Monday, 17 March 2025

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

 


जालना, दि. 17 (जिमाका) :-  देशातील युवकांना कंपनी, आस्थापनेमध्ये अनुभवाची संधी प्राप्त करून देण्यासाठी भारत सरकारने प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेची अर्ज प्रक्रिया सुरु केली आहे. योजनेतंर्गत 21 ते 24 वर्षे वयोगटातील तरुणांना इंटर्नशिप दिली जाणार आहे. प्रधानमंत्री इंटर्नशिपसाठी जालना जिल्ह्यात एकूण 9 आस्थापनांनी http://pminternship.mca.gov.in/  या संकेतस्थळावर रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. तरी प्रधानमंत्री इंटर्नशिप योजनेचा जिल्ह्यातील दहावी, बारावी, पदवीधर आणि आय.टी.आय. शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

इंडियन आईल कॉ. लि.,  ज्युब्लीयंट फूडवर्कस लि.,  हिंदुस्तान पेट्रोलीयम कॉर्पोरेशन लि.,  रिलायंन्स इंडस्ट्रीज लि.,  बायर क्रॉपसायन्स प्रा.लि.,  पी.एन.सी. इन्फ्राटेक प्रा. लि.,  एच.डी.एफ.सी. बँक लि.,  श्रीराम फायनान्स लि., मेघा इंजिनिअरींग अॅन्ड इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या नामांकित कंपनी आदि आस्थापनांनी  http://pminternship.mca.gov.in/ या संकेतस्थळावर रिक्त पदे अधिसुचित केली आहेत. यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 24 पर्यंत असावे व दहावी, बारावी, पदवीधर आणि आय.टी.आय. शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार अर्ज करू शकतात.

अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी  http://pminternship.mca.gov.in/  या संकेतस्थळावर नोंदणी करून प्रोफाईल तयार करावी व विविध क्षेत्रातील इंटर्नशिपसाठी अर्ज करावा. या योजनेंतर्गत युवकांना 12 महिन्यांसाठी इंटर्नशिपचा लाभ घेता येईल, तसेच यासोबतच त्यांना दरमहा 5 हजार रुपये इंटर्नशिप रक्कम मिळेल, याशिवाय इंटर्नशिप पुर्ण झाल्यानंतर 6 हजार  रुपये अनुदान मिळेल. या योजनेंतर्गत भारत सरकारकडून प्रत्येक प्रशिक्षणार्थीला प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतंर्गत विमा संरक्षण प्रदान केले जाईल. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक 02482-299033  यावर संपर्क साधावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

No comments:

Post a Comment