Sunday, 19 February 2023

जिल्हाधिकारी कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन ‘जय जय महाराष्ट्र माझा’ गीत सादर

 




जालना, दि. 19 (जिमाका) :-  जिल्हाधिकारी कार्यालयात आज  छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उपजिल्हाधिकारी रविंद्र परळीकर, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी अंजली कानडे, नायब तहसिलदार विक्रांत मोंढे, संदिप देबडे आदिंसह उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.  याप्रसंगी महाराष्ट्र शासनाने राज्यगीत म्हणून घोषित केलेल्या ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गीताचे सादरीकरण करण्यात आले. उपस्थित सर्वांना जिल्हाधिकारी डॉ. राठोड यांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या.

Friday, 17 February 2023

क्षय रुग्‍णांना पोषण आहार किट वाटपात महाराष्ट्र राज्य देशात तर जालना जिल्हा राज्यात सर्वप्रथम

 





जालना, दि. 17 (जिमाका) :- भारत सरकारने वर्ष 2025 पर्यंत  क्षयरोग    मुक्त भारत करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुषंगाने प्रधानमंत्री टिबीमुक्त भारत अभियानांतर्गत ‘कम्युनिटी सपोर्ट टू टीबी पेशंटस’ हा उपक्रम संपूर्ण भारत देशामध्ये राबविण्यात येत आहे. या उपक्रमातंर्गत उपचाराखाली असलेल्या व संमती दिलेल्या सर्व क्षयरुग्णांना सामाजिक संस्था, औद्योगिक संस्था व समाजातील दानशूर व्यक्ती यांनी निक्क्षय मित्र म्हणून नोंद करुन त्यांच्यामार्फत क्षयरुग्णांना अतिरिक्त पोषण आहार किट देण्याकरीता केंद्रशासनामार्फत प्रधानमंत्री टिबीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे.

त्यानुषंगाने जालना जिल्ह्यातील सीएसआर अंतर्गत येणाऱ्या स्टील आसोसीएशन, विक्रम टी प्रोसेसर  यांनी डिसेंबर-2022 व जानेवारी-2023 मध्ये जालना जिल्ह्यात उपचारावर असणाऱ्या सर्व 2 हजार 295 क्षयरुग्णांना पोषण आहार किटचे वाटप केले आहे. क्षय रुग्णांना पोषण आहार किट वाटपामध्ये महाराष्ट्र राज्य देशात तर जालना जिल्हा राज्यामध्ये सर्वप्रथम आहे.

            प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियानातंर्गत उपचारावर असणाऱ्या सर्व क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप करण्याकरीता जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सिएसआर अंतर्गत येणाऱ्या उद्योजकांना उपक्रमामध्ये सहभागी होण्याकरीता आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देऊन उद्योजकांनी जालना जिल्ह्यात उपचारावर असणाऱ्या क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप करण्यास संमती दर्शवली आणि पुढील तीन वर्ष क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप करण्याचा त्यांचा मानस आहे. प्रधानमंत्री टिबी मुक्त भारत अभियानातंर्गत सहभाग नोंदविल्या बद्दल जालना जिल्हयातील विक्रम टी प्रोसेसर, कालीका स्टील, गजलक्ष्मी स्टील, गजकेशरी स्टील, ओमसाईराम स्टील, भाग्यलक्ष्मी रोलींग मिल, एस.आर.जी. पिती स्टील, गिताई स्टील, राठी स्टील, मेटारोल स्टील, महिको सिड्स व कलश सिड्स  इत्यादी उद्योजकांचे आभार व्यक्त करण्यात आले आहे. असे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूकीतील वाहनाची तांत्रिक तपासणी करण्याचे आवाहन


जालना, दि. 17 (जिमाका) :-  छत्रपती शिवाजी महाराज जयंती मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या वाहनधारकांनी वाहन कर, विमा प्रमाणपत्र, रोड  परवाना, चालक अनुज्ञप्ती, वायु प्रदुषण प्रमाणपत्र आदी कागदपत्र सोबत बाळगून जालना येथील आझाद मैदानात दि.19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9 ते दुपारी 12 वाजेपर्यंत तर अल्पबचत भवन मैदानात दुपारी 12 ते 3 या वेळेत तपासणी करुन घ्यावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने जालना शहरात रविवार दि.19 फेब्रुवारी 2023 रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहे. तरी या मिरवणूकीत सहभागी होणाऱ्या वाहनांची तांत्रिक तपासणी  करुन सदरची वाहने मिरवणूकीत सहभागी होण्यास तांत्रिकदृष्ट्या योग्य  आहेत किंवा नाही याची तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणीमध्ये मोटार वाहन निरीक्षक श्रीमती ए.आर.जाधव, सहायक मोटार वाहन निरीक्षक  अभिजीत रिळे, सुनिल गिते, प्रियंका छडीदार आणि अश्विनी जोगदंड या अधिकाऱ्यांचा  समावेश करण्यात आला आहे. हे अधिकारी आवश्यक कागदपत्रासह डिझले टँक गळती, वाहनांचे ब्रेक्स यांची काटेकोरपणे तपासणी करतील, असे  उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-


जिल्हास्तर एफसी बायर्न महाराष्ट्र कप फुटबॉल स्पर्धा संपन्न

 


जालना, दि. 17 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य तसेच फुटबॉल क्लब बायर्न यांच्या करारान्वये क्रीडा नैपुण्याचा शोध घेऊन त्यांना जर्मन येथे प्रशिक्षण देण्यासाठी राज्यात 14 वर्षाखालील मुलांच्या जिल्हास्तरीय एफसी बायर्न महाराष्ट्र कप स्पर्धां दि. 16 ते 17 फेब्रूवारी 2023 या कालावधीत जालना येथील जिल्हा क्रीडा संकुलात संपन्न झाल्या.

महाराष्ट्र राज्यात फुटबॉल खेळाच्या विकास व प्रसारासाठी फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी यांच्याशी क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्यावतीने करारनामा करण्यात आला आहे. फुटबॉल क्लब बायर्न म्युनिक, जर्मनी हा जागतिक अग्रगण्य लोकप्रिय फुटबॉल क्लबांपैकी एक आहे. या करारनाम्यामुळे राज्यातील फुटबॉल खेळाची लोकप्रियता वाढीस लागेल, खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांना फुटबॉल खेळातील तांत्रिक प्रशिक्षण, क्रीडा नैपुण्याचा शोध घेण्यासाठी तसेच योजनाबध्द प्रशिक्षण, पायाभुत सुविधा यांना चालना मिळणार आहे.

प्रथम सेमीफायनल गोल्डन ज्युबली स्कुल, जालना वि.वि. जैन इंग्लीश स्कुल, अंबड ( 1 -0 ) ने गोल्डन ज्युबली स्कुल, जालना विजयी झाला. द्वितीय सेमीफायनल ऑक्सफर्ड इंग्लीश स्कुल, जालना वि.वि. सेंट जान्स हायस्कुल, जालना ( 3- 0 ) ने ऑक्सफर्ड इंग्लीश स्कुल, जालना विजयी झाला. अंतिम सामना गोल्डन ज्युबली स्कुल, जालना वि.वि. ऑक्सफर्ड इंग्लीश स्कुल, जालना ( 3 – 0) ने गोल्डन ज्युबली स्कुल, जालना विजयी होऊन विभागस्त स्पर्धेस पात्र झाले. सोहम सचदेव यांने 2 गोल तर विवान बजाज या खेळाडूंने 1 गोल करीत आपल्या संघास विजयी करण्यात मोलाची कामगिरी केली. या स्पर्धेसाठी पंच म्हणून इम्रान सिध्दिकी, शेख इस्माईल, सय्यद शौकत, गुरू कावळे इत्यादीने पाहिले. विजयी संघाना ट्रॉफी व मेडल्स प्रदान करण्यासाठी श्री फिरोज अली मौलाना, श्री मुस्ताक भाई जालना जिल्हा फुटबॉल असोशिएशन, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर,  क्रीडा मार्गदर्शक महमंद शेख, संतोष वाबळे, इत्यादीच्या हस्ते देण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा मार्गदर्शक महमंद शेख, संतोष वाबळे, सोपान शिंदे, जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राचे हारूण खान  आदिंनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.  असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

 

 

 

बदनापूर येथील विभागीय रोजगार मेळाव्यास उमेदवारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद तरुणांनी कंपनीसाठीचे ज्ञान आत्मसात करुन भविष्यात मोठा उद्योगपती होण्याच्या दिशेने वाटचाल करावी - केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे * गावाचा लोभ सोडा, घराबाहेर पडून नोकरी करा * तरुणपणी अभ्यास करा, कष्ट करा

 







 

          जालना, दि. 17 (जिमाका) :- आपल्या  देशात केवळ मनुष्यबळाची कमतरता नसून कुशल मनुष्यबळाची मोठ्या प्रमाणात दिवसेंदिवस औद्योगिक क्षेत्राला उणीव भासत आहे. त्यामुळे तरुणांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या माध्यमातून  कुशल मनुष्यबळ कसे मिळविता येईल यावर लक्ष केंद्रीत करावे. तसेच एखाद्या औद्योगिक कंपनीत कुठल्याही पदावर काम करत असताना त्या कंपनीसाठी लागणाऱ्या सर्व गोष्टींचे ज्ञान आत्मसात करुन भविष्यात मोठा उद्योगपती  होण्याच्या दिशेने वाटचाल करावी, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी केले.

जालना येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या व बदनापूर येथील कै.तिलोकचंद कुचे  शिक्षण प्रसारक मंडळ संचालित रावसाहेब पाटील दानवे कॉलेज ऑफ फार्मसी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळावा आज  संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, बदनापुरचे नगराध्यक्ष जगनराव बारगजे,  माजी आमदार गोविंदराव केंद्रे, औरंगाबाद विभागाचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता उपआयुक्त सुनिल सैंदाणे, जालना येथील कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे, योगेश जोशी,  देविदास कुचे, श्रीमती शीतल कुचे, भिमराव  डोंगरे, भाऊसाहेब घुगे, वसंत जगताप, भगवान म्हात्रे, यांची प्रमुख उपस्थिती होती.

केंद्रीय राज्यमंत्री श्री. दानवे म्हणाले की, उमेदवारांनी सर्व परिस्थितीचा सर्वप्रथम अभ्यास करुन विभागीय रोजगार मेळाव्यातून नोकरी निवडावी. उमेदवाराच्या कौशल्यावर या मेळाव्यातून नोकरी मिळणार असल्याने आपली निवड न झाल्यास खचून न जाता नव्याने पुन्हा तयारीला लागून पुढील रोजगार मेळाव्यात नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करावे.  उमेदवारांनी सुरुवात करतांना प्रथम कनिष्ठ पातळीवरील पदावरुन करावी. नंतर टप्प्याटप्प्याने एक एक पायरी चढत जात यश प्राप्त  करत रहावे. आपल्या शहर परिसरातील उद्योगधंद्यांचा अभ्यास करुन त्या-त्या  क्षेत्रातील योग्यतेची पात्रता संपादन करावी. जेणेकरुन आपल्या आवडत्या परिसरात  आपल्याला नोकरीची संधी प्राप्त होवू शकेल. अकुशल माणसांना कुशल होण्यासाठी बराच काळाचा अनुभव घ्यावा लागतो. सर्वात अगोदर क्षेत्र निवडावे व ज्या क्षेत्रात कार्यरत असाल त्यात सर्वस्व अर्पण करुन  काम करावे. कुठलेही काम छोटे किंवा मोठे नसते, त्यामुळे संयम ठेवून काम करा म्हणजे यश हमखास मिळेल.  परदेशात भारतीय तरुणांना आपल्या शिक्षणाच्या जोरावर मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी मिळत आहेत त्यामुळे आपल्या गावाचा लोभ सोडा, घराबाहेर पडून नोकरी करा, असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला.

आपला देश हा तरुणांचा देश असून आपली लोकसंख्या ही संपत्ती झाली पाहीजे, या दिशेने वाटचाल करावी. नोकरी करत असतांना प्रामाणिकपणे करा ते जमत नसेल तर शेती करावी, असे सांगून शासनाच्या ‍विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेवून कर्ज उपलब्धतेतून व्यवसाय सुरु करुनही आपण प्रगती साधू शकतो. तरुणपणी अभ्यास करा, कष्ट करा आणि मेहनत घ्यावी  म्हणजे तुमचा भविष्यातील काळ हा उज्वल होईल, त्यामुळे तरुणपण कामासाठी वापरावे म्हणजे नंतर वय  व अनुभव झाल्यावर देशभ्रमंती करता येईल.

विभागीय रोजगार मेळाव्यात आमदार संतोष दानवे, आमदार नारायण कुचे, औरंगाबाद विभागाचे कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता उपआयुक्त सुनिल सैंदाणे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संपत चाटे यांनी केले तर आभार कौशल्य विकास अधिकारी सुरेश बहुरे यांनी मानले. सुत्रसंचालन राजु थिटे यांनी केले.  कार्यक्रमाची सुरुवात ही मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन झाली. या कार्यक्रमास पदाधिकारी, संबंधित विभागाचे अधिकारी, विविध कंपनींचे प्रतिनिधी, सुशिक्षीत बेरोजगार उमेदवार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आत्मराम दळवी, कैलास काळे, अमोल बोरकर, प्रदीप डोळे, वीरेंद्र चव्हाण, गजानन खोकड, राजू कटके, जयदत्त इंगोले, मधुकर खेडकर, सुरेश शेळके यांनी परिश्रम घेतले.

-*-*-*-*-

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे नुतनीकरणाचे प्रस्ताव सादर करावेत

 


          जालना, दि. 17 (जिमाका) :-  भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेअंतर्गत महाविद्यालयातील सन 2021-22 या शैक्षणिक वर्षातील पात्र विद्यार्थ्यांना लाभ वितरीत करण्यात आलेला आहे, अशा विद्यार्थ्याचे सन 2022 -23 करीता नुतनीकरणाचे प्रस्ताव महाविद्यालयीन स्तरावर दि. 28 फेब्रुवारी 2023 पर्यत सादर  करावेत. तसेच संबंधित महाविद्यालयांनी विद्यार्थांची वार्षिक उपस्थितीसह व योग्य त्या कागदपत्राच्या छायांकित प्रतिसह परिपुर्ण प्रस्ताव सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जालना या कार्यालयास दि. 6 मार्च 2023 पर्यत सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त अमित घवले यांनी केले आहे.

                      

-*-*-*-*-

घनसावंगी येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील साहित्य निर्लेखनासाठी आवाहन

 


जालना, दि. 17 (जिमाका) :-  औद्योगिक प्रशिक्षण संस्था , घनसावंगी जि. जालना या संस्थेतील निर्लेखित फर्निचर , हत्यारे व उपकरणे ,लहान यंत्रे, सयंत्रे व स्क्रॅप इत्यादीची विक्री निविदा पध्दतीने करावयाची आहे. ही निविदा दि. 20 व 21 फेब्रुवारी 2023 दुपारी 12 वाजेपर्यत भरुन सादर करावी लागणार आहे. त्यामुळे विक्रीकरीता ठेवलेले साहीत्यसुध्दा याच कालावधीत कार्यालयीन वेळेत व शेवटच्या दिवशी दुपारी 12  वाजेपर्यत पाहता येईल.  खरेदीदार इच्छुकांनी प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घनसावंगी जि. जालना यांच्याशी संपर्क साधावा इतर सविस्तर माहिती निविदेच्या अटी व शर्ती बाबतची माहिती भांडार विभागात पहावयास उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. असे प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, घनसावंगी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-