Friday, 29 August 2025

जिल्हा प्रशासनाकडून अपघातग्रस्त ठिकाणी तातडीने मदत कार्य

 


 

जालना दि. 29 (जिमाका) :- जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी ते राजुर रस्त्यावर शुक्रवार दि.29 ऑगस्ट 2025 रोजी पहाटे अंदाजे 5 वाजता चालकाचे नियंत्रण सुटल्याने एक कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या विहिरीत जावून पडली होती. जालना जिल्ह्यातील अपघाताची माहिती समजताच या घटनेचे गांभिर्य ओळखून जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत अपघातग्रस्त ठिकाणी तातडीने अचुक व समन्वय ठेवून बचाव व मदत कार्य करण्यात आले.

सकाळपासून उपविभागीय अधिकारी तथा  सहायक जिल्हाधिकारी डॉ.बी. सर्वांनन, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, उपविभागीय पोलिस अधिकारी नितिन कटेकर, प्र.तहसीलदार सुरेश मिसाळ, अग्निशमन अधिकारी माधव पाणपट्टे हे घटनास्थळावर प्रत्यक्ष हजर झाले होते. जिल्हा प्रशासनाकडून शर्थीचे प्रयत्न करत क्रेनच्या सहाय्याने दुर्घटनाग्रस्त कार विहीरीतुन बाहेर काढण्यात आली. तसेच या अपघातात मृत्यु पावलेल्या व्यक्तीमध्ये 3 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश असून एकुण 5 मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. विहीरीतील मृतदेह शोधण्यासाठी गोताखोर यांनी तळाशी जावून शोध घेतला. पोलिस विभागाकडून अधिक तपास करण्यात येत आहे. अशी माहिती मिळाली आहे.

_*_*_*_*_

पंडीत दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवाविषयी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतली बैठक

 


 

जालना दि. 29 (जिमाका) :-  पंडीत दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवातंर्गत पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचे कार्य, विचारप्रणाली व एकात्म मानव दर्शन शालेय विद्यार्थी, शिक्षक, महिला इत्यादी घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक पार पडली.

बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, शिक्षणाधिकारी बाळासाहेब खरात, उपशिक्षणाधिकारी रवि जोशी, उपशिक्षणाधिकारी विनया वडजे, जिल्हा व्यवसाय व प्रशिक्षण अधिकारी अतुल केसकर, समिती सदस्य तथा ॠषी विद्या स्कुलच्या व्यवस्थापकीय संचालक शितल भाला, श्रीमती दानकुंवर हिंदी कन्या विद्यालयाचे कोषाध्यक्ष संजय अग्रवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.

गुरुवार दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती असून त्यानिमित्ताने पंडीत दीनदयाळ उपाध्याय एकात्म मानव दर्शन हिरक महोत्सवातर्गंत पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांचे कार्य, विचारप्रणाली व एकात्म मानवदर्शन जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी ग्राम पातळीवर विविध कार्यक्रम, युवा तरूण, तरूणी विद्यार्थ्यासाठी निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, वाद- विवाद स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात यावे. तसेच उत्कृष्ट सहभागासाठी पारितोषिक देवून गौरविण्याबाबत कार्यक्रम आयोजित करण्यात यावा. असे निर्देशही जिल्हाधिकारी मित्तल यांनी संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना यावेळी दिले.

-*-*-*-*-

30 ऑगस्ट रोजी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन

 


 

जालना दि. 29 (जिमाका) :-   ग्राम पातळीवर महसूली कामे वेळच्या आत पुर्ण करुन त्यानुसार अभिलेखे अद्यावत करणे व तसेच ग्राम पातळीवर कार्यालयीन कामकाजात सुलभता येण्यासाठी ग्राम पातळीवरील अधिकारी- कर्मचारी यांना प्रशिक्षीत करणे आवश्यक आहे. त्यानुसार ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्या दैनंदिन कामकाजाची माहिती व्हावी  यासाठी ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांच्यासाठी दि. 30 ऑगस्ट 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी दिली.

प्रशिक्षणाचे दि. 30 ऑगस्ट रोजी सकाळी 9:30 वाजता जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून  सकाळी 10 ते 11 या कालावधीत सर्वांसाठी घरे योजनेबाबत, जिवंत 7/12 मोहिम, भोगवटादार वर्ग 02 मधुन भोगवटादार वर्ग 01 रुपांतरणाबाबत, शर्तभंग प्रकरणाबाबत उप जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, नायब तहसीलदार किशोर तायडे हे मार्गदर्शन करणार आहेत.

सकाळी 11 ते 11:45 या वेळेत अनुदान वाटप पध्दती, महसुली नकाशामध्ये दर्शविलेल्या सर्व पाणंद व शिवरस्त्यांचे मॅपींग करुन व रस्त्याच्या दुर्तफा वृक्ष लागवड करणे,  ई-फेरफार,  ई-चावडी आदी  विषयावर उप विभागीय अधिकारी परतुर पद्माकर गायकवाड, सहायक महसूल अधिकारी भारती पांडे  हे मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी 12 ते 1 या वेळेत महाराजस्व अभियान राबविणे, ॲग्रिस्टॅक, (Digital Public Infrastructure for Agriculture) योजना अंमलबजावणी, कमी जास्त पत्रक, तुकडे बंदी कायदा, विशेष अर्थसहाय्य योजनेतंर्गत डीबीटीसाठी पात्र लाभार्थ्यांची योजनेनिहाय माहिती संकलित करणे याविषयी अंबडचे उप विभागीय अधिकारी उमाकांत पारधी, अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण हे मार्गदर्शन करणार आहेत.

दुपारी 1 ते 2 या वेळेत वाळु/रेती निर्गती धोरण 2025, वाळु घाटांचे सर्वेक्षण, एम-सॅण्ड, घरकुल बांधकाम वाळु वाटप, दगड, मुरुम, माती उत्खनन व सर्वेक्षण, अवैध उत्खनन, शासकीय कामांना गौण खनिज परवानगीबाबत या विषयांबाबत जालना उपविभागीय अधिकारी रामदास दौंड, जिल्हा गौण खनिज अधिकारी तुषार निकम हे मार्गदर्शन करणार आहेत. तरी प्रशिक्षणासाठी जिल्ह्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी वेळेवर उपस्थित रहावे. असेही सांगितले.

-*-*-*-*-

सण, उत्सवात ध्वनीची मर्यादा राखून सूट दिल्याचे आदेश जारी

 


जालना, दि.29 (जिमाका) :- जिल्ह्यात सन 2025 मध्ये विविध धार्मिक सण, उत्सव व उपक्रम संपन्न होणार असून या सण, उत्सवाच्या काळात ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर शासन निर्णय व ध्वनी प्रदुषण (नियम व नियंत्रण) नियम 200 च्या नियम 5 (3) नूसार ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाचा वापर श्रोतेगृहे, सभागृह, सामुहिक सभागृहे आणि मेजवाणी कक्ष यासारख्या बंद जागेशिवाय इतर ठिकाणी ध्वनीची विहीत मर्यादा राखून चालु वर्षातील खालील सण / उत्सव व उपक्रमाच्या दिवशी  सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत सूट देण्यात आली असल्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी आशिमा मित्तल यांनी जारी केले आहेत.

सण, उत्सव व उपक्रमामध्ये शिवजयंती, ईद-ए-मिलाद, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, 1 मे महाराष्ट्र दिन, श्रीकृष्ण जन्माष्टमी (दि. 15.08.2025) अनुक्रमे एक दिवस तर गणपती उत्सवासाठी दि. 27 ऑगस्ट व 6 सप्टेंबर रोजीचे 2 दिवस तसेच नवरात्री उत्सवातील नवमी आणि दिवाळीतील लक्ष्मीपूजन, ख्रिसमस, 31 डिसेंबर रोजी, विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा दि.14 व 15 फेब्रुवारी रोजी  आणि महत्वाच्या कार्यक्रमासाठी राखीव दोन दिवस अशी सुट जाहीर करण्यात आली असल्याचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. सण, उत्सवासाठी ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापराबाबतची सुट जिल्ह्यातील शांतता क्षेत्रासाठी लागू नसून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित नगरपालिका, नगर पंचायत, स्थानिक संस्था व ध्वनी प्रदुषण प्राधिकरणाची राहील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

 


 जालना, दि. 29 (जिमाका) :- जिल्ह्यात श्री. गणेश उत्सव, ईद ए मिलाद या सण, उत्सव आणि इतर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी मुंबई पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 37 (1) (3) अन्वये जालना जिल्ह्याच्या संपूर्ण हद्दीत दि.29 ऑगस्ट 2025 ते 11 सप्टेंबर पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी करण्यात आली आहे, असे आदेश अपर जिल्हादंडाधिकारी गणेश महाडिक यांनी जारी केले आहेत.

 संपूर्ण जालना जिल्ह्याच्या हद्दीत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपासून ते दि. 11 सप्टेंबर रोजीच्या 24 वाजेपर्यंत लागू राहील. या आदेशान्वये शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे, काठ्या, लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल, अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगता येणार नाही. व्यक्तीचे प्रेते, आकृत्या व प्रतिमा यांचे प्रदर्शन करता येणार नाही. जाहीरपणे घोषणा, गाणे म्हणणे, वाद्य वाजविणे यास प्रतिबंध राहील. तसेच कोणत्याही रस्त्यांवर किंवा कोणत्याही एका ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हा आदेश अधिकारी- कर्मचाऱ्यांना तसेच उपविभागातील पोलिस अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणूका, सभा, मोर्चा यांना लागू राहणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

Thursday, 28 August 2025

ई-पिक पाहणी करुन घेण्याचे शेतकऱ्यांना आवाहन

 


 

जालना दि. 28 (जिमाका) :-  हंगाम 2025-26 मध्ये केंद्र शासनाने निश्चित केलेल्या आधारभुत दरानूसार राज्यात नाफेड व एनसीसीएफच्यावतीने पणन महासंघामार्फत राज्यात कडधान्य व तेलबियांची (मुग, उडिद, सोयाबीन व तूर) खरेदी करण्यात येणार आहे.  आधारभुत दराने खरेदी करण्यासाठी ई-पिक पाहणी असलेला सातबारा उतारा आवश्यक आहे. तसेच ही खरेदी प्रक्रिया शेतकऱ्यांच्या हितासाठी पारदर्शक, कार्यक्षम व संपुर्णपणे ऑनलाईन प्रणालीद्वारे पार पाडली जाणार आहे. केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची ई-पिक पाहणी शासनाने दिलेल्या कालावधीत पुर्ण करावी, असे आवाहन पणन महासंघाकडून प्रसिध्दीपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

सार्वजनिक ग्रंथालयांनी पुरस्कारासाठी अर्ज करावेत

 


 

जालना दि. 28 (जिमाका) :-  जालना जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्र) यांनी शासनाच्या विविध पुरस्कारासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी, जालना यांच्याकडे  दि.30 सप्टेंबर 2025 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाचा गुणात्मक विकास व्हावा या उद्देशाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार तसेच ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने डॉ.एस.आर.रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार देण्यात येतो. शहरी व ग्रामीण भागातील अ, ब, क आणि ड  वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे 1 लाख, 75 हजार, 50 हजार आणि 25 हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देवून गौरविण्यात येत असते. असे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

 

शासकीय कामकाजात कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करावा - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 



 

 

जालना दि. 28 (जिमाका) :-  आजमितीस तंत्रज्ञानात नवनवीन बदल होत असून सद्यस्थितीत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सर्वत्र केला जात आहे. तरी जालना जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी -कर्मचाऱ्यांनी शासकीय कामकाज करतेवेळी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (ए.आय.) वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी प्रशिक्षणात केले.

जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवार दि. 28 ऑगस्ट 2025 रोजी एम. के. सी. एल. मार्फत कृत्रिम बुद्धिमत्ता (ए. आय.) प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी सरिता सुत्रावे, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, तहसीलदार अनिल नव्हाते, तहसीलदार प्रणाली तायडे यांची उपस्थिती होती. यावेळी एमकेसीएलचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक विनायक कदम यांनी ए. आय. आधुनिक तंत्रज्ञानाबद्दल उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचारी यांना सविस्तर प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणास महसूल अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-

नागरिकांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा - अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार

 



 

·         जनसंवाद कार्यक्रमातंर्गत बठाण ग्रामस्थांशी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी साधला संवाद

 

जालना (जिमाका), दि. 28 : सर्वसामान्य जनतेच्या अडचणी तसेच तक्रारीचे निराकरण करण्यासाठी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी आज जनसंवाद कार्यक्रमातंर्गत अंबड तालूक्यातील बठाण या गावाला भेट देवून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी श्रीमती मैत्रेवार यांनी भेटीत गावकऱ्यांच्या रस्ते, पाणी, वीज, रॅशन, शिक्षण या मुलभूत अडचणी व समस्या जाणून घेतल्या. तसेच शासकीय योजनांचा लाभ घेण्यासंबंधी येणारे अडथळे, तसेच स्थानिक विकासाशी संबंधीत विविध मागण्याची माहिती ही घेतली.

यावेळी सरपंच भगवान इंगळे, मंडळ अधिकारी, केंद्र प्रमुख, तलाठी, कृषी सहायक ग्रामविकास अधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार म्हणाल्या की, बठाण गावातील नागरिकांनी विकासाच्या कामाबाबत आपल्या संकल्पना शासनास सुचवाव्यात, त्यानूसार प्रशासनामार्फत कार्यवाही करण्यात येईल. आज येथे जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रत्यक्ष समस्या सोडविण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहेत. ग्रामस्तरावरील विविध विभागांचे अधिकारी या कार्यक्रमात उपस्थित असून, प्रलंबित व अपेक्षित असलेली विविध कामे तात्काळ सोडविण्यासाठी जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी श्रीमती मैत्रेवार यांनी नागरिकांच्या तक्रारी व सूचना ऐकून तातडीने कार्यवाही करण्यासाठी संबंधित विभागांना निर्देश दिले.

यावेळी शेत रस्ते विषयक प्रकरणे, स्वस्त धान्य दुकान, फेर-फार नोंदी, संजय गांधी निराधार अनुदान योजना, पांदण रस्ता, शिवरस्ता मोकळा करणे, घरकुल योजना, ई-पीक पाहणी, अंगणवाडी, आरोग्य सेवा आदी योजनांची विषयी बठाण ग्रामस्थांना माहिती देवून त्यांच्या अडचणीचे निराकरण जनसंवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आले. तसेच जागेवर सोडवणूक होणाऱ्या प्रकरणांचे निराकरण करण्यात आले. तसेच तालुका, जिल्हा, विभागीय आणि शासन स्तरावरील प्रकरणे सोडवणूक करण्यासाठी संबंधित विभागाकडे वर्ग करण्यात आली.

यावेळी बठाण येथील ग्रामस्थांनी गावाला जोडणारा मुख्य रस्ता करण्याची मागणी केली. तसेच नदीचे खोलीकरण करुन बंधाऱ्यावर गेट बसवून देणे, शाळेत शिक्षक उपलब्ध करुन देणे तसेच पर्यटन योजनेअंतर्गत गावातील  मंदीराचा विकास करुन देण्याची मागणी केली. यावर श्रीमती मैत्रेवार यांनी संबंधीत विभागास याबाबत पाठपूरावा करुन सदर मागण्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल असे सांगितले.  जनसंवाद कार्यक्रमास यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.

 

****

 

Tuesday, 26 August 2025

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


जालना दि.26 (जिमाका) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 27 ऑगस्ट ते 29 ऑगस्ट 2025 रोजी यलो  (Yellow) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, हलका ते मध्यम पाऊस आणि सोसाट्याचा वारा  (ताशी 30-40 कि.मी.प्र.ता. वेगाने) येण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच दि. 30 ऑगस्ट 2025 रोजी हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

            मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे,मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे.वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी,जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधाण्याचे आवाहजन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

27 ऑगस्ट रोजी जिल्ह्यात मद्यविक्री बंद

 


 

जालना दि. 26, (जिमाका) : बुधवार दि. 27 ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री व ताडी/माडी विक्री अनुज्ञप्ती संपूर्ण दिवस बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी आशिमा मित्त्ल  यांनी दिले आहेत.

या वर्षी 27 ऑगस्ट 2025 या दिवशी गणेश मुर्तीची स्थापना होणार आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 चे कलम 142 अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी बुधवार दि. 27 ऑगस्ट रोजी श्री गणेश चतुर्थी, या दिवशी जिल्ह्यातील सर्व किरकोळ देशी/विदेशी मद्य विक्री व ताडी/माडी विक्री अनुज्ञप्ती संपुर्ण दिवस बंद राहतील, असे आदेश जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी दिले आहेत.

या आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून, यामधे कसूर केल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकांविरुध्द मुंबई मद्य निषेध अधिनियम 1949 मधील तरतुदींनुसार कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी.                                                 -*-*-*-*-*-

 

महाबँक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातर्फे राणीउंचेगाव येथे एकदिवसीय शेतकरी मेळावा संपन्न

 



 

जालना,दि.26 (जिमाका) : महाबँक स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातर्फे आज दि. 25 ऑगस्ट रोजी राणीउंचेगाव येथे एक दिवसीय शेतकरी मेळावा संपन्न झाला.

या एक दिवसीय शेतकरी मेळाव्यात केंद्र आणि राज्य शासनाच्या बँके मार्फत राबावण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या माध्यमातून शेतीस पूरक जोड धंदे वाढवण्याचा हा एक प्रयत्न आहे असे श्री मंगेश केदार यांनी यावेळी सांगितले.

मेळाव्यास प्रमुख पाहुणे म्हणून जालना जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक मंगेश केदार उपस्थित होते. तसेच महाबँक स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रातर्फे संचालक गिरीश सुलताने, प्रशिक्षक दाभाडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन श्रीमती अनुराधा बोराडे आणि कमलेश भुरेवाल यांनी केले. या मेळाव्यात प्रशिक्षणार्थी आणि गावकरी यांची उपस्थिती होती.                                                

                                                           -*-*-*-*-*-

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी घेतला महसूल विभागाच्या आढावा

 



जालना,दि.26 (जिमाका) : जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी आज महसूल विभागातील सर्व विभागांचा सविस्तर आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित आढावा बैठकीत उप जिल्हाधिकारी, सर्व उप विभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार यांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी सदरील बैठकीत सर्व उप विभागीय अधिकारी यांनी दरमहा 2 तर तहसीलदार यांनी दरमहा 4 क्षेत्रभेटी करण्याच्या सूचना देवून, ग्रामपातळीवरील जनतेशी सातत्याने सुसंवाद ठेवण्यास सांगितले. तसेच  कार्यालयीन कामकाज करतांना तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा. मंडळ अधिकारी, तलाठी, तहसिल कार्यालयातील कर्मचारी यांचे सक्षमीकरण करुन  ई-ऑफिस प्रशिक्षणाचे आयोजन करावे. तसेच माहे नोव्हेंबर 2025 पर्यंत नागरिकांच्या प्रलंबित सर्व तक्रारीचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

तसेच श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियानांतर्गत दि. 17 सप्टेंबर, 2025 ते 2 ऑक्टोबर, 2025 या कालावधीत मिशन मोडवर कामकाज करुन, यात पाणंद रस्ते गाव नकाशावर घेणे, सर्वांसाठी घरे या अभियानांतर्गत पट्टेवाटप करण्याचा कार्यक्रम घेण्याबाबात सांगितले. नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येत असलेल्या सेवा विषयक माहिती तात्काळ उपलब्ध करून देण्यात याव्यात.  मा. मुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार राबविण्यात येत असलेल्या विकसित महाराष्ट्र, ई-गव्हर्नन्स विषयक सुधारणा आणि सेवा विषयक प्रशासकीय सुधारणा या तीन बाबींवर आधारित दीडशे दिवसांचा कृती आराखडा राबविण्यात येत असून, या कार्यक्रमातील सर्व सेवा विषयक बाबींची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

                                             -*-*-*-*-*-*-

नागरिकांनी एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 



 

जालना,दि.26 (जिमाका) : आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची प्रमुख योजना असुन राज्यात महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजने सोबत एकत्रितपणे राबविण्यात येत आहे. सदर योजने अतंर्गत लाभार्थी रुग्णांना अंगीकृत रुग्णांलयामध्ये रुपये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतात. तसेच 70 वर्षावरील सर्व व्यक्ती हे वय वंदना कार्डचे लाभार्थीं आहेत. वय वंदना योजनेअतंर्गत लाभार्थी रुग्णांना अंगीकृत रुग्णांलयामध्ये रुपये 5 लाखांपर्यंत मोफत उपचार देण्यात येतात.

तसेच आयुष्मान भारत अंर्तगत स्माईल (SMILE) योजनेचे लाभार्थीं ट्रान्सजेंडर हे आहेत. आयुष्मान भारत स्माईल (SMILE) योजने अंर्तगत लाभार्थीना रुग्णांना तसेच आयुष्मान भारत नमस्ते (नमस्ते) योजने अंर्तगत लाभार्थीना रुग्णांना अंगीकृत रुग्णांलयामध्ये रुपये 5 लाखापर्यंतचे मोफत उपचार देण्यात येतात.

त्या अनुषंगाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे आज दि. 26 ऑगस्ट, 2025 रोजी जिल्ह्यातील गोल्डन कार्ड पात्र लाभार्थ्यांची संख्या 18 लाख 34 हजार असुन त्यापैकी 6लाख 74 हजार एवढे कार्ड तयार करण्यात आले आहे. उर्वरीत एकुण 11 लाख 60 हजार लाभार्थ्यांचे ई के.वाय.सी करण्यात येणार आहे.

एकत्रित आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना आणि वय वंदना योजनेचे ई-केवायसी कामचे उद्धिष्ट पुर्ण करण्याकरिता दि. 01 ऑगस्ट, 20254 पासून जिल्ह्यामध्ये विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या योजनेतंर्गत  आयुष्मान कार्डसाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता आहे. यामध्ये  12 अंकी ऑनलाईन राशन कार्ड क्रमांक, आधार कार्ड, आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल तर वय वंदना कार्डसाठी आधार कार्ड, आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल ही कागदपत्र आवश्यक आहे. स्माईल (SMILE) योजने अंर्तगत आयुष्मान कार्ड e-KYC करण्यासाठी 12 अंकी ऑनलाईन राशन कार्ड क्रमांक, आधार कार्ड, आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाइल तर नमस्ते योजने अंर्तगत आयुष्मान कार्ड e-KYC करण्यासाठी आधार कार्ड आणि आधार कार्ड सोबत लिंक असलेला मोबाईल लाभार्थ्यांकडे असणे आवश्यक आहे.

तसेच आपल्या भागातील आशा सेविका,स्वस्त धान्य दुकानदार,आपले सरकार सेवा केंद्र,महा ई-सेवा केंद्र आणि योजने अंतर्गत अंगिकृत रुग्णालयात आरोग्यमित्रांना भेटून सर्व नागरिकांनी आयुष्मान कार्ड आणि वय वर्ष 70 किंवा 70 पेक्षा जास्त वय असलेल्या सर्व जनतेनी वय वंदना कार्ड ई-के.वाय.सी बनवुन घ्यावे. तसेच या विशेष मोहिमे मध्ये जास्तीत-जास्त जनतेने,अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेऊन जास्तीत-जास्त लाभार्थ्यांनी आयुष्मान कार्ड आणि वय वंदना कार्डचे ई-के.वाय.सी करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी आाशिमा मित्तल यांनी केले आहे.

                                             -*-*-*-*-*-*-

गणेशोत्सवानिमीत्त सार्वजनिक गणेश मंडळांना अन्न व औषध प्रशासनातर्फे आवाहन

 

 

जालना दि. 26, (जिमाका) : जालना जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांना आवाहन करण्यात येते की, दिनांक 27 ऑगस्ट 2025 पासुन गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. सदर उत्सवानिमीत्त विविध मंडळातर्फे भंडारा प्रसाद, अन्नदान इत्यादी कार्यक्रम ठेवण्यात येतात. त्या अनुषंगाने सर्व सार्वजनिक धार्मिक उत्सव मंडळे, त्यांचे पदाधिकारी आणि प्रसाद उत्पादन वितरण करणारे अन्न व्यवसायीक यांना सूचित करण्यात येते की, अन्न सुरक्षा व मानके अधिनीयम 2006 व त्या अंतर्गत नियम व नियमन 2011 मधील तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे.

प्रसाद वितरण करणाऱ्या मंडळांनी अन्न सुरक्षा व मानदे कायदा 2006 अंतर्गत ऑनलाईन अर्ज करुन नोंदणी प्रमाणपत्र घेण्यात यावे. प्रसाद तयार करण्याची जागा स्वच्छ व आरोग्यदायी असावी. प्रसादासाठी लागणारा किराणा माल परवानाधारक अथवा नोंदणीकृत अन्न व्यवसायीकांकडूनच खरेदी करावा. प्रसाद तयार करण्यासाठी उपयोगात येणारे पाणी पिण्यास योग्य असावे. प्रसाद तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी भांडी स्वच्छ, आरोग्यदायी व झाकण असलेली असावी. शक्यतो आवश्यक तेवढ्याच प्रसाद तयार करण्यात यावा. उरलेल्या शिळे अन्न पदार्थांची योग्य रितीने विल्हेवाट लावावी. प्रसाद तयार करणारा व वाटप करणारा स्वयंसेवक हा संसर्गजन्य रोगापासुन मुक्त असावा.

जनआरोग्याचे दृष्टीने वरील मार्गदर्शक सुचनांचे पालन करुन सहकार्य करावे.

जालना जिल्ह्यातील सर्व सार्वनिक गणेश उत्सव मंडळांनी वरील सर्व बाबींचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सहायक आयुक्त (अन्न)  अन्न व औषध प्रशासन,यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

                                             -*-*-*-*-*-*-

मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वाहतुक मार्गात बदल

 


 

जालना दि. 26, (जिमाका) : मराठवाडयातील काही मराठा समाज दिनांक 26 ऑगस्ट, 2025 रोजी पासुन अंतरवाली सराटी या ठिकाणी जमणार आहे. त्यामुळे दिनांक 26 ऑगस्ट, 2025 रोजी मराठवाडयातील जालना जिल्हा वगळता इतर जिल्ह्यातील सुमारे 10 ते 12 हजार लोक अंतरवाली सराटी याठिकाणी जमणार असून, सदर आंदोलन यात्रा दिनांक 27 ऑगस्ट, 2025 रोजी 10.00 वा. मौजे अंतरवाली सराटी ते मुंबई येथे जाणार आहे.

या यात्रेसाठी अंतरवाली सराटी येथे दिनांक 27 ऑगस्ट, 2025 रोजी 40 ते 50 हजार मराठा आंदोलक जमण्याची शक्यता असल्याने सुमारे 10 ते 12 हजार लोक आंदोलन यात्रेत सर्व सामानासह यात्रा सुरु करणार आहे. उरलेली लोक त्यांना बळेगावपर्यंत सोडण्यास येणार आहे.

त्याअनुषंगाने सदर ठिकाणी मोठ्याप्रमाणात जनसमुदाय हजर राहणार आहे. सदर आंदोलन यात्रेच्या वेळी अडथळा निर्माण होवु नये, रस्ता मोकळा राहावा तसेच रस्त्यावर वाहणे उभी राहुन मार्गात अडथळा निर्माण होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये. या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधिक्षक, अजय कुमार बंसल, जालना यांना प्रदान केलेल्या शक्ती नुसार जालना शहरातील वाहतुक नमुद पर्यायी मार्गाने वाहतुकीचे नियमनासाठी या मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात (Diversion) आले आहे.

            सध्याचा प्रचलित मार्ग पैठण फाटा शहागड ते पैठण  दिनांक 27 ऑगस्ट, 2025 रोजी मराठा आंदोलन यात्रेच्या अनुषंगाने वाहतुक नियमन बाबत पर्यायी मार्ग बीड गेवराईकडून येणारी पैठण फाटा शहागड मार्गे पैठणकडे जाणारी वाहने ही शहागड पाचोड एनएच 52 या महामार्गाने एकेरी वाहतुक जाण्यासाठी-येण्यासाठी राहणार आहे. वरील आदेश दिनांक 27 ऑगस्ट, 2025 रोजी 9.00 वाजेपासून मराठा आंदोलन यात्रा संपेपर्यत अंमलात राहणा असल्याचे पोलीस अधिक्षक कार्यालय, जालना यांनी कळविले आहे.

                                             -*-*-*-*-*-*-

 

Monday, 25 August 2025

जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते पावसामुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना मदतीच्या संचाचे वितरण




 

जालना, दि.25 (जिमाका) :- जालना जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या सततधार पावसामुळे बाधित झालेल्या शहरातील कुटुंबांना सेंटर फॉर एग्रीकल्चर अँड डेव्हलपमेंट अर्थात कार्ड संस्थेच्या माध्यमातून शेल्टर कम हायजीन किट्सचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

जालना येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन सभागृहात दि.25 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता संच वाटप कार्यक्रम पार पडला. यावेळी महापालिका आयुक्त संतोष खांडेकर, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त राजू एडके , सनदी लेखापरीक्षक स्नेहल मोदाळे, निखिल बाहेती, डॉ.दीपक बुक्तरे, पत्रकार नूर अहमद कुरेशी,कार्डचे अध्यक्ष सुवर्णा दांडगे,उपाध्यक्ष डॉ.रामदास निहाळ, सचिव पुष्कराज तायडे, कोषाध्यक्ष सोनिया तेलगड यांची उपस्थिती होती.

वाटप करण्यात आलेल्या शेल्टर कम हायजीन किट्समध्ये ताडपत्री,सतरंजी, मच्छरदाणी,टूथपेस्ट,ब्रश, अंगाची व कपडे धुण्याची साबण, सॅनिटरी नॅपकिन,दोरी, बॅग आदी साहित्य आहे. वाटप प्रसंगी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी कार्डच्या मदतीबद्दल अभिनंदन करून आपत्ती काळात अशीच मदत करत रहा असे सांगून संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुष्कराज तायडे यांनी केले यात त्यांनी अमेझॉन,डोनेट कार्ट कडून जालना जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टी बाधित कुटुंबांना 300 किट्स उपलब्ध करून देण्यात आल्या असून त्याचे वाटप जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात येत असून बाधित कुटुंबांपर्यंत पोहचणार आहोत. असे स्पष्ट केले.तर सूत्रसंचालन आणि आभार प्रा.डॉ.रामदास निहाळ यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी भास्कर उघडे, विशाल उघडे, राहुल उघडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी बाधित नागरिक उपस्थित होते.

 _*_*_*_*_


भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 


 

जालना दि. 25 (जिमाका) :- महानुभाव पंथाचे संस्थापक, लिळाचरित्रकार भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या अवतार दिनानिमित्त (जयंती) जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे यांच्यासह अधिकारी -कर्मचारी उपस्थित होते.

 -*-*-*-*-

जिल्ह्यात जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन

 

 

जालना दि. 25 (जिमाका) :-  जिल्ह्यात जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्याबाबत महसूल मंत्री यांनी आदेश दिले आहेत. या निर्देशानूसार जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार  दि.26 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 9 वाजता जालना तालुक्यातील नेर  व गुरुवार दि.28 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता अंबड तालुक्यातील बठाण येथे जनसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 

जनसंवाद कार्यक्रमातंर्गत नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधण्यात येणार आहे.  ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत त्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी  ग्रामपातळीवरील सर्व यंत्रणेचे अधिकारी जनसंवाद कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

Friday, 22 August 2025

जालना जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना जाहीर

 

 

जालना (जिमाका), दि. 22 : राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या प्रधान सचिव यांच्या 12 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार जालना जिल्हा परिषदेच्या 57 जागा आणि त्याअंतर्गत भोकरदन-22, जाफ्राबाद-12, बदनापूर-10, जालना-18, मंठा-12, परतूर-10, घनसावंगी-14 व अंबड-16 अशा एकूण जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांच्या 114 जागांसाठी निवडणूक प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार आज दि. 22 ऑगस्ट 2025 रोजी अंतिम प्रभाग रचनेची अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिद्ध होणार आहे.

ही अधिसूचना जालना जिल्हाधिकारी कार्यालय, जालना जिल्हा परिषद कार्यालय, सर्व उपविभागीय कार्यालये, सर्व तहसील कार्यालये आणि सर्व पंचायत समिती कार्यालयांतील फलकांवर नागरिकांच्या अवलोकनासाठी उपलब्ध असेल. सर्व संबंधितांनी अंतिम प्रभाग रचनेचे अवलोकन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-*-

जालना येथे 26 ऑगस्ट रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

 


 

जालना दि. 22, (जिमाका)  : नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध

खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने तसेच रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हाधिकारी कार्यालय जालना यांचे मार्फत जालना येथे दिनांक 26 ऑगस्ट 2025 मंगळवार रोजी प्लेसमेंटड्राईव्ह -जागेवर निवड संधी चे आयोजन सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आले आहे.

यासाठी बजाज ऑटो प्रा.लि.छत्रपती संभाजीनगर चे अप्रेंटिस करिता आय.टी. आय.कोणताही ट्रेड / डिप्लोमा उत्तीर्ण साठी 20 पदे, डिप्लोमा कोणताही ट्रेड उत्तीर्ण साठी टेक्नीशियनची 20 पदे तसेच मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा करिता आय टी आय / डिप्लोमा चे 20 पदे त्याचप्रमाणे टाटा मोटर्स प्रा.लि. पुणे यांचे ऑपरेटर पदाकरिता बारावी पास, आय.टी. आय / डिप्लोमा उत्तीर्ण साठी 50 पदेअशी एकूण 110 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत.

याकरीता नोकरी इच्छुक पात्रता धारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे कमवा आणि शिका योजने अंतर्गत पुणे येथे मेकॅट्रॉनिक्स डिप्लोमा करताना बेरोजगार उमेदवार यांना स्टायपेंड मिळणार आहे त्यामध्ये मोफत बस सुविधा,जेवण यांचा समावेश असून त्याच ठिकाणी त्यांना नोकरीची संधी देखील मिळणार आहे. जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.

त्याच प्रमाणे केंद्र शासनाच्या एन.सी.एस. पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी देखील www.ncs.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगिन मधून आपल्या युजर आयडी पासवर्ड च्या आधारे लॉगिन करावे.त्यानंतर डॅसबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील [PLECEMENT DRIVE (2025-26) JALNA] 03 याची निवड करावी किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो,शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ.कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून दिनांक दिनांक 26 ऑगस्ट मंगळवार रोजी सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय जालना 431203 येथे उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

 

                                                       -*-*-*-*-*-*-

Thursday, 21 August 2025

नागरिकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदणी करावी - जिल्हाधिकारी आशिमा मित्तल · जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांच्या धनादेशाचे वितरण · अटल पेंशन योजनेअंतर्गत सर्वोकृष्ट जिल्हा पुरस्कार

 



 

जालना दि. 21 (जिमाका) :- राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणाऱ्या जिल्ह्यातील नागरिकांना नियमितपणे केवळ 436 रुपये वार्षिक हप्ता भरुन प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ घेता येतो. या योजनेसाठी उत्पन्नाची कोणतीही अट नाही. शेतकरी, व्यावसायिक, कामगार, नोकरदार आदि या  योजनेत सहभागी होवू शकतात. तरी   जिल्ह्यातील  18 ते 50 वयोगटातील  बँकेत खाते असणाऱ्या नागरिकांनी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेत नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी यांच्या कक्षात गुरुवार दि.21 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 4 वाजता प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या लाभार्थ्यांस धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी छत्रपती संभाजीनगर येथील बँक ऑफ महाराष्ट्रचे उपप्रादेशिक अधिकारी मुकूंद कांबळे, जिल्हा अग्रणी बँक अधिकारी मंगेश केदार, व्यवस्थापक हितेश दामोर, आकाश पाटी, कैलास तावडे यांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्ह्यातील प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेसाठी बँक ऑफ महाराष्ट्रच्या कुंभार पिंपळगाव येथील शाखेतील खातेदार असलेले स्व. संतोष कंतुले यांच्या वारसदार श्रीमती रत्नमाला संतोष कंतुले यांना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते 2 लाख रुपयांचा धनादेशाचे वितरण करण्यात आले. यावेळी संबंधित यंत्रणेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

राष्ट्रीयकृत बँकेत खाते असणाऱ्या तसेच  प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा वार्षिक हप्ता केवळ 436 रुपये भरलेल्या खातेधारकाचा कोणत्याही कारणामुळे मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसदारास 2 लाख रुपयांची रक्कम शासनाकडून प्रदान करण्यात येत असते.  जिल्ह्यात प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतंतर्गत पात्र बचत खातेधारकांची संख्या  13  लाख 67 हजार अशी आहे.  जालना जिल्ह्यात प्रधानमंत्री जनधन योजना खातेधारक पात्र संख्या 4 लाख 70 हजार  लाख अशी असून आजअखेर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेतंर्गत 224 लाभार्थ्यांना प्रत्येकी 2  लाख रुपयांप्रमाणे दावे वितरित करण्यात आले आहेत. तर  प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेतंर्गत 64 लाभार्थ्यांना दावा रक्कम वितरीत करण्यात आली आहे.
तसेच, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत वार्षिक फक्त 20 रुपये वार्षिक हप्ता  भरून अपघाती मृत्यू अथवा अपंगत्वाच्या प्रकरणात 1 ते 2 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळते. अशी माहिती यावेळी देण्यात आली. तसेच अटल पेंशन योजनेअंतर्गत सर्वोकृष्ट जिल्हा पुरस्कार जालना जिल्ह्याला मिळाला आहे. त्याचे प्रमाणपत्रही जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते संबंधित यंत्रणेच्या अधिकाऱ्यांना यावेळी प्रदान करण्यात आले.