Friday, 2 May 2025

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकराज्य'चा वेव्हज विशेषांक प्रकाशित



मुंबई, दि. २ : मुंबईत सुरू असलेल्या 'वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट' अर्थात 'वेव्हज् २०२५' या जागतिक परिषदेच्या निमित्ताने ‘लोकराज्य’ आणि ‘महाराष्ट्र अहेड’च्या विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये सुरू असलेल्या 'वेव्हज' परिषदेत आयोजित या प्रकाशन सोहळ्यास राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव विकास खारगे, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन , एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारासू, सिडकोचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्रसिंह कुशवाह, 'लोकराज्य' चे प्रबंध संपादक तथा संचालक (माहिती) हेमराज बागुल,  संचालक (माहिती) तथा वेव्हजविषयक प्रसिद्धी मोहिमेचे समन्वयक किशोर गांगुर्डे, संचालक (वृत्त-जनसंपर्क) डॉ. गणेश मुळे, उपसंचालक (वृत्त) श्रीमती वर्षा आंधळे आदी उपस्थित होते. 

 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे प्रधान सचिव तथा महासंचालक आणि 'लोकराज्य'चे मुख्य संपादक ब्रिजेश सिंह  यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाशित झालेल्या या विशेषांकात  'वेव्हज'शी संबंधित विविध विषयांवर मान्यवरांचे महत्त्वपूर्ण लेख आहेत.

यासोबतच या अंकात सागरी किनाऱ्यांच्या सुरक्षेसाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, सिंहस्थ कुंभमेळा, अन्नसुरक्षा, जलसाक्षरतेतून जल व्यवस्थापन अशा विविध विषयांचा देखील मागोवा घेण्यात आला आहे.

-----०००----

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारत पॅव्हेलियनला भेट दिली

 





 

मुंबई, दि. १ : बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स येथील वर्ल्ड जिओ सेंटर येथे ‘ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट’ वेव्हज - २०२५ जागतिक परिषदेनिमित्त उभारण्यात आलेल्या भारत पॅव्हेलियनला  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली.

 

 भारत पॅव्हेलियनमध्ये  हरियाणा, पंजाब, राजस्थान, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा,गोवा राज्यांचे पॅव्हेलियन उभारण्यात आले आहेत. याशिवाय करमणूक  क्षेत्रातील नेटफ्लिक्स, जिओ, यू ट्यूब, मेटा,स्टार्टअप,  विविध मनोरंजन  आणि वृत्त वाहिन्या, चित्रपट निर्मिती संस्थाचे पॅव्हेलियन उभारण्यात आले आहेत . 

सर्जनशीलता, सुसंवाद आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन आणि येणाऱ्या काळात या क्षेत्रात भारताची भविष्यातील कशी वाटचाल याचे दर्शन भारत पॅव्हेलियनला मध्ये पाहायला मिळत असल्याचे  मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांनी सांगितले. 

 यावेळी श्री.फडणवीस यांनी विविध पॅव्हेलियनला भेट देऊन उपस्थित कंपन्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली.

0000/

‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्रात भारताला नेतृत्वाची संधी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनोरंजन क्षेत्रातील अत्याधुनिक ‘एआय’ तंत्रज्ञान शिक्षणासाठी नवी मुंबई येथे एज्युकेशन सिटी उभारणार

 


मुंबई, दि.  २ : जागतिक स्तरावर मनोरंजनक्षेत्रात ‘एआय’चा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. येत्या काळात नवी मुंबई येथे ‘एआय’ तंत्रज्ञानची शिक्षणनगरी उभारण्यात येणार आहे. त्यामुळे आता ‘एआय’ आणि मनोरंजन क्षेत्राचे जागतिक नेतृत्व करण्याची संधी भारताला मिळणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

वेव्हज परिषदेदरम्यान महाराष्ट्र पॅव्हेलियन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, वेव्हज परिषदेसारख्या एका व्यासपीठाची जागतिक पातळीवर गरज होती. ही गरज ओळखून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पहिल्या वेव्हज परिषदेचे आयोजन केले आणि त्याचे यजमानपद महाराष्ट्राकडे दिले राज्यासाठी ही एक मोठी संधी आहे.

वेव्हज परिषदेच्या निमित्ताने महाराष्ट्र सरकारने काही अत्यंत महत्त्वाचे सामंजस्य करार  (MoUs) केलेले आहेत. यामध्ये  सगळ्यात महत्त्वाचा, एनएसईने (NSE) वेव्हज निर्देशांक सुरू केलेला आहे. ४३ कंपन्या, या दृकश्राव्य  क्षेत्रातल्या आहेत, या कंपन्यांचा निर्देशांक सुरू झालेला आहे. त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करत आणि एकूणच फायनान्शियल इकोसिस्टीम तयार करण्याकरिता हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललेले आहे. हा वेव्हज इंडेक्स म्हणजे वेव्हजच्या यशामधला एक मुकुटमणी असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

            ऑस्ट्रेलिया आणि न्यूयॉर्क या दोन जागतिक विद्यापीठांसोबत आज सामंजस्य करार  केल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंतर्गत, परदेशी विद्यापीठांना देशामध्ये त्यांचे केंद्र उघडण्याची परवानगी मिळाली असून नवी मुंबई इथे सिडकोच्या पुढाकाराने एज्युसिटी उभारण्यात येणार आहे. या एज्युसिटीमध्ये जागतिक दर्जाची 10 ते 12 विद्यापीठे आपले कॅम्पस सुरू करणार आहेत.  त्यातील दोन विद्यापीठांशी सामंजस्य करार करण्यात आला. सुरुवातीला दीड हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे. पण भविष्यात ही गुंतवणूक वाढत जाणार आहे. आणखी तीन महत्त्वाच्या विद्यापीठांशी चर्चा सुरू आहे.  देशातले जागतिक विद्यापीठ एकत्र असलेले पहिले कॅम्पस  नवी मुंबईमध्ये  सुरू होत आहे.

यासोबत प्राइम फोकससोबत (Prime Focus) सामंजस्य करार करण्यात आला आहे, ज्याच्यामध्ये प्राइम फोकस एक फिल्मसिटी या ठिकाणी तयार करणार आहे, ज्यामध्ये जवळपास 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून किमान 10 हजार लोकांना रोजगार मिळेल.  ‘एआय’ (AI) पॉवर आणि जगातली उत्तम तंत्रज्ञानही त्या ठिकाणी असणार आहे.

 पनवेल येथे चित्रपट सृष्टी उभारण्यासाठी गोदरेज सोबतही दोन हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीबाबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. एकूण 8000 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

फिल्मसिटी म्हणजे तंत्रज्ञान

फिल्मसिटी म्हणजे लोकेशन नाही, आता फिल्मसिटी म्हणजे टेक्नॉलॉजी असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सर्व तंत्रज्ञानाने परिपूर्ण चित्रपट सृष्टी असेल. तेथे चित्रपट निर्मिती क्षेत्रातील सगळ्या गोष्टींसाठी परिसंस्था असतील. आतापर्यंत आपले लोक तिथे वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्याकरिता प्रयत्न करायचे, मात्र जे लोकं जाऊ शकत नाहीत, त्यांना तेच शिक्षण या ठिकाणी मिळणार आहे. आज वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था जर कुठली असेल, तर ती दृकश्राव्य माध्यमाची अर्थव्यवस्था आहे. सर्वात जास्त रोजगाराची संधी यात असून, या क्षेत्रात भारताला नेतृत्व करण्याची संधी आहे. कारण कंटेंट क्रिएटर्स, कंटेंट वापर, आपल्याकडे सगळ्यात जास्त आहेत. या क्षेत्रात नेतृत्व करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. वेव्हजमुळे, हे शक्य झाले आहे आणि मुंबई, ही दृकश्राव्य माध्यमाची जणू राजधानीच या संमेलनामुळे झालेली असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

००००

 

वेव्हज २०२५ मध्ये माध्यम आणि मनोरंजनासह साहस, समानतेचा उत्सव

 


 

        मुंबई, दि. २ : कथानकांमध्ये बदल घडवण्यासाठी आणि लोकांना एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ वेव्हज २०२५ ने उपलब्ध करून दिले आहे. चित्रपटसृष्टीत नवीन संधी निर्माण करण्यासाठी महिलांनी एकत्र येणे महत्वाचे आहे. धैर्याने पुढे येण्यासाठी, एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी आणि परिवर्तनाच्या बाजूने  उभे राहण्यासाठी चळवळ उभी करण्याचे आवाहन इस्त्राइलच्या अभिनेत्री रोना ली शिमोन यांनी केले. या चळवळीत समाजमाध्‍यमांची भूमिका महत्त्वाची आहे, कारण हे माध्‍यम  महिलांना त्यांचा आवाज आणि कथा सामायिक करण्याची ताकद देतो, असेही त्यांनी सांगितले.

बीकेसी मुंबई येथे वेव्हज २०२५ जागतिक शिखर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये "प्रतिकूल परिस्थितींना धैर्याने सामोरे जात , एका कथेची नवीन पटकथा लिहिणे " या विषयावरील चर्चासत्रात सुप्रसिद्ध इस्रायली अभिनेत्री रोना-ली शिमोन, इटालियन मॉडेल आणि कर्करोगातून बरी झालेली  बियांका बाल्टी, माजी जर्मन फुटबॉलपटू आणि विश्वविजेती एरिअन हिंगस्ट यांनी सहभाग घेतला.

रोना-ली शिमोन यांनी सांगितले की, चित्रपटसृष्टीत नवीन संधी निर्माण करण्यासाठी महिलांनी एकत्र यावे, धैर्याने व  एकमेकांना पाठिंबा देण्यासाठी आणि परिवर्तनाच्या बाजूने न घाबरता उभे राहण्याचे आवाहन त्यांनी केले. इथल्या प्रत्येक वक्त्याने वैयक्तिक किंवा व्यावसायिक अडचणींचा सामना केला आहे आणि त्यांचा आयुष्य़ावर परिणाम होऊ देण्याऐवजी त्यांनी त्या क्षणांचा उपयोग स्वतःची कथा नव्याने लिहिण्यासाठी केला आहे. वेव्हज २०२५ याच गोष्टीचे प्रतीक आहे. अशा व्यक्ती जे केवळ आव्हानांना सामोरे जात नाही, तर त्यांना परिवर्तन आणि प्रेरणेसाठी व्यासपीठात रूपांतरित करतात.

एरिअन हिंगस्ट हिने  पुरुषप्रधान खेळात व्यावसायिक फुटबॉलपटू म्हणून आपला  प्रवास सांगितला.  लिंगभेदावर मात करून जगज्जेता बनण्याबाबत आणि आता खेळांमध्ये निष्पक्षता आणि समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी ती करत असलेल्या प्रयत्नांबद्दल तिने माहिती दिली. पुरुषांच्या तुलनेत महिला फुटबॉलला प्रसारमाध्‍यमांकडून मिळणारी कमी प्रसिध्‍दी  आणि योग्य व्यासपीठांचा अभाव असल्याची बाब तिने अधोरेखित केली आणि महिला खेळाडूंना समान संधी आणि ओळख मिळण्याची गरज असल्याचे सांगितले.

मॉडेल आणि कर्करोगातून बरी झालेली बियांका बाल्टी हिने बरे झाल्यानंतर कामावर परतण्याची तिची यशकथा सांगितली. मॉडेलिंग उद्योगात महिला आणि पुरुषांच्या वेतनातील तफावत, महिला मॉडेल्सना त्यांच्या पुरुष सहकाऱ्यांपेक्षा मिळणारे कमी पैसे, यामुळे माध्यमांत अजूनही पुरूषप्रधान संस्कृती असल्याचे तिने स्पष्ट केले. समाजमाध्यमांमध्ये बदल घडवून आणण्याची ताकद असल्याचे तिने सांगितले.

00000

वेव्हज २०२५ : कृत्रिम बुद्ध‍िमत्ता आणि सर्जनशीलतेचा मेळ विविध साधने पुरविणारे ‘एआय’ सर्जनशीलतेची जागा घेणार नाही

 


 

मुंबई, दि. २ : ५०० दशलक्षाहून अधिक भारतीय ऑनलाइन आशय वापरत आहेत आणि प्रादेशिक भाषांकडे मोठ्या प्रमाणात वळत आहेत. सर्जनशीलता आणि उत्पादन सशक्त करणे, व्यवसाय मॉडेल्समध्ये नावीन्य आणणे, एआय-कुशल कार्यबलाचे नेतृत्व करणे आणि उद्योजकता वाढवणे यामध्ये भारत आघाडीवर आहे.  इंटरनेटपासून मोबाइल आणि आता कृत्रिम बुद्ध‍िमत्तेपर्यंतच्या डिजिटल प्रवासात भारताची भूमिका महत्वाची असल्याचे अ‍ॅडोबचे अध्यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी  शंतनू नारायण यांनी सांगितले.

बीकेसी येथे सुरू असलेल्या वेव्हज २०२५ मध्ये शिखर परिषदेच्या उद्घाटनाच्या दिवशी जागतिक उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या नेतृत्वाखाली झालेल्या तीन सत्रांमध्ये माध्यम, कथाकथन आणि डिजिटल उत्पादनात कृत्रिम बुद्ध‍िमत्तेच्या गतिमान प्रवेशाचा वेध घेण्यात आला.

वेव्हज २०२५ : ‘एआय’च्या नेतृत्वाखाली सर्जनशील परिवर्तनासाठी भक्कम पाया

सत्रांमधील चर्चेदरम्यान,  एआय हे सक्षमीकरणाचे साधन आहे. ते कोणाची जागा घेणार नाही, असा एकंदर सूर उमटला. डिझाइन, चित्रपट, अ‍ॅनिमेशन किंवा कथाकथन असो, जे मूलभूत गोष्टी समजून घेतील, नवीन साधनांचा जबाबदारीने वापर करतील आणि नीतिमत्ता, सर्जनशीलता आणि सर्वसमावेशकतेवर आधारित प्रणाली तयार करतील अशांचे भविष्य निश्चितच उज्ज्वल असेल. जागतिक स्तरावर सर्जनशील आणि तंत्रज्ञानाधारित परिसंस्थेमध्ये भारताच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा सबळ पुरावा म्हणजे वेव्हज २०२५ आहे.

"कृत्रिम बुद्ध‍िमत्तेच्या युगात संरचना, माध्यम आणि सर्जनशीलता" या विषयावर अ‍ॅडोबचे अध्यक्ष आणि मुख्‍य कार्यकारी अधिकारी शंतनू नारायण विकसित होत असलेल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेवर विस्तृत दृष्टिकोन मांडताना बोलत होते. ‘एआय’ संचालित चौकट तयार करण्यात भारताचे अद्वितीय स्थान अधोरेखित करताना अनुप्रयोगांपासून डेटा पायाभूत सुविधांपर्यंत श्री. नारायण यांनी चार-स्तरीय धोरणाची रूपरेषा मांडली.

एनव्हीडीओ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल म्हणाले की, "पीसी कार्यालयीन वेळेनंतर निद्रिस्त व्हायचे पण मानवाचे तसे नाही." एनव्हीआयडीआचा सुरुवातीचा दृष्टिकोन  पीसींना सर्जनशील साथीदार म्हणून कल्पना करणे हा आहे. आता कृत्रिम प्रज्ञा  समर्थित जगात याचा  प्रतिध्वनी कसा उमटतो,

-*-*-*-*-*-*-