Tuesday, 29 April 2025

मुंबईत होणारी ‘वेव्हज’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांकडून परिषदेच्या तयारीची पाहणी

 




 

     मुंबई, दि.29: मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे 1 ते 4 मे दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा (वेव्हज) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या समिटच्या तयारीची पाहणी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

          वेव्हज 2025 परिषद मुंबईत होतेय हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. जागतिकस्तरावर मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ही परिषद ‘दावोस’ ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

दुपारी तीनच्या सुमारास उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिओ वर्ल्ड सेंटरला भेट दिली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री.अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसु आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी परिषदेबाबत सादरीकरण करण्यात आले.

 

या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाला मिळाले ही अभिमानाची बाब असून असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीतू‌न ही परिषद साकार होत आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री श्री. मोदी १ मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत.

 

भारत जगात आघाडीवर आहे हे सिद्ध करण्यासाठी ही परिषद महत्वाची असून मुंबई हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे तसेच मिडिया आणि मनोरंजनाचे हे केंद्र असल्याने या परिषदेमुळे मनोरंजन क्षेत्राला तांत्रिकदृष्ट्या नवी ओळख मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या परिषदेमुळे आंतरराष्ट्रीय स्टुडिओज, प्रोडक्शन हाऊसेस, टेक कंपन्यांची भागीदारीची याची दारे खुली होतील असेही ते म्हणाले.

 

-*-*-*-*-*-

 

10 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

 


 

        जालना, जिमाका, दि.29 : उच्च न्यायालय, मुंबई व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक 10 मे, 2025 रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, जालना येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा या उद्देशाने लोक अदालत बाबतची माहिती व प्रसिध्दी घरा-घरा पर्यंत पोहचावी या उद्देशाने व लोकांनी जास्तीत जास्त प्रकरणे लोक न्यायालयाच्या माध्यमातून निकाली निघावे या हेतुन राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोक अदालतीमध्ये आपली जास्तीत जास्त प्रकरणे ठेवावी यासाठी विधिज्ञ, पक्षकार व शासनाच्या विविध विभागांनी/अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना वर्षा एम. मोहिते व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना प्रणिता पी. भारसाकडे-वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

एम. आर. डी. ए. स्कूलमध्ये कायदेविषयक शिबिर संपन्न

 


        जालना, जिमाका, दि.29 : उच्च न्यायालय मुंबई व मुंबई महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना व एम.आर.डी.ए. स्कुल, जालना यांच्या संयुक्त विद्यमान दिनांक 25 एप्रिल, 2025 रोजी एम.आर.डी.ए. स्कुल, जालना येथे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले.

 

त्याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम. मोहिते, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना प्रणिता पी. भारसाकडे-वाघ, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, जालना तथा प्रमुख न्यादंडाधिकारी जुवेनाईल जस्टीस बोर्ड (जे.जे.बी.), आर.एन. मुजावर, सदस्य बाल न्यायमंडळ, जालना अॅड. अश्विनी एम. धन्नावत, व एम.आर.डी. स्कुलच्या संचालीका ईश्वरी चव्हाण उपस्थित होत्या. त्यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा एम. मोहिते यांनी पोक्सो अॅक्ट विषयी मुलांना मार्गदर्शन केले. सचिव प्रणिता पी. भारसाकडे-वाघ, यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कार्यालयाची माहिती व या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या विषयी मुलांना मार्गदर्शन केले. आर.एन. मुजावर यांनी जुवेनाईल अॅक्ट प्रमाणे बालकांचे हक्क, या विषयी मुलांना मार्गदर्शन केले. तसेच अॅड. अश्विनी एम. धन्नावत यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळ, बाल विवाह या विषयी मुलांना मार्गदर्शन केले.

 

प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश

 


 

जालना, जिमाका, दि.29 : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, व लातूर या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुला / मुलींना इयत्ता 1 ली मध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

 

या योजनेचा लाभ घेवू इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. अर्जासोबत अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत असावी. विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर त्यासंबंधीत छायांकित प्रत व दारिद्रय रेषा अनुक्रमांक नमुद करावा. पालकाची उत्पन्न मर्यादा ही 1 लाख एवढी असुन यासाठी सक्षम अधिका-याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र देण्यात यावे. अर्जासोबत पालकांनी संमती पत्रक देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईजचे फोटो, जन्म तारखेचा पुरावा व वैद्यकिय अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे. या योजनेत आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील पाल्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल विद्यार्थ्यांचे पालक शासकीय / निमशासकीय नोकरदार नसावेत प्रकल्प कार्यालयात प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध असुन दिनांक 23 मे, 2025 पर्यंत परिपुर्ण प्रवेश अर्ज जमा करणे आवश्यक आहे.

 

तरी या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यावर होणारा संपुर्ण खर्च आदिवासी विकास विभाग करणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, रिलायंन्स मॉलच्या पाठीमागे, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्यास शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश घेण्याबाबतचे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

आपदा मित्र’ प्रशिक्षणासाठी नोंद करण्याचे आवाहन

 

‘

 

जालना, जिमाका, दि.29 : राज्यातील 20 जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या Up scaling apda Mitra या योजनेचे यश विचारात घेऊन  उर्वरित 16 जिल्ह्यात  ‘आपदा मित्र’प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजीचे शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जालना जिल्ह्यामधून एकूण 300 आपदा मित्रांना (स्वयंसेवक) आपत्ती व्यवस्थापन विषयाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपदा मित्रांत नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी NCC/NSS विद्यार्थी, NGO, आशा, पोलिस पाटील, कोतवाल, अंगणवाडी सेविका, होमगार्ड, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, खाजगी सुरक्षा रक्षक, शासकीय/निम शासकीय कर्मचारी यांचा समावेश करण्यात येणार आहे.

सहभागी होणा-या प्रशिक्षणार्थीना 12 दिवसाचे निवासी प्रशिक्षण, वैयक्तिक आपत्कालीन प्रतिसादकर्ता संच (ERK), 3 वर्षाकरिता 5 लाखाचे विमा संरक्षण राज्य शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरील कीट आपदा मित्र प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात येईल.

 

 

 

आपदा मित्र निवड निकष

      सदर व्यक्ती हि भारताची नागरिक असावी व संबंधित जिल्ह्यातील रहिवासी असावी. सदर व्यक्ती हि शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावी. वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष (माजी सैनिक, डॉक्टर, स्थापत्य अभियंता, शास्त्रज्ञ, आपत्कालीन सेवेतून सेवानिवृत अधिकारी व कर्मचारी यांना आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी करून घेता येईल त्याकरिता वयोमर्यादा 55 वर्षे असेल मात्र त्यांना विमा सुरक्षा देता येणार नाही.) आपदा मित्र प्रशिक्षणामध्ये किमान 35% महिलांचा सहभाग असणे आवश्यक आहे.

      जालना जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपत्ती व्यवस्थापनामध्ये "आपदा मित्र (आपत्कालीन परिस्थितीत मदत करणारा स्वयंसेवक) म्हणून स्वेच्छेने प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीने आपत्ती शाखा क्रिस्ताविकारी कार्यालय जालना अथवा आपल्या नजीकच्या तहसील कार्यालय येथे नाव नोंदणी करावी.

-*-*-*-*-*-

हज यात्रेकरुंचे लसीकरण व आरोग्य तपासणी

 


 

जालना, जिमाका, दि.29 : हज यात्रा 2025 साठी जाणाऱ्या हज यात्रेकरुंचे लसीकरण व आरोग्य तपासणी दि. 5 मे, 2025 रोजी सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत बी.एस्सी. नर्सिंग विद्यालय जिल्हा रुग्णालय परिसरात करण्यात येणार आहे. तरी  हज यात्रेसाठी जाणाऱ्या हज यात्रेकरुंनी लसीकरण व आरोग्य तपासणी करीता येतांना त्यांचे आधार कार्ड व पासपोर्टची छायांकित प्रत व यात्रेकरुना काही आजार असल्यास त्याची औषधोपचाराची संपुर्ण कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

 

वेव्हज 2025’ : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

 


 

मुंबई, दि. 29 : देशातील माध्यम व मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणाऱ्या ‘वेव्हज 2025’ या जागतिक परिषदेस मुंबईत भव्य सुरुवात होत आहे. 1 मे रोजी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई येथे या ऐतिहासिक परिषदेचे उद्घाटन होणार आहे. 1 ते 4 मे दरम्यान होणारी ही परिषद भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून, माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

 

मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे २०२५ या कालावधीत ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाही या परिषदेत सहभाग असणार आहे.

 

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. विशेषतः मुंबईला हिंदी चित्रपटसृष्टीचे माहेरघर म्हटले जाते. मनोरंजनाच्या क्षेत्रात मुंबई देशात अग्रगण्य शहर आहे. गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीतही आघाडीवर आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात देखील महाराष्ट्र आणि मुंबई आघाडीवर राहिलेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने देखील महाराष्ट्र या देशाच्या पातळीवर अन्य देशांशी स्पर्धा करतो आहे. म्हणून पर्यटनाची सगळी स्थळे जागतिक पातळीवर जावी, हा देखील या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा उद्देश आहे. या कार्यक्रमात ३३ देशांतील मंत्री व मंत्रीस्तरीय अधिकारी, तसेच १२० आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूड, टॉलीवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार व निर्मातेही कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

 

या चार दिवसीय सोहळ्यात भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन, तेलंगणा पॅव्हेलियन तसेच अन्य  संस्थांचेही पॅव्हेलियन उभारण्यात येणार आहेत. त्यांचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 1 मे 2025 रोजी करणार आहेत. विविध क्षेत्रांतील परिसंवाद, राउंड टेबल कॉन्फरन्स, आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल. विशेषतः तिसऱ्या दिवशी म्हणजे ३ मे २०२५ रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ए. आर. रहमान यांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र – ‘ग्लोबल क्रिएटर इकॉनॉमी’कडे वाटचाल

बॉलीवूड, टीव्ही आणि ओटीटी इंडस्ट्री यांचे केंद्रस्थान असलेली मुंबई भारताच्या मनोरंजन क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आता याच मुंबईला आणि महाराष्ट्राला जागतिक स्तरावर 'क्रिएटर हब' म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न ‘वेव्हज 2025’ च्या माध्यमातून होतो आहे. ऑस्कर, कान्स आणि दावोससारख्या जागतिक परिषदेच्या धर्तीवर प्रथमच भारतात अशी परिषद आयोजित होत असून, जगभरातील 100 पेक्षा अधिक देशांतील प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.

 

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला दिशा देणारा मंच

‘वेव्हज 2025’ ही परिषद केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक माध्यम व मनोरंजन (M&E)  उद्योगाला एकत्र आणणारा, नवसृजनास चालना देणारा आणि गुंतवणुकीसाठी दरवाजे उघडणारा एक महत्त्वाचा मंच आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, तंत्रज्ञानातील कौशल्य आणि प्रतिभेचा संगम या परिषदेच्या केंद्रस्थानी असणार आहे.

परिषदेतील एक विशेष आकर्षण 'WAVES बाजार’

 ‘WAVES बाजार’ – एक इंटरॅक्टिव्ह व्यावसायिक व्यासपीठ असून जिथे खरेदीदार आणि विक्रेते थेट संवाद साधू शकतात. नव्या प्रकल्पांची ओळख, सर्जनशील कल्पना, आणि गुंतवणुकीच्या संधी येथे उपलब्ध होतील. विशेषतः, श्रेणीआधारित शोध प्रणाली आणि सुरक्षित मेसेजिंग सुविधांमुळे व्यवहार अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह ठरतील.

परिषदेत काय असणार?

·         परिषद सत्रे – जागतिक उद्योग नेते, विचारवंत आणि नवोन्मेषक विविध विषयांवर मार्गदर्शन करतील.

·         मीडिया मार्केटप्लेस – भारताच्या माध्यम व मनोरंजन (M&E) क्षेत्रातील वैविध्य, क्षमता आणि नवकल्पनांचे आकर्षक प्रदर्शन.

·         तंत्रज्ञान प्रदर्शन – नवीन तंत्रज्ञान आणि सर्जनशील प्रकल्पांचे लाईव्ह डेमो.

·         सांस्कृतिक कार्यक्रम – भारताच्या समृद्ध कलासंपदेची झलक दाखवणारे बहारदार कार्यक्रम.

जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025’ भारताला जागतिक पातळीवर ‘कंटेंट सुपरपॉवर’ म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी एक सुवर्ण संधी ठरणार आहे. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनानुसार भारताने क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये आघाडी घेत असून नेहमीप्रमाणे मुंबईने क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे नेतृत्व करायला तयार आहे. ‘वेव्हज 2025’ ही केवळ एक शिखर परिषद नाही, तर भारताच्या सर्जनशील शक्तीला, जागतिक गुंतवणुकीला आणि धोरणात्मक बदलांना चालना देणारा परिवर्तनशील क्षण आहे. भारताने याचा उपयोग करून जागतिक कंटेंट क्षेत्रावर आपला ठसा उमटवावा, अशी सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांची अपेक्षा आहे.

‘वेव्हज 2025’ : का आहे ही परिषद खास?

भारतामध्ये माध्यम आणि मनोरंजन (Media & Entertainment - M&E) उद्योग हा वेगाने प्रगत होत असलेला आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. OTT, अ‍ॅनिमेशन, गेमिंग, VFX, चित्रपट, संगीत, आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात भारताने गेल्या दशकात विक्रमी प्रगती केली आहे. FICCI-EY रिपोर्टनुसार, 2024 मध्ये भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योगाची किंमत $28 अब्जच्या पुढे गेली असून, 2025 पर्यंत तो $34 अब्ज गाठेल असा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर ‘वेव्हज 2025’ ही परिषद केवळ चर्चासत्रांचे व्यासपीठ नसून, भारतातील सृजनशील उद्योगक्षेत्राला जगभरातील गुंतवणूक, सहकार्य, आणि नवकल्पनांशी जोडणारा सेतू ठरणार आहे.

 

भारत – सृजनशील महासत्ता होण्याच्या वाटेवर

भारतात सध्या दरवर्षी 2,000 पेक्षा अधिक चित्रपट तयार होतात, ज्यात 20 पेक्षा अधिक प्रादेशिक भाषा समाविष्ट असतात. OTT प्लॅटफॉर्मवर भारतीय कंटेंटची मागणी केवळ देशातच नव्हे तर अमेरिका, युरोप, मिडल ईस्ट आणि दक्षिण आशियाई देशांमध्येही वाढत आहे. या मागणीचा फायदा घेत, भारताने ‘कंटेंट एक्स्पोर्ट हब’ होण्यासाठी पावले उचलणे ही काळाची गरज बनली आहे. WAVES 2025 या दिशेने एक निर्णायक टप्पा ठरेल. ही परिषद केवळ संवादाचा नव्हे, तर कृतीशील धोरणनिर्मितीचा केंद्रबिंदू ठरेल, जिथून भारताची माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील भविष्यातील दिशा ठरवली जाईल.

 

ऑस्कर, कान्स, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोसच्या धर्तीवर वेव्हज् चेही दरवर्षी आयोजन

‘वेव्हज्’ ही परिषद केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने होत आहे. वेव्हजला कायमस्वरूपी एक सचिवालय स्वरूपात पुढे नेण्यात येणार आहे. या परिषदेस एक कायमस्वरूप देऊन दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर, कान्स किंवा दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयोजन केले जाते, अगदी त्याचप्रमाणे वेव्हज याचेही दरवर्षी आयोजन केले जाणार आहे. यासाठी एक समर्पित टीम वर्षभर काम करणार आहे.

 

वेव्हज परिषदेस 100 पेक्षा जास्त देश होणार सहभागी

सध्या तंत्रज्ञानाचे युग असून ते बदलणारे आहे. या नवीन बदलत्या तंत्रज्ञानाचे नेतृत्व महाराष्ट्राने करावे, यावर जोर देण्यात येत आहे. दृकश्राव्य तसेच मनोरंजन क्षेत्रात क्रियेटिव्ह इॅकॉनॉमीला एक प्लॅटफॉर्म देण्यात येणार आहे. मुंबई येथे होणाऱ्या या वेव्हज परिषदेस 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम यापूर्वी झालेल्या जी 20 पेक्षा खूप मोठा असणार आहे.

वेव्हज समिटची वैशिष्ट्ये आणि महत्त्वाचे घटक:

• 'क्रिएट इन इंडिया' वर भर: मेक इन इंडिया' पाठोपाठ आता 'क्रिएट इन इंडिया' ही नवी संकल्पना  WAVES समिटद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे नेली जाईल.

• सर्जनशील प्रतिभेला व्यासपीठ: भारतातील प्रादेशिक भाषांतील कंटेंट, अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रातील नवोदित निर्माते आणि कलाकारांना जागतिक प्लॅटफॉर्मवर आपली कला सादर करण्याची संधी.

• ग्लोबल सहयोग आणि भागीदारी: Netflix, Amazon, Disney+, Sony Pictures यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत भागीदारीसाठी मार्ग मोकळे होतील.

• तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा संगम: एआय, वर्च्युअल प्रोडक्शन, आणि इंटरॅक्टिव कंटेंटसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर सखोल चर्चा.

• धोरणात्मक चर्चासत्रे: धोरणकर्ते, गुंतवणूकदार, कलाकार, तंत्रज्ञ आणि उद्योगपती यांच्यात थेट संवादाची संधी.

• क्रिएट इन इंडिया चॅलेंज - जगभरातील नवोदित निर्मात्यांच्या प्रतिभेचा अविष्कार साजरा करणारा एक अभूतपूर्व उपक्रम, अर्थात मुंबईत होणाऱ्या वेव्हज 2025 मध्ये आपल्या प्रतिभेची झलक दाखवण्यासाठी  ‘वेव्हज’ हे एक आघाडीचे व्यासपीठ म्हणून सज्ज आहे.

• वेव्हेक्स 2025 - हा उपक्रम एक मैलाचा दगड ठरणार असून यामाध्यमातून मीडिया-टेक स्टार्टअप्स त्यांच्या नवकल्पना आघाडीच्या उद्योग धुरिणांसमोर आणि सेलिब्रिटी एंजल गुंतवणूकदारांसमोर सादर करतील, ज्यामुळे  भारताच्या माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेच्या भविष्याला नवीन दिशा मिळेल.

• वेव्हज बाजार: चित्रपट, गेमिंग, संगीत, जाहिरात आणि एक्सआर, निर्माते, गुंतवणूकदार आणि इतर व्यवसायांना जोडणारी एक अद्वितीय जागतिक बाजारपेठ. यातूनच उद्योग व्यावसायिकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्याच्या संधी देखील देते.

• मास्टरक्लासेस आणि परस्परसंवादी सत्रे - उद्योगातील दिग्गज आणि जागतिक नेत्यांकडून शिकण्याची, माध्यम, मनोरंजन आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल अंतर्दृष्टी मिळविण्याची एक दुर्मिळ संधी.

00000