Thursday, 5 October 2023

समृध्दी महामार्गावरील वाहतूक ठराविक वेळ वगळता सुरळीतपणे चालू राहील

 


       जालना दि. 5 (जिमाका) :- हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृध्दी महामार्गावरील जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान दोन्ही बाजुची वाहतूक ही पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरच्या कामासाठी दि.10 ते 12 ऑक्टोबर 2023 या कालावधीत  दर दिवशी दुपारी 12 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत तसेच दि. 25 व  26 ऑक्टोबर  या दोन दिवशी दुपारी 12 ते दुपारी 3 या वेळेत बंद करण्यात आली आहे. तरी इतर वेळेत समृध्दी महामार्गावरील वाहतूक सुरळीतपणे चालू राहील, अशी माहिती अधिक्षक अभियंता तथा प्रकल्प संचालक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविली आहे.

समृध्दी महामार्गावरील जालना इंटरचेंज (IC - १४) ते सावंगी इंटरचेंज (IC -१६) दरम्यान समृध्दी महामार्गवरुन नागपूर कडुन मुंबईकडे जाणारी वाहतूक, "निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-१४ मधुन बाहेर पडुन निधोना एमआयडीसी मार्गे राष्ट्रीय महामार्ग ७५३ A (जालना - छत्रपती संभाजीनगर) मार्गे केंब्रीज शाळेपर्यंत  नंतर ती उजवीकडे वळून सावंगी बायपास मार्गे सावंगी इंटरचेंज क्र. IC- १६ (छत्रपती संभाजीनगर ) ” येथे समृध्दी महामार्गावर प्रवेश करुन शिर्डीकडे रवाना होईल. तर  समृध्दी महामार्गावरील शिर्डीकडुन नागपूर कडे जाणारी वाहतूक, “सावंगी इंटरचेंज क्र. IC-१६ (छत्रपती संभाजीनगर) येथून बाहेर पडुन वर नमूद केलेल्या मार्गावरुन (विरुध्द दिशेने) निधोना (जालना) इंटरचेंज क्र. IC-१४” या ठिकाणी समृध्दी महामार्गावर प्रवेश करुन नागपूरकडे रवाना होईल. असेही अधिक्षक अभियंता तथा प्रकल्प संचालक, म.रा.र.वि.म./ना.मु.शिंसं, द्रु. महामार्ग, छत्रपती संभाजीनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Wednesday, 4 October 2023

राष्ट्रीय लोकअदालतीचे 8 ऑक्टोबरला आयोजन; प्रकरणे लोकअदालतमध्ये तडजोडीने मिटविण्याचे आवाहन

 


 

      जालना दि. 4 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय व जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयामध्ये प्रलंबित मोटार वाहन अपघात कायद्याअतंर्गत नुकसान भरपाईचे प्रकरणे, प्रलंबित दिवाणी व फोजदारी प्रकरणे, कलम 138 एन.आय.ॲक्टची प्रकरणे, बॅंकेची वसुली प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, मजुरी संबधी वादाची प्रकरणे, भुसंपादनाची प्रकरणे, इलेक्ट्रीसीटी, पाणी बिल, महसुलची प्रकरणे व इतर प्रकरणे तसेच दावा दाखलपूर्व प्रकरणे आदि प्रकरणासाठी रविवार दि. 8 ऑक्टोबर 2023 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी सर्व संबधितांनी या संधीचा फायदा घेवून आपापली जास्तीत जास्त प्रकरणे लोकअदालतीमध्ये ठेवून तडजोडीने मिटवावीत, असे आवाहन दिवाणी  न्यायधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण सचिव यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

                                                             -*-*-*-*-

हरवलेली मुलगी आढळल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन

 


जालना, दि. 4 (जिमाका) :-  जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील सिरसगाव मंडप येथील अश्विनी दशरथ सौदागर  वय 16 वर्षे  असलेली  मुलगी हरवली आहे. मुलीची उंची अंदाजे 5 फुट असून रंग सावळा, चेहरा उभा तसेच केस काळे, पोशाख पांढऱ्या रंगाचा पंजाबी ड्रेस व लाल रंगाची ओढणी, पायात प्लास्टीकचा बुट, शिक्षण दहावी असून तिला भाषा मराठी येते. या  वर्णनाच्या मुलीला अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवुन घेवून गेल्याची  नोंद भोकरदन पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. तरी या वर्णनाची मुलगी कोणास आढळून आल्यास पोलीस ठाणे भोकरदन येथे पोलिस उप निरीक्षक विजय आहेर (मो.8087507511) आणि पोलिस ठाणे भोकरदन दुरध्वनी क्र. 02458-244210 (मो. 8459610489) असा असून हरवलेल्या मुलीच्या संबंधित माहिती असल्यास पोलिस विभागास भ्रमणध्वनीवर किंवा दुरध्वनी क्रमांकाद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक, पोलीस ठाणे, भोकरदन यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

                                                            -*-*-*-*-

Tuesday, 3 October 2023

जालना येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 4 ऑक्टोंबर रोजी रोजगार मेळावा

 


जालना, दि.  3 (जिमाका) :- मॉडेल करिअर सेंटर, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि शासकिय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जालना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 4 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 9 ते 4  वाजेपर्यंत  “पंडित दीनदयाळ उपाध्याय  रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे. या सुवर्ण संधीचा रोजगार  इच्छुक उमेदवारांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.  विविध नियोक्त्यांकडे मुलाखती देण्यासाठी किमान पाच प्रतीत बायोडाटा,  शैक्षणिक कागदपत्रे आणि आधार कार्ड/सेवायोजन नोंदणी छायांकित प्रतीसह  सकाळी 9 वाजता उपस्थित राहून  मुलाखती द्याव्यात आणि या रोजगार संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन  कौशल्य विकास रोजगार व उद्योजकताचे सहायक आयुक्त भुजंग रिठे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.                                  

रोजगार मेळाव्यात करिअर विषयक  मार्गदर्शन करण्यात येणार असून दहावी /बारावी/आय.टी.आय./बी.ए./बी.कॉम/ बी.एस सी./एम.कॉम/बी.फॉर्म/ डिप्लोमा व बी.ई./ डिप्लोमा  ॲग्री/बी.एस सी. ॲग्री /एम.एस.सी. ॲग्री /एम.बी.ए/एम.बी.ए./एम.एस.डब्ल्यू. इत्यादी पात्रताधारक नोकरी इच्छूक यांचेसाठी एकूण  953  रिक्तपदे उपलब्ध असून मुलाखतीसाठी विविध 12  कंपन्यांचे  प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.   या मेळाव्यात शासनामार्फत मोफत कौशल्य विकास प्रशिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी विविध शासकीय संस्थांचे स्टॉल्स लावण्यात येणार  आहे. तसेच  व्यवसाय इच्छुकांकरिता स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य करणाऱ्या शासनाच्या विविध महामंडळाचे स्टॉल्स लावून  योजनांचे  मार्गदर्शन  करण्यात येणार आहे.                

रोजगार मेळाव्यामध्ये एन.आर.बी. बेरिंग लि. जालना यांची 30 पदे,  धूत ट्रान्समिशन प्रा. लि. शेंद्रा, एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर यांची 300 पदे, यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स  छत्रपती संभाजीनगर यांची 200 पदे, डिस्टिल एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी प्रा. लि. (एन्ड्युरन्स टेक्नॉलॉजीज लि. वाळूज छत्रपती संभाजीनगर) यांची 21 पदे, क्यूस कॉर्पोरेशन लि. पुणे  (फोर्स मोटर्स लि, आकुर्डी, पुणे / टाटा मोटर्स लि. पिंपरी, पुणे) यांची 200 पदे,  महिको  प्रा. लि. एमआयडीसी, जालना यांची 4 पदे,  ओम  साई मॅन पॉवर  सर्विस प्रा. लि. वाळुज एमआयडीसी,  छत्रपती संभाजीनगर यांची  50 पदे , फुलब्री टेक्स कॉम प्रा. लिमिटेड, जालना यांची 70 पदे,  कॉपी व्हिजन   इनफोर्समेंन्ट सर्विसेस प्रा. लिमिटेड जालना यांची  21 पदे, एल. जी. बी . कंपनी जालना यांची 20 पदे, नव-भारत फर्टिलायझर्स प्रा. लि. छत्रपती  संभाजीनगर यांची 28 पदे  अशी एकूण 953  रिक्तपदे उपलब्ध आहेत. या मेळाव्यासाठी वरील 12 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहणार असून पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत. असेही प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून जेष्ठ नागरिक आणि महिलांच्या अधिकाराविषयी मार्गदर्शन शिबीर संपन्न

 


जालना, दि.  3 (जिमाका) :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना तर्फे दि. 30 सप्टेंबर 2023 रोजी नारायणी फाउंडेशन, जालना येथे जेष्ठ नागरिक आणि महिलांचे अधिकार या विषयावर मागदर्शन शिबीराचे आयोजन केले होते. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणुन दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर तथा जिल्हा  विधी सेवा प्राधिकरण सचिव श्रीमती प्रणिता भारसाकडे- वाघ आणि अॅड. महेशन धन्नावत हे उपस्थित होते.

श्रीमती प्रणिता भारसाकडे यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण या विषयी उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच विद्यार्थ्यांनी जीवनात कसे पुढे गेले पाहिजे आपले ध्येय कसे निवडले पाहिजे आणि ध्येयापासुन विचलित करणाऱ्या गोष्टीपासुन स्वतःला कसे दुर ठेवले पाहिजे तसेच आपल्या जीवनामध्ये शिस्त लावली पाहिजे आणि शेवटी जिद्दीने मेहनत केल्याशिवाय आपल्या जीवनाला काही अर्थ नाही, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीस अॅड. महेश एस. धन्नावत यांनी जेष्ठ नागरिकांचे अधिकाराविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत चिंचखेडकर यांनी अध्यक्षीय भाषण केले. असे सचिव, जिल्हा  विधी सेवा प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

नेहरु युवा केंद्रातर्फे जिल्हाभरात स्वच्छता मोहीम

 


 

जालना, दि.  3 (जिमाका) :-  नेहरू युवा केंद्राच्या स्वच्छता ही सेवा या मोहिमेअंतर्गत एक तास जिल्हाभरात विविध ठिकाण स्वच्छता करण्यात आली, यावेळी परतूर तालुक्यामध्ये स्वयंसेवक रुपाली भापकर, जाफ्राबाद येथे अजय पैठणे व शुभम शुक्ला, भोकरदन येथे तय्यब शाह, जालना शेवली येथे पठाण रुक्सर, बदनापुर येथे जितेंद्र खंडाळे व रवि दळे तर मंठा येथे मयुरी थोरवे व वैभव कांगणे या तालुक्यातील सर्व स्वयंसेवकांनी अभियानात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंतीचे औचित्य साधून आपआपल्या तालुक्यात तासभर परिसराची स्वच्छता केली व या मोहीमेअंतर्गत सर्व स्वयंसेवकांनी श्रमदान करुन शपथ घेण्यात आली. या अभियानात उत्स्फूर्त प्रतिसादही मिळत आहे. एक तास स्वच्छतेसाठी सर्वांनी श्रमदान करावे असे स्वयंसेवकांनी गावातील लोकांना केले, असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

नेहरु युवा केंद्रातर्फे जिल्हाभरात मेरी माटी मेरा देश उपक्रम साजरा

 


 

जालना, दि.  3 (जिमाका) :-  नेहरू युवा केंद्राच्या ‘मेरी माटी मेरा देश’ हा उपक्रम जिल्हाभरात स्वयंसेवकांच्या वतीने घेण्यात आला. यावेळी परतूर तालुक्यामध्ये स्वयंसेवक रुपाली भापकर, जाफ्राबाद येथे अजय पैठणे व शुभम शुक्ल, भोकरदन येथे तैय्यबा शाह, जालना शेवली येथे पठाण रुक्सर, बदनापुर येथे जितेंद्र  खंडाळे व रवि दळे तर मंठा येथे मयुरी थोरवे व वैभव कांगणे या तालुक्यातील सर्व स्वयंसेवकांनी घरोघरी जाऊन अमृत कलशमध्ये माती जमा केली व सेल्फी घेण्यात आली व प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार देशभरात 'अमृत कलश यात्रा सुरु आहे.  या अभियानाच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, बलिदान दिलेल्या त्या सर्व ज्ञात, अज्ञात देशवीरांप्रती नतमस्तक होण्याची, अभिवादन करण्याची संधी आपल्या प्रत्येकाला मिळत आहे अशा प्रकारे स्वयंसेवकांनी गावातील लोकांना या उपक्रमाचे महत्व़ पटवून सांगितले. असे जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-