Wednesday, 4 December 2024

सामाजिक संस्थांपासून व्यापारी महासंघापर्यंत सर्वांनी लोकशाही मजबूत करण्याचे कार्य केले - डॉ. पांचाळ

 

मतदान टक्केवारी वाढविण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा सन्मान
    



          जालना,दि.4 (जिमाका) :- जालना जिल्ह्यातील नागरिकांनी लोकशाही मूल्यांची जाणीव ठेवत मतदान प्रक्रियेत उत्स्फुर्तपणे सक्रिय सहभाग घेतला, ही कौतुकास्पद बाब आहे. सामाजिक संस्थांपासून व्यापारी महासंघापर्यंत सर्वांनी एकत्र येत लोकशाही मजबूत करण्याचे कार्य केले, त्यामुळेच मतदानाच्या टक्केवारीत जालना जिल्हा मराठवाड्यात प्रथम तर राज्यात तिसऱ्या स्थानावर राहिला, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी आज (दि. 4) रोजी येथे केले.
                विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत जालना जिल्ह्याने मतदानाच्या उच्च टक्केवारीत महाराष्ट्रात तृतीय आणि मराठवाड्यात पहिल्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांचा कॅट अंतर्गत व्यापारी महासंघ जिल्हा जालना यांच्यावतीने विशेष सन्मान करण्यात आला, त्यावेळी सत्काराला उत्तर देताना डॉ. पांचाळ बोलत होते. ते पुढे म्हणाले की, हा पुरस्कार माझ्यासाठी नव्हे, तर जिल्ह्याच्या प्रत्येक नागरिकासाठी आहे. यापुढेही आपण असेच संघटित राहून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करत राहू.
             सन्मान पत्राचे वाचन  सतीश पंच यांनी केले. सन्मान सोहळ्याचा उद्देश विषद करताना ते म्हणाले की, व्यापारी महासंघाने जालना जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या उल्लेखनीय मतदानासाठी कौतुक करण्यासाठीचा हा सन्मान सोहळा आहे. जिल्ह्याच्या प्रगतीसाठी पुढील काळात सामूहिक प्रयत्न करण्याचा संकल्प आपण सर्व मिळून करूयात, अशी साद त्यांनी घातली. कॅटचे मराठवाडा अध्यक्ष हस्तीमल बंब यांनी मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न करणारे जिल्हाधिकारी डॉ. पांचाळ, जिल्ह्यातील व्यापारी आणि नागरिकांचे आभार मानले आणि व्यापारी महासंघाची लोकशाहीसाठी बांधिलकी अधोरेखित केली.
                      याप्रसंगी व्यापारी महासंघाचे पदाधिकारी दीपक भुरेवाल, रामकुवर अग्रवाल, संजय लव्हाडे, अशोक हुरगट, अशोक मिश्रा, महिंद्रा कुमार भक्कड, किशन भक्कड, अनिल लोढा, सुनील रुणवाल, पुरुषोत्तम अग्रवाल, श्रीधर देशपांडे, कैलास इघारे, अनिल व्यवहारे, ईन्नरव्हील क्लब ऑफ जालना होरायझनच्या अध्यक्ष ॲड. अश्विनी धन्नावत, सचिव ॲड. पिंकी लड्डा आदींची उपस्थिती होती.

                                                                       ****

No comments:

Post a Comment