Thursday, 23 January 2020


प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते
मुख्य शासकीय ध्वजारोहण
            जालना, दि. 23 – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या  70  व्या वर्धापन दिनानिमित्त दि. 26 जानेवारी, 2020 रोजी सकाळी 9-15 वाजता पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री  राजेश टोपे यांच्या हस्ते होणार आहे.
            तत्पुर्वी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रंगाणात जिल्हाधिकारी रविंद्र बिनवडे यांच्या हस्ते सकाळी 8.15 वाजता ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे.
            या कार्यक्रमास सर्व शासकीय, निमशासकीय, सहकारी संस्था आदीमधील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी राष्ट्रीय पोषाखात उपस्थित रहावे, असे उपजिल्हाधिकारी, (सामान्य प्रशासन) जालना यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

Tuesday, 7 January 2020


प्रजासत्ताक दिन पूर्वतयारीचा उपजिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा
            जालना, दि. 7 – प्रजासत्ताक दिन पूर्वतयारीची आढावा उपजिल्हाधिकारी (सामान्‍ प्रशासन) श्रीमती शर्मिला भोसले यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून घेतला.
            यावेळी श्रीमती भोसले म्हणाल्या 26 जानेवारी, 2020 रोजी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येणार आहे.  या कार्यक्रमानिमित्त प्रत्येक विभागांनी त्यांना देण्यात आलेल्या जबाबदाऱ्या चोखपणे पार पाडण्याच्या सुचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
            बैठकीस तहसिलदार संतोष बनकर, नायब तहसिलदार श्रीमती मयुरा पेरे यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.





महारेशीम अभियानाचा निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ
            जालना, दि. 7 -  शेतकऱ्यांनी अधिक प्रमाणात रेशीम शेतीकडे वळावे या उद्देशाने दि. 7 ते 21 जानेवारी, 2020 दरम्यान महारेशीम अभियानाचे आयोजन करण्यात आले असुन या अभियानाचा शुभारंभ निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात प्रचार रथास हिरवी झेंडी दाखवुन करण्यात आला. 
            शेतकऱ्यांनी अधिकाधिक रेशीम शेती करुन आपल्या उत्पन्नात भर घालण्यासाठी व या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिनांक 7 जानेवारी 2020 ते 21 जानेवरी 2020 या कालावधील mahareshim.com या संकेतस्थळावर नोंदणी करुन आवश्यक ती कागदपत्रे व अर्ज, नोंदणी शुल्क जिल्हा रेशीम कार्यालय,नवीन मोंढा, देउळगावराजारोड, जालना  येथे दिनांक 21 जानेवारी पुर्वी किंवा पर्यत जमा करावीत, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.
            यावेळी जिल्हा रेशीम विकास अधिकारी जी.एम. मिसाळ, वरिष्ठ तांत्रिक अधिकारी अजय मोहिते यांच्यासह शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Sunday, 5 January 2020


जिल्हा माहिती कार्यालयात दर्पण दिन साजरा
            जालना, दि. 6 –  दर्पण दिनानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयात जालना येथे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष अब्दुल हाफीज,  जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष अंकुशराव देशमुख व माहिती सहायक अमोल महाजन  यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.  
            या कार्यक्रमास जिल्ह्यातील वृत्तपत्राचे संपादक, जिल्हा प्रतिनिधी, इलेक्ट्रॉनिक माध्यमांचे प्रतिनिधी, छायाचित्रकार तसेच जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी  आदींनीही बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. 





Friday, 3 January 2020

इंटरनेटचा वापर करताना महिलांनी काळजी घेण्याची गरज “सायबर सेफ वुमन” कार्यशाळेतील सुर



      जालना, दि. 3 -  आजचे युग हे माहिती व तंत्रज्ञानाचे युग आहे. इंटरनेटच्या सहाय्याने आपल्या हवी असलेली माहिती, खरेदी, विक्रीसह ईतर आर्थिक व्यवहारही एका क्लिकच्या माध्यमातुन होत आहेत.  परंतू इंटरनेटचा वापर करताना आमिषाला बळी पडुन आपली फसवणुक तर होत नाही ना याची काळजी समाजातील प्रत्येक नागरिकांबरोबरच महिलांनीही घेण्याची गरज असल्याचा सुर “सायबर सेफ वुमन” कार्यशाळेत निघाला.
            जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व श्री वर्धमान स्थानकवासी जैन श्रावकसंघ, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने “सायबर सेफ वुमन” मोहिमेंतर्गत जैन विद्यालय जालना येथे महिला व बालकांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
            व्यासपीठावर सहाय्यक पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक ॲड प्रभाकर गवारे, सायबर सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती किर्ती पाटील, धरमचंद गादीया, सुदेशकुमार सकलेचा, माहिती सहाय्यक अमोल महाजन, दामिनी पथकाच्या प्रमुख श्रीमती पल्लवी जाधव, महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख श्रीमती राठोड,  संजयकुमार बंब, शांतीलाल संचेती, श्रीमती पुजा टेहरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            सहाय्यक पोलीस अधीक्षक निलेश तांबे म्हणाले, आजघडीला विविध कंपन्या ग्राहकांना इंटरनेटच्या माध्यमातुन प्रलोभने दाखवुन त्यांना फसवण्याचे प्रकार करत आहेत.  अशा फसव्या जाहिरातीपासुन नेटीजन्सनी सावधान होणे गरजेचे आहे. एखाद्या संकेतस्थळावरुन वस्तु खरेदी करताना त्याची सत्यता पडताळुनच ती खरेदी केली पाहिजे. तरुणांकडून समाजमाध्यमांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येतो.  केवळ लाईक्स मिळण्यासाठी मुला-मुलींकडून त्यांचे फोटो, व्हिडीओ शेअर केले जातात.  समाजमाध्यमावर पोस्ट केलेल्या फोटो व व्हिडीओचा अनेकवेळा गैरवापर केल्याचे दिसुन येते.  याबाबत मुलींनी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन करत आपली वैयक्तिक माहिती समाजमाध्यमांवरुन प्रसारित न करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. 
            विविध प्रलोभने दाखवत मोबाईलवर अनेकवेळा फसवे संदेश अथवा फोन करुन आपल्या बँकेच्या एटीएमचा पासवर्ड अथवा ओटीपी मागितला जातो.  अशावेळी हा पासवर्ड अथवा ओटीपी कोणालाही देऊ नये.  अशाप्रकारे अनेकवेळा फसगत झाल्याचे अनेक उदाहरणे आपल्यासमोर असल्याने इंटरनेटच्या अथवा मोबाईलच्या सहाय्याने आर्थिक व्यवहार करताना योग्य ती दक्षता घेण्याची गरज असल्याचेही श्री तांबे यांनी यावेळी सांगितले.
            उप विभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर म्हणाले, सायबरच्या माध्यमातुन महिलांवरील होणारे अत्याचार रोखण्यासाठी राज्यभर  “सायबर सेफ वुमन”  मोहिम राबवुन या माध्यमातुन महिलांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे.  सायबर गुन्हे हा आज एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.  सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी जिल्हास्तरावर सायबर सेलची निर्मिती करण्यात आली असुन या सेलच्या माध्यमातुन घडलेल्या गुन्ह्यांचा तपास करण्याबरोबरच पिडितांना न्याय देण्याचे काम करण्यात येत असल्याचे सांगत इंटरनेटच्या माध्यमातुन व्यवहार करताना तसेच समाजमाध्यमांचा वापर करताना महिला व मुलींनी दक्षता घेण्याची गरज असल्याचेही श्री खिरडकर यांनी यावेळी सांगितले.
            राज्य महिला आयोगाचे समन्वयक श्री गवारे म्हणाले, कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळ रोखण्यासाठी प्रत्येक शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये विशाखा समितीची स्थापना करण्याचे शासनाने निर्देश दिलेले आहेत. कामाच्या ठिकाणी महिलांवर अत्याचार होत असेल या समितीच्या माध्यमातुन त्यांना दाद मागण्याची सुविधा असुन या समितीला न्यायालयाप्रमाणे अधिकार देण्यात आलेले आहेत.  या समितीसमोर अशा प्रकारचे एखादे प्रकरण आल्यास तीन महिन्यांमध्ये या प्रकरणाचा निपटारा करण्याचे आदेश देण्यात आलेले असल्याचे सांगत महिलांसाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती त्यांनी यावेळी दिली.
            पोलीस उपनिरीक्षक श्रीमती जाधव,  श्रीमती राठोड यांनी महिलांचे व बालकांचे अधिकार या विषयावर उपस्थितांना सविस्तर असे मार्गदर्शन केले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात सायबर सेलच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती किर्ती पाटील यांनी कार्यशाळा आयोगाजनामागची भूमिका विषद केली. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार संजय सोनवणे यांनी केले. या मोहिमेच्या अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा व्हिडीओ संदेशही उपस्थितांना दाखविण्यात आला.
            कार्यक्रमास विद्यार्थी, विद्यार्थीनी, शालेय शिक्षक, शिक्षिका, महिला व पत्रकारांसाठी मोठ्या संख्येने उपस्थिती होती.









Tuesday, 24 December 2019

बँकांनी कर्जवाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पुर्ण करावे -- नरेंद्र पाटील



            जालना, दि. 24 –अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळामार्फत समाजातील तरुणांना देण्यात येणाऱ्या कर्जाची प्रकरणे त्वरेने निकाली काढण्याबरोबरच बँकांना कर्जवाटपाचे देण्यात आलेले उद्दिष्ट शंभर टक्के पुर्ण करण्याचे निर्देश महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिले.
            अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनेच्या आढावा बैठकीचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित बँकेच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना श्री पाटील बोलत होते.
            यावेळी आमदार संतोष दानवे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी निशांत ईलमकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            नरेंद्र पाटील म्हणाले, मराठा समाजातील तरुणांनी उद्योग व्यवसाय सुरु करुन स्वत:च्या पायावर उभे रहावे यासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे.  राज्य शासनाच्या मोठ्या प्रमाणात ठेवी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये ठेवण्यात येतात.  राष्ट्रीयकृत बँकांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास योजनेंतर्गत तरुणांनी केलेल्या कर्जाच्या मागणीची प्रकरणे तातडीने निकाली काढावीत.  बँकांनी तरुणांची प्रकरणे विनाकारण नाकारु नयेत.  त्याचबरोबर सहाकारी बँकांनीही तरुंणाना कर्ज उपलब्ध करुन द्यावे.  ज्या बँकांना उद्दिष्ट देण्यात आलेले नसेल अशा बँकांनीही सकारात्मक दृष्टीकोन ठेवत अधिकाधिक कर्ज प्रकरणे मंजुर करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
            समाजातील तरुणांनीही नोकरीच्या मागे न लागता नोकरी मागण्यापेक्षा उद्योग व्यवसायाच्या माध्यमातुन नोकरी देण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण करावी.  या महामंडळाच्या माध्यमातुन ज्या बँकांकडून उद्योग व्यवसायासाठी कर्ज घेतले आहे त्याची परतफेड विहित वेळेत करावी.  येणाऱ्या कालावधीमध्ये या योजनेसंदर्भात अधिकाधिक जनजागृती करण्यासाठी तालुकास्तरावरही बैठकांचे, मेळाव्यांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील प्रत्येक गरजु तरुणाला या महामंडळाच्या माध्यमातुन कर्जाची प्रकरणे मंजुर करुन त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यात येणार असल्याचेही श्री पाटील यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी आमदार संतोष दानवे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांनीही उपस्थित बँक अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत तरुणांना अधिकाधिक कर्ज प्रकरणे मंजुर करण्याचे निर्देश दिले.
            बैठकीस सर्व बँकांचे व्यवस्थापक, संबंधित विभागाचे शासकीय अधिकारी तसेच समाजातील तरुणांची उपस्थिती होती.