जालना, दि.3 (जिमाका) : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाने निर्देशित केल्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालय, जालना येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि जिल्हा वकील संघ जालना यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय लोक अदालतीचे रविवार, दि. 28 सप्टेंबर 2024 रोजी आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकुण 615 प्रकरणे निकाली निघाली. तर तडजोड रक्कम 7 कोटी 95 लक्ष 56 हजार 969 रुपये एवढी रक्कम जमा झाल्याची माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.
राष्ट्रीय लोक अदालती मध्ये प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, तसेच धनादेश अनादर संदर्भातील प्रकरणे, विद्युत प्रकरणे, बॅंकेची प्रलंबित व दावा दाखलपुर्व वसूली प्रकरणे, कौटूंबिक वादाची प्ररणे, बी.एस.एन.एल.ची दावा दाखल पुर्व प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली. या लोक अदालतसाठी जिल्ह्याच्या मुख्यालयी 8 पॅनल ठेवण्यात आले होते. त्यावर पॅनल प्रमुख म्हणुन सर्व न्यायाधिशांनी तर पॅनल सदस्य म्हणुन विधिज्ञांनी काम पाहिले. लोक अदालती मध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष वर्षा मोहिते, जिल्हा न्यायाधीश ए.जी. जोशी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ तसेच सर्व न्यायाधिश, पॅनल सदस्य व न्यायालयीन कर्मचारी आदींची उपस्थिती होती.
कौटुंबिक न्यायालय, जालना येथील राष्ट्रीय लोक अदालती मध्ये एकुण 27 प्रकरणात सन्मानजनक तडजोड होऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यामधील 3 प्रकरणातील जोडप्यांनी परस्परांमधील वाद सामंजस्याने मिटवुन घटस्फोटाचा मार्ग सोडुन पुन्हा संसार करण्याचा निर्णय घेतला. तसेच पक्षकांराच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सदरचे राष्ट्रीय लोक अदालती मध्ये जास्तीत-जास्त प्रकरणे निकाली निघाले. पॅनल सदस्य म्हणुन विधीज्ञांनी, सरकारी अभियोक्ता यांनी काम पाहिले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील व न्यायालयीन सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेत लोकअदालत यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले असल्याचेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment