Tuesday, 13 August 2019

पूरबाधितांसाठी मदत स्वीकृती केंद्रामध्येच मदत जमा करण्याचे आवाहन


            सांगली, दि. 13, (जि. मा. का.) :  सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमिवर प्रत्यक्ष पूरबाधितांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी ती मदत स्वीकृती केंद्रामध्येच जमा करावी. मदत स्वीकृती केंद्रामध्ये प्राप्त होणारी मदत ही संबंधित ग्रामपंचायतीमार्फत सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील यांच्या उपस्थितीत सर्व बाधितांपर्यंत पोहोच केली जाईल, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.  
सांगली जिल्ह्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मिरज, वाळवा, शिराळा, पलूस तालुक्यामध्ये अनेक गांवे बाधित झालेली असून सदर गावांमधील बाधित कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी विस्थापित करण्यात आले होते. सद्यस्थितीत नद्यांच्या पाणी पातळीमध्ये घट होऊन परिस्थिती पूर्वपदावर येत आहे.  पूरबाधितांना विविध दानशूर / सेवाभावी संस्था / नागरीक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक / वस्तू स्वरुपात मदत केली जात आहे.  यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय येथे व तालुका स्तरावर संबंधित तहसिल कार्यालयामध्ये पूरग्रस्तांसाठी मदत स्वीकृती कक्ष स्थापन करण्यात आलेले असून, त्या कक्षामार्फत विविध ठिकाणांहून प्राप्त होणारी मदत एकत्रित करुन ती पूरबाधितांपर्यंत पोहोचविण्याचे काम अखंडितपणे सुरु आहे.                     
पूरबाधितांना मदत देण्यासाठी पुढीलप्रमाणे संपर्क करावा - जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली - श्रीमती  शिल्पा ओसवाल            - 8007547333,तहसिल कार्यालय, मिरज - सुनील कानडे - 7709286873, तहसिल कार्यालय, वाळवा - श्रीमती शर्वरी पवार - 9422763562, तहसिल कार्यालय, शिराळा - श्री. सिद - 9421177627, तहसिल कार्यालय, पलूस - श्रीमती पाटील - 9404419378
दरम्यान श्री स्वामी नारायण मंदिक, आंबेगाव (खु.) पुणे यांच्याकडून 3 गाड्यांद्वारे गृहोपयोगी साहित्याचे 1000 किट प्राप्त झाले. त्यातील 400 किट महानगरपालिका, 300 किट पलूस तालुका आणि 300 किट मिरज तालुक्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. तहसील कार्यालय, उरण यांच्याकडून प्राप्त 257 पाणी बॉक्स, खाद्यतेल, बिस्कीटस्‌ तहसीलदार पलूस यांच्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. सहकार महर्षि कापरी विविध कार्यकारी सेवा मर्यादित, कापरी, नगर यांच्याकडून प्राप्त गृहोपयोगी साहित्य, धान्य, अंथरूण आदि मिरज तहसीलकडे वर्ग करण्यात आले आहे. पिंपरी - चिंचवड महानगरपालिकेकडून प्राप्त मास्क,खराटे, घमेली आदि साफसफाईचे साहित्य मिरज तहसीलकडे वर्ग करण्यात आले आहे.

ग्रामपंचायतीना 5 कोटी स्वच्छतेसाठी पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा लवकरच सुरळीत करणार - बबनराव लोणीकर


            मुंबई, दि. 13 : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर, सांगली़, सातारा तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे या जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा विस्कळीत झाला आहे. तो लवकरच सुरळीत करणार असून पूरग्रस्त गावातील स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींना 5 कोटी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद केली असल्याची माहिती पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज दिली.
            पूरग्रस्त भागातील पाणी पुरवठा योजना व स्वच्छतेबाबतची आढावा बैठक आज मंत्रालयात झाली त्यावेळी श्री. लोणीकर बोलत होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता राज्यमंत्री सदाभाऊ खोत, अपर मुख्य सचिव शामलाल गोयल व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
            श्री. लोणीकर म्हणाले, कोल्हापूर, सांगली व सातारा या भागातील पुराचे पाणी कमी होण्यास सुरुवात झाली आहे. कोल्हापूरमध्ये सुमारे 604 पाणी पुरवठा योजना, सांगलीमध्ये 130 पाणी पुरवठा योजना, साताऱ्यामध्ये 98 पाणी पुरवठा योजना या क्षतिग्रस्त झालेल्या आहेत. तसेच राज्यातील इतर पूरग्रस्त भागातील योजनाही क्षतिग्रस्त झाल्या आहेत. या सर्व भागातील स्वच्छता मोहीम व स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुरळीत करण्यावर भर दिला आहे. त्या अनुषंगाने तात्पुरत्या उपाय योजना राबविण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या उद्भवाची तातडीने तपासणी  करावी. त्या ठिकाणी टी. सी.एल. पावडर, क्लोरिनचा वापर करून जे पाणी पिण्यायोग्य आहे, त्या पाण्याचा पुरवठा सुरळीत करावा. तसेच या भागातील जे जलस्त्रोत दूषित आहेत, त्या जलस्त्रोतांची तातडीने तपासणी करून पाणी पिण्यायोग्य करण्यात यावे, तसेच अन्य जिल्ह्यातून हातपंप दुरुस्ती व पाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती करण्यासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहेत. जेणे करून सर्व पिण्याच्या पाण्याच्या योजना तातडीने सुरू करण्याचे निर्देशही श्री. लोणीकर यांनी यावेळी दिले.
           राज्यातील पूरग्रस्त भागातील नद्यांवर तेथील गावातील अनेक पाणी पुरवठा योजना आहेत. पुरामुळे या भागातील पाणी पुरवठा करणाऱ्या विहीरीमध्ये गाळ साचणे, अनेक विहिरी ढासळल्या आहेत. तर काही ठिकाणीच्या बुजलेल्या आहेत. तेथील  पाईपलाईन खराब होणे, विद्युत पंप खराब होणे. या सर्व योजनांचा सर्व्हे करून यामध्ये बाधित योजनामध्ये कोणत्या उपाय योजना करणे गरजेचे आहे, त्याचे तातडीने सर्व्हेक्षण करावे. तसेच या कामांचे अंदाजपत्रक तयार करून जिल्हास्तरावरून उपलब्ध होणारा निधी तातडीने वापरण्यात यावा. तसेच इतर उपाय योजनांच्या बाबतीत शासनाला एकत्रित प्रस्ताव सादर करावा. तसेच यासाठी आवश्यक तो सर्व निधी शासन त्वरीत उपलब्ध करुन देणार असल्याचेही श्री. लोणीकर यांनी सांगितले.
पूरग्रस्त भागातील गावांच्या स्वच्छतेसाठी ग्रामपंचायतींना 5 कोटी रुपये विशेष निधीची तरतूद
        राज्यातील पूरग्रस्त भागातील ग्रामपंचायतींना स्वच्छतेसाठी 5 कोटी रुपयांच्या विशेष निधीची तरतूद करण्यात आली. 1500 लोकसंख्येपर्यंतच्या ग्रामपंचायतींना रु. 50 हजार तर 1500 च्या पुढील लोकसंख्येच्या ग्रामपंचायतींना 75 हजार रुपये निधी प्राथमिक स्वरुपात त्वरीत वितरीत करण्यात येणार असल्याचे श्री. लोणीकर यांनी सांगितले.

Monday, 12 August 2019

मुंबईत दुधाचा तुटवडा भासणार नाही दुधपुरवठा परिस्थितीचा पदुम राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी घेतला आढावा



मुंबई, दि. 11 : राज्यातील इतर भागातून दूध उपलब्ध करून दिले जात असल्याने आता मुंबईत दुधाचा तुटवडा भासणार नाही अशी ग्वाही पशूसंवर्धन,दुग्ध विकास आणि मत्स्यव्यवसाय राज्यमंत्री अर्जून खोतकर यांनी दिली आहे. कोल्हापुर व सांगली जिल्ह्यात उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे मुंबई शहर परिसरातील दूध तुटवड्याचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला.
          मुंबई शहर परिसरात दररोज सुमारे 35 लाख लिटर पिशवीबंद दुधाची विक्री होते. यात  मुंबई शहर आणि परिसरात लागणाऱ्या दुधाचा पुरवठा राज्यातील पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, पुणे तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर व जळगांव जिल्ह्यातून होतो.  मुंबई शहर परिसरात प्रामुख्याने अमुल, गोकुळ, वारणा, प्रभात, राजहंस, मदर डेअरी, गोवर्धन, विकास इ. प्रमुख ब्रॅन्डचे दूध विक्रीसाठी येते.
दि.१०.८.२०१९ रोजी प्रमुख सहकारी व खाजगी प्रकल्पांकडून मुंबईत पुरवठा झालेल्या सुमारे ३१.५४ लाख लिटर दुधाच्या तुलनेत दि. ११.८.२०१९ रोजी ३१.०३ लाख लिटर दूध वितरण झाले आहे. म्हणजेच दि. १०.८.२०१९ रोजीच्या तुलनेत शहरातील वितरणात ०.५१ लाख लिटरने कमी झाले.   दि.१०.८.२०१९ रोजीच्या तुलनेत कोल्हापूर जिल्हातील वारणा सहकारी दूध संघाचा मुंबईतील दूध पुरवठा नियमीत झाला असुन फक्त गोकुळ सहकारी दूध संघामार्फत मुंबईत येणारे दूध सरासरी ६.७५ लाख लिटर ऐवजी १.४८ लाख लिटर मुंबई वितरणासाठी उपलब्ध झाले.
 गोकुळ कडुन मुंबईत वितरणासाठी कमी पडलेल्या ६.७५ लाख लिटर दुधाची अमुलने त्यांचे वितरण २.९५ लाख लिटर , मदर डेअरी ०.१८ लाख लिटर,प्रभात डेअरी ०.०३ लाख लिटर, गोवर्धन ०.४८ लाख लिटर, गोविंद ०.०५ लाख लिटर, सोनाई  डेअरी (इंदापूर) ०.३४ लाख लिटर,नंदीनी ०.२४ लाख लिटरने असे एकूण ४.२७ लाख लिटर ने दुधाची भरपाई केली आहे.  अशाप्रकारे कोल्हापूर जिल्ह्यातून कमी पुरवठा झालेल्या 6.75 लाख लिटर दुधापैकी वरील सर्व ब्रॅन्डनी  त्यांची  वितरणाचा पुरवठा वाढवून सुमारे ४.२७ लाख लिटरचे जास्तीचे वितरण केले आहे.   तसेच नाशिक विभागातून सुध्दा सहकारी व खाजगी प्रकल्पांकडून जळगाव संघ ०.६१ लाख लिटर पतंजली आयुर्वेद ०.२८ लाख लिटर, मळगंगा डेअरी ०.२४ लाख लिटर, राजहंस ०.१०, संगमनेर ०.१० व गोदावरी खोरे ०.१० लाख लिटर असे एकूण सुमारे १.४३ लाख लिटर दुधाचा नियमीत पुरवठा मुंबईत झाला आहे. सर्व प्रमुख ब्रॅन्डकडे पुढील २ दिवसासाठी वितरणासाठी आवश्यक असलेला दुधाचा साठा उपलब्ध आहे.
 पूरग्रस्त जिल्हे सोडून नाशिक विभागातील सहकारी व खाजगी प्रकल्पांना त्यांच्या मार्फत मुंबईस होणाऱ्या दुध पुरवठयात पूर परिस्थिती सुधारणा होईपर्यत वाढ करण्याबाबत विभागामार्फत सूचना देण्यात आलेल्या आहेत.  अशी माहिती दुग्ध विकास आयुक्त नरेंद्र पोयाम यांनी दिली आहे.

अतिवृष्टीबाधित जिल्हा परिषदेच्या शाळांना तातडीने 57 कोटीचा निधी उपलब्ध करुन देणार; शालेय शिक्षणमंत्र्यांची माहिती


·       शाळा दुरूस्ती, शैक्षणिक साहित्य,पोषण आहार, उपलब्ध करणार
·       पूरग्रस्त विद्यार्थी पाठ्यपुस्तक योजना राबविणार

            पुणे, दि. 11 : राज्यातील 21 जिल्ह्यातील 2 हजार 177 जिल्हा परिषद शाळांना फटका बसला असून त्यांची दुरुस्ती व पोषण आहार, शैक्षणिक साहित्य व पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यासाठी शाळांना 57 कोटींचा निधी आवश्यक असून तो निधी तातडीने शिक्षण विभागाकडून खास बाब म्हणून देण्यात येईल,अशी घोषणा शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी आज पुण्यात केली.
राज्यातील अतिवृष्टीबाधित शाळांचा आढावा गेल्या दोन दिवसांपासून शिक्षण विभागाकडून घेण्यात येत असून त्याचा एकत्रित आढावा घेण्यासाठी ॲड. शेलार तातडीने पुणे दौऱ्यावर आले होते. पूरपरिस्थिती ओसरल्यावर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ॲड. शेलार यांनी आज सांगली, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर वगळून पूरबाधित जिल्ह्यातील संबंधितांची आढावा बैठक पुणे येथे घेतली. या बैठकीत संबंधित अधिकाऱ्यांकडून जिल्हे आणि तालुकानिहाय शाळांच्या झालेल्या नुकसानीची माहिती घेतली.
राज्यातील अतिवृष्टीमुळे आठ शिक्षण विभागापैकी सहा विभाग पूरपरिस्थितीने बाधित झाले असून 21 जिल्ह्यातील 155 तालुक्यात नुकसान झाले आहे. या 21 जिल्ह्यात  जिल्हा परिषदेच्या 2 हजार 177 शाळा बाधित झाल्या आहेत. याचा फटका 1 लाख 63 हजार 275 विद्यार्थ्यांना बसेल, असा अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे. तातडीने 53 पूर्ण वर्ग खोल्याचे बांधकाम करावे लागणार असून  2 हजार 177 शाळांच्या वर्ग खोल्यांची दुरुस्ती करावी लागणार आहे. 36 किचनशेड बाधित झाले असून 477 शाळांमध्ये शालेय पोषण आहार बाधीत झाला आहे. तर 260 शाळांमधील 27 हजार 905 विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके ही पुरामुळे बाधित झाली आहेत. एकंदरीत यासाठी रुपये 57 कोटी एवढ्या निधीची गरज असल्याचे विभागीय उपसंचालक, जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी कळविलेल्या अहवालातील माहिती आजच्या बैठकीत ॲड. शेलार यांच्यासमोर संबंधित अधिकाऱ्यांनी मांडली.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष अडचणीत येऊ नये आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ॲड. शेलार यांनी खास बाब म्हणून 57 कोटींचा निधी शिक्षण विभागातर्फे उपलब्ध करून देण्यात येईल, असे या बैठकीत घोषित केले.
हा निधी थेट शाळेच्या बँक खात्यामधे जमा करण्यात येणार असून स्थानिक पातळीवर दुरुस्ती करण्यात येणार आहे.
पूरग्रस्त भागातील शाळा पुन्हा सुरू करताना आरोग्याच्या दृष्टीने तो संपूर्ण शाळा परिसर संबंधित शासकीय यंत्रणेकडून निर्जंतुक करण्यात यावा तसेच पिण्याच्या पाण्याच्या टाक्या व वर्गखोल्यांची स्वच्छता याबाबत सविस्तर परिपत्रक शिक्षण विभागाने काढावे, असे निर्देश ॲड. शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ज्या शाळांमध्ये पूरग्रस्तांसाठी तात्पुरती निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे, अशा शाळांतील विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था नजिकच्या खाजगी शाळांमध्ये करता येईल का? अथवा दोन सत्रात शाळा भरविण्याची व्यवस्था होऊ शकते का ? याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्यात यावा, असे निर्देश त्यांनी दिले. ज्या ठिकाणी पूर परिस्थितीमुळे शाळा  पुन्हा वापरताना योग्य  ती स्वच्छता करण्यात यावी याबाबतही सूचना या बैठकीत देण्यात आल्या.
पूर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर सांगली, सिंधुदुर्ग व कोल्हापूर या जिल्ह्यांची माहिती गोळा करून त्यांचाही या योजनेत समावेश करून त्यांनाही निधी उपलब्ध करून देण्यात येईल.
बैठकीला शालेय शिक्षणच्या अप्पर मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, शिक्षण विभागातील सर्व संचालक, बालभारती, बोर्डाचे अध्यक्ष व सचिव आणि संबंधित बाधित जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी उपस्थित होते.
०००

आपदग्रस्तांना प्रतिकुटुंब पाच हजार रोखीने अर्थसहाय्य -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्र्यांची राज्य आपत्कालीन कक्षास भेट



मुंबई, दि. 11 : पूरपरिस्थितीत बाधीत झालेल्या नागरिकांना देण्यात येणाऱ्या मदतीपैकी प्रतिकुटुंब रोखीने पाच हजार अर्थसहाय्य तातडीने वितरीत करा तसेच उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. 
          मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी मुख्य सचिव अजोय मेहता, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर, माहिती व जनसंपर्क सचिव ब्रिजेश सिंह, मंत्रालय नियंत्रण कक्षाचे सहसचिव अरुण उन्हाळे, आपत्ती निवारण प्रभागाचे संचालक अभय यावलकर यावेळी उपस्थित होते.
बाधीत नागरिकांना रोख रकमेचे वितरण करण्यासोबतच नादुरुस्त पाणीपुरवठ्याच्या योजना तातडीने दुरुस्त करुन नागरिकांना स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात यावा. बाधीत गावांमध्ये स्वच्छतेची मोहीम प्राधान्याने हाती घेण्यासोबतच रस्ते, पुलांच्या दुरुस्तीसह गावांमध्ये जनजीवन सुरळीत होण्यासाठी तातडीच्या उपाययोजना राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी दिले.
स्वच्छतेच्या मोहीमेसाठी शासकीय, निमशासकीय, खाजगी स्तरावर उपलब्ध होणारी सर्व यंत्रणा कामाला लावा. बाधीत गावांमध्ये औषधांची फवारणी, पूर परिस्थितीमुळे प्रभावीत झालेल्या कुटुंबियांना दैनंदिन आर्थिक मदत तसेच पेट्रोल, डिझेल व गॅसपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. खंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. शिरोळ येथे तातडीने चारा पोहोचविण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या.
          महामार्गांवर ज्याठिकाणी वारंवार पाणी साचून वाहतूक बाधीत होते, अशाठिकाणी उड्डाणपुले बांधण्याचे प्रस्तावित करण्याच्या सुचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या. सांगलीत आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीसाठी कवलापूर येथे सुसज्ज विमानतळ बनविण्याबाबत सूचना दिल्या.
राज्यातील 10 जिल्ह्यांत पूरपरिस्थिती असून 70 तालुके व 761 गावे बाधित झाली आहेत. 4,47,695 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. मदतकार्यात एनडीआरफ 32 टिम, एसडीआरफ 3 टिम, आर्मी 21 टिम, नेव्ही 41, कोस्ट गार्ड 16 टिम राज्यात कार्यरत आहेत. 226 बोटी द्वारे बचावकार्य सुरु आहे. पूरपरिस्थितीमुळे 32 व्यक्तींचा मृत्यू झाला तर 4 व्यक्ती जखमी झाल्या. 48 जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत.
कोल्हापूर येथे पाण्याची पातळी 1 फुट 11 इंचाने व सांगलीतील पाण्याची पातळी 3 फूटाने ओसरली आहे. शिरोळ येथे 62.9 फुट पाण्याची पातळी आहे. अलमट्टी धरणामध्ये 6 लाख 8 हजार 33 क्यूसेक इन फ्लो असून विसर्ग 5 लाख 70 हजार क्युसेक आहे. पुणे विभागातील 27 तालुके बाधित असून 585 गावांचा त्यात समावेश आहे. त्यामध्ये 2 महानगरपालिका आणि 15 नगरपालिकांचा  समावेश आहे.
सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर या जिल्ह्यांतून 4 लाख 13 हजार 985 नागरिकांना 535 आश्रय शिबीरात सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे. सांगली जिल्ह्यात एकूण 51 पथके, 95 बोटी व 569 जवानांमार्फत बचाव कार्य सूरू आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 54 पथके, 74 बोटी आणि 456 जवानांमार्फत बचाव कार्य सुरु आहे. सांगली जिल्ह्यात 80, कोल्हापूर जिल्ह्यात 150 आणि सातारा जिल्ह्यात 72 वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.
सांगली जिल्ह्यात 66 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 33 पूल पाण्याखाली आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात 91 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 39 पूल पाण्याखाली आहेत. सातारा जिल्ह्यात 5 रस्ते वाहतूकीसाठी बंद असून 3 पूल पाण्याखाली आहेत. सोलापूर जिल्ह्यात 33 रस्ते बंद असून 14 पूल पाण्याखाली आहेत.
          राज्यात आज अखेर 802.70 मि.मि. पावसाची नोंद झाली असून ती सरासरीच्या 109.43 टक्के आहे. मागील वर्षी यावेळी ती 79.22 टक्के होती. राज्यात आतापर्यंत 58 टक्के पाणीसाठा पावसामुळे निर्माण झाला आहे. जायकवाडी धरण 80 टक्के तर उजनी धरण 100 टक्के भरलेले आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन सचिव किशोरराजे निंबाळकर यांनी बैठकीदरम्यान मुख्यमंत्र्यांना दिली.
००००

पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार - पालकमंत्री दीपक केसरकर



सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात  अभूतपूर्व अतिवृष्टी झाली. त्यामुळे अनेक भागात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. या पुरामुळे ज्यांचे नुकसान झाले त्यांना पुन्हा उभे करणे गरजेचे आहे. त्यासाठी लागणारी सर्व ती मदत करणार असल्याचे पालकमंत्री दीपक केसरकर सांगितले.
पालकमंत्री श्री. केसरकर यांनी कुडाळ, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन नागरिकांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते.
पुरामुळे अनेकांचे संसार वाहून गेले आहेत. घरात धान्य नाही, साहित्य नाही अशी परिस्थिती उद्भवली असल्याचे सांगून पालकमंत्री म्हणाले की, पूरग्रस्तांना शासनाकडून ग्रामीण भागासाठी 10 हजार रुपये आणि शहरी भागासाठी 15 हजार रुपये तातडीची मदत दिली जाणार आहे. तसेच स्थलांतरितांना प्रति दिनी प्रति व्यक्ती प्रौढांसाठी 60 रुपये आणि मुलांसाठी 45 रुपये दैनिक भत्ता दिला जाणार आहे. ही रक्कम पूरग्रस्तांच्या बँक खात्यावर मंगळवारपर्यंत जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले असून त्याची कार्यवाही सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी आपल्या नुकसानीचे पंचनामे करुन घ्यावेत. पडलेल्या घरांचेही पंचनामे सुरू आहेत. तसेच मातीच्या घरांमध्ये पाणी शिरले असेल तर त्याचे वेगळे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. मातीची घरे पाणी शिरल्याने लगेच कोसळत नाहीत. पण, नंतर ती कोसळतात. त्यावेळी पाऊस नसेल तर त्यांना नुकसान भरपाई मिळत नाही. त्यामुळे अशा घरांचे वेगळे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जेणेकरुन नंतर जरी घर कोसळले तर त्याची नुकसान भरपाई देण्याविषयी कार्यवाही करता येईल, शेतीच्या नुकसानीबाबत पंचनामे करुन जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना कशी करता येईल, याविषयी निर्णय घेण्यात येईल, असे पालकमंत्री श्री. केसरकर म्हणाले.

अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी डोंगर खचण्याच्या घटना

यंदाच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी डोंगर खचण्याच्या घटना घडत आहेत. कुडाळ तालुक्यातील सरंबळ, आकेरी, सावंतवाडी तालुक्यातील शिरशिंगे पैकी गोठवेवाडी, दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे यासह अनेक भागात डोंगर खचत असल्याचे दिसत आहे. याठिकाणी राहणाऱ्या लोकांनी स्थलांतर करावे असे आवाहन केले.

भूगर्भ शास्त्रज्ञांना याविषयीची पाहणी करण्याचे आदेश दिले आहे. त्या पद्धतीने पाहणी सुरू असून कोणती उपाययोजना करता येईल याविषयी अहवाल तयार करण्यात येत आहे. पण, अशा भागातील रहिवाशांनी स्थलांतर करावे. कायमस्वरुपी स्थलांतरासाठी जागा त्यांनी सांगावी. त्याठिकाणी त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यात येईल.

पुन्हा भात लावणीसाठी प्रयत्न करणार

अतिवृष्टीमुळे मुख्यतः भात पिकाचे नुकसान झाले आहे. पण, अजून वेळ गेलेली नाही. ज्याठिकाणी पुन्हा भाताची लावणी करणे शक्य आहे त्याठिकाणी लावणी करण्यासाठी प्रयत्न केले जातील. या भात लावणीसाठी कृषि यांत्रिकीकरणातून यंत्रांचा पुरवठा केला जाईल. त्यासाठी ग्रामस्थांनी एकत्र येऊन तसे ठराव पाठवावेत. तसेच चांदा ते बांदा योजनेतून कुक्कुट पालनासाठी, गायी पालनासाठीच अनुदान दिले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

गोव्याप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन उभारणार
आपत्तीप्रसंगी नागरिकांना तातडीने मदत मिळावी, त्यांची सुटका व्हावी यासाठी गोव्याच्या धर्तीवर जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाची उभारणी करण्यात येईल. गोव्यात एका टीममागे एक 307 आणि 407 गाडी असते. त्यामध्ये त्यांची एक नाव असते. त्याप्रमाणेच जिल्ह्यातही आपत्ती व्यवस्थापनाच्या निधीतून तेरा पोलीस स्थानकांना एक नाव, एक 407 आणि एक 307 गाडी पुरवण्यात येणार आहे. त्या माध्यमातून पुरासारख्या आपत्तीप्रसंगी पोलिसांची नाव वापरून पुरात अडकलेल्या लोकांना ताबडतोब बाहेर काढता येईल. तसेच ग्रामस्थांना तातडीने आवश्यक असणाऱ्या वस्तू पुरवण्यात येतील, असेही श्री. केसरकर म्हणाले.

यावेळी पालकमंत्री श्री. केसरकर यांनी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस गावाला भेट दिली. तसेच केळूस येथील तुळाजी तांडेल यांचे घर पाण्यात होते त्यांच्या घरालाही भेट देऊन पाहणी केली, चेंदवण येथील 92 कुटुंबे स्थलांतरीत आहेत. त्यांच्याशी संवाद साधून त्यांना धिर दिला. दोडामार्ग तालुक्यातील सासोली हेदूस यांच्या शेतीच्या नुकसानीची पाहणी केली. तर तिलारीच्या कालव्यात कोसळलेल्या दरडीची, वाहून गेलेल्या केळी बागायतीची व श्री धवसकर यांच्या भात शेतीची पाहणी केली.
एनडीआरएफच्या जवानांचे मानले आभार
दोडामार्ग तहसील कार्यालयामध्ये छोटेखानी समारंभामध्ये पालकमंत्री श्री. केसरकर यांनी दोडामार्ग तालुक्यातील पूरपरिस्थितीवेळी लोकांना वाचवण्यासाठी चांगले काम केल्याबद्दल एनडीआरएफच्या जवानांचे आभार मानले. यावेळी खासदार विनायक राऊत, तहसीलदार ओंकार ओतारी यांच्यासह दोडामार्ग तालुक्यातील ग्रामस्थ उपस्थित होते. एनडीआरएफचे इन्स्पेक्टर पितांबरे पराग यांना पुष्पगुच्छ देऊन व जवानांना पुष्प देऊन त्यांचे आभार मानले.

सांगली जिल्ह्यात 14 हजारहून अधिक विस्थापितांवर 67 वैद्यकीय पथकांद्वारे औषधोपचार


                   सांगली, दि. 12 : ‍जिल्ह्यात पुराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर नागरिकांना स्थलांतरित होण्याची वेळ आली आहे. या पूरग्रस्तांवर उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. चार तालुक्यांमध्ये 14 हजार 891 पूरग्रस्त नागरिकांवर औषधोपचार करण्यात येत आहे.
मिरज तालुक्यातील हरिपूर, मौजे डिग्रज, पद्माळे, नांद्रे, समडोळी, सावळवाडी, माळवाडी, दुधगाव, कसबे डिग्रज, तुंग, कवठेपिरान, अंकली, ढवळी, निलजी/बामणी,जुनी धामणी, म्हैसाळ या 16 गावांतील एकूण 1 हजार 30 विस्थापितांवर 16 पथकांद्वारे औषधोपचार करण्यात आले आहेत. पलूस तालुक्यातील बुरुंगवाडी, भिलवडी स्टेशन, माळवाडी, खंडोबाचीवाडी, वसगडे, नागठाणे, अंकलखोप, विठ्ठलवाडी, दह्यारी, रामानंदनगर, दुधोंडी, पलूस या 15 गावांतील 6 हजार 484 विस्थापितांवर 17पथकांद्वारे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र, कासेगाव, नेर्ले, बावची, वाळवा, बागणी, बोरगाव, येलूर, कुरळप या ग्रामीण भागातील एकूण4 हजार 921 विस्थापितांवर 23 पथकांद्वारे वैद्यकीय उपचार सुरू आहेत. तसेच इस्लामपूर नगरपालिका क्षेत्रामध्ये मसुचीवाडी, शिगाव, वाळवा, बोरगाव, बहे,खरातवाडी, साटपेवाडी, हुबालवाडी, खरातवाडी, बोरगाव, गौडवाडी या गावांतील 1 हजार 288 विस्थापितांवर 6 पथकांद्वारे वैद्यकीय उपचार करण्यात आला आहेत. कसबे बीड, नागठाणे, औदुंबर, दुधगाव, सांगलवाडी, कसबे डिग्रज, अंकलखोप या गावांतील 1 हजार 168 विस्थापितांवर आष्टा नगरपालिका क्षेत्रामध्ये वैद्यकीय उपचार सुरू आहेत. वाळवा तालुक्यातील एकूण 7 हजार 377 विस्थापितांवर वैद्यकीय उपचार करण्यात आले आहेत. शिराळा तालुक्यातील सागाव, पुनवत, मांगले, देववाडी या गावातील विस्थापितांवर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.