Monday, 28 April 2025

मुंबईत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चे भव्य आयोजन; प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्घाटनासाठी उपस्थित राहणार - उद्योग मंत्री उदय सामंत

 



                              

 

 

मुंबई, दि. २८ : मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे २०२५ पर्यंत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या कार्यक्रमाचे १ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी बीकेसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.

 

या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 1 मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत. त्यांच्या सोबत परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाही सहभाग राहणार आहे.

 

उद्योग मंत्री सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले की, मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. विशेषतः हिंदी चित्रपटसृष्टीचे माहेरघर हे मुंबईला म्हटले जाते.  भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक  दादासाहेब फाळके यांनी  याच महाराष्ट्रामध्ये मराठी चित्रपट सुरू केले. त्यामुळे मनोरंजनाच्या क्षेत्रात मुंबई ही देशात अग्रगण्य शहर आहे. त्याचबरोबर, गेल्या  तीन वर्षात महाराष्ट्रात परकीय गुंतवणूक ही एक नंबरला आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात देखील महाराष्ट्र आणि मुंबई एक नंबरला राहिलेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने देखील महाराष्ट्र या देशाच्या पातळीवर अन्य देशांशी स्पर्धा करतो आहे. म्हणून पर्यटनाची सगळी स्थळे जागतिक पातळीवर जावी, हा देखील या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा उद्देश आहे. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, औद्योगिक व पर्यटन संस्कृती आणि ज्या काही महाराष्ट्राच्या परंपरा आहेत, त्या जागतिक पातळीवर जाव्यात, यासाठी मुंबई शहराची निवड केंद्र शासनाने केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले

 

उद्योग मंत्री सामंत यांनी सांगितले की, या कार्यक्रमात ३३ देशांतील मंत्री व मंत्रीस्तरीय अधिकारी, तसेच १२० आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूड, टॉलीवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार व निर्मातेही कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

 

या चार दिवसीय सोहळ्यात भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन, तेलंगणा पॅव्हेलियन तसेच अन्य  संस्थांचेही पॅव्हेलियन उभारण्यात येणार आहेत. त्यांचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विविध क्षेत्रांतील परिसंवाद, राउंड टेबल कॉन्फरन्स, आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल. विशेषतः तिसऱ्या दिवशी म्हणजे ३ मे रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ए. आर. रहमान यांच्या सांगितिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

"हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, औद्योगिक व पर्यटन क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्याची संधी आहे. या भव्य आयोजनासाठी राज्य शासनाला सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे," असे आवाहनही उदय सामंत यांनी केले.

 

000

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी – जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 


 











जालना, जिमाका, दि.28 : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हा नागरिकांना सेवेचा हक्क देणारा महत्वाचा कायदा आहे. या कायद्यान्वये नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज येथे केले.

येथील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी जिल्ह्यामधील लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, पत्रकार, नागरीक जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी तसेच अधिकारी व अधिनस्त कार्यालये आदी यावेळी उपस्थित होते. तसेच यावेळी सेवेच्या बांधिलकी मानणारी शपथ घेण्यात आली.

यावेळी डॉ. पांचाळ मार्गदर्शन करतांना म्हणाले की, सेवा हक्क कायदा संपूर्ण राज्यात सर्व शासकीय सेवा देणाऱ्या विभागांसाठी लागू करण्यात आला आहे. या कायद्यामुळे नागरिकांना विहित कालमर्यादेत शासकीय विभागांच्या अधिसूचित सेवा मिळविण्याचा अधिकारी प्राप्त झालेला आहे. त्यामुळे शासकीय विभागाच्या अधिसूचीत सेवा विहित कालमर्यादेत नागरिकांना पुरविणे बंधनकारक आहे. शासनाच्या विविध योजना व सेवांचा लाभ नागरिकांना सुलभरित्या व तत्परतेने घेता यावा, यासाठी आपल्या विभागांतर्गत येणाऱ्या अधिकतम सेवा अधिसूचित करण्यासोबतच कायद्याच्या जनजागृतीसाठी विभागप्रमुखांनी प्रयत्न करणे आवश्क आहे. तसेच कायद्याची योग्य अंमलबजावणी देखील करणे आवश्यक आहे. या कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचे देखील डॉ. पांचाळ यावेळी म्हणाले.

यावेळी कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध विभाग प्रमुख यांच्यासह अधिकारी कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..

            नागरीकांना जलद गतीने सेवा देणाऱ्या नायब तहसीलदार मंगेश साबळे,तहसील कार्यालय जाफ्राबादाचे नायब तहसीलदार राजु निहाळ, तहसिल कार्यालय जालन्याचे नायब तहसीलदार कृष्णा फुलमाळी, अनुराधा नागोरी यांचा  तसेच खुली निबंध स्पर्धेतील प्रथम,द्व‍ितीय व तृतीय पारितोषिक आणि प्रशस्तीपत्र अविनाश जगताप व आसेफ पठाण , ओंकार घाटुळे यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

-*-*-*-*-

 

Friday, 25 April 2025

5 मे रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 


जालना, दि.25 (जिमाका) :- जिल्हास्तरीय लोकशाही  दिनाचे  महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजन करण्यात येते.   त्यानूसार जालना येथील   जिल्हाधिकारी कार्यालयात    जिल्हास्तरीय   लोकशाही   दिन   सोमवार  दि. 5 मे 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत आयोजित  करण्यात आला आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी  नम्रता चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

              लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.  लोकशाही  दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा.  लोकशाही  दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे,  राजस्व,  अपील,  सेवाविषयक,  आस्थापनाविषयक बाबी,   विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसीलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल.  ज्यांनी यापूर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नयेत.   तसेच लोकशाही दिनात द्यावयाच्या अर्जाचा विहित नमुना  https://jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

जालना जिल्ह्यात 25 ते 27 सप्टेंबर रोजी यलो अलर्ट जारी

 


  विजेच्या कडकडाटासह  25 ते 27 एप्रिल दरम्यान पावसाची शक्यता 

नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन

            जालना दि. 25 (जिमाका) :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 25 ते 27 एप्रिल 2025 रोजी यलो अलर्ट जारी केला असुन या कालावधीमध्ये तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पावसाची व ताशी 30 ते 40 कि.मी. प्रति तास वेगाने वारे वाहण्याची  शक्यता वर्तवली आहे. या नैसर्गिक आपत्ती संदर्भात सर्व संबंधीत यंत्रणा आणि जनतेने खबरदारी घ्यावी, खबरदारीची उपाययोजना म्हणून खालीलप्रमाणे काळजी घ्यावी.

        हे करावे :- विजेच्या गडगडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्यास बाहेर जाणे टाळा. जर मोकळया जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसा.आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्या. घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नका.आपण घरात असाल आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करा. तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहा.पाण्यात उभे असाल तर तात्काळ पाण्यातून बाहेर पडा.

          हे करु नका :-आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नका. शॉवरखाली आंघोळ करु नका. घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करु नका तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नका. विजेच्या गडगडाटासह वादळी वारे चालू असताना लोखंडी धातूच्या सहाय्याने उभारलेल्या तंबूमध्ये किंवा शेडमध्ये आसरा घेऊ नका. उंच झाडाच्या खाली आसरा घेऊ नका.धातूंच्या उंच मनो-याजवळ उभे राहू नका. जर आपण घरात असाल तर उघड्या दारातून अथवा खिडकीतून वीज पडताना पाहू नका. हे बाहेर थांबण्याइतकेच धोकादायक आहे. असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण) गणेश महाडिक यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

 

Thursday, 24 April 2025

चला हिवतापाला संपवु याः पुन्हा योगदान द्या…

 

जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल - २०२५


 

दरवर्षी प्रमाणे जागतिक हिवताप दिन २५ एप्रिल २०२५ रोजी साजरा करण्यांत येतो. यानिमित्त संपुर्ण जिल्ह्यात हिवताप जनजागरण करण्यात येते. डासांमुळे हिवताप, डेंग्यू, चिकुनगुन्या, झिका, जे.ई., हत्तीरोग यासारखे जीवघेणे आजार पसरतात. हिवताप, डेंग्यू झाल्यास रुग्ण शासकिय अथवा खाजगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतो. परंतु सदरील किटकजन्य आजार होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविणे अत्यंत आवश्यक आहे. सन २०२७ अखेर हिवताप दुरीकरण करायचे असल्याने ध्येय व नियोजन आवश्यक आहे. या वर्षीचे घोषवाक्य’चला हिवतापाला संपवु याः पुन्हा योगदान द्या, पुर्नेविचार करा, पुन्हा सक्रिय व्हा’ असे आहे

हिवतापाचे लक्षणे : थंडी वाजुन ताप येणे, घाम येणे, उलटी, डोकेदुःखी, एक दिवस आड ताप. हिवताप ऑनाफिलीस दुषित मादी मच्छर चावल्यामुळे होतो. किटकजन्य आजारांचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्ती साचलेल्या पाण्यात होत असते. डास हा साचलेल्या पाण्यात अंडी घालतो. अंडी, अळी, कोष व डास या चार अवस्थेतुन ८ ते १० दिवसांत नवीन डास जन्माला येतो. दुषित मादी डास निरोगी व्यक्तीला चावला की, डास चावतांना मानवाच्या रक्तामध्ये जंतु सोडतात. दुषित एनॉफिलस मादी मच्छर चावल्यामुळे हिवताप हा आजार होतो. महाराष्ट्रामध्ये साधारणतः प्लाझमोडियम व्हाव्हॅक्स (पी.व्ही.) व प्लाझमोडियम फॅल्सीफेरम (पी.एफ.) असे दोन प्रकारचे हिवताप रुग्ण आढळुन येतात. रक्ताच्या तपासणी मध्ये हिवतापाचे निदान होते. हिवताप दुषित पी.व्ही.किंवा पी.एफ.आढळुन आल्यानंतर त्याप्रमाणे औषधोपचार करुन १०० टक्के रुग्ण बरा होतो.

डास प्रामुख्याने ३ प्रकारचे आहेत. १) ऑनॉफिलीस डास हा हिवतापाचा प्रसार करतो, त्यांची उत्पत्ती स्वच्छ पाणीसाठयांमध्ये होते. उदा. नदी, हौद, नाले, विहिरी, तळी. २) एडिस डास हा डेंग्यू, चिकूनगुन्या व झिका या आजारांचा प्रसार करतो, त्याची उत्पत्ती ही घरातील स्वच्छ पाणीसाठयांमध्ये होते. उदा, पाण्याच्या टाक्या, बॅरल, रांजण, हौद, फुटके डबे, निरुपयोगी टायर, नारळाच्या करवंटयामध्ये साचलेले पावसाचे पाणी, घर आणि परिसरात साठलेले किंवा साठविलेले स्वच्छ पाणी, घरातील कुलर, फ्रिजच्या ड्रीप ट्रे मधील पाणी, मनी प्लॅन्ट मधील स्वच्छ पाणी इ. ठिकाणी होत असते. ३) क्यूलेक्स डास हा हत्तीरोगाचा प्रसार करतो, त्याची उत्पत्ती ही अस्वच्छ पाणीसाठयांमध्ये होते, उदा. शौचालयाच्या सेप्टीक टॅंक, तुंबलेली गटारे, पाण्याचे डबके इ.

हिवताप व इतर किटकजन्य आजारांचा प्रसार रोखणे, स्वतःचा डासांपासून बचाव करण्यासाठी जनतेने खालीलप्रमाणे दक्षता घेणे आवश्यक आहे. १) ताप आल्यास त्वरीत डॉक्टरांकडे जावे, डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे आवश्यक चाचण्या कराव्यात. शासकिय रुग्णालयात यासाठी मोफत रोगनिदान व औषधोपचार उपलब्ध आहेत. २) डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे अथवा गप्पी मासे सोडणे. ३) घराच्या शौचालयाच्या सेप्टीक टॅंकच्या व्हेंन्ट पाईपला (गॅस पाईप) जाळी अथा कापड बांधावे. यामुळे डासांची उत्पत्ती रोखली जाते. ४) घर व परिसरामध्ये स्वच्छता ठेवावी. ५) गच्चीवरील पाण्याच्या टाक्यांना घट्ट झाकणे बसवावीत. ६) घरातील पाण्याच्या टाक्या/रांजण/बॅरल हौद हे आठवडयातून किमान एकदा घासून पुसून स्वच्छ कोरडे करावेत व ते घट्ट झाकणाने आणि कापडाने नेहमी झाकून ठेवावेत. ७) घरातील/गच्चीवरील/घराच्या परिसरातील भंगार सामान/फुटके डबे/वस्तू / निरुपयोगी टायर याची विल्हेवाट लावावी. या सामानात पावसाचे पाणी साचते व त्या ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. ८) घरातील कुलर, मनी प्लॉंट / चायनीज प्लॉंटमधील पाणी आठवडयातून किमान एकदा बदलावे स्वच्छ करुन पुन्हा भरावे. ९) झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा, पूर्ण अंग झाकले जाईल असे कपडे वापरावेत. १०) डासांपासून संरक्षणासाठी घराच्या दारे खिडक्यांना जाळया बसवाव्यात, क्रिम, मॅट, कॉईलचा वापर करावा. ११) प्रिजचा ट्रे मधील पाणी वेळोवेळी काढून टाकावे. १२) गच्चीवर / अंगणात / घराच्या परिसरात कोठेही पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यावी. १३) आरोग्य कर्मचारी/आशा यांना सहकार्य करणे. वरिल प्रमाणे दक्षता सर्वांनी घेतल्यास आपण किटकजन्य आजारांचे प्रमाण नियंत्रणात ठेवू शकू. जागतिक हिवताप दिन यशस्वीपणे राबविण्यासाठी संपुर्ण जिल्ह्यात हस्तपत्रिका वाटप, आशा वर्कर बळकटीकरण कार्यशाळा, ग्रामीण आरोग्य पोषणहार व स्वच्छता समिती सभा, स्वच्छता मोहिम, गप्पी मासे सोडणे, बचत गटांच्या सभा, सेन्सटायजेशन मिटींग, रॅली इत्यादी वरील प्रमाणे कार्यक्रम संपुर्ण जिल्ह्यात सर्व शासकीय आरोग्य संस्थेमार्फत ’ जागतिक हिवताप दिन ’ साजरा करण्यात येणार आहे.

 

- ( डॉ.जयश्री भुसारे ) जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, जालना.

-*-*-*-*-

जागतिक हिवताप दिनानिमित्त 25 एप्रिल रोजी मोहिमेचे आयोजन

 


 

जालना, दि. 24 (जिमाका) :- जागतिक हिवताप दिन म्हणुन 25 एप्रिल हा दिवस साजरा करण्यात येतो. चला हिवतापाला संपवु या,पुन्हा योगदान द्या,पुन्हा विचार करा,पुन्हा सक्रिय व्हा’ हे या वर्षीचे घोषवाक्य आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनानुसार,भारतामध्ये सन 2027 पर्यंत हिवताप दुरीकरण करण्याचे ठरविले आहे. संपुर्ण जिल्ह्यामध्ये दि.25 एप्रिल 2025 रोजी राबविण्यात येणाऱ्या मोहिमेसाठी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करावे. तसेच हिवताप, डेंग्यु, चिकुणगुन्या व किटकजन्य आजारापासुन संरक्षण मिळविण्यासाठी या मोहिम काळातच नाही तर नेहमीसाठी आपल्या सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा.घरातील पाणीसाठयावर झाकण ठेवावे,नाल्या,गटारे वाहते ठेवावे. आठवडयातुन एक दिवस कोरडा दिवस म्हणुन पाळावा,मच्छर दानीचा वापर करावा,उघडया खिडक्यांना जाळया बसवावे, संडासच्या व्हेंट पाईपला जाळी बसवावी, भंगार सामान व रिकामी टायर यांची विल्हेवाट लावावी, कुलर फ्रिजच्या ड्रिपमधील पाणी स्वच्छ करावे,पाण्याचा हौद, टाक्या, रांजन आदि दर आठवड्याला स्वच्छ करावेत. थंडी वाजुन ताप येणे, मळमळ होणे, डोके दुखणे, अंगदुखी इत्यादी हिवतापाची लक्षणे आढळुन आल्यास जवळच्या आरोग्य संस्थेत संबंधीत वैद्यकिय अधिकारी यांच्या मार्फत तपासणी करुन योग्य औषध उपचार घ्यावा, असे जिल्हा हिवताप अधिकारी जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

Wednesday, 23 April 2025

संवाद व कृती कार्यक्रम संपन्न

 

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा- 2025


 

           जालना, दि. 23 (जिमाका) :-  "जलव्यवस्थापन कृती पंधरवडा 2025" अंतर्गत दि. 23 एप्रिल 2025 रोजी बदनापूर येथील कृषी विज्ञान केंद्रात  "विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र आणि सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संवाद व कृती कार्यक्रम हा उपक्रम राबविण्यात आला.

जलसंपदा विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमासाठी कार्यकारी अभियंता रोहित  देशमुख, कार्यकारी अभियंता सुरेखा कोरके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत पवार व जलसंपदा विभागाचे सर्व उपविभागीय अधिकारी समवेत सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.  या कार्यक्रमास प्रमुख वक्ते म्हणून डॉ. एस. बी. पवार व डॉ. डी. बी. कच्छवे लाभले. डॉ. एस. बी. पवार यांनी "विविध पिकांतील पाण्याचे व्यवस्थापन" तसेच डॉ. डी. बी. कच्छवे यांनी "दुष्काळी परिस्थितीत शेतीतील करावयाचे नियोजन" या विषयावर सर्व जलसंपदा व कृषी विभागातील अभियंता, अधिकारी, कर्मचारी, शेतकरी व सेवाभावी संस्थेला मार्गदर्शन केले.

-*-*-*-*-