Tuesday, 3 February 2026

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक संपन्न

 



 

जालना, दि.3 (जिमाका): राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षेत संपन्न झाली.

बैठकीत जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की,  तंबाखूमुक्त तसेच आरोग्यसंपन्न समाजासाठी तंबाखू नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. त्यादृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्यासोबतच विविध स्वंयसेवी संस्था, शाळा यांनी सक्रिय सहभाग घेवून प्रभावी जनजागृती करावी. शालेय विद्यार्थ्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची माहिती व्हावी यासाठी जनजागृती करावी. तसेच तंबाखुमुक्त शाळा अभियान यशस्वीरीत्या पुर्ण करण्यासाठी तंबाखुमुक्त शैक्षणिक संस्था या मार्गदर्शक सुचनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. शहरी आणि ग्रामिण भागात अवैधरित्या तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थ विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी, असे सांगितले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.

बैठकीस अन्न व औषधी प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त निखिल कुलकर्णी, शिक्षणाधिकारी प्राथमिक संगिता भागवत, उपशिक्षणाधिकारी संजय कायंदे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गजानन म्हस्के, महानगरपालीकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अतुल राजे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील, तंबाखु नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा सल्लागार डॉ. संदिप गोरे, सायकॉलॉजीस्ट सोनाजी भुतेकर, सामाजिक कार्यकर्त्या सुनंदा कोरडे व ग्रामीण विकास संस्थेचे विभागिय व्यवस्थापक मंगेश गायकवाड इ. सदस्य उपस्थित होते.  

-*-*-*-*-*-*-

प्रशिक्षण संस्थाना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


 

जालना, दि.3 (जिमाका): जिल्हास्तरीय सर्वसाधारण योजना अंतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन 2025-26 मध्ये प्रशिक्षण राबविण्यासाठी इच्छुक व पात्र प्रशिक्षण संस्थांकडून प्रस्ताव मागविण्यात येत आहेत. नॅशनलत स्कील डेव्हलपमेंट कॉरपोरेशन (NSDC) यांचेकडील Skill India Digital Hub या पोर्टलवर सूचीबद्ध (Listed) असलेल्या प्रशिक्षण संस्था या योजनेअंतर्गत प्रस्ताव सादर करण्यास पात्र राहणार आहेत.

प्रस्ताव सादर करण्यासाठी आवश्यक विहित नमुन्यातील परिशिष्टे तसेच मान्यता प्राप्त अभ्यासक्रमांची यादी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. पात्र व इच्छुक प्रशिक्षण संस्थांनी अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालना या कार्यालयास प्रत्यक्ष अथवा दुरध्वनी क्रं. ०२४८२-२९९०३३ वर कार्यालयीन वेळेत संपर्क करून विहित नमुन्यात परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव दि. 16 फेब्रुवारी, 20265पर्यंत सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.  

-*-*-*-*-*-*-

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनाच्या ऑफलाईन अर्जातील त्रुटी पुर्तता करण्यासाठी शेवटची संधी

 


जालना, दि.3 (जिमाका): सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते. या योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासन निर्णयानुसार देय असलेली रक्कम विद्यार्थ्याच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये जमा केली जाते. या योजनेसाठी संबधित लाभार्थ्याना त्रुटी पुर्तता करण्याबाबतचे पत्र संबधीत लाभार्थ्यांच्या मुळ पत्यावर पाठविण्यात आलेले आहे. तसेच यापूर्वी वेळोवेळी अंतीम संधी त्रुटीपुर्तता करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.

सन 2022-23 ते 2023-24 या आर्थीक वर्षातील विद्यार्थ्याना अंतीम संधी म्हणून दि. 10 फेब्रूवारी, 2026 पर्यतच्या मुदतीत आपल्या अर्जातील त्रुटी सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, जालना डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सादर कराव्यात.

संबधित कालावधीतील लाभार्थी यांनी विहित मुदतीत त्रुटी पुर्तता सादर न केल्यास सदरील अर्ज नस्तीबदध् करण्यात येतील. व त्यानंतर सन 2022-23 ते 2023-24  या कालावधीतील कोणत्याही विद्यार्थ्याना त्रुटी पुर्ततेची संधी दिली जाणार नाही. तसेच कोणताही विद्यार्थी स्वाधार योजनेच्या लाभापासून वंचीत राहिल्यास त्यास समाज कल्याण, जालना कार्यालय जबाबदार राहणार नाही.

त्याअनुषगांने सन 2022-23 ते 2023-24 वर्षामध्ये अर्ज सादर केलेल्या (फ्रेश व नुतनीकरण) ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापपर्यत त्रुटीची पुर्तता केलेली नाही. अशा सर्व विद्यार्थ्यांच्या संचीका नस्तीबध्दं करण्यात येतील यांची सर्व लाभार्थ्यानी नोंद घ्यावी. असे आवाहन सहायक आयुक्त समाज कल्याण, जालना राजु एडके यांनी केले आहे.   

-*-*-*-*-*-*-

 

बालकामगारांना कामावर ठेवू नये–जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

 


 

जालना, दि.3 (जिमाका): जिल्ह्यात कोणत्याही आस्थापनांनी बालकामगारांना कामावर ठेवू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहत दि. 30 रोजी संपन्न झालेल्या बालकामगार व वेठबिगार कृती दलाची बैठकीमध्ये जिल्हाधिकारी मित्तल बोलत होत्या. यावेळी सहाय्यक कामगार आयुक्त यु.स. पडियाल यांच्यासह विविध विभागातील अधिकारी यांची उपस्थिती होती.

            जिल्हाधिकारी श्रीमती मित्तल यांनी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बालकामगार व वेठबिगार बाबत जन जागृती करण्याचे निर्देश दिले. तसेच 14 वर्षाच्या आतील बालकास कामावर ठेवणे व 14 ते 18 वयोगटातील किशोरवयीन कामगारास कामावर ठेवणे कायद्याने गुन्हा असूनख् त्याबाबत 20 ते 50 हजार रु. दंड व 6 महिने ते 2 वर्ष शिक्षेची तरतुद आहे. बालकामगार कामावर ठेवल्याने बालकामगाराचे शारिरीक व मानसिक नुकसान होते. बालकामगारास अत्यंत वेदना होतात व शिक्षणाच्या वयात काम करावे लागल्याने त्यांचे संपूर्ण भविष्य उध्वस्त होते. त्यामुळे जालना जिल्ह्यात कोणत्याही आस्थापनेने, कारखान्याने अथवा हॉटेल, गॅरेज इ. चालकांनी बालकामगारांना कामावर ठेवू नये. कोणत्याही आस्थापनेवर बालकामगार काम करताना आढळून आल्यास त्या संबंधीत आस्थापना मालकाविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे कोणीही बालकामगारांना कामावर ठेवू नये. व बालकामगारांचे भविष्य वाचवावे असे आवाहन जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी केले.   

 

-*-*-*-*-*-*-

इयत्ता 10 वी व इयत्ता 12 वी परीक्षेसाठी परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू

 


 

जालना दि. 3 (जिमाका):- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी दि. 10 फेब्रुवारी 2026 ते दि. 18 मार्च 2026 या कालावधीत जिल्ह्यातील एकुण 79 परीक्षा केंद्रांवर तसेच माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 10 वी दि. 20 फेब्रुवारी 2026 ते 18 मार्च 2026 या कालावधीत जिल्ह्यातील एकुण 102 परीक्षा केंद्रावर घेण्यात येणर आहे.

 वरील परीक्षा केंद्राच्या परिसरात अशांतता निर्माण होऊन परीक्षा कालावधीत कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने नमुद परीक्षा उपकेंद्रांच्या 200 मीटर परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागु करुन  प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याचे अपर जिल्हादंडाधिकारी यांनी आदेशीत केले आहे.

या आदेशान्वये परीक्षा केंद्राच्या 200 मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी आदेशात नमुद कालावधीत  सर्व सार्वजनिक टेलिफोन/एसटीडी बुथ/फॅक्स/ झेरॉक्स केंद्र व ध्वनीक्षेपके बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. हा आदेश परीक्षेच्या दिवशी  सकाळी 8.00 वाजेपासुन सायंकाळी 8.00  वाजेपर्यंत अंमलात राहील.

-*-*-*-*-*-*

 

विशेष लेख जागतिक कर्करोग दिन : कर्करोगाचे प्राथमिक अवस्थेत रोगनिदान होणे आवश्यक

 



 

संपुर्ण जगामध्ये दरवर्षी 04 फेब्रुवारी रोजी ‘जागतिक कर्करोग दिन’ साजरा करण्यात येतो. कर्करोगाबाबत लवकर निदान होणे, प्रतिबंध करणे, उपचार व जीवनशैलीचा वापर इत्यादी विषयी जनजागृती करणे हे मुख्य उदिद्ष्ट आहेत. जागतिक कर्करोग दिनाचे प्राथमिक उदिद्ष्ट कर्करोगाचे प्रमाण व मृत्यू कमी करणे असुन, कर्करोगापासुन बचाव कसा करावा या बाबतची माहितीची जनजागृती करण्याचे उदिद्ष्ट आहे.    

असंसर्गजन्य आजारांची झपाट्याने वाढ होत असल्यामुळे कर्करोगाबाबतची माहिती जनतेस मिळणे आवश्यक आहे.  कारण कर्करोग कोणालाही होवू शकतो.  जागतिक आरोग्य संघटनेनुसार कर्करोग हा दुसऱ्या क्रंमाकाचा सर्वात घातक आजार आहे.  अंतिम टप्प्यात असलेल्या कर्करोगामुळे मृत्यू होतो. कर्करोगामुळे मृत्यू होणाऱ्या लोकांची स्थिती भारतासाठी गंभीर आहे. कर्करोगामध्ये रोगांचा समुह असुन, त्यामध्ये असामान्य पेशी अनियंत्रितपणे वाढुन शरीराच्या अवयवमध्ये पसरतात. ॲन्कोलॉजी (कर्करोगाचा अभ्यास) आणि कर्करोगावरील संशोधनासाठी प्रशिक्षण व शिक्षणासाठी सुविधा प्रदान करणे आवश्यक आहे.  ज्यामुळे कर्करोगामुळे होणारे मृत्यू टाळणे शक्य होईल.

कर्करागाच्या प्राथमिक अवस्थेत सतत अतिसार, अशक्तपणा, खोकला तोंडातुन रक्त येणे, स्तनातील गाठ, कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यात कमीत कमी किंवा कोणतेही लक्षणे आढळुन येत नाही. यासाठी मेमोग्राम, ओ.व्ही.ई., व्ही.आय.ऐ., सिटी स्कॅन, एम.आर.आय., सोनोग्राफी, बायोप्सी इ. तपासणीमुळे कर्करोग अंतिम टप्प्यामध्ये जाण्यापुर्वी कर्करोगाचे निदान होते. एच.पी.व्ही. (हयुमन पॅपिलोमाव्हायरस) लसींमुळे गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग टाळता येतो. तसेच हिपॅटायटीस बी या लसीमुळे यकृतचा कर्करोग होण्याचा धोका कमी होतो.

आज कर्करोगामध्ये विविध उपचार उपलब्ध आहेत.  रुग्णांच्या शरीरामध्ये किंवा कोणत्या टप्प्यात आहे यावर उपचार पध्दती अवलंबुन आहे. कर्करोगाच्या उपचारामध्ये शस्त्रक्रिया, केमोथेरपी, रेडियशन थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मानथेरपी इ. प्रकाराचा वापर केला जातो.

कर्करोगाच्या पहिल्या टप्प्यात कमीत-कमी किंवा कोणतेही लक्षणे आढळुन येत नाही. याकरिता नियमित तपासणी होणे आवश्यक आहे. कारण कर्करोग अंतिम टप्प्यात जाण्यापुर्वी कर्करोगाचे निदान होते. त्यामुळे पुढील मृत्यूचा धोका टळतो. लवकर निदान लवकर उपचारामुळे कमी खर्चात उपचार होतो. अर्थात उशीरा निदान झाल्यामुळे उपचार खर्चिक होतो. तसेच हॉस्पीटलमध्ये दीर्घकाळ ऑडमिट राहावे लागते.                                                                 

संतुलीत आहार, फळे, हिरवा पालेभाज्या इ. समावेश असावा. नियमित व्यायाम करणे. अतिनील किरणोत्सर्गाचा संपर्क टाळणे, प्रदुषण, तंबाखु व मद्यपानाचे सेवन करु नये.  रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्याकारणाने कर्करोगाचा धोका कमी होतो. निरोगी जीवनशैली असावी.

जालना जिल्ह्यात सन 2021 ते 2025 या कालावधीत मौखिक कर्करोगाच्या 75, 955 तपासणी करण्यात आल्यात यामध्ये  184 रोगनिदान झाले असुन, 173 औषधोपचाराखाली आहेत. तसेच स्तनाचा कर्करोगाच्या 39,432  तपासणी करण्यात आल्यात यामध्ये  142 रोगनिदान झाले असुन, 133 औषधोपचाराखाली आहेत. गर्भाशय मुखाचा कर्करोगाच्या 50,383 तपासणी करण्यात आल्यात यामध्ये  158 रोगनिदान झाले असुन, 141 औषधोपचाराखाली असल्याची माहिती जिल्हा आरोगय अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी दिली. जिल्ह्यातील 30 वर्षावरील स्त्री / पुरुष  यांनी नियमित आपल्या आरोग्याची तपासणी करुन घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी टोल फ्रि क्रमांक 104 / 102 या हेल्पलाईनवर कॉल करावा.

-*-*-*-*-*-

Monday, 2 February 2026

मराठी साहित्य संमेलन 2026 करीता जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रातील शासकीय महिला अधिकारी यांना नांवे कळविण्याचे आवाहन • पहिले महिला शासकीय अधिकारी यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन

 


जालना, दि.2(जिमाका) : महाराणी ताराराणी यांच्या 351 व्या जयंतीवर्षानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या तसेच सेवानिवृत्त झालेल्या महिला शासकीय अधिकाऱ्यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सरहद संस्था पुणे यांच्या वतीने व महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या सहकार्याने दि. 7 व 8 मार्च, 2026 रोजी नवी दिल्ली येथे पहिले महिला शासकीय अधिकारी यांचे पहिले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026 आयोजित करण्यात येत आहे.

त्यानुसार जालना जिल्ह्यातील साहित्य क्षेत्रामध्ये योगदान दिलेल्या प्रतिभाशाली शासकीय महिला अधिकारी यांनी त्यांची नावे संमेलनाचे प्रतिनिधी श्री. लेशपाल जवळगे  मो. ८४८४०५५२५२ यांना कळवावी असे अवाहन उपजिल्हाधिकारी  (सामान्य) नम्रता चाटे यांनी केले आहे.


बौद्ध समाजातील संस्थांच्या पायाभूत सुविधांसाठी अनुदान योजना ; 20 फेब्रुवारीपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 

जालना, दि.2(जिमाका) : राज्यातील धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या, तसेच 51 टक्क्यांपेक्षा जास्त विश्वस्त किंवा सदस्य संख्या बौद्ध समाजातील असलेल्या सांस्कृतिक, शैक्षणिक व सामाजिक संस्थांना पायाभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनामार्फत सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अनुदान योजना राबविण्यात येत आहे. 

महाराष्ट्र शासन अल्पसंख्यांक विकास विभाग यांचे परिपत्रक क्र. अविवि-2026/प्र.क्र.03/का.6, दि.27 जानेवारी, 2026अन्वये सन 2025-26 या वर्षासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे. या योजने अंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणाऱ्या बौध्द समाजातील सांस्कृतिक, शैक्षणीक व सामाजिक कार्य राबविणाऱ्या संस्थाची शिफारस करण्यात येणार आहे. शासन निर्णयातील कार्यपद्धतीचा अवलंब करून, तसेच अटी व शर्ती पूर्ण करणाऱ्या संस्थांनी अर्जासोबत शासन निर्णयांमध्ये नमूद केल्याप्रमाणे कागदपत्रे जोडून, परिपूर्ण प्रस्ताव दि. 20 फेब्रुवारी, 2026 रोजीपर्यंत जिल्हा नियोजन समिती, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना या कार्यालयात सादर करावेत असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी यांनी केले आहे. या योजनेच्या अर्जाचा नमूना https://jalna.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.

Saturday, 31 January 2026

जालना महानगरपालिकेच्या आरोग्य, कर व स्वच्छता विभागाची आढावा बैठक संपन्न

 


जालना, दि. 31(जिमाका) : जालना शहर महानगरपालिकेतील आरोग्य, कर व स्वच्छता विभागाचा  आढावा जिल्हाधिकारी तथा जालना शहर महानगरपालिका आयुक्त

आशिमा मित्तल यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी त्यांनी हे अर्थसंकल्पीय वर्ष संपण्यासाठी केवळ दोन महिन्यांचा कालावधी शिल्लक असल्याने कर वसुलीबाबत गतीने काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

           कर विभागाने शंभर टक्के कर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, असे निर्देश देताना जिल्हाधिकारी  तथा आयुक्त मित्तल यांनी थकीत कर वसुलीला सर्वोच्च प्राधान्य देण्यावर भर दिला. नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की त्यांच्याकडे थकीत असलेले पाणीपट्टी व घरपट्टी कर तातडीने भरावेत.

            नागरिकांच्या सोयीसाठी फेब्रुवारी 2026 महिनाअखेरपर्यंत करातील शास्ती (व्याज) रकमेवर 50 टक्के सवलत देण्यात येत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. या सवलतीचा लाभ घेऊन नागरिकांनी आपले थकीत कर वेळेत भरावेत, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

        तसेच व्यापारी व व्यावसायिकांनी थकीत कर तात्काळ भरावा, अन्यथा पुढील आठवड्यापासून थकीत करदारांच्या मालमत्तेवर जप्तीची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

           आरोग्य विभागाच्या बैठकीत जालना जिल्ह्यातील कुपोषण, माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे,गरोदर,स्तनदा माता व 0 ते 5 वयोगटातील मुलांना पौष्टिक आहार देण्यासोबतच त्यांचा शारीरिक, मानसिक व बौद्धिक विकास साधण्यासाठी जिल्हा प्रशासन व हेल्थ स्पोकन ट्युटोरियल आणि विल्स ग्लोबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येत असलेल्या 'जालना मिशन न्युट्रीशन कार्यक्रमाअंतर्गत' जालना शहर महानगरपालिका क्षेत्रात काम करावे असे निर्देश दिले. हेल्थ स्पोकन ट्युटोरियल आणि विल्स ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने कुपोषण, माता मृत्यू व बाल मृत्यूचे प्रमाण कमी करणे,गरोदर,स्तनदा माता व 0 ते 5 वयोगटातील मुलांना पौष्टिक आहार या विषयावर 104 विषयांवर त्या त्या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या तज्ञ मार्गदर्शकांचे ॲनिमेटेड व्हिडिओंचा समावेश आहे.सदरील व्हिडिओ मध्ये गर्भवती मातांनी गर्भधारणा कालावधीत आहार विषयक कशी काळजी घ्यावी, शास्त्रोक्त पद्धतीने बाळालाा स्तनपान कसे करावे, 0 ते 5 वयोगटातील मुलांना कुठलाा पुरक व पौष्टिक आहार द्यावा यासह अन्य विषयांचा समावेश आहे. सर्वप्रथम जालना शहर महानगरपालिका क्षेत्रातील आरोग्य  विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी या व्हिडिओंचा परिपूर्ण अभ्यास करावयाचा आहे. व यानंतर याविषयावर परीक्षा घेऊन त्यातून तज्ञ मार्गदर्शकांची निवड केली जाणार आहे. 

           जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी जालना शहर महानगरपालिकेतील स्वच्छता विभागाची आढावा बैठकीत  शहरातील स्वच्छता व्यवस्था अधिक सक्षम, प्रभावी व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने सविस्तर चर्चा करण्यात आली.

         बैठकीदरम्यान जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दैनंदिन कचरा संकलन, ओला-सुका कचरा वर्गीकरण, कचऱ्याची शास्त्रीय विल्हेवाट, स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता तसेच मुख्य रस्ते व अंतर्गत भागातील स्वच्छतेची सद्यस्थिती यांचा आढावा घेतला. स्वच्छता कामकाजात शिस्त, वेळेचे पालन आणि कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

          शहर स्वच्छ व आरोग्यदायी ठेवण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱ्यांची उपस्थिती, आवश्यक साधनसामग्री, यंत्रसामग्रीचा प्रभावी वापर तसेच तक्रार निवारण यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा देण्यासाठी जनजागृती वाढविण्यावर भर देण्यासही त्यांनी सांगितले.

        या बैठकीस अतिरिक्त आयुक्त अर्जुन गिराम, उपायुक्त कानपुडे, कर वसुली अधिकारी राहूल देशमुख, स्वच्छता विभागाचे कैलास चांदणे, आरोग्य विभागातील सर्व डॉक्टर व त्यांचे कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, कर विभागातील कर्मचारी यांची उपस्थिती होती.

विभाग प्रमुखांनी 15 फेब्रुवारी 2026 पर्यंत कामाचे नियोजन करावे, जिल्हा वार्षिक योजना मासिक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांचे निर्देश

 


जालना, दि. 31 (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या कामांचा मासिक आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी मित्तल यांनी  राज्यस्तरीय यंत्रणांचे विभाग प्रमुखांनी  फेब्रुवारी 2026 पर्यंत प्रस्तावित कामांचे सविस्तर नियोजन करून प्रत्यक्ष अंमलबजावणीस सुरुवात करण्याचे निर्देश दिले.

              आज दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यस्तरीय यंत्रणांचे विभाग प्रमुखांची जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-2026 मासिक प्रगती अहवाल आढावा  बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी त्या बोलत होत्या. 

               या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र पाटील, जिल्हा कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, जिल्हा रेशीम अधिकारी श्री. अजय मोहिते,कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग श्रीमती स्मिता पवार,नियोजन विभागातील अमोल तोंडे,यांच्या सह संबंधित राज्यस्तरीय यंत्रणांचे विभाग प्रमुखांची  उपस्थित होती. जिल्हा वार्षिक योजनेतील निधी वेळेत व परिणामकारक पद्धतीने खर्च होणे आवश्यक असून, मंजूर कामांमध्ये अनावश्यक विलंब होऊ नये, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विभागाने आपल्या-आपल्या योजनेतील कामांचा कालबद्ध कृती आराखडा तयार करून प्रगती अहवाल सादर करावा, तसेच प्रलंबित कामांबाबत तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

             या बैठकीत कृषी, पशुसंवर्धन, आरोग्य, मत्स्य व्यवसाय, बांधकाम विभाग, वनीकरण विभाग, प्रादेशिक परिवहन विभाग, लघु पाटबंधारे, अपारंपरिक उर्जा विभाग, आयटीआय यासह अन्य राज्यस्तरीय यंत्रणांच्या विभागाचा आढावा घेण्यात आला. बैठकीदरम्यान विविध विभागांकडील सुरू असलेल्या व प्रस्तावित कामांचा आढावा घेण्यात आला. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड न करता नागरिकांना थेट लाभ मिळेल अशा योजनांना प्राधान्य देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिले.


जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक संपन्न

 


जालना,दि.30(जिमाका) : जिल्ह्यातील ग्राहकांच्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली. यावेळी बैठकीस अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, प्रभारी जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव मनिषा देशपांडे, पोलीस उपअधिक्षक रविंद्र निकाळजे, कृषी उपसंचालक एस.एच. कायंदे, अन्न व औषध सहा. आयुक्त निखील कुलकर्णी, वैधमापनचे आर.डी. दराडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचे अनिल कदम, महावितरणचे चेतन पाटील, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी डी.एस. दिवटे यांच्यासह अशासकीय सदस्यांची बैठकीस उपस्थिती होती. 

यावेळी जिल्हाधिकारी मित्तल म्हणाल्या की, नागरिकांना दैनंदिन व्यवहारात येणाऱ्या अडचणी किंवा समस्यांबाबत उपाय योजना करण्यासाठी जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेमार्फत प्रयत्न होणे आवश्यक आहे. जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे मुख्य उद्दिष्ट ग्राहकांच्या हक्कांचे संरक्षण करणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे, तसेच ग्राहकांच्या तक्रारी त्वरित सोडविण्याचे आहे. याकरीता जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेने ग्रामीण भागात विविध माध्यमातून ग्राहक जनजागृतीसाठी विशेष मोहीमद्वारे प्रयत्न करावा. ग्राहकांना काही अडचणी असल्यास त्याबाबत जालना जिल्ह्याचे संकेतस्थळ jalna.nic.in यावर ग्राहकांच्या तक्रारीसाठी पोर्टल उपलब्ध करुन दिलेले असून, नागरिकांनी त्यांच्या समस्या या पोर्टलच्या माध्यमातून सादर कराव्यात, 

यावेळी अशासकीय सदस्यांनी बैठकीमध्ये विविध विषयाच्या तक्रारी मांडल्या यामध्ये जिल्ह्यातील काही भागातील औषधी दूकानदार हे काही निवडक डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्श्न असेल तरच औषधी देतात. तसेच शहर व ग्रामीण भागत अनधिकृत वैद्यकीय व्यावसायीक (बोगस डॉक्टर) असल्याची तक्रारी आहेत. याकरीता जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील औषध दूकाने आणि  बोगस डॉक्टरांचा शोध घेवून कार्यवाही करावी. तसेच अन्न औषध प्रशासनाने भेसळयुक्त खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करावी. ग्रामीण भागातील आठवडी बाजारात विक्रेते दगडाचे माप वापरतात, अशा विक्रेत्यांची तपासणी करुन वैधमापन विभागाने कारवाई करावी. परतुर येथील राशन दुकानामधुन मानकांप्रमाणे धान्य वितरीत होत नसल्याने अशा दूकानांची तपासणी करावी. जिल्ह्यातील रस्त्यांवरील दूभाजक अनाधिकृतपणे तोडण्यात आलेले आहेत. त्याचा शोध घेवून योग्य कार्यवाही करावी. शहरातील विविध रस्त्यावरील सिग्नलच्या वेळा रस्यांतरवर होणाऱ्या वाहनांची वाहतूकीचे अभ्यास करुन योग्य कार्यवाही करावी. रस्यांाणवरील दूभाजकांवर विविध प्रकारचे फलक लावल्याने अपघात होण्याची शक्यता असते, अशा फलकांबाबतीत कार्यवाही करावी. जालना येथील न्यू मार्केट यार्ड समोरील रस्त्यावर गतिरोधकाची आवश्यकता आहे का ? याची पाहणी करुन परिवहन कार्यालयाने आवश्य ती कार्यवाही करावी. तसेच वेळोवेळी टॅक्स भरुन ही जालना मार्केट कमिटी परिसरातील स्वच्छता होत नाही. मार्केट यार्ड  महावितरणने स्मार्ट मिटर संबंधी प्राप्त तक्रारीचे निवारण करावे. बदनापुर वाहन थांब्याजवळ विद्युत पोल लावले ते तपासुन घेणे. तसेच ग्राहकांनी महावितरण संबंधधी तक्रारी 1912 आणि 18002123435 यावर नोंदवावी. तसेच आजच्या बैठकीत अशासकीय सदस्यांनी मांडलेल्या तक्रारींची दखल घेवून, याबाबत योग्य कार्यवाही करुन, अहवाल सादर करण्याच्या सूचना यावेळी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी दिल्या. 

बैठकीच्या सुरुवातीस प्र. जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव मनिषा देशपांडे यांनी प्रास्ताविकात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे उद्दीष्ट सांगुन मागील बैठकीबाबत झालेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच जिल्ह्याच्या ऑनाईलन पोर्टलवर मागील महिन्यात एकही तक्रार प्राप्त झाली नसल्याचे सांगुन, तक्रारी ऑनलाइन नोंदवाव्यात. तसेच jalna.nic.in या संकेतस्थळावर ग्राहकांच्या समस्यांसाठी पोर्टल उपलब्ध आहे. ग्राहकांच्या हिताशी संबंधित तक्रारी असल्यास त्या ऑनलाइन किंवा ऑफलाइन पद्धतीने सादर करण्याचे आवाहन केले. 

  

Thursday, 29 January 2026

*पुरातत्त्व विभागाच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय महावारसा समितीची बैठक संपन्न*

 





                 जालना,दि.29(जिमाका) : पुरातत्त्व विभागाच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचे संवर्धन, संरक्षण व जतन करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय महावारसा समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात संपन्न झाली.
         या बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, सहाय्यक संचालक पुरातत्त्व विभाग छत्रपती संभाजी नगर श्रीमती जया वाहणे, पुरातत्त्व सहाय्यक रुख्मिणी रोडगे, जतन अधिक्षक वैभव वानखेडे, सुरेश केसापुरकर, यांच्यासह समीती सदस्य उपस्थित होते.
      या बैठकीत जिल्ह्यातील संरक्षित व असंरक्षित ऐतिहासिक स्थळे, पुरातत्त्वीय स्मारके, वारसास्थळांचे संरक्षण, अतिक्रमण रोखणे, तसेच त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. वारसास्थळांच्या नोंदणी, दस्तऐवजीकरण तसेच पर्यटनाच्या दृष्टीने विकास करण्याबाबतही विचारमंथन करण्यात आले.
         जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा जपणे ही आपली सामूहिक जबाबदारी असून, संबंधित सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करावे, असे निर्देश दिले. तसेच पुरातत्त्वीय स्थळांच्या संरक्षणासाठी कायदेशीर तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
                पुरातत्त्व विभागाच्या नियंत्रणाखाली जालना जिल्ह्यातील प्रागेतिहासिक (नवाश्मयुगीन) स्थळ जालना, भोकरदन लेणी, प्रागैतिहासिक स्थळ भोकरदन, महादेव मंदिर, अनिवार्य भोकरदन, प्रागेतिहासिक स्थळ, अंबड, जांबुवंत मंदिर जामखेड अंबड, अमरगड किल्ला, उमरखेड मंठा, खंडकेश्वर मंदिर जामखेड, अंबड या आठ संरक्षित स्मारकाचां समावेश आहे. तर 27 असंरक्षित स्मारकांचा समावेश आहे.

जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन

 


        जालना, दि.29(जिमाका) : जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे शुक्रवार, दि. 30 जानेवारी,  2025 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीला समितीवर नियुक्त शासकीय सदस्य, अशासकीय सदस्यांनी वेळेवर उपस्थित रहावे. तसेच सर्वसामान्य नागरिकांचे ग्राहक हितासंबंधीत तक्रार असल्यास सदर बैठकीच्या दिवशी उपस्थित राहून आपला लेखी स्वरुपाचा अर्ज सादर करावा.

नागरिकांना ग्राहक या संबंधाने काही अडचणी असल्यास त्याबाबत जालना जिल्ह्याचे संकेतस्थळ jalna.nic.in यावर ग्राहकांच्या तक्रारीसाठी पोर्टल उपलब्ध करुन दिलेले असून, नागरिकांनी त्यांच्या समस्या या पोर्टलच्या माध्यमातून सादर कराव्यात, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी तथा जालना संरक्षण परिषदेचे सदस्य सचिव सविता चौधर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

मिशन वात्सल्य व मिशन शक्ती अंतर्गत जिल्हास्तरीय बैठक संपन्न

 


 

जालना,दि.29(जिमाका) : महिला व बालविकास विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या ‘मिशन वात्सल्य व मिशन शक्ती’ योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात एकल महिला पुनर्वसन, मिशन शक्ती अंतर्गत जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती तसेच मिशन वात्सल्य त्रैमासिक आढावा बैठक यांचे आयोजन करण्यात आले होते.

          या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जालना पी. एम. मिन्नू, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कोमल कोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे,पोलीस उप अधीक्षक श्री. निकाळजे, व्यवस्थापक जिल्हा अग्रणी बँक मंगेश केदार, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी गणेश चिमणकर, युनिसेफच्या सदस्य अल्पा वोरा यांच्यासह संबंधित विभागातील अधिकारी यांची उपस्थिती होती.

        जालना जिल्हात घटस्फोटित, परित्यक्ता, विधवा व अविवाहित अशा एकूण 69,358 एकल महिला आहेत. यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वकष प्रयत्न होणे गरजेचे आहे. यासाठी तालुकानिहाय एकल महिलांसाठी मेळाव्याचे आयोजन करुन, यांना सर्वप्रथम शासकीय कागदपत्रे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. तसेच या महिलांसाठी आरोग्य, पोषण व त्यांच्यासाठी शासन स्तरावरुन ज्या काही योजना राबविल्या  जातात, त्यांची माहिती व लाभ पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या महिलांचा समावेश महिला बचत गटात करणे, बाल संगोपन योजनेचा लाभ मिळवून देणे, रोजगार विषयक कार्यशाळा आयोजित करणे. तसेच या बैठकीत एकल महिलांच्या पुनर्वसनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सद्यस्थिती, लाभार्थ्यांना मिळणाऱ्या सुविधा, तसेच त्यांना आर्थिक, सामाजिक व मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

          मिशन शक्ती अंतर्गत महिलांच्या सुरक्षितता, सक्षमीकरण, स्वावलंबन व रोजगारनिर्मितीच्या उपक्रमांचा आढावा घेण्यात आला. महिलांवरील हिंसाचार प्रतिबंध, तक्रार निवारण यंत्रणा बळकट करणे, तसेच विविध विभागांनी एकत्रितपणे काम करण्यावर भर देण्याचे निर्देश देण्यात आले. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेचा लाभ प्रभावीपणे सर्व पात्र लाभार्थांना देण्यात यावा, अशा सूचना देण्यात आल्या.

-*-*-*-*-*-

लेख कुष्ठरोग निवारण दिन भेदभाव समाप्त करु या, सन्मानाची वागणुक देऊ या


 

        सन 1873 मध्ये डॉ.हॅन्सन यांनी कुष्ठ रोगाच्या जंतुचा शोध लावला. त्यामुळे कुष्ठरोगाला हॅन्सन डिसीज असे सुध्दा म्हणतात.  कुष्ठरोग हा मायकोबॅक्टेरियम लेप्री या जिवाणु पासुन होतो.  दरवर्षी 30 जानेवारीला कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्यांत येतो.  या दिवशी महात्मा गांधी यांची पुण्यतिथी असते.  महात्मा गांधी यांनी कुष्ठरुग्णांची सेवा करुन काळजी घेतली आहे.  या आजारावर मात करण्यासाठी जागरुकता वाढविण्यात येऊन जनजागृती करण्यांत येते.  जनतेमध्ये जनजागृती करुन समाजातील कुष्ठरोगाचे निर्मुलन करणे तसेच केंद्र शासनाने सन 2027 पर्यंत कुष्ठरोग प्रसाराचे प्रमाण शुन्य करण्याचे हे उदिद् ष्ट आहे. कुष्ठरोगाचा प्रसार थांबविणे व कुष्ठबाधित रुग्णांना लवकरात लवकर बहुविध औषधोपचाराखाली आणणे तसेच कुष्ठरुग्णांच्या संपर्कातील नातेवाईकांना (निकट सहवासित) रिफॅम्पिसीन या गोळीचा एकल डोस देऊन संसर्गापासुन सुरक्षित करणे हे प्रमुख उदिद् ष्ट आहे.                   

घोषवाक्य : ’ भेदभाव समाप्त करु या, सन्मानाची वागणुक देऊ या ’

लक्षणे :- त्वचेवर लालसर फिकट न खाजणारा, न दुखणारा, बधीर चट्टा, तेलकट त्वचा, त्वचेवर गाठी, कानाच्या पाळया जाड होणे, त्वचेला थंड व गरम संवेदना न जाणवणे, हाता पायाची बोटे वाकडी, मज्जातंतु जाड होणे.

प्रसार :- कुष्ठबाधित रुग्णांच्या खोकला/शिंकाद्वारे मायकोबॅक्टेरियम लेप्री जिवाणु हवेमध्ये पसरतात. श्वसनप्रक्रिया मध्ये निरोगी व्यक्तीच्या शरीरामध्ये मायकोबॅक्टेरियम लेप्री जिवाणु प्रविष्ठ होतात.  दुषित हवेद्वारे कुष्ठरोगाचा प्रसार होतो. कुष्ठरोग बाधित व्यक्ती सोबत जवळचा संपर्क असल्यास त्याचा प्रसार होतो.  कुष्ठरोगाविरुध्द लढण्याच्या नैसर्गिक रोगप्रतिकार शक्तीमुळे बहुतांश लोकांना (98 टक्के) कुष्ठरोग होत नाही.  कुष्ठरोग कोणालाही होऊ शकतो.

अधिशयन काळ : 6 महिने ते 10 वर्षे.

रोगनिदान :- बाहय शारीरिक तपासणी उदा. त्वचेवर लालसर फिकट न खाजणारा, न दुखणारा, बधीर चट्टा तपासणी, कानाच्या पाळया जाड, भुवयांचे केस विरळ, हाता पायाची बोटे वाकडी पाहणी, बायोप्सी,

प्रकार :- कुष्ठरोगाचे दोन प्रकार आहेत 1) पी.बी.(पॉलीबॅसिलाय) व 2) एम.बी.(मल्टीपल बॅसिलाय).

औषधोपचार :- सर्व शासकिय रुग्णालयात रोगनिदान व औषधोपचार मोफत उपलब्ध आहे.  एम.डी.टी.औषधोपचार पध्दती आहे.  पी.बी.केस मध्ये 6 महिने औषधोपचार दिला जातो.  यामध्ये टॅब.डापसोन, रिफामायसिन दिल्या जातात.  पी.बी.केस असंसर्गजन्य आहे.  एम.बी.केस मध्ये 12 महिने औषधी दिली जाते.  यामध्ये टॅब.डापसोन, रिफामायसिन व क्लोफायझीमीन दिल्या जातात.  एम.बी.केस संसर्गजन्य आहे.  पी.बी.केस मध्ये 1 ते 5चट्टे व एम.बी.केसमध्ये असंख्य चट्टे असतात.

        कुष्ठरोगामुळे अंधत्व, किडनीविकार, स्नायु कमकवुत, कायमचे हाताचे/पायाचे बोटे नष्ट होते, मज्जातंतुचे नुकसान होते, चेहरा विकृतीग्रस्त होतो.

गैरसमज :- कुष्ठरोग अनुवांशिक नाही.  कुष्ठरोग हा शाप नसुन जिवाणुमुळे होणार रोग आहे.

सामाजिक घटक :- गरीबी, वैयक्तीक अस्वचछता, गर्दी.

प्रतिबंध :- बी.सी.जी. लस घेतल्यामुळे 50 टक्के कुष्ठरोगापासुन संरक्षण मिळते.  आरोग्यदायक वातावरण ठेवणे, विटामीन अे,सी,डी,इ, बी-12 व खनिज झिंक, मॅग्नेशियम व शिलेनियम चे प्रमाण व्यवस्थित ठेवणे. कुष्ठबाधित व्यक्तीचे लवकरात लवकर निदान करुन एम.डी.टी.औषधोपचाराखाली आणणे. एम.डी.टी.औषधोपचार प्रणालीमुळे कुष्ठरोग पुर्णपणे बरा होतो.

पुर्नेवसन :- कुष्ठरुग्णांचे वैद्यकिय, आर्थिक व सामाजिक पुर्नेवसन होणे आवश्यक आहे.  शस्त्रक्रियेसाठी पात्र असलेल्या कुष्ठ रुग्णांवर जिल्हा सामान्य रुग्णालय व ठराविक स्वयंसेवी संस्थांमध्ये पुनर्रचनात्मक शस्त्रक्रिया मोफत करण्यांत येतात. मेजर शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांना रुपये 12000/- इतका प्रोत्साहनपर भत्ता तसेच  मेजर शस्त्रक्रिया करणा-या शासकिय आरोग्य संस्थांना रुपये 5000/- इतका प्रोत्साहनपर भत्ता देण्यांत येतो.कुष्ठरुग्णांच्या पायाला नवीन जखम होऊ नये किंवा जखमा असलेल्या रुग्णांना वर्षातुन दोन वेळा मोफत एम.सी.आर.चप्पल देण्यांत येते. कुष्ठरुग्णांना हाताची बोटे वाकडी असतील तर रुग्णांना मोफत स्प्लिंटस. पात्र कुष्ठरुग्णांना सर्व शासकिय रुग्णालये व स्वयंभु कुष्ठ वसाहतीमध्ये गरजेप्रमाणे मोफत व्रणोपचार सेवा व भौतिकोपचार सेवा देण्यांत येतात.  कुष्ठरुग्णाला शासन मार्फत विविध सुविधा देण्यांत येतात. उदा.एस.टी.बस मध्ये प्रवास सवलत, कुष्ठमुळे अंपगत्व असल्यास अंपगाचे प्रमाणपत्र.  अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा.

आकडेवारी: माहे एप्रिल 2025 ते डिसेंबर 2025 अखेरपर्यंत एकूण 143 नवीन कुष्ठरुगण आढळून आले असून त्यांना बहुविध औषध सुरू करण्यात आले आहेत तसेच कुष्ठरोगोनांच्या संपर्कातील नातेवाईकांना (सहवासीतांना) रिफामायसिन या गोळीचा एक डोस देऊन संसर्गापासून सुरक्षित करण्यात आले आहे.

 

(डॉ. जयश्री भुसारे)                                                            जिल्हा आरोग्य अधिकारी,                                     जिल्हा परिषद, जालना

Tuesday, 27 January 2026

150 दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालय राज्यात दुसरे

 




   छत्रपती संभाजीनगर, दि. 27 (विमाका) – राज्य शासनाच्या 150 दिवसांच्या ई-गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमांतर्गत राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांच्या कामगिरीचे अंतिम मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) यांच्याकडून करण्यात आले. या मूल्यमापनात छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्त कार्यालयाने उत्कृष्ट कामगिरी करत राज्यात दुसरा क्रमांक मिळविला आहे.

 

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यालयात ई-गव्हर्नन्स उपक्रमांची नियोजनबद्ध अंमलबजावणी करण्यात आली. विभागनिहाय सातत्यपूर्ण आढावा, ई-ऑफिसचा प्रभावी वापर तसेच नागरिक-केंद्रित निर्णय प्रक्रियेवर भर देण्यात आल्याने विभागाला हे यश मिळाले आहे.

 

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जाहीर करण्यात आलेल्या या मूल्यमापनात कार्यालयाची वेबसाईट, आपले सरकार प्रणाली, ई-ऑफिस, कार्यालयीन डॅशबोर्ड, व्हॉट्सॲप चॅटबॉट, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन तसेच GIS तंत्रज्ञानाचा शासकीय कामकाजात झालेला वापर या सात निकषांवर कामगिरी तपासण्यात आली.

 

राज्यात दुसरा क्रमांक मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी सर्व विभागप्रमुखांशी संवाद साधून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. यावेळी अपर विभागीय आयुक्त प्रताप काळे, अपर विभागीय आयुक्त खुशालसिंह परदेशी, अपर आयुक्त रिता मेत्रेवार, उपजिल्हाधिकारी शुभांगी आंधळे, अपर विभागीय आयुक्त मंजुषा मिसकर, सहआयुक्त डॉ. अनंत गव्हाणे, सहआयुक्त राजेश काटकर, उप आयुक्त दादासाहेब वानखेडे, उपआयुक्त सुषमा देसाई, सहायक आयुक्त सरीता सुत्रावे, नगर प्रशासन विभागाचे देविदास टेकाळे, सहायक आयुक्त मंजुषा कापसे, महानगर नियोजनकार हर्षल बावीस्कर, जिल्हा विज्ञान व सूचना अधिकारी विद्याधर शेळके,  यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-*-

 

जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विविध उपक्रम, योजनाचा शुभारंभ व लाभाचे वितरण

 










जालना,दि.27 (जिमाका): जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या सभागृहात विविध उपक्रम, योजनाचा शुभारंभ व लाभार्थ्यांना लाभाचे वितरण करण्यात आले.

यामध्ये शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी तंत्रज्ञान, पारदर्शक प्रशासन आणि पायाभूत सुविधांचा संगम साधत जालना जिल्ह्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना’ आणि ‘भू-दृष्टी’ पोर्टलचा शुभारंभ जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला. या दोन महत्त्वाकांक्षी उपक्रमांमुळे ग्रामीण दळणवळण अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

तसेच जिल्ह्यातील दिव्यांग, विद्यार्थी व वाचन संस्कृतीच्या सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, जालना व रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या दिव्यांग सक्षमीकरण अभियान, प्रोजेक्ट व्हिजन तसेच ग्रंथालय प्रकल्प या तीन महत्त्वपूर्ण प्रकल्पांवरील सामंजस्य कराराचे उद्घाटन पालकमंत्री पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते यावेळी संपन्न झाले. तसेच जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या दिव्यांग सक्षमीकरण अभियान अंतर्गत 100 टक्के अंध दिव्यांगांना ‘NAVINAUT’ सहाय्यक उपकरणांचे जिल्ह्यातील एकूण 100 दिव्यांगांना या संस्थेमार्फत ‘NAVINAUT’ किट वितरित करण्यात येणार आहे. आजच्या कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात 7 जणांना ‘NAVINAUT’ किटचे वितरण पालकमंत्री  पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.

केंद्र शासनाच्या ‘पीएम सूर्यघर मुफ्त बिजली योजना’ अंतर्गत नवीकरणीय ऊर्जेला चालना देण्यासाठी जालना जिल्ह्यात 5,000 पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या 29 गावांमध्ये मॉडेल सोलार स्पर्धेचा शुभारंभ पालकमंत्री  पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच जालना फर्स्ट या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने जालना शहरातील नागरी समस्या सोडविण्यासाठी विकसित करण्यात आलेले ‘माय जालना’ ॲपचे उद्घाटन आज पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. या ॲपमुळे जालना शहर महानगर पालिकेच्या वतीने शहरातील स्वच्छता विषयक नागरिकांच्या समस्या दूर करण्यास हातभार लाभणार आहे.

            यावेळी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरकुलांचे वितरण करण्यात आले. तसेच कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना हार्वेस्टर व ट्रॅक्टरचे वितरण करण्यात आले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2.0 अंतर्गत निवडपत्रांचे वाटप करण्यात आले. राष्ट्रीय रस्ते सुरक्षा अभियान-2026 अंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी व नागरिकांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

यावेळी खासदार कल्याण काळे, आमदार सर्वश्री राजेश राठोड, अर्जुन खोतकर, बबनराव लोणीकर, नारायण कुचे, संतोष दानवे, हिकमत उढाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

****

 

Monday, 26 January 2026

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण

 




 

जालना, दि.26 (जिमाका) : भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.

यावेळी अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हा दंडाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा पुरवठा अधिकारी सविता चौधर, उपजिल्हाधिकारी मनिषा दांडगे, उपजिल्हाधिकारी नम्रता चाटे, यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-*-*-

प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न






 

        जालना, दि.26 (जिमाका) : जालना जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी, प्रगतीसाठी तसेच शासनाच्या सर्व योजना यशस्वीपणे राबविण्यासाठी आपण कटिबध्द असल्याचे प्रतिपादन राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा जालना पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांनी केले.

भारताच्या 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त येथील पोलीस मुख्यालय मैदानावर मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री पकंजा गोपीनाथ मुंडे यांच्या हस्ते आज झाले त्याप्रसंगी त्या बोलत होत्या.

            यावेळी आमदार सर्वश्री राजेश राठोड, अर्जुन खोतकर, बबनराव लोणीकर, नारायण कुचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधिक्षक आयुष नोपाणी, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे म्हणाल्या की, लोकशाही प्रणालीचा दीपस्तंभ ठरलेली भारतीय राज्यघटना 26 जानेवारी, 1950 रोजी राष्ट्राला अर्पण करण्यात आली. जगामध्ये भारत देश एक प्रजासत्ताक गणराज्य म्हणून उदयास आला. नागरिकांना राज्यकारभारात सहभागी होण्याचा अधिकार मिळाल्याने या दिवसाला विशेष महत्व आहे. घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे यासाठी अमुल्य योगदान लाभले.

विविध योजनांच्‍या यशस्‍वी अंमलबजावणीमुळे आपला जालना जिल्हा विविध क्षेत्रात सतत ग्रेसर राहिला असुन, जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून अतिशय आनंद आणि अभिमान असल्याचे ही त्या यावेळी म्हणाल्या.

जिल्ह्यात मुख्यमंत्री समृध्द पंचायत राज अभियान अंतर्गत ग्राम विकास विभागाच्यावतीने या अभियानाची अंमलबजावणी करण्यात येत असून ग्रामीण, भागातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करणाऱ्या ग्राम पंचायती, पंचायत समिती, जिल्हा परिषदांना कामगिरीनूसार प्रोत्साहित करण्यासाठी हे अभियान सुरु करण्यात आले आहे. तसेच मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना ही महाराष्ट्र शासनाची एक नवीन योजना आहे, जी शेतकऱ्यांसाठी शेत आणि पाणंद रस्त्यांची समस्या सोडवण्यासाठी सुरू केली आहे. कृषी विभागामार्फत सन 2025-26 अंतर्गत जिल्ह्यातील सुमारे 15 हजार शेतकऱ्यांना यांत्रिकीकरण, ठिबक, तुषार, शेततळे, आस्तारीकरण, फळबाग लागवड, सामुहिक शेततळे, कांदाचाळ, क्षेत्र विस्तार, संरक्षित शेती इत्यादी बाबीसाठी 76 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आले आहे. तसेच प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न  प्रक्रिया योजने अंतर्गत 96 लाभार्थ्यांना 7 कोटी रुपयांचे कर्ज तसेच 2.69 कोटी रुपयांचे अनुदान वितरीत करण्यात आले आहे. शेतकऱ्यांसाठी नविन विहिर, दुरुस्ती व इतर लाभांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषि स्वावलंबन योजना अंतर्गत 11 कोटी रुपये तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना अंतर्गत 30 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत समावेश करण्यात आलेल्या 44 गावामध्ये 1 हजार 248 कामे पूर्ण झाली आहेत. गाळयुक्त धरण गाळमुक्त शिवार योजनेअंतर्गत सुमारे 5 लाख घनमिटर गाळ काढण्यात आला. तसेच अमृत सरोवर अंतर्गत सर्व कामे पुर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत कुक्कुट पालनाचे 2 प्रकल्प पूर्णत्वास येत असून, शेळी-मेंढी पालनाचे 4 प्रकल्प जिल्ह्यात कार्यान्वित झालेले आहेत.

जलजीवन मिशन कार्यक्रमातंर्गत जिल्ह्यासाठी 733 योजना मंजूर असुन, यापैकी 414 योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी सानुग्रह योजने अंतर्गत 2025-26 मध्ये अपघातात मृत्यू झालेल्या तसेच अपंगत्व आलेल्या जिल्ह्यातील एकुण 88 शेतकऱ्यांच्या वारसदारांना 1.76 कोटी रुपये सानुग्रह अनुदान मंजूर करण्यात आले आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांना चांगल्या आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी अंबड आणि घनसावंगी येथे 100 खाटांचे रुग्णालय रुग्ण सेवेसाठी सुरु होणार आहे. जिल्ह्यात बालविवाह रोखण्यासाठी चांगले काम झाले असुन, महिला व बालविकास विभागाला 152 बालविवाह रोखण्यात यश आले आहे.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत जिल्ह्यात ‘सक्षम जालना’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये जिल्ह्यातील 100 शाळांची निवड करण्यात आली आहे. जालना तालूक्यातील 10 शाळांमध्ये ‘पढो जालना’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. तसेच शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी व भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यातील 20 शाळांची ‘पीएम श्री शाळा’ मध्ये निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्याच्या क्रीडा धोरणाअंतर्गत जालना जिल्हा क्रीडा संकुलाच्या पहिल्या टप्प्यातील विकासकामे पूर्ण झाली असुन, दूसऱ्या टप्प्यातील विकासकामे प्रगतीपथावर आहेत. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालूक्याच्या ठिकाणी अत्याधुनीक सुविधा असलेले तालूका क्रीडा संकुल विकसीत करण्यात येत आहे. याद्वारे अद्ययावत क्रिडा सुविधा उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ अंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 1 हजार 650 बेरोजगार युवकांची शिकाऊ प्रशिक्षणार्थी म्हणुन निवड करण्यात आलेली आहे. राज्य शासनाच्या महत्वकांक्षी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेच्या माध्यमातून मागील वर्षी 325 तर यावर्षी 255 नवीन उद्योग उभे राहिले आहेत. तसेच जिल्ह्यातील निर्यातक्षम उद्योगांची क्षमतावृध्दीसाठी फेब्रूवारी-2026 मध्ये ‘IGNITE’ ‘महा एक्सपोर्ट कन्व्हेन्शन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 योजनेकरीता जिल्ह्यातील 50 उपकेंद्रासाठी 693 हेक्टर जमीन प्रदान केली आहे. या योजने अंतर्गत जालना जिल्ह्यात 17 ठिकाणी 84 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्यात 32 उपकेंद्राकरीता 152 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची उभारण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच केंद्र सरकार तर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘पीएम सुर्यघर मुफ्त बीजली योजने’ अंतर्गत मॉडेल सोलार व्हिलेज स्पर्धेचे आज उद्घाटन होत आहे.

राष्ट्रपिता महात्मा गांधी याच्या पुण्यतिथी निमित्त राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर कुष्ठरोग निवारण दिन साजरा करण्याबाबत केंद्रशासनाने निर्देश जारी केले आहेत. जिल्ह्यात ‘स्पर्श’ कुष्ठरोग जनजागृती अभियान अंतर्गत 30 जानेवारी रोजी ‘कुष्ठरोग निवारण दिन’ तसेच 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या पंधरवड्यात विविध आरोग्य शिक्षणाचे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. तसेच आज होणाऱ्या ग्रामसभेमध्ये ‘स्पर्श कुष्ठरोग जनजागृती मोहिम’ बाबत ‘कुष्ठरोग मुक्त गाव’ करुन भेदभाव समाप्त करुन, सन्मानाची वागणूक देण्याचे आवाहन केले. सार्वजनीक आरोग्य विभागामार्फत 1 ते 7 फेब्रुवारी, 2026 या कालावधीत  ‘पॉलिएटीव्ह केअर कार्यक्रम’ राबविण्यात येणार आहे.

इयत्ता बारावीची लेखी परीक्षा 10 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत तर इयत्ता दहावीची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या कालावधीत होणार असून, या परीक्षांमध्ये कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येणार आहे. या परीक्षांसाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून, विद्यार्थ्यांनी आनंददायी तसेच तणावमुक्त वातावरणात परीक्षा देण्याचे आवाहन ही पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी केले.

यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वांना महिला बालविकास विभागामार्फत  बालविवाह प्रतिबंध – बालविवाह मुक्त भारत शपथ देण्यात आली.

ध्वजारोहण कार्यक्रमानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते विविध लाभर्थ्यांना विविध लाभ व पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये पी.एम.ए.वाय घरकुल लाभार्थ्यांना चावी वाटप. ओबीसी महामंडळ व वसंतराव नाईक महामंडळ अंतर्गत ट्रॅक्टर व आयशर वाटप. पोलीस अधिक्षक कार्यालय श्री. भगवान बाळु नरोडे, पोलीस उप निरीक्षक पोलीस ठाणे अंबड यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक प्रदान करण्यत आले. तसेच राज्यस्तरीय चतुर्थ चरण पात्र विद्यार्थी चेतन सतिष हिवाळे, साहिल सुनिल रोजेकर, ओम शिवाजी सपकाळ, स्वराज संदिप नेमाने, प्रविण शिवाजी गावंदे, साई सोमिनाथ वरपे, साईराज मोहन सपकाळ, प्रथमेश संजय अवघडकर, आदित्य संजय फुके, सुमित विलास गिरी, साई विशाल पवार, साई सचिन श्रीवास्तव यांचा गौरव करण्यात आला. तसेच रोहन लक्ष्मण वाघमारे (तलवारबाजी), आदित्य आसाराम घुले  (बुध्दीबळ), एकनाथ बाळाजी सुराशे (सॉफ्टबॉल) यांना जिल्हा क्रीडा गुणवंत पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर श्रीमती करुण अच्युत मोरे (युवती), स्वामी विवेकानंद आश्रम किन्होळा ता. बदनापुर जि. जालना (संस्था) यांना जिल्हा युवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. उप प्रादेशिक परिवहन कार्यालय जालना यांच्या तर्फे घेण्यात आलेल्या रस्ता सुरक्षा विषयक प्रश्न मंजुषा मध्ये विशेष प्राविण्य मिळविलेले विष्णु राजेश मिठे, गौतम दिगंबर वाढेकर, अभिषेक अर्जुन लोणके, गोविंद परमेश्वर भोसले, प्रियंका संतोष पिठोरे,प्रियंका भगवान रोडे,करण केदारनाथ कोरडे,पुजा रामप्रसाद गवते, आदित्य ज्ञानदेव अंभोरे, सिध्दांत रामेश्वर शिंगरे या विद्यार्थ्यांचा पुरस्कार देवून गौरविण्यात आले. इन्स्पायर अवॉर्ड मानक स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या कु. साक्षी रविंद्र ना-हेडा  कु. आरुषी विजय काकरवाल तर डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम इंन्टरनॅशनल फा. यांचेवतीने स्नेहल कैलास पवार, कु. शबनम गुलाब बागवान, सार्थक तुपे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.  जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शहीद सैनिक श्री. किशोर पारवे हे युध्दजन्य कर्तव्य बजावतांना ऑपरेशन स्नो लेपर्डमध्ये वीर गती प्राप्त झाले. त्यांच्या अदम्य साहस व बलिदान सन्मानार्थ महाराष्ट्र शासन सैनिक कल्याण विभाग पुणे यांचेतर्फे पालकमंत्री यांचे हस्ते वीरपत्नी श्रीमती कविता किशोर पारवे यांना ताम्रपट प्रदान करुन गौरविण्यात आले. गोरक्षण पांजरपोळ, परभणी ॲग्रो टेक प्रा. लि. यांना महाराष्ट्र शुध्द देशी गोवंश सन्मान पुरस्काराने गौरविण्यात आले.

 प्रारंभी पोलीस दलाच्यावतीने राष्ट्रगीत व राज्यगीत सादर करण्यात आले व राष्ट्रध्वजास सलामी देण्यात आली. यानंतर पालकमंत्री यांनी पोलीस परेडचे निरीक्षण केले. यावेळी पोलीस, होमगार्ड, सैनिक शाळेचे विद्यार्थी, एनसीसीच्या विद्यार्थ्यांना सलामी देण्यात आली. विविध विभागांनी चित्ररथाद्वारे योजनांचे सादरीकरण केले. तसेच विविध शालेय विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे सादरीकरण केले.   

-*-*-*-*-*-*-


जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जालना जिल्ह्याच्या 359 कोटी 24 लाखांच्या प्रारूप आराखड्यास मंजुरी · पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेत जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न







जालना, दि.23 (जिमाका) : जिल्ह्याच्या सन 2026-27 यावर्षीच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या 359 कोटी 24 लाखांच्या प्रारूप आराखडयास आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मंजुरी दिली. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन तथा जालना पालकमंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली.

जालना जिल्हा नियोजन समितीची बैठक आज जिल्हा नियोजन भवन येथे पार पडली. आजच्या बैठकीला यावेळी खासदार कल्याण काळे, आमदार सर्वश्री राजेश राठोड, अर्जुन खोतकर, बबनराव लोणीकर, नारायण कुचे, संतोष दानवे, हिकमत उढाण, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी.एम., पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रमेश मिसाळ, निवासी उपजिल्हाधिकारी शशिकांत हदगल, जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जालना जिल्ह्याच्या 2026-27 च्या 778 कोटी 97 लाखाच्या मर्यादेतील आराखड्यात भरीव वाढ करण्याची शिफारस राज्यस्तरीय बैठकीत करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी सन 2025-26 च्या मंजूर आराखड्यातील 100 टक्के निधी खर्च करण्याचे निर्देश त्यांनी आज येथे दिले.

शासनाने घातलेली मर्यादा व प्रत्यक्ष मागणी यावरून जिल्ह्याचा 2026-27 चा नियोजनाचा आराखडा ठरणार आहे. या आराखड्यामध्ये जिल्ह्यातील यंत्रणेने प्रस्तावित केलेल्या मागणीप्रमाणे निधी मिळावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केले.

नियोजन विभागाने जिल्हा वार्षिक योजना  (सर्वसाधारण), अनुसूचित जाती उपायोजना, आदिवासी उपाययोजना, या तीन्ही घटकांना मिळून सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 438 कोटी 21 लाखांची आर्थिक मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. जिल्ह्यातील यंत्रणेने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत 729 कोटी 66 लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 76 कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी 2 कोटी 97 लाख असे एकुण 808 कोटी 63 लाखांची मागणी केली आहे. वित्त व नियोजन मंत्र्यांच्या बैठकीमध्ये आता जिल्ह्याच्या डीपीडीसीच्या अंतिम प्रारूपाला मान्यता मिळणार आहे. यामध्ये जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) साठी शासनाने 359 कोटी 24 लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 76 कोटी, आदिवासी उपयोजनेसाठी 2 कोटी 97 लाख रुपये आर्थिक मर्यादा केली आहे.

तर सन 2025-26 जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) चे 436 कोटी, अनुसूचित जाती उपयोजनेचे 76 कोटी, आदिवासी उपयोजनेचे 2 कोटी 97 लाख रुपयाचा निधी जिल्ह्यातील सर्व शाखांना मार्च अखेरपर्यंत खर्च करायचे आहेत. या निधीपैकी आतापर्यत केवळ 43.55 टक्के निधी खर्च झाला असून, जिल्हा यंत्रणेला तीन्ही योजनेतील उर्वरित निधी पुढील दोन महिन्यात खर्च करणे आवश्यक आहे. आतापर्यंत वितरित करण्यात आलेल्या 132 कोटी 72 लाख रुपयांपैकी जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत 46 कोटी 53 लाख, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी 10 कोटी 25 लाख, आदिवासी उपयोजनेसाठी 1 कोटी 02 लाख असे एकुण 57 कोटी 80 लाख रुपयाचा निधी खर्च झालेला आहे. वितरित झालेल्या तरतुदीच्या 43.55 टक्के निधी खर्च झाला आहे. तरी सर्व संबंधीत यंत्रणांनी उर्वरित दोन महिन्यात विविध विकासकामावर खर्च वेळेत करण्याच्या सूचना पालकमंत्री श्रीमती मुंडे यांनी यावेळी दिल्या.

तत्पूर्वी, आज पालकमंत्री महोदयांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. यामध्ये उर्वरित निधी येत्या दोन महिन्यात खर्च करावा, राहिलेल्या प्रशासकीय मान्यता वेळेत कार्यवाही पूर्ण करावी, वन विभागाने केलेली वृक्ष लागवड, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, जिल्हा परिषद  समाज कल्याण विभाग, आरोग्य केंद्र, रस्त्यांची कामे, लोप्रतिनीधींच्या मतदार संघातील कामे पूर्ण करण्यासाठी निधी मंजुरी या विविध विषयावर चर्चा करण्यात आली. यासोबतच केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांबाबत व जिल्ह्यातील अंमलबजावणीबाबत यावेळी अधिकाऱ्यांसोबत उपस्थित खासदार-आमदारांनी चर्चा केली.   

प्रारंभी पालकमंत्री पंकजा मुंडे यांना पुण्यातील अजिंक्य डी वाय पाटील विद्यापीठाच्यावतीने मानद डॉक्टरेट पदवी देवून सन्मानित करण्यात आले, त्याबद्दल आजच्या बैठीकीत सर्व लोकप्रतिनीधींनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून अभिनंदन केले.

बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन जिल्हा नियोजन अधिकारी सुचित कुलकुणी यांनी केले. यावेळी बैठकीस जिल्ह्यातील सर्व यंत्रणांचे प्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते.

-*-*-*-*-*-*-