Friday, 3 January 2025

 

चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन

जालना, दि.03 (जिमाका):-  महिला व बाल विकास विभागामार्फत बालगृहातील बालकांसाठी दरवर्षी तीन दिवसीय चाचा नेहरु बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयामार्फत दि.6 ते 8 जानेवारी 2025 या कालावधीत चाचा नेहरु बाल महोत्सवाचे जालना येथील जिल्हा पोलीस मैदानावर आयोजन करण्यात आले आहे. या  बाल महोत्सवाचे उद्घाटन दि.6 जानेवारी 2025 रोजी जिल्हाधिकारी     डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते होणार आहे. या बाल महोत्सवात विविध क्रीडा स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, सांस्कृतिक स्पर्धा तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

महाराष्ट्र शासनाच्या स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारासाठी अर्ज करावेत

 


जालना, दि.03 (जिमाका) :-  सन 2024 वर्षातील मराठी भाषेतील उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी राज्य शासनाच्यावतीने  स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय  पुरस्कार  देण्यात येणार आहे.  1 जानेवारी 2024  ते 31 डिसेंबर, 2024 या कालावधीत प्रकाशित झालेले प्रथम आवृत्ती पुस्तके स्पर्धेसाठी पात्र आहेत. तरी जिल्ह्यातील लेखकांनी आपल्या साहित्यासह पुरस्काराच्या प्रवेशिका जालना जिल्हाधिकारी कार्यालयात  शुक्रवार दि. 31 जानेवारी, 2025 पर्यंत सादर कराव्यात, असे आवाहन तहसीलदार (सर्वसाधारण), जिल्हाधिकारी कार्यालय, जालना यांनी  प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

या स्पर्धेची नियमावली व प्रवेशिका महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला, सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025 यांच्या कार्यालयात तसेच मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळता अन्यत्र संबंधित जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयात (सर्वसाधारण शाखा अथवा करमणूक शाखा) विनामूल्य उपलब्ध आहेत.  महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर 'नवीन संदेश' या सदरात 'स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 नियमावली व प्रवेशिका' या शीर्षाखाली व 'What's new' या सदरात 'Late Yashwantrao Chavan State Literature Award 2024 Rules Book and Application Form' या शीर्षाखाली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या  http://sahitya.marathi.gov.in या संकेतस्थळावर प्रवेशिका व नियमपुस्तिका उपलब्ध होतील. प्रवेशिका पूर्णतः भरुन आवश्यक साहित्यासह सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या कार्यालयात दि. 1 ते 31 जानेवारी 2025 या विहित कालावधीत पोहचतील अशा पाठवाव्यात.

लेखक / प्रकाशक या स्पर्धेसाठी प्रवेशिका दाखल करु शकतात. मुंबई शहर व मुंबई उपनगर या दोन जिल्ह्यातील लेखक / प्रकाशकांनी पुस्तकांच्या दोन प्रतींसह विहित नमुन्यातील प्रवेशिका सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, रवींद्र सयानी मार्ग, प्रभादेवी, मुंबई 400 025 येथे पाठवाव्यात. मुंबई शहर व मुंबई उपनगर हे दोन जिल्हे वगळून अन्य ठिकाणच्या लेखक / प्रकाशकांनी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये हे साहित्य दि. 31 जानेवारी 2025 पर्यंत पाठवावे.

लेखक / प्रकाशकांनी मंडळाकडे प्रवेशिका व पुस्तके पाठविताना सदर बंद लिफाफ्यावर / पाकीटावर 'स्व.यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कार 2024 साठी प्रवेशिका' असा स्पष्ट उल्लेख करावा. प्रवेशिका व पुस्तके स्विकारण्याचा अंतिम दि. 31 जानेवारी, 2025 हा राहील. विहित कालमर्यादेनंतर येणाऱ्या प्रवेशिका स्पर्धेसाठी स्विकारल्या जाणार नाहीत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

मराठी पत्रकारितेचे जनक : आचार्य बाळशास्त्री जांभेकर

 


 

‘दर्पण’ या वृत्तपत्राद्वारे मराठी भाषेतील पत्रकारितेची मुहूर्तमेढ रोवणारे; इंग्रजी राजवटीच्या सुरुवातीच्या काळातील एक उच्चविद्याविभूषित, पंडिती व्यक्तिमत्त्व म्हणजे आचार्य बाळशास्त्री जांभेकर होत. 19 व्या शतकाच्या प्रारंभीच्या काळात मराठी समाजमन घडविण्यात आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा फार मोठा वाटा होता. कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले या गावी जन्मलेल्या बाळशास्त्रींनी अनेक विषयांचे अभ्यासक-संशोधक, अध्यापक, उत्कृष्ट लेखक, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार म्हणून आपल्या कार्याचा ठसा 1832 ते 1846 या काळात उमटवला.

भारतात ब्रिटिशांनी येताच कलकत्यामध्ये पहिलं वृत्तपत्र 'बेंगाल गॅझेट' नावानं इंग्रजी साप्ताहिक 29 जानेवारी, 1780 रोजी सुरु केले. ब्रिटिश सरकारने आपल्या स्वार्थासाठी ठिकठिकाणी मुद्रणालयं सुरु केली. समाज प्रबोधन करण्यासाठी हे महत्वाचं साधन आहे. त्याकरीता समाजाचे विचार परिवर्तन न होणारे वृत्तपत्र निघू नये अशी त्यांची धारणा होती. परंतू कालांतराने आपले विचार प्रकट करण्यासाठी वृत्तपत्र हे प्रभावी माध्यम असल्याची भारतीयांना जाणीव झाली. यानंतर अनेक भारतीय भाषांतील वृत्तपत्र निघू लागली. बंगालीनंतर मराठी असा भाषिक वृत्तपत्रांचा क्रम लागतो.

            ब्रिटीशांनी भारतात आपलं बस्तान सार्वजनिक केल्यानंतर पाश्चिमात्य संस्कृती मूल्यांचा भारतातील पारंपरिक जुन्या मूल्यांशी संषर्घ निर्माण झाला. तथापि, पाश्चात्य संस्कृतीच्या परिचयामुळं भारतीय पंडितांना समाजातल्या घडामोडींची भौतिक दृष्टीनं कारणमीमांसा करण्यास प्रोत्साहनही मिळालं. समाजातील वर्णव्यवस्था, जातीभेद, स्त्री दास्य, सती प्रथा, अस्पृश्यता, बालविवाह आदी जुन्या मूल्यांचा पुनर्विचार करण्यास पंडितांना भाग पाडलं  यातूनच एकसंध समाज निर्माण करण्यासाठी समाजातील भेदाभेद गेले पाहिजेत. याची त्यांना जाणीव झाली. हळूहळू समाज प्रबोधनांची प्रक्रिया सुरु झाली. यातच वृत्तपत्रांच आगमन ही घटना क्रांतीकारक ठरली. ब्रिटीश सरकारच्या अधिपत्याखाली असलेल्या कलकत्ता, मद्रास (चेन्नई), मुंबई येथे इंग्रजी वृत्तपत्रांची सुरुवात झाली. परंतू जनतेच्या अस्तित्वाला या वृत्तपत्रात विशेष स्थान देण्यात येत नसे. या वृत्तपत्रांवर सरकारचे विशेष लक्ष होतं. जहाजांची ये-जा, जाणाऱ्या - येणाऱ्या प्रमुख व्यक्तींची नावं, सरकारी जाहिराती आदी मजकूर वृत्तपत्रांत प्रसिध्द करण्यात येत असे. यामुळे भारतीय सुशिक्षित वर्गात वृत्तपत्र ही कल्पना रुजू लागली आणि तर इंग्रजी भाषेत वृत्तपत्रं निघतात तर भारतीय भाषांतही अशी वृत्तपत्रं का निघू नयेत असा प्रश्न निर्माण झाला. आणि कलकत्त्ता येथे पहिलं इंग्रजी वृत्तपत्र निघाल्यामुळं या शहरात पहिल्या भाषिक वृत्तपत्राचाही प्रारंभ झाला. भारतीय समाजानं नवीन वैचारिक जागृती आणि नवी जाणीव निर्माण होण्यास या वृत्तपत्रामुळे मदत झाली.

            ब्रिटिश अधिकारी जेम्स ऑगस्ट हिकीच्या इंग्रजी 'बेंगॉल गॅझेट' च्या आगमनानंतर तब्बल अर्ध्या दशकानंतर म्हणजेच 52 वर्षांनी 6 जानेवारी, 1832 रोजी बाळशास्त्री जांभेकर या विद्वानानं ' दर्पण ' च्या रुपानं पहिलं मराठी वृत्तपत्रं सुरु केलं. मुंबईत बाळशास्त्री जांभेकरांनी ' दर्पण ' च्या माध्यमातून सुरु केलेली वैचारिक प्रबोधनाची पेरणी मराठी भूमित रुजण्यास सुरुवात झाली.

एक उतुंग व्यक्तिमत्व असलेल्या बाळशास्त्री जांभेकरांना आपण ‘दर्पण’कार जांभेकर म्हणूनच ओळखतो. ब्रिटिश कालखंडात त्यांनी दर्पणच्या संपादनाची धुरा समर्थपणे वाहिली. भविष्यकाळातील या माध्यमाची जबरदस्त ताकद त्यांनी तेव्हाच ओळखली होती. परकी सत्तेला उलथून टाकायचे असेल, तर समाजजागृती घडवायला हवी आणि त्यासाठी लेखणीला पर्याय नाही हे त्यांना फार पूर्वीच समजले होते. बाळशास्त्री कडवे देशाभिमानी होते. त्यांच्या या देशसेवा आणि समाजसेवेच्या जाणिवेतूनच दर्पणसारख्या नियतकालिकाचा जन्म झाला आणि मराठी वृत्तपत्रविश्वात नवी पहाट उगवली. दर्पणचा जन्म होताना गोविंद कुंटे व भाऊ महाजन यांचेही सहकार्य बाळशास्त्रींना लाभले. त्या वेळी बाळशास्त्रींचे वय अवघे वीस वर्षांचे होते. एका वृत्तपत्राच्या संपादकाला आवश्यक असणारी भाषेची जाण आणि सामाजिकतेचे भान त्यांच्याकडे होते.

‘दर्पण’ चा पहिला अंक 6 जानेवारी, 1832 रोजी प्रकाशित झाला. इंग्रजी आणि मराठी अशा जोड भाषेत प्रकाशित होणारे हे वृत्तपत्र ! या अंकात दोन स्तंभ असत. उभ्या मजकुरात एक स्तंभ (कॉलम) मराठीत आणि एक स्तंभ इंग्रजीत असे. मराठी मजकूर अर्थातच सर्वसामान्य जनतेसाठी होता आणि इंग्रजी मजकूर वृत्तपत्रात काय लिहिले आहे, हे राज्यकर्त्यांनाही कळावे यासाठी इंग्रजी मजकूर होता. वृत्तपत्राची संकल्पना त्या काळी लोकांना नवीन होती. त्यामुळे दर्पणचे वर्गणीदार सुरुवातीच्या काळात खूप कमी होते. पण हळूहळू लोकांमध्ये ही संकल्पना जशी रुजली, तसे त्यातील विचारही रुजले आणि प्रतिसाद वाढत गेला. दर्पणवर प्रथमपासूनच बाळशास्त्री जांभेकरांच्या विचारांचा आणि व्यक्तिमत्त्वाचा ठसा होता. दर्पण अशा रितीने  साडे आठ वर्षे चालले आणि जुलै, 1840 ला त्याचा शेवटचा अंक प्रकाशित झाला.

आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे महाराष्ट्रातील पहिल्या पिढीतील समाजसुधारक होते. ‘दर्पण’ हे बाळशास्त्रींच्या हातातील एक लोक शिक्षणाचे माध्यम होते. त्यांनी त्याचा उत्तम वापर प्रबोधनासाठी करून घेतला. यात विशेष उल्लेख त्यांनी हाताळलेल्या विधवांच्या पुनर्विवाहाच्या प्रश्नांचा व वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या प्रसाराचा करावा लागेल. बाळशास्त्रींनी या विषयांवर विपुल लिखाण केले. त्यामुळे त्यावर विचारमंथन होऊन त्याचे रूपांतर पुढे विधवा पुनर्विवाहाच्या चळवळीत झाले. ज्ञान, बौद्धिक विकास आणि विद्याभ्यास या गोष्टी त्यांना महत्त्वाच्या वाटत. उपयोजीत ज्ञानाचा प्रसार समाजात व्हावा, ही त्यांची तळमळ होती. देशाची प्रगती, आधुनिक विचार आणि संस्कृतीचा विकास यासाठी वैज्ञानिक ज्ञानाची गरज आहे, तसेच सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याच्या विवेकनिष्ठ भूमिकेसाठी शास्त्रीय ज्ञानाच्या प्रसाराची आवश्यकता आहे, याची जाणीव त्यांना झाली होती. विज्ञाननिष्ठ मानव उभा करणे हे त्यांचे स्वप्न होते. थोडक्यात, आजच्यासारखा ज्ञानाधिष्ठित समाज त्यांना दोनशे वर्षांपूर्वीच अपेक्षित होता. त्या अर्थाने ते द्रष्टे समाजसुधारक होते. सार्वजनिक ग्रंथालयांचे महत्त्व ओळखून त्यांनी ‘बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली. विविध समस्यांवर सकस चर्चा घडवण्यासाठी ‘नेटिव्ह इंप्रुव्हमेंट सोसायटी’ची स्थापना केली. यातूनच पुढे ‘स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी’ या संस्थेला प्रेरणा मिळाली व दादाभाई नौरोजी, भाऊ दाजी लाड यांसारखे दिग्गज कार्यरत झाले. सन 1840 मध्येच त्यांनी ‘दिग्दर्शन’ या मराठीतील पहिल्या मासिकाची सुरुवात केली. या मासिकाचे संपादक म्हणून त्यांनी ५ वर्षे काम पाहिले. या मासिकातून त्यांनी भूगोल, इतिहास, रसायन शास्त्र,पदार्थ विज्ञान, निसर्ग विज्ञान आदी विषय नकाशे व आकृत्यांच्या साहाय्याने प्रसिद्ध केले. या अभिनव माध्यमातून त्यांनी लोकांची आकलनक्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला.  त्यांच्या विद्वत्तेला जोड होती ती त्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाची. संस्कृत, मराठी, इंग्रजी आणि हिंदी या त्या काळच्या प्रचलित भाषांवर त्यांचे प्रभुत्व होतेच, याशिवाय ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, बंगाली आणि गुजराती भाषाही त्यांना उत्तम अवगत होत्या. या भाषांसह विज्ञान, गणित, भूगोल, शरीरशास्त्र व सामान्य ज्ञान या विषयांवरही त्यांचे विलक्षण प्रभुत्व होते. आज मराठीतील वृत्तपत्रांचे जनक असा जसा त्यांचा नावलौकिक आहे, तसाच एल्फिन्स्टन कॉलेजमधील नावाजलेले, हिंदीचे पहिले प्राध्यापक असाही त्यांचा लौकिक आहे. त्याचबरोबर रॉयल एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध प्रसिद्ध झालेले पहिले भारतीय असाही मान त्यांच्याकडे जातो. सन 1845 मध्ये त्यांनी केलेले ज्ञानेश्वरीचे मुद्रण हे या ग्रंथाचे पहिले मुद्रण मानले जाते. बाळशास्त्रींनी कुलाबा वेधशाळेचे संचालक म्हणूनही काम पाहिले. तसेच त्यांनी नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप, हिंदुस्थानचा इतिहास, शून्यलब्धी गणित आदी ग्रंथांची निर्मिती केली.

साधारणपणे सन 1830 ते 1846 या काळात बाळशास्त्रींनी आपले योगदान महाराष्ट्राला (व भारताला) दिले. या काळात बहुसंख्येने समाज निरक्षर, अंधश्रद्ध व अज्ञानी होता. म्हणूनच अवघ्या 33 वर्षांच्या आयुष्यात, विविध क्षेत्रांत त्यांनी केलेले प्रचंड कार्य मूलभूत, मौल्यवान व अद्‌भूत  ठरते. 6 जानेवारी रोजी ‘दर्पण’चा पहिला अंक प्रसिद्ध झाला. हाच योगायोगाने बाळशास्त्रींचाही जन्मदिवस. त्यांच्या स्मृत्यर्थ हाच दिवस ‘पत्रकार दिन’ म्हणून आज महाराष्ट्रात साजरा केला जातो.

 

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी त्यांनी आपल्या पत्रकारितेचा वापर केलाय त्याच बरोबर जातीभेद निर्मुलन आणि विधवा पुनर्विवाह यालाही त्यांनी प्राधान्य दिलं. त्यामुळेच त्यांचा उल्लेख "आद्य समाजसुधारक" असा केला जातो. परंतु कोकणातील राजापूर तालुक्यातील पोंभूर्ले येथे 1812 च्या उतरार्धात जन्म झालेल्या बाळशास्त्री यांच वयाच्या अवघ्या 33 वर्षी सन 1846 मध्ये निधन झालं.

 

-         जिल्हा माहिती कार्यालय, जालना

 

 

****

 टिप : कृपया सदर लेख दि. 6 जानेवारी रोजीच्या अंकात प्रसिध्द करावा, ही विनंती.

 

 

अमृत बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे बेरोजगारांना उद्योग उभारण्याची संधी

 


 

जालना,दि.02 (जिमाका) :- पुणे येथील महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत)  व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने खुल्या प्रवर्गातील "अमृत" संस्थेच्या लक्षीत गटातील उमेदवारांसाठी मोफत अमृत बेकरी प्रशिक्षणावर आधारीत निवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे.  सुशिक्षित बेरोजगार युवकांना तांत्रिक व उद्योजकीय प्रशिक्षण छत्रपती संभाजी नगर येथे दि. 24 जानेवारी ते  8 फेब्रुवारी 2025 या अठरा दिवसाच्या कालावधीमध्ये देण्यात येणार आहे. इच्छुकांनी आपला प्रवेश अर्ज एमसीईडी जिल्हा कार्यालय, जालना येथे दि. 14 जानेवारी 2025 पर्यंत सादर करावा,  अशी प्रकल्प अधिकारी, एमसीईडी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

  बेकरी उत्पादन व्याप्ती आणि महत्त्व, बेकरीमध्ये विविध व्यवसाय संधी बेकरी उत्पादनाच्या उत्पादनासाठी विविध तंत्रे विविध बेकरी उत्पादने  तयार करण्यासाठी विशेष उपकरणे आणि साधने आवश्यक आहेत, केकचे प्रकार, सिद्धांत आणि व्याहारिक, टी-टाईम केकचे विविध प्रकार सिद्धांत आणि व्यवहारिक एक्सप्लोर, कुकीजचे प्रकार सिद्धांत आणि व्यवहारिक, पफ पेस्ट्रीजचे प्रकार सिद्धांत आणि व्याहारिक, ब्रेंड, टोस्ट, पाव, पिझ्झा, बर्गर, बन इत्यादी तयार करणे सिद्धांत आणि व्यवहारिक, चॉकलेटचे सिद्धांत आणि व्याहारिक, प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगार व उद्योग करण्याची संधी या प्रशिक्षणाद्वारे उपलब्ध होणार असून प्रशिक्षणामध्ये प्रशिक्षणार्थींची निवड प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. तसेच जालना जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून  एक याप्रमाणे सदरील प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

   सदरील प्रशिक्षण हे खुल्या प्रवर्गातील "अमृत" लक्षित गटातील उमेदवारांसाठी म्हणजे (ब्राह्मण, बनिया, वत्स, कम्मा, कायस्त, नायर, एयांगर, पाटीदार, बंगाली, पटेल, मारवाडी, यलमार, त्यागी, ठाकूर, मारवाडी, सेनगुनथर, सिंधी, राजपुरोहित, नायडू, यलमार,) इत्यादी प्रवर्गातील लाभार्थींना सदरील प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये प्रत्यक्ष मुलाखती द्वारे सहभागी होता येईल. प्रवेशासाठी पात्रता शिक्षण किमान 12 वी पास, पदवीधर व तांत्रिक पदवीधारकास  प्राधान्य असून वयोमर्यादा  21 ते 50 वर्ष आहे. जालना जिल्हातील प्रत्येक तालुक्यातील उमेदवारांना प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे. 

अर्जासोबत पुढील कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. शैक्षणिक गुणवत्तेचे प्रमाणपत्र/गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, तहसीलचे अधिवास प्रमाणपत्र, जातीचा उल्लेख असलेल्या कोणत्याही शासकीय कागदपत्राचा पुरावा, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असल्याचे तहसील उत्पन्न दाखला, विवाहित असल्यास महिलांसाठी गॅझेट किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र किंवा पॅन कार्ड प्रवेश अर्जासोबत छायांकित प्रतिमध्ये जोडणे आवश्यक आहे.  www.mahaamrut.org.in या संकेतस्थळावर आपला अर्ज अपलोड करून, अर्जाची हार्ड कॉपी व अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची छयांकित प्रत जोडून जिल्ह्यातील जिल्हा प्रकल्प अधिकारी या ठिकाणी प्रत्यक्ष अर्ज सादर करणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज जिल्हा कार्यालयामध्ये सादर करण्याची अंतिम दि. 14 जानेवारी असून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थींसाठी दि. 14 जानेवारी 2025 रोजी एमसीईडी जिल्हा कार्यालय येथे निशुल्क एक दिवसीय परिचय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे.  प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी प्रकल्प अधिकारी, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एम.सी.ई.डी), द्वारा मराठा पार्क बिल्डींग विशाल कॉर्नर, छत्रपती संभाजीनगर चौफुली, जालना दुरध्वनी क्र. 02482 220592 या ठिकाणी संपर्क साधावा व आपला प्रवेश अर्ज सादर करावा. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Thursday, 2 January 2025

रस्ता सुरक्षा अभियानातंर्गत आयोजित रॅलीची जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते सुरुवात

 





 

जालना,दि.02 (जिमाका) :- जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी या कालावधीत ‘रस्ता सुरक्षा अभियान’ राबविण्यात येणार आहे. नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती व्हावी यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रॅलीला जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात केली.

यावेळी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन कृष्णा चिंतल यांच्यासह प्रादेशिक परिवहन विभागाचे अधिकारी, मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटार वाहन निरीक्षक आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.

1 ते 31 जानेवारी या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत जिल्ह्यात उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, पोलीस, शिक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सहकार्याने विविध जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यात प्रामुख्याने रस्ता सुरक्षाविषयक बॅनरद्वारे जनजागृती करणे, शाळा, महाविद्यालयात रस्ता सुरक्षाविषयक व्याख्यान आयोजित करणे, रस्त्यावरील बैलगाडी, ट्रॅक्टर आणि ट्रॉली वाहनांना परावर्तिका (रिफलेक्टर) लावणे, वाहन चालकांची आरोग्य तपासणी करणे, मोटार ड्रायव्हींग स्कूल कार्यशाळा आयोजित करणे तसेच जिल्ह्यातील रस्ते अपघातास कारणीभूत बाबींची तपासणी करणे आदी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहे.

 

****

 

Wednesday, 1 January 2025

युजीसी नेट परीक्षेसाठी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 


 

जालना, दि. 1 (जिमाका) :- युजीसी नेट डिसेंबर 2024 ही परीक्षा दि.3 ते 16 जानेवारी 2025 या कालावधीत इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी, पाथ्रीकर कॅम्पस, बदनापूर या परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी युजीसी नेट परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत.

परीक्षा केंद्र परिसरात अशांतता निर्माण होवून परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये इन्स्टीट्युट ऑफ फार्मसी, बदनापूर या परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी  नोटीस देण्यास पुरेसा कालावधी नसल्याने व परीक्षा सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (2) नुसार आदेश एकतर्फी काढण्यात आला आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

विज्ञान शाखेच्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना आता महाविद्यालयात मिळणार जात वैधता प्रमाणपत्र

 

जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीची विशेष मोहिम


जालना, दि. 1 (जिमाका) :- इयत्ता अकरावी व बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय विद्यार्थ्यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या 100 दिवस उद्दिष्ट पुर्ती कार्यक्रमातंर्गत संबंधित महाविद्यालयातच जात वैधता प्रमाणपत्र मिळणार आहे. तरी जालना जिल्ह्यातील काही महाविद्यालयामध्ये जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून शिबिरे आयोजित करण्यात आले असून त्याच ठिकाणी संबंधित विद्यार्थ्याचा अर्ज स्विकारून जात वैधता प्रमाणपत्र दिले जाणार आहे. अशी माहिती उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या निर्देशानुसार दि. 1 जानेवारी 2025 पासून  पुढे 100 दिवस या कालावधीत 100 दिवस उद्दिष्ट पुर्ती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. जालना जिल्ह्यातील इयत्ता अकरावी व बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागासप्रवर्ग व सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग एसईबीसी (मराठा) या मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांना जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करण्यासाठी जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांच्यावतीने विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. इयत्ता अकरावी व बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, पशुसंवर्धन, वास्तुशास्त्र, फार्मसी, विधी आदी व्यावसायिक अभ्यासक्रमात आरक्षित जागेवर प्रवेश घेण्यासाठी तसेच सदर अभ्यासक्रमाचे शिक्षण शुल्काची प्रतिपुर्ती करण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते.

इयत्ता अकरावी व बारावीमध्ये विज्ञान शाखेतील विद्यार्थी वेळेत त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव समितीकडे दाखल करीत नाहीत, पर्यायाने अशा विद्यार्थ्यांना या सवलतीचा लाभ मिळत नाही. ही अडचण विचारात घेऊन शैक्षणिक वर्ष 2024-25 तसेच 2025-26 मध्ये इयत्ता अकरावी व बारावीमध्ये विज्ञान शाखेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग, सामाजिक आर्थिक मागास प्रवर्ग, एसईबीसी (मराठा) या मागास प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राची पडताळणी करणयात येत आहे. त्याकरिता संबंधित मागासवर्गीय विद्यार्थ्यांनी त्यांचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन करावेत.  या अर्जाची हार्ड कॉपी संबंधित महाविद्यालयात दाखल करावी व संबंधित महावि‌द्यालयांनी असे अर्ज या कालावधीत फेब्रुवारी अखेरपर्यंत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, जालना यांच्याकडे सादर करावेत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-