Tuesday, 4 August 2026

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 

जालना, दि.4 (जिमाका) : राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड हे जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांच्या दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेत.

सकाळी  9.30 वाजता पारनेर, को.प.बं.क्र. 1 ता. अंबड जि. जालना येथे बंधाऱ्याची पाहणी. सकाळी 10.00 वाजता घनसावंगीकडे प्रयाण. सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वाजेपर्यंत विमुक्त आणि भटक्या जमाती समुदाय तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. दुपारी 1 ते 4 वाजेपर्यंत विमुक्त आणि भटक्या जमाती समुदाय राष्ट्रीय नेतेपदी निवड झाल्याबद्दल जाहीर सत्कार सोहळ्यास उपस्थिती. दुपारी 4.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जालनाकडे प्रयाण. दुपारी 4.30 वाजता मृद व जलसंधारण विभागाशी संबंधित विविध विषयानुषंगाने आयोजित बैठकीस उपस्थिती. स्थळ जिल्हाधिकारी कार्यालय, जालना. सायंकाळी 6.00 वाजता शासकीय वाहनाने जिल्हा यवतमाळकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-

फॅक्टरी भाडे अनुदान योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि.4 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या उ‌द्योग विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य लघु उ‌द्योग विकास महामंडळ (MSSSIDC) व RAMP (Raising and Accelerating MSME Performance) कार्यक्रमाच्या माध्यमातून उत्पादन (Manufacturing) क्षेत्रातील सूक्ष्म व लघु उ‌द्योगांना चालना देण्यासाठी "फॅक्टरी भाडे अनुदान योजना राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील उद्यम (Udyam) नोंदणीकृत उत्पादन क्षेत्रातील पात्र सूक्ष्म व लघु उ‌द्योगांना (MSES) कारखान्याच्या मासिक भाड्‌याच्या 30 टक्के किंवा कमाल ₹30 हजार प्रतिमहिना इतके आर्थिक अनुदान देण्यात येणार आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये :  कारखान्याच्या भाड्यावर 30% पर्यंत अनुदान. कमाल ₹30 हजार प्रतिमहिना आर्थिक सहाय्य. नव्या उ‌द्योगांना उत्पादन व्यवसाय सुरु करण्यास प्रोत्साहन.उ‌द्योगांच्या उत्पादन क्षमतेत वाढ.रोजगार निर्मितीस चालना.5 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधीपासून कार्यरत उत्पादन उ‌द्योगांना प्राधान्य.

पात्रता

नोंदणीकृत भाडे करारनामा, ऑनलाइन सुविधा द्वारे भाडे अदा पावतीअर्ज करण्याची अंतिम तारीखः 31 ऑगस्ट 2026,ऑनलाईन अर्ज: mssidc.maharashtra.gov.in/RAMP/#/EOI

अधिक माहितीसाठी संपर्कः BFC Manager: अनिकेत शिवाजीराव डाके 9699637821,

Technology Manager: अनुज विजयकुमार ढवळे 9359747011, Field Officer: विशाल मधुकरराव इंगळे – 7972790530  जिल्हा उ‌द्योग केंद्र जालना अंतर्गत कार्यरत बिझनेस फॅसिलिटेशन सेल/टीम यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्यातील पात्र सूक्ष्म व लघु उत्पादन उ‌द्योगांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी निर्धारित मुदतीपूर्वी ऑनलाईन अर्ज सादर करून शासनाच्या भाडे अनुदान योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारणीकर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

 

तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण योजनेंतर्गत जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न

 



जालना, दि.4 (जिमाका) : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण व कल्याण योजना" अंतर्गत सहायक आयुक्त समाज कल्याण, जालना, राजाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, वसुर, सहारा सामाजिक विकास संस्था, चांदई ठोंबरी, ता. भोकरदन, जि. जालना तसेच गरु आशीर्वाद किन्नर समाज चॅरिटेबल ट्रस्ट, जि. जालना यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय मार्गदर्शन कार्यशाळेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

 

कार्यशाळेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. उपस्थित मान्यवरांचे शाल व पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमास परीविक्षाधीन सहाय्यक जिल्हाधिकारी श्री. रंगामंजू यांची विशेष उपस्थिती लाभली. त्यांनी तृतीयपंथीयांच्या सामाजिक सक्षमीकरणासाठी शासनाच्या विविध विभागांनी समन्वयाने कार्य करण्याची आवश्यकता अधोरेखित केली.

 

कार्यक्रमामध्ये तृतीयपंथीय समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, कायदेशीर हक्क, शिक्षण, आरोग्य, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, ओळखपत्रे, सामाजिक सुरक्षा तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्याच्या प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती देताना तृतीयपंथीयांच्या हक्कांचे संरक्षण अधिनियम, शासनाच्या कल्याणकारी योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, स्वयंरोजगाराच्या संधी तसेच विविध शासकीय विभागांशी समन्वय साधून लाभ मिळविण्याबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. संजय राठोड यांनी तृतीयपंथीयांच्या व्यक्तिमत्त्व विकास, आत्मविश्वास वाढ आणि सामाजिक नेतृत्व या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. कार्यशाळेदरम्यान अहिल्यानगर येथील तृतीयपंथीय प्रतिनिधी श्रीमती दिशा पिंकी शेख यांनी तृतीयपंथीयांच्या विविध समस्या, सूचना व अपेक्षा मांडल्या. त्यांनी तृतीयपंथीयांसाठी स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. यावर संबंधित अधिकाऱ्यांनी शासन नियमांनुसार आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

 

कार्यक्रमात तृतीयपंथीयांचे गुरु मोहम्मद शकीफ बक्ष (काजल गुरु नानी) यांनी समाजातील एकजूट, शिक्षण, स्वावलंबन आणि शासनाच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.कार्यशाळेच्या निमित्ताने तृतीयपंथीयांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये उपस्थितांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून आवश्यक आरोग्यविषयक सल्ला देण्यात आला.

 

तसेच आधार कार्डमधील नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाईल क्रमांक आदी तपशील अद्ययावत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. जिल्हा पुरवठा विभागामार्फत शिधापत्रिका (रेशन कार्ड) दुरुस्ती, नवीन नोंदणी, नाव समाविष्ट करणे तसेच सार्वजनिक वितरण प्रणालीतील लाभांविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

 

आरोग्य विभागामार्फत पात्र लाभार्थ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत आयुष्मान कार्ड काढण्याची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे व उपलब्ध आरोग्य सुविधांविषयी माहिती देण्यात आली. याशिवाय, तृतीयपंथीय व्यक्ती (हक्कांचे संरक्षण) अधिनियम, 2019 अंतर्गत उपलब्ध कायदेशीर अधिकार, संरक्षणात्मक तरतुदी तसेच विविध शासकीय योजनांमधील लाभांविषयी सविस्तर कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांचे निरसन करून त्यांना त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करण्यात आले.

 

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हरीदास भोपळे वरीष्ठ लिपीक व निलेश लक्कस कनिष्ठ लिपीक यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. अनिता राठोड सहायक आयुक्त समाज कल्याण जालना यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती स्नेहल मोदाळे, विशेष अधिकारी, शासकीय निवासी शाळा, जालना यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहायक आयुक्त समाज कल्याण, जालना कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच राजाराम बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, वसुर, यांचे अध्य्क्ष योगेश पाटील सहारा सामाजिक विकास संस्था, चांदई ठोंबरी यांचे अध्यक्ष सय्यद सर आणि गरु आशीर्वाद किन्नर समाज चॅरिटेबल ट्रस्ट, जालना तृतीयपंथीयांचे गुरु मोहम्मद शकीफ बक्ष (काजल गुरु नानी) पदाधिकारी व स्वयंसेवकांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यशाळेच्या माध्यमातून तृतीयपंथीय समाजाला त्यांच्या हक्कांविषयी जागरूक करून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभघेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. या उपक्रमास तृतीयपंथीय समाजाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी कार्यक्रमास सहायक आयुक्त समाज कल्याण जालना कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

Monday, 3 August 2026

प्रवीण टाके छत्रपती संभाजीनगरच्या माहिती उपसंचालक पदावर रूजू

 





 

छत्रपती संभाजीनगर दि.03 : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाचे उपसंचालक प्रवीण टाके यांनी सोमवारी छत्रपती संभाजीनगर विभागाचे माहिती उपसंचालक या पदाचा कार्यभार स्वीकारला.

 

प्रवीण टाके यापूर्वी कोल्हापूर येथे उपसंचालक म्हणून कार्यरत होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात २००८ ला रुजू झाल्यानंतर त्यांनी नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रात जनसंपर्क अधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर मुंबई  मंत्रालयात वरिष्ठ सहायक संचालक असताना ‘लोकराज्य’चे ते कार्यकारी संपादक होते. चंद्रपूर, नागपूर व नांदेड याठिकाणी त्यांनी जिल्हा माहिती अधिकारी पदावर कार्य केले आहे. शासन सेवेत केलेल्या उल्लेखनीय कामासाठी त्यांना सन २०१९ - २० वर्षाचा यशवंतराव चव्हाण उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे.

 

पत्रकारितेतील स्नातकोत्तर पदवी प्राप्त असलेले प्रवीण टाके यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा स्व.वसंतराव ओगले पुरस्कार प्राप्त आहे. शासनात येण्यापूर्वी त्यांनी जवळपास १४ वर्ष नागपूर पत्रिका, तरुण भारत, सामना आणि लोकमत वृत्तपत्रात विविध पदावर कार्य केले आहे. त्यांची फकीर ही चरित्र कादंबरी प्रकाशित झाली आहे. वऱ्हाडी भाषेतील स्तंभकार, कवी, लेखक म्हणून त्यांची ओळख असून विविध सामाजिक विषयावर त्यांनी विपुल लेखन केले आहे.

 

आज विभागीय माहिती कार्यालय छत्रपती संभाजीनगर येथे छत्रपती संभाजीनगर, जालना,  बीड, परभणी येथील जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने अधिकारी,कर्मचा-यांनी  त्यांचे स्वागत केले.

 

*****

क्रांतीसिंह नानासाहेब पाटील यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



जालना, दि.3 (जिमाका) : थोर स्वातंत्र्यसेनानी क्रांतीसिंह नानासाहेब पाटील यांची जयंती जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

            याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, नायब तहसिलदार तुषार निकम, विक्रांत मोंढे, किशोर तायडे, सहाय्यक महसुल अधिकारी शिल्पा मगरे, दिपाली राऊत, वृषाली नवले, कुंता पठाडे, रिना नगरकर, अरुणा रनेर, सविता भोकरे, संतोष पगार, रविंद्र हेलगट, सत्यनारायण कदम, सुनिल काळुंके आदी  कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-

प्रवासी वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ’ योजनेत नोंदणीचे आवाहन

 


जालना, दि.3 (जिमाका) : राज्यातील ऑटो-रिक्षा, टॅक्सी, कॅब तसेच इतर प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेसाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. पूर्वीच्या ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र ऑटो-रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळा’चे नाव बदलून आता ‘धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळ’ असे करण्यात आले असून, मंडळाच्या नियमावलीतही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत.

या सुधारित योजनेमुळे मंडळाच्या सदस्यत्वाची व्याप्ती वाढली असून, आता परवानाधारक बॅजधारक सर्व प्रकारच्या प्रवासी वाहन चालकांना या मंडळाचे सदस्य होता येणार आहे. त्यामुळे राज्यातील अधिकाधिक चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शासनाच्या निर्णयानुसार प्रवासी वाहतूक क्षेत्रात कार्यरत चालकांच्या सामाजिक आणि आर्थिक सुरक्षेसाठी स्वतंत्र कल्याणकारी निधी निर्माण करण्यात येणार आहे. या निधीतून पात्र नोंदणीकृत चालकांना विविध शासकीय कल्याणकारी योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जाणार आहे. तसेच Ola, Uber आणि तत्सम ऑनलाइन अॅप किंवा ॲग्रीगेटरच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक बुकिंग करणाऱ्या कंपन्यांकडून शासनाने निश्चित केलेल्या तरतुदीनुसार प्रत्येक राईडवर आकारण्यात येणारी कल्याणकारी रक्कम या निधीत जमा होणार असून, त्याचा उपयोग चालकांच्या हितासाठी केला जाणार आहे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र चालकांनी मंडळाकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. नोंदणीसाठी 500 रुपये नोंदणी शुल्क भरून विहित नमुन्यात अर्ज सादर करावा लागणार आहे.

नोंदणीसाठी चालकांकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, वैध वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स), प्रवासी वाहन चालविण्यासाठी आवश्यक बॅजची माहिती तसेच अर्जामध्ये मागविण्यात आलेली इतर आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे.

नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित चालकाला मंडळाचे ओळखपत्र (Identity Card) दिले जाणार असून, त्याच्या आधारे शासनामार्फत आणि मंडळाकडून भविष्यात राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे.

जालना जिल्ह्यातील चालकांना विशेष आवाहन

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना यांनी जिल्ह्यातील ऑटो-रिक्षा, टॅक्सी, कॅब तसेच इतर सर्व पात्र प्रवासी वाहन चालकांना या योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः Ola, Uber व इतर ऑनलाइन प्रवासी वाहतूक सेवांशी संलग्न असलेल्या चालकांनी आवश्यक कागदपत्रांसह तातडीने नोंदणी करून शासनाच्या या महत्त्वाकांक्षी कल्याणकारी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

Saturday, 1 August 2026

लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



 

 

     जालना दि. 1 (जिमाका) :-लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे  यांच्या जयंती निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात  मनपा उपआयुक्त, नंदा गायकवाड यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले.             

          यावेळी, सहा. आयुकत मनपा सुप्रिया चव्हाण, नायब तहसिलदार  सतिश तायडे, सहायक महसूल  अधिकारी दिपाली राऊत,  राहुल मुंढे, एन.बी. सोळुंके, पी.ए. मुळे, डी.एल. पवार, बी. एच. भिसे, श्री. चव्हाण, सुनिल काळुंके आदी  कर्मचारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-*-