Wednesday, 30 October 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 विधानसभा निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे आणि निर्भय वातावरणात पार पाडावी -निवडणूक निरिक्षक (सामान्य) वेद पती मिश्र · केंद्रीय निवडणूक निरिक्षक यांनी घेतला विधानसभा निवडणूक पूर्वतयारीचा आढावा

 









जालना,दि.30,(जिमाका): विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्हा प्रशासनाने निवडणूकीच्या अनुषंगाने चांगली पूर्वतयारी केलेली असुन, ही निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे आणि निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदाऱ्या गांभिर्यपूर्वक पार पाडण्याचे निर्देश 101-जालना, 102-बदनापूर (अ.जा.) आणि 103 भोकरदन विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) वेद पती मिश्र यांनी यावेळी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सभागृहात आयोजित विधानसभा निवडणूकीच्या पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत श्री. मिश्र हे बोलत होते. यावेळी 99-परतूर आणि 100-घनसावंगी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्री. नवीन, निवडणूक निरीक्षक (पोलीस) झेड ॲन विजया, निवडणूक निरीक्षक (खर्च) देव प्रकाश बमणावत जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, बीएसएफचे अजयकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उप जिल्हा निवडणुक अधिकारी शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्री. मिश्र म्हणाले की, जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांच्या टीमने विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने सर्व प्रक्रीयेची पुर्वतयारी खुप चांगल्या प्रकारे तयारी केलेली आहे. परंतू आता या पुर्वतयारीची प्रत्यक्षात योग्य अंमलबजावणी करणे आवश्यक असून, त्यासाठी सर्वांनी योग्य नियोजन करत आपल्या जबाबदारी पार पाडाव्यात. आपण आता निवडणूकीच्या महत्वाच्या टप्प्यावर पोहचलो असून, सर्वांनी गांभिर्याने निवडणूकीचे काम करावे. सर्व निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त कर्मचाऱ्यांना निवडणूकीच्या अनुषंगाने चांगल्या प्रकारे प्रशिक्षित करावे. पोस्टल मतदानाचे योग्य नियोजन करावे. तसेच  भारत निवडणूक आयोगाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा उपलब्ध असणे बंधनकारक आहे. यात ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांसाठी रॅम्प, व्हिलचेअर, मतदारांचे उन्हापासून संरक्षणासाठी शेडची व्यवस्था, वैद्यकीय उपचार किट, मदत कक्ष, पिण्याचे पाणी, प्रसाधन गृह, आदीं सुविधा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आपल्या मतदार संघात आहेत का ? याची खात्री करुन घ्यावी. प्रामुख्याने ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर आवश्यक सोयी-सुविधा आहेत का ? ज्या क्रिटीकल मतदान केंद्रावरुन वेबकास्टींग होणार आहे तेथील इंटरनेट सुविधा सुरळीत राहील याची काळजी घ्यावी. तसेच दूरस्थसह इतर सर्व मतदान केंद्राच्या मार्गाची आणि संपर्क व्यवस्थेची देखील तपासणी करुन ठेवावी. ज्याठिकाणी त्रुटी आहेत त्यासुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश संबंधीत यंत्रणेला निवडणूक निरिक्षक (सामान्य) श्री. मिश्र यांनी यावेळी दिले.

निवडणूक कालावधीत मतदार संघात प्रसारीत होणाऱ्या राजकीय पेड न्यूज आणि राजकीय पुर्वप्रमाणिकरण न केलेल्या जाहिराती, तसेच सोशल मिडीयावरील जाहिरातीवर माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीने (एमसीएमसी) लक्ष ठेवावे. तसेच संशयीत पेड न्युज किंवा जाहिराती प्रसारित झाल्यास संबंधीत उमेदवारास खुलासा करण्याची नोटीस देण्यात यावी. तसेच एफएसटी, एसएसटी, व्हीएसटी आणि व्हिव्हिटी भरारी पथकांनी वेळोवेळी आपली स्थाने बदलून तपासणी करावी. निवडणूकीसाठी नियुक्त केलेल्या सर्व पथकांनी निवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडावयाची आहे. मतदारांमध्ये जनजागृती करत, मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याच्या सुचना ही श्री. मिश्र यांनी यावेळी दिल्या.

श्री. नविन यावेळी म्हणाले की, विधानसभा मतदारसंघातील निवडणुकांसाठी सर्व यंत्रणांनी निवडणूक प्रक्रिया शांततेत व नि:पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी आपल्यावर सोपविण्यात आलेली जबाबदारी गांभिर्यपूर्वक पार पाडावी. विधानसभा मतदारसंघातील संवेदनशील मतदान केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रीत करुन कायदा व सुव्यवस्थेबाबत योग्य ती खबरदारी घ्यावी. आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याची गांभीर्याने काळजी घ्यावी. 

यावेळी निवडणूक निरीक्षक (पोलीस) झेड ॲन विजया म्हणाल्या की, निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस विभागाने तयारी पुर्ण केली आहे. परंतु जे नियोजन केले आहे, त्यानुसार कायदा सुव्यवस्था राखण्याची योग्य अंमलबजावणी करावी. तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी यांनी निवडणुक प्रक्रियेमध्ये व्यत्यय आणणाऱ्या व्यक्तींचा शोध घेवून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. निवडणुकीच्या प्रचाराला आता मोठ्या प्रमाणात सुरुवात होणार असल्याने विनापरवाना प्रचार करणाऱ्या वाहनांवर नियमानुसार कारवाई करावी.

निवडणूक खर्च निरीक्षक श्री. बमणावत यांनी खर्च पथकांनी विविध माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर सर्व बाबींची दैनंदिन नोंद ठेवून बारीक लक्ष ठेवावे. निवडणूक कालावधीत अर्थिक व मद्याचा गैरव्यवहार होण्याची शक्यता असल्याने मतदारसंघातील वाहनांची कसून तपासणी करावी, तसेच अशी वाहने आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करावी. उमेदवारांना 40 लाखांची खर्चाची मर्यादा ठेवण्यात आली आहे, त्यावर देखील खर्च पथकाने दैनंदिन लक्ष ठेवावे, निवडणूक कालावधीत जिल्ह्यात होत असलेली मद्य विक्रीवर देखील बारकाईने लक्ष ठेवावे. एफएसटी, एसएसटी, व्हीएसटी आणि व्हिव्हिटी भरारी पथकांनी गांभिर्याने तपासणी करण्याचे निर्देश ही श्री. बमणावत यांनी यावेळी दिले.

प्रारंभी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 पार्श्वभूमीवर जिल्हा माहिती कार्यालय, जालना यांच्यामार्फत तयार करण्यात आलेल्या जालना जिल्हा विधानसभा मतदार संघ निवडणूक-2024 पूर्वपिठीकेचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक यांच्या हस्ते आज प्रकाशन करण्यात आले. तसेच निवडणूक दिव्यांग आयकॉन डॉ. निलेश मदारे यांनी मतदान जनजागृतीबाबत आपले मनोगत व्यक्त केले.

जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या पूर्वतयारीचे तर पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी कायदा सुव्यस्थेच्या तयारीची सादरीकरणाद्वारे सविस्तर माहिती सादर केली.

यावेळी बैठकीस सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, नोडल अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्यासह संबंधीत विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-

 

Friday, 25 October 2024

विधानसभा मतदार संघासाठी 19 उमेदवारांचे 25 नामनिर्देशन अर्ज दाखल आजपर्यंत 391 उमेदवारांना 904 नामनिर्देशन अर्जाचे वितरण

 

         जालना, दि.25(जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील 99-परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102- बदनापूर (अ.जा.) आणि 103-भोकरदन या पाच विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठी आजरोजी 19 उमेदवारांनी 25 नामनिर्देशन अर्ज दाखल केले असल्याची माहिती जिल्हा निवडणूक कार्यालयान दिली आहे.

आज शुक्रवार दि. 25 ऑक्टोबर, 2024 रोजी 99-परतूर विधानसभा मतदारसंघासाठी सुरेशकुमार कन्हैलाल जेथलिया (अपक्ष), निळकंठ बाबासाहेब वायाळ (अपक्ष), रामप्रसाद किसानराव थोरात (वंचित बहूजन आघाडी), श्रीराम बन्सीलाल जाधव (जय सेवालाल बहूजन विकास पार्टी) प्रत्येकी एक नामनिर्देशन अर्ज दाखल तर कृष्णा त्रिंबकराव पवार (ऑल इंडिया हिन्दुस्थान पार्टी आणि अपक्ष) यांनी दोन नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहे. तर 100-घनसावंगी विधानसभा मतदारसंघासाठी निसार सुभानखा पठाण (ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लिमीन आणि अपक्ष), गजानन रामनाथ उगले (अपक्ष) यांनी प्रत्येकी दोन नामनिर्देशन अर्ज 101-जालना विधानसभा मतदारसंघासाठी रंजीत काशिनाथ निकाळजे (अपक्ष) आनंदा लिंबाजी ठोंबरे (अपक्ष), अतुल नारायणराव इंगळे (अपक्ष) संगिता कैलास गोरंट्याल (अपक्ष) प्रत्येकी एक नामनिर्देशन अर्ज 102- बदनापूर(अ.जा.) विधानसभा मतदारसंघासाठी काकासाहेब बाबूराव भालेराव (अपक्ष), दिपक लक्ष्मण डोंगरे (अपक्ष), चौधरी रुपकुमार नेहरुलाल (नॅशलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) सुश्मिता निवृत्ती चव्हाण (अपक्ष) यांनी प्रत्येकी एक नामनिर्देशन अर्ज तर 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी रवि विजयकुमार हिवाळे (अपक्ष), कडूबा म्हातारबा इंगळे (अपक्ष), सर्जेराव हरिबा लोखंडे (अपक्ष) प्रत्येकी एक नामनिर्देशन तर चंद्रकांत पुंडलीकराव दानवे (नॅशलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार) यांनी चार अर्ज नामनिर्देशन दाखल केले आहे. याप्रमाणे आज एकुण 19 उमेदवारांनी 25 नामनिर्देशन अर्ज दाखल केले असल्याची जिल्हा निवडणूक कार्यालयाने दिली आहे.

            आजपर्यंत एकूण 391 इच्छुक उमेदवारांना 904 नामनिर्देशन अर्जाचे वितरण करण्यात आले आहे. संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांनी उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र दाखल करुन घेतले. उमेदवारांना मंगळवार, दि. 29 ऑक्टोबर, 2024 रोजीपर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 ते 3 यावेळेत आपले नामनिर्देशन पत्र सादर करता येणार आहे. तसेच बुधवार, दि. 30 ऑक्टोबर, 2024 रोजी नामनिर्देशन पत्रांची छाननी करण्यात येणार असून, सोमवार, दि. 4 नोव्हेंबर, 2024 रोजीपर्यंत उमेदवारांना आपले अर्ज मागे घेता येणार आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार असून, शनिवार दि. 23 नोव्हेंबर, 2024 रोजी जाहिर केला जाणार आहे.

****

Friday, 18 October 2024

विधानसभा मतदार संघाकरीता निवडणूक निरीक्षक (खर्च) देव प्रकाश बमणावत यांची नियुक्ती

 

 

जालना, दि.18(जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने 99 - परतूर, 100 - घनसावंगी, 101 - जालना, 102 - बदनापूर आणि 103 - भोकरदन विधानसभा मतदार संघाकरीता देव प्रकाश बमणावत (आय.आर.एस.) यांची निवडणुक निरीक्षक (खर्च) म्हणुन नियुक्ती केली आहे.

 

    निवडणूक निरिक्षक (खर्च) देव प्रकाश बमणावत यांचा मुक्काम येथील शासकीय विश्रामगृह, जालना येथे राहणार असुन, त्यांचे संपर्क अधिकारी म्हणुन जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. राजू सोळूंके यांची नियुक्ती करण्यात आल्याचे असे जिल्हा निवडणूक यंत्रणेने कळविले आहे. 

-*-*-*-*-*-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणासाठी वेळेत उपस्थित रहावे -जिल्हाधिकारी डॉ.श्रीकृष्ण पांचाळ · प्रशिक्षणास गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई


 

जालना,(जिमाका) दि. 18 :- जिल्ह्यात मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी म्हणून  9 हजार 855 अधिकारी- कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तरी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण विधानसभानिहाय पाच ठिकाणी दोन सत्रात सोमवार दि.21 ऑक्टोबर 2024 रोजी आयोजित करण्यात आले आहे. तरी नियुक्त केलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणासाठी वेळेत उपस्थित रहावे, गैरहजर राहणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत.  

जालना जिल्ह्यातील शासकीय व निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालयामधील कार्यरत असलेल्या एकुण 14 हजार 720 अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती ऑनलाईन पोर्टलवर भरण्यात आली आहे. यामध्ये गट-अ 425, गट-ब 892, गट-क 12590 आणि गट-ड 813 असे एकुण 14720 अधिकारी-कर्मचाऱ्यांचा  समावेश आहे. यापैकी पहिल्या प्रशिक्षणाचे आदेश 9 हजार 855 अधिकारी-कर्मचाऱ्यांना संबंधित तहसील कार्यालयाकडून तामिल करण्यात आले आहेत. मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी 2 व 3 यांच्यासाठी पहिल्या प्रशिक्षणात सोमवार दि.21 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत व दुपारी 2 ते 5.30 वाजेपर्यंत राहिल. मतदान अधिकारी 2 व 3 यांच्यासाठी सकाळच्या सत्रात प्रत्यक्ष यंत्र हाताळणीचे ज्ञान व दुपारच्या सत्रात प्रशिक्षण देण्यात येईल. तर मतदान केंद्राध्यक्ष, सहाय्यक मतदान केंद्राध्यक्ष यांना सकाळच्या सत्रात प्रशिक्षण व दुपारच्या सत्रात प्रत्यक्ष यंत्र हाताळणीचे ज्ञान देण्यात येईल. अशी माहिती उपजिल्हाधिकारी तथा कर्मचारी व्यवस्थापन समितीच्या नोडल अधिकारी नम्रता चाटे यांनी दिली.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार जालना जिल्ह्यातील 99- परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102- बदनापूर (अ.जा.) आणि 103-भोकरदन या पाच विधानसभा मतदारसंघात बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी  मतदान होणार आहे. प्रथम प्रशिक्षण 99- परतूर विधानसभा मतदारसंघासाठी परतूर येथील भारतरत्न स्व.अटलबिहारी वाजपेयी नाट्यगृहात होणार आहे. 100-घनसावंगी विधानसभा मतदारसंघासाठी घनसावंगी येथील राजेगाव रोडवरील मॉडेल महाविद्यालयात होईल. 101-जालना विधानसभा मतदारसंघासाठी जालना येथील देऊळगाव राजा रोडवरील सेंन्ट मेरी हायस्कुलमध्ये होईल. 102- बदनापूर (अ.जा.) विधानसभा मतदारसंघासाठी बदनापूर येथील साक्षी मंगल कार्यालयात होईल. आणि 103-भोकरदन विधानसभा मतदारसंघासाठी भोकरदन येथील सिल्लोड रोडवरील समृध्दी लॉन्समध्ये आयोजन करण्यात आले आहे. असे उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

-*-*-*-*-

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 परवाना धारकांना शस्त्रास्त्रे बाळगण्यास निर्बंध; शस्ञ जवळच्या पोलिस ठाण्यात जमा करावेत

 

 

जालना,(जिमाका) दि. 18 :- भारत निवडणुक आयोगाच्या सुचनानुसार जालना जिल्ह्यामध्ये विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024  चा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. जालना जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातुन निवडणुक घोषित झाल्यापासुन निवडणुक निकाल घोषित होईपर्यत, परवाना दिलेले शस्त्रास्त्रे वाहुन नेण्यावर व बाळगण्यास निर्बंध लागू करण्यात येत आहेत. तरी असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या व्यक्ती, दंडाधिकारी शक्ती प्रदान केलेले अधिकारी, पोलिस अधिकारी-कर्मचारी, बँकेच्या सुरक्षा व्यवस्थेवरील अधिकारी-कर्मचारी तसेच सराफा यांच्या व्यतिरिक्त तसेच मा. उच्च न्यायालयातील जुन्या रिट पिटीशन 2009/2014 च्या आदेशास अधीन राहुन इतर सर्व परवानाधारक व्यक्तींनी परवाना दिलेले शस्ञास्ञे वाहुन नेण्यावर व बाळगण्यास आदेशान्वये बंदी घालण्यात आली आहे.  शस्ञ परवानाधारकांनी आपले शस्ञ जवळच्या पोलिस ठाण्यात जमा करावेत. निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर एका आठवड्याचे आत संबधितांचे शस्ञे परत करण्यात यावेत. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील पादचारी पुलाच्या उभारणीनिमित्त वाहतुकीच्या मार्गात बदल

 

 

जालना,(जिमाका) दि. 18 :- जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फुट ओव्हर ब्रिजची उभारणीनिमित्ताने अंबड चौफुली-मोतीबाग जाणारा रस्ता रविवार दि.20 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेपासून ते 21 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 1 वाजेपर्यंतच्या वेळेत बंद ठेवण्यात येणार आहे. तरी महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 कलम 36 अन्वये राष्ट्रीय महामार्ग 753 वरील अंबड चौफुली-मोतीबाग ते छत्रपती संभाजीनगर चौफुली मार्गावरील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. असे आदेश पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी जारी केले आहेत.

पर्याय मार्ग म्हणून बीड-अंबडकडून येणारी वाहतुक व छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी वाहतुक  ही जालना येथील मंठा चौफुली-नाव्हा चौफुली-देऊळगाव राजा चौफुली- कन्हैयानगर-भोकरदन चौफुली बायपास मार्गे छत्रपती संभाजीनगरकडे जाईल. सदरचे आदेश दि.20 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजेपासून ते 21 ऑक्टोबर 2024 रोजी 1 वाजेपर्यंतच्या कालावधीत पुलाची उभारणी पुर्ण होईपर्यंत लागू राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

Thursday, 17 October 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मनुष्यबळाची पहिली सरमिसळ प्रक्रिया पूर्ण • मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांची नियुक्ती

 




जालना,(जिमाका) दि. 17 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रमानुसार जालना जिल्ह्यातील 99- परतूर, 100-घनसावंगी, 101-जालना, 102- बदनापूर (अ.जा.) आणि 103-भोकरदन या पाच विधानसभा मतदारसंघात बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी  मतदान होणार आहे. याकरिता मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात येणाऱ्या मनुष्यबळाची निवडणूक आयोगाने विकसित केलेल्या संगणकीय प्रणालीद्वारे पहिली सरमिसळ (रॅण्डमायझेशन) प्रक्रिया जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण  पांचाळ यांच्या उपस्थितीत आज पार पडली. याद्वारे मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांची  नियुक्ती करण्यात आली आहे.

यावेळी अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी  नम्रता चाटे, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी रविंद्र पडूळकर, नायब तहसीलदार श्रीमती वैष्णव यांची उपस्थिती होती.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी जालना जिल्ह्यातील 1 हजार 755 मतदान केंद्र आहेत. मतदान केंद्राध्यक्ष, प्रथम मतदान अधिकारी आणि इतर मतदान अधिकारी यांची नियुक्ती करण्याबाबत मनुष्यबळाची पहिली सरमिसळ (रॅण्डमायझेशन) एकूण 9 हजार 855 अधिकारी- कर्मचाऱ्यांची  करण्यात आली. त्यानुसार आता संबंधित अधिकारी- कर्मचाऱ्यांना त्यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीचे आदेश वितरीत करण्याची कार्यवाही होणार आहे.

-*-*-*-*-

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावेत

 

 

जालना, दि.17 (जिमाका) :- इयत्ता अकरावी तसेच इयत्ता बारावी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या ज्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य, निर्वाहभत्ता व इतर आवश्यक सुविधावर खर्च करण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना लागू केली आहे. तरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या पोर्टलवर दि. 31 नोव्हेंबर 2024 पर्यत ऑनलाईन सादर करावेत. असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

योजनेतंर्गत जालना महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या महाविद्यालयांमध्ये इयत्ता अकरावी तसेच बारावी नंतर व्यावसायिक व बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविध स्तरावरील महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याना शासन निर्णयानुसार देय असलेली रक्कम मंजुर केली जाते. सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रूपये २ लाख ५० हजार रुपयांच्या आत असणे अपेक्षित आहे. अनुसुचित जाती व नवबौध्द घटकातील विद्यार्थ्यास दहावी, अकरावी व बारावी या अभ्यासक्रमात किमान ५० टक्के गुण असणे अपेक्षीत आहे. तसेच दिव्यांगासाठी ४० टक्के गुण असणे अपेक्षीत आहे. विद्यार्थ्याची महाविद्यालयातील उपस्थिती किमान ७५ टक्के अनिवार्य आहे. ज्या विद्यार्थ्यानी यापुर्वी वसतिगृह प्रवेशासाठी ऑनलाईन पोर्टलद्ववारे अर्ज सादर केले आहेत अशा विद्यार्थ्यांना अर्ज दाखल करण्याची आवश्यकता नाही. असेही कळविले आहे.

-*-*-*-*-

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेच्या त्रुटी पुर्ततेसाठी आवाहन

 

 

जालना, दि.17 (जिमाका) :- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासन निर्णयान्वये शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना कार्यान्वित केली आहे. सन २०२१-२२, सन २०२२-२३ व सन २०२३-२४ या वर्षामध्ये अर्ज सादर केलेल्या ज्या विद्यार्थ्यानी अद्यापपर्यत त्रुटीची पुर्तता केली नाही त्यांना स्वाधार योजनेचे अनुदान त्यांच्या बँक खात्यावर अदा करता आले नाही.  तरी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी अर्ज सादर केलेल्या व अद्यापपर्यत त्यांच्या खात्यावर अनुदान जमा न झालेल्या सर्व विद्यार्थ्यानी समाज कल्याण कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहुन अर्जातील त्रुटीची पुर्तता दि. 24 ऑक्टोबर 2024 पर्यत करावी, असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

महर्षि वाल्मिकी यांना अभिवादन



जालना, दि.17 (जिमाका) :- जिल्हाधिकारी कार्यालयात महर्षि वाल्मिकी यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार विक्रांत मोंढे, सतिश तायडे, तुषार निकम यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-

Wednesday, 16 October 2024

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिल्या विद्यार्थ्याने घेतला प्रवेश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेची परवानगी जालना जिल्ह्याच्या वैद्यकीय शिक्षणात मोलाची भर

 




     जालना, (जिमाका) दि.16: नुकतेच उद्घाटन झालेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास यावर्षी शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेची अधिकृत परवानगी प्राप्त झाली आहे. आज या महाविद्यालयाच्या वैद्यकीय शिक्षण विभागात पहिल्या विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्याने जालना जिल्ह्याच्या वैद्यकीय शिक्षणात  मोलाची भर पडली आहे.

       शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.  सुधीर चौधरी, यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे स्वागत करत महाविद्यालयाच्या शैक्षणिक ध्येयधोरणांबद्दल चर्चा केली. त्यांनी सांगितले की, "या महाविद्यालयाच्या स्थापनेमुळे जालना जिल्ह्याच्या वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता वाढेल. तसेच समाजातील विविध स्तरातील विद्यार्थ्यांना उत्तम वैद्यकीय शिक्षणाची संधी उपलब्ध होईल."

      शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे यश हे केवळ महाविद्यालयाच्या प्राध्यापकवर्गाचेच नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या कठोर परिश्रमांचेही फलित आहे. यापुढेही महाविद्यालय आरोग्य सेवेतील उत्कृष्टता प्राप्त करण्यासाठी कटिबद्ध राहील.

      या प्रसंगी महाविद्यालयाच्या विविध विभागातील प्रमुख अधिकारी व प्राध्यापक उपस्थित होते. विद्यार्थी व पालकांनी यावेळी महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाबद्दल समाधान व्यक्त केल्याचे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जालना अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी यांनी कळविले आहे.

-*-*-*-*-*-

 

 

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीच्या अनुषंगाने प्रिटींग प्रेस, राजकीय पक्ष आणि बँकर्सची बैठक संपन्न

 

जालना, दि.16 (जिमाका) : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने आज प्रिटींग प्रेस, राजकीय पक्ष आणि बँकर्सची बैठक जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल यांच्यासह प्रिटींग प्रेस असोसिएशन, राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि बॅंक व्यवस्थापकांची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. पाचांळ निवडणूक आदर्श आचारसंहितेबाबत सविस्तर माहिती देत म्हणाले की, निवडणूकीच्या कालावधीत मुद्रणालयांनी लोकप्रतिनिधीत्व कायदा 1951 चे कलम 127-क च्या नियमानुसार    कार्यवाही आवश्यक आहे. तसेच राजकीय उमेदवारांचे प्रचार साहित्य छापतांना प्रिटींग प्रेस मालकांनी पूर्व परवानगी घ्यावी. छापील साहित्यावर प्रकाशक व मुद्रकाचे नाव असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांकडून छपाईसाठी प्राप्त होणाऱ्या अर्जाची प्रत, प्रकाशीत प्रतीची संख्या याबाबत निवडणूक विभागास वेळोवेळी माहिती देण्याच्या सूचना दिल्या.

 तसेच राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना प्रचार सभा, ध्वनीक्षेपक, वाहनाचा वापर, राजकीय जाहिरातीचे पूर्वप्रमाणीकरण आदी अनुषंगीक बाबींना राजकीय पक्षाने घ्यावयाच्या पूर्व परवानगी तसेच निवडणूक खर्चाच्या नोंदी, काय करावे व काय करू नये याबाबतची माहिती दिली.

तर निवडणूक कालावधीत होणाऱ्या संदिग्ध व्यवहाराची माहिती बँकर्सनी तात्काळ कळवावी. निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना बँकेचे नवीन खाते त्यांचा अर्ज प्राप्त झाल्यास आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करून त्याच दिवशी तात्काळ सुरू करून द्यावे. तसेच बँकेत जमा व खर्चाच्या संदिग्ध व्यवहाराबाबत विशेषत: 10 लाखावरील रकमेच्या व्यवहाराबाबत निवडणूक विभागाला तात्काळ अवगत करावे. बँकेची रक्कम वहन करणाऱ्या वाहनावर विहीत क्युआर कोड लावून, जीपीएस यंत्रणा सुरू ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. पाचांळ यांनी यावेळी दिल्या.

****

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 ध्वनीक्षेपकाच्या वापरावर निर्बंध


जालना, दि.16 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी कार्यक्रम दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. सदर निवडणूकीच्या प्रचार मोहीमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे वाहनांवर ध्वनीक्षेपक बसवून मोठ्या आवाजातून प्रचार केल्यास ध्वनी प्रदुषण होणे, सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील शांततेस व स्वास्थास बाधा पोहोचण्याची व उशीरा रात्री पर्यंत ध्वनीक्षेपण यंत्रणा चालु ठेवण्याची शक्यता असल्यामुळे सदर बाबींवर निर्बंध घालणे आवश्यक आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (एन) मधील प्राप्त अधिकारानुसार निवडणूकीच्या प्रचारासाठी ध्वनीक्षेपकाचे वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत, असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

 ध्वनीक्षेपकाचा वापर पोलीस अधिकारी यांच्या परवानगी शिवाय करता येणार नाही.  सकाळी 6 वाजण्यापूर्वी आणि रात्री 10 वाजेनंतर कोणत्याही फिरत्या वाहनावर व कोणत्याही क्षेत्रात ध्वनीक्षेपकाचा वापर करता येणार नाही.  दिवसा प्रचाराकरिता फिरणाऱ्या वाहनांनी ध्वनी क्षेपकाचा वापर विशिष्ट ठिकाणी थांबूनच करावा, ध्वनी क्षेपकाच्या आवाजासह फिरणाऱ्या वाहनास प्रतिबंध असेल.  सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवार आणि इतर व्यक्तींनी निश्चीत ठिकाणी ध्वनी क्षेपकाच्या वापरा संबंधीत घेतलेल्या परवानगीची माहिती जिल्हादंडाधिकारी, संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी व संबंधीत यंत्रणेस कळविणे बंधनकारक राहील.  ध्वनीवर्धकांचा मग ते एका जागी लावलेले असोत किंवा चालत्या वाहनावर बसविलेले असोत, त्यांचा सकाळी 6 पुर्वी किंवा रात्री 10 वाजेनंतर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या लेखी पूर्व परवानगीशिवाय करण्यात येऊ नये. संबंधित प्राधिकाऱ्यांच्या लेखी पूर्वपरवानगीशिवाय, सार्वजनिक सभा आणि मिरवणुका यांच्यामध्येही ध्वनीवर्धकाचा वापर करण्यात येऊ नये. आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 खाजगी तसेच सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध


 

जालना, दि.16 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणूक-2024 साठीचा कार्यक्रम दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूकीच्या प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत इत्यादीचा संबंधीत जागा मालकाच्या परवानगीशिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगी शिवाय वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने निवडणूकीच्या प्रचारासाठी झेंड्याच्या काठ्या उभारणे, कापडी फलक लावणे, भित्तीपत्रक लावणे, घोषणा लिहीणे आदी करीता कोणत्याही व्यक्तीची जागा, इमारत, आवार, भिंती इत्यादीवर संबंधित मालकाच्या परवानगी शिवाय व संबंधित परवाना प्राधिकरणाचे परवानगी शिवाय वापर करण्यास निर्बंध घालणे आवश्यक झाले आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये खाजगी व सार्वजनिक जागेवर झेंडे, भित्तीपत्रके लावण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.  असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 निवडणूकीचे साहित्य सार्वजनिक ठिकाणी, रहदारीस अडथळा होईल असे लावण्यास निर्बंध


जालना, दि.16 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी कार्यक्रम दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (डीबी) अन्वये  निवडणूकीचे साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी  डॉ.श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपुर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक ईमारतीचे ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणूकीसंबंधी पोस्टर्स, बॅर्नस, पॉम्प्लेट्स, कटआऊट्स, होर्डिंग्ज, कमानी लावणे या व इतर बाबीमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवु शकेल किंवा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यावर निर्बंध घालणे आवश्यक झाले आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 मोटार गाड्या, वाहनांच्या ताफ्याच्या वापरावर निर्बंध जारी

  

 

जालना, दि.16 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी कार्यक्रम दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक मोटार गाड्या अथवा वाहने वापरण्यास निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. निवडणूक आयोगाने त्यांच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटार गाड्या, वाहने यांच्या ताफ्यात दहा पेक्षा अधिक वाहने नसावीत असे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन कोणत्याही राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी दहा पेक्षा अधिक मोटार गाड्या, वाहनांच्या ताफ्याचा वापर करण्यास प्रतिबंध केला आहे.  असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 वाहनावर पक्ष प्रचाराचे कापडी फलक, झेंडे लावण्यासंबंधीच्या नियमाचे आदेश जारी

  

जालना, दि.16 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024  साठीचा कार्यक्रम दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासुन आदर्श आधार संहिता अंमलात आलेली आहे. सदर निवडणूकीचे प्रचार मोहिमेच्या कालावधीत सर्व राजकीय पक्षाचे उमेदवार तसेच निवडणूक लढविणारे उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते आणि हितचिंतक हे निवडणूक प्रचारासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांवर पक्ष प्रचाराचे फलक लावणे, झेंडे लावणे आदिबाबत बंधन घालणे आवश्यक झाले आहे. तरी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

 फिरत्या वाहनांवर पक्ष प्रचाराचा झेंडा हा वाहनाच्या डाव्या बाजुला विंड स्क्रिन ग्लासच्यापुढे राहणार नाही आणि तो त्या वाहनाच्या टपापासून 2 फुट उंची पेक्षा जास्त राहणार नाही.  प्रचाराच्या फिरत्या वाहनावर कापडी फलक वाहन चालकाच्या आसना मागे वाहनाच्या डाव्या व उजव्या बाजुने लावण्यात यावा, इतर कोणत्याही बाजुस तो लावता येणार नाही.  फिरत्या वाहनांवर लावावयाचा पक्ष प्रचाराचा झेंडा किंवा कापडी फलक संबंधित पक्षाचे जिल्हाध्यक्ष, उमेदवार व उमेदवाराचे निवडणूक प्रतिनिधी निवडणूक प्रचारासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून अधिकृत परवानगी घेतलेल्या वाहना व्यतिरिक्त इतर कोणत्याही वाहनांवर लावता येणार नाही. हे आदेश निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अंमलात राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध जारी

  

जालना, दि.16 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी कार्यक्रम दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, संस्था, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्याच्या ठिकाणी धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. तरी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, 2023 चे कलम 163 अन्वये असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने जालना जिल्ह्यात विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, शासकीय विश्रामगृह, सार्वजनिक ठिकाणे, रस्त्यावर कोणत्याही राजकीय पक्षाने, व्यक्तीने, संघटनेने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराने किंवा त्याच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने धरणे आंदोलन, मोर्चा, निदर्शने, उपोषण करण्यावर निर्बंध घालणे आवश्यक आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 धार्मिक स्‍थळे, रुग्‍णालये, शैक्षणिक संस्‍थेसह सार्वजनिक ठिकाणाच्या जवळपास तात्‍पुरती पक्ष कार्यालये स्‍थापन करण्‍यास निर्बंध जारी

 

 

जालना, दि.16 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा  सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी कार्यक्रम दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता2023 चे कलम 163 अन्वये जिल्ह्यातील धार्मिक स्थळेरुग्णालये किंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निवडणूक प्रक्रीया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेतनिर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्ह्यातील धार्मिक स्थळेरुग्णालयेकिंवा शैक्षणिक संस्था व सार्वजनिक ठिकाणाचे जवळपास तात्पुरती पक्ष कार्यालये स्थापन करण्यावर निर्बंध घालणे आवश्यक झाले आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 शासकीय, निमशासकीय कार्यालयासह विश्रामगृहात सभा घेण्यावर निर्बंध जारी

   

 

जालना, दि.16 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 साठी कार्यक्रम दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. जालना जिल्ह्यात शासकीय , निमशासकीय कार्यालये, संस्था, विश्रामगृहे आदिच्या परिसरात मिरवणूक काढणे, घोषणा देणे, सभा घेण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. त्यामुळे जालनाजिल्ह्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेतनिर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन जिल्हादंडाधिकारी,उपविभागीय अधिकारी, तालुका दंडाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील सर्व शासकीयनिमशासकीय कार्यालय, संस्था आणि शासकीय विश्रामगृहाच्या आवारामध्ये कोणत्याही राजकीय पक्षानेनिवडणूक लढविणाऱ्याउमेदवाराने किंवा त्यांच्या प्रतिनिधीने किंवा त्यांच्या हितचिंतकाने सभा घेणे. सदरील आवाराचा वापर राजकीय कामासाठी करणे किंवा रॅली काढणेनिवडणूकी संबंधाने पोस्टर्सबॅनर्सपॉम्प्लेट्सकटआऊटपेंटींग्सहोर्डींग्ज लावणेनिवडणूक विषयक घोषवाक्य लिहिणे किंवा सदरील आवारात निवडणूक विषयक घोषणा देणे किंवा मतदाराला प्रलोभन दाखविणे आणि निवडणूकीच्या कामात बाधा निर्माण होईल अशी कृती करणे इत्यादी बाबी नियंत्रीत करणे आवश्यक आहे.  भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वयेमला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन या आदेशाव्दारे वरील ठिकाणी वरील प्रमाणे कृती करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 उमेदवारांना नामनिर्देशन दाखल करण्याच्या कार्यपध्‍दतीचे आदेश जारी

    

 

जालना, दि.16 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगानेविधानसभा  सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी कार्यक्रम दि. 15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023  चे कलम 163 अन्वये निवडणूकीच्या कालावधीत जालना जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेतनिर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळी  वाहनांच्या ताफ्यामध्‍ये तीन पेक्षा जास्त मोटारगाड्या, वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावाउमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाच्या 100 मीटर परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकांपासून आदर्श आचार संहिता अंमलात आली आहे. त्यामुळे जालना  जिल्‍ह्यात विधानसभा  निवडणूकीची संपूर्ण प्रक्रीया शांततेतनिर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्‍याच्‍या दृष्टीकोनातून निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र दाखल करतेवेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात वाहनांच्या ताफ्यामध्ये तीन पेक्षा जास्त मोटार गाड्या, वाहने यांचा समावेश नसावा. तसेच नामनिर्देशन पत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे दालनात पाच व्‍यक्‍ती उपस्थित राहतील. या व्यतिरिक्त कोणालाही निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात प्रवेश दिला जाणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक, सभा घेणेकोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्‍यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. आदेश दि. 15 ऑक्‍टोबर रोजीचे 6 वाजेपासुन ते दि. 25 नोव्‍हेंबर 2024 रोजीचे 24 वाजेपर्यंत संपूर्ण जालना जिल्ह्यात अंमलात राहतील. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 नमुना मतपत्रिका छपाईवर निर्बंध

    

 

जालना, दि.16 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 साठी कार्यक्रम दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये नमुना मतपत्रिका छपाईस निवडणूक प्रक्रिया पुर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत.  असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात  आलेली आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेतनिर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टीकोनातुन राजकीय पक्षांनीनिवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने मुद्रणालयाचे मालकाने व इतर सर्व माध्यमाद्वारे छपाई करणाऱ्या मालकांनी तसेच प्रकाशकाने नमुना मतपत्रिका छापतांना इतर उमेदवाराचे नाव व त्यांनी नेमुन देण्यात आलेले चिन्ह वापरणे, नमुना मतपत्रिकेसाठी आयोगाने निश्चित केल्याप्रमाणे कागद वापरणे तसेच आयोगाने निश्चित केलेल्या कागदाच्या आकारामध्ये नमुना मतपत्रिका छापणे आदिवर निर्बंध घालण्यात आले आहेत. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 सार्वजनिक मालमत्‍ता विद्रुपीकरणास प्रतिबंध

   

जालना, दि.16 (जिमाका) :- भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 साठी कार्यक्रम दि.15 ऑक्टोबर 2024 रोजी घोषित केला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये निवडणूकीच्या कालावधीत शासकीय, निमशासकीय, सार्वजनिक मालमत्तेची प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरुपात विद्रुपीकरण करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. असे आदेश जिल्हादंडाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केले आहेत.

निवडणूक कार्यक्रम घोषित केल्याच्या दिनाकांपासून आदर्श आचार संहिता अंमलात आलेली आहे. काही व्यक्ती, संस्था यांच्याकडुन मोठ्या प्रमाणात अनाधिकृत होर्डिंग्जबॅनर्सपोस्टर्स व भिंतीवर जाहिराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्यात आले आहे. तसेच निवडणूक कालावधीत राजकीय पक्ष अथवा पक्षाशी संबंधीत व्यक्ती, संस्था यांच्याकडून होर्डिग्जबॅनर्सपोस्टर्स व भिंतीवर जाहीराती लावून शहराचे विद्रुपीकरण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत निवडणूक आयोगाने मालमता विद्रुपीकरण करण्यास प्रतिबंध करण्यासंबंधी दिलेल्या आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत सूचित केल्यानुसार महानगरपालिकानगरपालिकानगरपंचायत व ग्रामीण भागात निवडणूकीच्या कालावधीमध्ये होर्डिंग्जबॅनर्सपोस्टर्स व भितीवर जाहिरात प्रदर्शित करतांना संबंधित स्थानिक प्राधिकरणाची पूर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसेच परवानगी संपल्यानंतर ते नष्ट  करुन इमारतीमालमत्ता पूर्ववत करुन घेणेजाहिराती तात्काळ काढून घेणे आवश्यक आहे. असेही आदेशात नमुद करण्यात आले आहे.

-*-*-*-*-

Tuesday, 15 October 2024

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा

 






 

जालना, दि.15 (जिमाका) : माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस सर्वत्र ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार यांच्या हस्ते डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

वाचन संस्कृती ही प्रत्येक मानवाच्या सोबत वाटचाल करणारी एक महत्वाची प्रक्रिया आहे. वाचन संस्कृतीचा समाजातील दैनंदिन जीवनशैलीशी व एकूणच समाजातील घडामोडींशी जवळचा संबंध येत असतो. किंबहूना वाचन संस्कृती म्हणजे समाज व्यवस्थेचेच महत्वाचे एक रूप आहे. ज्यातून विविध विषयाचे ज्ञान प्राप्त होत असते. वाचनामुळे मानवी मेंदूला व मनाला नवी दिशा व चालना मिळते असे अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रवार यावेळी म्हणाल्या.

उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे म्हणाल्या की, प्रत्येकाने  रोज एक तरी पुस्तकाचे वाचन करणे आवश्यक आहे. वाचनामुळे आपल्या ज्ञानात विविध विषयाची भर पडण्यास मदत होते.

वाचन प्रेरणा दिनानिमित्त मान्यवरांनी पुस्तकांचे वाचन केले. यावेळी वाचन सामान्य प्रशासनाच्या उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, तहसिलदार सर्वश्री श्रीमती तायडे, श्रीमती मेडके, अनिल नवहाते यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची उपस्थिती होती. 

 

****

 

Sunday, 13 October 2024

जालना जिल्हाच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचे निर्णय घेवून चांगले काम करण्याचा प्रयत्न केला : पालकमंत्री अतुल सावे · पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते जिल्हा क्रिडा संकुल टप्पा 2 आणि जिल्हा नियोजन समिती सभागृहाचे लोकार्पण

 











 

     जालना, दि.13 (जिमाका) : जालना जिल्ह्याच्या मागील दोन वर्षात विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेवून नेहमीच चांगले काम करण्याचा प्रयत्न केला असल्याचे प्रतिपादन राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहूजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी केले.   

राज्याचे गृहनिर्माण, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते आज जिल्हा क्रिडा संकुल टप्पा 2 आणि जिल्हा नियोजन समिती सभागृहाच्या लोकार्पण सोहळाप्रसंगी श्री. सावे बोलत होते. यावेळी खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार राजेश राठोड, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे,  जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, पंडित भुतेकर,औदूंबर बागडे, भाऊसाहेब घुगे, अण्णासाहेब चित्तेकर, रविंद्र तौर, मिर्झा अन्वर बेग, भाऊसाहेब गौरे, बाबासाहेब इंगळे, योगेश रत्नपारखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी श्री. सावे म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जालना जिल्ह्यात विविध विकासाची कामे करण्यात आली आहे. जिल्ह्यातील क्रिडा संकूलाच्या विकासाचे कामे अनेक वर्षापासून प्रलंबीत होती. क्रिडा क्षेत्रातील खेळाडूंची गरज पाहून तसेच पंतप्रधान मोदी यांनी क्रिडा क्षेत्राला दिलेले विशेष महत्व लक्षात घेवून जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून टप्पा 1 अंतर्गत आज टेनिस कोर्ट, सिंथेटिक बॉस्केटबॉल कोर्ट, व्हॉलीबॉल मैदान, कबड्डी मैदान, खो-खो मैदान, सिंथेटिक स्केटींग रिंग व मिनी स्केटींग रिंग, आर्टीफिशियल क्रिकेट टर्फ, रिफरबीशमेंट ऑफ एक्झीस्टींग जिम हॉल, संरक्षक भिंत, अंतर्गत रस्ते इत्यादी सुमारे तीन कोटी अठ्ठयाऐंशी लक्ष रुपयांचे कामांचे लोकार्पण तर  टप्पा 2 मधील 400 मीटर सिंथेटीक ट्रॅक, नॅचरल ग्रास फुटबॉल मैदानासह इतर अनुषंगीक बाबीच्या बारा कोटी वीस लक्ष रूपयांच्या कामांचे भुमिपुजन करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रिडा सुविधा उपलब्ध झाल्या आहेत.

तसेच जालना जिल्ह्यासाठी सुमारे 23 कोटी रुपये खर्च करुन अत्याधुनिक असे जिल्हा नियोजन भवन उभारण्यात आले आहे. यामध्ये फर्निचर, सजावट, वातानुकलीत यंत्रणा, सोलार रुफटॉप, डिजिटल ऑडियो कॉन्फरन्स व व्हिडिओ सिस्टीम, जिल्हाधिकारी यांचे दालन, अभ्यागतांसाठी प्रतिक्षा दालन अशा सुविधा उपलबध करुन देण्यात आल्या आहेत. जिल्हा नियोजन भवन आणि क्रिडा संकुलाच्या कामात जिल्हाधिकारी श्री. पांचाळ यांनी विशेष लक्ष देवून हि कामे करुन घेतल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. या कामामुळे जालना जिल्ह्याच्या वैभवात नक्कीच भर पडणार आहे.

 पालकमंत्री म्हणुन मागील दोन वर्षाच्या कालाधीत जिल्हा विकासाच्या दृष्टीने अनेक महत्वाचे निर्णय घेत नेहमीच चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. पोलिस विभागाला 40 वाहने आणि सीसीटीव्हीसाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला. आरोग्य विभागास मॉड्यूलर शस्त्रक्रिया विभागासाठी निधी उपलब्ध करुन दिला. तर जलजीवन करीता 500 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला. नुकतेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन झाले असून, केंद्र शासनाने याकरीता 160 कोटी निधी मंजूर केला असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच येणाऱ्या कालावधीत डीएमआसीमध्ये सुमारे 52 हजार कोटींची औद्योगिक प्रकल्प उभारले जाणार असुन, यामधुन सुमारे 30 हजाराहून अधिक रोजगार निर्मिती होणार आहे. यामुळे जालना आणि छत्रपती संभाजीनगरचा मोठ्या प्रमाणात विकास होणार असल्याचे श्री. सावे यावेळी म्हणाले.

जिल्हाधिकारी श्री पांचाळ यांनी या लोकार्पण सोहळ्याचे प्रास्ताविक केले. तर खासदार डॉ. कल्याण काळे, आमदार नारायण कुचे, आमदार कैलास गोरंट्याल, आमदार संतोष दानवे, आमदार राजेश राठोड यांची यावेळी क्रिडा संकुल आणि जिल्हा नियोजन भवन लोकार्पण सोहळ्याच्या अनुषंगाने समयोचित भाषणे झाली.  

यावेळी दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण, दिवंगत उद्योगपती रतन टाटा आणि दिवंगत माजी आमदार बाबा सिद्दीकी यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

पालकमंत्री यांच्या हस्ते जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, कार्यकारी अभियंता स्मिता पवार, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय गाढवे, खेळाडू, कंत्राटदार आदींचा सत्कार करण्यात आला.  

या लोकार्पण कार्यक्रमास अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, जिल्हा निवडणूक अधिकारी शशिकांत हदगल, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, सार्वजनीक बांधकाम कार्यकारी अभियंता स्मिता पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सूर्यवंशी, जिल्हा क्रिडा अधिकारी संजय गाढवे यांच्यासह अधिकारी-कर्मचारी नागरिक यांची यावेळी उपस्थिती होती.

****