Wednesday, 24 September 2025

महाराष्ट्र राजपत्रित नागरी संयुक्त पुर्व परीक्षा 2025 साठी परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

 


        जालना दि.24 (जिमाका) : महाराष्ट्र राजपत्रित नागर संयुक्त पुर्व परीक्षा 2025 ही दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी  सकाळी 10.00 ते 12.00 व दुपारी 3.00 ते 6.00 या वेळेत जालना जिल्ह्याच्या बद्रीनारायण बारवाले कॉलेज एमआयडीसीजवळ औरंगाबाद रोड, जालना. मत्सोदरी शिक्षण संस्था अंकुशराव टोपे कॉलेज, मोतीबाग ओव्हरब्रीज जवळ जालना. राष्ट्रीय हिंदी विद्यालय, देऊळगावराजा रोड, जालना. श्री. एम.एस. जैन विद्यालय (मराठी मिडियम), गणेश नगर छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ, जालना या 4 केंद्रावर घेण्यात येणार असुन अपर जिल्हादंडाधिकारी यांच्या  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सर्व सार्वजनिक टेलिफोन/ एसटीडी बुथ/फॅक्स/झेरॉक्स व ध्वनीक्षेपके बंद ठेवण्याचे प्रतिबंधात्मक आदेश लागु केले आहे.  हा आदेश दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 8.00 वाजेपासून सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत लागु राहतील असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिले आहेत.

-*-*-*-*-*-

3 ऑक्टोबर ते 9 ऑक्टोबर 2025 अभिजात मराठी भाषा सप्ताह म्हणुन साजरा करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 


 

जालना दि.24 (जिमाका) : दि. 3 ऑक्टोबर  हा दिवस अभिजात  मराठी भाषा दिवस व दि. 3 ऑक्टोबर  ते 9 ऑक्टोबर 2025 हा कालावधी अभिजात मराठी भाषा  सप्ताह साजरा करण्याचे  प्रशासनाने निर्देश दिले आहे.

सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये/महामंडळे, केंद्र शासनाव्या अखत्यारीतील राज्यातील सर्व कार्यालये, मंडळे, महामंडळे, सार्वजनिक उपक्रम, सर्व खाजगी उद्योग, आस्थापना  व व्यापारी बँक, सर्व शैक्षणिक संस्था/विद्यापीठे/ महाविद्यालये इत्यादी सर्व संस्थामध्युन  अभिजात मराठी भाषे संदर्भात  जास्तीत जास्त संशोधन,संवर्धन व जनजागृती व्हावी या हेतूने  प्रतिवर्षी दि . 3 ऑक्टोबर  हा दिवस अभिजात मराठी भाषा दिवस व दि. 3 ऑक्टोबर  ते 9 ऑक्टोबर 2025  या कालावधीत अभिजात मराठी भाषा सप्ताह साजरा करण्याचे जिल्हाधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

-*-*-*-*-*-

जिल्हा जाती प्रमाणपत्र समितीमार्फत 2 ऑक्टोबर पर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी विशेष मोहीम

 


जालना दि.24 (जिमाका) : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कालावधीनिमित्त 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत विद्यार्थ्यांकरीता  जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी  विशेष मोहीमेचे आयोजन उपायुक्त जिल्हा जाती प्रमाणपत्र पडतळणी समिती यांनी केले आहे.

जिल्ह्यात सेवा पंधरवाड्यात 11 वी 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व प्रवेशित व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेशीत त्रुटी पुर्ततेअभावी प्रलंबीत विद्यार्थ्यांना जात वैधताप्रमाणपत्र देण्यासाठी विशेष मोहिम राबविली जाणार आहे. जी त्रुटी पुर्ततेअभावी प्रलंबित प्रकरणे आहेत अशा अर्जदारांना ई-मेलद्वारे कळविले आहे. परंतु ज्यांची त्रुटीची पुर्तता केलेली नाही अशा विविध व्यावसायिक अभ्यासक्रमास कागदपत्रे त्रुटी पुर्ततेसाठी कॅम्प राबविण्यात येणार आहे. या मोहिमे दरम्यान विज्ञान शाखेतील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांची जात प्रमाणपत्र पडताळणी प्रकरणे निकाली काढण्यासाठी तसेच ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणीच्या पार्श्वभुमीवर  विद्यार्थ्यांसाठी संबंधित महाविद्यालयातील समान संधी केंद्रामार्फत वेबिनारचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरताना तो व्यवस्थित भरला जाईल त्यामधील सर्व माहिती स्व:त खात्री करुन भरता यावी  तसेच योग्य परिपुर्ण कागदपत्रे अपलोड करावीत यासाठी सदर अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी तो व्यवस्थित भरला आहे याची खात्री करण्याचे आवाहन उपायुक्त जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


जालना दि.24 (जिमाका) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 24 सप्टेंबर व 26 सप्टेंबर 2025 ते  दि. 28 सप्टेंबर 2025 या कालावधीत यलो  (Yellow) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलका ते मध्यम स्वरुपाची पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दि. 25  सप्टेंबर 2025 रोजी हलका ते मध्यम व दि.28 सप्टेंबर 2025 रोजी  तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

            मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे,मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे.वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी,जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधाण्याचे आवाहजन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

“मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर” चे 26 सप्टेंबर रोजी उद्घाटन

 


जालना, दि.24 (जिमाका): जिल्ह्यातील शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांतील विद्यार्थी तसेच नवउद्योजकांमध्ये नाविन्य व उद्योजकता वृद्धीसाठी, छत्रपती संभाजीनगर येथे दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे MAGIC (Marathwada Accelerator for Growth and Incubation Council), छत्रपती संभाजीनगर यांच्याव्दारे इनक्युबेशन सेंटर स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या अनुषंगाने, सदर इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील को-वर्किंग व कार्यालयीन जागेचे नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले असून प्रत्यक्ष कामकाज सुरू होण्याच्या मार्गावर आहे.या अनुषंगाने, गुरुवार, दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1.30 वाजता कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, मंत्री,  मंगल प्रभात लोढा, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत “मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर” या केंद्राचा उद्घाटन समारंभ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना येथे आयोजित करण्यात आला आहे.मॅजिक आयटीआय जालना इनक्युबेशन सेंटर च्या स्थापनेमुळे नवीन उद्योग उभारणीसाठी आवश्यक मार्गदर्शन,प्रशिक्षण व सुविधा मिळणार असून, नवउद्योजकांना स्टार्टअप कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी मदत होणार आहे.त्याचप्रमाणे बँक व शासकीय योजनांशी जोडणी करून आर्थिक साहाय्य मिळविण्याची संधी, कौशल्य, तंत्रज्ञान आणि बाजारपेठ यांचा थेट अनुभव व नेटवर्किंग होणार, जिल्ह्यातील नव्या उद्योग जगतात  सक्रिय सहभाग व संधी उपलब्ध होणार आहे. सदर उद्घाटन समारंभास आपण उपस्थित राहून आपल्या प्रगतीसाठी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक,आयुक्त कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता,यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे

-*-*-*-*-*-  

 

जालना जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पालकमंत्री पंकजा मुंढे यांनी केली पाहणी

 


 





जालना,दि.24(जिमाका): जालना जिल्ह्यातील काही भागात मुसळधार पाऊस झाल्याने गोदावरी नदीला पूर आला आहे त्यामुळे नदीच्या काठावरील अनेक गावामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.  जिल्ह्यातील काही गावात देखील नदीचे पाणी घुसून नागरिक पाण्यामध्ये अडकले होते. काहींच्या घरात पाणी आले होते. त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री श्रीमती पंकजा मुंडे यांनी आज जालना जिल्ह्यातील पुरग्रस्त गावांचा दौरा केला. यावेळी श्रीमती मुंडे यांनी परतूर तालूक्यातील गोळेगाव, घनसावंगी तालुक्यातील भेंडाळा, कुंभार पिंपळगाव, मच्छिंद्रनाथ चिंचोली आणि अंबड तालुक्यातील सुखापूरी, शहापूर या गावांना भेट देऊन येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

            यावेळी श्रीमती मुंढे यांनी नागरिकांशी संवाद साधुन, त्यांना तात्काळ मदत करणार असल्याचे आश्वासित केले. पंचनामे करण्याचे काम सुरु आहे, परंतू शासनामार्फत पुरग्रस्त भागातील बाधीत नागरिक आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचविण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शासन नागरिकाच्या पाठीशी असून, कोणीही काळजी करू नये. बाधित नागरिकांना शासन शक्य ती मदत करणार आहे. परतूर तालुक्यातील गोळेगावचा अनेक वर्षाचा पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. हा प्रश्न मी पुढील मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडून, पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तसेच या पुरामुळे अनेक नागरिक बेघर झाले असून, त्यांच्या राहण्याची व जेवणाची सोय करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले. शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत देण्यात येणार आहे. ज्या भागात 65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्यास त्या भागात अतिवृष्टी घोषित करण्याचा नियम आहे. परंतु जिल्ह्यात ज्याठिकाणी 65 मिमी पेक्षा देखील कमी पाऊस झाला असेल पण त्या ठिकाणी जास्त नुकसान झाले असल्यास त्याचेही पंचनामे करण्याच्या तसेच जिल्ह्यातील पर्जन्यमापकाची तपासणी करण्याच्या सूचना श्रीमती पंकजा मुंडे यांनी प्रशासनाला यावेळी दिल्या.

यावेळी परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बबनराव लोणीकर, घनसावंगी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हिकमत उढाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जिपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम. मिनु, परतूरचे उपविभागीय अधिकारी पद्माकर गायकवाड, तहसिलदार प्रतिभा गोरे, घनसावंगीचे उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार पूजा वंजारी, तहसीलदार विजय चव्हाण, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह नांदूर हवेली येथील गावकऱ्यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-

नुकसानग्रस्त भागातील शेतीशिवाराची कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केली पाहणी एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही - कृषिमंत्री दत्तात्रय भरणे "काळजी करू नका, शासन आपल्या सोबत...

 










 

जालना,दि.24(जिमाका): जालना जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतीचे नुकसान झाले आहे, अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेती शिवाराची आज कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली. सोमठाणा, ता.बदनापूर, ढाकलगाव, ता. अंबड या गाव शिवारातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन "काळजी करू नका, शासन आपल्या सोबत आहे" असा धीर दिला. एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असे सांगतानाच तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करा, असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.

जालना जिल्ह्यातील सोमठाणा, ता.बदनापूर व ढाकलगाव, ता. अंबड शिवारात आज सकाळी कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी थेट बांधावर जात शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी आमदार नारायण कुचे यांच्यासह महसूल, कृषि, पशुसंवर्धन, कृषि विद्यापीठ यांच्यासह संबंधित यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

कृषिमंत्री श्री.भरणे संवाद साधताना म्हणाले, अतिवृष्टीमुळे शेतकरी बांधवाने कष्टाने पिकविलेल्या शेती पिकाचे नुकसान झाले आहे. जालना जिल्ह्यात नुकसानीचे क्षेत्र अधिक आहे. कपाशी, सोयाबीन यासह इतर पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात आहे. पशुधन तसेच घराची पडझड झाली आहे.  जिल्हा प्रशासनाने संबंधित यंत्रणांसह तातडीने पंचनामे करून राज्य शासनाकडे अहवाल सादर करावा. अहवाल प्राप्त होताच तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, काळजी करू नका, शासन आपल्या सोबत आहे, असा धीर त्यांनी शेतकऱ्यांना दिला.

जालना जिल्ह्यात ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात क्षेत्र बाधित झाले आहे. गेल्या आठ-दहा दिवसात मोठ्या प्रमाणात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. शेतीशिवारात पिके पाण्याखाली आहेत, तर कुठे पीक वाहून गेल्याचे दिसत आहे. शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत तातडीने मदत पोहचलीच पाहिजे म्हणून जिल्हा प्रशासनाने तत्परतेने पंचनामे करून अहवाल सादर करावा, असे निर्देशही त्यांनी यंत्रणेला दिले.

राज्याच्या कृषिमंत्री म्हणून आपण सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. तसेच शासनाची भूमिका शेतकऱ्याला आधार देण्याचीच असून नुकसानीचे पंचनामे होऊन प्रस्ताव सादर होताच मदत तत्परतेने मदत मिळेल, संकटाच्या काळात आपण सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी उभे राहूयात असेही ते म्हणाले. यावेळी शासनाच्या विविध विभागांचे प्रमुख, लोकप्रतिनिधी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-