Tuesday, 18 December 2018

"जालना ग्रंथोत्सव-2018" चे 21 ते 22 डिसेंबर रोजी मा.कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह येथे आयोजन ग्रंथ प्रदर्शन-विक्री आणि विविध कार्यक्रमाची मेजवानी



जालना, दि. 18 :- ग्रंथालय संचालनालय मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, जालना यांच्या विद्यमाने "जालना ग्रंथोत्सव 2018" चे आयोजन करण्यात आले आहे. मा.कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह, जालना  येथे 21  व 22  डिसेंबर 2018 या दोन दिवसात ग्रंथप्रेमींना विविध कार्यक्रमांची मेजवाणी लाभणार आहे. शुक्रवारी  21  डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. जालना ग्रंथोत्सव उद्घाटनास राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर व राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांची  प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
ग्रंथप्रसार, ग्रंथप्रदर्शन व ग्रंथविक्री असा या ग्रंथोत्सवाचा उद्देश असून प्रकाशक, ग्रंथविक्रिते आणि ग्रंथप्रेमी वाचकांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम आहे. जालनासह महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या प्रकाशनांची दालने याठिकाणी राहणार आहेत. याशिवाय महाराष्ट्र शासनाच्या औरंगाबाद येथील शासकीय ग्रंथगाराचे विशेष दालन या प्रदर्शनात राहणार असून या दालनात शासकीय प्रकाशने व दुर्मिळ ग्रंथ विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
शुक्रवार 21  डिसेंबर रोजी सकाळी 8 ते 9.30 वा. गांधी चमन ते मा.कृष्णराव फुलंब्रीकर नाट्यगृह येथून कार्यक्रम स्थळापर्यंत ग्रंथदिंडी आयोजित केली आहे. या ग्रंथदिंडीचे उदघाटन ज्येष्ठ साहित्यिक प्र.स. हुसे, शिक्षणाधिकारी (मा) एम.एस. चौधरी तसेच शिक्षणाधिकारी (प्रा) पांडुरंग कवाणे यांच्या उपस्थितीत होणार आहे. ग्रंथोत्सव 2018 चा शुभारंभ राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर व राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 10 ते 12 वाजता या वेळेत  करण्यात येणार आहे.    
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून खासदार रावसाहेब दानवे, खासदार संजय जाधव, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर,आमदार विक्रम काळे, आमदार सतिश चव्हाण,आमदार सुभाष झांबड, आमदार राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष पाटील दानवे, नगराध्यक्षा श्रीमती संगीता गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, पोलीस अधिक्षक, एस. चैतन्य, जिल्हा कोषागार अधिकारी  श्रीमती वैशाली थोरात, जिल्हा माहिती अधिकारी अनिल आलुरकर, मराठवाडा साहित्य परिषदेच्या संचालक डॉ. संजीवनी तडेगावकर, सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, जिल्हा ग्रंथालय असोशिएशनचे, जालनाचे अध्यक्ष देविदास देशपांडे, नागसेन ग्रंथालय, जालनाचे अध्यक्ष राजेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती होणार आहे. 
दुपारी 12  ते 2.00 वा ग्रंथाने मला काय दिले....!  तसेच द्वितीय सत्रात दुपारी 2 ते 4.00 वाजता अनुभव कथन, तृतीय सत्रामध्ये निमंत्रितांचे  कवीसंमेलनाचे आयोजन केले आहे. 
रविवार 22  डिसेंबर रोजी  प्रथम सत्रात सकाळी 10 ते 12 महात्मा गांधीना समजून घेताना, द्वितीय सत्रात दुपारी 12 ते 2.00 वाजता प्रकट मुलाखत, तृतीय सत्रात दुपारी 3.00 ते 5.00 वाजता कार्यकारी मंडळ, बदल अर्ज, संस्था नोंदणी रद्द, हिशोबपत्रे ( ऑडीट) संदर्भात मार्गदर्शन, सायंकाळी 5.00  ग्रंथोत्सवाचा समारोप  होणार आहे.  ग्रंथोत्सव कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सचिन हजारे यांनी केले आहे. 000000






Monday, 17 December 2018

महारेशीम अभियानाचा राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते शुभारंभ




जालना, दि. 17 – दि. 17 ते 29 डिसेंबर, 2018 या कालावधीत राज्यात महारेशीम अभियान राबविण्यात येत असुन या अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ जिल्हा परिषदेच्या प्रांगणात राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास, मस्त्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री श्री खोतकर यांच्या हस्ते करण्यात आला. 
यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, प्रादेशिक रेशीम कार्यालय, औरंगाबादचे सहाय्यक संचालक दिलीप हाके, रेशीम विकास अधिकारी अजय मोहिते, आदींची उपस्थिती होती.
राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, शेतकऱ्यांमध्ये रेशीम उद्योगाविषयी जनजागृती व्हावी या उद्देशाने संपूर्ण राज्यात 17 ते 29 डिसेंबर, 2018 दरम्यान महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानामध्ये रेशीम विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्येक गावामध्ये जाऊन रेशीम उद्योगाबाबत शेतकऱ्यांना माहिती देऊन हा व्यवसाय करण्यासाठी प्रवृत्त करावे. येणाऱ्या काळात रेशीम विभागाचा कायापालट करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असुन जालना जिल्हा राज्यात रेशीम उद्योगामध्ये अग्रेसर राहील, याची सर्वांनी समन्वयाने काम करण्याच्या सुचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
याप्रसंगी महा रेशीम अभियान चित्ररथाचे राज्यमंत्री श्री खोतकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवुन शुभारंभ करण्यात आला.  तसेच रेशीम विकास कार्यालयातर्फे काढण्यात आलेल्या घडीपत्रिकेचे विमोचनही करण्यात आले.
कार्यक्रमास पदाधिकारी, अधिकारी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अभियानाची वैशिष्टये
  रेशीम शेतीचे फायदे,वैशिष्टे व तंत्रज्ञान गावागावात जावुन शेतकऱ्यांपर्यत पोहोचविणे, संपुर्ण राज्यात एकाच वेळेस रेशीम शेतीचा प्रचार व प्रसिध्दी करणे, रेशीम शेती करीता शासनाच्या विविध योजना, जसे मनरेगा, ISDSI,जिल्हा वार्षिक योजना ची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, योग्य लाभार्थ्यांची निवड करण्यास वाव, तुती रोपाव्दारे तुती लागवड केल्यामुळे तुती बाग जोमाने वाढते व दुष्काळातही तग धरून राहते अभियान लवकरच राबविण्यात आल्यामुळे, लाभार्थ्यांना जानेवारी-फेब्रुवारी मध्ये तुती रोपे तयार करण्यास कालावधी मिळतो.गटाने रेशीम शेतीची वाढविणे, सन 2019 मध्ये तुती लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांची नोंदणी करणे.
*-*-*-*-*-*-*






पिण्यासाठी पाणी व मजुरांच्या हाताला काम देण्यासाठी सुक्ष्म नियोजन करा - राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर



            जालना, दि. 17 –  निसर्गाच्या अवकृपेमुळे आपणा सर्वांना भीषण पाणीटंचाईचा मुकाबला करावा लागणार आहे.  टंचाईच्या अनुषंगाने पिण्यासाठी पाणी व मजुरांच्या हाताला काम या बाबींचे सुक्ष्म नियेाजन करण्याचे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन,दुग्धविकास, मस्त्यव्यवसाय व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिले.
            जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात जालना मतदासंघाच्या पाणीटंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांशी संवाद साधताना राज्यमंत्री श्री खोतकर बोलत होते.
            यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, सभापती पांडूरंग डोंगरे, द्वारकाबाई खरात, सदस्य यादवराव राऊत, बबनराव खरात, रऊफभाई परसुवाले, श्रमती अरुणा सदाशिव शिंदे, पुष्पाताई चव्हाण, पं.स. सदस्य कैलास उबाळे, जनार्दन चौधरी, संतोषराव मोहिते, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती निमा अरोरा, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव केंद्रे, संजय इंगळे, पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता श्री डाकोरे आदींची उपस्थिती होती.
            राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, जानेवारी ते जून या कालावधीसाठी पाण्याचे नियोजन करावे लागणार आहे. आपत्तीच्या परिस्थितीमध्ये यंत्रणांनी आपली जबाबदारी गांभिर्याने पार पाडावी.  पदाधिकाऱ्यांनी गटातटाचे राजकारण न करता टंचाई परिस्थितीचा खंबीरपणे मुकाबला करण्यासाठी सज्ज रहावे. टँकरद्वारे पाणी पुरवठा हा शेवटचा पर्याय असुन टंचाईच्या अनुषंगाने नळयोजनांची दुरुस्ती, तात्पुरत्या पाणी पुरवठा योजना, खाजगी विहिरींचे अधिग्रहण आदी बाबींवर भर देण्यात यावे. त्याचबरोबरच 200 फुटावर पाणी लागणाऱ्या बोअरसाठी तातडीने मंजुरी देण्यात यावी.  कुठल्याही पाणी पुरवठा येाजनेचा वीज पुरवठा खंडित करण्यातयेऊन तसेच तसेच विहिर अधिग्रहीत केलेल्या शेतकऱ्यांचे पैसे तातडीने अदा करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            यावेळी राज्यमंत्री श्री खोतकर यांरनी टंचाईच्या अनुषंगाने जालना मतदासंघातील गावनिहाय पाण्याबाबत परिस्थिती उपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून जाणुन घेत पाणी पुरवठ्याच्या उपाययोजना तातडीने राबविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना यावेळी दिले.
            यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनीही टंचाईच्या अनुषंगाने उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना केल्या.
            बैठकीस जिल्हा परिषदेतील सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी, सर्व गावचे सरपंच व ग्रामसेवकांची उपस्थिती होती.





Friday, 14 December 2018


जिल्ह्यातील विविध विकास कामांचा
पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी घेतला आढावा
शेगाव-पंढरपुर मार्गाच्या कामात
कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारणार नाही
रस्त्याच्या दर्जात व गुणवत्तेमध्ये फरक पडल्यास कंत्राटदारावर कारवाई करणार
                                               - पालकमंत्री बबनराव लोणीकर

            जालना, दि. 14 – जालना जिल्ह्यातील विविध विकास कामे तसेच दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांसदर्भात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी 6 तास मॅरेथॉन बैठक घेतली. शेगाव-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाचा आढावा घेत महामार्गाचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्णच करण्यात यावे.  या महामार्गाच्या कामात कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नसल्याचे स्पष्ट करत रस्त्याच्या दर्जात व गुणवत्तेमध्ये फरक पडल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे खडेबोलही पालकमंत्री            श्री लोणीकर यांनी कंत्राटरास सुनावले.
            या बैठकीस जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राहूल लोणीकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी,  प्रकल्प संचालक सुरेश बेदमुथा, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख,  कार्यकारी अभियंता अजय सिंग, उप विभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील, तहसिलदार श्रीमती सुमन मोरे, मेघा इंजि. इन्फ्रा लिमिटेड, हैद्राबादचे मधुसुदन राव, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी            श्री कोकणी यांच्यासह सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
            पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, शेगाव ते पंढरपुर हा 2 हजार कोटी रुपये खर्चून रस्ता तयार करण्यात येत आहे.  या रस्त्याच्या दर्जासंदर्भात नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत आहेत.  या रस्त्याच्या गुणवत्तेमध्ये व दर्जामध्ये कुठल्याही प्रकारची तडजोड स्वीकारली जाणार नाही. 
..2..
रस्त्याचे काम करत असताना शासनाने ठरवुन दिलेले निकष व नियमांप्रमाणेच करण्यात यावे. या रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असणारी वाळूची मागणी जिल्हा प्रशासनास कळवण्यात यावी.  जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येणाऱ्या वाळुच्या लिलावामध्ये सहभाग नोंदवुन आवश्यक असणारी वाळुची रॉयल्टी शासनाकडे भरणा करण्यात येऊन वाळुची उचल करावी व साठवणुक करुन ठेवण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित कंत्राटदारांना दिले. त्याचबरोबरच रस्त्याच्या कामांसाठी आवश्यक असणारा मुरुम हा पाझर तलावांमधुन घेता येऊ शकतो.  प्रशासनामार्फत या संदर्भात मंजुरी घेण्यात यावी.  यामुळे पाझर तलावांमधील गाळ निघुन मोठया प्रमाणात पाण्याचा संचय होण्याबरोबरच रस्त्याच्या कामासाठी आवश्यक असणारा मुरुमही वेळेवर उपलब्ध होईल.
            पर्यटन विकास आराखड्यासंदर्भात आढावा घेताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यात पर्यटन विकासाला मोठा वाव आहे.  जिल्ह्यात अनेक देवस्थानी अशी आहेत ज्या ठिकाणी हजारो भाविक हजेरी लावत असतात.  या ठिकाणचा विकास केल्यास भाविकांना आवश्यक असणाऱ्या सुविधा मिळण्याबरोबरच बेरोजगारांच्या हाताला मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणारअसल्याने जिल्ह्यातील शंभु महादेव-नांगरतास तसेच गोखुरेश्वर या तीर्थक्षेत्राचा विकास करण्यासाठी 25 कोटी रुपयांचा आराखडा तयार करुन शासनास सादर करण्यात यावा.  त्याचबरोबर निळकंठेश्वर, वटेश्वर, चतुर्वेदेश्वर, रेणुकादेवी व दर्गा या क्षेत्रांचाही प्रस्ताव एकत्रितरित्या तयार करुन शासनास सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            वीजेमध्ये बचत होण्याच्या दृष्टीने शासनामार्फत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये एलईडी दिवे बसविण्यात येणार आहेत.  जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय कार्यालयांनी आपल्या कार्यालात एलईडी दिवे बसवुन घेण्याच्या सुचना करत नगरपालिका क्षेत्रामध्येही एलईडी बसवुन घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
            दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेऊन पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, वीजेचे देयक न भरल्यामुळे ज्या  पाणी पुरवठा योजनांचा वीज पुरवठा खंडित केला आहे तो नियमित करण्याचा मंत्री मंडळाच्या बैठकीत
..3..
निर्णय घेण्यात आला असल्याने जिल्ह्यातील खंडीत करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनांना तातडीने वीज जोडणी करण्याबरोबरच नव्याने झालेल्या योजनांनाही तातडीने वीज जोडणी देण्यात यावी.  मनरेगाच्या माध्यमातुन मागेल त्याला काम उपलब्ध करुन देण्याचे निर्देश देत आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे निर्देशही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी दिले. जनावरांच्या चारानिर्मितीसाठी लोअर दुधना प्रकल्पाशेजारी असलेल्या दोन हजार हेक्टरवर चारानिर्मिती करण्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली असुन त्यासाठी आवश्यक असणाऱ्या बियाण्यासाठीही निधीही उपलब्ध करुन दिला आहे.  चारानिर्मिती करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांची बैठक आयोजित करुन त्यांना चारा निर्मितीसाठी प्रोत्साहित करण्यात यावे.  निर्मिती केलेला चारा शासन शेतकऱ्यांकडून विकत घेणार असुन मराठवाड्याला पुरेल एवढ्या चाऱ्याची निर्मिती या प्रकल्पाशेजारील शेतीमध्ये होऊ शकते, असेही पालकमंत्री श्री लोणीकर  यांनी यावेळी सांगितले.
            राष्ट्रीय रुरबन मिशनसंदर्भात आढावा घेताना पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, राष्ट्रीय रुरबन अभियानाच्या माध्यमातुन परतूर तालुक्यातील आष्टीसह 16 गावांचा 185 कोटी रुपयांच्या माध्यमातुन सर्वांगिण विकास करण्यात येत असुन करण्यात येत असलेल्या कामांची पहाणी केंदाच्या पथकाने नुकतीच भेट देऊन केली आहे. संपुर्ण देशभरात आष्टी व 16 गावात करण्यात येत असलेले काम हे उत्कृष्ट दर्जाचे असल्याची भावना या पथकाने व्यक्त केली असल्याचे सांगुन या प्रकल्पाचा सुधारित आराखडा 300 कोटी रुपयांचा करुन शासनास सादर करण्यात येणार आहे.  या प्रकल्पात काम केलेल्या सर्व विभागाचे अभिनंदन करुन यापुढे राष्ट्रीय रुरबन मिशनचे काम अधिक गतीने व दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले.
            या बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
*******
           







Thursday, 13 December 2018

ध्वजदिन निधीस सढळ हस्ते मदत करा - अपर जिल्हाधिकारी प्रकाश खपले


            जालना, दि. 13 - देशाच्या रक्षणासाठी जवान आपल्या प्राणांची बाजी लावून सिमेवर लढत असतात. त्यांच्या त्याग व बलिदानामुळेच आपण सुरक्षित आहोत. जवानांच्या कुटूंबियांच्या व निवृत्त सैनिकांच्या पूनर्वसनासाठी ध्वजदिन निधीतून कल्याणकारी योजना राबविण्यात येत असल्याने या ध्वजदिन निधीस सर्वांनी सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी प्रकाश खपले यांनी केले.
            जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या वतीने महासैनिक लॉन, जालना येथे आयोजित ध्वजदिन निधी संकलनाचा अपर जिल्हाधिकारी श्री खपले यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. त्याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते.
            यावेळी व्यासपीठावर जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी स.ह. केंजळे, पोलीस निरीक्षक राजेंद्रसिह गौर, सेवानिवृत्त कर्नल ए.एस. पवार, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड आदींची उपस्थिती होती.
            अपर जिल्हाधिकारी श्री खपले म्हणाले की, ध्वजदिन निधीच्या माध्यमातून माजी सैनिक तसेच त्यांच्या अवलंबितांसाठी कल्याणकारी योजना राबविण्यात येतात.  सैनिकांप्रती ऋण व्यक्‍त करण्याची संधी ध्वजदिन निधीच्या माध्यमातून सर्वसामान्यांना होत असल्याने नागरिकांनी या निधीस अधिकाधिक मदत करावी.  या वर्षात जिल्ह्याला देण्यात आलेले ध्वजदिन निधीचे उद्दिष्ट पूर्ण झाले असल्याचे सांगत पुढील वर्षामध्ये उद्दिष्टापेक्षा अधिक प्रमाणात ध्वजदिन निधी संकलित करण्यात येईल, असेही अपर जिल्हाधिकारी श्री खपले यांनी यावेळी सांगितले.
            कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हासैनिक कल्याण अधिकारी स.ह. केंजळे यांनी  ध्वजदिन निधी संकलनाचे महत्तव विषद करत जालना जिल्हा ध्वजदिन निधी संकलनामध्ये अग्रेसर असुन जिल्ह्यातील 68 शासकीय कार्यालयाने निधी संकलनामध्ये मदत करतात.  गतवर्षी पोलीस विभागाने सर्वाधिक निधी संकलन केले असल्याचे सांगत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयामार्फत माजी सैनिकांसाठी करण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली.
            या कार्यक्रमात ऑपरेशन मेघदुतमध्ये शहिद झालेले सुरेश केशवराव कदम यांचे वीरपिता केशवराव कदम तसेच ऑपरेशन रक्षकमध्ये शहिद झालेले पंडितराव लहाने यांच्या वीरपत्नी श्रीमती लिलाबाई लहाने यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.   तसेच माजी सैनिकांच्या पाल्यांच्या शैक्षणिक खर्चाच्या प्रतिपूर्तीचे धनादेशही मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले. ध्वजदिन संकलनाचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विविध कार्यालय प्रमुखांचाही मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
            सर्वप्रथम  मान्यवरांनी शहिद जवानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
            या कार्यक्रमास जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील वरिष्ठ लिपीक विनायक अनाळकर, लिपीक तुकाराम काकडे, कल्याण संघटक सिताराम सोनुने, विनायक केंद्रे, शेख युनुस शेख गुल्जार, सुभाष रगडे, साहेबराव तोरमल यांच्यासह जिल्ह्यातील माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, सैनिकांचे कुटूंबिय, अधिकारी-कर्मचारी सैनिकी शाळेचे विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते




कुस्तीस्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करावे -- राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांचे निर्देश



        जालना, दि. 13 – महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेच्या मान्यतेने व जिल्हा राष्ट्रीय तालीम संघ तसेच राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या पुढाकाराने 62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे दिनांक 19 ते 23 डिसेंबर 2018 दरम्यान जालना शहरातील आझाद मैदानावर आयोजन करण्यात आलेले असुन ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे व समन्वयाने काम करण्याचे निर्देश राज्याचे पशुसंवर्धन, मस्त्यव्यवसाय, दुग्धविकास व वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांनी दिले.
            62 वी वरिष्ठ राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकारी व पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.
            यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, भास्कर आंबेकर, अभिमन्यू खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक एस. चैतन्या, तालीम संघाचे अध्यक्ष किसनलाल भगत, सचिव प्रा. डॉ. दयानंद भक्त, उपाध्यक्ष लक्ष्मणराव सुपाटकर, पांडूरंग डोंगरे, प्राचार्य भागवतराव कटारे, विष्णु पाचफुले, आत्मनंद भगत, गोपाळ काबलिय, सुशिल भावसार, अंकुश पाचफुले, विकास क्षीरसागर, विक्रम कुसूंदल आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
            राज्यमंत्री श्री खोतकर म्हणाले की, या स्पर्धेत संपुर्ण महाराष्ट्रातील जिल्हयातील व महानगर पालीका क्षेत्रातील एकुण 45 संघासह 900 कुस्तिगीर, 100 संघ व्यवस्थापक व मार्गदर्शक, 125 तांत्रिक अधिकारी ( पंच), महाराष्ट्र राज्य कुस्तिगीर परिषदेचे 90 पदाधिकारी व प्रतिनिधी, 40 महाराष्ट्र तसेच भारतातील प्रसिध्द कुस्तीपटु, 2 भारतीय कुस्ती संघ निरीक्षक, 2 भारतीय शैली कुस्ती संघ निरीक्षक, महाराष्ट्र ऑलम्पीक निरीक्षक असे एकुण 1260 मल्ल व अधिकारी या स्पर्धेमध्ये सहभागी होणार असुन जवळपास 80 ते 90 हजार प्रेक्षक याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेदरम्यान कायदा व सुव्यवस्था आबाधित राहून स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात यावा.  आवश्यकता भासल्यास अतिरिक्त पोलीस मनुष्यबळ उपलब्ध करुन घेण्यात यावे.  स्पर्धेदरम्यान मैदान व परिसरात स्वच्छता राहील यासाठी नगरपालिकेने योग्य ती व्यवस्था करण्याबरोबरच स्पर्धेदरम्यान मोठ्या संख्येने जनसमुदाय उपस्थित राहणार असल्याचे मोबाईल शौचालये या परिसरात उपलब्ध करण्याबरोबरच पुरेशा प्रमाणात स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे या स्पर्धा सकाळी व संध्याकाळच्या वेळेस असल्याने संध्याकाळी वीज पुरवठा अखंडित रहावा यासाठी विद्युत विभागाने योग्य ती दक्षता घेण्याचे निर्देशही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी दिले.
            स्पर्धेदरम्यान कुस्तीगीरांना काही दुखापत झाल्यास त्यांच्यावर प्रथमोपचार करण्यासाठी तज्ज्ञ अशा डॉक्टरांची टीम उपलब्ध ठेवण्याबरोबरच रुग्णवाहिकाही उपलब्ध करुन ठेवण्याच्या सुचनाही राज्यमंत्री श्री खोतकर यांनी यावेळी केल्या.
            या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एम.के. राठोड, नगरपालिकेचे मुख्याधिकारी संतोष खांडेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती प्रमोदिनी अमृतवाड यांच्यासह पोलीस व सर्व संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.




Wednesday, 5 December 2018

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची केंद्रीय पथकाकडून पहाणी शेतकऱ्यांशी संवाद साधुन घेतली पीकपरिस्थितीची माहिती



            जालना दि. 5 -  जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसापासुन पावसाने दडी मारल्याने निर्माण झालेल्या परिस्थितीची पहाणी केंद्रीय पथकाने आज दि. 5 डिसेंबर रोजी बदनापुर व जालना तालुक्यातील गावांना भेटी देऊन केली व उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधुन पीकपरिस्थितीची माहिती घेतली.
            केंद्र शासनाच्या या पथकामध्ये निती आयोगाचे सहसल्लागार मानश चौधरी, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे एस.सी.शर्मा, यांचा समावेश होता तर पहाणी दरम्यान पथकासमवेत जलसंधारण विभाग (वाल्मी) औरंगाबादचे आयुक्त दीपक सिंघला अपर आयुक्त शिवानंद टाकसाळे, आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, उप विभागीय अधिकारी केशव नेटके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय माईनकर, तहसिलदार बिपीन पाटील, बदनापुरच्या तहसिलदार श्रीमती छाया पवार आदींची उपस्थिती होती.
            सर्वप्रथम पथकाने बदनापुर तालुक्यातील जवसगाव या गावाला भेट देत या गावातील शेतकरी श्रीमती सुवर्णा सुखदेव अंभोरे यांच्या शेतामधील कापूस पिकाची पहाणी केली. तद्नंतर जालना तालुक्यातील बेथलम या गावातील शेतकरी प्रकाश जयसिंग निर्मल यांच्या शेतातील ज्वारी पीकाची पहाणी केली.
            यावेळी पथकातील सदस्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधत किती दिवसापासुन पाऊस नाही, पीकाची पेरणी कधी केली, गतवर्षात किती उत्पन्न मिळाले होते, यावर्षी किती उत्पन्न अपेक्षित आहे, पीकविमा भरला होता काय तसेच बँकेकडून पीकांच्या लागवडी कर्ज घेतले होते काय आदी माहिती विचारली.  तसेच आमदार नारायण कुचे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांनीही पीक परिस्थितीबाबत पथकाला माहिती दिली.
            यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्ह्यातील पाणी पुरवठा, टंचाईच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या उपाययोजना, टंचाई आराखडा, रोहयोच्या माध्यमातुन मजुरांना काम यासह दुष्काळी परिस्थितीच्या अनुषंगाने केंद्रीय पथकाला माहिती दिली.             पथकाने भेट दिलेल्या दोनही गावात शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*******