Friday, 2 May 2025

डाक विभागाच्या" ज्ञान पोस्ट" सेवेला 1 मे पासुन सुरुवात

  

जालना दि.2 (जिमाका): भारतीय डाक विभागातर्फे नवीन "ज्ञान पोस्ट" ह्या सेवेची सुरुवात दिनांक 1 मे पासून करण्यात आलेली आहे. ह्या सेवे अंतर्गत ज्ञान प्रसाराचे लेखी दस्तावेज, पुस्तके, सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक साहित्य (लेखन) माफक दारात डाक सेवेच्या माध्यमातून पाठवणे शक्य होणार आहे.

"ज्ञान पोस्ट" या नवीन मेल उत्पादनाची ओळख

आढावा आणि उद्देश - ज्ञान पोस्ट हे टपाल विभागाच्या मेल सेवांतर्गत एक नवीन उत्पादन असेल, ज्याद्वारे प्रेषक विशिष्ट पुस्तके आणि अध्ययन साहित्य टपाल कार्यालयाद्वारे पाठवू शकेल.

वैशिष्ट्ये -"ज्ञान पोस्ट" या नवीन उत्पादनाची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेतः ऑनलाईन ट्रैकिंग सेवेद्वारे वस्तूचे ट्रॅक व ट्रेस करणे.  पत्त्यानुसार विशिष्ट सेवा. पोस्टिंगचा पुरावा (पोस्टिंग पावती) प्रेषकास दिला जाईल. वितरणावेळी स्वाक्षरीनिशी मिळण्याचा पुरावा (विनंतीनुसार). या वर्गाअंतर्गत नोंदवलेले पार्सल्स भूपृष्ठ मार्गे (surface mode) पाठवले जातील."ज्ञान पोस्ट" अंतर्गत पार्सल बुकिंगसाठी किमान वजन 300 ग्रॅम आणि कमाल वजन 5 किलो असेल. हे उत्पादन टपाल कार्यालयाच्या काउंटरवर किरकोळ बुकिंगसाठी उपलब्ध असेल.

प्रेषकासाठी इतर महत्त्वाच्या सुविधा - पोस्ट केलेल्या टपाल वस्तूचा प्रेषक जेथे "प्रेषक" असा उल्लेख आहे तेथे प्रेषक म्हणून विचार करण्यात यावा. पुढील अटींच्या अधीन राहून ती वस्तू पोस्टमधून मागे घेऊ शकतो किंवा तिचा पत्ता बदलू शकतो. जर ती वस्तू अद्याप प्राप्तकर्त्याच्या वितरणासाठी इनव्हॉईस केलेली नसेल. जर ती वस्तू देशातील कोणत्याही कायद्याअंतर्गत जप्त करण्यात आलेली नसेल. प्रेषक अतिरिक्त शुल्क भरून वस्तू परत मागवू शकतो, जर ती वस्तू अद्याप वितरण कार्यालयात वितरणासाठी इनव्हॉईस केलेली नसेल. तरी सर्वांनी "ज्ञान पोस्ट" ह्या सुविधेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन मोहम्मद खदीर, अधिक्षक, परभणी विभाग यांनी केले आहे.

-*-*-*-*-

एमएचटी-सीईटी 2025 पीसीएम ग्रुपची 5 मे रोजी फेर परिक्षा

 


जालना दि.2 (जिमाका): शैक्षणिक वर्ष 2025-26 करिता राज्य सामाईक प्रवेश कक्षामार्फत घेण्यात आलेली एमएचटी-सीईटी 2025 सामाईक प्रवेश परीक्षा दिनांक 9 ते 27 एप्रिल, 2025 या कालावधीत पार पाडली आहे. सदर परिक्षेदरम्यान दिनांक 27 एप्रिल, 2025 रोजी सकाळच्या सत्रात झालेल्या परिक्षेमध्ये उमेदवारांना गणित विषयाशी संबधीत तांत्रिक अडचणी उद्भवल्यामुळे उमेदवारांनी सीईटी सेलकडे ई-मेल, पत्र, टिकीट सिस्टम, दुरध्वनी आणि प्रत्यक्ष सीईटीकक्षास भेट देवुन पालक/उमेदवारांनी आक्षेप/तक्रारी नोंदविल्या आहेत. उमेदवार/पालक यांच्या तक्रारीची दखल घेवून तसेच उमेदवारांच्या शैक्षणिक हित लक्षात घेता सीईटीसेल कडून पुढील निर्णय घेण्यात आला आहे.

            दि. 27 एप्रिल, 2025 रोजी सकाळच्या सत्रात घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्याप्रमाणे दि. 27 एप्रिल, 2025 रोजी सकाळच्या सत्रात परीक्षा दिलेली आहे, अशा परिक्षेकरिता उपस्थित सर्व उमेदवारांची फेरपरिक्षा दि. 5 मे, 2025 रोजी घेण्यात येणार आहे. याची संबंधीत उमेदवारांनी कृपया नोंद घ्यावी. सदर परिक्षेस उपस्थित राहीलेल्या उमेदवारांची यादी सीईटीसेलच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. या यादीमध्ये नाव असलेल्या उमेदवारांनी फेरपरिक्षा देणे अनिवार्य आहे. सदर फेर परीक्षेचे प्रवेशपत्र उमेदवारांना त्यांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करुन देण्यात येईल.

उमेदवारांनी अधिकृत माहितीसाठी राज्य सीईटीकक्षाच्या संकेतस्थळ www.mahacet.org वर नियमीतपणे भेट द्यावी. अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

-*-*-*-*-

बेकायदेशीर बालगृहे, अनाथाश्रम, वसतिगृहे आढळुन आल्यास शासनास कळविण्याचे आवाहन

  जालना दि.2 (जिमाका): पुणे जिल्ह्यातील आळंदी व ठाणे जिल्ह्यातील खडवली येथे बेकायदेशीर बालगृहे, वसतिगृहे, अनाथाश्रम चालविले जात असल्याबाबतच्या बातम्या प्रकाशित झाल्या आहेत. वृत्तपत्रामध्ये प्रकाशित झालेल्या बातम्यानुसार तसेच सदर संस्थांमध्ये बालकांना अनधिकृतपणे डांबून ठेवण्यात येऊन त्यांचे शारिरीक, मानसिक आणि लैंगिक शोषणाच्या घटना घडत असल्याबाबतच्या बातम्या प्रसिध्द झाल्याचे निदर्शनास येत आहे. सदर बाब अत्यंत गंभीर स्वरुपाची असून बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 तसेच महाराष्ट्र राज्य बालन्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 मधील तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या आहेत.

बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि सुधारित अधिनियम 2021 मधील कलम 42 नुसार मान्यता तथा सोबतच्या नोंदणी प्रमाणपत्राप्रमाणे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त नसलेली संस्था अथवा अशी संस्था चालविणाऱ्या व्यक्तीला 1 वर्ष कारावास तसेच रुपये 1 लक्ष पेक्षा कमी नसेल एवढा दंड किंवा दोन्हीही करण्यात येईल अशी तरतुद नमुद करण्यात आलेली आहे. 

आपल्या आसपासच्या परिसरामध्ये अनधिकृत संस्था आढळून आल्यास जिल्ह्यातील जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तसेच चाईल्ड हेल्पलाईन टोल फ्री क्रमांक 1098 यावर संपर्क साधून बालकांवरील शारिरीक तसेच लैंगिक अपराधास प्रतिबंध करण्यासाठी सहकार्य करावे असे जाहिर आवाहन नयना गुंडे आयुक्त महिला व बालविकास आयुक्तालय पुणे यांनी केले आहे.

*-*-*-*-*-

राज्यपाल हरिभाऊ बागडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

  

जालना, दि.30 (जिमाका) : राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे हे शनिवार  दि.3 मे, 2025 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 2 एप्रिल 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता राजमिलन मिठाई भंडार, सदर बाजार, बडी सडक, जालना येथे आगमन होणार आहे. तसेच सकाळी 9.45 वाजता राजमिलन मिठाई भंडार, सदर बाजार, बडी सडक, जालना येथे कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. सकाळी 10.15 वाजता जेईएस कॉलेज येथे आगमन सकळी 10.30 वाजता जेईएस कॉलेज येथे जनजागृती मंडळ, जालनाद्वारे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहतील. तसेच सकाळी 11.30 वाजता इन्सिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, फेज-2 एमआयडीसी, जालना येथे आगमन सकाळी 11.50 वाजता इन्सिट्युट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी, फेज-2 एमआयडीसी, जालना येथे राखीव. दुपारी 1.05 वाजता कालिका स्टील फेज 2 येथे आगमन दुपारी 1.15 वाजता कालिका स्टील फेज 2 एमआयडीसी येथे राखीव दुपारी 2.00 वाजता शुभदायोग प्लॉट नं. 16 एन 4 सिडको, हॉटेल पालकी शेजारी छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-

 

Thursday, 1 May 2025

पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे लोकार्पण

 




 

जालना, जिमाका, दि.1 : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून आज जालना जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे लोकार्पण राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी आमदार अर्जूनराव खोतकर, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, सरिता सुत्रावे, मनिषा दांडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांची उपस्थिती होती

पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, राज्यातील गरजू रूग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आर्थिक मदत पुरवली जाते. वैद्यकीय उपचासाठी मदत मिळावी याकरिता गरजू रूग्ण व त्यांचे नातेवाईक मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज करत असतात. अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी ते मंत्रालयात वारंवार येतात. रूग्ण व नातेवाईकांना होणारा त्रास लक्षात घेवून मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दुरदृष्टीतून रूग्ण व नातेवाईकांची परवड थांबविण्याच्या उद्देशातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष सुरू करण्यासंदर्भात 22 फेब्रुवारी 2025 रोजी शासन निर्णय काढण्यात आला. शिवाय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाची 23 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडलेल्या बैठकीत त्यांनी जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष पुर्ण क्षमतेने कार्यान्वयित करणेबाबत निर्देश दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष स्थापन करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सौरऊर्जा केंद्र, पालकमंत्री कक्ष, तसेच इतर विभागाच्या प्रशासकीय कार्यालयाची पाहणी केली. सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लागावीत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय एका नवीन रुपात सज्ज झाले आहे. याचा फायदा जालना जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेला नक्की होणार असल्याचे पालकमंत्री श्रीमती मुंडे यावेळी म्हणाल्या.

 

****

 

Wednesday, 30 April 2025

विकासाच्या प्रक्रियेत राज्य शासन शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी - पालकमंत्री पंकजा मुंडे

 






 

जालना दि.1(जिमाका): राज्य शासन विविध कल्‍याणकारी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत असून, विकासाच्या प्रक्रियेत राज्य शासन शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी सदैव उभे असल्याचे, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी केले.

महाराष्ट्र दिनाच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर श्रीमती मुंडे यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश मिनियार, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात, महान विभूतींना मी सर्वप्रथम अभिवादन करते. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेंव्हा पासूनच आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यामुळेच आज आपले महाराष्ट्र राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे जालना जिल्हा देखील अग्रेसर राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि राज्याचे नाव देशात अग्रेसर ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाचा 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करून, ठोस कामगिरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘जागतिक वसुंधरा दिन’ निमित्त पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यात 22 एप्रिल ते महाराष्ट्र दिन 1 मे, 2025 या कालावधीत ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ (पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ) हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. या उपक्रमातंर्गत सर्वांनी आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या महानगरातील, पाण्याचे विविध स्त्रोत साफ केले आहेत. नद्या, नाले, तलावांची स्वच्छता केली. तसेच जालना शहरातून वाहणाऱ्या सीना-कुंडलिका नदी पात्रात मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे काढून नदीची स्वच्छता करण्याचे काम करण्यात येत असल्याच त्यांनी सांगितले.

नागरिकांमध्ये जल साक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जल व्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने 15 ते 30 एप्रिल या कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा करण्यात आला. या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या माध्यमातून समाजात पाण्याच्या सुयोग्य वापराबाबत विविध उपक्रमाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात पाणी टंचाईकरिता आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. टँकर, पुरक नळ योजना, विहिर अधिग्रहण इत्यादी या उपाययोजनांद्वारे सर्वसामान्य नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास होणार नाही. याबाबतच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत.

कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ‘अॅग्रिस्टॅक’ योजना राज्यात राबविण्यात येत असून, जिल्ह्यात सदर योजनेची अमंलबजावणी जलद गतीने सुरु आहे. जिल्ह्यात या योजने अंतर्गत सुमारे 3 लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. ‘ॲग्रीस्टॅक’ योजने अंतर्गत आपली नोंदणी आपली नोंदणी करुन घेण्याचे आवाहन पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी केले.

जिल्ह्यातील महसूल प्रशासनाने गाव नकाशात असणारे रस्ते खुले करणे व बारमाही वापरता येण्यासारखे कायमस्वरुपी रस्ते तयार करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार केला आहे. यामध्ये कालबध्द रितीने रस्ते खुले करणे, तसेच मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजनेअंतर्गत बारमाही वापरता येण्यासारखे कायमस्वरुपी रस्ते तयार करणे 1 मार्च ते 9 मे या कालावधीत हा कालबध्द कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची कायमस्वरुपी अडचण दूर होणार आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरिप हंगाम 2024-25 मध्ये 2 लाख 82 हजार शेतकऱ्यांना 107 कोटी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. तसेच विविध शासन निर्णयानुसार डिसेंबर पर्यंत प्राप्त झालेला निधी वितरीत झाला असून, उर्वरीत निधीचे वितरण सुरु आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती निधीचे वितरण सुरु आहे.

जालना जिल्ह्यात महत्वाच्या पायाभूत सुविधा उभारण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. यामध्ये जालना ड्रायपोर्ट, जालना-नांदेड समृध्दी महामार्ग आणि जालना-जळगाव रेल्वे मार्ग यांचा समावेश आहे. हे तिन्ही प्रकल्प सुरु झाल्यानंतर जालना जिल्ह्यातील उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून, जिल्ह्याच्या विकासात देखील भर पडणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना असून सदर योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज व अखंडित वीज पुरवठा करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या योजनेकरीता जिल्ह्यातील 47 उपकेंद्रासाठी 610 हेक्टर जमीन प्रदान केली आहे. या योजने अंतर्गत जालना जिल्ह्यात सहा ठिकाणी 29 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्यात 36 उपकेंद्राकरीता 186 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

 ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ या योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील 800 लाभार्थी मागील महिन्यात जालना येथुन अयोध्या येथे जाऊन दर्शन घेवून सुखरुप परतले आहे. बालविवाह रोखण्यासाठी मागील कालावधीत जिल्ह्यात चांगले काम झाले असून, जिल्ह्यात मागील वर्षात 144 बाल विवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच आज आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करीत असून, देशाला प्रगतीपथावर आणण्यामध्ये कामगार बांधवांचा महत्वाचा वाटा आहे. त्याकरीता त्यांचे अभिनंदन करुन त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देते. कामगार बांधवासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे. या मंडळाअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. कामगारासाठी असलेल्या सर्व योजने अंतर्गत कामगारांना सुमारे 72 करोड रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाच्या ‘नमो कामगार कल्याण अभियान’ अंतर्गत 4 हजार कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वितरीत करण्यात आले आहे. तर अत्यावश्यक संच व सुरक्षा संच योजने अतंर्गत 99 हजार कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संचाचा लाभ देण्यात आला आहे. तसेच सप्टेंबर 2024 पासून इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने प्रत्येक तालूक्यात ‘तालूका कामगार सुविधा केंद्र’ स्थापन केले आहे. याठिकाणी कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज तपासणी केली जात असल्याची त्यांनी माहिती दिली.

 

पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी प्रारंभी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अत्यंत संतापजनक, निंदनीय भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निरापराध नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटूंबियांना या दु:खातून सावरण्यास सामर्थ्य मिळो यासाठी प्रार्थना करत असल्याचे सांगत, या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. तसेच निरापराध नागरिकांना लक्ष्य बनवणे ही मानवता विरोधी कृती आहे असल्याचे सांगुन अशा भ्याड हल्याचा त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परेड निरीक्षण केले. त्यानंतर विविध पथकांनी संचलन केले. पोलीस शहर व ग्रामीण यंत्रणेचे पथक, वाहतूक नियंत्रण विभाग, गृह रक्षक दल, शीघ्र प्रतिसाद दल यांच्यासह अग्निशमन दल, श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन वाहन, 108 रूग्णवाहिका आदि वाहनांचा संचलनात उत्स्फूर्त सहभाग होता. पोलीस वाद्यवृंद पथकाच्या स्फूर्तीदायक महाराष्ट्र गीतांच्या वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास यावेळी स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार व नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

 




 

जालना,दि.1(जिमाका): महाराष्ट्र दिनाच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, सरिता सुत्रावे, मनिषा दांडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा कोषागार अधिकारी श्री. पुंडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

                                                           -*-*-*-*-