Thursday, 12 October 2023

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीसाठी नेमलेल्या समितीने घेतला जात नोंदींच्या पुराव्याबाबत सविस्तर आढावा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

 



जालना, दि. 12 (जिमाका) :- मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या समितीची बैठक आज समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली  संपन्न झाली. ‘मराठा-कुणबी, कुणबी-मराठा’ या जात नोंदींचे सबळ पुरावे ठरणारी कागदपत्रे, पुरावे निश्चित करण्यासंदर्भात या कामकाजात सविस्तर चर्चा झाली.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पार पडलेल्या या बैठकीस समितीचे सदस्य सचिव तथा विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी वर्षा मीना,  विधी व न्याय विभागाचे सह सचिव सुभाष क-हाळे, उपायुक्त जगदीश मिनीयार,  समिती कक्षाचे उपसचिव विजय पोवार, अवर सचिव पूजा मानकर, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी केशव निटके, उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.

प्रारंभी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी जालना जिल्ह्यात विविध विभागांच्या अभिलेखेव्दारे तपासलेल्या कागदपत्रावरील नोंदींची माहिती सादरीकरणाव्दारे दिली. त्याच बरोबर समितीने भूमि अभिलेख विभाग, जिल्हा निबंधक व मुद्रांक नोंदणी विभाग या विभागांकडील नोंदींबाबतही माहिती जाणून घेतली. उर्दू, मोडी लिपीतील नोंदींबाबत संबंधित जाणकारांची मदत घेण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले. यावेळी बैठकीत उपस्थित असलेल्या मराठा समाजाच्या प्रतिनिधींची मतेही समितींनी जाणून घेतली.

बैठकीनंतर दुपारच्या सत्रात जिल्ह्यातील नागरिकांना त्यांच्याकडील उपलब्ध जुने पुरावे, कागदपत्रे समितीकडे सादर करण्यासाठी वेळ देण्यात आली होती. त्यानुसार नागरिकांकडील पुरावेही समितीने स्विकारले.

00000

 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न

 


जालना दि. 12 (जिमाका) :-  महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिनांक 12  ऑक्टोबर 2023 रोजी हुदा उर्दु प्राथमिक विद्यालय, जालना येथे राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त मार्गदर्शन शिबीर संपन्न झाले.

शिबीर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा मोहिते, दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ,  मुख्याध्यापक उबेद अब्दुल रहेमान सिद्दिकी उपस्थित होते.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा  मोहिते यांनी उपस्थित विद्यार्थांना त्यांना समजेल अशा सोप्या शब्दात लैंगिक गुन्ह्यांपासुन बालकांचे संरक्षण कायदा समजावुन सांगितला. तसेच सदर कायद्यामध्ये शिक्षेचे प्रावधान आणि विद्यार्थ्यांना गुड टच आणि बॅड टच याबाबत सांगितले. तसेच मुलींच्या विविध प्रश्नांबाबत एक कमिटी स्थापन करण्याचे निर्देश दिले.

कार्यक्रमाच्या सुरूवातीस प्रणिता भारसाकडे-वाघ यांनी आपला न्यायाधीश पदापर्यंतचा प्रवास याबद्दल विद्यार्थ्यांना सांगितले. मनामध्ये इच्छाशक्ती असली की आपण कोणत्याही पदापर्यंत पोहचु शकतो तसेच कोणत्याही गोष्टीला अगदी मनापासुन मिळवण्याचा ठरवलं तर ती गोष्ट ते ध्येय आपल्याला साध्य होवू शकते. तसेच विदयार्थ्यांना अभ्यास करतांना मोबाईल जवळ नाही ठेवला पाहिजे सर्व मन एकाग्र करून अभ्यास केला पाहिजे तसेच आयुष्याच्या वाटेवर कितीही कठीण प्रसंग आला तर त्याला तोंड देवून आपण आपल्या आयुष्यात पुढे गेले पाहिजे असे सांगितले.  कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या  हस्ते उपस्थित विद्यार्थ्यांना चॉकलेटस वाटप करण्यात आले. असे सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

16 ऑक्टोबरला महिला लोकशाही दिनाचे आयोजन

 


 

जालना, दि. 12 (जिमाका) :- महिला व बाल विकास विभागाने, समस्या व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळण्यासाठी त्यांच्या हक्कांचे संरक्षण होऊन न्याय मिळावा या हेतूने  जिल्हा तसेच तालुकास्तरावर महिलांसाठी विशेष लोकशाही दिन पाळण्यात येतो. तालुकास्तरावर प्रत्येक तहसिल कार्यालयात महिन्याच्या चौथ्या सोमवारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयात दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिनाचे आयोजन  करण्यात येते. तरी  सोमवार दि. 16 ऑक्टोबर 2023  रोजी सकाळी 11 ते 12  वाजेपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या महिला लोकशाही दिनात तक्रार दाखल करु इच्छिणा-या महिलांनी आपली तक्रार दोन प्रतित महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय जालना येथे दाखल करावी, असे  आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रेश्मा चिमंद्रे यांनी केले.

            अर्ज स्वीकृतीचे निकष पुढीलप्रमाणे तक्रार, निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, तक्रार निवेदन दोन प्रतित सादर करावे, सदरील प्रकरण न्याय प्रविष्ठ नसावे, अर्ज विहित नमुन्यात व आवश्यक त्या कागदपत्रासह सादर करावा, सेवा व आस्थापना विषयक बाबी विचारात घेतल्या जाणार नाहीत.  निवडणुक आचार संहिता काळात त्या त्या स्तरावर, विधीमंडळ अधिवेशन काळात राज्यस्तर महिला लोकशाही दिन पाळण्यात येत नाही.

     महिलांनी प्रथम संबंधीत तहसिलदार यांच्याकडे महिला लोकशाही दिनाच्या पंधरा दिवस आधी दोन प्रतीत तक्रार दाखल करावी. तालुका महिला लोकशाही दिनात एका महिन्यांचे आत कार्यवाही न झाल्यास संबंधीत महिला जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनांत तक्रार दाखल करु शकतील. तालुकास्तरावरील लोकशाही दिनांत अर्जदार महिलेस अंतिम उत्तर  शक्य तितक्या लकर जास्तीत जास्त एक महिन्याच्या आत देण्याचे बंधन संबंधित अध्यक्ष तथा तहसिलदार व सदस्य सचिव तथा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची राहील. महिलांनी तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी तालुकास्तरावर तहसिल कार्यालय व जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्याशी संपर्क करुन या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

14 ऑक्टोबर रोजी वाहतुक मार्गात बदल

 


 

     जालना दि. 12 (जिमाका) :-    मनोज जरांगे पाटील रा. अंकुशनगर महाकाळा ता. अंबड जि. जालना व इतर यांनी दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजी मराठा समाजातील लोकांसोबत संबोधन सभेचे आयोजन केलेले आहे. मराठा समाजातील संबोधन सभेमध्ये मराठवाडा, विदर्भ, खान्देश, पश्चिम महाराष्ट्र विभागातुन सभेसाठी मोठ्या प्रमाणात लोक येण्याची शक्यता असून सदर सभा ही मौजे आंतरवाली सराटी येथील रामगव्हाण रोडवरील 100 एकर जागेवर धुळे ते सोलापूर राष्ट्रीय महामार्ग जवळ होणार असून सभेसाठी अनेक वाहने येणार आहे.

      सदर सभेमध्ये मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होणार असून वाहनांच्या रहदारीमुळे अपघात होऊ शकतो त्यासाठी जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी सदर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात आले आहे.  

    पोलीस अधिनियम 1951 ची कलम 36 अन्वये छत्रपती संभाजीनगर ते बीड या राष्ट्रीय महामार्गावरील येणारी व जाणारी वाहतुक व्यवस्था दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजीच्या सकाळी 8.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत (अथवा सभा संपून जनसमुदाय जाईपर्यंत)खालील सर्व प्रकारच्या वाहतुकीस खालील मार्गाने वळविण्याचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे  यांनी जारी केले आहेत.

 

     जालना-अंबड-वडीगोद्री शहागड मार्गे बीडकडे जाणारी वाहतुक पर्यायी मार्ग जालना-अंबड/घनसावंगी – आष्टी- माजलगांव मार्गे बीडकडे जाईल.   छत्रपती संभाजीनगर –पाचोड-वडीगोद्री –शहागड मार्गे बीडला जाणरी वाहतुक पर्यायी मार्ग छत्रपती   संभाजीनगर –पैठण उमापूर फाटा मार्गे बीडकडे जाईल. बीड- शहागड-वडीगोद्री  मार्गे जालन्याकडे जाणारी वाहतुक पर्यायी मार्ग बीड – माजलगाव-आष्टी –घनसावंगी/अंबड मार्गे जालन्याकडे जाईल.  बीड-शहागड-वडीगोद्री –पाचोड मार्गे छत्रपती संभाजीनगर जाणारी वाहतुक पर्यायी मार्ग बीड- उमापुर फाटा –पैठण मार्ग छत्रपती संभाजीनगरकडे जाईल.

      वरील मार्गाची सर्व वाहतुक दि. 14 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 8.00 ते रात्री 10.00 वाजेपर्यंत (अथवा सभा संपून जनसमुदाय जाईपर्यंत) बदल करण्यात आला आहे. तरी सर्व वाहन धारकांना याची नोंद घेण्याचे आदेशात नमुद करण्यात आले आहे.  

 

                                                                    -*-*-*-*-*-         

 

 

दिपावली उत्सवानिमित्त फटाका विक्री परवान्यासाठी 23 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करावेत

 


 

जालना, दि. 12 (जिमाका) :- दिपावली सणानिमित्त जिल्ह्यात विविध ठिकाणी फटाका विक्री होत असते. विस्फोटक नियम 2008 मधील कलम 84 अन्वये सदरील तात्पुरता फटाका विक्री करण्याचे परवाने अपर जिल्हादंडाधिकारी या कार्यालयामार्फत निर्गमित होत असतात. तरी तात्पुरता फटाका विक्री नुतनीकरण व नवीन तात्पुरता फटाका परवाने अर्ज दि.23 ऑक्टोबर 2023 पर्यंत  जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी केले आहे.

तात्पुरता फटाका विक्री परवान्यासाठी या कार्यालयात मोठ्या प्रमाणात अर्ज प्राप्त होत असतात. त्याकरिता सदरील तात्पुरते परवाने विहीत मुदतीत देणे सुलभ व्हावे यासाठी यावर्षी फटाका परवाना देण्यासाठी पुढीलप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. सर्व तात्पुरता फटाका विक्री परवाने वेळेत देण्यात येतील. फटाका विक्री परवान्यासाठी  विहीत नमुन्यातील अर्ज, परवाना धारकाचा फोटो,  पॅन कार्ड , मतदान ओळखपत्र/ फोटो असलेला कुठलाही पुरावा,  महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, अजिविका व नोक-या यांवरील कर अधिनियम 1975 नुसार व्यवसाय कर अधिकारी यांच्याकडील नादेय प्रमाणपत्र,  आयुक्त तथा प्रशासक जालना महानगर पालीका/मुख्याधिकारी नगर परिषद/नगरपंचायत/ग्रामसेवक, ग्रामपंचायत यांचे कडील स्थळ दर्शक नकाशासह नाहरकत प्रमाणपत्र,  नवीन परवाना धारकांसाठी संबंधित पोलीस स्टेशनचे चारित्र्य प्रमाणपत्रासह नाहरकत (कागदपत्रे सादर केल्यानंतर संबंधित पो.स्टे.ला या कार्यालया मार्फत पत्र देण्यात येईल),  सर्व कागदपत्रे सादर केल्यानंतर नियमाप्रमाणे परवाना शुल्का नुतनीकरण शुल्क शासन जमा करण्यासाठी शासकीय चलन देण्यात येईल. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

 

 

 

 

 

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

 


 

जालना, दि. 12 (जिमाका) :- जिल्हा सामान्य रुणालय जालना व जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम व प्रेरणा प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. 10 ऑक्टोबर जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त रागोंळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, पथनाट्यासह महाविद्यालयातून जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.     

जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे घोषवाक्य मानसिक आरोग्य हा जागतिक मानवी हक्क असे आहे. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रताप घोडके, अतिजिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन शाह, मनोविकृती चिकित्सक डॉ. नितिन पवार, आणि डॉ. सुरज सेठीया, शासकिय नर्सिंग महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संदिप गोरे यांच्यासह मानसिक आरोग्य विभागातील किरण निर्मळ, त्रिशिला पाईकराव, शितल सिनगारे, सुलोचना पडघण, अंकित गिरमकार, प्रदीप शिंदे उपस्थित होते. असे जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Wednesday, 11 October 2023

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेल्या समितीची जालन्यात 12 ऑक्टोबरला बैठक

 

- सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

    - दुपारी 2 वा. नागरिकांकडून  स्विकारले जाणार पुरावे

 

जालना दि. 11 (जिमाका) :-  मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) हे गुरुवार,  दि. 12 ऑक्टोबर 2023 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर  येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि. 12 ऑक्टोबर 2023 रोजी  सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून मोटारीने जालनाकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 ते 2 या वेळेत राखीव. दुपारी 2 ते 4 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांकडून पुरावे स्विकारतील आणि सायंकाळी 4 वाजता जालना येथून चिकलठाणा विमानतळ, छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

 

-*-*-*-*-