जालना, दि.16 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आज प्रिटींग प्रेस, राजकीय पक्ष आणि बँकर्सची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह प्रिटींग प्रेस असोसिएशन, राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि बॅंक व्यवस्थापकांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाचांळ निवडणूक आदर्श आचारसंहितेबाबत सविस्तर माहिती देत म्हणाले की, निवडणूकीच्या कालावधीत मुद्रणालयांनी लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 चे कलम 127-क च्या नियमानुसार कार्यवाही आवश्यक आहे. तसेच राजकीय उमेदवारांचे प्रचार साहित्य छापतांना प्रिटींग प्रेस मालकांनी पूर्व परवानगी घ्यावी. छापील साहित्यावर प्रकाशक व मुद्रकाचे नाव असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडून छपाईसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची प्रत, प्रकाशीत प्रतीची संख्या याबाबत निवडणूक विभागास वेळोवेळी माहिती देण्याच्या सूचना दिल्या.
तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना प्रचार सभा, ध्वनीक्षेपक, वाहनाचा वापर, राजकीय जाहिरातीचे पूर्वप्रमाणीकरण आदी अनुषंगीक बाबींना राजकीय पक्षाने घ्यावयाच्या पूर्व परवानगी तसेच निवडणूक खर्चाच्या नोंदी, काय करावे व काय करू नये याबाबतची माहिती दिली.
तर निवडणूक कालावधीत होणाऱ्या संदिग्ध व्यवहाराची माहिती बँकर्सनी तात्काळ कळवावी. निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना बँकेचे नवीन खाते त्यांचा अर्ज प्राप्त झाल्यास आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून त्याच दिवशी तात्काळ सुरू करून द्यावे. तसेच बँकेत जमा व खर्चाच्या संदिग्ध व्यवहाराबाबत विशेषत: 10 लाखावरील रकमेच्या व्यवहाराबाबत निवडणूक विभागाला तात्काळ अवगत करावे. बँकेची रक्कम वहन करणाऱ्या वाहनावर विहीत क्युआर कोड लावून, जीपीएस यंत्रणा सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. पाचांळ यांनी यावेळी दिल्या.
****
No comments:
Post a Comment