Monday, 22 August 2022

लोकशाही दिनाचे दि. 5 सप्टेंबर रोजी आयोजन

 


जालना दि. 22 (जिमाका) :-   जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दिनांक 5 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.  लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.  लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनदेखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा. लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्वी, अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसिलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल.  ज्यांनी यापूर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नयेत.  तसेच लोकशाही दिनात द्यावयाच्या अर्जाचा विहित नमुना http://jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-

Friday, 19 August 2022

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा निरंतर लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी आवश्यक

 


 

                जालना दि. 19 (जिमाका) :-  जिल्ह्यातील सर्व प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये अनुदान वितरीत करण्यास प्रारंभ झालेला आहे. ज्या लाभार्थ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेची ई- केवायसीची प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांचा पुढील हप्ता बँक खात्यामध्ये जमा होणार नाही. सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट 2022 पासून योजनेच्या पुढील लाभाचे हप्ते निरंतर मिळण्याकरीता ई- केवायसीची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आलेली आहे.

            याकरीता प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Former  Corner या टॅबमध्ये किंवा पी.एम. किसान ॲपद्वारे ओटीपी आधारे लाभार्थ्यांना स्वत: ई - केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल.   ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) केंद्रावर ई-केवायसी प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल.

            केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (सीएससी) केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर शासनामार्फत रुपये 15/- फक्त निश्चित करण्यात आला आहे.

            पी.एम. किसान योजनेअंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील ऑगस्ट -नोव्हेंबर 2022 या कालावधीची लाभ प्राप्त होण्यापुर्वी ई-केवायसी प्रमाणीकरण प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असुन दि. 31 ऑगस्ट 2022 अखेरपर्यंत ही प्रक्रीया पूर्ण करण्यात यावी.   तरी सर्व नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा निरंतर लाभ मिळवा यासाठी ई - केवायसी करण्याचे आवाहन नोडल अधिकारी पीएम किसान योजना तथा निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

तालुकास्तरावरील महिला लोकशाही दिनाचे 22 ऑगस्टला आयोजन

 

            जालना, दि. 19 (जिमाका):- महिला व बाल विकास विभागामार्फत समस्या व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळण्याकरीता त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्यात येतो. तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याच्या चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन  करण्यात येते. त्यानुसार सोमवार, दि. 22 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.00 ते 12.00 वाजेपर्यंत तहसिल कार्यालय, परतूर व बदनापूर येथे महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु इच्छिणा-या महिलांनी आपली तक्रार दोन प्रतीत तालुका महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय येथे दाखल करण्याचे आवाहन केले आहे.

            अर्ज स्वीकृतीचे निकष पुढीलप्रमाणे - तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, तक्रार निवेदन दोन प्रतित सादर करावे, सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावे, अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा, सेवा व आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत.

            निवडणुक आचार संहिता काळात त्या त्या स्तरावर, विधीमंडळ अधिवेशन काळात राज्यस्तर महिला लोकशाही दिन पाळण्यात येत नाही. शासन निर्णयाप्रमाणे महिलांनी प्रथम संबंधीत तहसिलदार यांच्याकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतीत तक्रार दाखल करावी. तालुका महिला लोकशाही दिनात एका महिन्याच्या आत कार्यवाही न झाल्यास संबंधीत महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु शकतील. तालुकास्तरावरील लोकशाही दिनात अर्जदार महिलेस अतिम उत्तर शक्य तितक्या लकर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत देण्याचे बंधन संबंधित अध्यक्ष तथा तहसिलदार व सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील. महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन बाल विकास प्रकल्प अधिकारी, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, परतूर शिवाजी नागरे  यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

अपर जिल्हादंडाधिकारी यांचे कलम 37 (1) व (3) अन्वये आदेश जारी

 

 

     जालना दि. 19 (जिमाका) :-   दि.21 ऑगस्ट 2022 रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा होणर आहे. दि. 26 ऑगस्ट 2022 रोजी पोळा सण साजरा होणार आहे.तसेच दि. 31 ऑगस्ट 2022 रोजी गणेशोत्सव निमित्ताने श्री गणेश स्थापना होणार आहे. त्यानुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.

  सध्या मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण मिळावे या मागणीसाठी तसेच शेतक-यांचे विविध मागणीसाठी विविध संघटनांकडून आत्मदहन, उपोषण, धरणे, मोर्चे, निदर्शने, रास्तारोको इत्यादी सर्व प्रकारची आंदोलनात्मक कार्यक्रम घेण्याची शक्यता नाकरता येत नाही. तसेच धार्मिक स्थळावरील भोंगे काढण्यासाठी मनसे आक्रमक असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही

        त्यामुळे अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणा-या कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी किंवा त्या आसपास शस्त्रे, लाठ्या, सोटे, बंदुके, तलवारी , भाले, चाकु व इतर शरीरास इजा अथवा अपाय करणा-या वस्तु जवळ बाळगणार नाही. तीक्ष्ण पदार्थ अथवा स्फोटके सहज हाताळता येतील अशी घातक वस्तु जवळ बाळगणार नाही. दगड किंवा इतर उपकरणे किंवा प्रवर्तक शस्त्रे गोळा करुन ठेवणार नाही किंवा जवळ बाळगणार नाही. व्यक्तींच्या किंवा समुहाच्या भावना जाणुनबुजुन दुखविण्याचे उद्देशाने असभ्यतेने भाषण म्हणणार नाही, वाद्य वाजविणार नाही, गाणे म्हणणार नाही. व्यक्तींचे किंवा शवाचे किंवा त्याच्या प्रतिकृतीचे प्रदर्शन करणार नाही. आवेषी भाषण, अंगविक्षेप,विडंबनापर नकला करणार नाही  आणि सभ्यता किंवा नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा कोणतीही वस्तु बाळगणार नाही.

 

   तसेच  अपर जिल्हादंडाधिकारी जालना यांना प्राप्त अधिकारानुसार पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (3) अन्वये  पाच किंवा अधिक व्यक्तींना जमण्यास किंवा सभा, मिरवणुका, मोर्चा काढण्यास मनाई केली आहे.   

 

  हा आदेश कामावरील कोणताही ‍अधिकारी किंवा कर्मचारी यांना लागु होणार नाही.  तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि पोलीस अधिक्षक जालना व उपविभागीय पोलीस अधिकारी जालना, अंबड, परतुर, भोकरदन यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुका, सभा, मोर्चा यांना लागु राहणार नाही.

       हा आदेश संपुर्ण जिल्ह्यासाठी दि. 21 ऑगस्ट 2022  रोजीच्या 6.00 वाजेपासुन ते  दि. 4 सप्टेंबर 2022         रोजीचे रात्री 12.00 वाजेपर्यंत अंमलात राहील.

-*-*-*-*-*-  

21 ऑगस्टला राज्य सेवा पूर्व परीक्षा ; प्रतिबंधात्मक आदेश जारी

 


     जालना दि. 19 (जिमाका) :-  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व-2021, परीक्षा रविवार दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी जालना शहरातील खालील उपकेंद्रावर सकाळी 10.00 ते 5.00 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.

बद्रीनारायण बारवाले महाविद्यालय, नवीन एम. आय. डी.सी. जवळ, औरंगाबाद रोड, जालना, शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय, नागेवाडी, औरंगाबाद रोड, जालना, श्री. सरस्वती भुवन माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशाला, टाऊन हॉलजवळ, जुना जालना, मत्सोदरी शिक्षण संस्था, अभियांत्रिकी व तंत्रनिकेतन महाविद्यालय, नागेवाडी, औरंगाबाद रोड, जालना, सी.टी.एम.के. गुजराथी हायस्कुल, मुथा बिल्डिंग जवळ, सरोजिनी देवी रोड, जालना, अंकुशराव टोपे महाविद्यालय, मोती बागेजवळ, जुना जालना.

            वरील केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, वरील परीक्षा केंद्राजवळच्या 100 मीटरच्या परिसरातील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी बुथ, फॅक्स झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके परीक्षेच्या कालावधीत बंद ठेवण्यात यावेत. वरील परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने फौजदारी दंड प्रक्रिया 1973 चे कलम 144  अंतर्गत वर नमुद केंद्राच्या 100 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रतिबंधात्मक कार्यवाही म्हणुन फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 लागु राहील.

            अपर जिल्हादंडाधिकारी यांना फौजदारी दंड संहिता 1973 चे कलम 144 अन्वये प्राप्त अधिकारान्वये वरील केंद्राच्या 100 मीटर परिसरात याद्वारे प्रतिबंधात्मक आदेश लागु करीत आहे. हा आदेश दि.21 ऑगस्ट 2022 रोजीच्या सकाळी 8.00 वाजेपासुन ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत लागु राहील.

 

-*-*-*-*-*-

Thursday, 18 August 2022

जिल्हाधिकारी कार्यालयात स्व.राजीव गांधी यांना आभिवादन

 




 

जालना, दि. 18 :- देशाचे माजी पंतप्रधान स्व.राजीव गांधी यांच्या जयंती निमित्त  जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन आभिवादन केले.तसेच सद्भावना दिनाची उपस्थितांना प्रतिज्ञा देण्यात आली.

यावेळी उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी गणेश नि-हाळी, तहसीलदार संतोष गोरड,तहसीलदार प्रशांत पडघन,संजय चंदन,याया पठाण यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

                                                        *****

पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करणे बंधनकारक शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करावी -- जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

 



            जालना, दि. 18 (जिमाका):- खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांची ई-पीक पाहणी कार्यक्रम जिल्ह्यात 1 ऑगस्ट, 2022 पासुन सुरू झाला आहे. पिकांच्या नुकसानीपोटी पीकविम्याची रक्कम मिळण्यासाठी ई-पीक पहाणीमध्ये नोंद करणे बंधनकारक असुन चालु खरीप हंगामातील पिकांची नोंद शेतकऱ्यांनी ई-पीक पहाणीमध्ये करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

            ई-पीक पहाणीमध्ये नोंदीसाठी ई पीक पहाणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 नव्याने या ॲपची निर्मिती करण्यात आली असुन शेतकऱ्यांनी मोबाईल अॅपमध्ये नोंदविलेल्या पीक पाहणीमध्ये ४८ तासांच्या आत दुरुस्ती करता येणे शक्य होणार आहे. याशिवाय हमीभावाने नाफेडमध्ये पिकाच्या विक्रीसाठी नोंदविल्याची सुविधादेखील यंदा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नाफेड केंद्रांवर ऑनलाईन नोंदणीसाठी ताटकळण्याची गरज राहणार नाही.

            खातेदारांना त्यांच्या गावातील संपूर्ण पीक पाहणी नोंद पाहण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. यापूर्वी मुख्य पीक व दोन दुय्यम पिकाची नोंद करता येत होती. या हगामापासून एक मुख्य पीक व तीन दुय्यम पिकांच्या नोंदीची सुविधा आहे. याशिवाय खातेदारांना पीक पाहणीमध्ये दुरुस्ती करायची झाल्यास तलाठ्याकडे अर्ज करणे शक्य होणार आहे.

            शेतकऱ्यांनी त्यांच्या मोबाईलमधील जुने ॲप डिलीट करुन https://play.google.com/store/apps/details?id=io.sc.eppCordova या लिंकद्वारे गुगल प्ले स्टोअरवर जाऊन ई पीक पहाणी मोबाईल ॲप व्हर्जन-2 हे नवीन ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करुन आपल्या शेतातील पिकाची नोंद शेतकऱ्यांना स्वत: शेतामध्ये जाऊन करण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले आहे.

*******