Friday, 15 May 2020

जालना जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाबाधित महिला व पारध येथील तरुणीला रुग्णालयातुन डिस्चार्ज डॉक्टरांसह आरोग्यपरिचारिकांनी पुष्पवृष्टी करत टाळया वाजवुन दिला निरोप साहब आप सबने हमारी बहोत खिदमद की कोरोनामुक्त महिलेने व्यक्त केल्या भावना


        जालना, दि. 15 (जिमाका) :-  कोरोना बाधीत होने के बाद हमे यहा लाया गयायहा पे हमारी अच्छी खिदमद की गई.. सबकी की दुआँसे आज सब ठिक हॅु.. यहॉ के डॉक्टर्स, स्टाफ ने हमारी बहोत खिदमद की.. डॉक्टर साहब ने भी हमे हमारा बहोत ख्याल रखा.. अशा भावना कोरोनातून वाचलेल्या व आज जिल्हा सामान्य रूग्णालयातून सुट्टी देण्यात आलेल्या महिलेने व्यक्त केल्या.
            जालना जिल्ह्यामध्ये पहिली कोरोनाबाधित आढळलेली दु:खीनगर येथील 65 वर्षीय महिला तसेच पारध ता. भोकरदन येथील तरुणीच्या स्वॅबचा अहवाल  निगेटीव्ह आल्याने जिल्हा रुग्णालयातुन आज                             दि. 15 मे, 2020 रोजी डिस्चार्ज देत डॉक्टर व परिचारिकांनी टाळया वाजवुन पुष्पवृष्टी करत दोघींना निरोप देण्यात आला. या महिलांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांनी दिली.
            यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, डॉ. म्हस्के, डॉ.जगताप, डॉ. सोळंके, डॉ. राठोड, डॉ. सर्वेश पाटील आदींची उपस्थिती होती.
            जालना येथे कोरोनाबाधित रुग्णांसाठी 150 खाटांचे स्वतंत्र अशा कोव्हीड19 रुग्णालयाची उभारणी करण्यात आली असुन या दवाखान्यामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारासाठी विविध तज्ज्ञ, डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करण्यात येत आहेत.  त्याचप्रमाणे कोरोनाबाधितांची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या सुचनेनुसार आहार तज्ज्ञांच्या सल्ला घेत रुग्णांना दोन वेळेत वरण, भात, भाजी, पोळी याबरोबरच रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यामध्ये मदत करणारे उकडलेले अंडे, गुळ, शेंगदाणे, सोयाबीन वडी, दुध याबरोबरच प्रोटीनचा भरपुर समावेश असलेल्या थ्रेप्टीन बिस्कीटांचाही या रुग्णांच्या आहारामध्ये समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांच्या प्रकृती सुधारणा होत आहे.
            जिल्ह्यातील नगरपंचायत, नगर परिषद तसेच ग्रामपातळीवर अँटीकोरोना पथकाची स्थापना करण्यात आली असुन या पथकाच्या माध्यमातुन परजिल्ह्यातुन जालना जिल्ह्यात येणाऱ्या व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असुन जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तींना होमक्वारंटाईन अथवा गरजेनुसार आयसोलेशन कक्षात भरती करण्यात येत असुन असुन जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्युचे प्रमाण शुन्य टक्के असल्याची माहिती प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.  
                                                                      -*-*-*-*-


Thursday, 14 May 2020

खरीप हंगाम 2020 मध्ये शेतक-यांना रासायनिक खते, बियाणे यांचा मुबलक प्रमाणात पुरवठा होणार


जालना दि. 14 (जिमाका) – खरीप हंगाम 2020 जालना जिल्ह्याचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र 5.89 लक्ष हेक्टर असून कापुस, सोयाबिन, मका आणि तुर ही प्रमुख  पिके आहेत. पिकाचे प्रस्तावित पेरणी क्षेत्र व बियाणे दर यानुसार एकुण 36 हजार 196 क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. दि. 13 मे 2020 पर्यंत जिल्ह्यामध्ये  सोयाबीन 5 हजार 700 क्विंटल, संकरीत कापुस 4 लक्ष 50 हजार पाकिटे , मका 2 हजार 48 क्विंटल, बाजरी 219 क्विंटल आणि मुग 120 क्विंटल बियाण्याची बाजारात उपलब्धता झाली आहे.
            जिल्ह्यासाठी रासायनिक खतांचे मंजुर आवंटन 1 लक्ष 65 हजार 190  मेट्रीक टन मंजुर असुन 13 मे 2020 अखेर जिल्ह्यामध्ये 89 हजार 656 मेट्रीक टन झालेली असुन त्यापैकी 46 हजार 82 मेट्रीक टन  खताची विक्री शेतक-यांना कृषि सेवा  केंद्रातुन POS मशिनद्वारे झाली असुन 43 हजार 574 खत साठा जिल्ह्यात शिल्लक आहे. जिल्ह्यामध्ये कोठेही खताची टंचाई नाही व येत्या खरीप हंगामात शेतक-यांना खते आणि बियाणांचा तुटवडा होणार नाही याची काळजी कृषि विभाग घेत आहे. शेतक-यांना दर्जेदार कृषि निविष्ठा मिळण्यासाठी जिल्हास्तरावर कृषि‍ विकास अधिकारी यांचे अध्यक्षेतखाली – 1 व तालुका स्तरावर संबंधित तालुक्याचे तालुका कृषि अधिकारी यांचे अध्यक्षतेखाली - 8 असे एकुण -9  भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. बियाणे, रासायनिक खते, व किटकनाशके बाबत तक्रारीचे निराकरणे करण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हा परिषद कृषि विभाग व प्रत्येक तालुक्याचे ठिकाणी पंचायत समिती कृषि विभागामध्ये तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे. या ठिकाणी शेतकरी आपली तक्रार नोंदवू शकतात. जिल्ह्यात व राज्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव असल्याने कृषि निविष्ठा केंद्रावरील शेतक-यांची गर्दी टाळण्याचे दृष्टीकोनातून शेतक-यांना बांधावर बियाणे व खते पुरवठा करण्याची मोहिम राबविली जात आहे. असे कृषि‍ विकास अधिकारी जिल्हा परिषद जालना भिमराव रणदिवे तसेच जिल्हा अधिक्षक कृषि‍ अधिकारी जालना बाळासाहेब शिंदे यांनी एका प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.  
-*-*-*-*-*-


खाजगी वैदयकीय व्यवसायीक, खाजगी औषध विक्रेते,खाजगी प्रयोगशाळांनी त्यांच्याकडील क्षयरुग्णांची माहिती निक्क्षय ॲपवर कळवावी. जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे निर्देश

          जालना, दि. 14 - क्षयरोग ही सार्वजनिक आरोग्याची गंभीर समस्या आहे. क्षयरोगाचे नियंत्रण करण्यासाठी क्षयरोगाचे लवकरात लवकर निदान आणि संपुर्ण औषधोउपचार करणे अत्यंत आवश्यक आहे.जेवढे रुग्ण शासकीय आरोग्य संस्थेमध्ये औषधोपचार घेतात त्याच प्रमाणात खाजगी वैदकीय व्यवसायिकांकडे रुग्ण औषधोपचार घेतात. चुकीचे रोगनिदान आणि अनियमित औषधोपचार यामुळे औषधोपचार यामुळे औषधोपचारास दाद न देणारा डी.आर.टिबी होण्याची दाट शक्यता असते.यामुळे क्षयरोग हा नोटीफायबल आजार म्हणुन घोषीत करण्यात आला आहे.
                खाजगी वैदयकीय व्यवसायीक, खाजगी औषध विक्रेते,खाजगी प्रयोगशाळा यांनी त्यांच्याकडील क्षयरुग्णांची माहिती निक्क्षयॲपदारे जिल्हा क्षयरोग अधिकारी यांना कळविने बंधनकारक आहे. शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार टिबी नोटिफिकेशन करीता रुपये 500 रुपये तसेच रुग्णाचा संपुर्ण औषधोपचार पुर्ण झाल्याचे कळविण्यानंतर 500 रुपये इंन्सेटीव्ह देय आहे.तसेच उपचारावर असणा:या सर्व क्षयरुग्णांची सिबीनेंट तपासणी ,एचआयव्ही  तपासणी ,आरबीएस तपासणी करणे आवश्यक आहे,जी की शासकीय आरोग्य संस्थामध्ये बिनामुल्य आहे.
       परंतु अनेक खाजगी वैदकीय व्यवसायिक, खाजगी औषध विक्रेते व खाजगी प्रयोगशाळा हे त्यांच्याकडील प्रत्येक क्षयरुग्णांची माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयास निक्क्षय ॲपदवारे सादर करत नाहीत ही बाब अत्यंत गंबीर स्वरुपाची असुन जालना जिल्हयातील खाजगी औषध विक्रेत्यांकडुन माहे जानेवारी ते एप्रिल -2020 पर्यतची क्षयरोग विरोधी औषधाच्या विक्री बाबतची माहिती मागविण्यात आली होती. या माहितीचे अवलोकन केले असता एकुण 107 क्षयरुग्णांनी खाजगी औषध विक्रेत्याकडुन टिबी रोगाची औषधी खरेदी केल्याचे निदर्शनास आले आहे.परंतु सदर रुग्णांची खाजगी वैदयकीय व्यवसायिक यांनी निक्क्षय ॲपमध्ये नोंदी केलेल्या नाहीत. यावरुन असे निदर्शनास येते की खाजगी वैदयकीय व्यवसायिक आपल्याकडील क्षयरुग्णांची माहिती प्रशासनापासुन दडपुन ठेवत आहेत.दर महिन्याला साधारणपणे 80 ते 90 क्षयरुग्णांची नोंदी खाजगी वैदयकीय व्यवसायिक यांच्यादवारे निक्क्षय प्रणालीमध्ये होत असतात परंतु मार्च महिन्यात 50 क्षयरुग्णांच्या नोंदी व एप्रिल महिन्यात केवळ 23 क्षयरुग्णांच्या नोंदी केलेल्या आढळुन आल्या आहेत.ही बाब सामाजिक आरोग्याच्यादृष्टिने गंभीर आहे.
     खाजगी रुग्णालये,खाजगी औषध विक्रेते व खाजगी प्रयोग शाळा यांनी त्यांच्याकडे निदान झालेल्या क्षयरुग्णांची नोंद निक्क्षय ॲपदवारे घेऊन शासन यंत्रणेस कळविण्यात यावे, भारत सरकारच्या राजपत्रानुसार माहिती न देणाऱ्या खाजगी वैदकीय व्यवसायिक ,खाजगी औषध विक्रेते व खाजगी प्रयोग शाळा चालक यांच्या विरुध्द भारतीय दंड संहिता 1860 अधिनियम क्रं.45 चे कलम 269 व 270 नुसार दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद घ्यावी. तसेच जिल्हयातील खाजगी क्षेत्रातील वैदकीय व्यवसायिक, औषध विक्रेते व प्रयोगशाळा यांचे ऑनलाईन निक्क्षय प्रणालीमधील नोंदी झालेल्या नसेल तर त्यांनी क्षयरोग कर्मचारी यांच्याशी संपर्क साधुन आपल्या संस्थेची निक्क्ष्य ॲप मध्ये नोद करुन घ्याव्यात.
       जिल्हयात कोविड -19 या विषाणुमुळे साथरोग परिस्थिती उदभवलेली आहे. क्षयरुग्ण हे कोविड -19 या विषाणुच्या संक्रमणास अतिजोखमग्रस्त असल्याने त्यांचे निदान वेळेत होऊन औषधोपचार सुरु होणे आवश्यक आहे. खाजगी वैदकीय व्यवसायिक,खाजगी औषध विक्रेते व खाजगी प्रयोगशाळा यांनी सुचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी एका आदेशाद्वारे दिले आहेत.
*******

कोविड -19 च्या पार्श्वभुमीवर अतिजोखमीच्या रुग्णांकडे विशेष लक्ष देऊन वेळीच औषधोपचार करण्याचे जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांचे निर्देश


जालना, दि. 14 - जालना जिल्हयात कोविड -19 विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनामार्फत योग्य उपाययोजना करण्यात येत आहेत. तथापि, समाजातील काही अतिजोखमीच्या गटाला म्हणजेच क्षयरुग्ण,कुष्ठरुग्ण , एचआयव्ही संक्रमीत रुग्ण,मधुमेही,उच्च रक्तदाब असणारे रुग्ण,कर्करोग असणारे रुग्ण तसेच नवजात बालके ,गरोदर माता यांना तसेच समाजातील सर्व रुग्णांकरीता दैनंदिन आरोग्य सेवा नियमित सुरु ठेऊन अतिजोखमीच्या रुग्णांकडे विशेष लक्ष देऊन त्यांना वेळीच औषधोपचार व आरोग्य सेवा देण्याचे निर्देश जिल्हाधिकारीरवींद्र बिनवडे यांनी एका आदेशान्वये दिले आहेत.
*******

विविध वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध बातम्यांच्या अनुषंगाने तहसिलदार श्रीकांत भुजबळ यांचा खुलासा

जालना, दि. 14 (जिमाका) :-  जालना तालुक्यातील मौजपुरी सज्जाचे तलाठी हे तीन महिन्यांपासुन दिसलेच नाहीतम्हणुन शेतकरी संघटनेने मौजपुरी पोलीस ठाण्यात निवेदन दिल्याच्या बातम्या दि. 12 मे, 2020 रोजीच्या विविध वृत्तपत्रांमध्ये मौजपुरी सज्जाचे तलाठी हरवले, मौजपुरीच्या तलाठ्याचा शोध घ्या या मथळखालील विविध दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्याया बातमीनुसार संबंधित तलाठी हे तीन महिन्यांपासुन सज्जा मौजपुरी मुख्यालयी आले नाहीत, त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात, जनमसान्य, शेतकऱ्यांना विविध कारणांने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
            वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्यांच्या अनुषंगाने तहसिलदार, जालना श्रीकांत भुजबळ यांनी खुलासा सादर केला असुन सदर बातमीची दखल घेऊन प्रशासनाने संबंधित सज्जाचे तलाठी एस.आर. जाधव यांच्या कामकाजाचा आढावा घेतला असता तलाठी यांनी मागील तीन महिन्यांमध्ये त्यांच्या सज्जांतर्गत गावात हजर राहुन पाणीटंचाई विषयक विहिर पंचनामे, पीकपेरा संदर्भातील कामे, अवेळी पावसाचे पंचनामे, स्वस्तधान्य दुकानातील धान्य वाटपाचे पंचनामे, चेक पोस्टवरील कर्तव्य, आदी कामे केलेली असल्याचे निरीक्षणावरुन दिसुन आलेत्यामुळे वरील मथळयांखाली विविध बातमीमध्ये तथ्य नसल्याचे त्यांनी खुलाशामध्ये म्हटले आहे.
******* 

राज्य राखीव पोलीस दलाच्या चार जवानांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह जवानांना जिल्हा रुग्णालयातुन डिस्चार्ज डॉक्टरांसह आरोग्यपरिचारिकांनी दिला टाळया वाजवुन निरोप राज्य राखीव पोलीस दलातील जवान व परतुर येथील 32 वर्षीय युवकाच्या स्वॅबचा अहवाल पॉझिटीव्ह


जालना, दि. 14 (जिमाका) :-  राज्य राखीव पोलीस बलगट क्र.3 चे कोरोनाबाधित असलेल्या चार जवानांच्या स्वॅबचा अहवाल दुसऱ्यांदा निगेटीव्ह आल्याने त्यांना आज दि. 14 मे रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी डॉक्टरांसह आरोग्यपरिचारिकांनी चारही जवानांना टाळया वाजवनु निरोप दिला. या जवानांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाईन राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.  तसेच राज्य राखीव पोलीस बलगट क्र.3 मधील एक जवान व परतुर येथील 32 वर्षीय पुरुषाच्या स्वॅबचा अहवाल आज दि. 14 मे, 2020 रोजी पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी दिली.
            आनंदनगर नुतन वसाहत येथे राहणारी व जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये परिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या परिचारिकेच्या स्वॅबचा अहवाल दि. 11 मे रोजी पॉझिटीव्ह प्राप्त झाला होता. परिचारिकेच्या संपर्कात आलेल्या लोरिस्क 9 सहवासितांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला आहे.  तसेच रंगनाथनगर पाण्याची टाकी परिसर, जालना येथील कोरोनाग्रस्त महिलेच्या संपर्कातील ३ हायरिस्क व 8 लोरिस्क असे एकुण 9 व्यक्ती संपर्कात आले होते.  त्यापैकी ३ जणांच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह आला असुन उर्वरित 8 व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल प्रयोगशाळेकडे प्रलंबित आहे.  अंबड तालुक्यातील कानडगाव येथील कोरोनाग्रस्त आढळलेल्या दोन व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या ५ हायरिस्क व्यक्तींच्या स्वॅबचा अहवाल निगेटीव्ह प्राप्त झाला असल्याची माहितीही जिल्हा शल्य चिकित्सक, जालना यांनी दिली आहे.
            जिल्ह्यात एकुण 1606 व्यक्ती संशयित असुन सध्या रुग्णालयात 21 व्यक्ती भरती आहेत तर एकुण भरती केलेल्या व्यक्तींची संख्या 839 एवढी आहे. दैनिक लाळेची तपासणी केलेली संख्या 14 एवढी तर एकुण तपासणी केलेल्या व्यक्तींची संख्या 1269 एवढी आहे.  दैनिक पॉझिटीव्ह नमुने -02 असुन एकुण पॉझिटीव्ह आलेल्या अहवालाची संख्या- 17 एवढी आहे. एकुण निगेटीव्ह नमुन्यांची संख्या 1234, रिजेक्टेड नमुने-04, पुन्हा पडताळणीसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांची संख्या 254, एकुण प्रलंबित नमुने -14 तर एकुण 818 व्यक्तींना डिस्जार्च देण्यात आला आहे.
14 दिवस पाठपुरावा केलेल्या दैनिक व्यक्तींची संख्या - 5, 14 दिवस पाठपुरावा झालेल्या एकुण व्यक्तींची संख्या 629 एवढी आहे. आज अलगीकरण केलेल्यांची संख्या-87, सध्या अलगीकरण कक्षात असलेल्या व्यक्ती -431, विलगीकरण कक्षात भरतीसाठी पाठविलेले संशयित-9, सध्या विलगीकरण कक्षात असलेल्यांची संख्या -21, आज अलगीकरण कक्षातुन घरी पाठविलेल्यांची संख्या -10, पॉझिटीव्ह रुग्णांच्या संपर्कातील सहवासितांची संख्या 315 तर कोरोना बाधित होऊन मृतांची संख्या शुन्य एवढी आहे.  
आजपर्यंत जालना जिल्ह्यात इतर राज्यातुन  117 व राज्याच्या इतर जिल्ह्यातुन 3 हजार 83 असे एकुण                3 हजार 200 नागरिक दाखल झाले असुन या सर्वांना 14 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत उत्तरप्रदेश-4369, बिहार-2944, मध्यप्रदेश-1014,राजस्थान-658, पश्चिमबंगाल-469, झारखंड-418, यासह उर्वरित 16 राज्यातील एकुण 10891 तर जालना जिल्ह्यातुन महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जाण्यासाठी 4776 अशा एकुण 15667 नागरिकांना पास उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
जालना जिल्ह्यातुन आजपर्यंत बिहार-119, आंध्रप्रदेश-103,ओरिसा-113,मध्यप्रदेश-710,छत्तीसगड-8, उत्तरप्रदेश-2673, झारखंड-03,राजस्थान-107, तेलंगणा-27, हैद्राबाद-05 अशा एकुण 3868 नागरिकांना परराज्यात पाठविण्यात आले आहे.
            परदेशी अडकलेल्या भारतीयांना स्वगृही आणण्यासाठी भारत सरकारच्यावतीने राबविण्यात येत असलेल्या वंदे भारत मिशनअंतर्गत जालना जिल्ह्यात चार नागरिक दाखल झाले आहेत. 

             कोरोनाविषाणुचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यात एकुण 431 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले असुन यामध्ये संत रामदास होस्टेल जालना-34, डॉ. बाबासाहेब आंबेडकर होस्टेल, जालना-07,  मुलींचे शासकीय निवासी वसतीगृह-12, मोतीबाग येथील शासकीय मुलींचे वसतीगृह-23,पोलीस प्रशिक्षण केंद्र-81, मॉडेल स्कुल, अंबा रोड, परतुर-00, हिंदुस्थान मंगल कार्यालय,जाफ्राबाद-08, जिजाऊ इंग्लिश स्कुल, जाफ्राबाद-4, राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कुल, टेंभुर्णी, जाफ्राबाद -77, डॉ. बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, अंबड -35, डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, घनसावंगी येथे – 18, अल्पसंख्यांक गर्ल्स होस्टेल, घनसावंगी-45, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन इमारत क्र. 1-64,डॉ बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, भोकरदन-23 व्यक्तींचे अलगीकरण करण्यात आले आहे.
            लॉकडाऊनच्या काळात आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस विभागाकडून कडक कारवाई करण्यात येत असुन आतापर्यंत 579 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येऊन 103 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. 574 वाहने जप्त, मुद्देमाल रक्कम  26 हजार 808, मोटार प्रतिबंधक कायद्यानुसार दंड वसुली 2 लाख 83 हजार 200 असा एकुण          310008 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.  
*******   

Sunday, 29 March 2020

परदेश, परराज्य, परजिल्ह्यातुन आलेल्या नागरिकांनी त्यांची माहिती जिल्हा प्रशासनास द्यावी - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे



        जालना, दि. 29 – मागील एक महिन्यात जिल्ह्यातील कोणी नागरिक कोरोनाग्रस्त अथवा इतर देशातुन, राज्यातुन, इतर जिल्हा अथवा शहरामधून जालना जिल्ह्यात आला असाल तर http://ezee.app/covid19jalna या वेबलिंकवर जाऊन आपली संपूर्ण माहिती भरावी. जेणेकरुन प्रशासनाला आपली मदत करता येणे शक्य होईल, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
            दि. 1 मार्च, 2020 नंतर परदेश प्रवासावरुन आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी व आवश्यकतेनुसार अलगीकरण किंवा विलगीकरण करण्यात येणार असुन यासाठी जिल्हा स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांना समन्वयक अधिकारी म्हणूननिश्चित केलेले असुन त्यांच्या अधिनस्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) यांची सहाय्यक अधिकारी म्हणून नेमणुक करण्यात आली आहे.  नागरिकांनी त्यांची माहिती http://ezee.app/covid19jalna या वेबलिंकवर जाऊन भरावी व प्रशासनास सहकार्य करावे.
            लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुर, विस्थापित झालेले कामगार, परराज्यातील अडकलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्न, पाणी, वैद्यकीय देखभाल आदी व्यवस्था जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणार असुन अशा संबंधित नागरिकांनी ते आहेत त्या ठिकाणीच थांबावे. प्रवासाचा प्रयत्न न करता तालुका अथवा जिल्हा प्रशासनाला माहिती देण्याचे आवाहनही जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
            जिल्ह्यात जमाबंदीच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवा देणारी वाहने (पिण्याचे पाणी पुरवठा, सांडपाणी, निचरा व्यवस्थापन, रुग्णालये, पॅथॉलॉजी, लॅबोरोटरी, सर्व प्रकारचे दवाखाने, वैद्यकीय महाविद्यालय, किराणा सामान दुकानदार, खाद्यतेल, अन्नधान्य, दुध, दुग्ध उत्पादने,फळे, भाजीपाल्याची वाहने, गॅस, औषधालये, अत्यावश्यक सेवा देणारे शासकीय कर्मचारी, आपत्ती व्य्वस्थापन कर्मचारी, शववाहिका वसक्षम अधिकारी यांना परवाना दिलेली वाहने यांना पेट्रोल पंप चालकांनी इंधन पुरवठा करावा. तसेच जमाबंदीच्या कालावधीमध्ये कृषीशी निगडीत उपकरणांना डिझेल व पत्रकारांना पेट्रोल उपलब्ध करुन देण्याचे आदेशही जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत.
            जालना जिल्ह्यामध्ये 29 मार्च, 2020 रोजी दोन रुग्ण नव्याने दाखल झाले असुन आतापर्यंत 78 रुग्ण विलगीकरण कक्षात दाखल होते.  त्यापैकी 76 रुग्णांचे स्वॅब घेण्यात आले आहेत. त्यापैकी 71 रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले असुन त्यांना डिस्चार्जही देण्यात आला आहे.  आजरोजी चार रुग्ण विलगीकरण कक्षामध्ये दाखल असुन त्यांची प्रकृती स्थिर आहे.
            रुग्णालयातुन डिस्चार्ज झालेल्या तसेच परदेशी प्रवासाचा पूर्व इतिहास असणाऱ्या सर्व व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे. आजपर्यंत एकुण 110 परदेश प्रवास केलेल्या व्यक्तींपैकी 108 व्यक्तींचे घरीच अलगीकरण करण्यात आले आहे.  इतर शहरे व राज्यातुन आलेल्या 4 हजार 788 व्यक्तींची तपासणी करुन त्यांचेही घरीच अलगीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
-*-*-*-*-*