Wednesday, 30 April 2025

विकासाच्या प्रक्रियेत राज्य शासन शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी - पालकमंत्री पंकजा मुंडे

 






 

जालना दि.1(जिमाका): राज्य शासन विविध कल्‍याणकारी योजनेच्या माध्यमातून सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न करत असून, विकासाच्या प्रक्रियेत राज्य शासन शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या पाठिशी सदैव उभे असल्याचे, असे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसवंर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे यांनी केले.

महाराष्ट्र दिनाच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त जालना येथील पोलीस मुख्यालय मैदानावर श्रीमती मुंडे यांच्या हस्ते आज मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. याप्रसंगी खासदार कल्याण काळे, आमदार अर्जुन खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश मिनियार, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी योगदान व बलिदान देणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात, महान विभूतींना मी सर्वप्रथम अभिवादन करते. महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली. तेंव्हा पासूनच आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वच क्षेत्रामध्ये विकासाची मोठी भरारी घेऊन विविध क्षेत्रात उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यामुळेच आज आपले महाराष्ट्र राज्य देशातील अग्रेसर राज्य म्हणून ओळखले जाते. विविध योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे जालना जिल्हा देखील अग्रेसर राहिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि राज्याचे नाव देशात अग्रेसर ठेवण्यासाठी राज्य शासनाच्या प्रत्येक विभागाचा 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करून, ठोस कामगिरी करण्याचा निर्णय घेतला आहे.

‘जागतिक वसुंधरा दिन’ निमित्त पर्यावरणाचे संवर्धन व संरक्षण करण्यासाठी पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाच्या वतीने राज्यात 22 एप्रिल ते महाराष्ट्र दिन 1 मे, 2025 या कालावधीत ‘पर्यावरण वाचवा वसुंधरा सजवा’ (पर्यावरण बचाओ वसुंधरा सजाओ) हा उपक्रम यशस्वीरित्या राबविण्यात आला. या उपक्रमातंर्गत सर्वांनी आपल्या गावातील, आपल्या तालुक्यातील, आपल्या जिल्ह्यातील, आपल्या महानगरातील, पाण्याचे विविध स्त्रोत साफ केले आहेत. नद्या, नाले, तलावांची स्वच्छता केली. तसेच जालना शहरातून वाहणाऱ्या सीना-कुंडलिका नदी पात्रात मोठ्या प्रमाणात झालेली अतिक्रमणे काढून नदीची स्वच्छता करण्याचे काम करण्यात येत असल्याच त्यांनी सांगितले.

नागरिकांमध्ये जल साक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्व पटवून देणे आणि जल व्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठी जलसंपदा विभागाच्यावतीने 15 ते 30 एप्रिल या कालावधीत ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा करण्यात आला. या जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या माध्यमातून समाजात पाण्याच्या सुयोग्य वापराबाबत विविध उपक्रमाच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात आली. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात पाणी टंचाईकरिता आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. टँकर, पुरक नळ योजना, विहिर अधिग्रहण इत्यादी या उपाययोजनांद्वारे सर्वसामान्य नागरिकांना पाणी टंचाईचा त्रास होणार नाही. याबाबतच्या सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत.

कृषि क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करुन शासनाच्या विविध योजनांचा जलद गतीने व परिणामकारकरित्या लाभ शेतकऱ्यांना देणे सुलभ व्हावे याकरीता केंद्र शासनाची ‘अॅग्रिस्टॅक’ योजना राज्यात राबविण्यात येत असून, जिल्ह्यात सदर योजनेची अमंलबजावणी जलद गतीने सुरु आहे. जिल्ह्यात या योजने अंतर्गत सुमारे 3 लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. ‘ॲग्रीस्टॅक’ योजने अंतर्गत आपली नोंदणी आपली नोंदणी करुन घेण्याचे आवाहन पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी केले.

जिल्ह्यातील महसूल प्रशासनाने गाव नकाशात असणारे रस्ते खुले करणे व बारमाही वापरता येण्यासारखे कायमस्वरुपी रस्ते तयार करण्यासाठी कालबध्द कार्यक्रम तयार केला आहे. यामध्ये कालबध्द रितीने रस्ते खुले करणे, तसेच मातोश्री ग्रामसमृध्दी शेत / पाणंद रस्ते योजनेअंतर्गत बारमाही वापरता येण्यासारखे कायमस्वरुपी रस्ते तयार करणे 1 मार्च ते 9 मे या कालावधीत हा कालबध्द कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांची कायमस्वरुपी अडचण दूर होणार आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत खरिप हंगाम 2024-25 मध्ये 2 लाख 82 हजार शेतकऱ्यांना 107 कोटी रक्कम वितरीत करण्यात आली आहे. तसेच विविध शासन निर्णयानुसार डिसेंबर पर्यंत प्राप्त झालेला निधी वितरीत झाला असून, उर्वरीत निधीचे वितरण सुरु आहे. तसेच नैसर्गिक आपत्ती निधीचे वितरण सुरु आहे.

जालना जिल्ह्यात महत्वाच्या पायाभूत सुविधा उभारण्याचे काम प्रगतीपथावर सुरु आहे. यामध्ये जालना ड्रायपोर्ट, जालना-नांदेड समृध्दी महामार्ग आणि जालना-जळगाव रेल्वे मार्ग यांचा समावेश आहे. हे तिन्ही प्रकल्प सुरु झाल्यानंतर जालना जिल्ह्यातील उद्योगांना मोठ्या प्रमाणात चालना मिळणार असून, जिल्ह्याच्या विकासात देखील भर पडणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वकांक्षी योजना असून सदर योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा वीज व अखंडित वीज पुरवठा करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने या योजनेकरीता जिल्ह्यातील 47 उपकेंद्रासाठी 610 हेक्टर जमीन प्रदान केली आहे. या योजने अंतर्गत जालना जिल्ह्यात सहा ठिकाणी 29 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्यात 36 उपकेंद्राकरीता 186 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

 ‘मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना’ या योजनेअंतर्गत जालना जिल्ह्यातील 800 लाभार्थी मागील महिन्यात जालना येथुन अयोध्या येथे जाऊन दर्शन घेवून सुखरुप परतले आहे. बालविवाह रोखण्यासाठी मागील कालावधीत जिल्ह्यात चांगले काम झाले असून, जिल्ह्यात मागील वर्षात 144 बाल विवाह रोखण्यात महिला व बालविकास विभागाला यश आले असल्याचे त्यांनी सांगितले.

तसेच आज आपण आंतरराष्ट्रीय कामगार दिन साजरा करीत असून, देशाला प्रगतीपथावर आणण्यामध्ये कामगार बांधवांचा महत्वाचा वाटा आहे. त्याकरीता त्यांचे अभिनंदन करुन त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा देते. कामगार बांधवासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना केली आहे. या मंडळाचा मुख्य उद्देश हा विविध योजनांद्वारे इमारत व इतर बांधकाम कामगारांना सुरक्षा तसेच आरोग्य व इतर कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देणे हा आहे. या मंडळाअंतर्गत विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. कामगारासाठी असलेल्या सर्व योजने अंतर्गत कामगारांना सुमारे 72 करोड रुपये अर्थसहाय्य देण्यात आले आहे. तसेच केंद्र शासनाच्या ‘नमो कामगार कल्याण अभियान’ अंतर्गत 4 हजार कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संच वितरीत करण्यात आले आहे. तर अत्यावश्यक संच व सुरक्षा संच योजने अतंर्गत 99 हजार कामगारांना अत्यावश्यक संच व सुरक्षा संचाचा लाभ देण्यात आला आहे. तसेच सप्टेंबर 2024 पासून इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळाने प्रत्येक तालूक्यात ‘तालूका कामगार सुविधा केंद्र’ स्थापन केले आहे. याठिकाणी कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज तपासणी केली जात असल्याची त्यांनी माहिती दिली.

 

पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी प्रारंभी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या अत्यंत संतापजनक, निंदनीय भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या सर्व निरापराध नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली. तसेच त्यांच्या कुटूंबियांना या दु:खातून सावरण्यास सामर्थ्य मिळो यासाठी प्रार्थना करत असल्याचे सांगत, या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी इच्छा व्यक्त केली. तसेच निरापराध नागरिकांना लक्ष्य बनवणे ही मानवता विरोधी कृती आहे असल्याचे सांगुन अशा भ्याड हल्याचा त्यांनी जाहीर निषेध व्यक्त केला.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी परेड निरीक्षण केले. त्यानंतर विविध पथकांनी संचलन केले. पोलीस शहर व ग्रामीण यंत्रणेचे पथक, वाहतूक नियंत्रण विभाग, गृह रक्षक दल, शीघ्र प्रतिसाद दल यांच्यासह अग्निशमन दल, श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन वाहन, 108 रूग्णवाहिका आदि वाहनांचा संचलनात उत्स्फूर्त सहभाग होता. पोलीस वाद्यवृंद पथकाच्या स्फूर्तीदायक महाराष्ट्र गीतांच्या वादनाने कार्यक्रमाची रंगत वाढवली.

यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. मुख्य ध्वजारोहणाच्या कार्यक्रमास यावेळी स्वातंत्र्यसैनिक, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार व नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

****

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

 




 

जालना,दि.1(जिमाका): महाराष्ट्र दिनाच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, सरिता सुत्रावे, मनिषा दांडगे, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी, जिल्हा कोषागार अधिकारी श्री. पुंडगे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

                                                           -*-*-*-*-

 

 

 

 

waves summit


 

waves summit


 

वेव्हज् परिषदेच्या उद्घाटनासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 1 मे रोजी मुंबईत

 

       

 

मुंबई, दि. 30 : भारताच्या पहिल्या जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन (वेव्हज्) शिखर परिषदेचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 मे रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होणार आहे. या वेव्हज् परिषदेचे यजमानपद महाराष्ट्र शासन भूषवित आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक व माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांची या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती असणार आहे.

 

कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रिज" या घोषवाक्याखाली होणाऱ्या या चार दिवसीय शिखर परिषदेत भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवप्रवर्तनाचे जागतिक केंद्र म्हणून प्रदर्शित करण्यात येईल.

 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सर्जनशीलता, तंत्रज्ञान आणि प्रतिभेच्या एकत्रीकरणाच्या दृष्टीकोनाशी सुसंगत असलेल्या या वेव्हज् 2025 मध्ये चित्रपट, ओटीटी, गेमिंग, कॉमिक्स, डिजिटल मीडिया, कृत्रिम बुद्धिमत्ता, एव्हीजीसी- एक्सआर ब्रॉडकास्टिंग आणि नव्या तंत्रज्ञानाचा समावेश असेल. भारताच्या मीडिया आणि मनोरंजन क्षेत्रातील सामर्थ्याचे हे सर्वांगीण प्रदर्शन असेल. या उपक्रमाच्या माध्यमातून 2029 पर्यंत 50 अब्ज डॉलर्सच्या बाजारपेठेचे दरवाजे उघडले जातील, असा अंदाज आहे.

 

या शिखर परिषदेत प्रथमच ग्लोबल मीडिया डायलॉग (GMD) चे आयोजन मुंबईत होणार आहे. यामध्ये 25 देशांचे मंत्री सहभागी होणार असून, भारताच्या जागतिक मीडिया क्षेत्रातील सहभागात हा एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. वेव्हज् बजार या जागतिक ई-मार्केटप्लेसमध्ये 6,100 पेक्षा अधिक खरेदीदार, 5,200 विक्रेते आणि 2,100 प्रकल्प सहभागी होणार आहेत, ज्यातून स्थानिक व जागतिक स्तरावर व्यवसाय आणि नेटवर्किंगच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत.

 

या परिषदेत प्रधानमंत्री क्रिप्टोस्पियरला भेट देऊन क्रिएट इन इंडिया उपक्रमांतर्गत निवड झालेल्या सर्जनशील कलाकारांशी संवाद साधणार आहेत. याशिवाय, ते भारत पॅव्हिलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियनला देखील भेट देतील. या स्पर्धेसाठी एक लाखांहून अधिक नोंदणी झाली.

वेव्हज् 2025 परिषदेमध्ये 90 हून अधिक देश, 10,000 प्रतिनिधी, 1,000 कलाकार, 300 हून अधिक कंपन्या आणि 350 हून अधिक स्टार्टअप्स सहभागी होणार आहेत. शिखर संमेलनात 42 मुख्य सत्रे, 39 विशेष सत्रे आणि 32 मास्टरक्लासेस आयोजित करण्यात येणार आहेत, ज्यामध्ये ब्रॉडकास्टिंग, इन्फोटेन्मेंट, एव्हीजीसी- एक्सआर चित्रपट आणि डिजिटल मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश असेल..

 

****

 

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम

 

            जालना,दि.30 (जिमाका):  राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री तथा जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे या जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौऱ्यातील कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे बुधवार, दि. 30 एप्रिल, 2025 रोजी रात्री 9.30 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथे आगमन व राखीव. तसेच गुरुवार, दि. 1 मे, 2025 रोजी सकाळी 7.45 वाजता शासकीय विश्रामगृह जालना येथून वाहनाने पोलीस मुख्यालय, मैदानाकडे प्रयाण करतील. सकाळी 8.00 वाजता पोलीस मुख्यालय, मैदान येथे आगमन व महाराष्ट्र राज्याच्या 66 व्या स्थापना दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम उपस्थित राहतील. तसेच सकाळी 8.30 वाजता जालना येथून वाहनाने परळी वैजनाथ, जि. बीडकडे प्रयाण करतील.

तसेच पालकमंत्री श्रीमती मुंडे यांचे शनिवार, दि. 3 मे, 2025 रोजी दूपारी 2 वाजता जालना येथे आगमन होणार आहे. तसेच जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध शासकीय आढावा बैठकीस उपस्थित राहणार आहेत. सायं. 5.15 वाजता जालना येथून चिकलठाणा विमानतळ छत्रपती संभाजनगरकडे प्रयाण करतील.

****

महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

 



जालना दि.30(जिमाका): महात्मा बसवेश्वर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

यावेळी उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) नम्रता चाटे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) मनिषा दांडगे, नायब तहसिलदार अनिल नव्हाते, सतिश तायडे  व इतर कर्मचारी उपस्थित होते. 

****

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाकरिता मिनी ट्रॅक्टरसाठी 2 मे रोजी लॉटरी पध्दतीने स्वयंसहाय्यता बचतगटांची निवड

 

जालना दि.30(जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येतात. सन 2024-25 या आर्थिक वर्षातील सदर योजनेतंर्गत एकुण 25 मिनी ट्रॅक्टर चे उद्दिष्ट प्राप्त झाले आहेत. त्यानुषंगाने अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील स्वयंसहाय्यता बचतगटांकडुन अर्ज मागविण्यात येणार असून, पात्र बचतगटांपैकी मंजुर उद्दिष्टाच्या अनुषंगाने 25 बचतगटांची निवड करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने बचतगटांची लॉटरी पध्दतीने निवड करण्यात येणार आहे. बचतगटांची अंतिम पात्र व अपात्र यादी कार्यालयाच्या सुचना फलकावर डकविण्यात आली आहे. 

तरी सर्व बचतगटांना दिनांक 2 मे 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील सांस्कृतीक सभागृहामध्ये पात्र बचतगटातील अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिव यांनी लॉटरी पध्दतीने स्वयंसहाय्यता बचतगटांची निवड करण्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

 

****

 

 

Tuesday, 29 April 2025

मुंबईत होणारी ‘वेव्हज’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्र्यांकडून परिषदेच्या तयारीची पाहणी

 




 

     मुंबई, दि.29: मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे 1 ते 4 मे दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा (वेव्हज) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या समिटच्या तयारीची पाहणी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.

          वेव्हज 2025 परिषद मुंबईत होतेय हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. जागतिकस्तरावर मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ही परिषद ‘दावोस’ ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

 

दुपारी तीनच्या सुमारास उपमुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी जिओ वर्ल्ड सेंटरला भेट दिली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, उद्योग विभागाचे प्रधान सचिव श्री.अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसु आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी परिषदेबाबत सादरीकरण करण्यात आले.

 

या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाला मिळाले ही अभिमानाची बाब असून असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे असे सांगत उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीतू‌न ही परिषद साकार होत आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री श्री. मोदी १ मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत.

 

भारत जगात आघाडीवर आहे हे सिद्ध करण्यासाठी ही परिषद महत्वाची असून मुंबई हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे तसेच मिडिया आणि मनोरंजनाचे हे केंद्र असल्याने या परिषदेमुळे मनोरंजन क्षेत्राला तांत्रिकदृष्ट्या नवी ओळख मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या परिषदेमुळे आंतरराष्ट्रीय स्टुडिओज, प्रोडक्शन हाऊसेस, टेक कंपन्यांची भागीदारीची याची दारे खुली होतील असेही ते म्हणाले.

 

-*-*-*-*-*-

 

10 मे रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

 


 

        जालना, जिमाका, दि.29 : उच्च न्यायालय, मुंबई व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार दिनांक 10 मे, 2025 रोजी जिल्हा व सत्र न्यायालय, जालना येथे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

या लोक अदालतीचा जास्तीत जास्त लोकांना फायदा व्हावा या उद्देशाने लोक अदालत बाबतची माहिती व प्रसिध्दी घरा-घरा पर्यंत पोहचावी या उद्देशाने व लोकांनी जास्तीत जास्त प्रकरणे लोक न्यायालयाच्या माध्यमातून निकाली निघावे या हेतुन राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.

लोक अदालतीमध्ये आपली जास्तीत जास्त प्रकरणे ठेवावी यासाठी विधिज्ञ, पक्षकार व शासनाच्या विविध विभागांनी/अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, जालना वर्षा एम. मोहिते व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना प्रणिता पी. भारसाकडे-वाघ यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-*-

एम. आर. डी. ए. स्कूलमध्ये कायदेविषयक शिबिर संपन्न

 


        जालना, जिमाका, दि.29 : उच्च न्यायालय मुंबई व मुंबई महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना व एम.आर.डी.ए. स्कुल, जालना यांच्या संयुक्त विद्यमान दिनांक 25 एप्रिल, 2025 रोजी एम.आर.डी.ए. स्कुल, जालना येथे कायदेविषयक शिबीराचे आयोजन करण्यात आले.

 

त्याप्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्षा एम. मोहिते, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जालना प्रणिता पी. भारसाकडे-वाघ, सह दिवाणी न्यायाधीश क.स्तर, जालना तथा प्रमुख न्यादंडाधिकारी जुवेनाईल जस्टीस बोर्ड (जे.जे.बी.), आर.एन. मुजावर, सदस्य बाल न्यायमंडळ, जालना अॅड. अश्विनी एम. धन्नावत, व एम.आर.डी. स्कुलच्या संचालीका ईश्वरी चव्हाण उपस्थित होत्या. त्यावेळी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती वर्षा एम. मोहिते यांनी पोक्सो अॅक्ट विषयी मुलांना मार्गदर्शन केले. सचिव प्रणिता पी. भारसाकडे-वाघ, यांनी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, कार्यालयाची माहिती व या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना या विषयी मुलांना मार्गदर्शन केले. आर.एन. मुजावर यांनी जुवेनाईल अॅक्ट प्रमाणे बालकांचे हक्क, या विषयी मुलांना मार्गदर्शन केले. तसेच अॅड. अश्विनी एम. धन्नावत यांनी कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा छळ, बाल विवाह या विषयी मुलांना मार्गदर्शन केले.

 

प्रवेश प्रक्रिया सन 2025-26 इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळांमध्ये अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश

 


 

जालना, जिमाका, दि.29 : सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, व लातूर या जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुला / मुलींना इयत्ता 1 ली मध्ये शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित निवासी शाळेमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे.

 

या योजनेचा लाभ घेवू इच्छिणारा विद्यार्थी अनुसूचित जमातीचा असावा. अर्जासोबत अनुसूचित जमातीच्या दाखल्याची साक्षांकित प्रत असावी. विद्यार्थी दारिद्रय रेषेखालील असेल तर त्यासंबंधीत छायांकित प्रत व दारिद्रय रेषा अनुक्रमांक नमुद करावा. पालकाची उत्पन्न मर्यादा ही 1 लाख एवढी असुन यासाठी सक्षम अधिका-याने दिलेले उत्पन्न प्रमाणपत्र देण्यात यावे. अर्जासोबत पालकांनी संमती पत्रक देणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दोन पासपोर्ट साईजचे फोटो, जन्म तारखेचा पुरावा व वैद्यकिय अधिकारी यांचे प्रमाणपत्र जोडण्यात यावे. या योजनेत आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांना तसेच विधवा, घटस्फोटीत, निराधार व दारिद्रय रेषेखालील कुटुंबातील पाल्याला प्रथम प्राधान्य देण्यात येईल विद्यार्थ्यांचे पालक शासकीय / निमशासकीय नोकरदार नसावेत प्रकल्प कार्यालयात प्रवेश अर्ज विनामुल्य उपलब्ध असुन दिनांक 23 मे, 2025 पर्यंत परिपुर्ण प्रवेश अर्ज जमा करणे आवश्यक आहे.

 

तरी या योजनेअंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यावर होणारा संपुर्ण खर्च आदिवासी विकास विभाग करणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रकल्प कार्यालय, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, रिलायंन्स मॉलच्या पाठीमागे, गारखेडा परिसर, छत्रपती संभाजीनगर येथे संपर्क साधावा अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या पाल्यास शहरातील इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेत प्रवेश घेण्याबाबतचे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-

आपदा मित्र’ प्रशिक्षणासाठी नोंद करण्याचे आवाहन

 

 

जालना, जिमाका, दि.29 : राज्यातील 20 जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या Up scaling apda Mitra या योजनेचे यश विचारात घेऊन  उर्वरित 16 जिल्ह्यात  ‘आपदा मित्र’प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यास दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजीचे शासन निर्णयानुसार प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाअंतर्गत जालना जिल्ह्यामधून एकूण 300 आपदा मित्रांना (स्वयंसेवक) आपत्ती व्यवस्थापन विषयाबाबत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. आपदा मित्रांत नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थीनी NCC/NSS विद्यार्थी, NGO, आशा, पोलिस पाटील, कोतवाल, अंगणवाडी सेविका, होमगार्ड, पोलीस, महाराष्ट्र सुरक्षा बल, खाजगी सुरक्षा रक्षक, शासकीय/निम शासकीय कर्मचारी यांचा समावेश करण्यात येणार आहे.

सहभागी होणा-या प्रशिक्षणार्थीना 12 दिवसाचे निवासी प्रशिक्षण, वैयक्तिक आपत्कालीन प्रतिसादकर्ता संच (ERK), 3 वर्षाकरिता 5 लाखाचे विमा संरक्षण राज्य शासनातर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सदरील कीट आपदा मित्र प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्यात येईल.

 

 

 

आपदा मित्र निवड निकष

      सदर व्यक्ती हि भारताची नागरिक असावी व संबंधित जिल्ह्यातील रहिवासी असावी. सदर व्यक्ती हि शारीरिक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावी. वयोमर्यादा 18 ते 45 वर्ष (माजी सैनिक, डॉक्टर, स्थापत्य अभियंता, शास्त्रज्ञ, आपत्कालीन सेवेतून सेवानिवृत अधिकारी व कर्मचारी यांना आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी करून घेता येईल त्याकरिता वयोमर्यादा 55 वर्षे असेल मात्र त्यांना विमा सुरक्षा देता येणार नाही.) आपदा मित्र प्रशिक्षणामध्ये किमान 35% महिलांचा सहभाग असणे आवश्यक आहे.

      जालना जिल्ह्यातील नागरीकांना आवाहन करण्यात येते की, आपत्ती व्यवस्थापनामध्ये "आपदा मित्र (आपत्कालीन परिस्थितीत मदत करणारा स्वयंसेवक) म्हणून स्वेच्छेने प्रशिक्षण घेण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीने आपत्ती शाखा क्रिस्ताविकारी कार्यालय जालना अथवा आपल्या नजीकच्या तहसील कार्यालय येथे नाव नोंदणी करावी.

-*-*-*-*-*-

हज यात्रेकरुंचे लसीकरण व आरोग्य तपासणी

 


 

जालना, जिमाका, दि.29 : हज यात्रा 2025 साठी जाणाऱ्या हज यात्रेकरुंचे लसीकरण व आरोग्य तपासणी दि. 5 मे, 2025 रोजी सकाळी 9 ते 2 वाजेपर्यंत बी.एस्सी. नर्सिंग विद्यालय जिल्हा रुग्णालय परिसरात करण्यात येणार आहे. तरी  हज यात्रेसाठी जाणाऱ्या हज यात्रेकरुंनी लसीकरण व आरोग्य तपासणी करीता येतांना त्यांचे आधार कार्ड व पासपोर्टची छायांकित प्रत व यात्रेकरुना काही आजार असल्यास त्याची औषधोपचाराची संपुर्ण कागदपत्रे सोबत आणण्याचे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

 

वेव्हज 2025’ : माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राच्या जागतिक परिवर्तनाचा प्रारंभ

 


 

मुंबई, दि. 29 : देशातील माध्यम व मनोरंजन क्षेत्राच्या इतिहासातील सुवर्णक्षण ठरणाऱ्या वेव्हज 2025या जागतिक परिषदेस मुंबईत भव्य सुरुवात होत आहे. 1 मे रोजी, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वांद्रे कुर्ला संकुल येथील जिओ वर्ल्ड सेंटर, मुंबई येथे या ऐतिहासिक परिषदेचे उद्घाटन होणार आहे. 1 ते 4 मे दरम्यान होणारी ही परिषद भारत सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली असून, माध्यम आणि मनोरंजन उद्योगाच्या भविष्यासाठी दिशादर्शक ठरणार आहे.

 

मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे २०२५ या कालावधीत वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिटचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर, केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचाही या परिषदेत सहभाग असणार आहे.

 

मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर आहे. विशेषतः मुंबईला हिंदी चित्रपटसृष्टीचे माहेरघर म्हटले जाते. मनोरंजनाच्या क्षेत्रात मुंबई देशात अग्रगण्य शहर आहे. गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रात परकीय गुंतवणुकीतही आघाडीवर आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात देखील महाराष्ट्र आणि मुंबई आघाडीवर राहिलेले आहे. पर्यटनाच्या दृष्टीने देखील महाराष्ट्र या देशाच्या पातळीवर अन्य देशांशी स्पर्धा करतो आहे. म्हणून पर्यटनाची सगळी स्थळे जागतिक पातळीवर जावी, हा देखील या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिटचा उद्देश आहे. या कार्यक्रमात ३३ देशांतील मंत्री व मंत्रीस्तरीय अधिकारी, तसेच १२० आंतरराष्ट्रीय कंपन्यांचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूड, टॉलीवूड, मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकार व निर्मातेही कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

 

या चार दिवसीय सोहळ्यात भारत पॅव्हेलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियन, तेलंगणा पॅव्हेलियन तसेच अन्य  संस्थांचेही पॅव्हेलियन उभारण्यात येणार आहेत. त्यांचे उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 1 मे 2025 रोजी करणार आहेत. विविध क्षेत्रांतील परिसंवाद, राउंड टेबल कॉन्फरन्स, आणि सांस्कृतिक कार्यक्रम यांचा समावेश असेल. विशेषतः तिसऱ्या दिवशी म्हणजे ३ मे २०२५ रोजी नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर ए. आर. रहमान यांच्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 

महाराष्ट्र – ‘ग्लोबल क्रिएटर इकॉनॉमीकडे वाटचाल

बॉलीवूड, टीव्ही आणि ओटीटी इंडस्ट्री यांचे केंद्रस्थान असलेली मुंबई भारताच्या मनोरंजन क्षेत्रात नेहमीच आघाडीवर राहिली आहे. आता याच मुंबईला आणि महाराष्ट्राला जागतिक स्तरावर 'क्रिएटर हब' म्हणून प्रतिष्ठा मिळवून देण्याचा महत्त्वाकांक्षी प्रयत्न वेव्हज 2025च्या माध्यमातून होतो आहे. ऑस्कर, कान्स आणि दावोससारख्या जागतिक परिषदेच्या धर्तीवर प्रथमच भारतात अशी परिषद आयोजित होत असून, जगभरातील 100 पेक्षा अधिक देशांतील प्रतिनिधी यात सहभागी होणार आहेत.

 

माध्यम आणि मनोरंजन क्षेत्राला दिशा देणारा मंच

वेव्हज 2025ही परिषद केवळ भारतातीलच नव्हे तर जागतिक माध्यम व मनोरंजन (M&E)  उद्योगाला एकत्र आणणारा, नवसृजनास चालना देणारा आणि गुंतवणुकीसाठी दरवाजे उघडणारा एक महत्त्वाचा मंच आहे. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, तंत्रज्ञानातील कौशल्य आणि प्रतिभेचा संगम या परिषदेच्या केंद्रस्थानी असणार आहे.

परिषदेतील एक विशेष आकर्षण 'WAVES बाजार

 ‘WAVES बाजार’ – एक इंटरॅक्टिव्ह व्यावसायिक व्यासपीठ असून जिथे खरेदीदार आणि विक्रेते थेट संवाद साधू शकतात. नव्या प्रकल्पांची ओळख, सर्जनशील कल्पना, आणि गुंतवणुकीच्या संधी येथे उपलब्ध होतील. विशेषतः, श्रेणीआधारित शोध प्रणाली आणि सुरक्षित मेसेजिंग सुविधांमुळे व्यवहार अधिक प्रभावी आणि विश्वासार्ह ठरतील.

परिषदेत काय असणार?

·         परिषद सत्रे जागतिक उद्योग नेते, विचारवंत आणि नवोन्मेषक विविध विषयांवर मार्गदर्शन करतील.

·         मीडिया मार्केटप्लेस भारताच्या माध्यम व मनोरंजन (M&E) क्षेत्रातील वैविध्य, क्षमता आणि नवकल्पनांचे आकर्षक प्रदर्शन.

·         तंत्रज्ञान प्रदर्शन नवीन तंत्रज्ञान आणि सर्जनशील प्रकल्पांचे लाईव्ह डेमो.

·         सांस्कृतिक कार्यक्रम भारताच्या समृद्ध कलासंपदेची झलक दाखवणारे बहारदार कार्यक्रम.

जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अ‍ॅण्ड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025’ भारताला जागतिक पातळीवर कंटेंट सुपरपॉवरम्हणून ओळख मिळवून देण्यासाठी एक सुवर्ण संधी ठरणार आहे. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या दृष्टिकोनानुसार भारताने क्रिएटिव्ह इकॉनॉमीमध्ये आघाडी घेत असून नेहमीप्रमाणे मुंबईने क्रिएटिव्ह इकॉनॉमीचे नेतृत्व करायला तयार आहे. ‘वेव्हज 2025’ ही केवळ एक शिखर परिषद नाही, तर भारताच्या सर्जनशील शक्तीला, जागतिक गुंतवणुकीला आणि धोरणात्मक बदलांना चालना देणारा परिवर्तनशील क्षण आहे. भारताने याचा उपयोग करून जागतिक कंटेंट क्षेत्रावर आपला ठसा उमटवावा, अशी सर्व क्षेत्रातील तज्ज्ञांची अपेक्षा आहे.

वेव्हज 2025: का आहे ही परिषद खास?

भारतामध्ये माध्यम आणि मनोरंजन (Media & Entertainment - M&E) उद्योग हा वेगाने प्रगत होत असलेला आणि रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचा घटक आहे. OTT, अ‍ॅनिमेशन, गेमिंग, VFX, चित्रपट, संगीत, आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात भारताने गेल्या दशकात विक्रमी प्रगती केली आहे. FICCI-EY रिपोर्टनुसार, 2024 मध्ये भारतीय माध्यम आणि मनोरंजन उद्योगाची किंमत $28 अब्जच्या पुढे गेली असून, 2025 पर्यंत तो $34 अब्ज गाठेल असा अंदाज आहे. याच पार्श्वभूमीवर ‘वेव्हज 2025’ ही परिषद केवळ चर्चासत्रांचे व्यासपीठ नसून, भारतातील सृजनशील उद्योगक्षेत्राला जगभरातील गुंतवणूक, सहकार्य, आणि नवकल्पनांशी जोडणारा सेतू ठरणार आहे.

 

भारत सृजनशील महासत्ता होण्याच्या वाटेवर

भारतात सध्या दरवर्षी 2,000 पेक्षा अधिक चित्रपट तयार होतात, ज्यात 20 पेक्षा अधिक प्रादेशिक भाषा समाविष्ट असतात. OTT प्लॅटफॉर्मवर भारतीय कंटेंटची मागणी केवळ देशातच नव्हे तर अमेरिका, युरोप, मिडल ईस्ट आणि दक्षिण आशियाई देशांमध्येही वाढत आहे. या मागणीचा फायदा घेत, भारताने कंटेंट एक्स्पोर्ट हबहोण्यासाठी पावले उचलणे ही काळाची गरज बनली आहे. WAVES 2025 या दिशेने एक निर्णायक टप्पा ठरेल. ही परिषद केवळ संवादाचा नव्हे, तर कृतीशील धोरणनिर्मितीचा केंद्रबिंदू ठरेल, जिथून भारताची माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील भविष्यातील दिशा ठरवली जाईल.

 

ऑस्कर, कान्स, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, दावोसच्या धर्तीवर वेव्हज् चेही दरवर्षी आयोजन

‘वेव्हज्’ ही परिषद केंद्र आणि राज्य शासनाच्या सहकार्याने होत आहे. वेव्हजला कायमस्वरूपी एक सचिवालय स्वरूपात पुढे नेण्यात येणार आहे. या परिषदेस एक कायमस्वरूप देऊन दरवर्षी हा कार्यक्रम घेतला जाणार आहे. ज्याप्रमाणे ऑस्कर, कान्स किंवा दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम सारखा आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयोजन केले जाते, अगदी त्याचप्रमाणे वेव्हज याचेही दरवर्षी आयोजन केले जाणार आहे. यासाठी एक समर्पित टीम वर्षभर काम करणार आहे.

 

वेव्हज परिषदेस 100 पेक्षा जास्त देश होणार सहभागी

सध्या तंत्रज्ञानाचे युग असून ते बदलणारे आहे. या नवीन बदलत्या तंत्रज्ञानाचे नेतृत्व महाराष्ट्राने करावे, यावर जोर देण्यात येत आहे. दृकश्राव्य तसेच मनोरंजन क्षेत्रात क्रियेटिव्ह इॅकॉनॉमीला एक प्लॅटफॉर्म देण्यात येणार आहे. मुंबई येथे होणाऱ्या या वेव्हज परिषदेस 100 पेक्षा जास्त देश सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम यापूर्वी झालेल्या जी 20 पेक्षा खूप मोठा असणार आहे.

वेव्हज समिटची वैशिष्ट्ये आणि महत्त्वाचे घटक:

• 'क्रिएट इन इंडिया' वर भर: मेक इन इंडिया' पाठोपाठ आता 'क्रिएट इन इंडिया' ही नवी संकल्पना  WAVES समिटद्वारे आंतरराष्ट्रीय पातळीवर पुढे नेली जाईल.

सर्जनशील प्रतिभेला व्यासपीठ: भारतातील प्रादेशिक भाषांतील कंटेंट, अ‍ॅनिमेशन आणि गेमिंग क्षेत्रातील नवोदित निर्माते आणि कलाकारांना जागतिक प्लॅटफॉर्मवर आपली कला सादर करण्याची संधी.

ग्लोबल सहयोग आणि भागीदारी: Netflix, Amazon, Disney+, Sony Pictures यांसारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांसोबत भागीदारीसाठी मार्ग मोकळे होतील.

तंत्रज्ञान आणि नवोन्मेष यांचा संगम: एआय, वर्च्युअल प्रोडक्शन, आणि इंटरॅक्टिव कंटेंटसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर सखोल चर्चा.

धोरणात्मक चर्चासत्रे: धोरणकर्ते, गुंतवणूकदार, कलाकार, तंत्रज्ञ आणि उद्योगपती यांच्यात थेट संवादाची संधी.

क्रिएट इन इंडिया चॅलेंज - जगभरातील नवोदित निर्मात्यांच्या प्रतिभेचा अविष्कार साजरा करणारा एक अभूतपूर्व उपक्रम, अर्थात मुंबईत होणाऱ्या वेव्हज 2025 मध्ये आपल्या प्रतिभेची झलक दाखवण्यासाठी  वेव्हजहे एक आघाडीचे व्यासपीठ म्हणून सज्ज आहे.

वेव्हेक्स 2025 - हा उपक्रम एक मैलाचा दगड ठरणार असून यामाध्यमातून मीडिया-टेक स्टार्टअप्स त्यांच्या नवकल्पना आघाडीच्या उद्योग धुरिणांसमोर आणि सेलिब्रिटी एंजल गुंतवणूकदारांसमोर सादर करतील, ज्यामुळे  भारताच्या माध्यम आणि मनोरंजन परिसंस्थेच्या भविष्याला नवीन दिशा मिळेल.

वेव्हज बाजार: चित्रपट, गेमिंग, संगीत, जाहिरात आणि एक्सआर, निर्माते, गुंतवणूकदार आणि इतर व्यवसायांना जोडणारी एक अद्वितीय जागतिक बाजारपेठ. यातूनच उद्योग व्यावसायिकांना उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडण्याच्या संधी देखील देते.

मास्टरक्लासेस आणि परस्परसंवादी सत्रे - उद्योगातील दिग्गज आणि जागतिक नेत्यांकडून शिकण्याची, माध्यम, मनोरंजन आणि तंत्रज्ञानाच्या भविष्याबद्दल अंतर्दृष्टी मिळविण्याची एक दुर्मिळ संधी.

00000