Wednesday, 25 May 2022
बदनापूर तालुक्यातील पीक परिस्थितीची पालकमंत्र्यांकडून पहाणी संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी नियोजनाच्या कामात शासनास सहकार्य करावे कामामध्ये हयगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार - पालकमंत्री बबनराव लोणीकर
लेख दि. 25 मे 2022 विजेपासून स्वत:चे करा रक्षण
पावसाळयाच्या
दिवसात आकाशातून अंगावर वीज कोसळून अनेकांना प्राण गमवावे लागतात. यामध्ये मनुष्य
प्राण्यासोबतच अनेक मुक्या जनावरांचाही मृत्यू होतो. ही
प्राणहानी टाळण्यासाठी पुरेक्षा प्रमाणात दक्षता घेतल्यास जीव वाचवता येऊ शकतो.
आकाशात विजा चमकत असल्यास कोसळणाऱ्या विजेपासून स्वत: चे रक्षण करण्यासाठी खालील दक्षता
घ्यावी.
हे करा --
• शेतात काम करीत असताना शेताजवळील
घराचा त्वरित आसरा घ्यावा. विद्युत उपकरणे बंद ठेवावीत.
• शेतात काम करीत असाल व सुरक्षित
ठिकाणचा आसरा घेतला नसेल तर शक्यतो जिथे आहात तेथेच रहा.
• शक्य असेल तर पायाखाली लाकूड,
प्लास्टीक, गोणपाट अशा वस्तू अथवा कोरडा पालापाचोळा ठेवा दोन्ही पाय एकत्र करून
गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवा, तथापि डोके जमिनीवर ठेऊ नका.
• ओल्या शेतात अथवा तलावात काम
करणाऱ्या व्यक्तींनी तात्काळ कोरड्या व सुरक्षित ठिकाणी जावे, पोहणारे, मच्छिमारी
करणारे यांनी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.
• झाडाच्या उंचीपेक्षा झाडापासून
दुप्पट अंतरावर उभे रहा. एखादे उंच झाड सुरक्षित ठेवायचे असल्यास उंच वृक्षाच्या
खोड अथवा फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून
ठेवावे, म्हणजे हे झाड सुरक्षित होईल.
• वीजवाहक वस्तूपासून दूर रहा. उदा.
रेडीयटर, स्टोव्ह, मेटल, लोखंडी पाईप, टेलिफोनचे खांब, विजेचे खांब, टेलिफोन टॉवर
यांपासून दूर रहा. मजबूत असलेले पक्के घर हे सर्वात सुरक्षित ठिकाण आहे.
• जंगलात असाल तर कमी उंचीच्या व दाट
झाडांचा आसरा घ्या. वृक्ष, दलदलीच्या ठिकाणे तथा पाण्याचे स्रोत यापासून शक्यतो
दूर रहा. तथापि मोकळ्या आकाशाखाली असण्यापेक्षा लहान झाडाखाली आसरा घेणे चांगले.
मोकळ्या आकाशाखाली राहणे आवश्यकच असेल तर खोलगट ठिकाणी रहा.
हे टाळा –
• विजेच्या खांबाजवळ उभे राहू नका.
• झाडाखाली उभे राहू नका, उंच जागेवर,
झाडावर चढू नका.
• पाण्याचे नळ, फ्रिज, टेलिफोन यांना
स्पर्श करु नका.
• धातूंच्या वस्तूंपासून दूर रहा.
• प्लग जोडलेली विद्युत उपकरणे हाताळू
नका. दूरध्वनीचा वापर करू नका.
• गांव, शेत, आवार, बागबगीचा आणि घर
यांच्या भोवती तारेचे कुंपन घालू नका, कारण ते विजेला सहजतेने आकर्षित करते.
• दोन चाकी वाहन, सायकल, ट्रक,
ट्रॅक्टर, नौका यांवर असाल तर तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जा. अशावेळी वाहनातून
प्रवास करू नका.
• वाहनाच्या बाहेर थांबणे आवश्यक
असल्यास, धातूचे कोणतेही उपकरण हातात बाळगू नका.
• एकाच वेळी जास्त व्यक्तींनी एकत्र
राहू नका. दोन व्यक्तीमधील अंतर किमान 15 फूट असेल असे रहा.
• धातूची दांडी असलेल्या छत्रीचा
उपयोग करू नका.
-- जिल्हा माहिती कार्यालय,
जालना
-*-*-*-*-*-*-*-*-
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेबाबत महाविदयालयांना आवाहन
जालना दि. 25 (जिमाका) :-
शासकिय
वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतू शासकिय वसतिगृहात प्रवेश न
मिळालेल्या किंवा शासकिय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य
सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द
विद्यार्थ्यांपैकी इयत्ता 11 वी,12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच
बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात/शिक्षण
संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना मागासवर्गीय शासकिय वसतिगृहातील
मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा
स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी शासन निर्णय दि. 13 जून 2018 अन्वये भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना कार्यान्वित करण्यात आलेली आहे.
या योजनेंतर्गत सन 2020-21 मधील
विद्यार्थ्यांना संपुर्ण वर्षभराचा लाभ देय ठरतो महाविद्यालयाने सन मधील 2020-21 स्वाधार
योजनेंतर्गत सादर केलेल्या विदयार्थ्याची अर्जांची पात्र यादी व त्रुटी यादी
यापूर्वीच सर्व सबंधीत महाविदयालयांना कळविण्यात आली आहे व सदर याद्या नोटीस बोर्ड
वर लावण्यात आल्या आहे. पात्र विदयार्थ्याची वार्षिक उपस्थिती महाविद्यालयाने देणे
आवश्यक आहे. महाविद्यालयाने उपस्थिती सादर केल्यास त्या विद्यार्थ्यांना त्या
वर्षाचा वार्षिक 12 महिन्यांचा लाभ देता येणार आहे. मा. आयुक्तालयाच्या दि. 31
डिसेंबर 2021 मधील पत्रात नमूद केल्यानुसार विद्यार्थ्याची महाविद्यालयीन उपस्थित
75 टक्के आवश्यक आहे. याबाबत संबंधित संस्थेचे विहीत नमून्यातील उपस्थिती पत्रक
सादर करावे. कोविड-19च्या प्रादूर्भावामुळे सर्व शैक्षणिक संस्था महाविद्यालय बंद
करण्यात आल्या असल्या तरी सन 2020-21 व सन 2021-22 या शैक्षणिक वर्षात
विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू होते. तरी सदर कालावधीतील संबंधित पात्र
यादीतील विद्यार्थ्यांची वार्षिक उपस्थिती व त्रुटी यादीतील विदयार्थ्याची
त्रुटीची पुर्तता महाविद्यालयाने दिनांक 29 मे 2022 पर्यंत सहायक आयुक्त समाज
कल्याण, जालना या कार्यालयास सादर करावीत, असे आवाहन समाज कल्याणचे, सहाय्यक
आयुक्त अमित घवले यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-*-
वीज कोसळण्यापूर्वी माहिती देणार “दामिनी ॲप”
जालना दि. 25 (जिमाका) :-
मान्सून कालावधीत विशेषत: जुन व जुलै
या महिन्यात वीज पडून जीवीत हानी होत असते. वीज पडून जीवीत हानी होऊ नये याकरीता
प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणुन पृथ्वी मंत्रालय, भारत सरकार, नवी दिल्ली यांनी “ दामिनी ” ॲप तयार केले आहे. हे ॲप गुगल प्ले
स्टोअरवर उपलब्ध आहे. गावातील सर्व स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना हे
ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये प्राप्त होणा-या अलर्टनुसार आवश्यक पुर्वसुचना गावातील
सर्व नागरीकांना देऊन होणारी जीवीतहानी टाळावी, अशी सूचना निवासी
उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
प्राधिकरण) केशव नेटके यांनी पत्राव्दारे केली आहे.
सुरक्षात्मक उपयायोजना म्हणुन तालुक्यातील सर्व शासकीय
यंत्रणा शासकीय अधिकारी, कर्मचारी, नागरीक क्षेत्रीय अधिकारी,
मंडळ अधिकारी, अव्वल कारकुन, महसूल सहायक, गांव स्तरावरील सरपंच, पोलिस पाटील
तलाठी, ग्रामसेवक, कृषीसेवक, कोतवाल, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविक,
ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर यांनाही हे ॲप डाऊनलोड करुन त्याचा वापर
करण्यासाठी प्रवृत्त करावे. तसेच या ॲपचे जीपीएस लोकेशनने काम करीत असून वीज
पडण्याच्या 15 मिनिटापूर्वी या ॲपमध्ये स्थिती दर्शविण्यात येते.
आपले ॲपमध्ये आपले सभोवताली वीज पडत असल्यास या ठिकाणापासून सुरक्षीत स्थळी जावे
तसेच यावेळी झाडाचा आश्रय घेऊ नये याबाबतचे निर्देश
नागरिकांना देण्यात यावे. तसेच इतर सामान्य नागरीक यांना हे ॲप डाऊनलोड करण्यास
प्रवृत्त करावे. तसेच दामिनी ॲप प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करणे व वापरणे याबाबत
माहिती द्यावी.
गावातील सर्व
स्थानिक शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना हे ॲप डाऊनलोड करुन त्यामध्ये प्राप्त
होणा-या अलर्टनुसार आवश्यक पुर्वसुचना गावातील सर्व नागरीकांना देऊन होणारी
जीवीतहानी टाळण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, असे पत्रात नमूद करण्यात आले
आहे.
-*-*-*-*-*-*-
पक्या पावतीशिवाय बियाणे व खताची खरेदी करू नका तक्रारीसाठी नियंत्रण कक्षाचा संपर्क क्रमांक 9823915234, टोल फ्री क्र. 18002334000
जालना,
दि. 25 (जिमाका) :- खरीप हंगामास लवकरच प्रारंभ होणार असून शेतकऱ्यांकडून बी-
बियाणे व खते खरेदी करण्यास सुरुवात झाली आहे. बियाणे, खते खरेदी करताना शेतकऱ्यांची फसवणूक
होऊ नये यासाठी शेतकऱ्यांनी परवानाधारक कृषी सेवा केंद्रातून खते, बियाणे व
किटकनाशके खरेदीच्या वेळी रीतसर पक्की पावती घेऊनच खरेदी करावी, असे आवाहन कृषी
विकास अधिकारी भिमराव रणदिवे यांनी केले आहे.
खरीप हंगामात बनावट बियाणे, खते व
औषधाची जादा दराने विक्री करणाऱ्यांवर
कडक कारवाई करण्यासाठी जिल्हास्तरावर कृषि विकास अधिकारी जिल्हा परिषद हे पथक
प्रमुख व तालुकास्तरावर तालुका कृषि अधिकारी हे पथकप्रमुख असून असे एकूण नऊ भरारी
पथकांची स्थापना करण्यात आली आहे. भरारी पथक जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर
अचानक भेटी देऊन कृषी सेवा केंद्राची तपासणी करणार आहेत. तपासणीच्या वेळी दुकानात
बनावट कृषि निविष्ठा किंवा अनियमितता आढळून आल्यास कारवाई करणार आहे. असे श्री.
रणदिवे यांनी सांगितले आहे.
शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि
किटकनाशकेबाबत काही तक्रार असल्यास जिल्हास्तरावरील कृषि विकास अधिकारी यांचे
कार्यालयतील नियंत्रण कक्षात दूरध्वनीद्वारे किंवा लेखी तक्रार करावी,
जिल्हास्तरावरील नियंत्रण
कक्षाचा दूरध्वनी क्रमांक 9823915234 व टोल फ्री क्र. 18002334000 हा
आहे. तसेच प्रत्येक तालुका स्तरावर पंचायत समिती येथे कृषि विभागात नियंत्रण कक्ष
स्थापन करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांनी निविष्ठा खरेदीच्या वेळी काही तक्रार असल्यास किंवा जादा दराने
विक्री कृषी सेवा केंद्रचालकाकडून होत असल्यास त्वरित तालुका कृषी अधिकारी
कार्यालय किंवा पंचायत समितीच्या कृषी विभागात संपर्क करावा. कोणतेही बियाणे खते
किंवा कीटकनाशके जादा दराने विक्री करताना आढळून आल्यास अशा कृषी सेवा केंद्र
चालकावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच पॅकिंगवर नमूद वजनाइतके बियाणे किंवा
खत आहे किंवा नाही हे तपासण्यासाठी भरारी पथकात
वजन मापे निरीक्षकांचा समावेश असून वजनाची पथकाकडून तपासणी करण्यात येणार आहे.
शेतकऱ्यांनी बियाणे खते किंवा
कीटकनाशक खरेदी करताना कृषी सेवा केंद्राचा नोंदणी क्रमांक असलेली पक्की
पावतीघ्यावी. दुकानदाराकडून शेतकऱ्यांनी खरेदी करताना कच्ची पावती घेतल्यास वाढीव
दराने बियाणे खरेदी केली असल्यास किंवा बियाणाची उगवण पेरणीनंतर कमी आल्यास
याबाबतची शेतकऱ्यांना तक्रार करण्यास तसेच कृषी विभागास संबंधित बियाणे कंपनी
किंवा कृषी केंद्रावर कारवाई करण्यास अडचणी येतात, त्यामुळे शेतकऱ्यांनी रीतसर
खरेदीची पक्की पावती घेऊनच कृषी निविष्ठांची खरेदी करावी, असे आवाहनही कृषि विकास
अधिकारी भीमराव रणदिवे व मोहिम अधिकारी अनिल कुलकर्णी यांनी केले आहे.
-*-*-*-*-*-*-
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत 'माहिती भवन' इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार 'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल - मुख्यमंत्री उद्धव ठाक
रे
मुंबई, दि. 25 :- पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला
बदल लक्षात घेता माहिती व जनसंपर्क विभागाचे 'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी
उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
नवी
मुंबईतील नेरुळ येथे माहिती भवन इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार माहिती व
जनसंपर्क महासंचालनालय आणि सिडको यांच्यात आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या
प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. माहिती व जनसंपर्कचे प्रधान सचिव दीपक कपूर आणि
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांच्यात सामंजस्य कराराचे
हस्तांतरण करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृहात आयोजित या कार्यक्रमास
माहिती व जनसंपर्क राज्यमंत्री कु. आदिती तटकरे, मुख्य
सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्र्यांचे
प्रधान सचिव विकास खारगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी
मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, दैनिक
सामनाचा मी देखील काही काळ संपादक होतो, त्यामुळे
राजकारण आणि पत्रकार यांच्यातील संबंध लहानपणापासून पाहत मी मोठा झालो, त्यामुळे
पत्रकारितेशी माझे कायम ऋणानुबंध आहेत. पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये बराच
बदल झाला असून खिळ्यांच्या ब्लॉकच्या टाईपसेटिंगपासून मोबाईलपर्यंतचा पत्रकारितेचा
प्रवास थक्क करणारा आहे. आता एका क्षणात जगभरात माहिती पाठवता येते आणि हे काम
करण्यासाठी पत्रकारांना एका ठिकाणी बसता यावे याकरिता माहितीभवन निश्चितच उपयुक्त
ठरेल. चुकीच्या माहितीवर आधारित अनेक बातम्या प्रसारित किंवा प्रसिद्ध होत असतात, त्या
बातम्यांची वस्तुस्थिती वेळोवेळी जनतेसमोर मांडण्याबरोबरच चुकीच्या बातम्यांचे
खुलासे होणे आवश्यक आहे. माहिती भवनची संकल्पना महत्त्वपूर्ण असून येथे सुरु
करायच्या उपक्रमांचा सविस्तर आराखडा तयार करण्याचे निर्देशही यावेळी
मुख्यमंत्र्यांनी दिले.
राज्यमंत्री
कु. आदिती तटकरे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कामकाजाचे कौतुक केले.
नवी मुंबईतील नेरूळ येथे माहिती भवनाची अत्याधुनिक इमारत विभागाच्या कामकाजास
उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले. या माहिती भवनामध्ये पत्रकार संघटनांच्या कार्यक्रमांबरोबरच
महासंचालनालयाकडील असलेल्या ग्रंथांचे डिजिटायझेशन करुन डिजिटल ग्रंथालय लवकरच
सुरु होईल. असा विश्वास व्यक्त करुन माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे
बळकटीकरणाची ग्वाही यावेळी राज्यमंत्री कु. तटकरे यांनी दिली.
माहिती
व जनसंपर्कचे प्रधान सचिव तथा महासंचालक दीपक कपूर यांनी मान्यवरांचे स्वागत करुन
प्रास्ताविक केले. ते म्हणाले, माहिती व
जनसंपर्क महासंचालनालय वृत्तसंकलनाबरोबरच माहितीचे विश्लेषण देखील करीत असते.
अलिकडच्या काळात नव्या तंत्रज्ञानाचा अंगीकार विभागाने केल्यामुळे कामाच्या पद्धती
बदलल्या आहेत. या बदललेल्या कामाच्या पद्धतीसाठी माहिती भवनाची संकल्पना उपयुक्त
ठरेल. माहिती भवनसाठी केलेल्या सहकार्याबद्दल नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्यमंत्री
कु. आदिती तटकरे यांचे आणि सिडकोचे श्री. कपूर यांनी आभार मानले. या माहिती
भवनामध्ये माध्यम प्रतिसाद केंद्र, डिजिटल
ग्रंथालय, माध्यम प्रशिक्षण केंद्र आणि पत्रकार कक्ष सुरु
करण्यात येणार असल्याचेही श्री. कपूर यांनी सांगितले.
यावेळी
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी मनोगत व्यक्त केले. सिडकोची
ही इमारत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला देखभाल दुरुस्तीसाठी देण्याचा निर्णय
घेण्यात आला होता, आता ही इमारत प्रत्यक्ष आज हस्तांतरित करण्यात
येत असल्याचे सांगून या इमारतीमध्ये सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्याचे डॉ.
मुखर्जी यांनी सांगितले.
या
कार्यक्रमास संचालक (वृत्त-जनसंपर्क) दयानंद कांबळे, कोकण
विभागाचे माहिती उपसंचालक डॉ. गणेश मुळे, उपसंचालक
(प्रकाशने) अनिल आलुरकर, सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी श्रीमती प्रिया
रातांबे यांचेसह माहिती व जनसंपर्कचे आणि सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वरिष्ठ सहायक संचालक श्रीमती मीनल जोगळेकर यांनी तर
संचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी यांनी आभार मानले.
असे
आहे माहिती भवन...
● नवी मुंबईतील नेरुळ येथे माहिती व जनसंपर्क
महासंचालनालयाचे माहिती भवन
● सिडको इमारतीच्या सुमारे ६ हजार
८८३ चौरस फुट क्षेत्रफळाच्या भव्य जागेत माहिती भवन सुरु होणार.
● तळमजला आणि पहिला मजला असे स्वरुप असलेल्या या
इमारतीत कॉन्फरन्स रुम, कार्यालये, बहुद्देशीय
सभागृह, अतिथी कक्ष, प्रतिक्षा
कक्ष, स्वयंपाकघर, वाहनतळ
आदी सुविधा.
● इमारतीच्या बांधकामासाठी सुमारे २.५८ कोटी
रुपये खर्च.
● अद्ययावत स्टुडिओ, लाईव्ह
स्ट्रिमिंग सुविधा, राज्यस्तरीय माध्यम प्रशिक्षण केंद्र, पत्रकार
कक्ष, ग्रंथालय, डिजिटल
ग्रंथालय, विविध प्रकाशनांचे दालन, प्रदर्शन
दालन, दुर्मिळ छायाचित्रांचे दालन, दुर्मिळ
दृकश्राव्य दालन, समाजमाध्यम कक्ष, पत्रकार
परिषद कक्ष, माध्यम प्रतिसाद केंद्र आदींचा माहिती भवनात
समावेश
-*-*-*-*-*-*-
Tuesday, 24 May 2022
दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठीत लावणे बंधनकारक
जालना दि.24 (जिमाका) :- महाराष्ट्र
शासनाने महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियम) अधिनियम
अधिसुचनेनुसार सुधारणा केली असून या अधिसुचनेनुसार आता सर्व दुकाने, व्यापारी
आस्थापना, हॉटेल, करमणुकीचे ठिकाणे यांना त्यांच्या आस्थापनांच्या नावांचे नामफलक
मराठीत लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. या अधिसुचनेनुसार आस्थापनेच्या
नियोक्त्याकडे, देवनागरी लिपितील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व
लिपितील नामफलक देखील असू शकतील,
मराठी भाषेतील
अक्षरलेखन, नामफलकावर सुरुवातीलाच लिहीणे आवश्यक असेल आणि मराठी भाषेतील अक्षरांचा
टंक आकार इतर कोणत्याही भाषेतील अक्षरांच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही. तसेच ज्या आस्थापनांमध्ये मद्य पुरविले जाते
किंवा विकले जाते अशा आस्थापना, नामफलकावर महान व्यक्तींची किंवा गड किल्ल्यांची
नावे लिहू नयेत.
जालना जिल्हयातील
सर्व दुकाने व आस्थापना मालकांनी वरील अधिसुचनेची काटेकोरपणे अंमलबजावणी करुन
त्यांच्या आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपितील मराठी भाषेत लावावेत, असे सरकारी
कामगार अधिकारी अ.मा. जाधव, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
-*-*-*-*-*-*-*-
