान जिल्हास्तरीय समितीचे सदस्य स्पर्धेत सहभागी गणेशोत्सव मंडळांचे प्रत्यक्ष भेटी देऊन परीक्षण करतील. व्हिडिओग्राफी आणि कागदपत्रे तपासून अभिप्रायासह गुणांकन करतील. जिल्हास्तरीय समिती जिल्ह्यातून एका उत्कृष्ट गणेश मंडळाची शिफारस १ ऑक्टोबरपर्यंत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीला करेल. राज्यस्तरीय समिती राज्यातील उत्कृष्ट ३ गणेश मंडळाची शिफारस अकादमीला करेल. त्यानुसार कला अकादमी विजेत्या मंडळांची घोषणा करेल व १२ ऑक्टोबरला विजेत्या गणेश मंडळांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.  

राज्य शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या ४ जुलै २०२३ रोजीच्या शासन निर्णयात स्पर्धेचा तपशील, स्पर्धा निवडीचे निकष नमूद केले आहेत. तसेच अर्जही उपलब्ध करून देण्यात आला आहे. अर्जाच्या या नमुन्यानुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पु. ल. देशपांडे, महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई- मेल १५ सप्टेंबर २०२३ पर्यंत अर्ज करावा. या स्पर्धेत जास्तीत जास्त मंडळांनी सहभाग नोंदवावा, असेही आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी केले आहे.

०००००

Tuesday, 5 September 2023

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक - ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन

 



जालना, दि. 5  (जिमाका) : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी शासन सकारात्मक असून एक महिन्याच्या आत याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

          मराठा आरक्षणासाठी अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे यांची आज श्री. महाजन यांनी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, पालकमंत्री अतुल सावे, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे आदी उपस्थित होते.

          श्री. महाजन म्हणाले की, मराठा आरक्षण व समाजाला सुविधा देण्यासाठी नेमलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमितीची  बैठक काल मुंबईत पार पडली.  आरक्षणाबाबत नेमलेल्या समितीचा एका महिन्याच्या आत अहवाल प्राप्त होताच निर्णय घेण्यात येईल. मात्र त्याआधीच हे काम पूर्ण होऊन निर्णय घेण्यात येईल. सर्व बाजू तपासूनच निर्णय घेतला जाईल.  सरकार  आरक्षणाबाबत अतिशय सकारात्मक आहे. उपोषणकर्ते श्री. जरांगे यांनी तब्येतची काळजी घ्यावी. आरक्षणाबाबतच्या प्रक्रीयेस शासन सर्वोच्च प्राधान्य देत आहे. कमी कालावधीत निर्णय घेण्याबाबत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

***

 

 

जिल्ह्यात शांतता प्रस्थापित होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ शांतता समितीची बैठक संपन्न

 





जालना, दि. 5 (जिमाका) :-  जिल्ह्यात उद्योग, व्यापारासह सार्वजनिक वाहतुक व्यवस्था तसेच जनजीवन पूर्ववत होण्यासह शांतता प्रस्थापित होण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

        मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक  आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  सभागृहात पार पडली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह सकल मराठा समाजाचे समन्वयक, सदस्यांची प्रमुख उपस्थिती होती.

        जिल्हाधिकारी डॉ.पांचाळ म्हणाले की, मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने राज्य शासनाने जिल्हा प्रशासनाकडून शैक्षणिक नोंदी, खासरा प्रमाणपत्र तसेच निजामकालीन दाखले मागविले होते, तरी 1960 पुर्वीचे कागदपत्रे शोधून ती शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. दरम्यान, लोकशाही मार्गाने आंदोलन करत असताना काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अशांतता पसरविणाऱ्या लोकांवर करडी नजर ठेवली जाईल. जिल्ह्यात आज शांततेचे वातावरण असून ते अबाधित राहण्यासाठी सर्वांनी जिल्हा व पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

         पोलिस अधिक्षक श्री.बलकवडे म्हणाले की, जिल्ह्यात कायदा व  सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि नागरिकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. अंतरवाली सराटी येथील अनुचित प्रकाराचा पारदर्शक आणि नि:पक्षपातीपणे तपास करण्यात येवून दोषीविरुद्ध कारवाई करण्यात येईल

तसेच जिल्ह्यात कालपर्यंत केवळ 162 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दाखल करण्यात आलेली कलमे कमी करण्याचे अधिकार असून चार्जशिट दाखल करतेवेळी कमी करण्यात येतील.  तरुणांनी सोशल मीडियावरील आक्षेपार्ह व्हिडीओ चित्रफितीवर विश्वास ठेवू नये तसेच फॉरवर्ड करु नये,  लाठीचार्जप्रकरणी  अपर पोलिस महासंचालक संजय सक्सेना हे पारदर्शकपणे तपास करुन चौकशी करत आहेत. नागरिकांनी पोलिस प्रशासनावर विश्वास ठेवावा. खरे गुन्हेगार शोधून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल. तसेच नागरिकांकडे असलेले पुरावे, जबाब, साक्षीदार तसेच आक्षेपार्ह व्हिडीओ पोलिस अधिक्षक कार्यालयातील विशेष कक्षात जमा करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी सकल मराठा समाजाच्या समन्वयकांनी आंदोलन दरम्यान ज्या व्यक्तींनी हिंसा केली त्यांच्यावर कायद्यान्वये कडक कारवाई करावी तसेच निरपराध लोकांवरील गंभीर स्वरुपात दाखल गुन्हे मागे घ्यावेत व अनुचित प्रकारची नि:ष्पक्षपातीपणे चौकशी करावी, अशा सूचना केल्या.  बैठकीस सकल मराठा समाजाचे नागरिक, सदस्य, पदाधिकारी, महिला उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

Friday, 1 September 2023

मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सव चित्ररथास जिल्हाधिकारी यांनी दाखविली हिरवी झेंडी

 




जालना, दि. 1 (जिमाका) - मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने  तयार करण्यात आलेल्या चित्ररथास जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ  व जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांनी हिरवी झेंडी दाखवून जनजागृतीसाठी रवाना केले.

या चित्ररथाच्या माध्यमातून मराठवाडा मुक्तीसंग्रामाची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. जालना जिल्हयातील सर्व तालुक्यात हा चित्ररथ फिरणार आहे.  सदर कार्यक्रमप्रसंगी उपजिल्हाधिकारी संगीता सानप, जिल्हा माहिती अधिकारी प्रमोद धोंगडे, नायब तहसिलदार विक्रांत मोंढे आदींसह कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-

निवडणुक साक्षरता मंडळ जालना जिल्ह्यात होणार स्थापन

 



 

जालना दि. 1 (जिमाका):-  भारत निवडणूक आयोगाकडुन नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये निवडणुक विषयक जनजागृती करण्यासाठी नुकतीच जालना जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.  जालना जिल्ह्यात निवडणुक साक्षरता मंडळाची स्थापना होणार असून     जास्तीतजास्त महाविद्यालयांनी यात सहभागी होऊन निवडणूक विषयी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घ्यावा. या उपक्रमामुळे युवकांच्या माध्यमांतून निवडणूकीविषयी सजगता निर्माण होण्याकरीता  निवडणुक साक्षरता मंडळ फलदायी ठरेल, अशी अपेक्षा जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

 

बैठकीमध्ये महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये निवडणुक साक्षरता संदर्भात जनजागृती प्रचार व प्रसार व्हावा. प्रत्येक महाविद्यालयामध्ये निवडणुक साक्षर मंडळाची स्थापना करुन अधिकाधिक विद्यार्थ्यांचा सहभाग या मंडळात व्हावा या उद्देशाने पुढील कामकाजाचे स्वरुप निश्चित करुन रुपरेषा ठरविण्यात आली.

 

बैठकीस जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना,  निवडणुक उपजिल्हाधिकारी शशीकांत हदगल,वर्शीप अर्थ फाऊंडेशनचे सीईओ तेजस गुजराथी, अंबडचे उपविभागीय अधिकारी दिपक पाटील, शिक्षणाधिकारी  व जिल्हा नोडल अधिकारी कैलास दातखिळ, एडीईआय आर. एन. जारवाल, वर्शीप अर्थ फाऊंडेशनचे महाराष्ट्र समन्वयक अल्ताफ पिरजादे, जिल्हा समन्वयक आकाश गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. सोमीनाथ खाडे, डॉ. बद्रीनाथ घोंगे, संतोष मुसळे यांच्यासह जिल्ह्यातील तहसिलदार, उपविभागीय अधिकारी नायक तहसिलदार हे दुरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

लोक अभिरक्षक कार्यालयाच्या फलकाचे अनावरण

 

जालना, दि.1 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांनी नियुक्त केलेल्या आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना या कार्यालयाअंतर्गत येणारे लोक अभिरक्षक कार्यालय, जालना Legal Aid Defense Counsel System ही प्रणाली कार्यान्वीत केली आहे. त्या अंतर्गत मुख्य महत्त्वाचे कार्य म्हणजे फौजदारी खटल्यांमध्ये मोफत शासकीय वकील मिळणे हे आहे तसेच इतरही कार्य या प्रणालीद्वारे चालविले जाते. लोक अभिरक्षक कार्यालयाच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

शुक्रवार दि. 29 ऑगस्ट 2023 रोजी लोक अभिरक्षक कार्यालय, जालना या कार्यालयाने पोलीस अधिक्षक कार्यालय, जालना येथे या कार्यालयाचे शासकीय वकील तसेच त्यांचे दुरध्वनी कमांकाचे फलक पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांच्या उपस्थितीत पोलीस अधिक्षक कार्यालयात लावण्यात आला जेणेकरून तेथे येणा-या अभिभावकांना लोक अभिरक्षक कार्यालय, जालना Legal Aid Defense Counsel System या प्रणाली ची माहिती होईल. लोक अभिरक्षक कार्यालय, जालना Legal Aid Defense Counsel System ही प्रणाली यामधील अधिकारी मुख्य लोकअभिरक्षक एम. आर. वाघुंडे, उपमुख्य लोकअभिरक्षक वाय. एस. कुलकर्णी,  वाय.एस. खरात, सहायक मौजुद शेख,  यश लोसरवार, अर्सलान शेख, ज्ञानेश्वर शेंडगे हे सदर फलकाचे अनावरणावेळी उपस्थित होते. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. 

-*-*-*-*-


जिल्हा ग्रंथालयातील ग्रंथाची संगणकात नोंद करण्यासाठी निविदा मागविली

 


जालना, दि.1 (जिमाका) :-  मराठी, हिंदी, इंग्रजी भाषांमध्ये प्रकाशित झालेल्या व जिल्हा ग्रंथालयात आणि डिजीटल उपकेंद्र घनसावंगी येथील कार्यालयात उपलब्ध असलेल्या सुमारे 1,30,000 ग्रंथ संपदेची विहीत नमुन्यातील विविरणपत्रात एक्सेल शिटमध्ये ऑफलाईन नोंद करावयाची आहे.  ग्रंथाची नोंदणी करणे, बारकोड लेबलचे स्टिकर लावणे, ग्रंथ संग्रहाची दाखल नोंद क्रमाने कपाटामध्ये मांडणी इत्यादी कामे करावयाची आहेत. हे काम बाह्य यंत्रणेकडून  करावयाचे असून करार पध्दतीने काम करुन देण्यास इच्छुक असलेल्या अनुभवी कंत्राटदार संस्था अथवा व्यक्तीकडून मोहोरबंद लिफाफ्यामध्ये दरपत्रक जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जालना कार्यालयात दि.14 सप्टेंबर 2023 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत निविदा सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश पाटील यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-