Friday, 28 March 2025

रोजगार मेळाव्याचे आयोजन

जालना, दि. 28 (जिमाका) :- जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना आणि मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अंकुशराव टोपे महाविद्यालय,जालना यांचे संयुक्त विद्यमाने शुक्रवारदि. 4 एप्रिल, 2025 रोजी मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अंकुशराव टोपे महाविद्यालय, सिरसवाडी रोड, रेल्वे उड्डाण पुलाशेजारी, जालना येथे सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत“पंडीत दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा ”तसेच मुख्यंमंत्री युवा कार्य प्रशिक्षण भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या 02482-299033 या दूरध्वनीवर कार्यालयीन वेळेत संपर्क करावा किंवा jalnarojgar@gmail.com या ई-मेलवर संपर्क साधावा. मेळाव्यासाठी जवळपास 150 पेक्षा अधिक रिक्त पदे उपलब्ध होणार आहेत. तरी या मेळाव्याचा बेरोजगार उमेदवारांनी उपस्थित राहुन लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. -*-*-*-*-

7 एप्रिल रोजी लोकशाही दिनाचे आयोजन

जालना, दि.28 (जिमाका) :- जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजन करण्यात येते. त्यानूसार जालना येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दि. 7 एप्रिल 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. अशी माहिती उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे दिली आहे. लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे. लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊन देखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा. लोकशाही दिनामध्ये न्याय प्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसीलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल. ज्यांनी यापूर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नयेत. तसेच लोकशाही दिनात द्यावयाच्या अर्जाचा विहित नमुना https://jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. -*-*-*-*-

Thursday, 27 March 2025

गोदा समृध्दी कृषी महोत्सवाचे आयोजन

 




 

    जालना, दि.27(जिमाका) : प्रकल्प संचालक (आत्मा) व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी जालना यांच्यावतीने पाच दिवसीय आझाद मैदान, जालना येथे दि. 27 ते 31 मार्च या कालावधीत गोदा समृध्दी जालना कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे आज महिला शेतकऱ्यांच्या हस्ते फीत कापुन गोदा समृद्धी कृषी महोत्सव सर्वांसाठी खुला करण्यात आला असून, 31 मार्च, 2025 पर्यंत सर्वांसाठी प्रदर्शन खुले असणार आहे.

 या महोत्सवासाठी आत्माचे प्रकल्प संचालक जे पी शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जी. आ.र कापसे, उपविभागीय कृषि अधिकारी, राम रोडगे, प्रशांत पवार, आत्माचे प्रकल्प उप संचालक अमोल आगवान,  दत्तात्रय सुर्यवंशी यांचेसह  विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, शेतकरी यांची उपस्थिती होती.

कृषी विभाग आणि कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव आयोजित केला जातो. या महोत्सवातून शेतकरी बांधवांना शेती क्षेत्रातील पारंपारिक आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळते.

सदरील महोत्सवात 200 स्टॉलमध्ये विविध विभागाच्या योजनांचे प्रचार प्रसिद्धीसाठी स्टॉल लावण्यात आले असून शेतकऱ्यांनी गहू, ज्वारी व डाळी विक्रीसाठी आणल्या आहेत.  कृषी निविष्ठा, कृषि औजारे, बचत गटांच्या स्टॉलमध्ये संधी देऊन विक्रीसाठी दालन आजपासून खुले करून देण्यात आले आहे.

 

-*-*-*-*-*-*-

ग्रंथोत्सवाचा उत्साहात समारोप

 


जालना, दि.27(जिमाका) : उच्च व तंत्र शिक्षण विभाग,ग्रंथालय संचालनालय आणि जालना जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण अंतर्गत  डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात येथे आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचा समारोप प्राचार्या डॉ. सुनंदाताई तिडके यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.

यावेळी कवयित्री डॉ.संजीवनी तडेगावकर, डॉ.रावसाहेब ढवळे, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेश राऊत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे, सतीश जाधव, शंकर पवार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

या दोन दिवसीय ग्रंथोत्सवामध्ये रसिकांना परिसंवाद, कवी संमेलन, कथाकथन अशा विविध सत्राचे आयोजन करण्यात आले होते. ग्रंथोत्सवातील विविध कार्यक्रमांना साहित्यिक, कवी, विद्यार्थी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने  उपस्थिती होती. 


-*-*-*-*-*-*-

जागतिक ग्राहक हक्क दिन उत्साहात साजरा

 


ग्राहकांनी वस्तु, सेवेची खरेदी करतांना जागरुकता बाळगावी

- अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार

 

           जालना, दि. 27 (जिमाका) :-  सुरक्षीत वस्तु खरेदी हा ग्राहकाचा हक्क आहे. ग्राहकाने खरेदी करतांना उत्पादनाशी निगडीत उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, मुल्य, शुध्दता आणि वापरावयाची अंतिम तारीख तपासणे महत्वाचे आहे. या जगात मोफत काहीच मिळत नसते त्यामुळे अनोळखी क्रमांकाच्या कॉलवरुन येणाऱ्या अमिषाला बळी पडू नये. तरी ग्राहकांनी वस्तु, सेवेची खरेदी करते वेळी जागरुकता बाळगणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार यांनी केले.

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त ग्राहक जनजागृतीपर कार्यक्रम जालना येथील मस्त्योदरी शिक्षण संस्थेच्या अंकुशराव टोपे महाविद्यालयातील सभागृहात पार पडला. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, तहसीलदार छाया पवार, सायबर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक जी.एस.शिंदे, यांच्यासह जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या अशासकीय सदस्यांची उपस्थिती होती.

अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार म्हणाल्या की, ग्राहकाची फसवणूक झाल्यास उत्पादन,  व्यावसायिक किंवा कंपनी यांच्याविषयीची तक्रार ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत करता येवू शकते.  ग्राहकाला कोणत्याही कंपनीच्या उत्पादनाची निवड करण्याचा हक्क आहे.  कोणत्याही फसव्या जाहिराती, अनोळखी कॉल्सना बळी पडू नका असेही त्यांनी सांगितले.

सायबर पोलिस निरीक्षक श्री. शिंदे म्हणाले की, पुर्वी सायबर गुन्ह्यात आर्थिक फसवणूक करण्यात येत होती. तरुणांनी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल अशा पोस्ट समाज माध्यमांवर पोस्ट करु नये. आता नवीन प्रकारात समाज माध्यमांचा वापर करुन फेक आयडी तयार करत बदनामीकारक  मजकुरासह फोटो  टाकून बदनामी करण्यात येत आहे. व्हॉटसअप हॅक करुन आपल्या जवळच्या व्यक्तीकडून पैशाची मागणी करण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत.  यामध्ये एपीके फाईल्सचा शिरकाव झाला आहे. एपीके फाईल्स आपल्या मोबाईलवर डाऊनलोड करु नये, त्यामुळे आपला मोबाईल ॲक्सेस सायबर क्रिमीनलकडे जावून तो हवा तसा आपला महत्वाचा डेटा वापरुन फसवणूक करु शकतो. असे सांगून त्यांनी महाविद्यालयीन तरुण-तरुणींची थेट व्हॉटसअप व मोबाईलमधील आवश्यक सुरक्षा सेटींग जागेवर करुन घेतली.

कार्यक्रमात पवन सांगळे विद्यार्थ्याने सायबर क्राईम विषयक निर्भिडपणे प्रश्न विचारत आपल्या मनात असलेल्या शंकेचे समाधान करुन घेतले. तसेच केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर शिक्षण विषयक युट्युब चॅनेलचा अभ्यासासाठी खुप फायदा होतो असे सांगून कार्यक्रमाचे कौतुक करत या प्रकारचे जनजागृतीपर कार्यक्रम प्रत्येक महाविद्यालयात नियमितपणे घेणे गरजेचे असल्याची भावनाही त्याने व्यक्त केली.  

कार्यक्रमात नारायण काळे आणि श्रीमती विद्या वाहुळे या स्वस्त धान्य दुकानदारांनी त्यांच्याकडील शिधापत्रिका धारकांची  100 टक्के ई-केवायसी पुर्ण केल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी सांगितले की, पुर्वीच्या काळात वस्तुविनिमय पध्दती अस्तित्वात होती. एका वस्तुच्या बदल्यात दुसरी हवी असणारी वस्तु ग्राहकाला मिळत होती. कालांतराने चलन पध्दतीचा उदय झाला आणि विक्रेत्यांची ग्राहकांशी बांधिलकी राहिली नाही, त्यामुळे फसवणुकीच्या घटना घडण्यास सुरुवात झाली. ग्राहकांच्या संरक्षणासाठी भारतात 1986 ला पहिला ग्राहक संरक्षण कायदा तयार झाला तर त्यामध्ये बदल करुन 2019 ला नवा कायदा तयार करण्यात आला. याप्रमाणे जागतिक ग्राहक हक्क दिनाची पार्श्वभूमी सांगून कार्यक्रम आयोजनामागील भूमिका विषद केली. या कार्यक्रमास नागरिक तसेच महाविद्यालयीन युवक-युवतींची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

-*-*-*-*-

जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर

 


 

            जालना, दि. 27 (जिमाका) :-  नवोदय विद्यालय समितीद्वारे इयत्ता सहावीसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणी परीक्षा -2025 चा निकाल जाहीर करण्यात आला आहे.  जालना जिल्ह्यातील पीएम श्री नवोदय विद्यालयासाठी एकुण 80 विद्यार्थ्यांची निवड यादी प्राप्त झाली असून विद्यालयाच्या सुचना फलकावर यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तरी निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ सादर करावी, असे आवाहन प्राचार्य एस. जी. पवार यांनी केले आहे.

पीएम श्री जवाहर नवोदय विद्यालयाच्या इयत्ता सहावीच्या 80 जागेसाठी घेण्यात आलेल्या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या निकालात जालना जिल्ह्यातील विविध तालुक्यामधील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे. तालुकानिहाय निकालानुसार पुढीलप्रमाणे विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये जालना  11,   भोकरदन 10, जाफराबाद 8, परतूर 12,  अंबड  11, बदनापूर 6, घनसावंगी  14,  मंठा 8 असे एकुण  80 विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल नवोदय विद्यालयाचे प्राचार्य एस. जी. पवार आणि शिक्षकांसह पालकांनी समाधान व्यक्त केले आहे. नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक होत आहे.

नवोदय विद्यालय समितीद्वारे इयत्ता नववीमध्ये रिक्त असलेल्या 4 जागेसाठी घेण्यात आलेल्या निवड चाचणी परीक्षेचा निकालही जाहीर केला असून नवोदय विद्यालयासाठी एकुण चार विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. परीक्षेला जालना जिल्ह्यातून इयत्ता आठवीचे एकूण 446 विद्यार्थी बसले होते. ही निवड यादी नवोदय विद्यालयाच्या सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

Wednesday, 26 March 2025

ग्रंथ हे ज्ञानाचे प्रेरणा स्त्रोत : जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते ‘जालना ग्रंथोत्सव 2024’ चे उद्घाटन

 


 

    जालना, दि.26(जिमाका) : चांगल्या शरीरासाठी नियमित व्यायाम तर चांगल्या मनासाठी वाचन आवश्यक आहे. नियमित वाचनामुळे वैचारिक कक्षाही रुंदावतात. ग्रंथ हे ज्ञानाचे प्रेरणा स्त्रोत असल्याने वाचन संस्कृती अधिक वाढण्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्यातील शाळांना ग्रंथ उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी सांगितले.

महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जालना ग्रंथोत्सव 2024 चे आयोजन जालना येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, टाऊन हॉल येथे करण्यात आले आहे. या भव्य ग्रंथोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी ग्रंथोत्सवाचे अध्यक्ष कवी डॉ. ललित अधाने, सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, कवयित्री डॉ. संजिवनी तडेगावकर, जालना जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष राजेश राऊत, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

3

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ म्हणाले की, ग्रंथ हे मानवी जीवनातील खरे गुरु आहेत. विविध ग्रंथाद्वारे मानवाच्या ज्ञानात भर पडत असते. ग्रंथामुळे मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे माणसाला प्रेरणा व प्रोत्साहन मिळते. कुणालाही पुस्तके वाचल्याशिवाय त्यांचे महत्व कळत नाही. जसे आपणांस चांगले शरिर पाहिजे असेल तर नियमित व्यायामाची आवश्यकता असते, तसेच चांगले विचार येण्यासाठी ज्ञान वाढविण्यासाठी नियमित वाचन आवश्यक आहे. वाचानाची सवय ही अंगवळणी पडणे आवश्यक आहे. आजच्या मोबाईलच्या युगात वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी शासनामार्फत ग्रंथोत्सवचे आयोजन करुन वाचन संस्कृती वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे. ग्रंथ हे ज्ञानाचे प्रेरणा स्त्रोत असल्याने जिल्हा वार्षिक योजने अंतर्गत जिल्ह्यातील शाळांना विविध प्रकारचे ग्रंथ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. यापूढे ही शाळांना ग्रंथ उपलब्ध करुन देण्यात येतील. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात ही ग्रंथालय सुरु करण्याचा मानस असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यावेळी म्हणाले. तसेच जिल्हाधिकारी डॉ.  श्रीकृष्ण पांचाळ  यांनी यावेळी वाचनाविषयी स्वतःचे अनुभव कथन करत वाचनाने विचारसरणीत फरक पडतो. जीवनात काही चांगल्या गोष्टी सांगून आत्मसात होत नसतात, तर वाचनाची सवय निर्माण करावी लागते असे सांगितले.

ग्रंथोत्सवाचे अध्यक्ष कवी डॉ. ललित अधाने म्हणाले की, ग्रंथ हे अभिव्यक्तीचे मोठे साधान आहे. जीवनमूल्ये अधोरेखित करण्याचे काम साहित्य करते. ग्रंथ हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात. स्वतःला अद्यायावत ठेवणे, आजच्या स्पर्धेच्या युगात यशस्वी होण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. आज मोबाईलवर सर्व काही उपलब्ध असले तरी जीवनात पुस्तक वाचनाला खुप महत्व आहे. कारण वाचनामुळे मानवाच्या विचारात प्रगल्भता येते. पुस्तकाशिवाय पर्याय नसल्याचे आपल्या महामानवांनी सांगितले आहे. नवे विचार मांडून      समाजाला दिशा देण्याचे काम ग्रंथ करत आहे. मराठी भाषा अडीच हजार वर्षापूर्वीची असल्याने आधीपासूनच ती अभिजात भाषा आहे. यामुळेच परिवर्तन चळवळ, प्रबोधन चळवळ, वारकरी संप्रदाय चळवळ ही आपल्या महाराष्ट्रातून झाली आहे. ओवी, अभंग, पोवाडा, गवळण, भारूड, छक्कड, लावणी आदी प्रकारी हे केवळ आपल्या मराठी भाषेतच आहे. त्यामुळे मराठी भाषा ही सुरुवातीपासूनच समृध्द भाषा आहे. ग्रंथ हे आपल्याला घडविण्याचे काम करतात. ग्रंथोत्सव हे एक असे व्यासपीठ आहे की, जेथे विचारांची देवाण घेवाण होते. याकरीता विद्यार्थी आणि नागरिकांनी या ग्रंथोत्सवात सहभागी व्हावे.

यावेळी सहायक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे म्हणाले की, ग्रंथाशी संबंध असणारे साहित्यीक, लेखक, कवी, प्रकाशक, विक्रेते यांनी एकत्र येवून वाचन संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करावा यासाठी अशा प्रकारच्या ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात येते. ग्रंथालय चळवळ ही माणसाला जगण्याची कला शिकवते. व्यक्तीमत्व विकासासाठी वाचन खुप महत्वाचे आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या पालकांना सुध्दा घेवून या. आपल्या आवडणाऱ्या लेखाचे एकतरी पुस्तक प्रत्येक विद्यार्थ्याने वाचायला पाहिजे. ही पुस्तक आपण व पालकांनी तसेच शिक्षकांनी खरेदी करावी. वाचनाची आवड वाढली पाहिजे, यासाठी शासनाने आता वाचन प्रकल्प हाती घेतला आहे.

कवयित्री डॉ. तडेगावर म्हणाल्या की, मराठवाड्यात जाती-धर्म, गट-तटात भांडण अशा परिस्थितीत संत आणि महापुरुषांनी जातीच्या पलीकडे जाऊन प्रेम, स्नेहभाव निर्माण केला होता. त्यांनी दाखवलेली वैश्विक भावना ,साहित्यिकांना संवेदनशीलता, कारुण्य साहित्यात प्रकट करावी लागेल वाचनामुळे मानवाला आत्मिक समाधान मिळते. तसेच जगण्याचा दृष्टीकोन ही वाचनामुळेच बदलण्यास मदत होते. आपल्या शहरात ग्रंथोत्सवाचा मोठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञानाचे भांडार उपलब्ध होणार आहे.

            कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुभाष साबळे यांनी केले. तर आशिष रसाळ यांनी आभार मानले. प्रारंभी वाचन संस्कृती वाढविण्याकरीता गांधी चमन ते टाऊन हॉल या दरम्यान ग्रंथ दिंडीचे आयोजन करुन जनजागृती करण्यात आली. ग्रंथ दिंडी मध्ये मनपाचे मुख्य लेखाधिकारी तुकाराम भिसे, मुख्य लेखा परिक्षक प्रविण निंबाळकर, कवी डॉ. ललित अधाने, सहाय्यक ग्रंथालय संचालक सुनिल हुसे तसेच लोकमान्य प्राथमिक विद्यालयाचे विद्यार्थी व शिक्षक सहभागी झाले होते. तसेच ग्रंथोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे देखील उद्घाटन जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सार्वजनीक ग्रंथालयाचे पदाधिकारी आणि नागरीकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. रंगनाथ खेडेकर यांनी केले.

-*-*-*-*-*-*-

कृषी महोत्सवातून होणार तंत्रज्ञानाची देवाण - घेवाण शहरातील आझाद मैदानावर महोत्सवाचे आयोजन


           जालना, दि. 26 (जिमाका) :-  कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा  यांच्या संयुक्त विद्यमाने  जालना शहरातील आझाद मैदानावर जालना जिल्हा कृषी महोत्सव दि.27 ते 31 मार्च 2025 या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. तरी  जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जालना जिल्हा कृषी महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन आत्मा नियामक मंडळाचे  अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी जालना डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे

बदलत्या परिस्थितीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन देण्यास अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रयोगशील व प्रगतीशील शेतकऱ्यांचे माध्यमातून शेतकऱ्यांना आपाआपसातील विचारांची देवाणघेवाण करण्यास व्यासपीठ उपलब्ध करुन दिल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास वृध्दिंगत होऊ शकतो. आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा शाश्वत पद्धतीने अवलंब केल्यास शेतकरी आर्थिकदृष्ट्या उन्नत होऊन जागतिक पातळीवरील स्पर्धाक्षम वातावरणात आपले स्थान सिध्द करु शकतील. याकरिता  जालना जिल्ह्यात दि.27 मार्च 2025 ते 31मार्च 2025 या  कालावधीत कृषी महोत्सव चे आयोजन कृषी विभाग , कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा  यांचे संयुक्त विद्यमाने जालना शहरातील आझाद मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.

कृषी विषयक विकसित तंत्रज्ञान व शासकीय योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे, शेतकरी, शास्त्रज्ञ आणि संशोधन विस्तार, शेतकरी विपणन साखळी सक्षमीकरण, समूह, गट संघटित करुन स्थापित शेतकरी उत्पादक कंपन्यांची क्षमता बांधणी करणे, शेतकऱ्यांच्या उत्पादनास योग्य भाव मिळावा, ग्राहकांना उच्च दर्जाचा माल मिळावा याकरिता शेतकरी ते ग्राहक थेट विक्री श्रृंखला विकसित करणे, कृषी विषयक परिसंवाद, व्याख्याने यांच्या माध्यमातून विचारांच्या देवाणघेवाणींद्वारे शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करणे, विक्रेता – खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून बाजाराभिमुख कृषी उत्पादनास व विपणनास चालना देणे या या योजनेचा प्रमुख उद्देश ,

·         काय असणार आहे या प्रदर्शनात 

कृषी प्रदर्शन- कृषी महोत्सवातील कृषी प्रदर्शन हा महत्वाचा घटक असून यामध्ये शासकीय दालन, विविध कंपन्यांचे स्टॉल्स, खाद्य पदार्थांचे स्टॉल्स, प्रात्यक्षिके यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावर कृषी आणि पूरक व्यवसायाशी निगडित एकात्मिक शेती पद्धती संकल्पनेवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येईल. यामध्ये कृषी संबंधित कृषी तंत्रज्ञान विभाग, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, संबंधित विविध कृषी महामंडळे यांचा सक्रिय सहभाग राहिल. शासकीय यंत्रणा बरोबरच खाजगी कंपन्या, उद्योजक, बचतगट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांचा सहभाग घेण्यात येईल.

जिल्ह्यातील कृषी व संलग्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेले शेतकरी तसेच पीक स्पर्धा विजेते शेतकरी यांचा प्रशस्तीपत्रासह यथोचित सन्मान करुन स्मृतीचिन्ह वितरण करण्यात येतील.

जिल्हा कृषी महोत्सवाअंतर्गत कृषी प्रदर्शन व धान्य महोत्सवात शासकीय दालनामध्ये 40 स्टॉल्स, कृषी निविष्ठा 30, कृषी तंत्रज्ञान व सिंचन 30, गृहोपयोगी वस्तू 40, धान्य महोत्सव 20, खाद्यपदार्थ 20 अशा एकूण अंदाजे 200 स्टॉलचा समोवश असेल. शासकीय दालनामध्ये शासनाच्या विविध योजनांची माहिती व उपक्रम यांचे स्टॅाल्स असतील. या कार्यक्रमाकरिता पुढील शासकीय विभाग, कार्यालये, यंत्रणांच्या दालनांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

-*-*-*-*-


सैन्य दलातील अधिकारी पदाच्या पुर्व प्रशिक्षणाची संधी

 


जालना दि.26 (जिमाका) :- भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलामध्ये अधिकारी पदावर भरती होण्यासाठी पात्र उमेदवारांना सर्विस सिलेक्शन बोर्ड या परीक्षेची मोफत पुर्व तयारी करुन घेण्यासाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक येथे महाराष्ट्र शासनाकडून एसएसबी कोर्स क्र. 61 आयोजित करण्यात येणार आहे. तरी  जालना  जिल्ह्यातील  इच्छूक  युवक-युवतींनी  जिल्हा  सैनिक  कल्याण  कार्यालय,  जालना  येथे  गुरुवार दि. 21 एप्रिल 2025 रोजी  सकाळी 11  वाजेपर्यंत  मुलाखतीस हजर रहावे. संपुर्ण प्रशिक्षण कालावधीत प्रशिक्षणार्थ्यांना नि:शुल्क प्रशिक्षण, निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. अधिक माहितीसाठी दुरध्वनी क्र. 0253-2451032 किंवा व्हॉट्सअप क्र. ९१५६०७३३०६ वर संपर्क करावा, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी,  जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन

 


 

           जालना, दि. 26 (जिमाका) :-  जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त शासनाकडून अ जस्ट ट्रान्सिशन टु ससटेनेबल लाईफटाईल्स अशी संकल्पना निश्चित करण्यात आली आहे. शासनाने निश्चित केलेल्या संकल्पनेवर आधारीत ग्राहक जनजागृतीबाबत कार्यक्रमाचे आयोजन मत्स्योदरी शिक्षण संस्थ्‍ोच्या अंकुशराव टोपे महाविद्यालय जालना येथे दि.27 मार्च 2025 रोजी करण्यात आले आहे. असे जिल्हा पुरवठा अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

Tuesday, 25 March 2025

जिल्ह्यात 26 व 27 मार्चला ‘जालना ग्रंथोत्सव 2024’ चे आयोजन

 


जालना, दि.25 (जिमाका) : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने जालना ग्रंथोत्सव 2024’ चे आयोजन करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव 26 व 27 मार्च रोजी जालना येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, टाऊन हॉल येथे पार पडणार आहे.

यावेळी ग्रंथोत्सवास पर्यावरण व वातावरणीय बदल, पशु संवर्धन मंत्री तथा पालकमंत्री पंकजाताई मुंडे, विरोधी पक्ष नेता अंबादास दानवे हे विशेष अतिथी म्हणुन उपस्थित राहणार आहे. तर प्रमुख पाहूणे म्हणुन खासदार कल्याण काळे, खासदार संजय जाधव यांच्यासह आमदार सर्वश्री सतीष चव्हाण विक्रम काळे, राजेश राठोड, बबनराव लोणीकर, अर्जुन खोतकर, नारायण कुचे, संतोष दानवे, हिकमत उढाण जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदिश मिनियार, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, मनपा आयुक्त संतोष खांडेकर, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, सहा. ग्रंथालय संचालक सुनिल हुसे, कवयित्री डॉ. संजिवनी तडेगावकर, जिल्हा ग्रंथालय असो. अध्यक्ष डी.बी. देशपांडे, जिल्हा ग्रंथालय संघ अध्यक्ष राजेश राऊत यांची उपस्थिती राहणार आहे. तर जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि कवी डॉ. ललित अधाने यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार आहे.

बुधवार दि.26 मार्च 2025 रोजी सकाळी 9.30 वाजता ग्रंथ दिंडी ने ग्रंथोत्सवाची सुरुवात होणार आहे. तर सकाळी 11 वाजता मान्यवरांच्या हस्ते ‘जालना ग्रंथोत्सव-2024’ चे उदघाटन होणार आहे. दूपारी 2.00 वाजत परिसंवाद तर दूपारी 3.30 वाजता कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गुरुवार दि.27 मार्च 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता परिसंवाद तर दूपारी 2.00 वाजता कथाकथन कार्यक्रमा होणार आहे. तसेच दूपारी 4.00 वाजत ग्रंथोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी ग्रंथोत्सवास विविध कार्यक्रमांना साहित्यिक आणि कवी यांची उपस्थिती राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून ग्रंथ प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समितीने केले आहे.

 

****

 

गिग वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व अॅग्रिगेटर यांनी ई- श्रम पोर्टलवर नोंदणी करावी - जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ

 


जालना, दि. 25 (जिमाका) :- ई-श्रम पोर्टलवर केंद्र शासनाने गिग व वर्कर, प्लॅटफॉर्म वर्कर व अॅग्रिगेटर यांची नोंदणी  करण्यास सुरवात झाली आहे. सधारनताः गिग व प्लॅटर्फार्म वर्कर म्हणजे शेरिंग वाहन कामगार, अन्न व किराणा पुरवठा करणारे कामगार, लॉजिस्टीक सेवा देणारे कामगार  आदि मार्केटमध्ये ऑनलाईन काम करणारे कामगार, प्रोफेशन सर्विस देणारे कामगार, हेल्थ केअर सेवा देणारे कामगार, ट्रॅव्हल व आदरातिथ्य करणारे कामगार, मिडिया सर्विसेस हे सर्व प्लॅटफॉर्म गिग वर्करच्या व्याख्येत येतात. अमॅझोन, फ्लीपकार्ट, मिंत्रा, स्नॅपडिल, अजिओ, मिशो, स्विगी, झोमॅटो अशा वेगवेगळ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर काम करणारे कामगार हे  सर्व ई श्रम eshram.gov.in वर नोंदित होवू शकतील व केंद्र सरकारकडे त्यांचा डेटा तयार होईल म्हणुन दि. 1 एप्रिल 2025 पासून सर्व गिग कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी.  डिजिटल मध्यस्थी म्हणुन काम करणारे सर्व सेवा पुरवठादार यांनी अॅग्रिगेटर म्हणुन नोंदीत होणे आवश्यक असून सर्व अॅग्रिगेटर यांनी 31 मार्च 2025 रोजी पर्यंत register.eshram.gov.in/#/user/platform-worker-registration या संकेतस्थळावर नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी केले आहे.

-*-*-*-*-

अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांनी अॅपद्वारे ई-केवायसी करावी -जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर

 


जालना, दि. 25 (जिमाका) :- महाराष्ट्र शासनाने शिधापत्रिकाधारकांना "ई-केवायसी" करणे बंधनकारक केले आहे. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब लाभार्थीसाठी सरकारने एनआयसीच्या सहकार्याने लाभार्थ्यांच्या सोयीसाठी "मेरा ई-केवायसी" हे अॅप सुरू केले आहे. स्वस्त धान्य दुकानदारांनी देखील शिधापत्रिकाधारकांना सहकार्य करून सर्व लाभार्थ्यांची ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, जेणेकरून राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचे लाभार्थी धान्यापासून वंचित राहणार नाही. तसेच लाभार्थ्यांनीही अॅपद्वारे ई-केवायसी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर  यांनी केले आहे.

स्वस्त धान्य दुकानातून ई-पॉस मशीनद्वारे मोफत केवायसी केली जात आहे. परंतु लहान मुले आणि वृद्ध लोकांना बोटांचे ठसे आणि डोळ्यांद्वारे स्कॅन करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे शासनाने "मेरा ई-केवायसी" अॅप तयार केले असून त्यावरून लाभार्थी दुकानात न जाता स्वतःचे आणि त्यांच्या कुटुंबियांचे केवायसी घरबसल्या पूर्ण करू शकतील. मात्र त्यासाठी आधार क्रमांक मोबाईलशी लिंक असणे आवश्यक आहे.  ही सेवा फक्त महाराष्ट्रातील लाभार्थ्यांसाठी असून, महाराष्ट्राबाहेरील स्थलांतरीत लाभार्थ्यांसाठी आयएमपीडीएस केवायसी पर्याय उपलब्ध आहे.

लाभार्थ्यांनी घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करण्यासाठी Play Store वरून Mera eKYC आणि AadhaarFaceRD हे दोन्ही अॅप डाऊनलोड करून मोबाईलमध्ये इन्स्टाल करावीत. दोन्ही इन्स्टाल अॅपना आवश्यक परवानग्या देऊन, Mera eKYC अॅप उघडून राज्य महाराष्ट्र निवडावे. आधार क्रमांक टाकून आधारशी संलग्न मोबाईलवर आलेला OTP टाकून, कॅप्चामध्ये दिलेल्या कोडची नोंद करावी. चेह-याद्वारे पडताळणी करण्याकरिता सेल्फी कॅमेरा चालू करून चेहरा स्कॅन करावा. स्क्रीनवर दिलेल्या सुचनांनुसार डोळ्यांची उघडझाप करा. दुस-या व्यक्तीची केवायसी करत असल्यास बॅक कॅमेरा वापरावा. याप्रमाणे कार्यवाही करून लाभार्थ्यांना घरबसल्या ई-केवायसी पूर्ण करता येते. जालना जिल्ह्यात एकूण 15 लाख 89 हजार 537 लाभार्थी असून, त्यापैकी 5 लाख 16 हजार 739 लाभार्थ्यांची केवायसी पूर्ण झालेली नाही. त्यामुळे ज्या लाभार्थ्यांची ई-केवायसी करणे अद्याप बाकी आहे.

-*-*-*-*-

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांना आवाहन

 


जालना, दि. 25 (जिमाका) :- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर केला आहे. परंतू ज्या विद्यार्थ्याना सेंट बँक ऑप्‍शन आले आहे, अशा विद्यार्थ्यांनी त्रुटीचे कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करावयाचे आहेत. तसेच विद्यार्थ्यानी बँक तपशिल भरण्याबाबतचा टॅब त्यांच्या लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. त्याअनुषंगाने सर्व विद्यार्थ्यांनी बँक तपशील भरुन घेण्याची व त्रुटीची पुर्तता तात्काळ करावी, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण जालना यांनी  प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या, शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या तसेच निवास, भोजन व अन्य सुविधांअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नसलेल्या अनुसूचित जाती व नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांपैकी अकरावी, बारावी तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात,  शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहातील मुला-मुलींप्रमाणे भोजन, निवास, शैक्षणीक साहित्य व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेची अंमलबजावणी करण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून सदर योजनेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने  https://hmas.mahait.org/ या संकेतस्थळावर दि. 15 मार्च, 2025 पर्यंत स्विकारण्यात आलेले होते. यापूर्वी स्वाधार योजनेचा अर्ज केलेल्या विद्यार्थ्याना त्रुटी असतील तर विद्यार्थ्यांना ई-मेल द्वारे कळविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या काही त्रुटी असतील तर त्रुटीची अपलोड करण्यासाठी विद्यार्थ्यांना वैयक्तिक लॉगीनला सेंट बॅक ऑप्शन देण्यात आलेले आहे.  असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

जालना शहरातील लाभार्थ्यांना आवाहन

 


           जालना, दि. 25 (जिमाका) :- जालना शहरातील संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना या लाभार्थ्यांना डी.बी.टी.मार्फत त्यांच्या खात्यावर पैसे डिसेंबर-2024 पासुन जमा करण्यात येत आहेत. त्यासाठी लाभार्थ्यांना बँक खात्याशी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक लिंक करणे आवश्यक आहे. तरी संबंधित लाभार्थ्यांनी मोबाईल क्रमांक व आधार क्रमांक बँक खात्याला लिंक केल्याची पावती, ई-केवायसी पावती, वर्गवारी पुराव्याची छायांकित प्रत जालना तहसील कार्यालयात  दि.31 मार्च 2025 पर्यंत जमा करावी. कागदपत्राची पुर्तता न केल्यास लाभार्थी अनुदानापासुन वंचित राहिल्यास त्यास लाभार्थी स्वत: जबाबदार राहील, असे जालना तहसीलदार छाया पवार यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

जिल्ह्यात 1 लाख 30 हजार 972 नोंदीत कामगार

 

महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ


·         विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत 24 हजाराहून अधिक

         बांधकाम कामगारांना 72 कोटी 43 लाख रुपयांचे अर्थसहाय्य

 

           जालना, दि. 25 (जिमाका) :-  महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जालना अंतर्गत इमारत बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात येते. तसेच त्यांना जीवित बांधकाम कामगार म्हणुन ओळखले जाते. याबरोबरच त्यांना विविध कल्याणकारी योजनांचा देखील लाभ अदा करण्यात येत असतो. जालना जिल्ह्यात 99 हजार 146 कामगारांची नोंदणी व 31 हजार 826 कामगारांचे नुतनीकरण करण्यात आले आहे. तरी जालना जिल्ह्यात आजपर्यंत 1 लाख 30 हजार 972 कामगार नोंदीत कामगार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचे जिल्हा उपकार्यकारी अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव यांनी दिली.

            सरकारी कामगार अधिकारी हे कार्यालय जुन 1981 पासून कार्यरत असून, या कार्यालयातंर्गत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ हे सन 2012 पासुन कार्यरत आहे. मंडळाचे कामकाज जुलै 2020 पासुन संपुर्ण संगणीकृत झाले असून, मंडळाद्वारे इमारत व बांधकाम क्षेत्रातील कामगारांची ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी करण्यात येते. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून विविध योजना राबविल्या जातात.

            सन 2024-25 या कालावधीत विविध कल्याणकारी योजनेअंतर्गत 24 हजार, 454 बांधकाम कामगारांना 72 कोटी 43 लाख 35 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले. गृह उपयोगी साहित्य खरेदीसाठी 3 हजार रुपये अर्थसहाय्यासाठी 1 हजार 14 नोंदीत लाभार्थी कामगारांना 30 लाख 42 हजार रुपयांचे अर्थसहाय्य वितरीत करण्यात आले. अवजारे खरेदीसाठी 5 हजार रुपये अर्थसहाय्य करण्यात येत असून  17 हजार 599 कामगारांना 8 कोटी 79 लाख 95 हजार रुपयांचे अर्थसहाय्य देण्यात आले आहे. या सर्व योजनेसाठी एकुण 48 हजार 558 लाभार्थी कामगारांना 47 कोटी 11 लाख 63 हजार 151 रुपये अर्थसहाय्यापोटी वाटप करण्यात आले आहेत.

            जानेवारी 2024 पासुन बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तु संच ही योजना सुरु करण्यात आली असून, आजपर्यंत 21 हजार 569 इतक्या नोंदीत कामगारांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने जिल्ह्यातील प्रत्येक तालुकास्तरावर ‘तालुका कामगार सुविधा केंद्र’ 1 सप्टेंबर, 2024 पासून स्थापन केले असून, त्या ठिकाणी संबंधित तालुक्यातील बांधकाम कामगारांची नोंदणी, नुतनीकरण व लाभाचे अर्ज तपासणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असल्याची माहिती जिल्हा उपकार्यकारी अधिकारी तथा सरकारी कामगार अधिकारी अमोल जाधव यांनी दिली.

 

-*-*-*-*-

Friday, 21 March 2025

रविवारी 17 हजार 554 नवसाक्षरांची परीक्षा

 

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रम


 

जालना, दि. 21 (जिमाका) :- जिल्ह्यात उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील 17 हजार 554 नवसाक्षरांची परीक्षा रविवार दि.23 मार्च 2025 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत त्यांच्या गावच्या शाळेतील परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे. तरी संबंधितांनी परीक्षेसाठी वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जगदीश मिनियार यांनी केले आहे.

उल्लास-नवभारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत परीक्षा ही ऑफलाईन पध्दतीने होणार असून प्रश्नपत्रिका 150 गुणांची असणार आहे. यात वाचन 50 गुण, शब्दलेखन 50 गुण आणि संख्यात्मक ज्ञानासाठी 50 गुण अशी गुणांची विभागणी करण्यात आली आहे. परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 51 गुण आवश्यक आहेत. उमेदवारांना परीक्षेसाठी निळा व काळा शाईचा पेन वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. जिल्ह्यात परीक्षेसाठी एकुण 970 परीक्षा केंद्र ठेवण्यात आली आहेत. परीक्षेत दिव्यांग उमेदवारांना 60 मिनिटांचा वेळ अधिकचा देण्यात येणार आहे. असे शिक्षणाधिकारी (योजना), जिल्हा परिषद, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

                                                     -*-*-*-*-