Friday, 7 August 2026

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

 


 

     जालना दि. 7 (जिमाका) :-    जिल्ह्यात श्री क्षेत्र शेगांव जि. बुलढाणा येथील श्री संत गजानन महाराज जयंती यांची पालखी पंढरपुर येथुन परतीच्या मार्गावर असून ही पालखी दि. 7 ऑगस्ट 2026 रोजी जिल्ह्याच्या हद्दीत प्रवेश करणार असून दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी जालना जिल्ह्यातील नियोजीत प्रवास पुर्ण  करुन बुलढाणा  जिल्ह्याचे हद्दीत प्रवेश करणार  आहे. तसेच दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी श्रावण मासारंभ, दि. 14 ऑगस्ट 2026 रोजी पतेती सण, दि. 15 ऑगस्ट 2026 रोजी स्वातंत्र्यादिन दि. 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमी इत्यादी सण, उत्सव  साजरे होणार आहेत. सदर सण, उत्सवाचे अनुषंगाने जालना जिल्ह्यात व शहरात मिरवणुका व विविध कार्यक्रम आयोजित होतात. त्यासाठी मोठ्या प्रमाणावर नागरिक एकत्र येत असतात.

तसेच सध्या महाराष्ट्रात व देशभरात आरक्षण उपवर्गीकरणाला तिव्र विरोध होत आहे. तसेच सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण  व धनगर आरक्षण मिळावे या अनुषंगाने जालना जिल्ह्यात विविध आंदोलनात्मक कार्यक्रम सुरु आहेत. तसेच सध्या महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या सत्ताधारी व विरोधकात एकमेकांविरुध्द विविध कारणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु आहे. तसेच  शेतक-यांचे विविध मागणीसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.  

 

        पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

 

तर पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.   

 

हा आदेश कामावरील कोणताही ‍ अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.   हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि. 8 ऑगस्ट, 2026   रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते  दि. 21 ऑगस्ट,2026 रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

 

Thursday, 6 August 2026

राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांची बदनापूर येथील कृषि विज्ञान केंद्र भेट व पाहणी

 







 

जालना,दि.6(जिमाका) : महाराष्ट्र राज्याचे कृषि, वित्त, नियोजन, मदत व पुनर्वसन तसेच विधी व न्याय राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी आज (दि. 6 ऑगस्ट) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ, परभणी अंतर्गत कार्यरत कृषि विज्ञान केंद्र (केव्हीके), बदनापूर येथे भेट देऊन बायोमिक्स लॅबोरेटरी, माती परीक्षण प्रयोगशाळा, कृषी प्रदर्शन स्टॉल तसेच कृषी संशोधन केंद्रातील विविध उपक्रमांची पाहणी केली. यावेळी त्यांनी जैविक शेती, मृदा आरोग्य संवर्धन आणि शाश्वत कृषी विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

राज्यमंत्री जयस्वाल यांनी सर्वप्रथम केव्हीके बदनापूर येथील बायोमिक्स लॅबोरेटरीला भेट देऊन तेथे तयार करण्यात येणाऱ्या विविध जैविक उत्पादनांची निर्मिती प्रक्रिया प्रत्यक्ष पाहिली. द्रवरूप जैविक खतांचे उत्पादन, त्यांचे दरपत्रक, गुणवत्ता नियंत्रण आणि शेतकऱ्यांसाठी त्यांचा होणारा उपयोग याबाबत त्यांनी सविस्तर माहिती जाणून घेतली. जैविक खतांच्या वापरामुळे मातीची सुपीकता व आरोग्य सुधारण्यास मदत होते, रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी होते, उत्पादन खर्चात बचत होऊन शेतकऱ्यांचा नफा वाढतो, असे सांगण्यात आले. या उपक्रमाचे त्यांनी विशेष कौतुक केले.

यानंतर त्यांनी माती परीक्षण प्रयोगशाळेला भेट देऊन माती आरोग्य पत्रिका तयार करण्याची प्रक्रिया, अन्नद्रव्य व्यवस्थापन आणि शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या शिफारशींची माहिती घेतली. कृषी प्रदर्शन स्टॉलवरील विविध जैविक उत्पादने, विस्तार साहित्य, सुधारित कृषी तंत्रज्ञान आणि शेतकरी हिताच्या विविध उपक्रमांची माहिती घेऊन ही उत्पादने व तंत्रज्ञान अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी प्रयत्न करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी त्यांनी कृषि संशोधन केंद्र, बदनापूर येथील जंगली जातींच्या संवर्धित बागेलाही भेट दिली. केंद्रामार्फत विकसित करण्यात आलेल्या आणि शेतकऱ्यांमध्ये प्रसारित होत असलेल्या कडधान्य पिकांच्या सुधारित वाणांची त्यांनी माहिती जाणून घेतली. विशेषतः तूर पिकातील ‘गोदावरी’ वाण तसेच हरभरा पिकातील ‘परभणी चना-१६’ या सुधारित वाणांच्या वैशिष्ट्यांबाबत त्यांनी शास्त्रज्ञांशी सविस्तर चर्चा केली. तूर, मुग व उडीद पिकांच्या जंगली जातींचे संवर्धन, त्यांचे जनुकीय महत्त्व आणि भविष्यातील सुधारित वाण विकसित करण्यामधील त्यांचे योगदान याविषयीही त्यांनी माहिती घेतली.

भेटीदरम्यान राज्यमंत्र्यांनी कृषि महाविद्यालय, बदनापूर येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कृषी संशोधन, आधुनिक कृषी तंत्रज्ञान, नवोन्मेष, जैविक शेती आणि कृषी क्षेत्रातील उदयोन्मुख संधी याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत संशोधनाधिष्ठित शेतीचा प्रसार करण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. राकेश अहिरे, कृषि महाविद्यालय, बदनापूरचे अधिष्ठाता डॉ. दीपक पाटील, डॉ. एस. बी. पवार, मोसंबी संशोधन केंद्र, बदनापूरचे प्रभारी अधिकारी डॉ. गजेंद्र जगताप, कृषि विज्ञान केंद्र, बदनापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सचिनकुमार दिगंबरराव सोमवंशी, विषय विशेषज्ञ (पीक संरक्षण) डॉ. सचिन रामचंद्र धांडगे, विषय विशेषज्ञ (विस्तार शिक्षण) डॉ. राहुल लक्ष्मणराव कदम, विषय विशेषज्ञ (कृषिविद्या) डॉ. दिपाली रमेश कांबळे, विषय विशेषज्ञ (पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र) प्रा. फारुक रुबाब तडवी तसेच कृषी संशोधन केंद्र, बदनापूरचे डॉ. प्रशांत सोनटक्के, डॉ. विष्णू गीते, डॉ. प्रशांत पगार, डॉ. नितीन पतंगे यांच्यासह इतर शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित शास्त्रज्ञांनी विविध संशोधन प्रकल्प, जैविक खत निर्मिती, मृदा आरोग्य व्यवस्थापन आणि कृषी विस्तार उपक्रमांची सविस्तर माहिती राज्यमंत्र्यांना दिली.

 

-*-*-*-*-*-*-

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत सक्रिय सहभाग घ्यावा - राज्यस्तरीय समन्वयक अधिकारी अमोल पाटील

 


 

जालना,दि.6(जिमाका) : ‘माझं गाव आरोग्य संपन्न’ अभियान अंतर्गत राज्यस्तरीय समन्वयक अधिकारी अमोल पाटील यांनी भोकरदन तालूक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नळणी बुद्रुक अंतर्गत राजूर येथे आयोजित असंसर्गजन्य रोग निदान शिबिर शिबिराला भेट दिली. यावेळी नागरिकांना प्रत्यक्ष भेटून ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची माहिती देऊन या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपले आरोग्य संपन्न होईल याची दक्षता घेण्याचे आव्हान केले.

या शिबिरामध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या एकूण 75 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 60 नागरिकांची रक्त तपासणी आणि 45 नागरिकांचा ईसीजी (ECG) करून आवश्यक वैद्यकीय उपचार व सल्ला, मार्गदर्शन, पोषण आहार व प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत माहिती देण्यात आली.

या शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून राज्यस्तरीय समन्वयक अधिकारी अमोल पाटील, डी. एस. बोराडे, ऋतुजा पाटील, सुनील बोडखे, यांची उपस्थिती होती. तसेच ग्रामसेवक पुंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित सावंत, डॉ. दीपक निहाल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नळणी येथील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान व उपस्थिती होती. ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने आयोजित केलेल्या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 

-*-*-*-*-*-

इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू; 31 ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

 

जालना,दि.6 (जिमाका) : राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत संचालित शासकीय वसतिगृहांमध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://hmasnew.mahait.org या ऑनलाइन संकेतस्थळावर दि. 7 ऑगस्ट ते दि. 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, जालना यांनी केले आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी निश्चित करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार, ऑनलाइन अर्ज दाखल झाल्यानंतर दि. 1 सप्टेंबर ते दि. 7 सप्टेंबर 2026 या कालावधीत अर्जांची छाननी करण्यात येणार आहे. त्यानंतर दि. ८ सप्टेंबर २०२६ रोजी गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी प्रसिद्ध केली जाईल.

पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना दि. 18 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी गुणवत्तेनुसार दुसरी निवड यादी दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांनी दि. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करावी, असे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

ही प्रवेश प्रक्रिया बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या नवप्रवेशित विद्यार्थ्यांसाठी तसेच व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहे.

इतर मागास बहुजन कल्याण विभागाने पात्र विद्यार्थ्यांनी वेळेत ऑनलाइन अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घ्यावा. तसेच जालना महानगरपालिका हद्दीपासून 10 किलोमीटर अंतरावरील परिसरातील महाविद्यालयांमध्ये प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनीच वसतिगृह योजनेसाठी अर्ज करावेत असे आवाहन केले आहे.

-*-*-*-*-*-

जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापक यांच्या पदनामात बदल

 


 

जालना,दि. 6 (जिमाका) : शासनाच्या परिपत्रकानुसार महाव्यवस्थापक, जिल्हा उद्योग केंद्र या पदनामा ऐवजी उप आयुक्त  (उद्योग व सेवा) जिल्हा उद्योग केंद्र अशा सुधारीत पदनामाचा सर्व कार्यालयीन पत्र व्यवहार तसेच कार्यालयीन कामकाजामध्ये उल्लेख करण्याचे सुचित केले आहे. अशी माहिती सहायक आयुक्त उद्योग सेवा जिल्हा उद्योग केंद्र यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-*-

शासकीय वसतिगृहात व्यावसायीक विभागाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि.6 (जिमाका) :  समाज कल्याण विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय वसतिगृह जालना, भोकरदन, अंबड, बदनापुर, घनसावंगी, संत रामदास शासकीय वसतिगृह, जालना व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले शासकीय वसतिगृह, जालना, अंबड, मंठा, भोकरदन या शासकीय वसतिगृहामध्ये सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी व्यावसायीक विभागाच्या प्रवेशासाठी मोफत प्रवेश देण्यात येत आहेत. त्यामुळे गरजु व पात्र विद्यार्थ्यांनी आजच https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळाला भेट देण्यात यावी. व्यावसायीक विभागाच्या प्रवेशासाठी दि. 15 सप्टेंबर 2026 रोजी पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येईल.

यासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, अनाथ, दिव्यांग, इतर मागासवर्गीय, विशेष मागासप्रवर्गसह इतर प्रवर्गाच्या इयत्ता आठवी, कनिष्ठ महाविद्यालय, वरिष्ठ महाविद्यालय, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये रिक्त असणाऱ्या जागेवर विनामुल्य प्रवेश ऑनलाईन पध्दतीने गुणवत्तेनुसार देण्यात येणार आहे.

जर गुणवत्तेनुसार किंवा जागेअभावी विद्यार्थ्याला शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, तरच त्याला "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनचा अर्ज सादर करता येईल. जे विद्यार्थी वसतिगृह योजनेचा अर्ज भरणार नाहीत त्यांना "भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना व वसतिगृह दोन्ही योजनेचा लाभ मिळणार नाही. ज्या तालुक्यामध्ये शासकीय वसतिगृहे नाहीत अशा तालुक्यात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यासाठी सदर नियम शिथील केला आहे.

शासकीय वसतिगृहात विनामुल्य निवास व भोजनासह शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता, ग्रंथालय, जिम व इंटरनेट वाय-फाय इत्यादी सुविधा विनामुल्य उपलब्ध करून देण्यात येतात. तरी गरजु विद्यार्थ्यांनी व्यावसायीक विभागाच्या प्रवेशासाठी अर्ज करण्यासाठी https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळाला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन डॉ. अनिता राठोड, सहायक आयुक्त, समाज कल्याण, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 साठी नोंदणी करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि.6 (जिमाका) :  राष्ट्रीय कौशल्य विकास परिषद (NSDC) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 या देशातील सर्वात प्रतिष्ठित कौशल्य स्पर्धेसाठी नोंदणी सुरू झाली आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, विविध सेक्टर स्किल कान्सिल तसेच औद्योगिक आस्थापनांच्या सहकार्याने जिल्हा, विभाग आणि राज्य स्तरावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावर निवड होण्याची तसेच जागतिक स्तरावरील वर्ल्डस्किल कॉम्पिटिशन मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.

            जागतिक कौशल्य स्पर्धा दर दोन वर्षांनी आयोजित केली जाते. ही स्पर्धा व्यावसायिक शिक्षण व कौशल्य उत्कृष्टतेच्या क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी स्पर्धा मानली जाते. 23 वर्षांखालील युवक-युवतींना कौशल्य सादर करण्याची ही स्पर्धा ऑलिम्पिक खेळासारखीच असते, हे विविध कौशल्य क्षेत्रांमध्ये आपले ज्ञान, गुणवत्ता व प्राविण्य सिद्ध करण्यासाठी हे एक प्रभावी व्यासपीठ आहे.

            इंडिया स्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 करिता वयोमर्यादा हा एकमेव पात्रतेचा निकष असून 56 कौशल्य क्षेत्रांकरिता उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2003 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. तसेच सायबर सिक्योरिटी, इंडस्ट्री 4.0, मेकॅट्रॉनिक्स आणि रोबोट सिस्टम इंटेग्रशन या टिम स्किल गटातील स्पर्धांसाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2003 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे. तसेच ऑटोनॉमस मोबाईल रोबोटिक्स, काँक्रीट कन्स्ट्रक्शन वर्क आणि लँडस्केप गार्डनिंग या टिम स्किल गटातील स्पर्धांसाठी उमेदवाराचा जन्म दि. 1 जानेवारी 2006 किंवा त्यानंतरचा असणे आवश्यक आहे.

            जिल्ह्यातील सर्व महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI), कौशल्य प्रशिक्षण संस्था, अभियांत्रिकी महाविद्यालये, पॉलिटेक्निक, उद्योग-आस्थापना तसेच संबंधित शैक्षणिक संस्थांनी पात्र युवक-युवतींमध्ये या स्पर्धेबाबत जनजागृती करून इंडियास्किल्स कॉम्पिटिशन 2026-27 स्पर्धेसाठी इच्छुक उमेदवारांनी https://www.skillindiadigital.gov.in या संकेतस्थळावर भेट देऊन ऑनलाइन नोंदणी करावी. असे आवाहन सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*-*-