Tuesday, 9 December 2025

प्रत्येक कुटुंबाची माहिती मोबाईल ॲपवर नोंदवून जनगणना केली जाईल -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 

 

जालना दि. 9 (जिमाका) :-  जनगणना-2027 हा खुप महत्वाचा विषय आहे. भारताच्या इतिहासातील प्रचंड मोठा बदल आहे. जातीनिहाय जनगणना केली जाणार आहे. जनगणना ही एकाच टप्प्यात पार पडणार आहे. कोणतेही घर अथवा कुटुंब या जनगणनेतून सुटता कामा नये,  जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषदेसह पालिकेतील अधिकाऱ्यांना मास्टर ट्रेनर्स म्हणून तयार करण्यात येणार आहे. 5 जानेवारीपर्यंत हाऊस लिस्टींग ब्लॉक तयार करावयाचा आहे. तसेच स्वत:च्या मोबाईलद्वारे प्रगणकाला प्रत्येक कुटुंबाची अचुक माहिती ही ॲपवर नोंदवून जनगणना केली जाईल,  अशी माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली.

भारताची जनगणना- 2027 साठी प्राथमिक बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, तहसीलदार अनिल नव्हाते यांच्यासह संबंधित यंत्रणेचे अधिकारी प्रत्यक्ष तर सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार व मुख्याधिकारी हे दुरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

जिल्ह्यातील जनगणना ही पुढील वर्षात केली जाणार आहे. यामध्ये 5 जानेवारी 2026 पर्यंत हाऊस लिस्टींग ब्लॉक तयार करणे. दि.20 जानेवारीपर्यंत प्रगणकाची यादी तयार करण्यात येईल.  10 जानेवारीपर्यंत मास्टर ट्रेनर्सची निश्चिती होईल. आणि दि.31 जानेवारीपर्यंत फिल्ड ट्रेनर्स निश्चित केले जातील. अशी माहिती जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी बैठकीत दिली.

प्रत्येक टप्प्यावर तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांनी पडताळणी करुन खात्री झाल्यानंतरच आपली स्वाक्षरी प्रपत्रावर करावी. जिल्हास्तरावरही मास्टर्स ट्रेनर्स निवडून यामध्ये ट्रेनिंग मुद्देसुद्द दिली जाणार आहे. डिजीटल जनगणना केली जाणार असून मे आणि जुनमध्ये हाऊस आयडेंटीफाय करुन त्यांना क्रमांक दिला जाणार आहे. जनगणनेसाठी तालुकास्तरावर कार्यक्षम व तंत्रस्नेही 10 अधिकारी-कर्मचारी घेवून जनगणना 2027 कक्ष स्थापन करावा जेणेकरुन भविष्यात समन्वय साधण्यास अडचण निर्माण होणार नाही. सहा प्रगणकामागे एक पर्यवेक्षकाची नेमणूक करावी लागणार आहे. असे निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांनी यावेळी बैठकीत सांगितले.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment