Tuesday, 17 October 2023

नवरात्र उत्सवामुळे वाहतुकीमार्गात बदल

 


नवरात्र उत्सवामुळे वाहतुकीमार्गात बदल

     जालना दि. 17 (जिमाका) :- जिल्ह्यात दि. 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असून त्याअनुषंगाने अंबड हद्दीतील मत्सोदरी देवी मंदीर येथे दि. 15 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर पर्यंत पाचवी, सहावी तसेच सातव्या माळेच्या दिवशी दर्शनी यात्रा भरुन मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. मंदीरात दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असून अवजड वाहनांच्या रहदारीमुळे क्षुल्लक बाबीवरुन विवादीत परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी या मार्गावरील अवजड वाहनांना पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.  जालन्याकडून अंबडमार्गे बीडकडे जाणारी वाहने व बीडकडुन अंबड मार्गे जालन्याकडे येणा-या अवजड वाहनांना दि.19 ऑक्टोबर रोजीच्या सकाळी 4.00 वाजेपासुन दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत खाली दिलेल्या पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत.

    बीडकडुन अंबडमार्गे जालन्याकडे येणारी अवजड वाहने ही (शहागड, हरीओम हॉटेल वडीगोद्रीसमोरील उड्डाणपुलाच्या खालून, पाचोड, अंबड, गोलापांगरी मार्गे जालन्याकडे जातील) तसेच जालन्याकडून अंबडमार्गे बीडकडे जाणारी अवजड वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.

     घनसावंगीकडून अंबडमार्गे जालन्याकडे जाणारी अवजड वाहने ही (सुतगिरणी चौफुली घनसावंगी,गुरुपिंपरी, राणीउंचेगाव, राणीउंचेगाव फाटा, अंबड येथील महालक्ष्मी पेट्रोल पंप समोरुन, गोलापांगरी मार्गे जालन्याकडे जातील) जालन्याकडुन अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणारी अवजड वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.

      घनसावंगीकडून अंबडमार्गे शहागडकडे जाणारी अवजड वाहने ही (सुतगिरणी चौफुली घनसावंगी, तिर्थपूरी, सुखापुरी, सुखापुरी फाटा, वडीगोद्री यामार्गे शहागडकडे जातील) शहागडकडुन अंबडमार्गे घनसावंगीकडे जाणारी वाहने ही याच पर्यायी मार्गाचा अवलंब करतील.

     वरील मार्गाचे अवजड वाहतुकीमध्ये दि.19 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 4.00 वाजेपासुन दि. 21 ऑक्टोबर 2023 रोजीच्या रात्री 12 वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. तरी सर्व वाहन धारकांनी याची नोंद घेण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिले आहेत.

-*-*-*-*-

राज्य लोकसेवा हक्क आयोगाची आढावा बैठक संपन्न नागरिकांना घरपोच शासकीय सेवा देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाऊले उचलावी - आयुक्त डॉ. किरण जाधव

 










       जालना दि. 17 (जिमाका):-  नागरिकांना पारदर्शक, गतिमानपणे आणि विहीत कालमर्यादेत माहिती तंत्रज्ञानाचा वापर  करुन जलदगतीने सेवा देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची स्थापना करण्यात आली आहे.  तरी नागरिकांना घरपोच शासकीय सेवा देण्यासाठी अधिकाऱ्यांनी पाऊले उचलावी, असे निर्देश राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त   डॉ. किरण जाधव यांनी बैठकीत दिले.

     महाराष्ट्र राज्यसेवा हक्क आयोगाच्या सेवा हक्क कायद्याबाबतची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात मंगळवार दि.17 ऑक्टोबर 2023 रोजी पार पडली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्‍ण पांचाळ, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मिना, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे यांच्यासह जिल्ह्यातील विभाग प्रमुखांची प्रमुख उपस्थिती होती.

 आयुक्त डॉ. जाधव म्हणाले की, जनतेच्या हक्कांना जपणारा हा कायदा असून या माध्यमातून प्रशासन नागरिकांच्या दारात पोहोचावे. जनतेला पारदर्शकपणे व विहित कालावधीमध्ये सेवा मिळावी या उद्देशाने ही सेवा सुरु करण्यात आली आहे.  महाराष्ट्र शासनाच्या अधिपत्याखालील सर्व शासकीय विभाग तसेच प्राधिकरणातील अधिसुचित करण्यात आलेल्या सेवांचा लाभ जनतेला देण्यात येत आहे.  येणाऱ्या काळात जालना जिल्हा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून जनतेला सेवा पुरवण्यामध्ये अग्रेसर रहावा, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

          हा कायदा जनतेसाठी अत्यंत उपयुक्त असून या कायद्याची माहिती जनतेला होण्यासाठी विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यालयात दर्शनी भागात या कायद्याच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या सेवांची व त्यासाठीच्या कालमर्यादेची माहिती दर्शनीय भागात लावणे बंधनकारक आहे. या कायद्याच्या अंमलबजावणीने प्रशासन अधिक गतीमान आणि पारदर्शक होण्यास मदत होणार  असून कालमर्यादेत जनतेला सेवा देणे आवश्यक आहे. अन्यथा, कालमर्यादेत काम न करणाऱ्या अधिकाऱ्यासाठी पाचशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली असल्याचेही डॉ. जाधव यांनी यावेळी सांगितले.

यावेळी आयुक्त डॉ. जाधव यांनी मागील वर्षभरामध्ये महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून शासनाच्या विविध विभागांमार्फत देण्यात आलेल्या सेवांचा सविस्तर आढावाही घेतला. जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या माध्यमातून जिल्ह्यात झालेल्या कामांची संगणकीय सादरीकरणाद्वारे माहिती दिली. तसेच सर्व विभाग प्रमुखांनी आपापले लॉगीन आयडी पासवर्ड तपासावेत आणि देण्यात येणाऱ्या सेवेतील प्रलंबित  प्रकरणे 10 टक्के  पेक्षा जास्त राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, अशी सुचना केली. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

            आयुक्त डॉ. जाधव यांनी कार्यालयास अचानक भेट देवून केली तपासणी

दुपारच्या सत्रात जालना शहरातील कृषी विभागाच्या जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालय व जिल्हा सरकारी कामगार अधिकारी कार्यालयास अचानक भेट देवून कार्यालयाची तपासणी केली. यावेळी आयुक्त डॉ. जाधव यांनी  प्रत्यक्ष  संगणकावर बसून डॅशबोर्डचे अवलोकन करत प्रलंबित राहिलेल्या प्रकरणाची माहिती व संगणकीय‍ सॉफ्टवेअरच्या समस्या जाणून घेत विविध सुचना केल्या. तसेच निदर्शनास आलेल्या त्रुटीबाबत एक महिन्याच्या आत अनुपालन अहवाल सादर करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. या प्रसंगी जिल्हा सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव, तालुका कृषी अधिकारी संतोष गुर्जर, जिल्हा समन्वयक प्रल्हाद तारख, सुर्यकांत मगर यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-

 

Friday, 13 October 2023

अंबड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना 14 ऑक्टोबर रोजी सुट्टी

 


 

       जालना दि. 13 (जिमाका) :-   अंतरवाली सराटी येथे दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजी  मराठा समाजाची सभा असल्याने अंबड तालुक्यांतर्गत शाळांमध्ये जाण्यायेण्याकरिता विदयार्थ्यांना त्रास होऊ नये व वाहतुकीस अडथळा निर्माण होऊ नये यासाठी अंबड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांना दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजी सुटटी देण्यात यावी, असे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा मीना यांनी  गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्राव्दारे कळवून  अंबड तालुक्यातील सर्व केंद्रप्रमुख, सर्व मुख्याध्यापक यांना सूचित करण्याबाबत निर्देश दिले आहेत. 

                                                                    -*-*-*-*-*-    

अंबड, घनसावंगी, परतूर तालुक्यात 14 ऑक्टोबरला मद्य विक्री बंद

 


      जालना दि. 13 (जिमाका) :-    मौजे अंतरवाली सराटी ता. अंबड या गावात मराठा आरक्षणा संदर्भात दिनांक 14 ऑक्टोबर 2023 रोजी सभा होणार असल्याने मौजे अंतरवाली सराटी या परिसरात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अबाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांना मुंबई दारुबंदी कायदा 1949 च्या कलम 142 (1) अन्वये अंबड, घनसावंगी व परतुर या तिन्ही तालुक्यांतील सर्व ठोक व किरकोळ देशी तसेच विदेशी मद्य अनुज्ञप्त्यांचे व्यवहार व मद्य विक्री दि. 14 ऑक्टोबर, 2023  रोजी संपूर्ण दिवस बंद ठेवण्याचे (कोरडा) आदेशीत केले आहे. आदेशाचे पालन सर्व संबंधित अनुज्ञप्तीधारकांनी करावे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कसूरदार ज्ञप्तीधारकांविरुध्द नियमातील तरतुदीनुसार कडक कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-*-

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे अर्जदारांना आवाहन

 


        जालना दि. 13 (जिमाका) :-  महात्मा फुले  मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय येथील सन 2023-24 या आर्थिक वर्षाकरीता मुख्य कार्यालय मुंबई यांच्याकडून विशेष घटक योजनेचे भौतिक उद्दिष्ट-85 आर्थिक 8.50 रुपये लाख आणि बिजभांडवल योजनेचे भौतिक उद्दिष्ट-85 आर्थिक रुपये 51 लाख प्राप्त झाल्यामुळे ऑनलाईन साईट https://nbrmahapreit.in पोर्टलवर अर्जदारांनी अर्ज भरण्याकरीता जाहिरात देण्यात आलेली आहे.

            परंतु ज्या अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरले त्यांनी अर्जाची व आवश्यक कागदपत्रांची हार्डकॉपी दोन प्रतित महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित जिल्हा कार्यालय येथे सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित एस.एल. कोची यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

आपत्ती निवारण दिनानिमित्त अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घेतली प्रतिज्ञा




 


  जालना दि. 13 (जिमाका) :- आपत्ती निवारण दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज आपत्ती प्रतिसादासाठी कटीबध्द होण्यासंदर्भात  अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रतिज्ञा घेतली. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) मनिषा दांडगे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी वैभव महेंद्रकर, नायब तहसिलदार तुषार निकम, नायब तहसिलदार संतोष अनर्थे आदींसह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

संयुक्त राष्ट्र संघाने आपत्ती धोके कमी करण्यासाठी लोकांमध्ये याबाबत जागृती निर्माण करण्याच्या दृष्टीने 13 ऑक्टोबर हा आपत्ती निवारण दिन म्हणून  घोषित केला आहे.

-*-*-*-*-*-  

14 ऑक्टोबर रोजी वाहतुक मार्गात बदल

 


 

     जालना दि. 13(जिमाका) :-    मनोज जरांगे पाटील रा. अंकुशनगर महाकाळा ता. अंबड जि. जालना व इतर यांनी दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजी मराठा समाजातील लोकांसोबत संबोधन सभेचे आयोजन केलेले आहे. मराठा समाजातील संबोधन सभेमध्ये मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र विभागातुन सभेसाठी मोठ्या प्रमाणात लोक येण्याची शक्यता असून सदर सभा ही मौजे आंतरवाली सराटी येथील रामगव्हाण रोडवरील 100 एकर जागेवर धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जवळ होणार असून सभेसाठी अनेक वाहने येणार आहे.

      सदर सभेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होणार असून वाहनांच्या रहदारीमुळे अपघात होऊ शकतो त्यासाठी जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी सदर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे. 

    पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये छत्रपती संभाजीनगर ते बीड या राष्ट्रीय महामार्गावरील येणारी व जाणारी वाहतुक व्यवस्था दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजीच्या सकाळी 8.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत (अथवा सभा संपून जनसमुदाय जाईपर्यंत)खालील सर्व प्रकारच्या वाहतुकीस खालील मार्गाने वळविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे  यांनी जारी केले आहेत.

 

     जालना-अंबड-वडीगोद्री शहागड मार्गे बीडकडे जाणारी वाहतुक पर्यायी मार्ग जालना-अंबड/घनसावंगी – आष्टी- माजलगांव मार्गे बीडकडे जाईल.   छत्रपती संभाजीनगर –पाचोड-वडीगोद्री –शहागड मार्गे बीडला जाणरी वाहतुक पर्यायी मार्ग छत्रपती   संभाजीनगर –पैठण उमापूर फाटा मार्गे बीडकडे जाईल. बीड- शहागड-वडीगोद्री  मार्गे जालन्याकडे जाणारी वाहतुक पर्यायी मार्ग बीड – माजलगाव-आष्टी –घनसावंगी/अंबड मार्गे जालन्याकडे जाईल.  बीड-शहागड-वडीगोद्री –पाचोड मार्गे छत्रपती संभाजीनगर जाणारी वाहतुक पर्यायी मार्ग बीड- उमापुर फाटा –पैठण मार्ग छत्रपती संभाजीनगरकडे जाईल.

      वरील मार्गाची सर्व वाहतुक दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत (अथवा सभा संपून जनसमुदाय जाईपर्यंत) बदल करण्यात आला आहे. तरी सर्व वाहन धारकांना याची नोंद घेण्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे. 

 

                                                                    -*-*-*-*-*-