Tuesday, 10 October 2023

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती 12 ऑक्टोबरला जालना जिल्हा दौऱ्यावर

 


सकाळी 11 वा. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक

दुपारी 2 वा. नागरिकांकडून पुरावे स्विकारले जाणार

 

            जालना दि. 10 (जिमाका) :-  मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) हे दि. 12 ऑक्टोबर 2023 रोजी जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर  येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि.12 ऑक्टोबर 2023 रोजी  सकाळी 10 वाजता छत्रपती संभाजीनगर येथून मोटारीने जालनाकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीस उपस्थिती. दुपारी 1 ते 2 या वेळेत राखीव. दुपारी 2 ते 4 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांकडून पुरावे स्विकारतील आणि सायंकाळी 4 वाजता जालना येथून चिकलठाणा विमानतळ, छत्रपती संभाजीनगरकडे प्रयाण करतील.

-*-*-*-*-

राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये 833 प्रकरणे निकाली;

 


9 प्रकरणात जोडप्यांनी सामंजस्यातून जोडीने संसार करण्याचा घेतला निर्णय

 

            जालना दि. 10 (जिमाका) :-   राष्ट्रीय विधी सेवा यांनी निर्देशित केल्यानुसार जिल्हा व सत्र न्यायालय, जालना येथे प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्राधिकरण, दिल्ली प्रकरणे, तसेच धनादेश अनादरण संदर्भातील प्रकरणे, विद्युत प्रकरणे, बँकेची प्रलंबित व दावा दाखलपूर्व वस. मूली प्रकरणे, कौटूंबिक वादाची प्रकरणे, बी.एस.एन.एल.ची दावा दाखल पूर्व प्रकरणे यासाठी राष्ट्रीय लोक अदालतीचे दि. 8 ऑक्टोबर 2023 रोजी आयोजन करण्यात आले होते. व तशी प्रकरणे ठेवण्यात आली होती. सदरच्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये एकुण 833 प्रकरणे निकाली निघाली. तर प्रकरणात तडजोडीअंती रू. 12,32,11,118/- एवढी रक्कम जमा झाली. अशी माहिती सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली.

जिल्ह्याच्या मुख्यालयी लोकअदालतीसाठी 6 पॅनल ठेवण्यात आले. त्यावर पॅनल प्रमुख म्हणुन सर्व न्यायाधीशांनी काम पाहिले. कौटुंबिक न्यायालय, जालना येथील राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये एकुण प्रकरणात तडजोड होवून प्रकरणे निकाली काढण्यात काढण्यात आली. त्यामधील 9 प्रकरणातील जोडप्यांनी परस्परांमधील वाद सामंजस्याने मिटवुन घटस्फोटाचा मार्ग सोडुन पुन्हा संसार करण्याचा निर्णय घेतला. तसेच पक्षकाराच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे सदरचे राष्ट्रीय लोकअदालतमध्ये जास्तीत जास्त प्रकरणे निकाली निघाली. पॅनल सदस्य म्हणुन मान्यवर विधीज्ञांनी आणि सरकारी अभियोक्ता यांनी काम पाहिले. या लोकअदालतीमध्ये प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष वर्षा मोहिते, जिल्हा न्यायाधीश ए. जी. जोशी व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव प्रणिता भारसाकडे-वाघ, तसेच  सर्व न्यायाधीश यांनी लोकअदालत यशस्वी करण्यासाठी अथक प्रयत्न केले. तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातील सर्व कर्मचारी व न्यायालयीन सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेउन लोकअदालत यशस्वीतेसाठी सहकार्य लाभले. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

जालना येथे 11 ऑक्टोबरला प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन बेरोजगारांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी

 


                     

          जालना दि. 10 (जिमाका) :-  नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांच्याकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या बुधवारी रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना यांच्यमार्फत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना   येथे बुधवार दि.11 ऑक्टोबर 2023 रोजी  सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधीचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जालना  येथे उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये  सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी केले आहे.

मेळाव्यासाठी भूमी कोटेक्स इंडिया, प्रा. लि. जालना यांची पदवीधर (बी.कॉम/एम.कॉम) पदवीधर उत्तीर्ण अकाऊंटंट साठी 3 पदे,  कोणतीही पदवीधर साठी सुपरवायझर 2 पदे आयटीआय फिटर,वेल्डर आणि आयटीआय इलेक्ट्रिकल साठी 14  पदे, दहावी/ बारावी हेल्पर साठी 4 पदे आणि स्नेहश्री मल्टीस्टेट को­-ऑपरेटिव्ह क्रेडीट लि.जालना यांची पदवीधर (बी.कॉम/एम.कॉम) पदवीधर उत्तीर्ण क्लर्क आणि  कॅशिअर साठी 7 पदे, दहावी बारावी पास/नापास साठी पिग्मी एजंट  4 पदे अशी एकूण 34 रिक्तपदे  प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणाऱ्या उमेदवारांच्या  प्रत्यक्ष  मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे.

              जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील स्पेशल जॉब फेयर-7 जालना याची निवड करावी. उद्योजक/नियोक्तानिहाय त्यांच्याकडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह  फोटो, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता आदि कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायांकित प्रतीचा संच सोबत ठेवून बुधवार दि. 11 ऑक्टोबर, 2023 रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत उपस्थित रहावे. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

फळपिक विमा मिळण्यासासाठी अपात्र ठरविलेल्या शेतकऱ्यांना तक्रार नोंदविण्याचे आवाहन

 

पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना


जालना दि. 10 (जिमाका) :-  पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना कृषि व पदुम विभाग शासन निर्णयान्वये मृग व आंबिया बहार सन 2021-22 ते 2023-24 या कालावधीकरिता जालना जिल्ह्यामध्ये एचडीएफसी इर्गो  जनरल इन्शुरन्स  विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. तरी ज्या शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेमध्ये सहभाग घेतला असून त्यांना विमा नुकसान भरपाई मिळण्यास अपात्र करण्यात आले आहे. त्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात संपर्क साधून आपली तक्रार नोंदवावी, जेणेकरून संयुक्त समितीमार्फत प्रत्यक्ष तपासणी करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनेनुसार जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी 4  हे. क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. तसेच अधिसूचित फळपिकासाठी एका वर्षात एका क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरिता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल.जिल्ह्यामध्ये वरीलप्रमाणे अटी व शर्तीचे पालन न करता बोगस विमा प्रकरणे निदर्शनास आलेली होती. त्यानुसार तपासणी करून बोगस विमा काढण्याऱ्यावर शासन निर्णयानुसार कार्यवाही करणे बाबत सुचना देण्यात आलेल्या होत्या.  त्यानुषंगाने कृषि आयुक्तांनी संबधित विमा कंपनी यांनी 100 टक्के क्षेत्रीय तपासणी करण्याचे आदेश दिलेले असून  त्यानुषगाने आंबिया बहार 22-23 मध्ये एचडीएफसी इर्गो  जनरल इन्शुरंस विमा कंपनी मार्फत जालना जिल्ह्यात 100 टक्के क्षेत्रीय तपासणी करण्यात आलेली आहे. एकूण 47683 अर्जदार शेतकऱ्यांची तपासणी करण्यात आली व  39756 अर्जदार शेतकऱ्यांना फळपिक योजनेस अटी व शर्तीनुसार पात्र ठरविलेले असून 7927  शेतकऱ्यांना अपात्र ठरविण्यात आलेले आहे.  असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

   

 

Friday, 6 October 2023

शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमतेकरीता कृषी उत्पादनांवर आधारीत प्रक्रीया उद्योगांवर भर द्यावा - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जिल्हा नियामक मंडळाची बैठक संपन्न

 


 

जालना, दि. 6 (जिमाका) : -  शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या आर्थिक सक्षमतेकरीता जिल्हयात कृषी उत्पादनांवर आधारीत प्रक्रीया उद्योगावर भर द्यावा. याबाबत प्रशासकीय बाबींच्या अुनषंगाने असणाऱ्या अडचणी तातडीने सोडविल्या जातील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले.

कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) जिल्हा नियामक मंडळाची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या  सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस आत्माचे प्रकल्प संचालक जितेंद्र शिंदे, प्रकल्प उपसंचालक श्रीकांत देशपांडे, खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक व्ही.एस. सोनुने,  बदनापूर कृषी संशोधन केंद्राचे डॉ. सचिन धांडगे, डॉ. के.टी. जाधव,  निविष्ठा पुरवठादार संघाचे प्रतिनिधी अतुल ब्रिजमोहन लढ्ढा, शेतकरी प्रतिनिधी उध्दवराव खेडेकर, सुनील लोखंडे  आदींसह दुग्ध, मत्स्य व्यवसाय, उद्योग, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी उपस्थित होते.

जालना जिल्ह्यात शेतीसाठी पूरक वातावरण आहे. पारंपारिक पिकांबरोबरच मोसंबी, रेशीम, सिताफळ मिरची, द्राक्ष लागवडीवर भर दिला जात आहे, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, जिल्ह्यात रस्ते, रेल्वेमार्ग या दळणवळणाच्या साधनांसह मोठी बाजारपेठ यासारख्या पायाभूत सुविधाही उत्तम आहेत. त्यामुळे कृषी उत्पादनांवर आधारीत प्रक्रीया उद्योग जिल्हयात मोठया प्रमाणात उभारल्यास निश्चितपणे शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल.  सध्या रेशीम शेती व त्यावरील प्रक्रीया उद्योगात जिल्हा वेगाने प्रगती करीत आहे. शिवाय मोसंबीचा मोठा उत्पादक म्हणूनही जालना जिल्हा ओळखला जात आहे. मोसंबीवर आधारीत प्रक्रीया उद्योग जर मोठया प्रमाणात सुरु झाल्यास भविष्यात या फळपिकावर आधारीत क्लस्टर निर्माण करता येईल. याच पध्दतीने सिताफळ, बांबू , द्राक्ष यावरील आधारीत प्रक्रीया उद्योगांनाही प्रोत्साहन दिले जाईल. आत्माने या संदर्भात अभ्यास करुन प्रस्ताव सादर करावा. याबाबत प्रशासकीय बाबींचे निराकरण करुन प्रक्रीया उद्योगांना निश्चितपणे बळ दिले जाईल.

जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी नाविण्यपूर्ण कल्पना राबविण्याबरोबरच शेती क्षेत्रातील घडामोडींचे अद्यावत मार्गदर्शन होण्याकरीता तज्ञांचे चर्चासत्रही आयोजित करावेत. तसेच जिल्हयाचे शेतीविषयक व्हीजन तयार करण्यासाठी कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्र, कृषीतज्ञ यांनी नवनवीन संकल्पना मांडाव्यात, अशी सुचनाही जिल्हाधिकारी यांनी केल्या.

प्रारंभी प्रकल्प संचालक जितेंद्र शिंदे यांनी आत्माबाबत सविस्तर माहिती दिली. सन 2022-23 व  2023-24 या वर्षात राबविण्यात आलेले विविध उपक्रम व त्यावरील खर्चाची माहिती त्यांनी यावेळी दिली.

***

 

Thursday, 5 October 2023

रोजगार मेळाव्यातून 242 उमेदवारांची निवड

 


 

      जालना दि. 5 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि.4 ऑक्टोंबर, 2023 रोजी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता.  रोजगार मेळाव्यात विविध नामांकित कपन्यांचे प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला. मेळाव्यात 569 पूरुष व 100  स्त्री  अशा एकुण 669 उमेदवारांनी सहभाग नोंदवला. 425 उमेदवारानी विविध उद्योजकाकडे मुलाखती दिल्या, त्यापैकी 242 उमेदवारांची विविध आस्थापनांनी प्राथमिक निवड करण्यात आली आहे. अशी माहिती  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भुजंग रिठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्यामार्फत दि.4 ऑक्टोंबर, 2023 रोजी बेरोजगार तरुणांसाठी जालना येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था,जालना येथे सेवा पंधरवाडा निमित्त  "पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे" आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याचे उदघाटन प्राचार्य डॉ.प्रविणकुमार उखळीकर यांच्या हस्ते झाले.  यावेळी प्रास्ताविक कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी केले,  सूत्रसंचालन  करुन आभार कौशल्य विकास अधिकारी सुरेश बहुरे यांनी मानले.

 रोजगार मेळाव्यात एन आर.बी. बियरिंग प्रा. लिमिटेड जालना - 35, एल.जी.बी. बालकृष्णन र्बोस  प्रा.लि.  जालना- 10, महिको  प्रा. लि. जालना-3, कॉपी व्हिजन  इनफोर्समेंन्ट सर्विसेस प्रा. लिमिटेड जालना- 18, गौरी ॲग्रोटेक प्रा. लि. जालना- 40, फुलंब्री टेक्स कॉम प्रा. लिमिटेड जालना- 16, क्यस कॉर्पोरेशन लि. पुणे  15, धूत ट्रान्समिशन प्रायव्हेट लि.  शेंद्रा, छ. संभाजीनगर- 45, ओम  साई मॅन पॉवर  सर्विस प्रा. लि. वाळुज, छ. संभाजीनगर- 24, यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स  छत्रपती संभाजीनगर- 13, डिस्टिल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रा. लि. छत्रपती संभाजीनगर- 9 आणि नवभारत फर्टीलायझर प्रायव्हेट लिमिटेड छ. संभाजीनगर- 14 याप्रमाणे उमेदवारांची  प्राथमिक निवड केली. तर मेळाव्यात स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या विविध महामंडळाकडे 318 उमेदवारांनी भेट दिली.  रोजगार मेळावा यशस्वी करण्यासाठी  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अधिकारी- कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

रविवारी राष्ट्रीय लोकअदालत

 


 

      जालना दि. 5 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयामध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्याअतंर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फौजदारी प्रकरणे, कलम 138 एन.आय.ॲक्टची प्रकरणे, बॅंकेची वसुली प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबधी वादाची प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणे व इतर प्रकरणे तसेच दावा दाखलपूर्व प्रकरणे आदि प्रकरणासाठी रविवार दि. 8 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व संबधितांनी या संधीचा फायदा घेवून आपापली जास्तीत जास्त प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवून तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन दिवाणी  न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

                                                             -*-*-*-*-