Monday, 16 October 2017

कर्जमाफीचा पहिला हफ्ता 18 ऑक्टोबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस



कर्जमाफीचा पहिला हफ्ता 18 ऑक्टोबरपासून
शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार
                               –मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
           जालना, दि. 16 :- शेतकऱ्यांना कर्ज माफी देण्याच्या शासन निर्णयाची अमलबजावणी सुरु आहे. 18  ऑक्टोबर, 2017 पासून कर्जमाफीचा पहिला हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. या कर्जमाफीचा फायदा राज्यातील गरजू शेतकऱ्यांना होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली .
          जालना तालुक्यातील कडवंची या गावातील सिमेंट नालाबंधाऱ्याची पहाणी व जलपूजन मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.  त्या प्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर, खासदार रावसाहेब दानवे, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, माजी आमदार अरविंद चव्हाण, विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, कडवंचीचे सरपंच चंद्रकांत क्षीरसागर आदींची उपस्थिती होती.
          मुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले की, शासकीय योजना यशस्वी होण्यासाठी लोकसहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे. शासन, लोकप्रतिनिधी आणि जनता यांच्या माध्यमातून गावाचा कसा विकास, कायापालट होतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे कडवंची हे गाव आहे.  कडवंचीच्या ग्रामस्थांनी अत्यंत मेहनतीमधून गावात जलसंधारणाची कामे केली आहेत. या गावाची आदर्श गाव म्हणून सर्वत्र ओळख निर्माण झाली आहे.  कडवंचीचा आदर्श इतर गावांनींही घेऊन गावात जलसंधारणाची कामे करावीत, यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. शाश्वत शेतीच्या अभावामुळेच शेतकरी अडचणीत आहेज.  शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण करुन शेतकऱ्याच्या शेतीला शाश्वत सिंचन मिळाल्यास शेतकरी निश्चित समृद्ध होऊ शकतो, असा विश्वासही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
           शेतकऱ्यांच्या पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन प्रयत्न करीत आहे. गटशेती ही नवीन योजना तयार करण्यात आली आहे.  शेतीक्षेत्रात यापूर्वी गुंतवणूक होत नव्हती परंतु राज्य शासनाने या क्षेत्रात 25 हजार कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक वाढवलेली आहे.  देशातील द्राक्षे व डाळींबाला परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.  जालना जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग जात आहे. तसेच ड्रायपोर्ट हा प्रकल्प साकारला जात आहे.   जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकवलेल्या फळपिकांना या प्रकल्पाच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जीवनात नक्कीच परिवर्तन होईल, असा विश्वासही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला.
          जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तयार करण्यात आलेल्या पुस्तिका व सीडीचे मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. या कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी तसेच कडवंची व परिसरातील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******





Friday, 13 October 2017

जिल्ह्याचा विकास अधिक जलद गतीने करण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करावेत – विभागीय आयुक्त श्री भापकर



जिल्ह्याचा विकास अधिक जलद गतीने करण्यासाठी
अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करावेत
                            – विभागीय आयुक्त श्री भापकर

       जालना, दि. 13 -  जालना जिल्ह्यात विकासाच्या दृष्टीकोनातुन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करण्यात येत असुन जिल्हयाचा विकास अधिक जलद गतीने करण्यासाठी सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी दिले.
            जिल्हाधिकारी कार्याल्याच्या सभागृहात जिल्ह्याच्या महसुल विषयाबरोबरच विविध विषयावरील  आयोजित आढावा बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना श्री भापकर बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपायुक्त महसुल प्रल्हाद कचरे, उपायुक्त (रोहयो) अनंत कुंभार, उपायुक्त (विकास) पारस बोथरा, उपायुक्त (पुरवठा) श्रीमती वर्षा ठाकुर-घुगे, रिता मेत्रेवार, सहाय्य्क आयुक्त श्रीमती सुत्रावे आदींची उपस्थिती होती.
            विभागीय आयुक्त श्री भापकर म्हणाले की, जालना जिल्ह्यामध्ये जलयुक्त शिवार अभियानाचे अत्यंत चांगले काम झाले असुन मराठवाड्या सर्वप्रथम ओडीएफ होण्याचा मानही जालना जिल्ह्याला मिळाला आहे.  आधारसिडींगमध्ये जिल्हा अग्रेसर असण्याबरोबरच  शेततळयांच्या बाबतीतही जिल्हा राज्यात 4 थ्या क्रमांकावर आहे.  पीकविमा योजनेमध्ये जालना जिल्ह्याने भरीव कामगिरी करत संपूर्ण देशामध्ये प्रथम येण्याचा मान पटकावला असुन येणाऱ्या काळात जिल्ह्याचा अधिक गतीने विकास करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अधिक वेगाने काम करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

            गौणखनिजाचा आढावा घेताना श्री भापकर म्हणाले की, जिल्ह्यात अवैधरित्या वाळुचे उत्खनन व वाहतुकीबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी आहेत.  अवैधरित्या वाळुचे उत्खनन व वाहतुक करताना आढळल्यास संबंधितांच्या गाड्या जप्त करण्याबरोबरच दोषींवर गुन्हे दाखल करण्यात यावेत.  या कामात हयगय अथवा दिरंगाई होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.  त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतजमीनीची सुपिकता व उत्पादकता वाढविण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये गांडुळखत तसेच सेंद्रीय खताचे युनिट उभे करण्याची गरज आहे.  यासाठी कृषी विभागाने आवश्यक ती कारवाई करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 
            महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातुन मोठ्या प्रमाणात वैयक्तिक लाभाच्या योजना घेता येतात.  याचा लाभ प्रत्येक लाभार्थ्यांना होण्यासाठी अधिकाऱ्यांनी वैयक्तिकरित्या प्रयत्न करावा.  तसेच राज्यात घटत चाललेले वृक्षाचे प्रमाण वाढविण्यासाठी व  पर्यावरणाचा समतोल राखुन वाढते प्रदुषण रोखण्यासाठी शासनाने वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला आहे.  येणाऱ्या काळात मराठवाड्यात अधिकाधिक वृक्षांची लागवड करावयाची असुन जिल्ह्यातही वृक्षांचे प्रमाण वाढविण्यासाठी नर्सरीच्या माध्यमातुन अधिकची रोपे निर्मिती करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.  
            यावेळी विभागीय आयुक्त श्री भापकर यांनी शासकीय वसुली, महसुल जमा व शासकीय भरणा प्रलंबित प्रकरणे,जीओ टॅगिंग, पुरवठा विभागाचा आढज्ञवा, महाराजस्व अभियान,  कर्मचारी कल्याण अभियान यासह विविध योजनेचा व्यापक स्वरुपात आढावा घेतला.        जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी जिल्ह्यातील विविध विकास कामांची माहिती दिली.
            बैठकीचे संचलन जिल्हा पुरवठा अधिकारी राजू नंदकर यांनी केले. बैठकीस सर्व उपजिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह प्रशासकीय विभागाचे प्रमुख अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
***-***


Saturday, 16 September 2017

मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहिदांना पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत मानवंदना



मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त शहिदांना
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत मानवंदना
        जालना, दि. 17 –  मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या 69 व्या वर्धापन दिनानिमित्त टाऊन हॉल येथील स्मृती स्तंभास पुष्पचक्र वाहून राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी हुतात्म्यांना आदरांजली वाहिली तर पोलीस जवानांनी हवेत बंदुकीच्या तीन फेरी झाडून हुतात्म्यांना मानवंदना दिली. जिल्हयात आज सर्वत्र मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
            शहरातील टाऊन हॉल जवळच्या मराठवाडा मुक्तीसंग्राम स्मृती स्तंभास आज मुख्य शासकीय ध्वजवंदना आणि हुतात्म्यांना आदरांजली अर्पण करण्याचा कार्यक्रम पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी जनतेला उद्देशुन शुभेच्छा संदेशही दिला.
            याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक रामश्वरजी दायमा, सुभद्राबाई शंकरराव देशमुख, आशाबाई मदनलाल चरमरे, प्रभावती गजानन जोशी, जानीबाई माणिकचंद कटारे, प्रयागबाई हरिशचंद्र हावळे, मालनबाई विठ्ठलराव चव्हाण, जाईबाई, खंडेराव खलसे, मालनबाई राजाराम बरवे, राणीरक्षा अब्दुल अजीज खॉ, कांताबाई विश्वंभरराव मिटकर यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात येऊन मान्यवरांनी स्वातंत्र्य सैनिकांसह उपस्थित नागरिकांना मराठवाडा मुक्ती संग्रामदिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मान्यवरांनी लोकमान्य टिळक यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            या कार्यक्रमास आमदार राजेश टोपे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीष टोपे,  नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, माजी आमदार अरविंद चव्हाण, विलास नाईक, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) कमलाकर फड, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) श्री पाटील, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी रवींद्र पडुळकर, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर यांच्यासह स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 
            मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमानंतर  गांधीचमन जवळील आठवडी बाजार परिसरात पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्याबरोबरच स्वच्छतेचा उपक्रमही राबविण्यात आला.
***-***  



Friday, 8 September 2017

जिल्ह्याच्या विकासासंदर्भात शासनस्तरावर प्रलंबित असलेली प्रकरणे पाठपुरावा करुन सोडवणार - पालकसचिव श्री वाघमारे



जिल्ह्याच्या विकासासंदर्भात शासनस्तरावर प्रलंबित असलेली
प्रकरणे पाठपुरावा करुन सोडवणार - पालकसचिव श्री वाघमारे
            जालना, दि. 8शासनाच्या विविध योजनांची जिल्ह्यात यशस्वीरित्या अंमलबजावणी होण्याबरोबर जिल्ह्यात विकासाची अनेकविध कामे सुरु आहेत. जिल्ह्याच्या विकासासंदर्भात शासनस्तरावर प्रलंबित असलेल्या प्रकरणांचा पाठपुरावा करुन ते सोडविण्यासाठी कसोशीने प्रयत्न करण्यात येणार असल्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव तथा जिल्ह्याचे पालकसचिव दिनेश वाघमारे यांनी सांगितले.
            जिल्ह्याच्या विकासासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व खातेप्रमुखांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मागदर्शन करताना श्री वाघमारे बोलत होते.
            यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, अपर जिल्हाधिकारी पी.बी.खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            श्री वाघमारे म्हणाले की, अनुसूचित जाती, जमातीच्या लाभार्थ्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाच्या अनेकविध योजना आहेत.  या योजना प्रत्येक पात्र लाभार्थ्यापर्यंत पोहोचतील यासाठी अधिकाऱ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करण्याबरोबरच  रमाई आवास योजनेच्या माध्यमातुन अनुसूचित जाती, जमातीच्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना येत्या 2019 पर्यंत घरे देण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले असुन त्याबाबत संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य ते नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. विशेष घटक योजनेंतर्गत विकास कामांसाठी देण्यात येणारे अनुदानाच्या वितरणाचे अधिकार हे प्रत्येक जिल्ह्याला देण्यात आले आहेत.  त्यामुळे या योजनेचा निधी संपूर्णपणे खर्च होईल, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
            संपूर्ण महाराष्ट्र राज्य हागणदारीमुक्त करण्याचा मुख्यमंत्र्यांनी संकल्प केला असुन जालना जिल्हाही यामध्ये मागे राहता कामा नये.  यासाठी अधिकाऱ्यांनी अधिकाधिक प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगत शौचालयांची देखभाल व दुरुस्ती बरोबरच त्याचा वापरही नियमित व्हावा यासाठी जिल्ह्यात सार्वजनिक शौचालायापेक्षा वैयक्तिक शौचालय उभारणीवर भर देण्यात यावा.
केवळ शौचालयांची उभारणी करुन चालणार नाही तर त्याचा नियमितपणे वापर होण्याच्यादृष्टीकोनातुन नागरिकांमध्ये याबाबत जनजागृती करण्याच्या सुचनाही श्री वाघमारे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
            यावेळी पालकसचिव श्री वाघमारे यांनी जिल्ह्यातील पीक परिस्थिती, जलसाठा, पीकविमा, पीककर्ज, जलयुक्त शिवार अभियान, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, मागेल त्याला शेततळे, जिल्हा वार्षिक योजना निधी, मग्रारोहयो, ई-7/12, ई-फेरफार, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना यासह विविध विकास कामांचा उपस्थित अधिकाऱ्यांकडून आढावा घेत जिल्ह्यातील विकास कामे गतीने करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी जिल्ह्यात विविध विकास कामांची माहिती पॉवर पाँइटच्या माध्यमातुन पालकसचिवांना दिली.
            या बैठकीस सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसिलदार यांच्यासह संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
*******