Monday, 18 September 2023

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

 


 

जालना, दि. 18 (जिमाका) :-   सध्या मराठा आरक्षण आंदोलनाचे अनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच दि. 19 सप्टेंबर 2023 ते दि. 28 सप्टेंबर 2023 पर्यंत गणेश उत्सव साजरा होणार आहेत. तसेच दि. 2 ऑक्टोबर 2023 रोजी संकष्ट चतुर्थी असल्याने जालना जिल्ह्यात मौ. राजुर माळाचा गणपती व माव पाटोदा येथे गणपती मंदिर असल्याने भाविकांची दर्शनासाठी मोठ्या प्रमताणात गर्दी असते. 

    तसेच सध्या महाराष्ट्रात राजकीय दृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकाविरुध्द आरोप प्रत्यारोप विविध कारणास्तव सुरु आहे. मराठा आरक्षण, तसेच शेतकऱ्यांचे विविध मागणीसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकरता येत नाही. 

        त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप, विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.    तसेच  अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.   हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.  हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि.  19 सप्टेंबर 2023  रोजीचे  6.00 वाजेपासून ते दि. 2 ऑक्टोबर 2023 रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

                                                                    -*-*-*-*-       

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून जिल्ह्यातील 2851 लाभार्थ्यांना 26.75 कोटीचा परतावा

 


 

 

जालना, दि. 18 (जिमाका) :- जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे कार्यालय सुरु झाल्यापासून जालना जिल्हा कार्यालयाच्यावतीने मराठा समाजातील 2 हजार 851 लाभार्थ्यांना आजपर्यंत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत परतावा देण्यास सुरुवात झाली असून त्यासाठी जवळपास 26.75 कोटी परतावा म्हणून दिलेले आहेत. वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील विविध बँकांनी  मराठा समाजातील 3 हजार 342 लाभार्थ्यांना जवळपास 214 कोटीचे कर्ज मंजूर करुन त्यांच्यातील उद्योजकाला चालना देण्याचा एक चांगला प्रयत्न केलेला असून हे सर्व लाभार्थी त्यांच्या उद्योग व्यवसायात चांगली प्रगती करुन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत. तसेच त्यांच्या उद्योग व्यवसायामुळे इतर अनेकांना रोजगार उपलब्ध करुन दिलेला आहे. हे या योजनेचे यश आहे. तरी जालना जिल्ह्यातील मराठा समाजातील जास्तीत जास्त युवकांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेवून उद्योजक बनण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही महामंडळाच्यावतीने करण्यात येत आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परताव योजना (आर-1)- या योजनेची मर्यादा रुपये 10 लाखाहून 15 लाख पर्यंत वाढविण्यात आलेली असून महामंडळामार्फत रुपये 4.5 लाखाच्या व्याज मर्यादेत परतावा करण्यात येईल. सदर व्याज परतावा कालावधी जास्तीत जास्त दरसाल दर शेकडा 12 टक्के इतका असेल. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी मात्र बँकेमार्फत घेतलेले कर्ज असावे व ते फक्त व्यावसायिक तथा उद्योगाच्या दृष्टीने मंजूर झालेले असावे.(टीप-मात्र दि.20 मे 2022 पूर्वीच्या एलओआय धारकांना नियमानूसार रुपये 10 लाखाच्या मर्यादेतील व्याज परतावा करण्यात येणार असून त्याकरीता रुपये 3 लाखाची मर्यादा असेल)

जालना जिल्ह्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कार्यालय सुरु झाल्यापासून ते आजपर्यंत 15 हजार 272 उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यातील 9 हजार 43 अर्जदारांना पात्रता प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे तर 3 हजार 342 लाभार्थ्यांना बँकांनी कर्ज मंजूर केलेले आहे. महामंडळाच्या व्याज परताव्यासाठी मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची संख्या 2 हजार 977 असून या लाभार्थ्यांना जिल्ह्यातील विविध बँकांनी 214 कोटी 03 लाख 77 हजार 539 रुपयाचे कर्ज मंजूर करुन लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वर्ग केलेले आहे. उपरोक्त पैकी महामंडळाकडून व्याज परतावा 2 हजार 851 लाभार्थ्यांना सुरु झालेला असून आजपर्यंत व्याज परताव्यासाठी  महामंडळाने 26 कोटी 75 लाख 91 हजार 26 रुपये लाभार्थ्यांना देण्यात आलेले आहेत.

महामंडळाच्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या जालना जिल्हा कार्यालयाने जिल्ह्यातील मराठा समाजातील युवकांना महामंडळाच्या योजनांचा लाभ मिळवून देवून जास्तीत जास्त उद्योजक तयार करण्यासाठी चांगले प्रयत्न सुरु केले आहेत. व ते जास्तीत जास्त  मराठा समाजातील लोकांपर्यंत पाहोचून महामंडळ अंतर्गत सुरु असलेल्या योजनांची माहिती देवून त्यांना या दृष्टीने लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

-*-*-*-*-

Saturday, 16 September 2023

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त पणन मंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी कटीबध्द - पणन मंत्री अब्दुल सत्तार

 

 

 

जालना, दि. 17 (जिमाका) :- मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्ष आपण साजरे करीत आहोत.  मराठवाड्याच्या मुक्ती लढ्यात जालना जिल्ह्याचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते. जिल्ह्यातील हजारो थोर  व्यक्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या लढ्यात सहभागी झाले होते, त्यांच्यामुळेच आज आपण स्वातंत्र्य उपभोगत आहोत. या आपल्या मराठवाड्याच्या विकासासाठी काल पार पडलेले मंत्रिमंडळ बैठकीत विविध लोककल्याणकारी निर्णय जाहीर केले आहेत. यामध्ये जालना जिल्हयासाठीही अनेक चांगले निर्णय घेण्यात आले आहेत, जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द आहे, असे प्रतिपादन राज्याचे पणन, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री अब्दुल सत्तार यांनी केले.

मराठवाडा मुक्तिसंग्राम वर्धापन दिनानिमित्त जालना शहरातील टाऊन हॉल‍ येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण श्री. सत्तार यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी जनतेला उद्देशून शुभेच्छा संदेश देताना ते बोलत होते. यावेळी आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी मंत्री अर्जुन खोतकर,  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, महापालिका आयुक्त संतोष खांडेकर यांच्यासह स्वातंत्र्यसैनिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, नागरिक यांची उपस्थिती होती.

प्रारंभी टाऊन हॉल परिसरात असणाऱ्या मान्यवरांनी  लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  यानंतर हुतात्मा स्मारक स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. तर पोलिस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून व पोलिस बँड पथकाने शोकधून वाजवून हुतात्म्यांना मानवंदना दिली. या कार्यक्रमानंतर मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांनी प्रतिज्ञा घेतली.

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा देताना श्री. सत्तार म्हणाले की, 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले, परंतु हैद्राबाद संस्थानातील या मराठवाडयात त्यावेळी पारतंत्र्य होते. त्या काळात मराठवाड्याच्या मुक्तीसाठी थोरामोठयांनी फार मोठी कामगिरी बजावली. मराठवाडयाने शौर्याची परंपरा कायम राखली. तळहातावर जीव घेऊन स्वातंत्र्यासाठी लढा देणारी मंडळी आपले घरदार, संपत्ती यांचा तिळमात्र विचार न करता स्वातंत्र्याच्या ध्येयाने प्रेरीत होऊन सहभागी झाली होती. सर्व स्तरावर निजामाशी मुकाबला करुन पारतंत्र्याचे जोखड झुगारुन मराठवाडयाला स्वातंत्र्य  मिळवून देण्यात त्यावेळच्या स्वातंत्र्यसैनिकांनी खंबीरपणे जबाबदारी पार पाडली, म्हणून आज तुम्ही-आम्ही ही स्वातंत्र्याची फळं चाखत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल एक वर्ष एक महिना आणि दोन दिवसांनी  हैद्राबाद संस्थान 17 सप्टेंबर 1948 रोजी निजामाच्या जुलमी राजवटीतून मुक्त होऊन भारतीय गणराज्यात विलीन झाले.  मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात जालना जिल्ह्याचे योगदानही अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यातील हजारो थोर  व्यक्ती प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष या लढ्यात सहभागी झाले होते. त्यांनी अत्यंत जिद्दीने निजामाच्या पाशवी सत्तेशी  झुंज दिली. प्रसंगी अनेकांनी मृत्युलाही कवटाळले. जात, धर्म विरहित अनेक समूहांनी आपल्या प्राणांची त्यासाठी बाजी लावली.  अनेकांनी आपले प्राण अर्पण केले. या  शूरवीरांना विनम्र अभिवादन. 

श्री. सत्तार पुढे म्हणाले की, मराठवाड्यासह संपूर्ण जालना जिल्ह्याचा विकास करण्याच्या दृष्टीने काल  छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत  अनेक लोककल्याणकारी निर्णय घेण्यात आले. मराठवाड्याचा कायापालट घडविणारा तब्बल 46  हजार 579 कोटी 34 लाख रुपयांचा संकल्प मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला. जालना जिल्ह्याच्या प्रगतीसाठीही अनेक चांगले निर्णय घेण्यात आले. मराठवाडा मुक्तीसंग्रामच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने मराठवाडयाची राणी लक्ष्मीबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या  जालना जिल्हयातील स्वातंत्र्यसैनिक दगडाबाई शेळके यांचे धोपटेश्वरे येथे स्मारक उभारण्यासाठी रुपये पाच कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीमधून हुतात्मा स्मारकाचे नूतनीकरण व सौंदर्यीकरण या वर्षी करण्यात येणार आहे.  याशिवाय जालना आयटीआयमध्ये महत्त्वाचे इन्क्युबेशन सेंटर सुरु करण्याचा निर्णय झाला असून यासाठी 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सेंटरमुळे शेतकरी, विद्यार्थी, महिलांच्या नवसंकल्पनांना मूर्त रुप येण्यास मदत होणार आहे. अंबड येथील मत्स्योदरीदेवी संस्थानाच्या विकासासाठी 40 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.  जालना शहर पाणीपुरवठा योजनेसाठी 35 एमएलडी क्षमतेचे अंबड येथे जलशुध्दीकरण केंद्र आणि 15 एमएलडी क्षमतेचे जालना येथे जलशुध्दीकरण केंद्रासाठी रुपये 56 कोटीचा निधी मंजूर करण्यात येणार आहे.  तर जाफराबाद शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजनेकरीता 47 कोटी 98 लाख निधीची तरतुद करण्यात येणार आहे. अंबड शहरातील भुयारी गटार प्रकल्पासाठी  16 कोटी 56 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. परतूर येथे शेतकरी एमआयडीसीसाठी 25 कोटी देण्यात येणार आहे. तर  जलसंपदासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे, त्यामुळे  जिल्हयाला  सिंचनाकरीता मोठा फायदा होणार आहे. अंगणवाडी, शाळा दुरुस्तीसाठीही भरीव तरतूद करण्यात येणार आहे.  जालना जिल्हयाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबध्द आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी मराठवाडा मुक्तीसंग्रामातील स्वातंत्र्यसैनिक यांच्यासह त्यांच्या वारसांची श्री. सत्तार यांनी भेट घेत त्यांची आस्थेवाईकपणे चौकशी केली व त्यांचा यथोचित सत्कार केला. यानंतर टाऊन हॉल परिसरात महानगरपालिकेच्यावतीने मेरी माटी, मेरा देश अंतर्गत भव्य अमृत कलश यात्रा चित्ररथाचे त्यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.

-*-*-*-*-

 

 

 

 

 

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

 


जालना, दि.17(जिमाका) :- मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी अपर जिल्हाधिकारी शशिकांत हदगल, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी संगिता सानप, उपजिल्हाधिकारी सविता चौधर, राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक पराग नवलकर, जिल्हा‍ नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी,  तहसीलदार छाया पवार यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

-*-*-*-*-

Friday, 15 September 2023

नेहरु युवा केंद्र जालना येथे हिंदी दिवस पखवाड्याचे उदघाटन संपन्न

 


 

जालना, दि. 15 (जिमाका) :- युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय, भारत सरकारच्या अंतर्गत असलेल्या नेहरु युवा केंद्राच्या वतीने 14 ते 29 सप्टेंबर हिंदी पखवाडा कार्यक्रम जिल्हाभरात  राबविण्यासाठी उदघाटन नेहरु युवा केंद्र जालना येथे करण्यात आले.

यावेळी प्रा.डॉ. रेणुका भावसार व जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर यांच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.  यावेळी नेहरु युवा केंद्र संगठनचे महानिदेशक द्वारा हिंदी दिवस करीता अपील वाचण्यात आली व हिंदी दिवस शपथ दिली. तसेच 2 ऑक्टोबर 2023 ला संसदेत होणाऱ्या कार्यक्रमासाठी भाषण स्पर्धा प्रथम चरणामध्ये घेण्यात आली. यावेळी जिल्हा भाषण स्पर्धेमध्ये अदिती सुरंगळीकर हिची राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड करण्यात आली. यावेळी उपस्थित वैभवी जगताप, अमृत शेळके, वैभव कांगणे, संदिप दांडगे, सागर मगरे , सुमेधा कातुरे व प्रिती झिने इत्यादी सहभागी उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करुन आभार जयपाल राठोड यांनी मानले. असे जिल्हा युवा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

आयुष्यमान भव: मोहिमेचा जिल्हास्तरीय शुभारंभ


 

जालना, दि. 15 (जिमाका) :-  "आयुष्यमान भव:" या मोहिमेचा जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन दि. 13 सप्टेंबर 2023 रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे करण्यात आले होते.  कार्यक्रमाचे राष्ट्रीयस्तरावरून राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते  माध्यमाद्वारे दुपारी 12 वाजता करण्यात आले. तसेच त्यानंतर राज्यस्तरीय कार्यारंभ सोहळा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला.

 जिल्हास्तरीय उद्घाटन कार्यक्रम  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. या प्रसंगी जालना महानगरपालिका आयुक्त संतोष खांडेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रताप घोडके, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भुसारे, निवासी वैद्यकिय अधिकारी जि.जालना डॉ. शितल सोनी, वैद्यकिय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र डॉ. तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तसेच आरोग्य विभागांतर्गत कार्यरत कर्मचारी उपस्थित होते.

'आयुष्यमान भव:" ही मोहिम देशपातळीवरुन ग्राम पातळीपर्यंत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त दि. 17 सप्टेंबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 या कालावधीत राबविण्यात येणार आहे.  या मोहिमे अंतर्गत दि. 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर या कालावधीत सर्व आरोग्य संस्थास्तरावर सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे ज्यामध्ये Pationent Safety Week साजरा केला जात असून समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक (पुरुष) व आशा स्वयंसेविका यांनी गृहभेटी देवुन भेटी दरम्यान उपशामक सेवा (Palliative Care) आवश्यक असलेल्या रुग्णांना शोधून त्यांना उपशामक सेवा देण्यात येणार आहे तसेच Pationent Safety संदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे.

1 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2023 या कालावधीत सेवा पंधरवाडा राबविण्यात येणार असून अमृत ज्यामध्ये ग्राम पंचायत जनआरोग्य समिती व रुग्ण कल्याण समिती यांच्या सहाय्याने सर्व आरोग्य संस्थामध्ये स्वच्छतेसाठी विशेष मोहिम राबविण्यात जाणार आहे. तसेच  या उपक्रमामध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सर्व आरोग्य संस्थामध्ये आयुष्यमान सभेमध्ये अवयवदानाची प्रतिज्ञा घेऊन अवयव दान करावे, असे  आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

मोहिमेच्या कालावधीमध्ये आयुष्यमान आपल्यादारी या मोहिमेअंतर्गत आयुष्यमान कार्ड मोहिम कार्ड नोंदणी व वितरण करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून जालना जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्था क्षेत्रा अंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी आरोग्य सेवक (पुरुष) आरोग्य सेविका यांच्यामार्फत तयार करावे व त्याप्रमाणे कार्ड तयार करावे. तसेच Self Ragistration साठी जनतेला प्रोत्साहीत करून परोपरी E-KYC चे वाटप करावे तसेच सदर यादी आरोग्य केंद्रावर तसेच गावांतील महत्वाच्या ठिकाणी लावण्यात यावी. तसेच लाभार्थ्याची नोंदणी PM-JAY Portal वर करण्यात यावी व आयुष्यमान कार्ड जनरेट करण्यात यावे अशा सूचना या दरम्यान  जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

दि. 17 सप्टेंबर पासुन दि.31 डिसेंबर 2023 या कालावधीत आरोग्यवर्धिनी केंद्रस्तरावर आरोग्य मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. ज्यामध्ये पहिल्या आठवडयात असंसर्गजन्य आजारी, निदान, उपचार आणि संदर्भसेवा दुस-या आठवड्यामध्ये क्षयरोग, कुष्ठरोग व इतर संसर्गजन्य आजार तपासणी, निदान, उपचार आणि संदर्भसेवा व तिस-या आठवडयामध्ये माता बाल आरोग्य व पोषण आरोग्य सुविधा या बाबत तर चौथा आठवडयात नेत्ररोग चिकित्सा, कान, नाक व घसा तपासणी तसेच सिकलसेल तपासणीचे आयोजन करण्यात येणार आहे. या करिता जिल्हा शल्य चिकित्सक यांच्यास्तरावरुन वैद्यकिय महाविदयालय यांच्या समन्वयाने उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये स्तरावर दर आठवड्याला आरोग्य मेळावा आयोजन करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने जनतेने मोठया संख्येने सदर आरोग्य मेळाव्यामध्ये सेवा घेऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी,  असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी उपकेंद्रस्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यामार्फत गावपातळीवर आयुष्यमान सभेचे आयोजन करण्यात यावे. तसेच सदर सभेमध्ये गावातील सरपंच, ग्राम सदस्य, ग्रामसेवकातील मान्यवर मंडळी यांचा समावेश करण्यात यावा. या सभेमध्ये आयुष्यमान कार्ड वितरीत करणे हा मुख्य उद्देश असून 100 टक्के आयुष्यमान कार्ड वितरण व आभा आदी नोंदणी करणे हा आहे. तसेच या सभेमध्ये पात्र लाभार्थ्यांची यादी व त्या लाभाय्याने आयुष्यमान भारत जन आरोग्य योजनेचा लाभ घेतला आहे अशा लाभार्थ्यांची यादी प्रधानमंत्री जनआरोग्य योजने अंतर्गत असलेल्या रुग्णालयांची यादी प्रसिद्ध करने व जनतेला याबाबत अवगत करणे हा आहे. त्यानुसार लाभार्थ्यांना यादीमध्ये नांव असलेले बाबतची खातरजमा होईल. तसेच यापूर्वी या लाभाष्य आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घेतला आहे अशा लाभाल्यांना मिळालेल्या आरोग्य सुविधेवात सेवा मनोगत व्यक्त करण्यास सांगावे तसेच जर कोणी 78 Champion गावांमध्ये असल्यास त्याचा गौरव करण्यात येवुन त्याला देखील मनोगत व्यक्त करण्यास सांगावे व लाभार्थ्यांच्या अनुमतीने व्हिडीओ काढून त्याची प्रसिद्धी करावी तसेच सदर सभेमध्ये समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका यांनी असंसर्गजन्य आजाराची माहिती जसेकी High Risk factor योग्य आहार विहार Physical Activity, मानसिक आरोग्य क्षयरोग व सिकलसेल या संदर्भात Health Talk आयोजित करण्यात यावे. तसेच प्रतिबंधात्म उपाय योजनावर भर देण्यात यावा, त्याकरिता आरोग्य विभागामार्फत देण्यात येणा-या आरोग्य सेवा सुविधा जसे आभा आयडी कार्ड, आयुष्यमान कार्ड, लसीकरण व त्याचे फायदे क्षयरोग, कुष्ठरोग, असंसर्गजन्य व संसर्गजन्य रोग, संजीवणी ई ओपीडी, टेलिकन्सलटेशन टेलीमानस इत्यादी योजनांची माहिती देवून जनजागृती करण्यात बाबी अशा सुचना मा जिल्हाधिकारी यांनी आरोग्य कर्मचारी यांना दिल्या असून सदर कालावधीमध्ये जास्तीत जास्त रुग्णाती आरोग्य सेवेचा लाभ घ्यावा. त्यानंतर आरबीएसके पथकामार्फत अंगणवाडी व प्राथमिक शाळेमध्ये 18 वर्ष वयोगटातील मुला- मुलींचे तपासणी गुणवत्ता पूर्वक करण्यात येणार असून आवश्यकता असल्यास जिल्हा रुग्णालय स्तरावर शस्त्रक्रिया करण्याकरिता संदर्भित करण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी यांनी केल्या तसेच आवश्यकतेनुसार लाभार्थ्यांना सहाय्य उपकरणे उपलब्ध करून देण्यात याला जसे (उदा. चष्मा यंत्र व्हिलचेअर) आदि सेवा उपलब्ध होईल याची दक्षता घेण्यात येईल. असे सांगितले या कार्यक्रमास आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या  संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-

मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधनेया योजनेंतर्गत अर्ज केलेल्या बचतगटांनी लॉटरी पध्दतीने निवडीसाठी 20 सप्टेंबरला हजर रहावे

 


 

जालना, दि. 15 (जिमाका) :-  अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येतात. सन 2022-23 या आर्थिक वर्षात सदर योजनेंतर्गत एकुण 35 मिनी ट्रॅक्टर चे उद्दिष्ट प्राप्त झाले होते. त्यानुषंगाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहाय्यता बचतगटांकडुन अर्ज मागविण्यात आले होते. पात्र असलेल्या बचतगटांपैकी उद्दिष्टाच्या अनुषंगाने 35 बचतगटांची निवड करावयाची आहे. त्यानुषंगाने सदर बचतगटांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. सदर बचतगटांची अंतिम पात्र व अपात्र यादी कार्यालयाच्या सुचनाफलकावर डकविण्यात आली आहे. तरी सर्व बचतगटांनी दि. 20 सप्टेंबर 2023  रोजी दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतीक सभागृहामध्ये पात्र बचतगटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांनी लॉटरी पध्दतीने स्वयंसहाय्यता बचतगटांची निवड करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-