Thursday, 23 January 2020


महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019
खातेदारांनी बँक खाती आधार क्रमांकाशी संलग्न करुन घ्यावीत

जालना दि.23- महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 योजनेची जिल्हयात अंमलबजावणी सुरु करण्यांत आली आहे. दि. 7 जानेवारी 2019 रोजी सर्व बँकस्तरावर ज्या खातेदारांची बँक खाती आधार क्रमांकाशी संलग्नीत केलेली नाही अशा खातेदारांच्या यादया बँक शाखा, ग्रामपंचायत कार्यालय  व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे कार्यालय येथे लावण्यांत आलेल्या आहेत. जिल्हयातील आधार क्रमांक संलग्न नसलेल्या खातेदारांची संख्या            31 हजार 544 इतकी असुन आतापर्यंत एकुण 23 हजार 17 इतक्या खातेदारांनी त्यांचे बँक खाते आधार संलग्न करण्यात आलेली आहेत. जिल्हयातील एकुण 8 हजार 527 खाती आधार संलग्न होणे बाकी आहेत. यामध्ये प्रामुख्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक 1 हजार 912, एस. बी. आय. 2 हजार 234, बॅंक ऑफ महाराष्ट्र 872, महाराष्ट्र ग्रामिण बँक 735, युनियन बँक ऑफ इंडीया 1 हजार 164, बँक ऑफ बडोदा 529 , सिंडीकेट बँक 280 , सेंट्रल बँक ऑफ इंडीया 142 तर बँक ऑफ इंडीया 332 यांचा समावेश आहे.
ज्या खातेदारांची बँक खाती आधार क्रमांकाशी संलग्नीत केलेली नाहीत, अशा खातेदारांनी तात्काळ त्यांचे आधार क्रमांक त्यांचे बँक खात्याशी संलग्नीत करण्यासाठी संबधीत बँकेशी संपर्क साधावा व महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 चा लाभ घ्यावा, असे आवाहन  जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जालना यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 


राष्ट्रीय  मतदार दिनानिमित्त रॅलीचे आयोजन
            जालना दि.23- दि.25 जानेवारी 2020 रोजी राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असून या दिवशी गांधी चमन, जुना जालना येथून जिल्हाधिकारी कार्यालय (मार्ग शनि मंदीर उड्डाण पुल ) पर्यंत सकाळी 8.00 वाजता प्रभात फेरीचे आयोजन करण्यात येणार आहे. या फेरीत शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थी सामाजिक संस्थेचे सदस्य, एस आर पी कर्मचारी व इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी इ.सामिल होणार असून जिल्हाधिकारी कार्यालयाचे प्रांगणात मुख्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात  येणार आहे.
या कार्यक्रमास अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे, असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी, जालना यांनी कळविले आहे.


पालकमंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली
24 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक
            जालना दि.23- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक दिनांक 24 जानेवारी, 2020 रोजी सकाळी ठीक 11.00 वाजता जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.  
            बैठकीची विषयसुची पुढील प्रमाणे राहील :- दिनांक 14 जुन 2019 रोजी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतील इतिवृत्तास मान्यता देणे व अनुपालन अहवाल सादर करणे. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/एस.सी.पी./ओ.टी.एस.पी.) सन 2019-20 अंतर्गत माहे डिसेंबर 2019 अखेर झालेल्या खर्चाचा आढावा. तसेच पुनर्विनियोजन प्रस्तावांना मान्यता देणे.  जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण/एस.सी.पी./ओ.टी.एस.पी.) सन 2020-21 च्या प्रारुप आराखडयास मान्यता देणे व पालकमंत्री महोदयांच्या परवानगीने आयत्या वेळी घेण्यात येणारे विषय असतील, असे जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, जिल्हा नियोजन समिती, जालना यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.


प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते
मुख्य शासकीय ध्वजारोहण
            जालना, दि. 23 – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या  70  व्या वर्धापन दिनानिमित्त दि. 26 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 9-15 वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  राजेश टोपे यांच्या हस्ते होणार आहे.
            तत्पुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रंगाणात जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या हस्ते सकाळी 8.15 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
            या कार्यक्रमास सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था आदीमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित रहावे, असे उपजिल्हाधिकारी, (सामान्य प्रशासन) जालना यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Tuesday, 7 January 2020


प्रजासत्ताक दिन पूर्वतयारीचा उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
            जालना, दि. 7 – प्रजासत्ताक दिन पूर्वतयारीची आढावा उपजिल्हाधिकारी (सामान्‍ प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला.
            यावेळी श्रीमती भोसले म्हणाल्या 26 जानेवारी, 2020 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमानिमित्त प्रत्येक विभागांनी त्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडण्याच्या सुचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
            बैठकीस तहसिलदार संतोष बनकर, नायब तहसिलदार श्रीमती मयुरा पेरे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.





महारेशीम अभियानाचा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
            जालना, दि. 7 -  शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात रेशीम शेतीकडे वळावे या उद्देशाने दि. 7 ते 21 जानेवारी, 2020 दरम्यान महारेशीम अभियानाचे आयोजन करण्यात आले असुन या अभियानाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात प्रचार रथास हिरवी झेंडी दाखवुन करण्यात आला. 
            शेतकऱ्यांनी अधिकाधिक रेशीम शेती करुन आपल्या उत्पन्नात भर घालण्यासाठी व या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक 7 जानेवारी 2020 ते 21 जानेवरी 2020 या कालावधील mahareshim.com या संकेतस्थळावर नोंदणी करुन आवश्यक ती कागदपत्रे व अर्ज, नोंदणी शुल्क जिल्हा रेशीम कार्यालय,नवीन मोंढा, देउळगावराजारोड, जालना  येथे दिनांक 21 जानेवारी पुर्वी किंवा पर्यत जमा करावीत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
            यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी जी.एम. मिसाळ, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी अजय मोहिते यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Sunday, 5 January 2020


जिल्हा माहिती कार्यालयात दर्पण दिन साजरा
            जालना, दि. 6 –  दर्पण दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात जालना येथे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल हाफीज,  जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष अंकुशराव देशमुख व माहिती सहायक अमोल महाजन  यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  
            या कार्यक्रमास जिल्ह्यातील वृत्तपत्राचे संपादक, जिल्हा प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी  आदींनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.