Wednesday, 29 April 2026

4 मे रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

 

जालना, दि.29  (जिमाका) :-   जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन महिन्याचे पहिल्या सोमवारी करण्याबाबत निर्देश आहेत. तरी जालना जिल्ह्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार दि. 4 मे 2026  रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

लोकशाही दिनाकरीता अर्जदार यांनी अर्ज विहीत नमुन्यात 15 दिवस आधी 2 प्रतीत पाठवणे आवश्यक आहे. या लोकशाही दिनामध्ये अर्ज देताना त्यांनी संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व या तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झाली नाही, अशाच अर्जदाराने टोकन क्रमांकाच्या पावतीसह विहीत नमुन्यात दोन प्रतीमध्ये अर्ज सादर करावा. ज्या अर्जदाराने तालुकास्तरीय लोकशाही दिनात भाग घेतला नाही, अशा अर्जदाराचे अर्ज स्विकारले जाणार नाहीत, असे जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचे कार्यालयाकडुन सुचित करण्यात येत आहे. लोकशाही दिनात न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व,अपील, सेवाविषयक आस्थापनाविषयक बाबी, विहीत नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत. तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाशी तहसीलदार यांच्या स्वाक्षरीची पोच पावती तसेच त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापुर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल. ज्यांनी त्यापुर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे. परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नये. तसेच लोकशाही दिन विहीत नमुन्याचा अर्ज  http://jalna.nic.in  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते होणार मुख्य शासकीय ध्वजारोहण


            जालना, दि.29 (जिमाका):-  महाराष्ट्र राज्य स्थापनेचा 67 वा स्थापना  दिन समारंभानिमित्त गुरुवार दि.1 मे 2026  रोजी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी 8.00 वाजता जालना येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर होणार आहे. तरी नागरिकांनी तसेच सर्व शासकीय, निमशासकीय आणि सहकारी संस्थेच्या कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखात ध्वजारोहणास उपस्थित रहावे, असे आवाहन  जिल्हा प्रशासनाने केले आहे.

-*-*-*-*-

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 


 

            जालना,दि.29 (जिमाका):  राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे बुधवार, दि. 30 एप्रिल, 2026 रोजी दुपारी 3.45 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव. सायंकाळी 4.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण्. सायंकाळी 4.10  ते सायंकाळी 5.25 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित खरीप हंगाम 2026 पुर्व तयारी आढावा बैठक/ पाणी टंचाई आढावा बैठक/जिल्हास्तरीय जन आरोग्य संरक्षण कार्यकारीणी बैठकीस उपस्थिती, सायंकाळी 5.30 ते सायंकाळी 6.30 वाजता  जिल्हाधिकारी कार्यालयातील पालकमंत्री यांच्या दालनात  जनता दरबार (अभ्यंगतांच्या भेटी व नागरिकांशी संवाद), सायंकाळी 6.35 वाजता विश्रामगृहाकडे प्रयाण करतील.

 तसेच शुक्रवार, दि. 1 मे, 2026 रोजी सकाळी 8.00 वाजता पोलीस परेड ग्राऊंड येथे आयोजित महाराष्ट्र दिनानिमित्त शासकीय ध्वजारोहण व विविध कार्यक्रम तसेच जिल्हा पोलीस दलाच्या नवीन वाहनांचे लोकार्पण  सोहळयास उपस्थिती. तसेच सकाळी 9.00 ते 10.45 वाजता मोतीबाग चौपाटी (बदनापूर रोड) कडे प्रयाण, दिव्यांग केंद्राचे लोकर्पण स्थळ – जिल्हा रुग्णालय शेजारी. सकाळी 11.00 वाजता अग्रेसन भवन येथे आयोजित “रायझिंग जालना”या कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळयास उपस्थिती. दुपारी 1.00 वाजता दैनिक दिव्य मराठी ग्रुपच्या वतीने आयोजित जालना पोलीस सन्मान सोहळयास उपस्थिती स्थळ हॉटेल अतिथी, मंठा रोड दुपारी 2.15 वाजता शासकीय वाहनाने परळी वैजनाथ जिल्हा बीडकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-*-*-

‘एल-निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुसंवर्धन विभाग सतर्क ; जिल्हा चारा सुरक्षा आराखडा तयार करण्याचे निर्देश

  जालना,दि.29(जिमाका): भारतीय हवामान विभागाने 2026 वर्षासाठी ‘एल-निनो’ परिस्थितीचा इशारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पशुसंवर्धन विभागाने सज्जता वाढवली असून, जनावरांच्या चाऱ्याची टंचाई टाळण्यासाठी सर्व जिल्ह्यांना ‘जिल्हा चारा सुरक्षा आराखडा’ तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार हा आराखडा तातडीने तयार करून अंमलबजावणीसाठी संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.

राज्यातील एकूण पशुधनापैकी सुमारे 43.5 टक्के जनावरे सुका चारा आणि 25.92 टक्के हिरव्या चाऱ्यावर अवलंबून आहेत. ‘एल-निनो’ मुळे पावसाचे प्रमाण घटण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने हिरव्या चाऱ्याच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो. या संभाव्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी विभागाने विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत.

पशुसंवर्धन आयुक्तालयाकडून जिल्हा प्रशासनांना चारा उपलब्धतेचा आढावा घेऊन नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यात गावपातळीवर चारा बँक उभारणी, शेतकऱ्यांना कमी पाण्यात होणाऱ्या चारा पिकांकडे वळवणे, तसेच चारा साठवणूक वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. टंचाई भासल्यास तातडीने चारा छावण्या सुरू करण्याची तयारी ठेवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

यासोबतच जनावरांच्या आरोग्य व पोषणासाठी पूरक उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. पशुवैद्यकीय सेवा बळकट करणे, रोगनियंत्रण मोहिमा, तसेच पशुखाद्याच्या गुणवत्तेवर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. चारा उत्पादन वाढवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, हरित चारा लागवड आणि “टोटल मिक्स्ड रेशन (TMR)” सारख्या पद्धतींचा प्रसार करण्यावर भर देण्यात येणार आहे.

 

विशेष जिल्हा चारा सुरक्षा आराखड्याचे मुद्दे :

·         पडणाऱ्या पावसाच्या अनिश्चिततेचा विचार करून पर्यायी चारा पिकांचे नियोजन.

·         टंचाई भासल्यास त्वरित चारा छावण्या सुरू करण्यासाठी पूर्वतयारी.

·         जनावरांसाठी आवश्यक पोषणमूल्यांचा साठा सुनिश्चित करणे.

·         स्थानिक पातळीवर चारा साठवणूक व वितरण यंत्रणा सक्षम करणे.

 

पशुसंवर्धन विभागाने जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि शेतकरी यांच्यात समन्वय साधून या उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर दिला आहे. तसेच शेतकऱ्यांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून उपलब्ध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. राज्यात ‘एल-निनो’चा संभाव्य परिणाम लक्षात घेता, चारा टंचाई टाळण्यासाठी विभागाने सर्वंकष नियोजन सुरू केले असून, पशुधन संरक्षणासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येत आहेत.

 

****

 

जालना जिल्ह्याच्या 45 वर्षपूर्तीनिमित्त ‘रायझिंग जालना’ सोहळ्याचे आयोजन

 


 

जालना,दि.29(जिमाका) : जालना जिल्ह्याच्या स्थापनेला 1 मे रोजी 45 वर्षे पूर्ण होत असून, या ऐतिहासिक टप्प्याच्या निमित्ताने ‘रायझिंग जालना’ या नावाने 1 मे रोजी महाराजा अग्रसेन फाउंडेशन येथे भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांतर्गत सकाळी 10 ते 1 या वेळेत सांस्कृतिक व औपचारिक कार्यक्रम पार पडणार असून, त्यानंतर सायंकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांसाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. हा उपक्रम जिल्हा प्रशासनाच्या पुढाकारातून आयोजित केला जात असून, जालन्याच्या समृद्ध इतिहासाचा गौरव करताना उज्ज्वल भविष्यासाठी एकत्र येण्याचा व संकल्प करण्याचा उद्देश आहे. जालन्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या उपक्रमांची सुरुवात करण्यात येणार आहे. कार्यक्रमस्थळी 50 हून अधिक स्टॉल्स उभारण्यात येणार असून, त्यामध्ये स्थानिक उत्पादने, स्टार्टअप्स, उद्योग क्षेत्र, विविध शासकीय योजना, स्थानिक खाद्यपदार्थ व मनोरंजनात्मक उपक्रम यांचा समावेश असणार आहे. तसेच नागरिकांसाठी एक उत्साही व कुटुंबासह अनुभव घेण्यासाठी विविध मनोरंजनात्मक सदृश वातावरण निर्माण करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ऐतिहासिक सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 

****

 

Tuesday, 28 April 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात सेवा हक्क दिन उत्साहात साजरा · जिल्हाधिकारी आाशिमा मित्तल यांचा राज्यस्तरीय सन्मान

 






जालना,दि.28(जिमाका) : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज ‘सेवा हक्क दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. नागरिकांना शासकीय सेवा वेळेत आणि पारदर्शकपणे मिळाव्यात यासाठी हा दिवस विशेष महत्त्वाचा मानला जातो.

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन सभागृहात आयोजित ‘सेवा हक्क दिन’ कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी श्रीमती देशपांडे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, तहसिलदार श्रीमती तायडे, तहसिदार श्री. अनिल नव्हाते यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ म्हणाले की, "सेवा हक्क कायद्याचा मुख्य उद्देश प्रशासनाला लोकाभिमुख करणे आहे. नागरिकांनी जागरूक होऊन आपला हक्क मागावा. सेवा मिळण्यास विलंब झाल्यास अपील करण्याची तरतूद देखील कायद्यात आहे."

प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे म्हणाल्या की, सेवा हक्क दिनानिमित्त, प्रशासनाने नागरिकांना अर्ज करण्यासाठी आणि सेवा ट्रॅक करण्यासाठी 'आपले सरकार' पोर्टल व मोबाईल ॲप वापरण्याचे आवाहन केले. या डिजिटल माध्यमामुळे पारदर्शकता वाढली असून, प्रशासकीय कामे अधिक गतिमान झाली आहेत. 'आपले सरकार पोर्टल' वर 500 हून अधिक सेवाद्वारे ऑनलाइन उपलब्ध आहेत. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा वाचत असून शासकीय कामकाजातील कार्यक्षमता वाढली आहे.

यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सेवा हक्क कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अधिनियमाचे उद्दिष्ट्ये, डिजिटल सेवा आणि ऑनलाइन प्रक्रियेविषयी प्रात्यक्षिकाद्वारे नागरिकांना सुलभ सेवा कशा मिळू शकतात याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्ह्यातील सर्व उपस्थित विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी 'सेवा हक्क दिना'निमित्त शपथ घेतली. यावेळी वेळेत सेवा देणाबाबत उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी/कर्मचाऱी आणि निबंध स्पर्धेतील विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देवून सत्कारही करण्यात आला.

यावेळी कार्यक्रमास विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती.

 

जिल्हाधिकारी आाशिमा मित्तल यांचा राज्यस्तरीय सन्मान

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क अधिनियमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राबविण्यात आलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे जालना जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचा मुंबई येथील सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या सोहळ्यात राज्यस्तरीय विशेष सन्मान करण्यात आला आहे.

जालना जिल्हा जिल्हाधिकारी म्हणून आशिमा मित्तल यांनी ‘घरपोच शासकीय सेवा’ हा उपक्रम राबवून नागरिकांना अधिक सुलभ, जलद आणि परिणामकारक सेवा मिळवून देण्याचा यशस्वी प्रयत्न केला. या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिकांना शासकीय कार्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी झाली असून, सेवा वितरणात पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढली आहे. राज्यभरातील इतर जिल्ह्यांसाठी हा उपक्रम आदर्श ठरणारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

 

****

कामगारांची उष्णतेच्या लाटेपासून संरक्षण करण्याचे सरकारी कामगार अधिकारी यांचे आवाहन

 


जालना,दि.28(जिमाका) : राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने सर्व आस्थापना मालकांना आवश्यक उपाययोजना तातडीने राबविण्याचे आवाहन केले आहे. कामगार व मजूर विविध क्षेत्रांत काम करत असताना उष्णतेच्या लाटेचा त्यांच्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सूचनांनुसार ही मोहीम राबविण्यात येत आहे.

श्रम व रोजगार मंत्रालय तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचनांचा आधार घेत, राज्यातील वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर कामगारांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व उद्योग, कारखाने, दुकाने, बांधकाम स्थळे, हॉटेल, व्यापारी आस्थापना, मॉल, शॉपिंग सेंटर्स आणि इतर संस्थांनी विशेष दक्षता घ्यावी, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सध्या राज्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून, कामगारांच्या सुरक्षिततेसाठी खालील उपाययोजना काटेकोरपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत :

·  कामगारांना स्वच्छ व थंड पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी.

·  कामाच्या ठिकाणी सावलीची किंवा विश्रांतीची जागा उपलब्ध करून द्यावी.

·  दुपारी 12 ते 4 या वेळेत उघड्यावर काम टाळावे; आवश्यक असल्यास कामाच्या वेळांत बदल करावा.

·  उष्माघात व उष्णतेच्या परिणामांविषयी जनजागृती करावी.

·  प्राथमिक उपचार व आपत्कालीन सुविधा उपलब्ध ठेवाव्यात.

·  या कालावधीत जड शारीरिक श्रम टाळण्याचे निर्देश द्यावेत.

·  बांधकाम व इतर श्रमिक कामांमध्ये आवश्यक त्या सुविधा, जसे की आईस पॅक व थंडावा देणारी साधने उपलब्ध करावीत.

·  कामगारांची नियमित आरोग्य तपासणी करून आरोग्य विभागाशी समन्वय साधावा.

·  उष्णतेच्या लाटेचे धोके व प्रतिबंधात्मक उपायांविषयी मार्गदर्शन करावे.

·  कामाच्या ठिकाणी सूचना फलक, पोस्टर्स व आपत्कालीन संपर्क क्रमांक प्रदर्शित करावेत.

या उपाययोजनांची अंमलबजावणी करून कामगारांचे आरोग्य सुरक्षित ठेवणे ही सर्व आस्थापनांची जबाबदारी आहे. सर्व संबंधितांनी या सूचनांचे काटेकोर पालन करून कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी अ. मा. जाधव यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-