Monday, 12 July 2021

आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढवा जिल्ह्यात कोरोना पॉझिटीव्हिटीचा दर वाढणार नाही यासाठी खबरदारी घ्या जिल्ह्यातील कोरोनामुक्त ग्रामपंचायतींची निवड करून उत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन सन्मानित करणार -पालकमंत्री राजेश टोपे

 




       जालना, दि. 12 (जिमाका):-  कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यात आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढविण्यात यावी. तसेच लसीकरण केंद्रांची संख्या वाढवत  लसीकरण गतीने करण्याचे निर्देश देत जिल्ह्यात कोविड 19 मुक्त गावांची  तपासणी करण्यात येऊन उत्कृष्ट ठरणाऱ्या  प्रत्येक तालुक्यातून तीन  ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहितीही राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटूंबकल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

       जालना जिल्ह्यातील कोरोनाच्या परिस्थितीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.  त्याप्रसंगी उपस्थित अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पालकमंत्री श्री टोपे बोलत होते.      यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परीषद मनुज जिंदाल,अप्पर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उप विभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव, उप विभागीय अधिकारी श्री कोरडे, जिल्हा शल्यचित्किसक डॉ. अर्चना भोसले, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विवेक खतगावकर, कल्याणराव सपाटे, डॉ. संजय जगताप, नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी नार्वेकर, अन्न व औषध विभागाच्या श्रीमती अंजली मिटकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.

 

        पालकमंत्री श्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यात कोविड 19 मुक्त झालेल्या ग्रामपंचायतींची  जिल्हास्तरीय पथकामार्फत तपासणी करण्यात येऊन प्रत्येक तालुक्यातुन  उत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतींच्या तपासणीवेळी 80 टक्के गुण हे लसीकरणसाठी, 10 टक्के गुण हे आरटीपीसीआर व अँटिजेन  तपासणी व 10 टक्के गुण हे कोविड 19 च्या अनुषंगाने मास्क, सॅनिटायझरचा वापर तसेच सुरक्षित अंतराचे पालन या बाबींचे कटाक्षाने पालन करण्यासाठी  देण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून तीन या प्रमाणे 24 ग्रामपंचायतीची  व जिल्हास्तरावर एक अशा एकूण 25 ग्रामपंचातीची निवड करण्यात येणार असून 15 ऑगस्ट रोजी या ग्रामपंचायतींना बक्षीस व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी दिली.

          जालना जिल्ह्यामध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी होताना दिसत असून त्याची संख्या वाढविण्याची गरज आहे. लोरिस्क व हायरिस्क सहवासितांचा शोध घेऊन त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या करण्यात याव्यात.   जालना जिल्ह्याचा कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर हा आजघडीला जरी कमी असला तरी हा दर भविष्यात वाढु नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश देत  ज्या बालकांना सर्दी, ताप, खोकला, अंगदुखी अशा प्रकारची कोव्हीडची लक्षणे असतील अशा प्रत्येकाची तपासणी करण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.  

       कोरोनाचा प्रादुर्भाव वाढु नये यासाठी मास्क, सुरक्षित अंतराचे पालन याबरोबरच लसीकरणही तेवढेच महत्वाचे आहे.  जालना जिल्हा लसीकरणाच्या बाबतीमध्ये ईतर जिल्ह्यांच्या तुलनेमध्ये मागे राहू नये यासाठी ग्रामीण भागात लसीकरणाबाबत अधिक दक्षपणे जनजगृती करण्यात यावी.  जिल्ह्यात लसीकरणासाठी केंद्रांच्या संख्येत अधिक वाढ करण्यात येऊन सातही दिवस लसीकरण केले जाईल, यादृष्टीने नियोजन करण्याबरोबरच दैनंदिन लसीकरणाचे उद्दिष्ट ठरवुन देण्यात यावे.  लसीकरणाच्या या राष्ट्रीय कार्यक्रमामध्ये प्रत्येक नगरपालिका, नगरपंचायत, तहसिल कार्यालय, उप विभागीय कार्यालयांनी हिरिरीने सहभाग नोंदवत ही मोहिम यशस्वी करण्याच्या   सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी दिल्या.

 

  राज्य शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंध कडक केले आहेत.  सायंकाळी 5 वाजेनंतर मुक्त संचारास बंदी करण्यात आली आहे.  लग्नसमारंभ तसेच सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार  नाही. तसेच विनामास्क कोणीही फिरणार नाही, यादृष्टीने काळजी घेत शासनाच्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घेण्याच्या सुचनाही पालकमंत्री श्री टोपे यांनी यावेळी केल्या.  

-*-*-*-*-*-*-

No comments:

Post a Comment