Wednesday, 28 May 2025

जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी

 



जालना, जिमाका, दि.28 : जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती साजरी करण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी रिता मैत्रावार यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हधिकारी नम्रता चाटे, तहसीलदार अनिल नव्हाते, नायब तहसीलदार श्री तायडे, नायब तहसीलदार तुषार निकम, सा.महसूल अधिकारी रवींद्र हेलगट, सा. महसूल अधिकारी अतुल केदार, दिनेश बेराड यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करून पुष्प अर्पण केले.

 

-*-*-*-*-*-*-

माजी सैनिक आणि अवलंबीतांना 30 मेपर्यत नोंदणी करण्याचे आवाहन

 

            

जालना, दि.28 (जिमाका) : सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य,पुणे यांचेमार्फत जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीरमाता, वीरपिता,अवलंबित आणि त्यांचे अनाथ पाल्य ज्यांची जिल्हा सैनिक कार्यालयात नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीरमाता, वीरपिता, अवलंबित आणि त्यांचे अनाथ पाल्यांचे महाराष्ट्र राज्य सैनिक कल्याण विभाग,पुणे याच्यांमार्फत सर्व डेटा डीजीटलाइझेशन तसेच संगणकीकरण करण्याचे काम सुरू आहे. यासाठी जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक, वीरमाता,     वीरपिता,अवलंबित आणि त्यांचे अनाथ पाल्य यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कोणत्याही सेवेचा लाभ घेण्याकरिता www.mahasainik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर दिनांक 30 मे, 2025 पर्यंत नोंदणी करणे अनिवार्य आहे. याकरिता 100 रूपये फी आकारणे बंद करण्यात आलेली आहे. याकरिता जिल्ह्यातील जास्तीत-जास्त माजी सैनिकांचे आणि विधवा पत्नींचे  जिल्हा सैनिक कार्यालयात मोबाईल क्रमांक आणि आधार क्रमांक उपलब्ध नाहीत अशा सर्वानी आपला मोबाईल क्रमांकासह आधार क्रमांक नावासहित 9284391660 या मोबाईल क्रमांकावर पाठवावा. तसेच वरील संकेतस्थळावर नोंदणी झाल्यानंतर प्राप्त झालेला फॉर्म देखील या कार्यालयास सादर करावा. अथवा जिल्हा सैनिक कार्यालय,जालना येथे दि. 30 मे, 2025 पर्यंत जमा करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, जिल्हा सैनिक कार्यालय, जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

 

-*-*-*-*-

गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉल वाटप योजनेअंतर्गत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 


        जालना, दि.28 (जिमाका) : जिल्ह्यातील गटई कामगारांना ऊन, वारा, पाऊस यापासून संरक्षण मिळावे आणि त्यांची आर्थिक उन्नती व्हावी यासाठी 100 टक्के अनुदानावर पत्र्याचे स्टॉल पुरविण्याची योजना समाज कल्याण विभागामार्फत राबविण्यात येते. या योजनेअंतर्गत लाभार्थ्याकडून सन 2025-26 या वर्षाकरिता अर्ज मागविण्यात  येत आहेत. इच्छूक लाभार्थ्यानी त्यांचे अर्ज सहायक आयुक्त, समाजकल्याण, जालना या कार्यालयात दिनांक 15 जून 2025 पर्यत सादर करावेत, असे आवाहन अनंत कदम, सहायक आयुक्त, समाज कल्याण, जालना यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.                                            

-*-*-*-*-

बदनापूर तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ आणि आमदार कुचे यांनी केली पाहणी

जालना, जिमाका, दि.28 : बदनापूर तालूक्यातील रोषणगाव महसूल मंडळात काल झालेल्या अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची आज जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि बदनापूर-अंबड विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी तालुका कृषि अधिकारी श्री. गोपाल गुजर, प्र. तहसिलदार श्री. तायडे आदींची उपस्थिती होती.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ आणि बदनापूर-अंबड विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांनी मौजे. बाजार वाहेगाव येथील शेतकरी नवनाथ भिमराव लांडगे यांच्या शेतातील अतिवृष्टीने ढासळलेल्या विहीरीची पाहणी केली. तसेच बाजार वाहेगावातील नदीला आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची देखील पाहणी केली. तसेच मौजे वाकुळणी येथील शेतकरी गणेश सुदामराव कोळकर यांच्या नुकसानग्रस्त डाळींब बागेची पाहणी केली. तसेच कडोळी येथील नाल्याची देखील पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ यांनी तहसिलदार बदनापूर आणि तालुका कृषि अधिकारी बदनापूर यांना वस्तुनिष्ठ पंचनामे करुन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच आमदार नारायण कुचे यांनी अतिवृष्टीने बाधित सर्व शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत शासनाकडुन उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन दिले. तसेच अतिवृष्टीमुळे खचलेल्या विहिरासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून तरतुद करण्याचे आश्वासन यावेळी दिले. यावेळी महसुल आणि कृषि विभागाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

 

*-*-*-*-





Friday, 23 May 2025

कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिम अंतर्गत राज्यस्तरावर जालना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रथम क्रमांकावर

 

      



 

जालना, दि.23(जिमाका) : महाराष्ट्र शासनाने क्षेत्रीय कार्यालयातील सुधारणा कार्यक्रमाच्या 100 दिवसीय कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील सर्व विभागातील जिल्हास्तरीय क्षेत्रीय कार्यालयाच्या कामकाजाचे मूल्यमापन भारतीय गुणवत्ता परिषद (क्युसीआय) यांचेकडून करण्यात आले होते. या मूल्यमापनामध्ये जालना जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राने राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे, ही बाब जिल्ह्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आहे.

 

100 दिवसीय कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे अंतर्गत जालना जिल्हा कार्यालयामार्फत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. शासन निर्णयानुसार, क्षेत्रीय कार्यालयांना 100 दिवसांचा 10 कलमी महत्वकांशी कृती कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले होते. या कृती कार्यक्रमांतर्गत पुढील मुद्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले संकेतस्थळाचा विकास व अद्ययावत माहिती उपलब्ध करणे, नागरिकांचे जीवनमान सुकर करण्यासाठी उपाययोजना, स्वच्छता व कार्यालयीन परिसराचे व्यवस्थापन, जनतेच्या तक्रारींचे वेळेवर व प्रभावी निराकरण, कार्यालयातील सुविधा व सोयींचा स्तर उंचावणे, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी प्रसार व प्रोत्साहन, क्षेत्रीय कार्यालयांना प्रत्यक्ष भेटी व आढावा, ई-ऑफिस प्रणालीची प्रभावी अंमलबजावणी, अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण, विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची अंमलबजावणी या सर्व घटकांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळेच या कार्यालयाने राज्यस्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले आहे.

 

या उल्लेखनीय यशासाठी कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनिषा वर्मा, नितीन पाटील, आयुक्त कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मुंबई, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उप आयुक्त, आयुक्तालय मुंबई, डी.डी.पवार, उप आयुक्त विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर विद्या शितोळे, यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जालनाचे सहायक आयुक्त गणेश चिमणकर यांच्या मार्गदर्शनाखाली भुजंग रिठे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी, सुरेश बहुरे, आत्माराम दळवी, डॉ. अमोल परिहार, अमोल बोरकर, प्रदिप डोळे, रविंद्र पाडमुख, विशाल जगरवाल, सुभाष पंडीत, उमेश कोल्हे, दिनेश उढाण, सोमेश्वर शिंदे, निर्मल बिडकर, दिपक पालवे, अमर तुपे यांचे सहकार्य लाभले आहे.

 

-*-*-*-*-

 

कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम मोहीमे मध्ये जालना उप प्रादेशिक परिवहन कार्यालय राज्यामध्ये द्वितीय

 


 

जालना, दि.23(जिमाका):  शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवून योजनांचा लाभ उपलब्ध करून देत शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम राज्यस्तरावर राबविण्यात आली. या मोहिमेतील दूसऱ्या टप्प्यात सर्वोत्कृष्ट कामगिरी बजावत उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना यांनी कार्यालयीन सुधारणा विशेष मोहिमे अंतर्गत राज्यात द्वितीय क्रमांक पटकाविला आहे.

राज्य शासनामार्फत प्रशासकीय कामकाजात गतीशिलता, पारदर्शकता आणि लोकाभिमुख सेवांचे वितरण यासाठी ‘100 दिवस कार्यालयीन सुधारणा कार्यक्रम’ राबविण्यात आला होता. यामध्ये कार्यालयीन कामकाजात नवकल्पना व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विहित वेळेत सेवा वितरण, ई-ऑफिसची अंमलबजावणी,
डिजिटलायझेशन व कागद विरहित कार्यालयीन कामकाज, नागरिकांच्या तक्रारींचे जलद निराकरण, कार्यसंस्कृती सुधारणा अंतर्गत प्रशिक्षण अशा विविध बाबींच्या अनुषंगाने मूल्यमापन करण्यात आले. या बाबींमध्ये
उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जालना यांनी उत्तम कामगिरी केली.

या उपक्रमासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी यांनी मर्यादित वेळेत विशेष काम करुन हे यश संपादन केल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रमोहन चिंतल यांनी सांगितले. 

-*-*-*-*-*-*-

लोकशाही दिनाचे 2 जुन 2025 रोजी आयोजन

 


 

  जालना दि.23 (जिमाका) : जिल्हास्तरीय लोकशाही दिन सोमवार दिनांक 2 जून 2025 रोजी सकाळी 10.00 ते दुपारी 12.00 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजन करण्यात आले आहे.  लोकशाही दिनात अर्जदाराने विहित नमुन्यातील अर्ज 15 दिवस अगोदर दोन प्रतीत सादर करणे आवश्यक आहे.  लोकशाही दिनासाठी अर्ज देताना संबंधित तालुक्यातील तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरीय लोकशाही दिनामध्ये अर्ज दिलेला असावा व तालुकास्तरीय लोकशाही दिनात एक महिन्यापेक्षा जास्त कालावधी होऊनदेखील कोणतीही कार्यवाही झालेली नसावी अशाच अर्जदारांनी टोकन क्रमांकाच्या पावतीसह अर्ज दोन प्रतीत सादर करावा. लोकशाही दिनामध्ये न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्वी, अपील, सेवाविषयक, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. तसेच तालुकास्तरीय लोकशाही दिनातील टोकन क्रमांकाची तहसिलदार यांच्या स्वाक्षरीची पोहोच पावती व त्यासाठी दिलेल्या मुदतीत व नमुन्यात ज्यांनी यापूर्वीच्या आवश्यक कागदपत्रासह अर्ज केले असतील त्यांना तक्रार मांडता येईल.  ज्यांनी यापूर्वी जिल्हास्तरावरील लोकशाही दिनी तक्रार अर्ज दिलेला आहे परंतु अद्याप कार्यवाही झालेली नाही, अशा तक्रारदारांनी पुन्हा अर्ज करु नयेत.  तसेच लोकशाही दिनात द्यावयाच्या अर्जाचा विहित नमुना http://jalna.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.

-*-*-*-*-

 

 

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतील तरतूदीमध्ये सुधारणा

 


 

जालना दि.23 (जिमाका) : राज्यातील शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित युवक-युवतींची वाढती संख्या  व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगाराच्या व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेऊन उद्योजकतेला चालना देणारी सर्जनशीलतेला कालानुरूप वाव देणारी सर्वसमावेशक मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)  ही योजना दिनांक 1 ऑगस्ट 2019 च्या शासन निर्णयान्वये राबविण्यात येत आहे. तसेच दिनांक 11 नोव्हेंबर, 2022 रोजीच्या शासन निर्णयाद्वारे सदर योजनेमध्ये सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.

या योजनेची अंमलबजावणी महाराष्ट्राच्या सर्व विभागात प्रभावीपणे व्हावी व योजनेअंतर्गत जास्तीत-जास्त युवक-युवतींना सहभाग घेऊन जास्तीत-जास्त यशस्वी उद्योजक निर्माण होण्याच्या दृष्टीकोनातून योजनेच्या शासन निर्णयामध्ये कालानुरुप बदल करणे आवश्यक होते. त्याअनुषंगाने मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय सुकाणू समितीने केलेल्या शिफारशीनुसार, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतील तरतुदींमध्ये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात आलेल्या आहेत.

यामध्ये प्रकल्पाची कमाल मर्यादा वाढली असुन, आता उत्पादन क्षेत्रातील प्रकल्पांसाठी 11 कोटी आणि सेवा व कृषी पूरक व्यवसायांसाठी रु.50 लाख पर्यंत कर्ज मिळवण्याची संधी प्राप्त झाली आहे. खेळत्या भांडवलाची मर्यादा देखील वाढली असुन यामध्ये सेवा उद्योगांसाठी आता प्रकल्प खर्चाच्या 60% आणि उत्पादन उद्योगांसाठी 40% पर्यंत खेळत्या भांडवलासाठी निधी उपलब्ध होणार आहे. नवीन व्यवसायांचा समावेश कुक्कुटपालन, अंडी उबवणी केंद्र, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, हॉटेल ढाबा (शाकाहारी/मांसाहारी), होम-स्टे. क्लाऊड किचन, जलक्रीडा, मासेमारी, प्रवासी वाहतुकीकरिता बोट व्यवसाय या योजनेतंर्गत पात्र असतील. तसेच शैक्षणिक पात्रतेत देखील शिथिलता देण्यात आली असून, आता 10 लाखांवरील उत्पादन प्रकल्पांसाठी आणि 5 लाखांवरील सेवा व कृषी पूरक व्यवसायांसाठी आता फक्त 8 वी पास असणे आवश्यक असणार आहे. या योजनेकरीता आता वयोमर्यादेचे बंधन राहणार नाही. आता 18 वर्ष पूर्ण झालेल्या कोणत्याही स्थानिक रहिवाशाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच निवासी/ऑनलाईन उद्योजकीय प्रशिक्षण निवड करण्याची मुभा देखील यामध्ये असणार आहे.

 

सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता प्राप्त 1 हजार 300 प्रकरणांचे उद्दिष्ट पूर्तीसाठी ग्रामीण व शहरी तरुणांनी जास्तीत-जास्त अर्ज योजनेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरावे. (www.maha-cmegp.gov.in) तसेच जिल्ह्यातील सर्व बँक व्यवस्थापक यांनी छाननी करून संकेतस्थळावर प्राप्त झालेल्या कर्ज प्रस्तावांना त्वरित कर्ज मंजुरी देऊन उद्दिष्ट पूर्तीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक योगेश सारणीकर यांनी केले आहे.

-*-*-*-*-

 

Thursday, 22 May 2025

राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जालना जिल्हा दौरा

 


 

जालना दि.22 (जिमाका) : महाराष्ट्र राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे. श्री. सावकारे यांचे शुक्रवार, दि. 23 मे, 2025 रोजी सकाळी जालना रेल्वेस्थानक येथे आगमन होणार असून, शासकीय विश्रामगृहाकडे रवाना होतील. सकाळी 5.45 वाजता शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. सकाळी 10.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथून भारतीय जनता पक्ष कार्यालयाकडे प्रयाण करतील. सकाळी 11.00 वाजता भारतीय जनता पक्ष कार्यालय येथे बैठकीस उपस्थित राहतील. तसेच दुपारी 2.30 वाजता शासकीय वाहनाने जालना येथून भुसावळ, जि. जळगावकडे प्रयाण करतील.

-

*-*-*-*-

शेतकऱ्यांनी ‘सस्ती अदालत’ उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन · प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी तालुकास्तरावर सस्ती अदालतीचे आयोजन

 

 

  जालना दि.22 (जिमाका) : विभागीय आयुक्त यांच्या परिपत्रकानुसार मराठवाडा विभागातील आठ जिल्ह्यातील विभागीय आयुक्त कार्यालयास भेट देणाऱ्या नागरिकांच्या बहुतांश तक्रारी या शेतरस्ते, पाणंद रस्ते यावरील अतिक्रमाणाबाबत असल्याचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांच्या निदर्शनास आले होते. त्यानुसार विभागातील सर्व संबंधित नागरिकांना विभागीय आयुक्त यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी वेबिनारद्वारे संवाद साधला. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी सहभाग व शेतरस्ते अतिक्रमण मुक्त करुन देण्याची मागणी केली. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 मधील तरतुदी, मामलेदार कोर्ट अधिनियम 1906 मधील तरतुदी आणि वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रक तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या रस्त्यांची प्रलंबित असलेली प्रकरणे निकाली काढणेबाबत निर्देशाच्या अनुषंगाने विभागात शेतरस्ते/पाणंद रस्ते अतिक्रमणाबाबत प्रभावी कार्यवाही करणे गरजेचे आहे. तसेच सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांच्या निर्देशानुसार विभागस्तरावर व जिल्हास्तरावर वेळोवेळी प्रलंबित न्यायालयीन प्रकरणात तडजोड करून जलद गतीने प्रकरणाचा निपटारा करता सामान्य जनतेस न्याय मिळावा यासाठी वेळावेळी लोक अदालतीचे आयोजन करण्यात येते.

      त्याच धर्तीवर सामान्य शेतकऱ्यांना अतिक्रमित शेतरस्ते/पाणंद रस्ते मोकळे करुन लवकर न्याय मिळावा व प्रकरणाचा तातडीने निपटारा व्हावा, यासाठी प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी तालुकास्तरावर सस्ती अदालत आयोजित करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने शुक्रवार, दि. 23 मे, 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजेपर्यंत या कालावधीत सस्ती अदालतीचे कामकाज सुरु राहणार आहे. जिल्ह्यातील सर्व तालूक्यात सस्ती अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. तरी गरजु शेतकऱ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह संबंधीत तालुक्याचे तहसिलदार यांच्याशी संपर्क साधून या उपक्रमाचा जास्तीत-जास्त सामान्य, गरजु शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

जिल्ह्याला यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता नागरिकांना दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


 

जालना दि.22 (जिमाका) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात दि. 22 मे, 2025 रोजी यलो  (Yellow) अलर्ट जारी केला असुन, जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी 40-50 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच दि. 23 मे, 2025 रोजी ढगांच्या गडगडाटासह हलका पाउस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. दि. 24 व 25 मे, 2025 या कालावधीत विजेच्या कडकडाटासह हलका व मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

            मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल/सायकल यांचेपासून दूर रहावे,मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणाऱ्या / लोंबणाऱ्या तारांपासून दूर रहावे. वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा. अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतकऱ्यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी,जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधाण्याचे आवाहजन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-

 

 

Wednesday, 21 May 2025

विद्यार्थ्यांना विविध प्रमाणपत्र वेळेत उपलब्ध होण्यासाठी ‘दाखला आपल्या दारी’ उपक्रम

 


 

जालना दि.21 (जिमाका) : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 या कायद्याची अंमलबजावणी होण्यासाठी इयत्त 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी लागणारे आवश्यक प्रमाणपत्रे विहित वेळेत मिळण्यासाठी दाखला आपल्या दारी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. नुकतेच इयत्ता 10 वी उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांना पुढील प्रवेशासाठी लागणारे आवश्यक प्रमाणपत्रे उदा. वय अधिवास व रहीवास प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, उन्नत गटात मोडत नसल्याचे प्रमाणपत्र, रहीवासी प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना वेळेत मिळण्यासाठी व प्रवेश सुरु झाल्यावर होणारी संभाव्य गर्दी टाळण्यासाठी दाखला आपल्या दारी  हा उपक्रम जिल्ह्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत दि. 26 ते 27 मे, 2025 पर्यंत राबविण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी सा. प्र. यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.   

-*-*-*-*-

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा

 



 

जालना,दि.21(जिमाका):  दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात  निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनाची शपथ घेण्यात आली.

यावेळी अधिकारी-कर्मचाऱ्यांना दहशतवाद व हिंसाचारविरोधी दिनाची शपथ देण्यात आली. यावेळी अधिकारी तसेच कर्मचारी यांची उपस्थिती होती.

-*-*-*-*-

अनुसूचित जाती व नवबौध्द घटकाकरिता मिनी ट्रॅक्टरसाठी स्वयंसहाय्यता बचत गटांना 31 मे पर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

 


जालना दि.21 (जिमाका) : अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांना 9 ते 18 अश्वशक्तीचे मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने 90 टक्के अनुदानावर वाटप करण्यात येतात.

सन 2025-26 या आर्थिक वर्षातील सदर योजनेतंर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील पुरुष व महिला स्वयंसहाय्यता बचतगटांकडुन अर्ज मागविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गटांनी  सहायक आयुक्त, समाज कलयाण, जालना (डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन जालना) कार्यालयात सुट्टीचे दिवस वगळून कार्यालयीन वेळेत दि.31 मे 2025 रोजी पर्यंत प्रस्ताव मागविणेबाबत  सहायक आयुक्त, समाजकल्याण यांनी आवाहन केले आहे.

-*-*-*-*-*-

माय भारत योजनेद्वारे नागरी संरक्षण स्वयंसेवक नोंदणी सुरु

 


  जालना दि.21 (जिमाका) :  माय भारत, भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, (नवी दिल्ली ) अंतर्गत नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी देशभरातील तरुणांना सक्रियपणे एकत्रित केले जात आहे. हा देशव्यापी उपक्रम तरुण नागरिकांना राष्ट्रीय कार्यात सहभागी करून घेण्याचा आणि विशेषतः आणीबाणी व संकटाच्या वेळी महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न करत आहे. नैसर्गिक आपत्ती, अपघात, सार्वजनिक आणीबाणी आणि इतर अनपेक्षित परिस्थितीत नागरी प्रशासनास सहकार्य करू शकणारे एक प्रशिक्षित, प्रतिसादक्षम व लवचिक स्वयंसेवक दल तयार करणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे. सद्याची परिस्थिती आणि वाढत्या सुरक्षा चिंता लक्षात घेता, एक मजबूत समुदायाधारित प्रतिसाद यंत्रणा उभारण्याची निकड आहे. नागरी संरक्षण स्वयंसेवक स्थानिक प्रशासनाला बचाव व निर्वासन, प्रथमोपचार अशा विविध सेवा देण्यामध्ये मोलाची मदत करतात. नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळः https://mybharat.gov.in नोंदणी प्रक्रिया सोपी आणि सर्वांसाठी खुली आहे. तरुणांनी पुढे येऊन या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर यांनी केले आहे.

-*-*-*-*-

लेख पावसाळयात विजांपासून रक्षण

 

                                                                

 


 

भारतात जून महिन्यात मान्सुन ऋतूचे आगमन होते. यावेळी शेतकरी आपल्या शेतीच्या मशागतीला सुरुवात करतात. शेतमजूरही शेतीच्या विविध कामात व्यस्त होतात. या कालावधीत वादळ आणि वीजेच्या कडकडाटसह पावसाला सुरुवात झाल्यास शेतावर काम करणारे शेतकरी-शेत मजूर आणि इतरांना नैसर्गिक आपत्तींना तोंड द्यावे लागते. दरवर्षी वीज पडून शेकडो नागरिकांना आपले प्राण गमवावे लागत होते. विशेषतः शेतकरी, मेंढपाळ यांना शेतात, जंगलात उघड्यावर वीज, वारा यांचा सामना करावा लागतो.  या पावसाळ्यात पडणाऱ्या वीजेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सूचविलेल्या गोष्टींची खबरदारी घेतल्यास विजेच्या आपत्तीला तोंड देता येऊ शकते. तसेच विजेपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी सुरक्षितता कशी  बाळगली पाहिजे हे आपण बघू या.

शेतात काम करीत असतांना वीजा कडाडत असल्यास शेतातील घराचा आसरा घ्यावा. पाण्यात असल्यास तात्काळ पाण्याबाहेर यावे. एखाद्या झाडाजवळ असल्यास झाडाच्या उंचीपेक्षा झाडापासून दुप्पट अंतरावर उभे राहावे. ओल्या शेतात रोपे लावण्याचे व अन्य काम करणाऱ्या व्यक्ती किंवा तलावात काम करीत असलेल्या व्यक्तीनी तात्काळ कोरड्या किंवा सुरक्षित स्थळी जावे. शेतामध्ये काम करीत असतांना सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला नसेल तर शक्यतो जिथे असेल तिथेच रहावे. शक्य झाल्यास पायाखाली लाकूड, प्लॅस्टिक, गोणपाट सारख्या वस्तू अथवा कोरडा पाला पाचोळा ठेवावा. दोन्ही पाय एकत्र करुन गुडघ्यावर दोन्ही हात ठेवून डोके जमिनीकडे झुकवावे मात्र डोके जमिनीवर ठेऊ नये.

            शेतात काम करतांना शेतकरी हे विविध कृषी औजारे हाताळत असतात. अशावेळी धातुपासून बनविलेल्या वस्तू यंत्र इत्यादीपासून दूर रहावे. गावाभोवती किंवा शेत, आवार, बाग-बगीचा आणि घर यांच्याभोवती तारेचे कुंपण घालू नये. कारण ते वीजेला सहजपणे आकर्षित करीत असते. धातूची दांडी असल्यास छत्रीचा उपयोग करु नये. वीजेच्या खांबाजवळ थांबू नये किंवा उभे राहू नये. तसेच झाडाखाली उभे राहू नये. उंच जागेवर झाडावर चढू नये. वीज वाहक असलेल्या रेडियेटर, स्टोव्ह, मेटल, लोखंडी पाईप आदी वस्तूपासून दूर रहावे. वीजा कडाडत असल्यास विद्युत उपकरणे बंद ठेवून शक्यतो घरातच रहावे, बाहेर पडू नये. पाण्याचे नळ, फ्रिज, टेलीफोन आदी वस्तूंना अशावेळी स्पर्श करु नये. तसेच वीजेपासून चालणाऱ्या यंत्रापासूनही दूर रहावे. कपडे वाळविण्यासाठी तारेचा वापर न करता, सुतळी अथवा दोरीचा वापर करावा.

            कोसळणाऱ्या वीजेपासून संरक्षण करण्यासाठी मजबूत असलेले पक्के घर हे सर्वांत सुरक्षित ठिकाण आहे. शक्य असल्यास आपपल्या घरी वीज वाहक यंत्रणा बसवावी. टेलीफोन आणि विजेचे खांब किंवा टेलीफोन/टेलीव्हिजन टावर यापासून दूर रहावे. आपल्या घराशेजारी किंवा शेत जमिनीच्या आसपास कमी उंचीची झाडे लावावी.  

मोठ्या प्रमाणात वीजा चमकत असल्यास किंवा कडकडाट सुरु असल्यास प्लग जोडलेली उपकरणे हाताळू नये. दूरध्वनीचा वापर अशावेळी करु नये. दोन चाकी वाहन, सायकल, ट्रक, ट्रॅक्टर किंवा नौका यावर असल्यास तात्काळ उतरुन सुरक्षित ठिकाणी जावे. अशा परिस्थितीत वाहनातून प्रवास करु नये. एखाद्याच्या शेतावर किंवा घराशेजारी उंच वृक्षाचे खोड अथवा फांदीवर तांब्याची एक तार बांधून तिचे दुसरे टोक जमिनीत खोलवर गाडून ठेवावे. म्हणजे हे झाड सुरक्षित होईल. वाहनातून प्रवास करत असल्यास वाहनातच रहावे. वाहनाच्या बाहेर थांबणे आवश्यक असल्यास धातुचे कोणतेही उपकरण हातात बाळगू नये. जंगलात गेले असल्यास कमी उंचीच्या व दाट झाडांचा आसरा घ्यावा. वृक्ष दलदलीची ठिकाणे अथवा पाण्याचे स्त्रोतापासून शक्यतो दूर रहावे किंवा आकाशाखाली राहण्यापेक्षा लहान झाडाखाली आसरा घ्यावा. मोकळ्या आकाशाखाली राहणे आवश्यक असल्यास खोलगट ठिकाणी रहावे. एकाच वेळी जास्त व्यक्ती एकत्र राहू नये. दोन व्यक्ती असल्यास किमान त्यांचात 10 ते 15 फुट अंतर असणे आवश्यक आहे. पोहणारे किंवा मच्छिमारी करणाऱ्यांनी अशावेळी तात्काळ पाण्यातून बाहेर यावे.

 

विजेबाबत काही काल्पनीक समज आणि वास्तव 

 

समजूत : वीज एकाच ठिकाणी दुस-यांदा कधीही पडत नाही. 

वास्तव : निर्जन स्थळी, उंच इमारतीवरील कळसावर वीज वारंवार कोसळते, जिथे वीज पडण्याची शक्यता जास्त असते, अशा जागा वादळी हवामानात टाळयाव्यात.

समजूत : पाऊस पडत नाही व ढगाळ हवामान नसेल, तर आपल्यावर वीज पडणार नाही.

वास्तव : वीज जवळ जवळ 5 कि. मी. अंतरावर सुध्दा पडू शकते. त्यामुळे हवामान ढगाळ नाही, पाऊस नाही, तरीही वीज पडू शकते, वज्राघात (जास्त ताकदीची वीज) कधी कधी 20-25 किमी अंतरावर सुध्दा पडू शकते. अगदी दुर्मिळ प्रसंगी वीज 80 कि.मी. अंतरावर देखील पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत.

समजूत : चार चाकी वाहनात असतांना रबर टायरमुळे विजेपासून संरक्षण होते.

वास्तव : वीज टायरपासून 2 इंच दुरच राहते हे खरे आहे. पण खरे पाहता, संरक्षण होण्यास टायर बरोबरच धातूचे छप्पर व बाजूमुळे मदत होते. मोटरसायकल, सायकल, उघड्या टपाची चारचाकी वाहने, फायबर ग्लास, प्लॅस्टीकचे कवच असलेली चारचाकी वाहने यांना विजेपासून तसे संरक्षण मिळत नाही. शेतावरील ट्रॅक्टर ट्रॉली यांना जर छप्पर नसेल, तर त्यांनाही तसे संरक्षण मिळत नाही. पण त्यांना छप्पर असेल, तर ती वाहने सुरक्षित राहतात.

समजूत : ज्याच्या अंगावर वीज पडली आहे, ती व्यक्ती विद्युतभारीत असते आणि तिला स्पर्श केल्यास आपल्याला सुध्दा विजेचा झटका बसतो.

वास्तव : मानवी शरीर वीज साठवून ठेवू शकत नाही. त्यामुळे वीजबाधित व्यक्तीला स्पर्श करणे वा त्या व्यक्तीला प्राथमिक उपचार करणे, यात मदत करणाऱ्या व्यक्तीला कसलाही धोका नसतो. वरील कल्पित समज अत्यंत चुकीचा आहे. अशा अपसमजामुळे सीपीआर किंवा कृत्रिम श्वासोच्छवास असे प्राथमिक उपचार दिले गेलेले नाहीत. तर एखादी व्यक्ती वाचण्याची 90 टक्के शक्यता असूनसुध्दा ती मृत्युमुखी पडू शकते.

समजूत : जर पावसाळी वादळी हवामानात सापडलात, तर झाडाखाली आश्रय घ्यावा.

वास्तव : वीज पडून मृत्युमुखी पडण्याची जी प्रमुख कारणे आहेत, त्यात झाडाखाली थांबलेल्या लोकांचा दुसरा नंबर लागतो.

समजूत : पावसाळी हवामानात मी घरातच राहीलो, तर मी सुरक्षित आहे.

वास्तव : पावसाळी/वादळी हवामानात घरात राहणे हे निश्चितच चांगले आहे, पण पूर्ण सुरक्षित आहे असे नाही. वीज-प्रवाह ज्याच्यातून वाहू शकतो, अशा गोष्टी असुरक्षित आहेत. उदा. बाहेरुन घरात येणारी ओली पाऊलवाट, टेलिफोनच्या-टिव्हिच्या-विजेच्या तारा, विजेची उपकरणे, तसेच नळ (अगदी प्लॅस्टिकचे नळ-ज्यातून पाणी वाहत असते). लोखंडी दारे, खिडक्या इत्यादी, विजेचा कडकडाट होत असताना खिडकीजवळ उभे राहणे धोकादायक असते. त्यापेक्षा खोलीत आतील भागात राहणे जास्त सुरक्षित असते.

समजूत : मैदानी खेळ चालू असतांना विजेचा कडकडाट झाला, पाऊस आला, तरी आसरा घ्यायच्या ऐवजी खेळ संपेपर्यंत खेळत राहिले पाहिजे. धातूनिर्मित वस्तु, अंगावरील धातूचे दागिने, घड्याळ, पाठीवरील पिशव्या विजेला आकर्षित करतात.

वास्तव : मैदानी खेळात वीज पडून मृत्युमुखी पडणे/जखमी होणे ह्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. आयुष्यापेक्षा कुठलाही खेळ महत्त्वाचा नसतो. मैदानी खेळ खेळणाऱ्या व्यक्तीनी कडाडणाऱ्या विजेपासून संरक्षण मिळवण्यासाठी आधीच एक योजना बनवावी आणि ती सर्वांना माहिती करुन द्यावी. त्याप्रमाणे वागणे बंधनकारक करावे. वरील हवामानात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर सुरक्षित जागेत त्वरित आसरा घ्यावा, लहान मुलांचे संरक्षण करणे, ही मोठ्याची जबाबदारी आहे, हे विसरु नये.

समजूत : धातूनिर्मित वस्तु, अंगावरील धातूचे घड्याळ, पाठीवरील पिशव्या विजेला आकर्षित करतात.

वास्तव : उंच, टोकदार आणि एकाकी जागा ह्यांच्यावर वीज पडणे ह्याची शक्यता जास्तीत-जास्त असते. त्यामुळे धातूनिर्मित वस्तू असल्या तरी काही फरक पडत नाही. डोंगर जरी दगडा-मातीचे असले, तरी त्यावर दर वर्षी अनेकदा वीज कोसळते. विजेचा कडकडाट सुरु झाला तर प्रथमतः चांगले संरक्षण मिळेल असा आसरा विनाविलंब घ्यावा. अंगावरील दागिने काढण्यात वेळ घालवू नये किंवा जिथे नीट संरक्षण मिळणार नाही, अशी जागा टाळावी. धातू विजेला जरी आकर्षित करत नसेल, तरी पण ज्यांची लांबी धातूनिर्मित वस्तू (तारेची कुंपणे, कठडे, वाहने इ.) धोकादायक असतात, त्यापासून दूरच राहवे. वीज जर कोसळली, तर अशा वस्तू वीज भारवाहक असल्याने ती प्रवाहित वीज अगदी 100 मीटर अंतरापर्यंत येऊन एखाद्या व्यक्तीला मृत्युदंड देवू शकते.

समजूत : वादळी हवामान, विजा कडकडत असतांना जर एखादी व्यक्ती त्यात अडकली, तर जमिनीवर लोटांगण घालणे हे सुरक्षित. जर वीज पडण्याची शक्ता असेल, तर टोकदार सुळक्याच्या जवळ 45 च्या शंकुक्षेत्रात पोहोचल्याने वीजक्षतीपासून संरक्षण मिळते.

वास्तव : ही अगदी कालबाह्य व पूर्ण चुकीची समजूत आहे. खरे पाहता जमिनीवर बसावे, दोन्ही गुडघे एकत्र करून त्यात डोके खुपसावे आणि दोन्ही हातांनी पायांना मिठी मारून बसावे, जमिनीवर वीजप्रवाह वाहू लागल्यास तो 30 मीटर पर्यंतसुध्दा वाहतो आणि तो धोकादायक असू शकतो. जरी जमिनीवर झोपल्याने पडणाऱ्या विजेपासून संरक्षण मिळण्याचे प्रमाण वाढते, ही गोष्ट चांगली, तरी जमिनीवरुन प्रवाहित विजेचा धोका वाढतो, ही गोष्ट वाईटच. त्यामुळे कमीत-कमी उंचीवर असणे व जमिनीशी कमीत-कमी स्पर्श असणे, ह्याची सांगड घालायची असेल, तर वरील कृती करणे, हेच जास्त सुरक्षित. खरे पाहता, घराबाहेर जाताना वादळी हवामान टाळणे हेच महत्त्वाचे ठरते. हा उपाय अगदी शेवटचा.

समजूत : जर वीज पडण्याची शक्यता असेल, तर टोकदार सुळक्याच्या जवळ 45 च्या शंकूक्षेत्रात पोहोचल्याने वीजक्षमतेपासून संरक्षण मिळते.

वास्तव : "शंकुक्षेत्र संरक्षण" हा समज चुकीचा आहे. उंच इमारती, सुळके ह्यांच्यावर वीज पडण्याची जास्तीत-जास्त शक्यता असते, तरीही त्याच्या जवळपास असणाऱ्या व्यक्ती, वस्तू यावर वीज पडणारच नाही असे नाही. त्यावरही वीज पडू शकते. शिवाय उंच इमारती, सुळके ह्यांच्यावर वीज पडली, तर त्याच्या 30 मीटरच्या परिघात असलेल्या व्यक्तीवर पण त्याचा आघात होऊ शकतो, आणि जर वीज ज्यावर पडली असते, त्या वस्तूला स्पर्श झाला किंवा वीजस्फोटाच्या परिघात जरी एखादी व्यक्ती असेल, तरी मृत्युदंड निश्चितच, त्यामुळे हे लक्षात घ्यावे की, विजेचा कडकडाट होत असतांना बाहेर जाणे टाळणे, हेच इष्ट. वीजप्रपात हा कधीही तथाकथित "शंकुक्षेत्रात" होऊ शकतो.

वीज पडून मृत्यू होण्याची भारतातील आकडेवारी फार मोठी आहे. दरवर्षी शेकडो लोक अशाप्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे आपले प्राण गमावतात. बऱ्याच घटनांमध्ये जागरुकता नसल्यामुळे मृत्यू होतात. अशा वेळी वरील स्वरक्षण पध्दतीचा अवलंब केल्यास वीजेपासून स्वत:चे व इतरांचे संरक्षण करण्यास नक्कीच मदत होईल.

 

 

जिल्हा माहिती कार्यालय

जालना

 

 

Monday, 19 May 2025

निवृत्तीवेतनधारकांनी ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदेशास बळी पडू नये

 


जालना, दि.19(जिमाका): निवृत्तीवेतन सुरु करणे, निवृत्तीवेतन बंद करणे, निवृत्तीवेतन फरक अदा करणे अथवा अतिरिक्त रक्कम वसूल करण्याच्या अनुषंगाने राज्यातील कोषागार कार्यालयामार्फत फोनद्वारे/मोबाईलद्वारे निवृत्तीवेतनधारकांना कळविले जात नाही. तसेच व्हॉट्ॲपद्वारे अथवा इतर सोशल मिडियावरुन निवृत्तीवेतन बंद होऊ नये, याकरिता लिंक ओपन करुन फॉर्म भरण्याबाबतही कळविले जात नाही. तसेच कोषागार कार्यालयामार्फत कोणत्याही कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकाच्या घरी पाठविले जात नाही. कोषागारमार्फत करण्यात येणाऱ्या सर्व व्यवहारांकरीता पत्रव्यवहार केल्या जातो. सर्व निवृत्तीवेतनधारकांना आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी फोन पे/गुगल पे/ ऑनलाईन रक्कम भरण्याचा अथवा ऑनलाईन फॉर्म भरण्याच्या संदेशास बळी पडू नये. अशा प्रकारे दुरध्वनीद्वारे /मोबाईलद्वारे संदेश प्राप्त झाल्यास जिल्हा कोषागार कार्यालयाशी तातडीने संपर्क साधाण्याचे आवाहन कोषागार अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा, पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

 


 

जालना दि.19 (जिमाका) : प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्हयात दि. 19 मे व 22 मे 2025 रोजी यलो  (Yellow) अलर्ट जारी केला असुन तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याचा वारा (ताशी 40-50 कि.मी.प्र.ता. वेगाने) हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच 23 मे 2025 रोजी ढगांच्या गडगडाटासह हलका पाउस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनातर्फे जिल्ह्यातील नागरीकांना खालीलप्रमाणे दक्षता घेणेबाबत आवाहन करण्यात येत आहे.

            मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. वीजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व वीजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा, ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल / सायकल यांचेपासून दूर रहावे,मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत/दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विदयुतवाहिनी अथवा ट्रॉन्सफोर्मजवळ थांबू नये. सर्व प्रकारच्या अर्थातरी लटकणा-या / लोंबणा-या तारांपासून दूर रहावे.वीजा चमकत असताना मोकळ्या जागेवर असल्यास सुरक्षेसाठी गुडघ्यावर बसून हाताने आपले कान झाकावे व आपले डोके दोन्ही गुडघ्यांच्यामध्ये झाकावे, जमीनीशी कमीतकमी संपर्क असावा.अवकाळी पाऊस व गारपीटीमुळे शेतीमालाचे नुकसान टाळण्यासाठी शेतकरी बांधवांनी वेळीच नियोजन करावे. शेतक-यांनी शेतमाल सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावा. बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी आणला असेल किंवा त्याप्रमाणे नियोजन केले असेल, तर सदर मालाचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी,जनावरांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे.

सर्व नागरीकांनी वादळी वारे, वीज पासून स्वतः सह जनावरांचे संरक्षण होईल याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, आपत्कालीन परिस्थितीत जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना 02482-223132 वर तसेच नजीकचे तहसील कार्यालय, पोलीस स्टेशन यांचेशी संपर्क साधाण्याचे आवाहजन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण गणेश महाडिक यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

-*-*-*-*-*-*-

 

Friday, 16 May 2025

विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बैठकीत घेतला विविध विषयांचा आढावा

 





जालना, दि.16(जिमाका): विधान परिषदेच्या उपसभापती श्रीमती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी आज येथील शासकीय विश्रागृहात आयोजित आढावा बैठकीत जालना जिल्ह्यातील विविध विषयांचा आढावा घेवून प्रशासनाला महत्त्वाचे निर्देश दिले.

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अवकाळी पाऊस, महिला अत्याचार, पाणी टंचाई व ऊसतोड आणि घरकाम कामगार आदी विषयांचा संबंधीत विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला. यावेळी बैठकीस जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्र. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी, जिपचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीष बनसोडे, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक,  महिला बालविकास अधिकारी कोमल कोरे, सार्वजनीक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती पवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री. कापसे आदींची उपस्थिती होती.

ऊसतोड कामगार महिलांसाठीच्या योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेतांना श्रीमती डॉ गोऱ्हे म्हणाल्या की, ऊसतोड महिला कामगारांच्या आरोग्य विषयक सर्वेक्षणाची आवश्यकता असल्याचे सांगितले. नोंदणी झालेल्या ऊसतोड कामगारांना नोंदणी कार्डचे वितरण करावेत. तसेच शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील घरकाम करणाऱ्या कामगारांचे सर्वेक्षण करुन त्यांची माहिती संकलीत करावी. केवळ मुलींची माता असल्याने नाकारण्यात येणाऱ्या मातांना मदत करण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्यात बालविवाहाच्या बाबतील चांगले काम झाले आहे. परंतू हे प्रमाण कमी करण्यासाठी गावपातळीवर जनजागृती होणे आवश्यक आहे. जिल्हा प्रशासनाने समाजसेवी संस्थांना या मोहिमेत सहभागी करून घ्यावे. तसेच पॉक्सो कायद्यांतर्गत येणाऱ्या प्रकरणांतील पीडित मुलींना महिला विषयक योजनांची माहिती मिळण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच या मुलींचे पुनर्वसन व सशक्तीकरणांवर भर देण्यात यावा. पोलीस विभागाने तयार केलेल्या मुलांसाठी जागरुकता पुस्तीकांचे समाज माध्यम आणि बचत गटांमार्फत जनजागृती करावी. मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना अंतर्गत महिलांचे ग्रुप तयार करुन त्यांच्यामार्फत महिलां विषयक कायद्यांचा प्रसार करावा. जिल्ह्यातील बेपत्ता मुलींबाबत तपास वेगाने पूर्ण करावा. तसेच अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले. जिल्ह्यातील रिक्त पोलीस पाटलांची पदे भरण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी. तसेच जिल्ह्यात बालस्नेही पोलीस स्टेशन सुरु करवायचे असल्यास त्याचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना ही यावेळी उपसभापती श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.

मागील काही दिवसात राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस झाला असून, जालना जिल्ह्यात देखील अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे.  प्रशासनाने सर्व नुकसानींचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना मदत मिळेल यासाठी प्रयत्न करावे. तसेच पावसाळ्यात वीज पडून अनेक नागरिकांचा मृत्यू होतो. याकरीता जिल्ह्यात महत्वाच्या ठिकाणांवर वीज नियंत्रक उभारण्याचे निर्देश श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी दिले.

जालना जिल्ह्यातील पाणी टंचाईचा आढावा घेतांना श्रीमती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या की, पिण्याच्या पाण्याची समस्या मोठी असून, नागरिकांची मागणी येताच पिण्याचे पाणी उपलब्ध होण्यासाठी तात्काळ योग्य नियोजन व उपाय योजना करण्याचे निर्देश ही उपसभापती श्रीमती डॉ. गोऱ्हे यांनी दिले.

यावेळी बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, प्र. पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी आणि महिला बालविकास अधिकारी कोमल कोरे यांनी सादरीकरणांद्वारे माहिती सादर केली. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे अधिकारी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती.

 

****

21 मे रोजी प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन

 

जालना दि.16 (जिमाका): नोकरीच्या शोधात असलेल्या जालना जिल्ह्यातील युवक-युवतींना विविध खासगी कंपन्या, कारखाने, उद्योग-व्यवसाय आणि आस्थापना यांचेकडील रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याच्या उद्देशाने तसेच रोजगार सहाय्यासाठी विशेष मोहिम सुरू करण्यात आली आहे. याप्रमाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र,जालना यांचे मार्फत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, 2 रा मजला जिल्हाधिकारी कार्यालय जालना 431203 येथे दि. 21 मे, 2025 बुधवार रोजी प्लेसमेंट ड्राईव्ह-जागेवर निवड संधीचे आयोजन सकाळी 11 ते दुपारी 2 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. यासाठी टी.व्ही.एस. सप्लाय चैन सोल्युशन्स प्रा. लि. पुणे दहावी, बारावी, आयटीआय/पदवीधर बी.ए, बी.कॉम, बी.एसी उत्तीर्ण करिता फ्लोअर स्टाफ चे 50 पदे, डाटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी कोपा,आयटीआय / MS-CIT कॉम्पुटर ऑपरेटर उत्तीर्ण करिता 10 पदे, टो ऑपरेटर करिता डीझेल मेकेनिकॅल, ट्रक्टर मेकेनिकॅल, मोटार मेकेनिकॅल उत्तीर्ण करिता 50 पदे, तसेच अन्नपूर्णा फायनन्स  प्रा.लि. जालना यांची दहावी, बारावी, पदवीधर उत्तीर्ण करिता फील्ड क्रेडीट एक्झीकेटीव्हसाठीचे 20 पदे, मार्केटींग एक्झीकेटीव्ह करिता कोणतीही पदवी उत्तीर्णकरिता 20 पदे, अशी एकूण 120 रिक्तपदे प्राप्त झालेली आहेत. याकरीता नोकरी इच्छुक पात्रताधारक उपस्थित होणा-या उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यात येवून जागेवरच निवडीची संधी उपलब्ध आहे. जालना जिल्ह्यातील नोकरी इच्छुकांनी या संधीचा लाभ व अधिक माहिती घेण्यासाठी विभागाच्या www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. त्याच प्रमाणे केंद्र शासनाच्या एन.सी.एस. पोर्टलवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी देखील www.ncs.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी. यापूर्वी नोंदणी केली नसल्यास प्रथम आपली नोंदणी करावी आणि होम पेज वरील नोकरी साधक (Job Seekar) लॉगिन मधून आपल्या युजर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगिन करावे. त्यानंतर डॅसबोर्ड मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून जालना जिल्हा निवडून त्यातील [PLECEMENT DRIVE 1 (2025-26) JALNA] याची निवड करावी. उद्योजक/नियोक्तानिहाय त्यांच्या कडील रिक्त पदांची माहिती घ्यावी. याप्रमाणे आवश्यक किमान पात्रता धारण करीत असल्याची खात्री करून उपलब्ध असलेल्या रिक्त पदासाठी ऑनलाईन पद्धतीने आपला पसंती क्रमांक नोंदवावा आणि किमान दोन प्रतीत बायोडाटासह फोटो, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता, इ. कागदपत्रे कंपनींना देण्यासाठी छायाप्रती संच सोबत ठेवून दिनांक 21 मे, 2025 बुधवार सकाळी 11 ते दुपारी 2 प्रत्यक्ष मुलाखतीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, प्रशासकीय इमारत, 2 रा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय जालना 431203 येथे उपस्थित राहून या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये सहभागी व्हावे आणि रोजगाराच्या या पर्वणीचा निश्चित लाभ घ्यावा असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, जालना यांनी केले आहे.

-*-*-*-*-*-