Wednesday, 30 April 2025
वेव्हज् परिषदेच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबईत
मुंबई,
दि. 30 : भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (वेव्हज्) शिखर
परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे रोजी मुंबईतील जिओ
वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. या वेव्हज् परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवित
आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, रेल्वे मंत्री
अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग
मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांची या
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे.
“कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रिज" या
घोषवाक्याखाली होणाऱ्या या चार दिवसीय शिखर परिषदेत भारताला मीडिया, मनोरंजन आणि
डिजिटल नवप्रवर्तनाचे जागतिक केंद्र म्हणून प्रदर्शित करण्यात येईल.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सर्जनशीलता,
तंत्रज्ञान आणि प्रतिभेच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असलेल्या या
वेव्हज् 2025 मध्ये चित्रपट, ओटीटी, गेमिंग, कॉमिक्स, डिजिटल मीडिया, कृत्रिम
बुद्धिमत्ता, एव्हीजीसी- एक्सआर ब्रॉडकास्टिंग आणि नव्या तंत्रज्ञानाचा समावेश
असेल. भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील सामर्थ्याचे हे सर्वांगीण
प्रदर्शन असेल. या उपक्रमाच्या माध्यमातून 2029 पर्यंत 50 अब्ज डॉलर्सच्या
बाजारपेठेचे दरवाजे उघडले जातील, असा अंदाज आहे.
या शिखर परिषदेत प्रथमच ग्लोबल मीडिया डायलॉग (GMD) चे
आयोजन मुंबईत होणार आहे. यामध्ये 25 देशांचे मंत्री सहभागी होणार असून, भारताच्या
जागतिक मीडिया क्षेत्रातील सहभागात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. वेव्हज् बजार या
जागतिक ई-मार्केटप्लेसमध्ये 6,100 पेक्षा अधिक खरेदीदार, 5,200 विक्रेते आणि 2,100
प्रकल्प सहभागी होणार आहेत, ज्यातून स्थानिक व जागतिक स्तरावर व्यवसाय आणि नेटवर्किंगच्या
मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.
या परिषदेत प्रधानमंत्री क्रिप्टोस्पियरला भेट देऊन “क्रिएट इन इंडिया” उपक्रमांतर्गत निवड झालेल्या सर्जनशील
कलाकारांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय, ते भारत पॅव्हिलियन, महाराष्ट्र
पॅव्हेलियनला देखील भेट देतील. या स्पर्धेसाठी एक लाखांहून अधिक नोंदणी झाली.
वेव्हज् 2025 परिषदेमध्ये 90 हून अधिक देश, 10,000
प्रतिनिधी, 1,000 कलाकार, 300 हून अधिक कंपन्या आणि 350 हून अधिक स्टार्टअप्स
सहभागी होणार आहेत. शिखर संमेलनात 42 मुख्य सत्रे, 39 विशेष सत्रे आणि 32
मास्टरक्लासेस आयोजित करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये ब्रॉडकास्टिंग,
इन्फोटेन्मेंट, एव्हीजीसी- एक्सआर चित्रपट आणि डिजिटल मीडिया यांसारख्या विविध
क्षेत्रांचा समावेश असेल..
****
पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम
जालना,दि.30 (जिमाका): राज्याच्या
पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा
गोपीनाथ मुंडे या
जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे
आहे.
पालकमंत्री
श्रीमती मुंडे यांचे बुधवार, दि. 30 एप्रिल, 2025 रोजी रात्री 9.30 वाजता शासकीय
विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव. तसेच गुरुवार, दि. 1 मे, 2025 रोजी सकाळी
7.45 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथून वाहनाने पोलीस मुख्यालय, मैदानाकडे
प्रयाण करतील. सकाळी 8.00 वाजता पोलीस मुख्यालय, मैदान येथे आगमन व महाराष्ट्र
राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उपस्थित
राहतील. तसेच सकाळी 8.30 वाजता जालना येथून वाहनाने परळी वैजनाथ, जि. बीडकडे
प्रयाण करतील.
तसेच
पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे शनिवार, दि. 3 मे, 2025 रोजी दूपारी 2 वाजता जालना
येथे आगमन होणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध शासकीय आढावा बैठकीस
उपस्थित राहणार आहेत. सायं. 5.15 वाजता जालना येथून चिकलठाणा विमानतळ छत्रपती
संभाजनगरकडे प्रयाण करतील.
****
महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन
जालना
दि.30(जिमाका): महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत
तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.
श्रीकृष्ण पांचाळ यांनी
त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी
उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मनिषा दांडगे, नायब
तहसिलदार अनिल नव्हाते, सतिश तायडे
व इतर कर्मचारी उपस्थित होते.
****
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाकरिता मिनी ट्रॅक्टरसाठी 2 मे रोजी लॉटरी पध्दतीने स्वयंसहाय्यता बचतगटांची निवड
जालना दि.30(जिमाका)
: अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील
नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची
उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येतात. सन 2024-25 या आर्थिक वर्षातील
सदर योजनेतंर्गत एकुण 25 मिनी ट्रॅक्टर चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहेत.
त्यानुषंगाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहाय्यता बचतगटांकडुन अर्ज
मागविण्यात येणार असून, पात्र बचतगटांपैकी मंजुर उद्दिष्टाच्या अनुषंगाने 25
बचतगटांची निवड करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने बचतगटांची लॉटरी पध्दतीने निवड
करण्यात येणार आहे. बचतगटांची अंतिम पात्र व अपात्र यादी कार्यालयाच्या सुचना फलकावर
डकविण्यात आली आहे.
तरी सर्व
बचतगटांना दिनांक 2 मे 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर,
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतीक सभागृहामध्ये पात्र
बचतगटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांनी लॉटरी पध्दतीने स्वयंसहाय्यता
बचतगटांची निवड करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण
यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.
****
Tuesday, 29 April 2025
मुंबईत होणारी ‘वेव्हज’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांकडून परिषदेच्या तयारीची पाहणी
मुंबई, दि.29: मुंबई बीकेसी येथील
जिओ वर्ल्ड सेंटर येथे 1 ते 4 मे दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट
समिट’चा (वेव्हज) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या समिटच्या तयारीची पाहणी आज
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
वेव्हज
2025 परिषद मुंबईत होतेय हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. जागतिकस्तरावर मनोरंजन
क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ही परिषद ‘दावोस’ ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी
सांगितले.
दुपारी तीनच्या सुमारास
उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिओ वर्ल्ड सेंटरला भेट दिली. यावेळी मुंबई
महापालिका आयुक्त भूषण गगराणी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता,
प्रधान सचिव नविन सोना, उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री.अनबलगन, एमआयडीसीचे
मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसु आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी परिषदेबाबत
सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे यजमानपद
महाराष्ट्र शासनाला मिळाले ही अभिमानाची बाब असून असून मुख्यमंत्री देवेंद्र
फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे असे सांगत उपमुख्यमंत्री श्री.
शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीतून ही परिषद साकार होत
आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री श्री. मोदी १ मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत
उपस्थित राहणार आहेत.
भारत जगात आघाडीवर आहे हे सिद्ध
करण्यासाठी ही परिषद महत्वाची असून मुंबई हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे तसेच मिडिया
आणि मनोरंजनाचे हे केंद्र असल्याने या परिषदेमुळे मनोरंजन क्षेत्राला तांत्रिकदृष्ट्या
नवी ओळख मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या परिषदेमुळे
आंतरराष्ट्रीय स्टुडिओज, प्रोडक्शन हाऊसेस, टेक कंपन्यांची भागीदारीची याची दारे
खुली होतील असेही ते म्हणाले.
-*-*-*-*-*-




