Friday, 21 April 2017

प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये देशात जालना जिल्हा प्रथम पंतप्रधानांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी स्वीकारला पुरस्कार

जालना -  सन 2016-17 या वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये उत्कृष्ट काम करुन जालना जिल्ह्याने संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. नागरी सेवा दिनानिमित्त नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे पारितोषिक स्वीकारले.
          दिल्लीमध्ये झालेल्या या भव्यदिव्य अशा कार्यक्रमाचे थेट प्रेक्षपण पहाण्याची व्यवस्था जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहामध्ये करण्यात आली होती. दूरदर्शनवरील कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण पहाण्यासाठी जिल्ह्यातील लाभार्थी शेतकरी, शासकीय अधिकारी, कर्मचारी, पत्रकार यांची उपस्थिती होती.  
          प्रधानमंत्री फसलबीमा योजना मे अव्वल आने का मान महाराष्ट्र के जालना जिले को मिलता है. जालना जिले के जिलाधिकारी शिवाजी जोंधळे से गुजारिश करते है की वे आकर प्रधानमंत्रीजी के करकमलो से पुरस्कार का स्वीकार करे अशी घोषणा निवेदकाने करताच जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या शेतकरी, अधिकारी, कर्मचारी व पत्रकार यांनी टाळयांच्या कडकडाटाने आनंद व्यक्त केला.  मुंबई दुरदर्शनच्यावतीने निर्माता मारुती मोगले व तंत्रज्ञ श्री मुपोनादी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित असलेल्या सर्वांचा उत्साह कार्यक्रमस्थळातील मान्यवरांपर्यंत ओबी व्हॅनच्या माध्यमातून पोहोचविला.

*******

Thursday, 20 April 2017

प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये देशात जालना जिल्हा प्रथम नागरी सेवादिनी पंतप्रधानांच्या हस्ते दिल्ली येथे जिल्हाधिकारी स्वीकारणार पुरस्कार

जालना  -  सन 2016-17 या वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये उत्कृष्ट काम करुन जालना जिल्ह्याने संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला असुन शुक्रवार दि. 21 एप्रिल, 2017 रोजी नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या नागरी सेवादिनाच्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे हे यावेळी पारितोषिक स्वीकारणार आहेत.
          राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्राद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर तसेच खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात उत्तमरित्या व्हावी व शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला. तसेच जिल्हा प्रशासनाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम केल्यामुळे संपूर्ण देशातुन जिल्हाला हा प्रथम पुरस्कार मिळाला आहे.
          जिल्हयात 2015-16 या वर्षी खरीपात एकूण रु. 25 कोटी विमा हप्ता भरुन पिक विमा घेतलेल्या जिल्हयातील जवळपास 95 टक्के शेतक-यांना  रु. 431 कोटी 64 लाख रुपये  आणि रब्बी मध्ये एकुण  2 कोटी विमा हप्ता भरून पिक विमा घेतलेल्या शेतक-यांना                   44 कोटी 29 लाख रुपये कोटी इतकी नुकसान भरपाई मिळाली. सन 2016-17 मध्ये जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातुन खरीपात 4 लाख 69 हजार आणि रब्बी मध्ये 1 लाख 27 हजार शेतक-यांनी 39 कोटी रुपयांचा विमाहप्ता भरुन पिकविमा योजनेत भाग घेतल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे यांनी सांगितले.  
          जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दशरथ तांभाळे, यांच्यासह तालुक्यातील सर्व कृषि अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी,कर्मचारी,सर्व तहसिलदार, तलाठी ग्रामसेवक यांच्या संयुक्त प्रयत्नातून व माहिती व जनसंपर्क विभाग व सर्व प्रसिद्धी माध्यमांनी दिलेल्या योगदानामुळे हे शक्य झाले, असल्याची भावना जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी व्यक्त केली.
          भारत सरकारमार्फत केंद्र पुरस्कृत काही महत्वपूर्ण योजनांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या जिल्हयांना प्रधानमंत्री उत्कृष्ट नागरी सेवा पुरस्कार दिला जातो.  त्यात प्रधानमंत्री पीकविमा योजनेचा समावेश आहे.  या योजनेतून पुरस्कार मिळण्यासाठी देशातील सर्व जिल्ह्यांनी अर्ज केले होते.  याची प्राथमिक छाननी होऊन बारा जिल्ह्यांना सादरीकरणासाठी दिल्ली येथे बोलावण्यात आले होते.  याचे सादरीकरण जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे यांनी दि. 14 फेब्रुवारी, 2017 रोजी दिल्ली येथे केले. तदनंतर दुसऱ्या छानणीत चार जिल्ह्यांना पुन्हा दिल्लीत सादरीकरणासाठी बोलावण्यात आले.  दि.  9 मार्च, 2017 रोजी जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे यांनी दिल्ली येथे सादरीकरण केले होते.
          या पुरस्कार सोहळयाचे थेट प्रक्षेपण दि. 21 एप्रिल, 2017 रोजी सकाळी 11-00 वाजता दुरदर्शनच्या डी.डी वाहिनीवरुन करण्यात येणार आहे.  या सोहळया दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जालना जिल्ह्यातील काही निवडक शेतकऱ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.  या कार्यक्रमाचा लाभ जिल्ह्यातील अधिकाधिक जनतेने घ्यावा, असे जिल्हा प्रशासनामार्फत कळविण्यात आले आहे.

*******

Saturday, 11 March 2017

“महाराष्ट्र माझा” छायाचित्र प्रदर्शनास पालकमंत्री बबनराव लोणीकर यांची भेट माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा स्तुत्य उपक्रम

जालना, दि. 11 –डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जालना येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनास राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी आज दि. 11 मार्च रोजी भेट देऊन प्रदर्शनाची पहाणी करत माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा उपक्रम स्तुत्य असून संपूर्ण राज्यभर अशा प्रकारचे प्रदर्शन आयोजित करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी केली.  
      याप्रसंगी माजी आमदार अरविंद चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, राज्य महिला आयोगाचे जिल्हा समन्वयक  ॲङ पी.जे. गवारे, विरेंद्र धोका, ज्येष्ठ छायचित्रकार बाबुराव व्यवहारे, प्रा. रेणुका भावसार, ज्ञानज्योती प्राथमिक विद्यालयाचे श्री हनवते आदींची प्रमुख उपस्थिती होती.
      यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, सर्वसामान्य व्यक्तींचा सर्वांगिण विकास करण्यासाठी राज्य शासनाने गेल्या दोन वर्षात अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. जलयुक्त शिवार, मेक इन इंडिया, स्वच्छता अभियान, विद्युत विकास, रस्ते विकास, कृषिविकास, कौशल्यविकास यासारख्या योजनांबरोबरच शेतकऱ्यांच्या शेतीला, वीज, पाणी, शेतमालाला भाव देण्यासाठी अनेकविध उपक्रम शासन राबवित आहे. शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती सर्वसामान्य जनतेला वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक मिडिया माध्यमातून तर तरुणाईला ही माहिती सोशल मिडिया माध्यमातून देण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अत्यंत उत्कृष्टपणे कार्य करत असल्याचे गौरदवोदगार त्यांनी यावेळी काढले.
     जालना जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगत जिल्ह्यात ड्रायपोर्ट, सीडस् पार्क, रसायन तंत्र महाविद्यालयासारखे विकासात्मक प्रकल्प आणण्यात आले असून या माध्यमातून मोठ्या प्रमाणात बेरोजगारांना रोजगाराच्या संधी मिळण्याबरोबरच विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याची सोय निर्माण होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
            प्राचीन भारतीय कला- संस्कृती, इतिहासाचा वारसा, लोकपरंपरा, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, वन्यजीव तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांवर आधारित अशा वैविध्यपूर्ण छायाचित्रे असलेल्या प्रदर्शनाचा लाभ जिल्ह्यातील जनतेने घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री                  श्री लोणीकर यांनी यावेळी केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने "महाराष्ट्र माझा" ही राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रे जालना जिल्ह्यातील नागरिकांना बघता यावीत या उद्देशाने येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथील हॉलमध्ये हे प्रदर्शन सुरु असून                 दि. 15 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना मोफत पाहता येणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी                 श्री बावस्कर यांनी यावेळी सांगितले.
 यावेळी शासनाच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी, शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी, नर्सिग कॉलेजच्या विद्यार्थीनी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*******


Monday, 6 March 2017

नामांकित छायाचित्रकारांचे "महाराष्ट्र माझा" प्रदर्शनाचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते उदघाटन संपन्न

जालना -  प्राचीन भारतीय कला- संस्कृती, इतिहासाचा वारसा, लोकपरंपरा, धार्मिक, सांस्कृतिक, पर्यटन, वन्यजीव तसेच शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांवर आधारित अशा वैविध्यपूर्ण छायाचित्रे असलेल्या प्रदर्शनाचे आयोजन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग, जालना येथे आयोजन करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
            यावेळी जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर, ज्येष्ठ छायाचित्रकार बाबुराव व्यवहारे, लक्ष्मण राऊत, तालुका विधी न्या विभागाचे समन्वये ॲड पी.जे. गवारे, सामाजिक कार्यकर्ते हेमंत ठक्कर आदींची प्रमुख उपस्थिती होती. 
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की,  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जिल्हा माहिती कार्यालय, जालना यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र माझा छायाचित्र प्रदर्शनात कला, संस्कृती, इतिहास वारसा यासह शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा समावेश असलेल्या विषयावरील अप्रतिम अशा छायाचित्रांचा समावेश करण्यात आला असून या प्रदर्शनाचा लाभ शालेय,महाविद्यालयीन विद्यार्थी, विद्यार्थीनींसह सर्व नागरिकांनी घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने "महाराष्ट्र माझा" ही राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेतील निवडक छायाचित्रे जालना जिल्ह्यातील नागरिकांना बघता यावीत या उद्देशाने येथील डॉ. बाबसाहेब आंबेडकर भवन, सामाजिक न्याय विभाग, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, जालना येथील हॉलमध्ये हे प्रदर्शन आज दि. 6 मार्च, 2017 पासून भरविण्यात आले असून 15 मार्चपर्यंत हे प्रदर्शन सर्वांना मोफत पाहता येणार असल्याचे जिल्हा माहिती अधिकारी श्री बावस्कर यांनी यावेळी सांगितले.
 या उदघाटन समारंभास पत्रकार अंकुश गायकवाड, अभयकुमार यादव, नारायण माने, अतुल व्यवहारे, अनिल व्यवहारे, साबेर खान, जावेद तांबोळी, किरण खानापुरे, सुनिल खरात, शासनाच्या विविध विभागाचे प्रमुख अधिकारी, कर्मचारी यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

*******







Friday, 3 March 2017

श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन योजनेंतर्गत करण्यात येणाऱ्या 16 गावांच्या विकास कामांचा डीपीआर तातडीने सादर करा– पालकमंत्री बबनराव लोणीकर

जालना –   केंद्र शासनाच्या श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन योजनेमध्ये परतूर तालुक्यातील 16 गावांचा समावेश करण्यात आला असून या गावांमध्ये विविध विकास कामे करण्यासाठी डीपीआर (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट) तातडीने सादर करण्याचे निर्देश राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा‍ जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.
श्यामा प्रसाद मुखर्जी रुरबन योजनेसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात संबंधित यंत्रणांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री लोणीकर बोलत होते.
या बैठकीस जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, ग्रामविकास विभागाचे उपसचिव श्री भालेराव यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी पालकमंत्री श्री लोणीकर म्हणाले की, परतूर तालुक्यातील आष्टीसह अकोली, आनंदगाव, ब्राम्हणवाडी, सुरुमगाव, ढोकमाळ तांडा, फुलेवाडी, पळसी, हास्तुरतांडा, लिखित पिंप्री, लोणी खुर्द, कनकवाडी, परतवाडी रायगव्हाण, सातारा वाहेगाव व वाहेगाव सातारा या गावांचा श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे.  या योजनेंतर्गत ग्रामीण व शहरी भागातील विकासाचा असमतोल दूर करणे असून निवड झालेल्या गावांमध्ये आर्थिक व तांत्रिक सोयी-सुविधा उपलब्ध करुन देणे अपेक्षित आहे.  त्यानुसार सर्व संबंधित यंत्रणांनी या गावांचा विकास करण्यासाठी जबाबदारीने व समन्वयाने कामे करावीत.  या कामात हगगय अथवा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पालकमंत्री       श्री लोणीकर यांनी यावेळी सांगितले.          
 श्यामाप्रसाद मुखर्जी रुरबन योजनेंतर्गत निवड झालेल्या गावात विकास कामे करण्यासाठी राज्य शासनामार्फत 70 टक्के निधी उपलब्ध करुन देण्यात येणार असून उर्वरित 30 टक्के निधी केंद्र शासनाकडून उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.  या 16 गावांमध्ये कौशल्यविकास प्रशिक्षण, कृषी प्रक्रिया, स्टोरेज आणि गोदाम, मोबाईल आरोग्य युनिट, शाळा सुधारणा, उच्चशिक्षण सुविधा, स्वच्छता, पाणी पुरवठा, घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन, गावअंतर्गत गटारे, रस्त्यावरील पथदिवे, गावअंतर्गत रस्ते जोडणी, सार्वजनिक वाहतुक, एलपीजी गॅस कनेक्शन, डिजिटल साक्षरता, नागरी सेवा केंद्रे आदी सुविधा उपलब्ध करुन द्यावयाच्या आहेत.  गावात कामे करताना ती गुणवत्तापूर्ण व दर्जेदार होतील याची सर्व यंत्रणांनी दक्षता घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री लोणीकर यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.
            यावेळी ग्रामविकास विभागाचे सचिव श्री भालेराव यांनी योजनेचे महत्व व कशापद्धतीने ही योजना राबवावयाची आहे या संदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांनासविस्तर अशी माहिती दिली. तर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी आजपर्यंत या योजनेंतर्गत झालेल्या कामांचा व केलेल्या नियोजनाचा उपस्थित अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला.
            या बैठकीस संबंधित विभागाचे जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.

*******

Friday, 17 February 2017

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक 2017 जिल्ह्यात सरासरी 70.69 टक्के मतदान 7 लाख 88 हजार 372 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क सर्वात जास्त 76.27 टक्के मतदान जाफ्राबाद तालुक्यात तर सर्वात कमी 66.36 टक्के मंठा तालुक्यामध्ये

जालना, दि. 17 –  जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक -2017 साठी जिल्ह्यात दि. 16 फेब्रुवारी, 2017 रोजी सकाळी 7-30 ते सायंकाळी 5-30 या वेळेत मतदान घेण्यात आले. जिल्ह्यात सरासरी 70.69 टक्के एवढे मतदान झाले असून एकूण 11 लाख 15 हजार 190 मतदारांपैकी 7 लाख 88 हजार 372 एवढ्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती निवडणूक विभागाकडून देण्यात आली असून तालुकानिहाय मतदानाची आकडेवारी खालीलप्रमाणे देण्यात येत आहे. कंसामध्ये एकूण मतदारांची संख्या आहे.
            भोकरदन तालुक्यामध्ये 80 हजार 300 पुरुष मतदारांनी तर 68 हजार 595 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला (209215), जाफ्राबाद 43 हजार 531 पुरुष, 38 हजार 636 स्त्री (107726),                   बदनापुर 41 हजार 566 पुरुष, 35 हजार 724 स्त्री (103174), जालना 62 हजार 565 पुरुष, 53 हजार 361 स्त्री (170386), मंठा 36 हजार 105  पुरुष, 31 हजार 02 स्त्री (101120), परतूर 39 हजार 725 पुरुष, 34 हजार 968 स्त्री (103971), घनसावंगी 57 हजार 401 पुरुष, 49 हजार 647 स्त्री (154855) तर अंबड तालुक्यामध्ये 62 हजार 200 पुरुष मतदारांनी तर 53 हजार 46 स्त्री मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला (164743). आठही तालुक्यात असलेल्या 5 लाख 89 हजार 238 पुरुष मतदार व 5 लाख 25 हजार 952 स्त्री मतदार असे एकूण 1115190 एवढ्या मतदारांपैकी 4 लाख 23 हजार 393 पुरुष मतदार व 3 लाख 64 हजार 979 स्त्री मतदार असे एकूण 7 लाख 88 हजार 372 एवढ्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.    जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सर्वात जास्त 76.27 टक्के मतदान जाफ्राबाद तालुक्यामध्ये झाले तर सर्वात कमी 66.36 टक्के मंठा तालुक्यामध्ये झाले.  भोकरदन तालुक्यात 71.17 टक्के, बदनापुर तालुक्यात 74.91 टक्के, जालना तालुक्यात 68 टक्के, परतूर तालुक्यात 71.84 टक्के, घनसावंगी तालुक्यात 69.13 टक्के तर अंबड तालुक्यामध्ये 69.96 टक्के मतदान झाले.
           

*******

Monday, 13 February 2017

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज – जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे


            जालना, – जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी 16 फेब्रुवारी, 2017 रोजी मतदान होत असून या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत सर्वतोपरी तयारी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिली.
            जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक 2017 च्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहिती देताना श्री जोंधळे बोलत होते.
            यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह, उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) डॉ. एन.आर. शेळके, जिल्हा माहिती अधिकारी एस.के. बावस्कर आदींची उपस्थिती होती.
            यावेळी जिल्हाधिकारी श्री जोंधळे म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या एकूण 56 गटासाठी 139 स्त्री तर 131 पुरुष असे एकूण 270 उमेदवार तर पंचायत समितीच्या 112 गणासाठी 259 स्त्री व 239 पुरुष असे एकूण 498 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.  जिल्ह्यात 5 लाख 22 हजार स्त्री मतदार तर 5 लाख 85 हजार 313 असे एकूण 11 लाख 7 हजार 813 मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत.   या निवडणुकीसाठी 2 हजार 898 कंट्रोल व बॅलेट युनिट पुरविण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी 133 क्षेत्रीय अधिकारी, 1 हजार 497 मतदान केंद्राध्यक्ष, 4 हजार 434 मतदान अधिकारी असे एकूण 6 हजार 119 अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी व्हावी यासाठी प्रत्येक तालुका स्तरावर एक व जिल्हाधिकारी कार्यालयात एक असे एकूण 9 आचारसंहिता कक्षाची स्थापना करण्यात आली असून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी प्रत्येकी दोन भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे.  जिल्ह्यात एकूण 18 चेकपोस्ट, 17 व्हिडीओ सर्व्हीलेन्स पथक व 9 खर्च तपासणी पथके कार्यरत असल्याची माहितीही त्यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांना दिली.
            मतदानाच्या एक दिवस अगोदर दि. 15 फेब्रुवारी मतदानाचा दिवस 16 फेब्रुवारी व मतमोजणी दि. 23 फेब्रुवारी, 2017 रोजी जिल्ह्यात ड्राय डे पाळण्याच्या सुचना देण्यात आल्या असून मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवणे तसेच मतदारांना मतदान करता यावे यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्याबाबत सर्व संबंधितांना सुचना देण्यात आल्या असल्याचेही जिल्हाधिकारी श्री जोंधळे यांनी यावेळी सांगितले.
            यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती ज्योतिप्रिया सिंह म्हणाल्या की निवडणुकीच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी यासाठी पोलीस प्रशासनामार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असून या कालावधीत 9 उप विभागीय पोलीस अधिकारी, 27 पोलीस निरीक्षक, 79 सहाय्यक पोलीस निरीक्ष आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकाऱ्यांबरोबरच 1 हजार 152 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत.   त्याचबरोबर बाहेर जिल्ह्यातील 115 पोलीस कर्मचारी, 240 नवप्रशिक्षणार्थी, एक राज्य राखीव दलाची कंपनी व 600 होमगार्ड यांचीसुद्धा नियुक्ती निवडणुकीसाठी करण्यात आली आहे.           
            निवडणुकीच्या कालावधीमध्ये 107 कलमान्वये 710, कलम 110 अन्वये 165 इसमांवर प्रभावीपणे प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून कलम 149 प्रमाणे 454 इसमांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.  त्याचबरोबर कलम 144 (2) अन्वये 8 इसमांवर कारवाई करण्यात आली असून अवैधरित्या दारुची विक्री व वाहतुक आणि साठवणूक करणाऱ्यांच्या संदर्भात 296 गुन्हे दाखल करण्यात आले असल्याची माहितीही पोलीस अधीक्षकांनी यावेळी पत्रकारांना दिली. मतदारांनी कोणाच्याही दबावाला बळी न पडता मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहनही श्रीमती ज्योतिप्रिया सिंह यांनी यावेळी केले.
            या पत्रकार परिषदेस विविध वर्तमानपत्राचे प्रतिनिधी, संपादक तसेच इलेक्ट्रॉनिक मिडियाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

*******