जालना दि. 9 (जिमाका) :- पारसी टेकडीला पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून, या भागाचे सुशोभीकरण करून ते पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनविण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.
इरकॉन भोज कंपनीच्यावतीने पारसी टेकडी येथील घनवनात 1000 वृक्षांची लागवड करण्यात आली असून त्याचे लोकार्पण मंगळवार दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी व त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी पी. एम. मिन्नू, अतिरिक्त पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, केशव सृष्टी मुंबई संस्थेचे विश्वस्त निलकंठण अय्यर, उद्योजक रमेशभाई पटेल, सुनिल रायठठ्ठा, शिवरतन मुंदडा, नितीन काबरा, गोविंद गोयल, राहूल अग्रवाल, डॉ. विठ्ठल पवार, डॉ. प्रकाश सिगेदार, सुरेश कुलकर्णी, हेमंत ठक्कर, यश पूरी, डॉ. आशुतोष सोनी, सचिन लोहीया, डॉ. रितेश अग्रवाल, चिराग तलरेजा, विष्णू पाटेकर यांच्यासह विविध सामाजिक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की, पारसी टेकडी परिसरात नैसर्गिक सौंदर्य ऐतिहासिक महत्त्व असलेली ठिकाणे असल्याने येथे पर्यटनाच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या ठिकाणाचा विकास झाल्यास रोजगार निर्मितीबरोबरच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळणार आहे. परिसरात रस्ते, पिण्याचे पाणी, प्रकाशयोजना, बसण्याची व्यवस्था, पार्किंग, कचरा व्यवस्थापन, सुरक्षा तसेच माहिती फलकांची उभारणी यांसारख्या मूलभूत सुविधा उभारण्यात येणार आहेत. इरकॉन भोज कंपनीच्या वतीने पारसी टेकडी येथील घनवनात 1000 वृक्षांचे संगोपन करण्याचे काम समस्त महाजन, कुंडलिका व सिना फाउंडेशन करणार आहे. केशवसृष्टी संस्थेने आतापर्यंत 65 हजार वृक्ष पारसी टेकडीवर लावलेले असून 3.5 लाख वृक्ष संवर्धित होत आहेत. लोकसहभागातून पारसी टेकडीवर वृक्षारोपण वृक्षसंवर्धन कार्य सुरू असून विविध सामाजिक संस्था, उद्योग समूह सक्रियपणे येथे योगदान देत आहेत. केशवसृष्टी संस्थेचे निलकंठण अय्यर यांचे जालना शहरवासियांच्यावतीने आभार व्यक्त करत विशेष सत्कार करण्यात आला.
-*-*-*-*-


No comments:
Post a Comment