Tuesday, 30 August 2016

महाअवयव दान अभियानानिमित्त आयोजित भव्य रॅलीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ विद्यार्थ्यांसह नागरिकांनी नोंदविला उत्स्फुर्त सहभाग

जालना -  महा अवयवदाना संदर्भात जनमानसामध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, 2016 या कालावधीत जिल्ह्यात महाअवयवदान अभियान राबविण्यात येत असून  त्याअनुषंगाने दि. 30 ऑगस्ट, 2016 रोजी जालना शहरात भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.  गांधीचमन येथे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
            यावेळी रामेश्वर भांदरगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते,  अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक श्री राठोड, बालकामगार प्रकल्पचे मनोज देशमुख, उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी  आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            गांधीचमन येथून रॅलीची सुरुवात होऊन मस्तगड, सुभाष चौक, काद्राबाद, मंगळ बाजार मार्गे निघून शिवाजी पुतळा येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.  या रॅलीमध्ये जेईएस, दानकुंवर,                   डॉ बारवाले या महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनी, बालकामगार प्रकल्प कार्यालयातील कर्मचारी, बदनापूर येथील वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी यांच्यासह नागरिकांनी या रॅलीमध्ये उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवत अवयव दान, श्रेष्ठ दान अशा आशयाचे फलक हाती घेऊन नागरिकांमध्ये अवयवदानाविषयी जनजागृती केली. 
            या रॅलीमध्ये डॉ. व्ही.व्ही. इंगे, डॉ. म्हस्के, डॉ. बी.के. नागरे, डॉ. एस.जी. पंडित, डॉ. ए.एस. खरात, डॉ. जगन्नाथ खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते श्री केळवदे, डॉ. राजेंद्र गाडेकर, डॉ. शिगेदार, प्रकाश मेटकर, डॉ. सुनिता गोलाईत, डॉ. एस.व्ही. कुलकर्णी, डॉ. राजेंद्र सोनवणे, डॉ. नितेश अग्रवाल यांच्यासह नागरिक मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.

******* 






Friday, 19 August 2016

“स्वच्छ महाराष्ट्रासाठी 18 लाख गृहभेटी, कुटूंबस्तर संवाद अभियानात” राज्यात राबविणार सर्वांनी सहभाग नोंदवावा – पालकमंत्री बबनराव लोणीकर

                           अभियानाच्या अनुषंगाने जालना जिल्ह्यात 63 हजार गाठीभेठीचे नियोजन
                           अभियानादरम्यान सेल्फी विथ स्टीकर अनोखा उपक्रम राबविणार
               अभियान यशस्वी करण्यासाठी उद्योजकांबरोबरच साधु-संतांची मदत 
         जालना - महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून देशात महाराष्ट्र राज्य स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. स्वच्छतेसंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात स्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख गृहभेटी  हा उपक्रम राबविण्यात आहे. जालना जिल्ह्यातही या अभियानांतर्गत 63 हजार कुटूंबाच्या गाठीभेठीचे नियोजन करण्यात येत असून या अभियानात सर्व पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी अधिकाधिक सहभाग नोंदवून राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले. 
            22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात कुटूंबस्तर संवाद 18 लाख गृहभेटी अभियान राबविण्यात येणार असून स्वच्छ व सुंदर जालना जिल्ह्यासाठी 63 हजार गाठीभेठीच्या नियोजनासंदर्भात मराठवाड्यातील स्वच्छता विभागांशी निगडीत अधिकारी तसेच जालना जिल्ह्यातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी  मातोश्री लॉन्स, अंबडरोड, जालना येथे दि. 19 ऑगस्ट रोजी आयोजित कार्यशाळेत उपस्थितांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, संचालक (वासो) मुंबई सतीष उमरीकर, जयंत रसाळ, राहूल लोणीकर, अपर पोलीस अधीक्षक राहूल माकणीकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री धोत्रे, युनिसेफचे जयंत देशपांडे, प्रचार व प्रसार सल्लागार कुमार खेडकर, उद्योगपती राम भोगले, विवेक देशपांडे, मनिष धुत, सुनिल रायठ्ठा, धनश्यामसेठ गोयल, सुनिल आर्दड, किशोर अग्रवाल, नामदेव चारठाणकर महाराज, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी.जी. ताठे, भुपेश पाटील, नम्रता गोस्वामी, वास्तु विशारद सतीष नागरे आदींची उपस्थिती होती.
            यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, महात्मा गांधी, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी आयुष्यभर आपल्या प्रबोधनाद्वारे जनतेला स्वच्छतेचा संदेश गावोगावी दिला आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनीही संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचे स्वप्न उराशी बाळगले असून हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत.  राज्यात 7 हजार 314 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.  सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील 15 तालुके पूर्णत: हागणदारी मुक्त झाले असून चालु वर्षात राज्यातील 13 जिल्हे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला असून 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर अभियाना दरम्यान शौचालय नसलेल्या राज्यातील 18 लाख कुटूंबियांपर्यंत पोहोचून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्री मंडळातील सर्व मंत्री, मुख्य सचिव, विविध खात्याचे सचिव तसेच राज्यातील सर्व पदाधिकारी व अधिकारी या अभियानांतर्गत प्रत्येकी एका गावास भेट देऊन कूटूंबस्तरावर शौचालयाचे महत्व पटवून देणार असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.

..2..

जालना जिल्ह्यात अभियानादरम्यान 63 हजार कुटूंबियांच्यागाठी भेठी
             जालना जिल्हाही या अभियानात मागे राहू नये यासाठी हे अभियान जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यासाठी व जिल्ह्यातील 63 हजार कुटूंबियांच्या या अभियानादरम्यान गाठीभेठी घेण्यासाठी नियोजन करण्यासंदर्भात राज्यातील पहिल्या अशा आगळयावेगळया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून या अभियानादरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गावा-गावात जाऊन जनतेला स्वच्छतेचे महत्त्व पटवून द्यावे.  ही मोहिम केवळ अभियानापुरती न राहता ती एक स्वच्छतेची लोकचळवळ होऊन नागरिकांनी अधिकाधिक शौचालयांची उभारणी करावी, असे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
सेल्फी विथ स्टीकर अनोखा उपक्रम राबविणार
            या अभियानादरम्यान जनतेच्या भेठीगाठी घेत असताना ज्यांच्याकडे शौचालय आहेत त्यांच्या घराच्या दारावर लयभारी अशा मजकुराचे हिरव्या रंगाचे स्टीकर व ज्यांच्याकडे शौचालय नाहीत अशा कुटुंबाच्या दारावर धोक्याचा इशारा देणारे लाल रंगाचे स्टीकर चिटकविण्यात येणार असून हे स्टीकर चिटकवताना सेल्फी विथ स्टीकर हा अनोखा उपक्रमही राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
अभियान यशस्वी करण्यासाठी उद्योजकांबरोबरच साधु-संतांची मदत
            22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर 2016 दरम्यान राज्यात राबविण्यात येत असलेल्या 18 लाख गृहभेटी कुटूंबस्तर अभियान यशस्वी करण्यासाठी राज्यातील स्वयंसेवी संस्था, उद्योगपतींची मदत घेण्यात येणार असून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी राज्यातील साधु-संत, महंत, विविध धर्माचे गुरु आपल्या किर्तनाच्या, प्रबोधनाच्या माध्यमातून समाजामध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करणार असून राज्यातील प्रत्येक शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांसह  विद्यार्थी विद्यार्थीनींनी या अभियान सहभाग नोंदवावा,असेही श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            स्वच्छतेचे महत्व पटवून देतांना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, स्वच्छता ही यशाची गुरुकिल्ली आहे.  स्वच्छतेमुळे मानवी आरोग्य सदृढ राहण्याबरोबरच मनही प्रसन्‍न राहते.  अस्वच्छतेमुळे मानवाला अनेक रोगांचा सामना करावा लागतो.  स्वच्छता ही प्रत्येकाची वैयक्तिक जबाबदारी असल्याचे सांगत आपले तन व मन सदृढ राहण्यासाठी स्वच्छतेची सवय प्रत्येकाने अंगिकारण्याची गरज असल्याचेही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
             राज्यातील नागरिकांच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी राष्ट्रपिता महात्मा गांधी, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखवून दिलेल्या मार्गाने राज्य शासन आपले काम सक्षमपणे करीत असून राज्यातील प्रत्येक नागरिक सुखी व्हावा, प्रत्येकास चांगले आरोग्य अणि शिक्षण मिळण्याबरोबरच देश हागणदारीमुक्त झाला पाहिजे.  यासाठी राज्यातील प्रत्येक नागरिकाने या अभियानात हिरिरीने सहभाग नोंदविण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी केले.
            खेडयाचा विकास झाला तरच देशाचा खऱ्या अर्थाने विकास होऊन देश बलशाली होईल.  राज्यात आदर्श ग्राम करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून आपण स्वत: सहा गावे दत्तक घेऊन ती आदर्शग्राम करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.  या गावांमध्ये अनेकविध सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात येत असल्याचे सांगत 21 प्रकारची कामे करण्यात येत आहेत.  तसेच हवेतुन पाणी शोषून घेऊन शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देणाऱ्या आकाश अमृत मशिन्सही या गावांमधून कार्यान्वित करण्यात येऊन या गावांना पिठाच्या गिरण्या उपलब्ध करुन देण्यात आल्या असून या गिरण्यांच्या माध्यमातून गावातील नागरिकांना मोफत दळण देण्यात येत असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            गेल्या तीन वर्षापासून राज्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प झाले असून यासाठी केवळ निसर्गाला दोष देऊन चालणार नाही तर यासाठी आपणही कारणीभूत आहोत.  मुबलक प्रमाणात पाऊस पाडण्यासाठी कारणीभूत असलेल्या वृक्षांची अधिकाधिक लागवड करुन त्याचे संगोपन करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            या कार्यशाळेत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, ह.भ.प. नामदेव चारठाणकर महाराज, उद्योजक राम भोगले, विवेक देशपांडे, प्रचार, प्रसिद्धी सल्लागार कुमार खेडकर, युनिसेफचे जयंत देशपांडे, संचालक (वासो) मुंबई सतीष उमरीकर आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.
            कार्यक्रमाच्या समारोपात जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी राज्याप्रमाणेच जालना जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी  कुटूंबस्तर संवाद अभियान जिल्ह्यात यशस्वीपणे राबविण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करण्याची गरज असल्याचे सांगत हे काम केवळ अभियानापुरते न करता एक सामाजिक दृष्टीकोन ठेऊन करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
            कार्यशाळेच्या प्रास्ताविकात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी म्हणाले की, जिल्ह्यात 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यातील 63 हजार कुटूंबियापर्यंत पोहोचून त्यांच्या गाठीभेठी घेत स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येणार असून त्यासंदर्भात नियोजन करण्यासाठी आज या आगळयावेगळया कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.  जिल्ह्यातील 420 गावे हागणदारीमुक्त करण्यासाठी या अभियानात सर्वांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            कार्यशाळेचे आभार प्रदर्शन जि.प.चे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर यांनी करुन उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली व या अभियानात सर्वांनी हिरिरीने सहभाग नोंदवावा, असे आवाहन केले.
            या अभियानादरम्यान वापरण्यात येणाऱ्या पोस्टर, हँडबील व घडीपत्रिकेचे मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.  सर्वप्रथम संत तुकडोजी महाराज व संता गाडगे महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन तसेच दीपप्रज्वलनाने कार्यशाळेची सुरुवात करण्यात आली.
            कार्यशाळेच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री ताठे, नम्रता गोस्वामी यांच्यासह सर्व टीमचा पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
            कार्यशाळेस मराठवाड्यातील स्वच्छता विभागाचे सर्व अधिकारी, जिल्ह्यातील सर्व उप विभागीय अधिकारी, तहसिलदार, पोलीस विभागाचे अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

******* 




Monday, 15 August 2016

राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी “अठरा लाख गृहभेटी” या उपक्रमांत सर्वांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा – पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना -  महाराष्ट्र राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी राज्य शासनामार्फत सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत असून देशात महाराष्ट्र राज्य स्वच्छता अभियानामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. स्वच्छतेसंदर्भात जनजागृती व्हावी या उद्देशाने 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राज्यात स्वच्छ महाराष्ट्रासाठी अठरा लाख गृहभेटी  हा उपक्रम राबविण्यात येणार असून या अभियानात सर्वांनी अधिकाधिक सहभाग नोंदवून राज्य हागणदारी मुक्त करण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.  
            भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या  69 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले.
            यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तुकाराम जाधव, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, माजी आमदार अरविंद चव्हाण, माजी आमदार संतोष सांबरे, जि.प. उपाध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, नगराध्यक्षा पार्वताबाई रत्नपारखे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक ज्योतिप्रिया सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, जि.प.चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री ताठे, श्री इंगळे, जिल्हा शल्य चिकित्सक              डॉ. सरिता पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांबाळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी जनतेला उद्देशुन संदेश देताना पालकमंत्री बबनराव लोणीकर म्हणाले की,  राज्यात 7 हजार 314 ग्रामपंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत.  सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील 15 तालुके पूर्णत: हागणदारी मुक्त झाले असून चालु वर्षात राज्यातील 13 जिल्हे हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 22 ऑगस्ट ते 2 ऑक्टोबर अभियाना दरम्यान शौचालय नसलेल्या राज्यातील 18 लाख कुटूंबियांपर्यंत पोहोचून स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह मंत्री मंडळातील सर्व मंत्री, मुख्य सचिव, विविध खात्याचे सचिव तसेच राज्यातील सर्व पदाधिकारी व अधिकारी या अभियानांतर्गत प्रत्येकी एका गावास भेट देऊन कूटूंबस्तरावर शौचालयाचे महत्व पटवून देणार आहेत.  शासनाच्या या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन राज्य हागणदारीमुक्त करण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
            गेल्या तीन वर्षापासून सातत्याने अल्प प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्याला दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत होते.  परंतू आता यावर्षी वरुणराजाची चांगली कृपा आपल्यावर होत असून आजपर्यंत अपेक्षित असलेल्या पावसाच्या 63 टक्क्यापेक्षा जास्त पाऊस जिल्ह्यात पडला आहे. त्यामुळे जायकवाडीसह जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा निर्माण झाल्यामुळे आगामी काळात शेती, उद्योग व पिण्यासाठी मुबलक पाणी उपलब्ध होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.  
              राज्य शासन शाश्वत पाणी साठे निर्माण करण्यासाठी जलयुक्त शिवार हे अभियान गतवर्षापासून राज्यात राबवित आहे. जालना जिल्ह्यात गतवर्षात 212 गावांची निवड करुन 412 सिमेंट बंधारे, 604 नाल्यांचे खोलीकरण आणि    3 हजार 214 बांध-बंधिस्तीची कामे करण्यात आली असून या कामावर 72 कोटी 55 लक्ष रुपये खर्च करण्यात आले आहेत.   या अभियानामुळे पडलेल्या पावसाचा प्रत्येक थेंब न् थेंब साठविण्यात व अडविण्यात आला असून  याद्वारे 49 हजार 550 टी.सी.एम. एवढा पाणीसाठा निर्माण होऊन जलयुक्त शिवार अभियानाची फलश्रुती आपणास पहावयास मिळत असल्याचे सांगत  चालू वर्षातही हे अभियान 186 गावातून राज्य शासनासह स्वयंसेवी संस्था व लोकसहभागातून राबविण्यात येत  आहे. येणाऱ्या काळातही जिल्ह्यातील सर्व गावात हे अभियान यशस्वीरित्या राबवून जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला आहे.  या कामी सर्वांनी अधिकाधिक सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
           नैसर्गिक आपत्तीमुळे गतवर्षात खरीप हंगामामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जवळपास  3 लाख 81 हजार शेतकऱ्यांना 221 कोटी 46 लक्ष रुपयांचे अनुदान त्यांच्या वैयक्तिक खात्यावर जमा करण्यात आले आहे. तसेच यावर्षी जिल्ह्यातील 1 लाख 62 हजार 239 शेतकऱ्यांना जवळपास 1 हजार 132 कोटी रुपयांच्या पीककर्जाचे वाटप करुन 102 टक्के वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यात आले. तसेच 23 हजार 531 शेतकऱ्यांच्या 217 कोटी 70 लाख एवढ्या पीककर्जाचे पुनर्गठण करण्यात आले असून पंतप्रधान पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 64 हजार 475 कर्जदार शेतकरी व 45 हजार बिगर कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेमध्ये समाविष्ट करुन घेण्यात आले असल्याचेही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            राज्यात घटत चाललेले वनक्षेत्र वाढविण्यासाठी संपूर्ण राज्यात 1 जुलै रोजी 2 कोटी वृक्ष लागवड हा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. जालना जिल्ह्याला या वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत देण्यात आलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजे 3 लाख 36 हजार वृक्षांची एकाच दिवशी लागवड करण्यात आली असून त्याचे संगोपनही करण्यात येत आहे.  वृक्ष लागवड ही केवळ मोहिम न राहता ती एक लोकचळवळ व्हावी यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या अंगणात, घराच्या व  कार्यालयाच्या परिसरात एक तरी वृक्षाचे रोपन करुन त्याचे संगोपन करण्याचे आवाहनही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी केले.  
            केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने जालना शहरात 14 हजार 500 विद्युत खांबावर एलईडी लाईट लावण्यासाठी दिल्ली येथील ईएसएल या कंपनीशी शासनाचा करार झालेला आहे. या करारापोटी शहरात 10 हजार एलईडी लाईट उपलब्ध झालेले असून एलईडी लाईट बसवणारी जालना नगरपालिका ही महाराष्ट्रातील पहिली नगरपालिका ठरणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
            सध्या नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाच्या सहाय्याने मानवी अवयव प्रत्यारोपणापद्वारे विविध गंभीर आजारांवर उपचार साध्य होत आहेत. सद्य:स्थितीत राज्यात सुमारे 12 हजार पेक्षा अधिक नोंदणीकृत रुग्ण अवयव मिळण्याच्या प्रतिक्षेत असून प्रतिदिन ही संख्या वाढत आहेत.  या रुग्णांना पुनर्जीवन देण्याच्या दृष्टीकोनातून अवयवदानाचे महत्व आपल्या सर्वांपर्यंत पोहोचणे ही काळाची गरज बनली आहे.  अवयव दानाचे महत्व लक्षात घेऊन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवयव दानाचा महोत्सव घेण्याच्या सुचना केल्या असून त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यात 30 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर, 2016 दरम्यान अवयवदान महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे.  आपण सर्वांनी या महोत्सवात हिरिरीने सहभाग नोंदविण्याचे आवाहन पालकमंत्र्यांनी यावेळी केले.
            जिल्ह्यातील ग्रामीण दळणवळणाचा दर्जा सुधारण्यासाठी राज्य शासन सतत प्रयत्नशिल आहे.  त्याचाच एक भाग म्हणून राज्य शासनाने अनयुटी तत्वावरील रस्त्यांसाठी प्रतीवर्षी 500 कोटीची तरतूद उपलब्ध करुन देण्याचे धोरण ठरविले असून या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने  1 हजार 343 कोटी रुपयांचा आराखडा शासनास सादर केलेला आहे.   तसेच केंद्रीय मार्ग निधीमधून 166 कोटी रुपयांची 9 कामे, अर्थसंकल्पीय तरतुदीमधुन 131 कोटी रुपयांची 97 कामे, नाबार्ड अंतर्गत 52 कोटी रुपयांची 47 कामे मंजूर करण्यात आली आहेत.
            राष्ट्रीय महामार्ग अंतर्गत दिंडी मार्ग म्हणून खामगाव-लोणार-मंठा-परतूर-माजलगाव-कळंब-बार्शी-पंढरपुर-सांगोला या 430 किलोमीटर अंतराच्या रस्त्यास केंद्र शासनाने मान्यता दिली असून केंद्रीय वार्षिक नियोजनात 860 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली असून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु असल्याचेही पालकमंत्री श्री बबनराव लोणीकर यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी लोकसहभागातून जलयुक्त शिवार अभियान, 2 कोटी वृक्ष लागवडीअंतर्गत वृक्ष लागवड, स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत उत्कृष्ट काम करणाऱ्या नागरिक, सरपंच, ग्रामसेवक, अधिकारी यांचा तसेच महसुल विभागात उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा, प्रचार व प्रसाराचे उत्कृष्ट काम केलेल्या जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा, माझी कन्या भाग्यश्री योजनेंतर्गत कुटूंब नियोजनांतर्गत शस्त्रक्रिया केलेल्या मातांचाही पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
            या कार्यक्रमाचे सुत्र संचलन निशिकांत मिरकले व तेजस्विनी माटोले यांनी केले.  कार्यक्रमास स्वातंत्र्य सैनिक, पदाधिकारी, अधिकारी, ज्येष्ठ नागरिक, कर्मचारी तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***-**** 

सायबर गुन्हेगारांवर वचक बसवून गुन्ह्यांची तात्काळ उकल होण्यासाठी सायबर लॅब उपयुक्त ठरणार – पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना – महाराष्ट्र सायबर सुरक्षा प्रकल्पांतर्गत सायबर गुन्हेगारांवर वचक बसविण्याबरोबरच गुन्ह्यांची तात्काळ उकल होऊन आरोपींचा तातडीने शोध लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेले जालना जिल्हा सायबर लॅब  हे अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी केले.
            पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या परिसरात स्वतंत्र इमारतीमध्ये उभारण्यात आलेल्या जालना जिल्हासायबर लॅबचे उदघाटन पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी श्री लोणीकर बोलत होते.
            यावेळी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह, अपर पोलीस अधीक्षक राहूल माकणीकर, लॅबचे प्रमुख व्ही.एच. इज्जपवार, पोलिस निरीक्षक अनंत कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            या सायबर लॅबच्या माध्यमातून डाटा चोरणे, गोपनीय सांकेतिक चिन्ह चोरणे, इंटरनेटद्वारे फसवणुक करणे, बदनामी करणे, दहशतवादी कट रचणे, देशाविरुद्ध छुप्या पद्धतीने युद्ध पुकारणे, एटीएम संबंधित गुन्हे, आर्थिक फसवणुक, सोशल मिडियावर खोटे अकाऊंट करणे, हॅकींग करणे, मालवेअर तयार करणे आदी गुन्ह्यांना आळा घालण्यात येणार असून या लॅबमध्ये अत्याधुनिक अशी संगणक यंत्रणेबरोबरच गुन्हे उघडकीस आणण्यासाठी विनालिफ्ट सॉफ्टवेअर, नेसा सॉफ्टवेअर, ॲडव्हीक सीडीआर. ॲनॅलिसीस सॉफ्टवेअर, सायबर चेक सुट सॉफ्टवेअर, मोबाईल चेक आदी सॉफ्टवेअर बसविण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह यांनी पॉवर पॉईंटच्या माध्यमातून पालकमंत्री महोदयांना‍ दिली.
            सर्वप्रथम कोनशिला अनावरण तसेच फित कापून पालकमंत्री श्री लोणीकर यांच्या हस्ते या सायबर लॅबचे उदघाटन करण्यात आले.
            कार्यक्रमास पदाधिकारी, पोलीस विभागातील सर्व अधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******  


Thursday, 11 August 2016

अंत्योदय शिधापत्रिकाधारक शेतक-यास अन्नधान्याचा ऑगस्ट महिन्याचा तालूका निहाय तूरडाळ पुरवठा जाहीर

           जालना - जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून अंत्योदय  (नियमित) योजनेतील सप्टेंबर 2016 चा एपीएल अन्नधान्याचा पुरवठा  शिधापत्रिकाधारकास  देण्यासाठी नियतन प्राप्त झाले आहे. तालुक्यातील शासकीय गोदामावर पुरवठा करण्यात आलेला एपीएल  योजनेचा तूरडाळीचा तपशील तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे.

       जालना  शासकीय गोदामावरील 29231  शिधापत्रिकाधारकांसाठी  292 क्क्टिंल तूरडाळ, बदनापूर या शासकीय गोदामावरील 8749  शिधापत्रिकाधारकांस 88 क्क्टिंल तुरडाळ,भोकरदन शासकीय गोदामावरील 20126  शिधापत्रिकाधारक 201 क्विंटल तूरडाळ, जाफ्राबाद- शासकीय गोदामावरील 16083 शिधापत्रिकाधारकास 161  क्क्टिंल तूरडाळ, परतूर- शासकीय गोदामावरील 13817  शिधापत्रिकाधारकास 138  क्क्टिंल तूरडाळ, मंठा शासकीय गोदामावरील 15164  शिधापत्रिकाधारकास 152  क्क्टिंल तूरडाळ, अंबड शासकीय गोदामावरील 29236  शिधापत्रिकाधारकास 292 क्क्टिंल तूरडाळ, आणि घनसावंगी शासकीय गोदामावरील 25114 शिधापत्रिकाधारकास 251  क्क्टिंल तूरडाळ .    *******

एपीएल शिधापत्रिकाधारक शेतक-यास अन्नधान्याचा सप्टेंबर महिन्याचा तालूका निहाय पुरवठा जाहीर

जालना - जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून अंत्योदय  (नियमित) योजनेतील सप्टेंबर 2016 चा एपीएल अन्नधान्याचा पुरवठा  शिधापत्रिकाधारकास  देण्यासाठी नियतन प्राप्त झाले आहे. तालुक्यातील शासकीय गोदामावर पुरवठा करण्यात आलेला एपीएल  योजनेचा गहू, तांदूळाचा तपशील तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे.

       जालना  शासकीय गोदामावरील 44501  शिधापत्रिकाधारकांसाठी  1335 क्क्टिंल गहू, 782 ‍क्क्टिंल तांदूळ, बदनापूर या शासकीय गोदामावरील 18775  शिधापत्रिकाधारकांस 563 क्क्टिंल गहू, 376 क्क्टिंल तांदूळ,भोकरदन शासकीय गोदामावरील 53533  शिधापत्रिकाधारक 1606 क्विंटल गहू,1071 क्क्टिंल तांदूळ, जाफ्राबाद- शासकीय गोदामावरील 25128 शिधापत्रिकाधारकास 754  क्क्टिंल गहू,503 क्क्टिंल तांदूळ, परतूर- शासकीय गोदामावरील 28756  शिधापत्रिकाधारकास 862  क्क्टिंल गहू,575 क्क्टिंल तांदूळ, मंठा शासकीय गोदामावरील 25661  शिधापत्रिकाधारकास 770  क्क्टिंल गहू, 514 क्क्टिंल तांदूळ, अंबड शासकीय गोदामावरील 34287  शिधापत्रिकाधारकास 1028 क्क्टिंल गहू,651 क्क्टिंल तांदूळ आणि घनसावंगी शासकीय गोदामावरील 18740 शिधापत्रिकाधारकास 512  क्क्टिंल गहू 00 क्क्टिंल तांदूळ.    *******

अंत्योदय योजनेचा अन्नधान्याचा सप्टेंबर महिन्याचा तालूका निहाय पुरवठा जाहीर

           जालना,दि,11:- जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्याकडून अंत्योदय  (नियमित) योजनेतील सप्टेंबर 2016 चा अन्नधान्याचा पुरवठा पात्र लाभार्थ्यांना देण्यासाठी जिल्हयातील तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या शासकीय गोदामात केला आहे. तालुक्यातील शासकीय गोदामावर पुरवठा करण्यात आलेला अंत्योदय  योजनेचा गहू, तांदूळाचा तपशील तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे.
       जालना  शासकीय गोदामावरील 9027  शिधापत्रिकाधारकांसाठी  1895 क्क्टिंल गहू, 1262 ‍क्क्टिंल तांदूळ, बदनापूर या शासकीय गोदामावरील 3758  शिधापत्रिकाधारकांस 789 क्क्टिंल गहू, 525 क्क्टिंल तांदूळ,भोकरदन शासकीय गोदामावरील 7279  शिधापत्रिकाधारक 1528 क्विंटल गहू,1018 क्क्टिंल तांदूळ, जाफ्राबाद- शासकीय गोदामावरील 3981 शिधापत्रिकाधारकास 835  क्क्टिंल गहू,557 क्क्टिंल तांदूळ, परतूर- शासकीय गोदामावरील 3876  शिधापत्रिकाधारकास 813  क्क्टिंल गहू,542 क्क्टिंल तांदूळ, मंठा शासकीय गोदामावरील 4075  शिधापत्रिकाधारकास 855  क्क्टिंल गहू, 570 क्क्टिंल तांदूळ, अंबड शासकीय गोदामावरील 5839  शिधापत्रिकाधारकास 1225 क्क्टिंल गहू,817 क्क्टिंल तांदूळ आणि घनसावंगी शासकीय गोदामावरील 5144 शिधापत्रिकाधारकास 1080  क्क्टिंल गहू ,719 क्क्टिंल तांदूळ.

                                                                        *******