Friday, 13 March 2020


कोरोना संशयित रुग्ण विलगीकरण कक्षात देखरेखीखाली
रुग्णाची प्रकृती समाधानकारक
नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन
            जालना, दि. 13 – जिल्हा रुग्णालय, जालना येथे दि. 13 मार्च, 2020 रोजी एकही संशयित रुग्ण भरती झालेला नसुन काल भरती झालेल्या रुग्णास विलगीकरण कक्षामध्ये दाखल करण्यात आले आहे. संशयित रुग्णावर विलगीकरण कक्षामध्ये विशेषतंत्र यांच्या देखरेखीखाली सेवा देण्यात येत आहे. सदरील रुग्णाचे नमुने एन.आय.व्ही. पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले असुन त्याचा अहवाल अद्यापपर्यंत प्राप्त झालेला नाही. संशयित रुग्णाची प्रकृती समाधानकारक आहे. 
            नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घ्यावी.  गर्दीच्या ठिकाणी, यात्रा, सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.  तसेच स्वच्छ पाण्याने व साबनाने वारंवार हात धुवावेत.  आजारी व्यक्तीचा सहवास शक्यतो टाळावा व आजारी व्यक्तीने शिंकताना, खोकताना रुमालाचा वापर करावा.  कोरोनाबात लक्षणे आढळून आल्यास तात्काळ नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करावी, असे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम. के. राठोड  यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.



कोरोना विषाणू संशयिताची आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी नागरिकांनी अधिक काळजी घ्यावी जिल्हा प्रशासकीय व आरोग्य यंत्रणा सज्ज - जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे



             जालना, दि. 13: कोरोना विषाणूसंदर्भात जालना येथे आढळलेल्या संशयित रुग्णाची तपासणी आरोग्य यंत्रणेमार्फत करण्यात येत असून या संदर्भात नागरिकांनी घाबरुन न जाता अधिक काळजी घ्यावी. तसेच गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी केले आहे.
            कोरोना विषाणुपासुन बचावासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्वच्छतेवर भर दिला पाहिजे.  सार्वजनिक व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.  कोरोनासंदर्भात समाजमाध्यमांद्वारे पसरविण्यात येणाऱ्या कुठल्याही अफवांवर नागरिकांनी विश्वास ठेऊ नये, या संदर्भात माहिती हवी असल्यास जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी श्री बिनवडे यांनी केले आहे.
            कोरोना संशयित रुग्णांसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात अलगीकरण कक्ष (Isolation Ward)  तयार करण्यात आला असुन कोरोना विषाणुचा प्रसार होऊ नये यासाठी प्रशासनामार्फत आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असल्याचेही श्री बिनवडे यांनी सांगितले.
जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू
        आंतरराष्ट्रीय स्तरावर व देशांतर्गत कोरोना विषाणूबाधित रुग्ण आढळत आहेत.  त्यामुळे हा संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण करणे व विषाणूंचे संसर्गात वाढ होऊ न देता त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आखणे गरजेचे असल्याने कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी  जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष रवींद्र बिनवडे यांनी कायद्यातील कलम 30 (२) अन्वये जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला आहे. जिल्ह्यात करावयाची पूर्वतयारी व प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी Incident Commander म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड मो.क्र.9422215730 व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर मो.क्र.9764860468 यांना सनियंत्रक म्हणून घोषित केले आहे.  त्याचबरोबर पोलीस विभाग, आरोग्य विभाग,नगर परिषद, नगर पंचायत, जिल्हा परिषद, महसुल विभाग, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, शिक्षण विभाग आदींना जबाबदाऱ्या नेमून दिल्या असुन संबंधित विभागांनी जबाबदारी पार न पाडल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 56 नुसार कारवाईचा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
            कोरोनाबाबत माहितीसाठी राष्ट्रीय व राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असुन राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 91-11-23978046 तर राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394 असा असल्याची माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिली.
*******



Thursday, 12 March 2020

जिल्हा सामान्य रुग्णालयात संशयित रुग्ण दाखल नागरिकांनी घाबरु नये, काळजी घेण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन



        जालना, दि. 12 – जालना शहरामधील जिल्हा सामान्य रुग्णालयात आज दि. 12 मार्च, 2020 रोजी एक संशयित रुग्ण सर्दी, खोकला, ताप ही लक्षण घेऊन भरती झाला आहे.  सदर रुग्ण हा मुंबई पोलीस विभागात कार्यरत असुन मागील आठ दिवसापासुन त्याने पोलीस रुग्णालय, नायगाव दादर या ठिकाणी उपचार घेतलेला आहे. या रुग्णाचा थुंकी नमुना घेण्यात आला असुन तो तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे.  रुग्णाला विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले असुन त्याच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड यांनी दिली आहे. 
नागरिकांनी घाबरु नये, काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन
कोरोना विषाणुबाबत नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.    बाहेरून आल्यानंतर व्यवस्थित हात हँण्डवाश अथवा साबणाने स्वच्छ धुवावे. शिंक अथवा खोकला आल्यास तोंडावर हात, रूमाल किंवा टिश्यू पेपर ठेवावा. त्यानंतर टिश्यू पेपरची व्यवस्थित पणे बंद कचराकुंडीत विल्हेवाट लावावी. शक्यतो गर्दीमध्ये जाणे टाळावे. पुर्ण शिजविलेले खाद्यपदार्थ खावे. 
  अर्धवट शिजविलेले खाद्यपदार्थ खावू नये. ताप, खोकला आल्यास डॉक्टरकडे जाण्यासाठी टाळाटाळ करू नये. कुठल्याही वस्तूच्या पृष्ठभागावरून लागलीच हात तोंडाला लावू नये. कुठेही थुंकू नये, नागरिकांनी घाबरून जावू नये. पाळीव प्राण्यांना अस्वच्छ ठेवू नये. नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. 
*******

Saturday, 29 February 2020

नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेच्या कामांना गती द्या अंबड व घनसावंगी तालुक्यातील कृषि विभागातील रिक्त पदे तातडीने भरणार कृषि सेवकांच्या मानधनात वाढीसाठी प्रयत्न करणार - पालकमंत्री राजेश टोपे



            जालना, दि. 29 – शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजना अत्यंत उपयुक्त असुन या योजनेंतर्गत जिल्ह्यात करण्यात येत असलेल्या कामांना गती द्यावी.  तसेच प्रत्येक कृषि सहाय्यकांनी एक गाव दत्तक घेऊन आपल्या ज्ञानाचा उपयोग या गावाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी करावा, अशा सुचना राज्याचे सार्वजनिक आरोग्य, कुटूंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिल्या.
            येथील अंकुशनगर सहकारी साखर कारखाना येथे नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजनेसंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.
            यावेळी  कृषि विभागाचे उपसंचालक विजय माईनकर, उप विभागीय कृषि अधिकारी श्री सोनकांबळे,            श्री कोकाटे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मनोज मर्कड, तालुका कृषि अधिकारी एस.व्ही. गिरी, सखाराम मोहोळ, श्री काळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांचा सर्वाधिक प्रमाणात संपर्क येणारा कृषी विभाग आहे.  या विभागामध्ये आपले काम घेऊन येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सन्मानाची वागणुक द्यावी. शासकीय कार्यालयात काम करत असताना आपले वर्तन हे लोकशाहीला पोषक असे असले पाहिजे.  वेतन घेऊन जनसामान्यांची सेवा करण्याची संधी आपल्याला प्राप्त झाली असुन आपल्या ज्ञानाचा फायदा जनकल्याणासाठी करावा. त्याचबरोबर विकासाची कामे करत असताना नियमानुसार व वेगाने कामे करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.         घनसावंगी व अंबड तालुक्यातील कृषि विभागामध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात विविध पदे रिक्त आहेत.  ही सर्व पदे तातडीने भरण्यासाठी आपण मंत्रालयीन स्तरावर प्रयत्न करणार असल्याचे सांगत कृषि सेवकांना आजघडीला केवळ सहा हजार रुपये एवढे मानधन देण्यात येते. या मानधनातसुद्धा वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
            नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प हा  सुमारे चार हजार कोटी रुपयांचा प्रकल्प असुन या प्रकल्पामध्ये वैयक्तिक विकासाबरोबरच सामुहिक विकासाच्या अनेकविध योजना राबविण्यात येत आहेत.  जालना जिल्ह्यात या योजनेंतर्गत 2 लाख 7 हजार 66 अर्जापैकी 1 लाख 31 हजार 193 अर्ज पात्र ठरली असुन विविध पातळयांवर पात्र अर्जामधील शेतकऱ्यांना अनुदान देण्यासाठी काम करण्यात येत आहे.  या योजनेंतर्गत आजपर्यंत 4 हजार 942 शेतकऱ्यांना 36 कोटी 33 लक्ष रुपये अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे.  या प्रकल्पांतर्गत फळबाग लागवड, शेडनेट, ठिबक सिंचन यासारख्या बाबींसाठीची प्रकरणे  15 दिवसांच्या आत पुर्ण  करावीत, जिओ टॅगींगचे काम प्रत्येक कृषि सहाय्यकाने आठ दिवसात पुर्ण करावेत तर उप विभागीय स्तरावरील प्रकरणे चार दिवसात पुर्ण करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री टोपे यांनी उपस्थितांना दिले.
            बैठकीस तालुका कृषि अधिकारी, कृषि सहाय्यक, मंडळ कृषि अधिकारी, कृषि सेवक आदींची उपस्थिती होती.
*******




Thursday, 27 February 2020

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मराठी भाषा गौरव दिन साजरा



जालना, दि. 27 – ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या  जन्मदिवसाचे औचित्य साधुन जिल्हाधिकारी कार्यालयात सभागृहात मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. अपर जिल्हाधिकारी रवींद्र परळीकर यांनी मराठी भाषा दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली.
            यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी निवृत्ती गायकवाड, उपजिल्हाधिकारी शर्मिला भोसले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियेळे, उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी, तहसिलदार संतोष बनकर, श्रीमती आर.आर. महाजन यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) दीपाली मोतियेळे यांनी मराठी भाषा व त्याचा वापर यावर प्रकाश टाकला.



मराठी भाषा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावी - जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे



          जालना, दि. 27 - जागतिकीकरणाच्या आजच्या युगात इंग्रजी भाषेचा प्रभाव वाढत आहे. अशामध्ये अनेक प्रादेशिक भाषा हरवत चालल्या आहेत. मराठी भाषा बोली भाषेत, लिखाणात, श्राव्य साहित्याच्या स्वरुपात टिकवणे आवश्यक आहे. मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले.
            जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ प्रदर्शन व विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री हजारे बोलत होते.
            यावेळी माहिती सहाय्यक अमोल महाजन, तांत्रिक सहाय्यक ज्ञानेश्वर पैठणे, शंकर पवार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
            श्री हजारे म्हणाले, दरवर्षी 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कवी कुसुमाग्रज  यांचा जन्मदिवस हा 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जातो. या माध्यमातुन मराठी भाषा टिकावी आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहचावी यासाठी प्रयत्न केले जातात. शालेय स्तरापासून प्रशासकीय स्तरावर विविध स्पर्धा, कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. बदलत्या काळानुसार भाषेवर भौगोलिक,राजकीय, संस्कृतिक बदलाचे परिणाम होतात. मराठी भाषेवरही ते होत आहेत. त्यामुळे ते स्वीकारत भाषा टिकवली तरच ती पुढच्या पिढीपर्यंत ती पोहचू शकते असे सांगत मराठी कवी विष्णू वामन शिरवाडकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकला.  
            माहिती सहाय्यक श्री महाजन म्हणाले भारत देशातील प्रमुख भाषांपैकी मराठी एक भाषा आहे. महाराष्ट्र आणि गोवा या राज्यांमध्ये मराठी ही अधिकृत राजभाषा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र शासनासोबतच अनेक मराठी भाषा प्रेमींकडून 27 फेब्रुवारी दिवशी 'मराठी राजभाषा दिनाचं' औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करत मराठी भाषेच्या संवर्धनासाठी विविध उपाय, मोहिमा राबवल्या जात असल्याचे सांगत प्रत्येकांने मराठी भाषेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
            सर्वप्रथम मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित ग्रंथ प्रदर्शनाचे फित कापुन उदघाटन करण्यात आले. तसेच विष्णू वामन शिरवाडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी उपस्थितांना मराठी भाषेची प्रतिज्ञा देण्यात आली.
            कार्यक्रमास नागरिक तसेच विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******