जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा
जालना, दि. 10 (जिमाका) :- मुंबई येथील कुलाबा प्रादेशिक
हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात यलो अलर्ट जारी केला
असुन विजेच्या कडकडाटासह दि. 11 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर 2024 या कालावधीत हलक्या
ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे, तरी जिल्ह्यातील नागरिकांनी
दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मेघगर्जनेच्या वेळी, विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत
असतांना झाडाखाली किवा झाडांजवळ उभे राहु नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित
ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान
व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. विजेच्या सुवाहक
भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून
दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे
खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या
अधांतरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या तारांपासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या
जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके
दोन्ही गुडघ्याच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व
गारपिटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे.
शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल
विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान
होणार नाही याची काळजी घ्यावी. जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे. सर्व
नागरिकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य
ती दक्षता घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी
कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच जवळच्या तहसील कार्यालय, पोलिस ठाणे यांच्याशी
संपर्क साधावा. असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, आपत्ती
व्यवस्थापन प्राधिकरण, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
-*-*-*-*-
No comments:
Post a Comment