Wednesday, 19 October 2022

कौशल्यावर आधारित प्रशिक्षण घेऊन नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बना रोजगार मेळाव्याचे थाटात उद्धाटन

 







 

        जालना, दि.19 (जिमाका) :- आजच्या आधुनिकतेच्या काळात विशेष कौशल्य आधारित प्रशिक्षित मनुष्यबळाची सर्वच क्षेत्रात मोठी मागणी होत आहे. तरुणांनी कौशल्य आधारित प्रशिक्षण घेऊन नवकल्पनेच्या माध्यमातून नोकरी मागण्यापेक्षा नोकरी देणारे बनावे असा सूर मस्त्योदरी शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नॉलॉली येथे आयोजित पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी निघाला.

            याप्रसंगी आमदार राजेश टोपे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, मॅजिक इनक्युबेशन सेंटर, औरंगाबादचे रितेश मिश्रा, मस्त्योदरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.बी.आर. गायकवाड प्राचार्य एस.के. बिरादार, कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

            आमदार राजेश टोपे म्हणाले की, आजच्या आधुनिकतेच्या काळामध्ये नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. तांत्रिक कौशल्य प्रशिक्षित मनुष्यबळाला मोठी मागणी होत आहे.  तरुणांनी विविध क्षेत्रामध्ये मागणी असलेल्या कोर्सची माहिती घेऊन ते आत्मसात करावेत. जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना कौशल्यावर आधारित शिक्षण घेता यावे यासाठी जालना व अंबड या ठिकाणी तांत्रिक शिक्षण देणाऱ्या महाविद्यालय सुरु करण्यात आले असल्याचे सांगत तरुणांनी जिद्द, चिकाटी व प्रयत्नांची जोड देत कौशल्यावर आधारित कोर्समध्ये प्राविण्य मिळवत नकारात्मकता काढून सकारात्मकवृत्तीने शिक्षण घ्यावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

        जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड म्हणाले की, तरुणांमधील सुप्तगुण,कौशल्याला वाव मिळावा यासाठी शासनाने महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा हा उपक्रम सुरु केला आहे. जिल्ह्यात झालेल्या बुटकँपमध्ये 50 तरुणांनी त्यांच्या नवसंकल्पना सादर केल्या. सर्वसामान्यांच्या समस्या लक्षात ठेऊन नवकल्पनेच्या माध्यमातून ग्राहक डोळयासमोर ठेवत सामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी अनेक उत्पादने तयार करता येऊ शकतात.  रोजगार मिळत नाही म्हणून निराश न होता तरुणांनी तांत्रिक शिक्षण घेऊन त्यात प्राविण्य मिळवत रोजगार मागण्यापेक्षा रोजगार देणारे बनावे, अशी अपेक्षा व्यक्त करत विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच वाचनाची सवय अंगिकारावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

            यावेळी मॅजिक इनक्युबेशन सेंटरचे रितेश मिश्रा यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

            याप्रसंगी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रेमध्ये प्राविण्य मिळवलेल्या कृषी क्षेत्रात सेल्फ ड्राईव्ह ट्रेलर सादर करणाऱ्या अक्षय चव्हाण, ई-प्रशासन क्षेत्रात क्यूआर कोड बेस्ट ॲटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीमसाठी सारंग वाकोडीकर तर कृषी क्षेत्रातील वील स्प्रे पंप प्रोजेक्ट सादर करणारे पवन राजु दळवी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक कौशल्य विभागाचे सहाय्यक आयुक्त संपत चाटे यांनी केले तर आभार कौशल्य विकास मार्गदर्शन अधिकारी सुरेश बहुरे यांनी मानले.  

            कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थीनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-

 

 

जायकवाडी धरणातुन गोदावरी पात्रात पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 


 

    जालना दि. 19 (जिमाका) :- कार्यकारी अभियंता जायकवाडी प्रकल्प पैठण, यांच्या संदेशानुसार आज दि. 19 ऑक्टोबर रोजी प्रकल्पाचा जीवंत पाणीसाठा 100 टक्के आहे व  पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस  होत असुन पाणलोट क्षेत्रातील नदी नाल्याद्वारे जायकवाडी धरणात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाचे एकुण 18 द्वारे 3.0 फुट उंचीवर उघडून एकुण 56 हजार 592 क्युसेक विसर्ग गोदावरी नदीमध्ये सुरु राहील. पाण्याची आवक पाहुन विसर्ग वाढविणे, कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध रहावे. उपविभागीय अधिकारी (अंबड,परतुर) व तहसिलदार (अंबड, घनसावंगी, परतुर) यांनी नदीकाठच्या परिसरातील सर्व लोकांना सतर्क राहण्याबाबत तसेच चल मालमत्ता चिजवस्तु,वाहने, जनावरे,पाळीव प्राणी व शेती अवजारे इत्यादी साधन सामग्री सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत दवंडीद्वारे सुचित करावे व पुरापासुन सावध राहण्यासाठी आपल्या स्तरावरुन ईशारा देण्यात यावा,  असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

खडकपूर्णा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

 


 

    जालना दि. 19 (जिमाका) :-  खडकपुर्णा प्रकल्प  पुर नियंत्रण कक्ष, ता. देऊळगावराजा यांच्या संदेशानुसार आज दि. 19 ऑक्टोबर रोजी प्रकल्पाचा जीवंत पाणीसाठा 100 टक्के आहे व  पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस  होत असुन पाणलोट क्षेत्रातील नदी नाल्याद्वारे खडकपुर्णा प्रकल्पात पाण्याची आवक वाढत असल्यामुळे धरणाची पाणी पातळी वाढत आहे. धरणाचे एकुण 13 द्वारे 0.30 मीटरने उघडून एकुण 15 हजार 147.99 क्युसेक विसर्ग नदीमध्ये सुरु राहील. पाण्याची आवक पाहुन विसर्ग वाढविणे, कमी करणेबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल तरी नदी काठच्या गावांतील नागरिकांनी सावध रहावे. उपविभागीय अधिकारी (परतुर) व तहसिलदार (मंठा) यांनी नदीकाठच्या परिसरातील सर्व लोकांना सतर्क राहण्याबाबत तसेच चल मालमत्ता चिजवस्तु,वाहने, जनावरे,पाळीव प्राणी व शेती अवजारे इत्यादी साधन सामग्री सुरक्षित स्थळी हलविण्याबाबत दवंडीद्वारे सुचित करावे व पुरापासुन सावध राहण्यासाठी आपल्या स्तरावरुन ईशारा देण्यात यावा,  असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

शेतकऱ्यांनी पंतप्रधान पिकविमा योजने अंतर्गत नुकसान भरपाईसाठी काढणी पश्चात नुकसान अंतर्गत पिक नुकसानीची माहिती 72 तासांच्या आत विमा कंपनीस कळविणे बंधनकारक

 


 

जालना दि. 19 (जिमाका) :- जालना जिल्ह्यामध्ये मागील काही  दिवसामध्ये परतीच्या पावसामुळे काही महसूल मंडळामध्ये सतत पाऊस,अतिवृष्टी झाली आहे.त्यामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन शेतीक्षेत्राचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.         प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2022 जालना जिल्ह्यामध्ये एचडीएफसी इरगो जनरल इन्शुरंस  कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.

सद्यस्थितीमध्ये बाजरी,मका व सोयाबीन या पिकाची कापणी सुरु असून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या पावसामुळे पिकांचे  नुकसान झाल्याचे निदर्शनास आलेले आहे.त्यानुषंगाने शासन निर्णयातील मार्गदर्शक सूचनानुसार हंगाम कालावधीमध्ये अधिसूचित क्षेत्रामधील अधिसूचित पिकाचे शेतात कापणी करून सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या,कापणी पासून जास्तीत जास्त 2 आठवड्यापर्यंत (14 दिवस) गारपीट,चक्रीवादळ ,चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसान भरपाई निश्चित करणेसाठी शेतकऱ्यांनी विमा दावा मंजूर होणेसाठी झालेल्या पिक नुकसानीची माहिती/पूर्वसूचना कंपनीस देणे आवश्यक आहे.

त्यासाठी पिक विमा धारक शेतकऱ्यांनी गुगल प्ले स्टोअर वरून Crop Insurance हे अप डाऊनलोड करून त्यामध्ये आपल्या नुकसानीची माहिती भरावी किंवा एचडीएफसी इरगो विमा कंपनीच्या १८०० २६६ ०७०० या टोल फ्री क्रमांकावर किंवा विमा कंपनीचे पिहू whatsapp bot(730454888)याद्वारे नुकसानीची पूर्वसूचना द्यावी.जर एखाद्या शेतकऱ्याला वाटत असेल पूर्वी तक्रार दिलेली आहे परंतु पूर्वीपेक्षा जास्त नुकसान वाटत असेल तर त्यांनी पुन्हा एकदा तक्रार वरील पर्यायाद्वारे नोंदवू शकतात.तक्रार नोंदवताना ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला तक्रार नोंदविताना घटनेचा प्रकार हा जास्त पाऊस निवडलेला असेल तर पुन्हा एकदा तक्रार देताना घटनेचा प्रकार inundation(क्षेत्र जलमय होणे)हा प्रकार निवडून पिकाची अवस्था Harvested निवडून व्यवस्थित तक्रार द्यावी.

            तथापि काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकरी वरील माध्यमद्वारे विमा कंपनीस पूर्वसूचना देऊ न शकल्यास विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी किंवा जिल्हा प्रतिनिधी,संबधित तालुका कृषि अधिकारी कार्यालय यांचेकडे प्रत्यक्ष 2 प्रतीत अर्ज देऊन एका प्रतीवर पोहोच घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय राठोड व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी भिमराव रणदिवे यांनी केले आहे.

                                        -*-*-*-*-*-*-

नेहरु युवा केंद्राच्या वतीने क्लीन इंडिया कार्यक्रम संपन्न

 



 

        जालना, दि. 19 (जिमाका) :-नेहरु युवा केंद्र जालना, समाजकार्य महाविद्यालय रामनगर जालना व युवा बहुद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने समाजकार्य महाविद्यालय, रामनगर येथे स्वच्छ भारत 1 ते 31 ऑक्टोबर च्या दरम्यान 19 ऑक्टोबर रोजी विशेष मेगा स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. तसेच सांस्कृतिक विभाग प्रमुख  डॉ. दीपक बुक्तरे व   सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.डॉ. रेणुका भावसार यांनी स्वच्छतेचे महत्व  विद्यार्थ्यांना सांगून महाविद्यालयाच्या परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित जिल्हा युवा अधिकारी नेहरु युवा केंद्र  प्रणित सांगवीकर, लेख व कार्यक्रम पर्यवेक्षक नेहरु युवा केंद्र, वसंत सुर्वे, सांस्कृतिक विभाग प्रमुख दीपक बुक्तरे, डॉ. रेणुका भावसार, डॉ. नरसिंग पवार, डॉ. बालाजी मुंढे, डॉ. प्रवीण कानकुटे, डॉ. मीना बोर्डे, डॉ. मधु खोब्रागडे, संस्थेचे अध्यक्ष जयपाल राठोड, महेश जाधव, शीतल मगर, अभिषेक तौर, किशोर वैद्य, वैष्णवी खरात इत्यादींची उपस्थिती होती अशी माहिती जिल्हा युवा अधिकारी, नेहरु युवा केंद्र यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे.

 

-*-*-*-*-*-

Tuesday, 18 October 2022

19 रोजी महाराष्ट्र स्टार्टअप व नाविन्यता यात्रा जिल्हास्तरीय पारितोषिक वितरण समारंभ

 


 

जालना, दि. 18 (जिमाका):-  नाविन्यपूर्ण संकल्पना आणि नवउद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र स्टार्ट-अप व नाविन्यता यात्रा दुसरा टप्पा जिल्हास्तरीय सादरीकरण सत्रात निवड झालेल्या प्रथम अक्षय विजय चव्हाण, कृषी क्षेत्र-सेल्फ ड्राईव्ह ट्रेलर,  द्वितीय सारंग वाकोडीकर, ई प्रशासन क्षेत्र-QR कोड बेस्ड अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीम आणि तृतीय पवन राजु दळवी, कृषी क्षेत्र -वील स्प्रे पंप या  पहिल्या तीन नवउद्योजकांना  मत्सोदरी शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, नागेवाडी औरंगाबाद रोड, जालना येथे  दि. 19 ऑक्टोंबर, 2022 रोजी आयोजित रोजगार मेळाव्यामध्ये पारितोषिक वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र स्टार्ट-अप व नाविन्यता यात्रा दुसरा टप्पा जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबिर सादरीकरण सत्राचे दि.13 ऑक्टोंबर, 2022 रोजी जे. ई. एस. महाविद्यालय, जालना येथे आयोजन करण्यात आले होते. सादरीकरण सत्रास नोंदणी केलेल्या 59 पैकी 43 नागरिकांनी स्थानिक समस्येसाठी उत्तम उपाय असलेल्या कृषी, शिक्षण, आरोग्य, सस्टेनिबिलिटी (कचरा व्यवस्थापन, पाणी, स्वच्छ उर्जा .), प्रशासन, स्मार्ट पायाभुत सुविधा व गतिशीलता आणि इतर क्षेत्रातील या 07 क्षेत्रातील आपल्या नाविन्यपूर्ण व्यवसाय संकल्पनांचे जिल्हास्तरीय तज्ञ समितीसमोर सादरीकरण केले होते.

 

जिल्हास्तरीय विजेत्यांची घोषणा  व पारितोषिक समारोह

जिल्हास्तरीय सादरीकरण सत्रास नियुक्त तज्ञ परीक्षण समितीच्या परीक्षणाअंती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समितीव्दारे प्रथम श्री.अक्षय विजय चव्हाण, कृषी क्षेत्र-सेल्फ ड्राईव्ह ट्रेलर,  द्वितीय श्री.सारंग वाकोडीकर, ई प्रशासन क्षेत्र  -QR कोड बेस्ड अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीम आणि तृतीय श्री.पवन राजु दळवी, कृषी क्षेत्र -वील स्प्रे पंप या क्षेत्रातील जिल्हास्तरावर पहिल्या तीन उत्कृष्ट व्यवसाय नवसंकल्पनांची निवड करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय सादरीकरण सत्रात या विजेत्या तीन नवउद्योजकांना मत्सोदरी शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी, नागेवाडी औरंगाबाद रोड, जालना येथे दि. 19 ऑक्टोंबर, 2022 रोजी सकाळी ९ वाजता पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

 

राज्यस्तरीय विजेत्यांची घोषणा  व पारितोषिक समारोह -

प्रत्येक जिल्हयातील सादरीकरण सत्रातील सर्वोत्तम 3 संकल्पनांमधून राज्यस्तरीय निवड तज्ञ समितीसमोर अंतिम विजेत्यांची निवड झालेली असून, श्री. सारंग वाकोडीकर यांच्या ई प्रशासन या क्षेत्रातील QR कोड बेस्ड अटेंडन्स मॅनेजमेंट सिस्टीम व्यवसाय नवसंकल्पनेची राज्यस्तरावर प्रथम विजेते म्हणून निवड झाली असून,  मा. राज्यपाल यांचे हस्ते दि. 16 ऑक्टोबर, 2022 रोजी राजभवन, मुंबई येथे पारितोषिक व प्रमाणपत्र वितरण समारंभ संपन्न झाला आहे. तसेच, सदर विजेत्यांना पेटेंट सहाय्य, इन्क्युबेशन सहाय्य, बीज भांडवल,निधी साठी सहाय्य, नाविन्यता परिसंस्थेतील महत्वाच्या संस्था व तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन, तसेच सॉफ्टवेअर क्रेडीटस, क्लाऊड क्रेडीटस इत्यादी सारखे इतर लाभही पुरविण्यात येणार आहेत. अशी सहायक आयुक्त माहिती कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-*-

19 रोजी जालना येथे पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा 727 रिक्तपदांसाठी भरती

 


जालना, दि. 18 (जिमाका):-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना व मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी  यांचे संयुक्त विद्यमाने दि. 19 ऑक्टोबर 2022, बुधवार  रोजी मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे कॉलेज  इंजिनीअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजी  नागेवाडी, जालना  येथे सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत  पंडित दीनदयाळ उपाध्याय  रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात दहावी पास किंवा नापास,बारावी,आय.टी.आय,बी..,बी.कॉम,एम.कॉम,बी.एस सी., डिप्लोमा  इंजिनिअर,बी.ई.,डिप्लोमा  ॲग्री,बी.एस.सी.ॲग्री,एम.एस.सी.ॲग्री,एम.बी.ए,ए.एन.एम,जी.एन.एम,बी.एस.सी.(नर्सिंग) या पात्रताधारक उमेदवारांसाठी 727 रिक्तपदे उपलब्ध असून प्रत्यक्ष मुलाखतीसाठी विविध 24 कंपन्या व आस्थापनांचे  प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच, कौशल्य विकास व स्वयंरोजगाराबाबत विविध महामंडळांचे स्टॉल्स लावून विविध अर्थसहाय्य योजनांचे  मार्गदर्शन  करण्यात येणार आहे. या मेळाव्याच्या ठिकाणी जाण्यासाठी उमेदवारांना जालना  येथील बस स्टँड, रेल्वे स्टेशन, अंबड चौफुली आणि  विशाल कॉर्नर येथून  इंजिनिअरिंग कॉलेजच्या बसेसची  मोफत सुविधा करण्यात आलेली आहे.

 

            या रोजगार मेळाव्यामध्ये  जालना येथील एन.आर.बी. बेरिंग लि. यांची 60 पदे, लक्ष्मी कॉटस्पिन लि. यांची 60 पदे, दिव्या एस. आर.जे. फुडस यांची 60 पदे, व्हिजन इलेक्ट्रोमॅक यांची 26  पदे, सिल्व्हर्क्स स्ट्रिप्स इंडस्ट्रीस प्रा.ली. यांची 26 पदे, भूमी कॉटेक्स इंडस्ट्री प्रा.लि प्रा.लि.यांची 19 पदे, एल.जी.बालाकृष्णन ॲण्ड ब्रॉस लि. यांची 15 पदे, एप्रोकॉप इंजिनिअरिंग प्रा.लि.  यांची 14  पदे, श्री बालाजी ट्रॅक्टर्स  यांची 12  पदे, ठाकुरजी सॅाल्व्हेक्स प्रा. लि.  यांची 10 पदे, विक्रम टी प्रोसेसर प्रा.लि. यांची 10 पदे, गौरी ॲग्रोटेक प्रोडक्टस प्रा.लि.  यांची 9 पदे, आई इन्शुरन्स ॲण्ड इन्वेस्टमेंट सर्विसेस यांची 50 पदे, जय बालाजी एंटरप्राइजेस यांची 150  पदे, जालना क्रिटिकल केअर हॉस्पिटल, यांची 9  पदे, कृषीधन सिडस प्रा.लि.  यांची 6 पदे, राजलक्ष्मी ॲग्रोटेक इंडिया प्रा.ली. यांची 5 पदे, यश इंट्रप्राईजेस  यांची 6  पदे, वरकड हॉस्पिटल प्रा.लि. यांची 4 पदे, संत कृपा  हॉस्पिटल  यांची 3  पदे, यंशवते शु पॅलेस ॲण्ड स्पोर्टस यांची 10 पदे, मोदी पाईप प्रा.ली.  यांची 2 पदे, आणि औरंगाबाद येथील बडवे इंजीनिअरिंग लि. यांची 120 पदे व  नवभारत फर्टिलाईजर लि, यांची  41 पदे. अशी एकूण 727 रिक्तपदे उपलब्ध आहेत. या मेळाव्यासाठी वरील 24 नामांकित कंपन्यांचे नियुक्ती अधिकारी उपस्थित राहणार असुन पात्र उमेदवारांच्या चाचणी व मुलाखती घेऊन विविध पदांसाठीच्या रिक्त जागांसाठी निवड व भरती करणार आहेत.

 

                      या सुवर्ण संधीचा बेरोजगार उमेदवारांनी जास्तीत जास्त फायदा घ्यावा. तसेच, रोजगार  इच्छुक उमेदवारांनी याचा लाभ घेण्यासाठी किमान पाच प्रतीत रिझ्युम/बायोडाटा  आणि  शैक्षणिक कागदपत्रे आधार कार्ड, सेवायोजन नोंदणी छायाप्रतीसह  सकाळी 9 वाजता उपस्थित राहावे. नोकरी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोकरी साधक म्हणून नोंदणी करावी. तसेच, यापुर्वी महारोजगार वेब पोर्टलवर नोंदणी केली असल्यास वरील सुधारीत संकेतस्थळावर आपला 15 अंकी नोंदणी क्रमांक टाकून लॉगीन करावे आणि मोबाईल आधार क्रमांक पडताळणी करावी. तसेच, या वेबपोर्टलवर लॉग-इन करुन जॉब फेअर टॅबवर  क्लिक करुन पंडित दीनदयाळ उपाध्याय  रोजगार मेळावा जालना 3 (2022-2023)   या मध्ये जाऊन पात्रतेप्रमाणे विविध कंपन्याच्या उपलब्ध रिक्तपदांसाठी ॲप्लाय करावे, यासाठी काही अडचण आल्यास कार्यालयीन दुरध्वनी व व्हॉटस्अप  क्रमांक 02482-299033 वर संपर्क करावा. या मेळाव्यास नोकरी इच्छूक उमेदवारांनी  उपस्थित राहुन  मुलाखती द्याव्यात आणि या रोजगार संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता, संपत चाटे,  यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-